लोकायत आणि चार्वाक

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
11 Mar 2014 - 3:02 pm

लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद. सर्व धर्म चेतनावादावर अवलंबून आहेत व लोकायतने त्यावर तोफ डागली म्हणून सर्व धर्मीयांनी चार्वाक मतावर कठोर टीकाच केली वेदप्रामाण्य नाकारल्यामुळे वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले व तर ऐहिक सुखांचा आनंद घेणे सुचविण्यामुळे जैन, बुद्ध इत्यादी धर्माच्या तत्त्ववेत्त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली.

मुळात, नवव्या शतकातील न्यासमंजिरीत एक वचन असे आहे :

यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

" यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्ति मृत्युरगोचर:" यात कोठेही भोगवाद नाही.

तत्कालीन टीकाकारांनी विरोधकावर टीका करावयाची म्हणून त्याचा विपर्यास करून "यावज्जीवं सुखं जीवेत्‌ ऋणं कृत्वा धृतं पिबेत्" हे वचन विद्यारण्य़स्वामींनी सोळाव्या शतकातील सर्वदर्शन संग्रहात भोगवादी लक्षण म्हणून दिले.

यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. ही एक ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, नास्तिक मताचा प्रवर्तक, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक/ ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतीप्रणीत विचार) असे आहे. परंपरा ..शंकर..पुरंदर.. बृहस्पती.. अशी धरली जाई.कौटिलीय अर्थशास्त्रात लोकायत हे आन्वीक्षिकी म्हणजे तर्कविद्येचा भाग असल्याचे म्हटले आहे. पण या नास्तिक मताचा प्रवर्तक म्हणून, चार्वाक नावाची कोणी व्यक्ती होऊन गेली, याला इतिहासात पुरावा नाही.[१] [२]

चार्वाक ही व्यक्ती काल्पनिक होती, एकच होती का त्या विशिष्ट जीवनवादी तत्त्वज्ञानाच्या पुरस्कर्त्यांकरिता वापरलेली उपाधी होती, या बाबत तज्ज्ञांत वेगवेगळी मते आहेत. असे असले तरी हे चार्वाक जडवादी व जीवनवादी अशा लोकायत नावाच्या अवैदिक तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते या बाबत दुमत नाही. तत्कालीन इतर धर्मीय तत्वचिंतकांनी त्यांच्या या अनीश्वरवादी विरोधकांवर उपभोगवादी असल्याचा शिक्का मारून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले. महाभारतात चार्वाक नावाच्या कौरवांच्या बाजूने असलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख आढळतो, पण तिथे लोकायत तत्त्वज्ञानाची कोणतीही चर्चा किंवा त्या व्यक्तिरेखेचा कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाशी संबध असल्याचे आढळून येत नाही.

ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इन्द्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. "शब्द" आणि "अनुमान" याला मर्यादा आहेत. यामुळे आत्मा, ईश्वर आणि स्वर्ग या गोष्टींना या तत्त्वज्ञानात स्थान नाही. जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच अस्तित्वात आहे असे समजले जाते. चैतन्य हे जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते.

आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. निर्माण झालेल्या ध्वनीमुळे आधी शांतता होती असे वाटते; शांतता असे काही नसते. [३]

चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणती आहे असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्‌!‘ हा त्याचा मुख्य सिद्धांत आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात नि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू. चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळपणाची आहे, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते.

या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरूषार्थ म्हटले आहेत. धर्म आणि मोक्ष या संकल्पना नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. पण असा हा चार्वाकवादातल्या ’ऋणं कृत्वा घृतं पिबेत्‌, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः’.. या वाक्यामुळे काहीसे हेटाळले गेले. पण खरे पाहिले तर, हे तत्त्वज्ञान अयोग्य गोष्टी सुचवत नाही. उलट, ते सुखासाठी चोरी किंवा मद्यप्राशन योग्य नाही असे सांगून, हिंसेचा धिक्कार आणि शाकाहाराचे समर्थन करते. वेदान्त हा सत्य नसून वेद रचणारे निशाचर, धूर्त आहेत. अग्निहोत्र आणि वेदांचे पठण तसेच त्यांतील होमहवन हे उपयुक्त नाहीत. पौरोहित्यावर गुजराण करणाऱ्यांची चार्वाकाने निंदा केली आहे. सुख मिळवण्यासाठी प्रामाणिक श्रम करावेत, काव्य, नृत्य, संगीत या कलाही हव्यात, राजकीय स्थैर्य हवे आणि स्वार्थीपणा नको असा हा विचार आहे.

कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि ।।

शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.

पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वी,आप,तेज,वायू ही चार तत्त्वे; यांच्या संयोगांस शरीर, इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते. चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही. त्यामुळे परलोक अस्तित्वात नाही. अर्थ व काम हेच पुरुषार्थ आहेत. वेदवाङ्मय हा धूर्तांचा प्रलाप आहे.

आत्मा नाही, त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही. श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे. परलोक मानत नसल्याने, कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही. तरी ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, हे त्यांचे मत आहे.

प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला. ज्ञानेंद्रियांच्या आधारे होणारे ज्ञान हे मुख्य प्रत्यक्ष प्रमाण. निसर्गातील गोष्टींचा परस्परांशी संबंध असतो. जसे धूर आणि अग्नी, पाऊस आणि मृद्‌गंध. अशा रितीने एकमेकांशी संबंधित गोष्टींचे ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणानुसार झाले नाही तरी अनुमानाने ओळखता येते, हे अनुमानप्रमाण. ज्याला पदार्थाचे सत्य ज्ञान झाले आहे अशा खरे बोलणाऱ्या माणसाने पाहिलेले व सांगितलेले ज्ञान हे शब्दप्रमाण. अशी चार्वाकांनी या तीन प्रमाणांची मांडणी केली होती.

