बरेच दिवसांनी नवर्याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्या बर्याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली. जनरलच्या डब्यात आधीपासूनच उभे असलेले लोक पाहिले आणि हे आपलं काम नव्हे याची खूणगाठ बांधत स्लीपरच्या डब्याकडे धाव घेतली.
४/५ डबे मागे चालत गेल्यावर एका डब्यात एक अख्खं बाक रिकामं दिसलं. टीसी येईपर्यंत बसून घेऊ म्हटलं, आणि काही मिनिटांतच टीसीसाहेब अवतीर्ण झाले. आमच्याकडे जनरलचं तिकीट आहे आणि फरकाचे पैसे भरून बर्थचं तिकीट दिलंत तर उपकार होतील असं सांगताच त्यांनी इतर काही बिनापावतीचे इ. सूचक वगैरे न बोलता पावती फाडून हातात ठेवली आणि बर्थ क्रमांक १,२ वर बसा म्हणाले. आता अधिकृतपणे आमच्या झालेल्या सीटखाली हातातली बॅग टाकली. चपला काढून पाय वर घेऊन मांडी ठोकली आणि अंग सैल सोडलं.
तिकिटाचा यक्षप्रश्न सुटल्यानंतर कंपार्टमेंटमधल्या इतर मंडळींकडे आपसूकच लक्ष गेलं. समोरच्या सीटवर एक टिपिकल मंगलोरी 'पेढा' आणि त्याची नवथर बायको बसले होते. खूपच तरूण दिसत होते. दोघांची चेहरेपट्टी आणि ठेवण बरीच एकसारखी. बहुधा जवळच्या नात्यातले असावेत आणि आता नवपरिणीत. ते त्यांच्या विश्वात अगदी गुंग होते. बायको लहान मुलासारखी लहान सहान हट्ट करत होती आणि पेढ्याला त्यात फारच मजा येत असावी असं दिसत होतं. त्यांचं कन्नड बोलणं थोडफार कळत असलं तरी मी कळत नसल्याचा आव आणला.
त्यांच्या बाजूला सगळ्यात वरच्या बर्थवर एक माणूस डोक्यावर पांघरूण घेऊन गाढ झोपला होता. सात साडेसात वाजता इतका गाढ कसा काय झोपला हा म्हणून विचारात पडले. पलिकडच्या सीटवर एक पोरगेला दिसणारा उंच तरूण बसला होता. थोड्याच वेळात त्या सीटवर एक कुटुंब येऊन बसलं आणि हा पोरगा आमच्या सीटवरच्या राहिलेल्या तिसर्या जागी सरकला. माझ्या नवर्याने त्याच्याशी जरा हसून बोलायला सुरुवात केली तसा तो घडाघडा बोलायला लागला. कारवारला नेव्हीत आहे, २० वर्षांचा आहे, पश्चिम बंगालमधे कलकत्त्याच्या पुढे कुठेतरी गाव आहे आणि अचानक सुटी मिळाल्याने निघालो आहे. इ. माहिती त्याने पहिल्या ३ मिनिटांत सांगून टाकली. त्याच्याकडे पाहताच हा एवढासा दिसणारा मुलगा नेव्हीत आहे या गोष्टीचं खरंतर हसूच येत होतं. पण त्याने लगेच एसीची नेव्हीसाठी काढलेली तिकिटेच काढून दाखवली. कारवार-मुंबई, मुंबई-कलकत्ता आणि तिथून आणखी पुढे कुठेतरी जायची तिकिटं. मात्र कन्फर्म्ड तिकीट नसल्याने त्याला एसीतून बाहेर काढले होते म्हणे. माझा नवरा त्याच्याशी आणखीही गप्पा मारत होता. मी खिडकीतून बाहेर नजर टाकली. झाडे घरे हळूहळू काळोखात गडप होत होती.
एकदाचं खास रेल्वेच्या चवीचं जेवण जेवून झालं. म्हणेपर्यंत गाडी कणकवलीला येऊन थांबली. ते कुटुंब तिथे उतरून गेलं आणि आणखी दोघेजण येऊन झोपून गेले. आमच्या कंपार्टमेंटमधे एकजण येऊन हातातल्या तिकिटाकडे पाहू लागला. सगळ्यात वरच्या बर्थवर झोपलेल्या महाशयांना भरपूर हलवल्यानंतर ते उठले आणि आपल्या खिशातलं तिकीट काढून दाखवायला लागले. हा नवा आलेला माणूस म्हणे, "अहो माझं कन्फर्म्ड तिकिट आहे. तुमचं तिकीट कन्फर्म्ड कुठे आहे?" तो आधीचा म्हणतोय, "मला एसेमेस आलाय पण!" शेवटी त्याने आपला एसेमेस दाखवला. बघितलं तर Sl हे त्याने S1 असं वाचलं होतं आणि आणि त्यापुढचं S6 म्हणजे ६ नंबरचा बर्थ समजला होता. मग त्याची रीतसर S6 मधे ४८ नंबरच्या सीटवर रवानगी झाली आणि नवा आलेला त्याच्या जागी झोपून गेला.
जरा वेळाने टीसी साहेबांनी येऊन या नव्या माणसांची त्यांना झोपेतून उठवून रीतसर चौकशी केली. नेव्हीतल्या पोराला "तेरे पास कन्फर्म्ड टिकट नही है ना, अभी अगले स्टेशन पर दूसरे लोग आएंगे तब तुम्हे उतार दूंगा" असा दम भरला आणि एक डोळा मिचकावत हसले. पुढच्या स्टेशनावर स्वत: टीसी साहेबांचीच ड्युटी संपणार होती. "क्या करें साब, हम लोगों को सोने को जगह मिली तो सोएंगे, मिलिटरी के लोगों को ऐसे जागते रहने की आदत रहती है" असं म्हणत नेव्हीवाल्याने संभाषणाचे धागे विणणे पुढे सुरू केले.
