शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं,
त्यांना कधीच विसरलो आहोत...
त्यांच्या नावानं जे पुढारले,
त्यांच्यावरच विसंबलो आहोत...
15 ऑगस्ट, 26 जानेवारी...
मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील..
सुट्टी जर जोडून आली,
तर फारच बहार आणतील...
तीन-चार दिवस स्वातंत्र्याला,
बघा कसं उधाण येईल..
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले,
त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल...
जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी,
पुन्हा कशाला आठवायच्या..?
असे जर म्हणत असाल,
तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..?
आपण करतो मौज-मजा,
त्यांनी सांडलेल्या रक्तावर..
आपण उपभोगतो स्वातंत्र्य,
त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर...
देशासाठी मेले ते...
स्वातंत्र्य देऊन गेले ते...
आज निदान आठवूया,
थोडी लाज बाळगूया...
मजा करू, मस्तीही करू...,
पण इतकं थोडं भान पाळू...
एकतरी छोटं फूल
आज त्यांच्यासाठी माळू...
खरे तर त्यांना नकोय उत्सव,
नकोय मान, नकोय छदाम..
कृतज्ञतेने इतके तरी देऊ....
दोन अश्रू आणि एक सलाम..!
- कवी : अजय अनंत जोशी
प्रतिक्रिया
17 Aug 2014 - 6:31 pm | सस्नेह
आहे कविता.
जवान अन शहीदान्साठी कायपण !
18 Aug 2014 - 1:58 pm | वेल्लाभट
सलाम तर आहेच त्यांना.
पण तुमची कविताही छान!