इतर ज्ञानप्रमाणांच्या मर्यादा विशद करताना हे दर्शन म्हणते- शब्द हे प्रमाण नव्हे. कारण, हे शब्द कुणीतरी उच्चारलेले असतात. त्यांचे नंतर संकलन होते. उच्चारणाऱ्यांची पात्रता काय, हा वादग्रस्त विषय होय. अपौरुषेय वेदांतले शब्द प्रमाण मानले, तर हाती काय येते ? जर्भरी, तुर्भरी असे निरर्थक शब्द वेदांमध्ये आढळतात. शिवाय स्वयंबहिणीने आपल्या भावाला कामपूर्तीसाठी गळ घातली, अशा अर्थाचे मंत्र वेदांमध्ये आहेत, असे हे शब्द प्रमाण धरायचे, हे वेडेपणाचे लक्षण की पांडित्याचे ? म्हणून वेदप्रामाण्य कुचकामाचे ठरते. अनुमान हेही तसेच. कशाचा तरी अनुभव घेऊन कुणीतरी काही अंदाज बांधतो- धूर असेल तेथे विस्तव असतोच, हा स्वयंपाकगृहातील अनुभव घेऊन, डोंगरावर धूर आहे त्याअर्थी तेथे आग आहे, असा अंदाज करता येईल. पण याला कित्येक मर्यादा पडतात. प्रत्येक व्यक्तिगणिक अनुमान वेगळे असू शकते. प्रत्येक प्रसंगात ते उपयुक्त ठरेलच असे नाही, म्हणून अनुमान प्रमाण या दर्शनाने अंशतः बाद ठरविले आहे.[४]

तर्क व प्रमाणांच्या आधारे धर्मशास्त्रांची कठोर चिकीत्सा चार्वाकांनी केली. लौकिक अनुमान व अलौकिक अनुमान असे अनुमाननचे दोन भाग करून अलौकिक अनुमान चार्वाकांनी नाकारले आहे. लौकिक अनुमानाचेही व्यावहारिक व तात्त्विक असे दोन भाग करून तात्त्विक अनुमानाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. देहाहून वेगळा असा आत्मा नसतो. पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, ईश्वर, मोक्ष इत्यादी अलौकिक गोष्टींचे अनुमान त्यानी नाकारले आहे. वरील गोष्टीं नाकारल्यामुळे धर्मशास्त्रांनी उभारलेला अलौकिकाचा सारा पसाराच अर्थहीन होतो.

अनुमानामुळेही पूर्ण सत्य कळत नाही. अनुमानाने मिळणारे ज्ञान हे व्यवहारोपयोगी असते, ते पूर्ण सत्याचा बोध करून देत नाही. त्यामुळे अनुमानाच्याही मर्यादा ओळखल्या पाहिजेत. ऋषी, मुनी, धर्मसंस्थापक, प्रेषित इत्यादींनी केलेली अनुमाने ही पूर्ण सत्य आहेत असे मानल्यामुळे आपले खऱ्या सत्याचे ज्ञान अपुरेच राहते. धर्मशास्त्रे सर्वश्रेष्ठ व स्वयंभू मानल्यामुळे ती, खोटेपणा आत्मविसंगती व पुनरूक्ती या दोषांनी काळवंडली आहेत, असे चार्वाक म्हणतात.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी मोक्ष हा परमपुरुषार्थ सर्वश्रेष्ठ मानला जातो. जन्ममरणाच्या फेऱ्यांतून आणि दुःखातून सुटका असे मोक्षाचे वर्णन केले जाते. चार्वाकांनी हा मोक्ष नाकारून ‘पारतंत्र्य म्हणजे बंध आणि स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष’ ही संकल्पना मांडली.

चार्वाक अर्थ आणि काम असे दोनच पुरुषार्थ मानीत होते. पण धर्म नाकारताना पारलौकिकाचे फळ देणारे साधन म्हणून तो नाकारला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिस्त आणि व्यवस्था हे महत्त्वाचे आहेतच पण त्यासाठी समाजाचे नियमन करणारी दंडनीती चार्वाकांनी ग्राह्य मानली आहे. धर्म- परलोकात सुख देणारा, पुण्यकृत्य- परलोकात सुख देणारे, पाप- परलोकात दुःख देणारे ही धर्माची संकल्पना चार्वाकांनी नाकारली. पण त्यांनी मानवी मूल्ये नाकारली नाहीत.

य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील अपरिमित हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. ऐतिहासिकदृष्ट्या येणारी वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टीका केली. वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानतात.

चार्वाकांनी ऋणाविषयी बेजबाबदारपणा मान्य केला नाही. समाजाला नियंत्रित करण्यासाठी दंडनीती नावाच्या स्वतंत्र विद्येचा पुरस्कार त्यांनी केला. चांगली कृत्ये, न्याय प्रशासन व कल्याणकारी शासन यांचा त्यानी आग्रह धरला होता.