समोरचा मंगलोरी आणि त्याची नवपरिणीता यांचे विभ्रम सुरूच होते. तिने खालच्या बर्थवर अनोळखी पुरुषांसमोर झोपावे हे त्याला पसंत नव्हतं, तर तिला खिडकी उघडी टाकून झोपायचं होतं. त्याने तिची रवानगी मधल्या बर्थवर केली तर १० मिनिटांतच ती तक्रार करत खाली उतरली आणि हट्ट करून खालच्या बर्थवर झोपून गेली. तिने बाजूला निष्काळजीपणे टाकलेली पर्स बघून आश्चर्यच वाटलं. थोड्या वेळाने तिच्या नवर्याला म्हटलं, खिडकीचं शटर बंद करा, नाहीतर कोणीतरी खिडकीतून हात घालून पर्स पळवून नेईल. त्यालाही ते पटलं आणि त्याने तत्परतेने शटर बंद केलं.
कंपार्टमेंटमधल्या बहुतेकांनी आडवं होऊन नाहीतर बसल्या जागी निद्रादेवीची आराधना सुरू केली होती. मग मी त्या सगळ्यांकडेच दुर्लक्ष करून परत खिडकीबाहेर नजर वळवली. समोर आलेल्या आकाशाच्या तुकड्यात मृग नक्षत्र सहजच ओळखू आलं. त्याच्या पोटातला बाण आणि आणि तो मारणारा व्याधही दिसला. आणखी एक ओळखीचा एम सारखा आकार दिसला. शर्मिष्ठा बहुतेक. क्षितिजाजवळ बहुधा शुक्र दिसत होता. एकदम आठवण झाली. आई हे सगळे ग्रह, तारे, नक्षत्रं, राशी ओळखायला शिकवायची.
मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं. एका साध्यासुध्या बैठ्या घराच्या अंगणात. चोपून तयार केलेलं लख्ख अंगण. त्याच्या कडेने लावलेले चिरे, आणि त्या चिर्यांच्या पलिकडे ओळीत लावलेली अनेक फुलझाडं आणि शोभेची झाडं. तगर, कण्हेरी, बिट्टी, कुंद, मोगरा, नेवाळी, लिली, गावठी गुलाब, वेलगुलाब, अगस्ती नाना प्रकार. त्या लहान झाडांच्या पुढे पाण्याची दगडी पन्हळ, पाण्याने भरलेली दोण, आणि माड, आंब्याची कलमं, चिकू, रामफळ, कोकम अशी मोठी झाडं. या माडांच्या मुळात सतत पाणी शिंपल्यामुळे ओलसर मऊ माती असायची आणि बाजूला दुर्वा. पलिकडे एक लहानसं शेत आणि त्याही पलिकडे बांबूचं बेट. घराच्या मागच्या बाजूलाही प्राजक्ताची श्रीमंती उधळत असायची.
अंगणाच्या छोट्या भागात पत्र्याचा मांडव घातला होता. पण आमचा वावर बराचसा मोकळ्या आकाशाखालीच असायचा. तिन्हीसांजा वडील अंगणात फेर्या मारत रामरक्षा म्हणायचे. कधी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणायचे. आई पण काम करता करता असं काही म्हणायची. त्यांच्यामागून फिरताना आम्हालाही ती पाठ होऊन गेली होती. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. रात्री नीरव शांततेत माड झावळ्या हलवत उभे असायचे. सगळी फुलझाडं पाणी पिऊन प्रसन्न झालेली असायची. जेवणं झाली की कधी मर्फीचा रेडिओ पण आम्हाला सोबत करायला त्या अंगणात येऊन गाणी गायचा. रात्रीच्या वेळी लता, रफी, तलत, अरुण दाते सगळ्यांचेच आवाज जादुई भासायचे. आईला वेळ मिळाला की ती गीतेचे अध्याय म्हणून घ्यायची आणि आकाशातले ग्रह तारेही ओळखायला शिकवायची. आता तर कित्येक दिवसांत आकाशाकडे लक्षच जात नाही. पण कधी गेलंच तर आपसूक तार्यांची नावं डोक्यात यायला लागतात.
त्या स्वप्नातल्या गावात पोचून मी परत एकदा लहान झाले. “आता ते गाव आणि ती माणसं राहिली नाहीत ग! सगळंच फार बदललंय” हल्लीच मैत्रीण म्हणाली होती. तिचं सासरही त्याच गावात असल्याने तिचा गावाशी संबंध राहिला आहे, आणि तोही भलेबुरे सगळेच अनुभव घेत. “असू दे ग! आता आपण तरी त्याच कुठे राहिलोय!” मी म्हटलं होतं. आणि तरीही ‘मैत्री’ या शब्दाचा अर्थही माहित नसलेल्या कोवळ्या वयातल्या मैत्रीला जागून इतक्या वर्षांनी तिने मला आंतरजालावरून शोधून काढलंच होतं!
