लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग २
संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक
‘... खेडी बदलू लागली, देश स्वतंत्र झाला आणि काळाने विलक्षण वेग घेतला. खेड्याचा कायापालट झाला असे आपण म्हणतो. हा कायापालट कसा झाला आहे, काय झाला आहे. ह्याचा नीट तपास घ्यायचा तर कोट्साहेबाने जसे कुठलेतरी एक लोणी गाव घेऊन त्यांचा सांप्रत वृतांत लिहिला, तशी महाराष्ट्रातील दहा-पाच खेडी घेऊन त्यांचा लिहिला पाहिजे. लोकांना भेटून, बोलून, प्रत्यक्ष स्थिती डोळ्यांनी पाहून आजच्या खेड्याचे चित्र रेखाटले पाहिजे....’
‘लोणी गावातील काही स्थळांना, लोकांना भेटलो. मिळवलेली माहिती माडगुळकरांनी मांडलेल्या विचारांचा मान राखत कशी सादर करावी असे विचार परतताना येत होतो. त्याचा हा छोटेखानी वृतांत.
...
भाग २ पुढे चालू...
कोट्स लिहितात, 'गावात प्रवेश केल्यावर एकंदरीत दृष्य पाहताक्षणी चित्त वेधण्यासाऱखे नाही. जिकडे तिकडे घाण आणि दारिद्र्य भरलेले दिसते. कुठेही नियमितपणा, नीटनेटकेपणा किंवा संपन्नता दिसत नाही. दुरून जी मातीच्या पडक्या भिंतीसारखी दिसतात, तीच गावकऱ्यांची घरे आहेत. ही घरे पांढऱ्या मातीची, उन्हात वाळवलेल्या विटांनी बांधलेली असतात. मातीची धाबी घरावर आहेत. काही घरे अगदी पडीक असून तेथे कोणी राहत नाही. काही घरांची छपरे गवताने शाकारलेली आहेत. ज्यांना याहून चांगली जागा मिळवण्यासाठी काही साधन नाही, असे दरिद्री लोक व त्यांची गुरे ह्यातून कशीबशी राहतात. गावातील सार्वजनिक इमारत म्हणजे महादेव, हनुमान, भैरव ह्या देवांची देवळे, एक पडझड झालेली मशीद आणि चावडी. गावातील घरे वाटेल तशी बांधलेली दिसतात. त्यात काहीही सुसूत्रता दिसत नाही.घरांच्या मधून अरुंद वाकडे तिकडे आणि गलिच्छ बोळ आहेत. कधी कधी तीन चार घरे एकमेकांना लागून असतात तर कधी दूर दूर असतात. घरे जशी संरक्षणासाठी बांधलेली दिसतात. आत इतका काळोख आणि उदासीनता दिसते की त्यात राहणारी माणसे माणुसघाणी असावीत असे वाटते... '
माडगूळकर म्हणतात, ' शंभरवर्षे जाऊनही गावचे दृष्य, गावाभोवताली असलेली शेतजमीन, महारवतने, लोकांची राहणी, पोषाख, सणसमारंभ. जेवण-खाण. कर्ज-सावकार, शेतीची पद्धती, निकृष्ट गुरेढोरे, वाया जाणारा वेळ हे सर्व जसेच्या तसेच राहिले होते.'