यज्ञाच्या अग्नीत तूप जाळून अलौकिकाच्या अभिलाषा करण्यापेक्षा ते तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट व समर्थ करा असा लौकिक जीवनाबाबतचा सम्यक अर्थ त्यांनी सांगितला. प्रस्थापित हितसंबंधांवर आधारलेला धर्म नाकारून विधायक मार्ग दाखवून देण्याचे कार्य चार्वाकांनी केले. ऋणाला भिण्याचे कारण नाही आणि तूप पिण्यातही काही पाप नाही. संकटांनी खचून-पिचून जाऊ नका, कर्तबगारीने संकटांवर मात करा व स्वतःच्या कष्टाचा आस्वाद स्वतःच घ्या हा या तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र सर्वांनाच सारखा आहे. [५]

वेदांच्या परंपरेतल्या, यज्ञयाग, पूजाअर्चा, अग्निहोत्र, श्राद्ध, स्वर्ग-नरक, कर्म- कर्मफळ, पूर्वजन्म- पुनर्जन्म, मोक्ष या सर्व कल्पना व कर्मकांड ही लोकांना लुबाडण्यासाठी, बनेल हितसंबंधीयांनी निर्माण केलेले भ्रमजाल आहे. पातिव्रत्य हे मूल्य नसून स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे, जुलमी पुरुषांचे एक हत्यार आहे. वर्णाश्रम व जातिभेद हे अशास्त्रीय आहेत. या विचारांची विधायक बाजू अशी- स्वतःची बुद्धी हेच खरे प्रमाण आहे. हे ऐहिक जीवनच खरे आहे. शेती, व्यापार, गोपालन, प्रशासन आणि उपयुक्त शास्त्रांचे अध्यापन अशा साधनांनी काम करून द्रव्य मिळवावे आणि सर्व सुखोपभोग मिळवून नीतीने जगावे. स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे.

संदर्भ : चार्वाक . (२०१३, एप्रिल ६). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश. Retrieved ०९:२५, मार्च ११, २०१४ from http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0.... मराठी विकिपीडियातील लेख आणि त्यात नमूद संदर्भ

मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.

धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद

संस्कृतीइतिहाससमाजजीवनमानतंत्रराहणीप्रतिभा

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

11 Mar 2014 - 3:48 pm | आयुर्हित

अधिक माहिती वाचायला आवडेल.
उत्तम लेख!
धन्यवाद

माहितगार's picture

11 Mar 2014 - 4:25 pm | माहितगार

ज्युडायिक + परंपरेतील तत्वज्ञानाचे भारतीय 'प्रमाण'मीमांसेचा आधार घेऊन तुलना करणारी चिकित्सा तसेच चार्वाकाच्या दृष्टीकोणातून चिकित्सा या पुर्वी कुणा तत्वज्ञांनी केली असल्यास माहिती हवी आहे. असल्यास/नसल्यास आपल्यापैकी अभ्यासूव्यक्तींनीही अशी चिकित्सा आपल्या सवडीनुसार कधी केल्यास आमच्या तर्कशास्त्र विषयक कोणत्याही धाग्यावर दुवा देण्याचे नम आवाहन आहे

नीलकांत's picture

11 Mar 2014 - 4:31 pm | नीलकांत

चार्वाकाविषयी अश्या एखाद्या लेखातूनच काय ते वाचायला मिळतं. मराठीत आ.ह.साळूंखे यांचे चार्वाकावर एक पुस्तक आहे. मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का?

बाकी ब्रम्ह केवळ सत्य आणि जग मिथ्या अशी विचारसरणी असलेल्या शंकराचार्यांच्या नंतरच्या काळात चार्वाकाच्या लोकायती साहित्याचा विध्वंस झाल्याचे कुठेसे वाचलेले आहे.

सध्या लोकायत हे नाव कम्युनिस्ट विचारसरणीचे किंवा आपण ज्यांना डावे म्हणतो ते वापरत आहेत असं दिसतंय. पुण्यात भांडारक इन्स्टीट्युट कडून नळस्टॉपकडे जाताना डाव्याबाजुला लोकायतची पाटी दिसते.

- नीलकांत

माहितगार's picture

11 Mar 2014 - 4:49 pm | माहितगार

मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का?

*लोकायत तत्त्वज्ञानाचा आधुनिक काळातील अभ्यास आणि विश्लेषण इथे एक यादी उपलब्ध आहे. हिंदी आणि काही दक्षिणी भाषातूनही संदर्भ साहित्य उपलब्ध असावे असे वाटते. पण हे सर्व उपलब्ध साहित्य विश्लेषणात्मक अथवा टिका आहेत. चार्वाकाचे मूळ साहित्य खूपसे शिल्लक नाही.

चार्वाकाचा दृष्टीकोण मला विज्ञानवादी वाटतो तो कम्युनीस्टांना सोयीचा वाटतो पण कर्ज घेऊन उद्योग करा म्हणणारा खरा चार्वाक कम्यूनीस्ट असू शकत नाही असे माझे व्यक्तीगत मत आहे. मुख्य म्हणजे विज्ञानवादी दृष्टीकोणातून नवी चार्वाक रचनाही कुणी करण्यास खरे तर हरकत नाही.

मी वर म्हटल्या प्रमाणे मला ज्युडायीक+ परंपरेतील तत्वज्ञानांशी चार्वाकाची तुलना माहित करून घेण्यात रस आहे

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2014 - 5:23 pm | अत्रुप्त आत्मा

@ मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का?>>> १पुस्तक आहे.स.रा.गाडगीळांचे- "लोकायत"
मांडणी व विवेचन या द्रुष्टिकोनातून खूपच चांगले आहे.

एस's picture

11 Mar 2014 - 9:42 pm | एस

'लोकायत' विचारचर्चा ह्या प्रास यांच्या लेखावर दिलेला प्रतिसाद इथे उद्धृत करीत आहे.

'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय.