इकडे गाडी आपली अशीच अनेक विश्वं पोटात घेऊन धावतच होती, बोगदे, डोंगर, नद्या, झाडे, घरे मागे पडत होती. कुठे बोगद्यात दिवे लागलेले असायचे तर कुठे कामगार मंडळी टॉर्च घेऊन उभी असायची. ते सगळं दिसत होतं आणि नव्हतंही. जवळच्या सगळ्या गोष्टी गाडीच्या मागे पडत होत्या, मात्र सुदूर अंतरावरचा तो तार्यांनी भरलेला आकाशाचा तुकडा गाडीला सोबत करत गाडीबरोबर पुढेच येत होता! आणि इतर कोणाला न सांगता मी खास माझ्या अशा एका अद्भुत प्रवासात रंगून गेले होते. आणखी एक ओळखीचा अस्पष्टसा आकार दिसला. कृत्तिका. अरे, पण या एवढ्या अस्पष्ट का दिसतायत! आता डोळ्यांना लांबचा नंबरही आला की काय! तेवढ्यात लक्षात आलं, क्षितिजाजवळ डोंगरावर दिवे दिसताहेत, त्यांच्यामुळे तिथे काळोखाचा गर्दपणा कमी झालेला होता आणि मग जरा हुश्श्य वाटलं.
लवकरच गाडीने लक्षात येईल असं एक वळण घेतलं आणि बाहेर दूरवर काळोखावर रांगोळी काढल्यासारखे प्रकाशाचे अनेक झगमगते ठिपके दिसायला लागले. माझ्या ओळखीच्या शहराचं पहिलं दर्शन! नेहमीच अतिशय सुखद वाटणारं. त्याने मला त्या स्वप्नातल्या गावाहून परत वर्तमानात आणलं. हळूहळू शहरातले रस्ते आणि त्यावरचे दिवे दिसायला लागले. गाडीने हलकेच ब्रेक लावल्याचा आणि रूळ बदलल्याचा आवाज जाणवला. सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे. बरचसं बदललं तरी बरचसं अजूनही बदललं नाही हे सांगणारा.
हळूहळू स्टेशनचा प्लॅटफॉर्म आणि त्यावरची लोकांची धांदल दिसायला लागली. नवर्याने बॅग उचलली. मी किरकोळ सामान उचललं, पायात चपला सरकवल्या आणि उठून उभी राहिले. आमचा आजचा प्रवास इथेच संपत होता, पण गाडी मात्र अशीच धावत पुढे जाणार होती. मंगलोरी जोडपं, बंगाली नेव्हीवाला आणि कणकवलीचा प्रवासी याना सोबत करायला माझ्या जागी दुसरंच कोणी येऊन बसणार होतं. उद्या पुढच्या प्रवासाला लागण्यापूर्वी या ओळखीच्या शहरात हौसेने घेतलेल्या घरकुलात चार घटका निवांत घालवायच्या आहेत हा विचार थंड वार्याच्या झुळकीसारखा मनात आला. आणि त्या विचाराचं अभेद्य कवच मिरवीत मी गाडीत चढू पाहणार्या स्टेशनवरच्या गर्दीत पाय ठेवला.
प्रतिक्रिया
28 Mar 2014 - 11:04 am | सुहास झेले
व्वा सुरेख... अगदी आठवणींच्या एका-एका स्टेशनाचा पल्ला गाठत पुढे जाणारा प्रवास :)
28 Mar 2014 - 11:43 am | अनुप ढेरे
छान लिहिलय. आवडलं!
28 Mar 2014 - 12:08 pm | मुक्त विहारि
छान लिहिलय.
28 Mar 2014 - 12:12 pm | नंदन
मुक्तक मस्त जमलंय, आवडलं.
28 Mar 2014 - 12:14 pm | मृत्युन्जय
मस्तच. सध्याच्या काथ्यांनी जीव उठवला होता. त्या गर्दीत हा लेख खुपच छान वाटला.
28 Mar 2014 - 12:18 pm | प्रमोद देर्देकर
खुप छान पैसातै. आवडेश.
28 Mar 2014 - 12:28 pm | पिलीयन रायडर
खरचं फार छान लिहिलय !!! आवडलं...
28 Mar 2014 - 12:32 pm | विटेकर
फारच छान !
खास आवडले !
रेल्वेचा प्रवास हा आम्हां भारतीयांसाठी एक सांस्कृतिक भाग आहे.
तुमच्या बालपणीच्या आठ्वणी वाचताना चुलीसमोर केस मागे घेत खरकट्या हाताने फुंकणी तून हवा घालून जाळ मोठा करणारी माझी आई समोर दिसली. ती फुंकणी वापरे त्यावेळेपुरते आवर्तन थांबे अन्यथा सतत रामरक्षा अथवा व्यंक्टेश स्तोत्र चाले. चुलीतील जाळ मोठा झाला की आईचा मूळ्चा तेजस्वी चेहरा आणखी उजळे.. त्यावेळी ती जगातील सर्वात सुंदर स्त्री असे आणि आम्ही तिची पिल्ले तिच्या भोवती कोंडाले करुन बसू. दादा आईच्या सुरात सूर मिसळून म्हणे .. त्याकाळी आमच्या घरी रामरक्षा पाठ असणे हे मुंजीसाठी प्री- क्वालिफिकेशन होते.
आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं.
अगदी अगदी .. माझाही असाच अनुभव आहे. रामरक्षा सहसा पूर्ण होत नाही .. तत्पूर्वी च झोप लागून जाते.
28 Mar 2014 - 12:45 pm | गणपा
हलकं फुलकं.. मस्त.
28 Mar 2014 - 5:43 pm | सखी
हलकं फुलकं.. मस्त. -- असेच म्हणते.
28 Mar 2014 - 6:50 pm | मूकवाचक
+२
28 Mar 2014 - 12:53 pm | कंजूस
विरंगुळा खासच .निवडणुकीचा काथ्या आणि पाकृच्या वासातून सुटलो जरा .