श्री. धुर्ये यांचा एकशे पंचवीस वर्षांनी बनवलेला वृतांत सांगतो, ' गावाला आता ग्रामपंचायत झालेली होती. एकोणीसशे अकरासाली डि. लोकल बोर्डाने शाळा सुरु केली होती. त्यामुळे कोट्सच्या काळी फक्त ब्राह्मण, पाटील आणि वाणी शिक्षण घेत, तेथे सन एकोणीसशे अठ्ठावन्नमधे रोटरी क्लब, मुंबईचे व्यापारी व गावकऱ्यांच्या मदतीने पाच खोल्यांच्या शाळेत नऊशे त्र्याण्णव मुले शिकत होती. ' देवळे तीन ऐवजी सहा झाली होती. बिरोबाचे महात्म्य नाहीसे झाले होते. कोट्याच्या काळात गावात प्रसिद्ध असलेले पिपरीबुवा हे भूत अजुनही जीवंत होते. दसऱ्याला रेडा बळी देण्याची पद्धत बंद झाली होती.लोकसंख्या वाढली होती. गुलाम आता नव्हते. गावात सायकली आल्या होत्या. चहाची दोन दुकाने, पिठाची गिरणी व हातभट्टीचा गुत्त्यावर दारू मिळू लागली होती. ''
आता 2009 साली कसे काय चित्र होते याचे वर्णन ओकांनी प्रत्यक्ष भेट देऊन केले-
1. पुणे ते अहमदनगर चौपदरी महामार्गावरील या गावाजवळच मरावीज बोर्डाचे मोठे केंद्र झाले आहे. आसपास एका शिक्षण संस्थेची मोठी नावाजलेली आंतरराष्टीय दर्जाची शाळा आहे. तेथूनच आळंदीला जाणारा व संभाजीराजांच्या वधाचे स्मारक असलेल्या तुळापुर - वढूला जाणारा रस्ता फुटतो. फुलगावही अध्यात्मिक चाहत्यांना आवडीचे गाव आहे. त्यामुळे लोणीकंद गावाला जवळच्या वाघोली व कोरेगाव भीमाच्या पेक्षा जास्त प्रतिष्ठा प्राप्त आहे.
2. गावाची लोकसंख्या आता सहा हजाराच्यावर आहे. उदरनिर्वाहासाठी लोकांचा शेतीवरील भार कमी झाला आहे. कारण आता लोकांना आसपासच्या कारखान्यात आणि वाघोली (सहा किमीवर) येथील पंधरा-सोळा दगडाच्या खाणीत कामे मिळतात. ज्या क्रिस्टल दगडासाठी वाघोली शैल जगप्रसिद्ध आहे, ती दाभाड्यांची खाण भावडी रस्त्यावर आहे. मात्र ज्यांची अजुनही शेती आहे, ते लोकवान गहू, ज्वारी, तूर, मूग, पालेभाज्या यांची शेती करतात. शेतमाल ट्रकने भरून पुणे व मुंबईच्या पेठेला पाठवला जातो.
3. अजुनही गल्ल्याबोळ आहेत पण त्यांना डांबराचे कवच आहे. ड्रेनेजची व्यवस्था असल्याची खूण म्हणून सिमेंटची गोल चेंबरे रस्त्याच्यावर आलेली दिसतात.
4. सायकलींचा भाव पडला होता. कमी आवाजाच्या मोटर सायकली तुरळक होत्या पण सिक्स सीटर उर्फ छकडा (वडाप) पुण्याच्या वेशीवरील येरवड्यापर्यंत जाण्यासाठी पीसीएमसी बसेसपेक्षा जास्त लोकप्रिय.
5. साठीच्या वरील काही लोक आजही धोतरात दिसतात. पण पँट- शर्ट, टी शर्टात तमाम पब्लिक सर्रास होते. टीव्ही व सिनेमाच्या प्रभावाने मुलींचा पोशाखही साडी न राहता पंजाबी ड्रेस झाल्याने त्यांच्यातील मराठी गावंढळ व लाजरेपणा कमी झाला आहे. मात्र 'बसु विद्याधाम' या मुलामुलींच्या शाळेमधील गणवेशात मुलांना गांधीटोपी सक्तीची असल्याने ती आवर्जून मुलांच्या डोक्यावर असते. प्रत्येकाच्या पायात कमीतकमी स्लीपर असते.
6. हमरस्त्याजवळ जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा व ग्रामनिधी अंतर्गत महिला अस्मिता भवन, पोलिस स्टेशन व ग्रामपंचायतीची इमारत साधारण 2000सालापासून दिमाखात उभे आहे. कॉलेजसाठी आजही वाघोलीला किंवा पुण्यास जावे लागते.
7. हमरस्यावरच 1998 साली जीर्णोद्धार केलेले म्हसोबाचे बिन छपराचे देऊळ (?) तसेच आहे. तेथे पाडव्यानंतर रामनवमीच्या आधी दोन दिवसांचा उरूस भरतो. त्यात कुस्त्यांचा फड लागतो. तमाशाचे कार्यक्रम होतात. सोंगे घेणे बंद पडले आहे. बकऱ्याचा बळी देऊन सांगता होते.
8. बलुतेदारांपैकी सुतार, न्हावी, बुरुड, धनगर, टिकून आहेत. सराफांच्या पेढीत सोनारांना सामावले आहे.चांभार फक्त छत्र्या व चपला दुरुस्तीसाठी उपयोगी पडतो.