संजय क्षीरसागर's picture

12 Mar 2014 - 12:41 am | संजय क्षीरसागर

म्हणजे विकीपिडियावरच्या चार्वाकाच्या तत्वज्ञानाची माहितीत भर अपेक्षित आहे की त्याचा प्रतिवाद? जर प्रतिवाद अपेक्षित असेल तर तुम्ही लेखात व्यक्त केलेल्या तत्वज्ञानाशी सहमत आहात काय?

असो, या निमित्तानं वस्तुस्थिती विशद करतो.

भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:

हे उघड आहे आणि त्यावर वादाचा प्रश्नच येत नाही. पण तुम्ही म्हटलंय :

`यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्ति मृत्युरगोचर:' यात कोठेही भोगवाद नाही.

मग यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌चा अर्थ काय?

चार्वाकाच्या तत्वज्ञानाशी मी बव्हंशी सहमत असलो तरी ते परिपूर्ण नाही कारण: १) तृप्ती भोगातून येत नाही आणि २) भोगात कितीही जीव रमवला तरी भोगसमाप्तीनंतर मृत्यूची भीती उरतेच. त्यामुळे `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' ला अर्थ राहात नाही.

जेंव्हा तुम्ही स्त्री उपभोगता तेंव्हा सुख प्रणयातून प्राप्त होत नाही तर ते स्वतःच्या स्वतःशी झालेल्या एकरुपतेमुळे मिळतं. There is a pleasure because you get connected to yourself. आणि ही गोष्ट प्रत्येक बाबतीत अनुभवता येते.

एखादं योगासन साधल्यावर जी शांतता लाभते ते केवळ शरीरस्वास्थ्यं नसतं तर आपली जाणीव शरीरापासून वेगळी होऊन स्वतःप्रत आलेली असते. हे जाणीवेचं स्वतःप्रत येणं (किंवा आपण स्वतःशी जोडले जाणं) सर्व योगाचं गमक आहे.

भोजनाची तृप्ती अन्नात नाही. तर भूकेमुळे जी जाणीव अन्नाप्रती उन्मुख झाली होती, ती भूक शमल्यानं परत स्वत:शी जोडली गेल्यामुळे आहे. You have come back to yourself.

याचा अर्थ अन्न व्यर्थ आहे किंवा शरीरस्वास्थ्याची आणि स्त्रीसंगाची गरज नाही असा नाही. तर जोपर्यंत तृप्तीसाठी भोगाचा आधार घेतला जाईल तोपर्यंत आपण अतृप्तच राहू कारण आपली जाणीव `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' (किंवा भोगातच) अडकून राहील ती स्वतःप्रत येणार नाही. आपल्याला स्वतःचा बोध होणार नाही.

हा स्वतःचा बोध हे प्रत्यक्ष प्रमाण आहे! त्या बोधामुळे या विधानाची :

प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही.

परिपूर्ती होते. पण चार्वाकाला स्वचा बोध नाही त्यामुळे त्याची दृष्टी केवळ `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' अशी एकांगी झाली आहे.

दुसरी गोष्ट :

आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. निर्माण झालेल्या ध्वनीमुळे आधी शांतता होती असे वाटते; शांतता असे काही नसते. [३]

तुम्ही आता जिथे आहात तिथून उठून चालून पाहा. शरीर हा आकार आहे. ते ज्यात चालतंय तो निराकार आहे. निराकार शरीराच्या चालण्यामुळे निर्माण होत नाही. तो शरीराच्या चालण्यापूर्वी आहे. निराकाराशिवाय आकाराची गती असंभव आहे.

तद्वत शांततेचंही आहे. `सा' जर `रे' पासून वेगळा करायचा झाला तर दोहोंच्यामधे अंतर हवं. हे `सा' आणि `रे' मधलं अंतर शांतता आहे. शांततेशिवाय ध्वनीनिर्मिती अशक्य आहे. थोडक्यात शांतता आणि स्वर मिळून संगीत आहे आणि चार्वाक शांतताच नाकारतोयं. त्यामुळे त्याचं सर्व तत्वज्ञान बेसूर झालंय.

पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत.

आकाशाशिवाय पृथ्वीची, सूर्याची आणि कोणत्याही आकाशस्थ ग्रहतार्‍यांची हालचाल असंभव आहे. त्यामुळे चार्वाकाचा बेसिक फंडाच गंडलायं.

आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे.

शरीर नाही असं कुणीही म्हणत नाही आणि ते विनाशी नाही असं चार्वाक सुद्धा म्हणू शकत नाही. चार्वाकाला आकाशासारख्या उघड गोष्टीचा बोध नाही त्यामुळे ते अविनाशी आहे हे लक्षात येत नाही. जोपर्यंत त्याला आकाश हे जाणीवेमुळे तयार होतं असं वाटतं तोपर्यंत त्याला आकाशाचा बोध शक्य नाही कारण त्याची जाणीव आकारातच अडकलीये, तिला निराकाराचा बोध शक्य नाही. जोपर्यंत आकाशाचा बोध होत नाही तोपर्यंत अविनाशी काय आहे ते समजू शकत नाही. त्यामुळे चार्वाकाचं तत्वज्ञान परिपूर्ण नाही. ते तुम्हाला `मृत्यू नंतर काहीही उरत नाही त्यामुळे आत्ताच काय ते भोगा' इतकंच सांगेल पण तो भोग तुम्हाला तृप्त करु शकणार नाही.

तुम्हाला नक्की काय करायचंय?
म्हणजे विकीपिडियावरच्या चार्वाकाच्या तत्वज्ञानाची माहितीत भर अपेक्षित आहे की त्याचा प्रतिवाद? जर प्रतिवाद अपेक्षित असेल तर तुम्ही लेखात व्यक्त केलेल्या तत्वज्ञानाशी सहमत आहात काय?