प्रवासात काय काय मागचे आठवत राहाते .रेडीओवरचे सहज सुचले म्हणून आणि शनिवारचे नभोनाट्य .रविंद्र पिंगे ,शंना ,जयवंत दळवींचे कल्याणी .ओरिसा कोणार्कच्या सूर्यमंदिरावर कोणी लिहिले होते ?प्रेमचंदच्या एका गोष्टीत नोकरीच्या शोधात निघालेला तरूण आर्मितील भावाचा कोट घालून रेल्वेने जातो आणि त्यालाच आर्मितला समजून बसायला जागा करून देतात .तुम्ही सिग्नल दिलात नी आमची गाडी सुटली सुसाट .
28 Mar 2014 - 12:54 pm | शैलेन्द्र
सुरेख लेखन :)
28 Mar 2014 - 1:21 pm | यशोधरा
सुरेख जमलंय.
28 Mar 2014 - 1:44 pm | भाते
पैसाताई,
संपादक मंडळात असल्याने धाग्यावरचे प्रतिसाद संपादित करण्याच्या कामातुन वेळ काढुन अधुनमधुन असेच छान लेख लिहित जा!
28 Mar 2014 - 1:48 pm | अजया
थंड वार्याच्या झुळकीसारखाच वाटून गेला लेख सद्य निवडणूक हल्लकल्लोळामध्ये !!
29 Mar 2014 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१०००, अजून काय ?
स्वतःच्या मालकांना निर्दोष देव बनवून त्यांच्या बाजूने काढलेले चिरके एकांगी सूर ऐकून लै वैताग आला होता !
28 Mar 2014 - 1:55 pm | यसवायजी
छान.. :)
28 Mar 2014 - 2:22 pm | सूड
आवडला. असेच केलेले काही प्रवास डोळ्यासमोरुन गेले.
28 Mar 2014 - 2:29 pm | सस्नेह
रेल्वे, निदान भारतीय रेल्वेचं एक खास वेगळं विश्व असतं. खूपदा प्रवासात असे अनुभव आलेत.
शेवट अगदी खास ! आपल्या गावाची चाहूल किती सुखद असते याचा कितिदा तरी अनुभव घेतला आहे, घेते आहे !
28 Mar 2014 - 2:37 pm | विशाखा राऊत
ताई रत्नागीरीला नेलेस बघ :)
28 Mar 2014 - 3:04 pm | पिशी अबोली
खरंच... रत्नागिरीला पोहोचवलंत... :)
28 Mar 2014 - 3:56 pm | ब़जरबट्टू
छान लिहलेय... खरच हलके फुलके...
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहुन, वारे अंगावर घेत, युफोरियाचे "ओ माय री.. " गळा फाडून गाण्यात जी मजा अहे ना, त्याला तोड नाही दुसरी... :)
28 Mar 2014 - 4:00 pm | संजय क्षीरसागर
निरिक्षणातला वेगळेपणा भावला
29 Mar 2014 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हजार दोनहजार वर्षातून एखादा क्षण संक्षींशी सहमत होण्याचा येतो. ;)
-दिलीप बिरुटे
31 Mar 2014 - 4:10 pm | विजुभाऊ
हजार दोनहजार वर्षातून एखादा क्षण संक्षींशी सहमत होण्याचा येतो.
हे सहमत होणे मागल्या सहस्त्रकातले की या?
म्हणजे आम्हालाही कळेल की ३०१४ मध्ये प्रा डॉ बिरुटे पुन्हा एकदा संक्षि शी सहमत होण्याची वळ आली.
28 Mar 2014 - 4:19 pm | आयुर्हित
व्वा, छान!
थंड वार्याची झुळूक!!!
28 Mar 2014 - 4:35 pm | आदूबाळ
ये बात! कोकण रेल्वेचा प्रवास स्वप्नातल्या प्रवासासारखा वाटतो.
28 Mar 2014 - 5:05 pm | चिगो
सुंदर, हळूवार लेख.. झक्कास, ज्योतितै.. प्रवास आणि अनुभव-प्रवास, दोन्ही आवडले.
बाकी रेल्वेप्रवासाचा लै अनुभव घेतलाय. त्यात दिल्ली-हैदराबाद सेकंद क्लासातला प्रवास, त्याच रुटवर अनकन्फर्म्ड टिकीटावर स्लीपरमधला प्रवास, नागपूर-दिल्ली रुटवरचा सेकंड-स्लीपर-एसी असा चढत्या भाजणीचा प्रवास, दिल्ली ते आसाम स्लीपरक्लासचा प्रवास, ज्यात सैनिकांच्या बस्त्यांमध्ये घळ करुन झोप घेतली होती.
बाकी, अनकन्फर्म तिकीटावर स्लीपर किंवा एसीतून प्रवास करण्यापेक्षा सेकंडक्लासमध्ये फाईट मारलेली परवडते, हा अनुभव आहे बरेचदा.. ;-)
28 Mar 2014 - 5:48 pm | बरखा
खुप छान लिहलयत.
"सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे."
तसं कोकण माझ मुळ गाव नाही. पण कोकणात जायच म्हणल की मी लगेच तयार होते. मी शाकाहारी असल्याने मासळीचा विशिष्ट वासाच्या जागी मला ऊकडीच्या मोदकाची स्वप्न पडायला लागतात. कोकण्यातल्या ऊकडीच्या मोदकाची सर बाकी कुठ्ल्याही मोदकाला नाही.
28 Mar 2014 - 5:53 pm | जेपी
झक्कास .
28 Mar 2014 - 6:24 pm | रेवती
सुरेख लेखन झालय. असा प्रवास करून कितीक वर्षे लोटलीत असे वाटले. आता एकदा इथल्याइथं कुठेतरी ट्रेनने जाऊन येईन म्हणते!
28 Mar 2014 - 6:39 pm | धन्या
मस्त. आवडलं.