9. महार, मांग आदींची घरे आहेत पण नवसमाजरचनेमुळे बलुतेदारांच्या जातींचा उल्लेख टाळला जातो. त्यांचे राहणीमान बदलल्याचे जाणवते. पण काही झोपड्या व पत्र्याच्या चाळ वजा घरात डोकावले तर दारिद्र्याचे दर्शन होते.
10. भैरव, महादेव मंदिरे अजून आपले अस्तित्व टिकवून आहेत. हनुमानाचे मंगलोरी कौलांचे छप्पर असलेले मंदीर चावडीजवळ आहे. तेथेच गाववेशीचा "गडधू" होता. 2003-4 मधे चावडीच्या नव्या इमारतीच्या बांधकामाच्या धामधुमीत गडधूला तेथून परागंदा व्हावे लागले असावे. तो आता एकांच्या परसदारी चुपचाप पडलेला आहे. तीच वेळ या खालील दगडी डमरु सदृ्ष्य एका पत्थरावर आली आहे.
11. गावात नजर टाकता आता काळी मातीची कौले जाऊन मंगलोरी कौलांनी आपले बस्तान बसवले आहे. तर अनेक चुन्या-विटांच्या घरांना बाहेरून सिमेंटचा गिलावा करून रंग लावलेला दिसतो. काही ठिकाणी टीव्हीच्या डिशछत्र्या वाकडी मानकरुन लोणीचे शहरीपण दर्शवतात.
12. पिंपरीबुवा भूत स्थान आता "वेताळबुवा "नावाने बस्तान ठोकून आहे. पण ते आता कोणाला पछाडताना दिसत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले.
13. विठोबाचे मंदिर अत्यंत क्षीण झाले तरीही तग धरून आहे. वारीच्या वेळी काही पांथस्थ त्याचा आश्रय घेतात असे आसपासच्या रहिवाश्यांनी सांगितले.
14. एक गोष्ट आणखी कळली की लोणी गावी गोराजीच्या काळात टपाल व्यवस्थेचा भाग म्हणून आठ घोड्यांची पागा व तबेला हमरस्त्यावर म्हसोबाच्या देवळाच्या विरुद्ध दिशेला होता. काळाच्या ओघात ते नष्ट झाले. मशीदही आहे.
15. कोट्स यांच्या उताऱ्यात सन 1820च्या वेळच्या काही वस्तूंच्या किंमती सांगितल्या आहेत. 2009 च्या सांप्रतकाळी, वस्तुंच्या किंमती आजच्या वाचकांना माहित असतील पण हा लेख नंतरच्या काळात कोणास निदर्शनाला आल्यास त्यांच्या सोईसाठी पुण्याच्या मार्केटयार्डातील बाजारसमितीचे (भावांबद्दल घोळ होऊ नये म्हणून सकाळ मधे छापुन आलेले) घाऊक भाव नोंद करीत आहे. थोड्याफार फरकाने त्याच किंमती आजच्या लोणीसारख्या खेडेवजा गावाला लागू आहेत असे ग्रामस्थांशी चर्चेत कळले. (आज दि. 26 मे 2014 मोदींचे सरकार देशाच्या राज्यकारभाराचे सूत्र हाती घेतल्यावर विविध बाजार भाव (सकाळ पेपरात) काय होते याची नोंद करत आहे. नंतर हे भाव मोदींनी निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनांशी किती जवळीक साधतात याचा ही पडताळा घेता येईल. २००९ सालच्या बाजार भावानंतर २०१४ सालचे बाजार भाव कंसात सादर)
16. धान्ये प्रती रु, किलो/ लिटर- तांदूळ साधा 17ते 36(30ते 35), अंबेमोहोर 40 (58ते 60), बासमती 18ते 90 (33 ते 145), साखर - 28 ते 32(31), गहू - 13 ते 18(20 ते 38), ज्वारी -10 ते 15(23ते 32), गूळ - 26 ते 30(19ते 34), डाळी- तूर 72 ते 85(56 ते 65), मूग - 58 ते 62 (92ते100), मटकी- 52 ते54(75 ते 77), हरभरा - 31 ते 34(35 ते 49). पोहे -17 ते 22(25 ते 35), मुरमुरे -भडंग 36(56), नारळ 8 ते 12(92 ते 119). तेल (प्रती लिटर) - शेंगदाणा – 70 (105), सोयाबीन -52 ते 56(108 ते 118). वनस्पती - 43 ते48(96 ते 114), खोबरेल -55 ते 60(55 ते 66). दूध -24(42) गाय म्हैस – 30(48).