मराठी विकिपीडियावरील लेखाचे सध्याचे स्वरूप केवळ चार्वाकाची बाजू मांडते हे खरे आहे. पण वस्तुतः माहितीत भर आणि त्याचा प्रतिवाद दोन्हीही हवे आहे. (सोबतच जमले तर ज्यू ख्रिश्चन आणि इस्लामी आणि इतरही तत्वज्ञांनाशी तूलना/(सहमती/प्रतिवाद) करता आल्यास तीही हवी आहे.)

विकिपीडियावरील लेखनात इतरांची समसमिक्षीत मते संदर्भा सहीत पण स्वतःच्या शब्दात मांडावयाची असतात;(मराठी संकेतस्थलावरील इतरांची तर्कसुसंगत व्यक्तीगत मते मी विकिपीडियावर संदर्भासहीत मांडू शकतो) त्यामुळे वस्तुतः इतरांच्या तत्वज्ञानाशी स्वतः सहमत असावे लागत नाही आणि सध्याच्या लेखाचे लेखन करताना मी ते तेवढ्याच तटस्थतेने केलेले आहे (अर्थात लेखातील मते माझी स्वतःची नाहीत). मला वाटते पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापकांची दर्शनशास्त्रावरील एक व्याख्यान माला मी ऐकली होती तिथे एक राइटअप मिळाला होता त्या शिवाय ऑनलाईन जे स्रोत उपलब्ध झाले त्यावर आधारीत संदर्भा सहीत लेखन केलेले आहे. संबंधीत संदर्भ मराठी विकिपीडियातील लेखात नमुद केलेले आहेत.

मी सहसा व्यक्तीशः बहुतांश बाबतीत प्रचंड तटस्थ असतो प्रत्येकाच्या बुटात पाय ठेऊन विचार करू शकतो आणि दाखवल्या गेलेल्या/न गेलेल्या बाबीही सहजतेने निरखू शकतो, जिथ पर्यंत चार्वाका बद्दल माझ्या व्यक्तिगत मतांचा प्रश्न आहे मी अंशतः सहमत आहे.

संजयजी मनोगतावर लेखन केलेले संजय क्षीरसागर आपणच असाल तर "आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही" हे चार्वाक मत मराठी विकिपीडियावर आपल्या संबंधीत लेखाचा संदर्भ उधृत करून घेतले गेले आहे. अर्थात वर म्हटल्या प्रमाणे प्रतिवाद विषयक लेखन अद्याप झालेले नाही. आपले लेखन आवडतेच आणि अजूनही वाचण्यास आवडेल.

आयला, हे कुठे आहे? जरा लिंक द्याल का?

अर्थात वर म्हटल्या प्रमाणे प्रतिवाद विषयक लेखन अद्याप झालेले नाही.

प्रतिवाद केल्याशिवाय दुसरी बाजू कशी कळेल? हा प्रतिवाद आता तिथे इन्क्लूड करावा ही विनंती.

आपले लेखन आवडतेच आणि अजूनही वाचण्यास आवडेल.

थँक्स!

"आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही"

हे मात्र चूक आहे. आकार निराकारात निर्माण होतो आणि त्यातच विलीन होतो. अस्तित्व आकार आणि निराकारानं मिळून बनलंय. आकार विनाशी असला तरी निराकार अविनाशी आहे. हा अविनाशाचा बोध प्रत्यक्ष प्रमाण आहे. ते अनुमान नाही. आणि जोपर्यंत तो बोध होत नाही तोपर्यंत "यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌" शक्य नाही.

स्टुपिड's picture

14 Mar 2014 - 9:25 pm | स्टुपिड

जेंव्हा तुम्ही स्त्री उपभोगता तेंव्हा

या शब्दांना आक्षेप आहे.

वास्तविकात प्रणयात तन्मय झालेल्या स्त्रीला सुद्धा तोच अनुभव येतो. She gets connected to herself. कारण जाणीव एक आहे. जाणीवेत स्त्री-पुरुष भेद नाही.

प्रसाद गोडबोले's picture

12 Mar 2014 - 1:08 am | प्रसाद गोडबोले

ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे .

ह्या इथेच , बेसीक मध्येच गडबड आहे ... प्रत्यक्ष अर्थात इंद्रियांद्वारे समजणारी प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असे नाही आणि इन्द्रियांना न समजणारी प्रत्येक गोष्ट असत्यच असेल असेही नाही .

इन्द्रियाणि पराण्याहु रिन्द्रियेभ्यः परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः॥३-४२॥

आपण जेव्हा

"आपल्या बुध्दीला मर्यादा आहेत , त्या मर्यादांपलिकडेही ज्ञान अस्तित्वात आहे आणि ते समजुन घेण्यासाठी लीप ऑफ फेथ घ्यावी लागेल "

हे जाणतो तेव्हा त्या तिथेच चार्वाकाचे सारे तत्त्वज्ञान कोलमडुन पडते.

असो .

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । ताँ स्ते प्रेत्याभिगछन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३ ॥
3. There are the worlds of the Asuras covered with blind darkness. Those who have destroyed their self (who perform works, without having arrived at a knowledge of the true Self ), go after death to those worlds.

माहितगार's picture

12 Mar 2014 - 8:40 am | माहितगार

अशाच काही विषयावरील इंग्रजी लेख संग्रहाचा मराठीत अनुवाद करतो आहे त्यांतील मांडणी आठवली. विषय रोचक आहे अजूनही मिपाकर प्रतिसाद नोंदवतील असे वाटते.