आम्ही आठवीला असताना संस्कृतच्या तासाला मास्तरीण बाई आमच्याकडून रामरक्षा घोकून घ्यायच्या. अर्थ समजावण्याच्या भानगडीत त्या कधीच पडल्या नाहीत. रामरक्षा का घोकून घ्यायच्या तेही कधी कळलं नाही. आम्ही मात्र बेंबीच्या देठापासून "आत्तसज्ज धनुष्या विशुस्पुशा वक्षया शुगनसंगीनौ" म्हणून ओरडायचो.
28 Mar 2014 - 6:50 pm | विकास
एकदम आवडले आणि भावले! मला वाटते ८० च्या दशकात शाळा-कॉलेज केलेल्या पिढीपर्यंतच्या (ज्यात मी देखील येतो) व्यक्तींनी अनेक बदल झपाट्याने पाहीले आहेत. त्यामुळे जेंव्हा परत परत असे लहानपणच्या घरापाशी मनाने जाणे होते तेंव्हा अशीच कुठेतरी अस्वस्थता येते.
28 Mar 2014 - 7:03 pm | बॅटमॅन
चित्रदर्शी वर्णन आवडले. लहानपणी हरिप्रिया एक्स्प्रेसने केलेल्या अनेक मिरज-धारवाड प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. बहुत धन्यवाद!
28 Mar 2014 - 7:11 pm | जोशी 'ले'
एकदम मस्त ,आवडलं मुक्तक
नाहितर केमो थेरपिच चालुय सगळी कडेच
28 Mar 2014 - 7:47 pm | गणपा
हा हा हा शब्द प्रयोग भयंकर आवडल्या गेला आहे.
28 Mar 2014 - 9:56 pm | विकास
क्षणभर मला कळले नाही! एकदम मस्त. फक्त केमो थेरपीच्या ऐवजी मी केमो थेरं म्हणेन. ;)
29 Mar 2014 - 3:18 pm | बॅटमॅन
+१११११११११११११११११११११११.
भयानक कोटी आहे =)) _/\_
28 Mar 2014 - 11:54 pm | सुहास झेले
हा हा हा ... फुटलो =))
29 Mar 2014 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा, हा, हा...
ही कोटी नाही दशकोटी आहे ;)
28 Mar 2014 - 7:38 pm | मेघनाद
छानच झाला आहे लेख, मजा आली. कुठून - कुठे गेला होतात ते पण सांगा की.
28 Mar 2014 - 7:48 pm | किसन शिंदे
बर्याच दिवसांनी हे असं काहीतरी चांगलं वाचायला मिळालंय. मनाला रिफ्रेश करणारं लेखन!
28 Mar 2014 - 7:58 pm | मधुरा देशपांडे
खूप आवडलं पैसाताई. कितीतरी आठवणी आहेत अशा प्रवासाच्या. :)
28 Mar 2014 - 8:27 pm | पैसा
सुहास झेले, अनुप ढेरे, मुवि, नंदन, मृत्युंजय, प्रमोद देर्देकर, पिरा, विटेकर, गणपा, सखी, मूकवाचक, कंजूस, शैलेन्द्र, यशोधरा, भाते, अजया, यसवायजी, सूड, स्नेहांकिता, विशाखा राऊत, पिशी अबोली, बजरबट्टू, संजय क्षीरसागर सर, आयुर्हित, आदूबाळ, चिगो, पल्लवी कुलकर्णी, जेपी, रेवती, धन्या, विकास, बॆटमॆन, जोशी ले, मेघनाद, किसना, मधुरा सर्वांना मनापासून धन्यवाद!
विटेकर, कंजूस, बजरबट्टू, चिगो, पल्लवी, विकास, प्रतिसाद आवडले.
जोशी ले, 'केमो' चा उलगडा जरा वेळाने झाला! शब्दप्रयोग लै आवडला आहे!
मेघनाद, हा छोटासा प्रवास मुंबई एक्सप्रेसने मडगावहून रत्नागिरीपर्यंतचा!
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना पुन्हा एकदा धन्यवाद!
28 Mar 2014 - 8:47 pm | जोशी 'ले'
धन्यवाद पै ताई :-)
29 Mar 2014 - 9:04 am | धन्या
लोल्झ!!!
28 Mar 2014 - 9:11 pm | नगरीनिरंजन
फारच छान!
28 Mar 2014 - 9:22 pm | निनाद मुक्काम प...
भारतीय रेल्वे प्रवास हा व्यक्ती आणि वल्ली निरीक्षण करण्यासाठी उत्कृष्ट जागा आहे.
पक्षी व प्राणी पाहण्यासाठी जसे अभयारण्यात जावे लागते. तसे मानवी स्वभावाचे वेगवेगळे नमुने आपल्या समाजातील विविध स्वतारातील , धर्माची जातीची , वयोगटातील माणसे निरीक्षण रेल्वेच्या डब्यात होते.
तुमच्या लेखनाच्या शैलीला तुमच्या बारीक निरीक्षणाची जोड मिळाल्याने आम्ही सुद्धा तुमच्यासारखा हा प्रवास अनुभवला.
फार पूर्वी यात्रा ह्या मालिकेतून आपल्या भारतचे दर्शन घडविणाऱ्या शाम बेनेगल व ओम पुरी ची ची आठवण आली.
28 Mar 2014 - 10:00 pm | आतिवास
प्रवास आवडला.
28 Mar 2014 - 11:53 pm | उपास
नॉस्टेल्जिक वाटलंच, रेवदंड्याला आईच्या आजोळी आम्ही भावंड जमत असू तेव्हाचं चित्र आलं डोळ्यासमोर, लंपनच्या भाषेत सांगायचं तर तंतोतंत! रामरक्षा, अथर्वशीर्श अगदी हुबेहुब..