17. भाजीपाला – कांदा 14(14ते 16), - , बटाटा -15(22), टॉमॅटो -20(20), मटार – 60(80), मिरची – 20(22), कोबी – 30(12), फ्लॉवर – 50(28) , मेथी - जुडी - 6-8 (14 ते 16) , पालक – 6(16), आळू – 2(2), शेपू – 2(10), कढीपत्ता – 1(2), कोथिंबिर – 8(15), लिंबू - नग – 2(2).
18. फळे - सफरचंद किलो- 100 (150), संत्रा - 60-70(120) , पपई -10 (14), चिकू -40(30), कलिंगड - 40-50(5-10किलो), सिताफळ - 4 , पेरू नग - 5, शहाळे -3-8(20ते 30) ,
19. दूध लिटरला - गाय 24(42) , म्हैस – 28(48). चहा कप -5-7(7-10), कॉफी - 6- 8(10-15) व उपहाराचे पदार्थ (मेनूकार्डावरून)- उपमा - 8 -12 (20), इडलीवडा प्लेट -15 ते 25 (25 ते 35), डोसा - 25 -35(40- 50), टोस्ट आमलेट - 18 – 25(20-30),
20. अंडी प्रती नग -2.20 (3-4), चिकन - जिवंत 56(90), ड्रेस्ड् -73(122),.मटन – 220(380).
21. केबल टीव्ही विभागाप्रमाणे 150 ते 340 (340-490) दरमहा, न्यूजपेपर - 2-3(4-5), मासिके - 25 ते 40(35-50),
22. पेट्रोल- 51(81), डीझेल 47(64), चलन रुपयात - डॉलर - 47.81(59), पौंड - 79.51(99), युरो - 67.83(80).
23. सोने-प्रती - दहाग्रॅम रु.14940(28400). चांदी - रु. 2345(4177).
यामधे इतरांनी भर घालून या सांप्रत वृतांताला वेऴोवेऴी ताजा ठेवावा अशी विनंती.
प्रतिक्रिया
6 Jun 2014 - 2:12 pm | कवितानागेश
वाचतेय..
7 Jun 2014 - 2:39 pm | शशिकांत ओक
रिपोर्ट वाचून झाला असल्यास प्रतिसाद अपेक्षित!
7 Jun 2014 - 4:01 pm | ढंप्या
तौलनीकता छान साधली आहे....
पण एका गोष्टीचे आश्चर्य वाटतेय की, इतकी वर्षे (अदमासे २०० वर्षे) होऊन पण बाकी बलुतेदारांपैकी 'कुंभार समाज' इथे अस्तित्वातच नाहीये......!!
तरीही बलुते पूर्ण चालू आहे....
7 Jun 2014 - 11:45 pm | शशिकांत ओक
मित्रा,
नाव न घेता घराला लागणाऱ्या विटा, कौले, बेंदराला बैल, गणपती आदी मूर्ति करायची वहिवाट उल्लेख केला गेला नसला कुंभार समाजाच्या अस्तित्वाची साक्ष देतो. असे वाटले...
9 Jun 2014 - 1:13 pm | बॅटमॅन
तौलनिक रिपोर्ट लय आवडला.
9 Jun 2014 - 8:20 pm | शशिकांत ओक
मित्रांनो, लोणीकंद गावाचे हे प्रतिनिधिक स्वरूपाचे चित्र आहे. मिपावरील सदस्यांना विनंती की ते ज्या गावात बालपणात होते ्त्या ठिकाणी आता काय स्थिति आहे याची नोंद अशा प्रकारे अशा धाग्यातून सादर करावी.
6 May 2020 - 11:08 pm | शशिकांत ओक
या धाग्यावर सादर केलेल्या फोटोवर त्रिकोणात उद्गार चिन्ह पाहून वाईट वाटले...
ते फोटो परत दिसावेत म्हणून काय करावे याचे मार्गदर्शन केले तर आभारी राहीन.