प्रतिसादासाठी आपणास आनि सर्वांना धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

12 Mar 2014 - 11:54 am | संजय क्षीरसागर

म्हणजे चार्वाकाची बरीचशी माहिती गोळा करुन तुम्ही हा लेख विकीवर टाकलायं आणि त्यात माझ्या या लेखाचा संदर्भ दिलायं. पण मी चार्वाकाच्या तत्वज्ञानाचा तिथे केलेला हा प्रतिवाद मात्र दिलेला नाही!

आता चार्वाकाने सगळ्यांची केलेली दिशाभूल बघू आणि हा लेख संपवू. चार्वाक म्हणतो की आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. ध्वनी मुळे शांतता होती असे वाटते, शांतता असे काही नाही. खरी परिस्थिती नेमकी उलटी आहे, जाणीव एकसंध आहे ती उन्मुख झाल्यामुळे शरीर जाणवते. शरीर असल्यामुळे तुम्ही आहात हा भास नाही तर तुम्ही आहात म्हणून शरीराची जाणीव आहे. शांतता मूळ आहे ती कानामार्फत उन्मुख झाल्यामुळे ध्वनी जाणवतो.

पण चार्वाकाच्या अश्या विचारामुळे संवेदना म्हणजे जाणीवेची उन्मुखता ही प्रार्थमिक झाली आणि जाणीव भासमान वाटू लागली. निराकार भासमान आणि आकार खरा वाटू लागला. भोग प्रार्थमिक झाला आणि भोगणार्‍याचे विस्मरण झाले. अश्या तर्‍हेनं निराकाराचा बोध दुर्लभ झाला.

निसर्गदत्त महाराजाना कुणीसे विचारले की या 'स्व' ला जाणण्यात काय आड येते? ते म्हणाले `तुमचे नित्यनवीन अनुभवासाठी सतत आसुसलेले असणे '! हेच आणखी सोपे करता येईल : जाणीव उन्मुख होताना तुमचे बेसावध असणे.

माहितगार's picture

12 Mar 2014 - 1:23 pm | माहितगार

संजयजी, चार्वाक सर्वांनीच प्रतिवादातूनच शोधला असेच काहीसे माझे ही झाले, अर्थात माझ्या बाबतीत ते तसे विकिपीडिया लेखनशैलीतील नैसर्गीक फ्लोमुळे तसे झाले आहे. आपण व्यक्तीगत मते मांडत केलेला फ्लो आणि ज्ञानकोशीय लेखनाचा फ्लो यात फरक पडतो. ("ओळख देण्यासाठी आधी मत आणि मग प्रतिवाद" आणि "प्रतिवादासाठीम्हणून ओळख आणि मग प्रतिवाद" यातला फरक सुक्ष्म असला तरीही व्यक्ती परत्वे महत्वाचा वाटू शकतो अर्थात ही दुय्यम बाब झाली).

चार्वाक काय म्हणाला ही फॅक्ट झाली आणि चार्वाक खूपच प्राचीन झाल्यामुळे मला कॉपीराईटचा संबंध येत नाही. एकतर तुमच्या प्रतिवादाचा भाग मी समजून घेऊन ते मला माझ्या शब्दात शक्य तेवढी कमी चुक करत मांडणे हे वेगळे आव्हान असते शिवाय चार्वाकाच्या प्रतिवादावर संपूर्ण वेगळा लेख लिहिता येऊ शकेल आणि प्रतिवादाच्या पुर्ण लेखाचा संक्षेप हे मनात ठेऊनही ते काम पुढे गेले. आणि ते काळाच्या ओघात मी किंवा इतर मंडळी करतीलच. अर्थात विकिपीडिया एका अर्थाने मुक्त आहे इतरांनी केलेल्या प्रतिवादाचे संदर्भ देत ते विकिपीडियावरील लेखात तुम्ही स्वतःसुद्धा केव्हाही लिहु शकता आणि त्याचे स्वागतच असेल. अर्थात तुमची व्यक्तीगत मते जी आहेत त्यांचे विकिपीडियावरील संदर्भा सहीत लेखन मी किंवा इतर कुणी त्रयस्थाने आमच्या स्वतःच्या शब्दात करणे अभिप्रेत असते. आणि मी आधी म्हटले तसे टिका अंतर्भूत करत तटस्थ लेखन करण्याबाबत माझा स्वतःचाही कटाक्ष असतोच त्यामुळे ते आपण काळाच्या ओघात करूच.

आपल्याकडून अजूनही माहिती घेण्यास आवडेल त्या मुळे प्रतिसादांकडे लक्ष ठेऊन आहे. आपल्या माहितीपुर्ण आणि उत्साही प्रतिसादांकरीता आभारी आहे.

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 7:18 pm | आत्मशून्य

....! रोचक प्रतिसाद.

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 7:18 pm | आत्मशून्य

....! रोचक प्रतिसाद.

सध्या चार्वाक हा थोर होता आणि त्याला खोडून काढणारे उदाहरणार्थ हिंदू, वैदिक, जैन, बौध्द इत्यादी बुर्झ्वा होत असा संदेश उपभोगवादी विचारसरणीच्या आधारावर चालणार्‍या कॉर्पोरेट कल्चरमधे प्रचलित आहे, फक्त अगदीच वखवखलेपणा दिसू नये म्हणून तोंडी लावण्यापुरता बुद्ध आळवला जातो. आणि या मताचा प्रसार करण्यासाठी चार्वाकाचे साहित्य जाळून टाकले वगैरे पोरकट विधाने केली जातात.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Mar 2014 - 1:25 pm | llपुण्याचे पेशवेll

याच्याशी सहमत व्हावेच लागते.