रेल्वेच्या प्रवासाची मज्जाच और.. अगदी मुंबईतला रोजचा प्रवास करायचो ते दिवस आठवले.. फक्त प्रवासातले असे मित्र/ कंपू होते ते विश्वच वेगळं!
खूप छान मांडलय लेखात.. आवडलंच!
29 Mar 2014 - 12:37 am | धमाल मुलगा
बढिया एकदम!
सर्वप्रथम, पैसाताईला 'आपण खूप छान लिहू शकतो' हे आठवलं त्याबद्दल तिचे अभिनंदन. :)
मुक्तक एकदम छान उतरलं आहे. बाकी, रेल्वेप्रवास असा एंजॉय करणार्यांचा फार हेवा वाटतो. दहा एक वर्षांखाली गवाल्यार ते पुणे असा शेवटचा छळवादी रेल्वेप्रवास केल्यापासून रेल्वेत बसायच्या कल्पनेनंच कसंतरी व्हायला लागतं. हवं तर चोवीसतास बाईक चालवतो पण रेल्वे नको असं झालं. त्यापुर्वी आवडायचं, पण त्या प्रवासानं मात्र आवडच मारली.
पण आज मात्र तुझ्या लेखामुळं कोकणरेल्वेची ही छोटेखानी सफर मस्त एंजॉय करता आली. :)
29 Mar 2014 - 1:23 am | पिवळा डांबिस
पण 'मंगलोरी पेढा' म्हणजे काय?
:-/
29 Mar 2014 - 2:33 am | बॅटमॅन
असेच म्हंटो. त्याचा कै उलगडा झाला नाही.
29 Mar 2014 - 3:04 am | स्पंदना
कालच मुलाला अंगणात बोलावुन तारका दाखवायचा प्रयत्न केला.
पण टीव्हीवर त्याच काहीतरी सुरु होतं.
मस्त गो पै तै.
किती दिवसांनी वाचत असताना आठवणी झरझर पुढुन येउन मागे पडत चालल्याचा भास झाला.
रेडीओच्या आठवणीने तर चक्क हळव केलं. मी सुद्धा रेडीओ आमच्या अंगणातल्या फळीच्या कॉटवर उपडं पडुन ऐकायचे. "वाटसरु" हे तेंव्हाचे भयानक नाटक मी असच अंगणात पडुन ऐकल अन शेवटी घाबरुन आत चुलीजवळ येउन बसले.
29 Mar 2014 - 7:20 am | drsunilahirrao
प्रवास आवडला !
29 Mar 2014 - 8:55 am | पैसा
नगरीनिरंजन, निनाद, आतिवास, उपास, धम्या, पिडां, अपर्णा, डॉ अहिरराव मनापासून धन्यवाद!
निनाद आणि उपास, प्रतिसाद आवडले! धम्या, रेल्वे आवडून घे परत! मज्जा येते!
अपर्णा, खरं आहे. आजकाल कोणाला असल्या गोष्टींसाठी वेळ राहिलेला नाही. मुलांना कॉम्प्युटर टीव्हीसमोरून उठवणं भयंकर कठीण जातं. त्यांना मोठे झाल्यावर आपल्याबद्दल काय आठवणी राहतील देवजाणे. आपण लहान असताना हे प्रकार नसल्याने इतर गोष्टी आहेत हे समजत होतं!
पिडां, तुम्हाला "पेढा" चा अर्थ माहिती असणारच! पण अजाण बॅट्यासाठी परत सांगते! तोही लै जुना वाक्प्रचार मला बरेच दिवसांनी आठवला. साधारण गव्हाळ गोर्या, गोलसर (अंगावर फॅट आहे हे लक्षात येणारी) अंगलट, बेताची उंची आणि गोड चेहरा असणार्या व्यक्तीविशेषांना तेव्हा पेढा ही संज्ञा असायची!
29 Mar 2014 - 3:18 pm | बॅटमॅन
अजाण बॅट्याकडून धन्यवाद!
(आता सुजाण) बॅटमॅन.
29 Mar 2014 - 11:20 am | भिकापाटील
व्वा ! क्या बात ... क्या बात....
29 Mar 2014 - 11:59 am | श्रिया
प्रवासवर्णन भावले, हे वाचताना माझ्याही रेल्वेप्रवासाच्या काही आठवणी जाग्या झाल्या.
29 Mar 2014 - 1:24 pm | आत्मशून्य
:)
29 Mar 2014 - 3:14 pm | इशा१२३
किती छान लिहीलय....अनेक प्रवास आठवले या लेखामुळे.कोकण रल्वेने मात्र अजून प्रवास नाही करायला मिळाला..निसर्ग बघण्यासाठी तरी कोकणात रेल्वेने जायचय.
29 Mar 2014 - 4:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पै सर्वप्रथम अभिनंदन...! निवडणुका आणि आपापल्या समर्थकांचे वैचारिक दावे प्रतिदाव्यातून आम्हा वाचकांना जरा उसंत दिली. थ्यांक्स....! :)
पै प्रवास आवडला. लेखनशैली सुरेख. आपल्याबरोबर आमचाही प्रवास छान सुरु होता. ''समोरच्या सीटवर एक टिपिकल मंगलोरी 'पेढा' आणि त्याची नवथर बायको बसले होते'' इथे फिस्सकन हसु आलं. आणि रेल्वेचा चलचित्र प्रवास आपल्याबरोबर आमचाही सुरु झाला. पूर्ण प्रवास रंगला मजा आली. आनंद वाटला. ब-याच दिवसानंतर एकेक ओळ वाचतांना मजा आली. मन लावून वाचावं वाटलं.
पै, मार्क द्यावे वाटले ते...''मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं...येथून पुढे जे वर्णन केलं ना ते केवळ सुरेख. कोकणात आम्हीही जाऊन आलो.
आमचा आजचा प्रवास इथेच संपत होता, पण गाडी मात्र अशीच धावत पुढे जाणार होती....इथे आम्हीही उतरलो. निरोप द्यायचा म्हटलं की जड होतं तसं. आतून काही तरी हलतंय असा सुरेख शेवट...दमदार लेखनीचा प्रवास दोन बोटांमधून सुटणा-या रांगोळीसारखा सुंदर प्रवास. (अजून खूप कौतुक करावं वाटतंय पण आवरतो.)
लिहित राहा हो...!!!
-दिलीप बिरुटे
29 Mar 2014 - 4:15 pm | रुमानी
छान...!
29 Mar 2014 - 4:18 pm | कवितानागेश
कित्ती छान. :)
29 Mar 2014 - 4:35 pm | त्रिवेणी
कसल मस्त लिहील आहे ताई.
29 Mar 2014 - 5:24 pm | अत्रुप्त आत्मा
@मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं. एका साध्यासुध्या बैठ्या घराच्या अंगणात. चोपून तयार केलेलं लख्ख अंगण. त्याच्या कडेने लावलेले चिरे, आणि त्या चिर्यांच्या पलिकडे ओळीत लावलेली अनेक फुलझाडं आणि शोभेची झाडं. तगर, कण्हेरी, बिट्टी, कुंद, मोगरा, नेवाळी, लिली, गावठी गुलाब, वेलगुलाब, अगस्ती नाना प्रकार. त्या लहान झाडांच्या पुढे पाण्याची दगडी पन्हळ, पाण्याने भरलेली दोण, आणि माड, आंब्याची कलमं, चिकू, रामफळ, कोकम अशी मोठी झाडं. या माडांच्या मुळात सतत पाणी शिंपल्यामुळे ओलसर मऊ माती असायची आणि बाजूला दुर्वा. पलिकडे एक लहानसं शेत आणि त्याही पलिकडे बांबूचं बेट. घराच्या मागच्या बाजूलाही प्राजक्ताची श्रीमंती उधळत असायची.
अंगणाच्या छोट्या भागात पत्र्याचा मांडव घातला होता. पण आमचा वावर बराचसा मोकळ्या आकाशाखालीच असायचा. तिन्हीसांजा वडील अंगणात फेर्या मारत रामरक्षा म्हणायचे. कधी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणायचे. आई पण काम करता करता असं काही म्हणायची. त्यांच्यामागून फिरताना आम्हालाही ती पाठ होऊन गेली होती. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. रात्री नीरव शांततेत माड झावळ्या हलवत उभे असायचे. सगळी फुलझाडं पाणी पिऊन प्रसन्न झालेली असायची. जेवणं झाली की कधी मर्फीचा रेडिओ पण आम्हाला सोबत करायला त्या अंगणात येऊन गाणी गायचा. रात्रीच्या वेळी लता, रफी, तलत, अरुण दाते सगळ्यांचेच आवाज जादुई भासायचे. >>>
29 Mar 2014 - 5:31 pm | इरसाल
आमी बी नॉस्टॅलजिक झालो.
दिल्लीसाठी केलेला वेगवेगळ्या ऋतुतला १० वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर तरळुन गेला.
29 Mar 2014 - 5:43 pm | सुधीर कांदळकर
रम्य आहे आवडला. प्रवासातून कसे मस्त अलगद साडेतीन दशकांचा प्रवास करून मागे नेलेत. मी पाच दशके मागे गेलो. रेडीओ तर मी अजूनही ऐकतो. मुंबई सोडल्यापासून मात्र मुंबई आकाशवाणीची साथ तुटली. माझ्याही बालपणींच्या आजोळच्या हळव्याआठवणी जाग्या झाल्या.
धन्यवाद.
29 Mar 2014 - 6:14 pm | इन्दुसुता
प्रवास आवडला. नॉस्टॅल्जिक करून गेला.
29 Mar 2014 - 6:22 pm | अनन्न्या
याच रत्नागिरी भेटीतला आपल्या प्रथम भेटीतला गप्पांचा फड अजून आठवतोय!
29 Mar 2014 - 7:36 pm | माहितगार
पै तै लै भारी. अशाच लिहित रहा ही शुभेच्छा.
29 Mar 2014 - 9:15 pm | प्रचेतस
मनुष्यस्वभावाची सूक्ष्म निरीक्षणं करत करत केलेला प्रवास मनापासून आवडला.
31 Mar 2014 - 3:47 pm | प्यारे१
+१.
असेच म्हणतो.
(सगळ्याच प्रतिसादांना +१ आहे.)
29 Mar 2014 - 9:22 pm | पैसा
इस्पीकचा एक्का, भिकापाटील, श्रिया, आत्मशून्य, इशा१२३, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, श्रुती कुलकर्णी, लीमाऊजेट, त्रिवेनि, अत्रुप्त आत्मा, इरसाल, सुधीर कांदळकर, इन्दुसुता, माहितगार, अनन्न्या, वल्ली, मनापासून धन्यवाद!
इशा१२३, केवळ निसर्ग पाहण्यासाठी कोंकण रेल्वेने जरूर जा.
सुधीर कांदळकर, आठवणी आवडल्या.
प्रा.डॉ.बिरुटे सर, _/\_ तुम्हीही लिहीत जा हो!