प्रचेतस's picture

12 Mar 2014 - 1:42 pm | प्रचेतस

सहमत आहे.

प्यारे१'s picture

12 Mar 2014 - 1:43 pm | प्यारे१

कारण चार्वाक'च' 'झेपतो'... बाकीच्यांना साथीला घेतल्यास 'त्रास' होतो. :)

माहितगार's picture

12 Mar 2014 - 1:59 pm | माहितगार

आणि या मताचा प्रसार करण्यासाठी चार्वाकाचे साहित्य जाळून टाकले वगैरे पोरकट विधाने केली जातात.

असेही आहे का ? चार्वाक समर्थकांनी प्रत्यक्ष प्रमाण अथवा तगडे संदर्भ न देता अनुमान करणे एक विरोधाभास ठरतो हे निश्चित. पण एक अखंड तत्वज्ञान;; टिकांमधून आणि प्रतिवादातूनच शोधावे लागले आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. एका चार्वाकावरील (चार्वाक समर्थकावरील) हल्ल्याची किमान एक घटना भारतीय मिथॉलॉजीत नमुद आहे, ती ऐतिहासिक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, पण चार्वाकांना ज्या दिव्यातून जावे लागले असेल त्यावर अंशतः प्रकाश पाडते किंवा कसे.

ज्यांना कल्पना नाही ते सुद्धा चार्वाक समकक्ष तत्वज्ञान घेऊन व्यक्तीगत पातळीवर जगत असू शकतात. चार्वाकाने कदाचित सुसंबद्ध मांडणी करण्याचा प्रयास केला असण्याची शक्यता असू शकेल का ?

आणि आपापले तत्वज्ञान बरोबर कसे हे सांगण्याचा प्रतिवाद मांडण्याकरता समस्त विरोधी तत्वज्ञानांना उपयूक्त ठरले असावे काय? प्रत्येक तत्वज्ञानाची चार्वाक ही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गरज नाही ना ?

तर एकुण प्रतिवाद करण्यासाठी चार्वाक असावेत अथवा नसावेत तुमचे मत काय ?

बॅटमॅन's picture

12 Mar 2014 - 2:20 pm | बॅटमॅन

अगदी तहे दिल से सहमत. अन साहित्य जाळून टाकण्याला पुरावा काय इ. विचारले तर फक्त आरोप केले जातात, बाकी शष्प काही हाती लागत नाही.

माहितगार's picture

12 Mar 2014 - 2:44 pm | माहितगार

माझा व्यक्तीगत अंदाज चार्वाकाला स्वतःची डायरेक्ट इनलाईन अशी शिष्यांची मोठी सक्सेशन परंपरा मिळण्याची शक्यता कमी होती. ज्या काळात तत्वज्ञान मुख्यत्वे स्मरण आणि मौखिकतेवर अवलंबून होत लेखनाची तत्कालीन तुटपुंजी साधन निसर्गाच्या नैसर्गिक हवाल्यावर होती जर काही लेखन झाले असेल तर शिष्य परंपरा असण्याची शक्यता कमी असल्यामुळे स्वतंत्र लेखी/मौखिक प्रिझर्व करण्यात कुणाला रस राहीला नसल्यास आश्चर्य नाही.

अर्थातच. मौखिक विरुद्ध लेखन हा भाग क्षणभर बाजूस ठेवू, पण शिष्यपरंपरा हवी तितकी न मिळाल्याने त्याचे विचार लुप्त झाले हे अगदी पटण्यासारखे आहे.

ते सोडून नस्ते आरोप केल्यावर इंटेलेक्च्युअल असण्याची शेखी मिरवता येते म्हणून आरोप केले जातात, बाकी काही नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Mar 2014 - 6:45 pm | llपुण्याचे पेशवेll

नाही जाळले नसतील तरी समाजविरोधी ठरवून शिष्यपरंपरा निर्माण न होण्याची काळजी देखील घेतली असू शकेल. उदा हे विचार मांडणार्‍या गुरुकुलांन पैसा, मदत, भिक्षा न मिळू देणे. पर्यायाने शिष्यपरंपरा निर्माण न होण्यास व मते पुढे न चालण्यास कारणीभूत झाले असू शकेल. पण मूळात या मतांना पाहीजे तितका लोकाश्रय मिळावा नसावा हेच जास्तं खरे वाटते.

बॅटमॅन's picture

12 Mar 2014 - 6:53 pm | बॅटमॅन

पण मूळात या मतांना पाहीजे तितका लोकाश्रय मिळावा नसावा हेच जास्तं खरे वाटते.

नक्कीच! यद्यपि बाकीच्या शक्यता पूर्णपणे झटकून द्याव्यात अशाही नाहीत.

पोटे's picture

13 Mar 2014 - 1:18 pm | पोटे

चार्वाकाची पुस्तकेच कशाला, अख्खा चार्वाकच युधिष्ठिराने जाळून टाकला, असे म्हणतात.

http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=articl...

तो अन हा चार्वाक एकच की कसे, याबद्दल तिथेच संशय व्यक्त केलेला आहे. असो.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2014 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

चार्वाक ही एकच व्यक्ती नसून तो एक प्रवाह होता. बुद्धाचे अनुयायी जसे बौद्ध.तसे चार्वाक मताचे लोकानुयायी-चार्वाक.

शिवाय तो चार्वाक ब्राम्हण भिक्षूका सारखा वेष करून गेला होता.(युधिष्ठीरापर्यंत सहज पोहोचता यावे म्हणून!) त्यामुळे वादास जागा मिळाल्या इतकेच.