30 Mar 2014 - 11:42 am | मदनबाण
सुरेख लेखन, आणि झकास निरिक्षण. :)
माझाही प्रवास अगदी असाच काहीसा असतो... आणि जमेल तेव्हा,जमेल तसा तो फोटोतुन साठवुन ठेवतो.
30 Mar 2014 - 11:55 am | पाषाणभेद
झकास लेख आहे. जुन्या आठवणी आठवल्या.
30 Mar 2014 - 7:18 pm | राही
सध्याच्या तप्त वातावरणात हा लेख वाचल्यावर ऐन वैशाखात वाळ्याचे पाणी अंगावर शिंपडावे तसे थंडगार वाटले.
रेल प्रवास माझाही अत्यंत आवडता. पण उत्तर भारत सोडून. दक्षिण भारतात रसम-सांबाराचा वास सतत सोबत करतो तेव्हढे सोडले तर बाकी प्रवास छान होतो. काही ठिकाणचे विशिष्ट वास अगदी लक्षात रहातात. नासिक रोड नंतरचा (बहुधा लासलगाव) कुजकट दुर्गंध झोपेतून हमखास जाग आणतो. एकदा जम्मू-दिल्ली प्रवासात चादरी-उश्या अस्वच्छ मिळाल्या म्हणून त्या देणार्याकडे तक्रार केली तर त्याने रेल-वे च्या कपडेधुलाईचा पार इतिहासभूगोल सांगितला. चादरी गोळा करून कुठे पाठवल्या जातात, कोणत्या धुलाईकंपनीचा वशिला कुठे असतो, 'लालूसाब' कसे अचानक भेट देऊन लिनन तपासत असत वगैरे. आम्हांला जबरदस्त झोप येत होती त्यामुळे 'स्वच्छ चादरी नकोत पण लेक्चर आवर' असे झाले.
खिडकीतून पहाताना दृश्ये भराभर सरकत जावी त्याप्रमाणे अनेक प्रसंगांचे धावते पण नेमके वर्णन वाचताना खरोखर रेलवे प्रवास करीत आहोत असे वाटले.
प्रतिसादातला 'केमोथेरपी' शब्दसुद्धा जबरदस्त. क्षणभर कळलेच नाही.
30 Mar 2014 - 10:33 pm | स्पा
मिपावर सद्ध्या येत असलेल्या एक से एक भंगार आणि भिकार राजकरणावरील लेखात पॆ ताइचं हे ललित वेगळाच आनंद देउन गेलं.
लिहित जा ग नेहमी.
30 Mar 2014 - 10:44 pm | तुमचा अभिषेक
मस्तच, कोकण नाही पण कोकणकन्या फिरवून आणलीत, असे कैक प्रवास आठवले. आम्ही कणकवलीचेच :)
सुक्या मासळीचा वास माझ्याही खास आवडीचा, छानशी तरतरी येते त्याने मला, त्यातही समुद्राच्या खार्या वार्यात मिसळून आला तर क्या बात !
31 Mar 2014 - 9:47 am | सुहास..
आवडेश !! क्वालिटी !!
31 Mar 2014 - 2:08 pm | सुबोध खरे
त्यातून २३ वर्षे लष्करी सेवेत गेल्याने रेल्वेच्या उभ्या आडव्या जाळ्यातून भारत भर प्रवास केला आहे. मुळात गोव्यात पाच वर्षे पोस्टिंग असल्यामुळे कोकण रेल्वे चे प्रत्येक स्टेशन उतरून पाहिलेले आहे. मांडवी, कोकणकन्या आणि जनशताब्दी च्या अनारक्षित ते वातानुकुलीत १ ल्या दर्जाच्या सर्व डब्यातून प्रवास केलेला आहे. शिवाय रेल्वेच्या YP(मीटर गेज कोळसा इंजिन) YDM ४(मीटर गेज), WDM २ WDM ३A, WDP ४ या डीझेल आणि WCM २, WCG २, WCAM ३, WAM ४, WAP ५ अशा इंजिनातून सुद्धा प्रवास केला आहे.(IRFCA http://www.irfca.org/ हि साईट पहा) यात सर्वात आनंदाचा प्रवास कैसल रॉक ते मडगाव हा मीटर गेज चा प्रवास गोमंतक एक्सप्रेस च्या YDM ४ इंजिनातूनहि केला आहे.
आपल्या लेखामुळे पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला.आणि मडगाव ते रत्नागिरी हा प्रवास तर डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गाचे दर्शन घडवतो. कोकण कन्या एक्स्प्रेस ने हाच प्रवास पावसाळ्याच्या नंतर सप्टेंबर मध्ये दुसर्या वर्गाच्या दारात बसून करून पहा.(रत्नागिरी सकाळी सहा ते मडगाव पावणे अकरा) स्वित्झर्लंड च्या तोंडात मारेल असे रम्य देखावे दिसतील.
बाकी लेख सुंदरच आहे.
1 Apr 2014 - 12:10 pm | सानिकास्वप्निल
मस्तं प्रवासवर्णन...खूप छान लिहिले आहे ताई :)
आवडले.
3 Apr 2014 - 1:06 pm | पैसा
प्रशांत आवले, पाभे, मदनबण, स्पा, राही, तुमचा अभिषेक, डो. सुबोध खरे, सुहास.. आणि सानिका, मनापासून धन्यवाद!
डॉ. खरे, प्रतिसाद आवडला.
राही, प्रतिसाद आवडला. रेल्वेच्या वासांचं एक वेगळंच जग आहे!
3 Apr 2014 - 4:12 pm | नाखु
प्रवास सगळेच करतात पन " प्रवास अनुभवणं आणि नेमक्या शब्दात मांडण अगदी अचूक"
पुन्हा पुन्हा लज्जत घेत वाचावा असा लेख.