हा महाभारतातला भाग गुप्तकालीन आहे, माझ्या मते.

पोटे's picture

14 Mar 2014 - 11:11 am | पोटे

असेल. अख्खा चार्वाकच गुप्त झाला म्हणजे गुप्तकाळच असणार. :)

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 3:15 pm | बॅटमॅन

रोचक आहे खरे.

पोटे's picture

16 Mar 2014 - 12:32 pm | पोटे

दुसर्‍याला जाळून मारणे हा पांडव कंपनीचा आवडता छंद असावा असे वाटते,

लाक्षागृहातून सुटकेसाठी पाच पुरुष आणि एक स्त्री अशा पाच वनवासींना पांडवांनी जाळुन मारले आणि त्यांची प्रेते आपल्याऐवजी ठेवली.

खांडववन जाळून कित्येक प्राणी आणि ते कुठले कुठले साप जाळून टाकले.

चार्वाकाला जाळून मारले.

:)

बाळ सप्रे's picture

12 Mar 2014 - 12:14 pm | बाळ सप्रे

आकार, निराकार, प्रत्यक्ष दर्शन वगैरे कशाही इंटरप्रिट करता येणार्‍या काही गोष्टी सोडल्यास चार्वाकाचे बहुतेकसे विचार इतर सर्व धर्मांच्या तत्वज्ञानापेक्षा जास्त प्रॅक्टिकल वाटतात.

संजय क्षीरसागर's picture

12 Mar 2014 - 1:16 pm | संजय क्षीरसागर

कारण

आकार, निराकार, प्रत्यक्ष दर्शन वगैरे गोष्टी....

कशाही इंटरप्रिट करता येत नाहीत. खरं तर चार्वाकाचा तो गैरसमज आहे आणि त्यामुळे त्याचं तत्वज्ञान एका मर्यादेपलिकडे फ्रस्ट्रेशन आणतं. ज्यानं मनसोक्त भोगलंय त्याला भोगाची व्यर्थता जाणवते. ज्याला भोगाची आशा आहे त्याला चार्वाक भावतो. याचा अर्थ भोग व्यर्थ आहे असा नाही पण त्याची मजा स्थैर्याच्या माहौल शिवाय शक्य नाही.

उदा. रात्र आहे, मद्य आहे, सखी, संगीत, उत्तम भोजन, स्वस्थ देह सर्व काही आहे पण जोपर्यंत कालाचं ओझं मनावर आहे तोपर्यंत भोगात निवांतपणा शक्य नाही. आणि चार्वाकाचा सगळा भार देहावर आहे, जो मुळातच कालबद्ध आहे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:? थोडक्यात जिथे भोगायची घाई आहे तिथे भोगातली मजा संपली. (आणि त्या अतृप्तीतून पुन्हा भोगायची इच्छा निर्माण होते. त्या चक्रातच तर सगळं जग आहे!) म्हणून तर शायरीत समयरहिततेचा ज़िक्र वारंवार येत राहातो..

वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर
चन्द घड़ियाँ यही है जो आज़ाद है
इन को खो कर मेरी जानेजां
उम्र भर ना तरसते रहो....

आज जानेकी ज़िद न करो

ज्यानं निवांतपणे भोगलं तो भोगाची संपूर्ण प्रक्रिया जाणतो. देहाची कालबद्धता मान्य करतो आणि त्याला निराकाराच्या अनुभवाची (इंटरप्रिटेशनची नव्हे) शक्यता निर्माण होते. जो कालातीताला जाणतो तो निवांतपणे उपभोगतो आणि चार्वाकाला भोगाची पडलीये, तो कालातीताला नाकारतोयं.

बाळ सप्रे's picture

12 Mar 2014 - 1:43 pm | बाळ सप्रे

कशाही इंटरप्रिट करता येत नाहीत. खरं तर चार्वाकाचा तो गैरसमज आहे

त्याच्या दृष्टीने पाहिल्यास तुमचा गैरसमज ठरेल.. समज/गैरसमज रिलेटिव्ह असतात.. म्हणूनच म्हटलं की काही गोष्टी कशाही इंटरप्रिट करता येतात... अंतिम सत्य असं काहिच नसतं..

संजय क्षीरसागर's picture

12 Mar 2014 - 2:51 pm | संजय क्षीरसागर

एक साधी गोष्ट पाहा : निवांतपणाशिवाय भोगाची मजा आहे का?

चार्वाक आणि मी काय म्हणतो ते सोडा. तुम्ही स्वतःच्या अनुभवातून पाहा. जर भोगातच सुख असतं तर वेश्या जगातली सर्वात सुखी स्त्री झाली असती. पण वस्तुस्थिती तशी नाही.

खरं तर चार्वाकानं प्रचलित तत्वज्ञानाविरुद्ध (ब्रह्म सत्य, जगं मिथ्या), नेमकं उलट तत्वज्ञान मांडलं : जगं सत्य, ब्रह्म मिथ्या! पण ते दोन्हीही दृष्टीकोन टोकाचे आहेत. जग मिथ्या असेल तर जगण्यातली मजा हरवेल आणि ब्रह्म मिथ्या असेल तर जगण्यातला निवांतपणा हरवेल. त्यामुळे भोगाला नाकारणारं तथाकथित अध्यात्म जगण्यातली मजा हिरावून घेतं आणि चार्वाकाचा निव्वळ भोगवाद, भोगाला लागणारा माहौल नाकारतो.

समग्र दृष्टीकोन, उपभोग आणि अध्यात्म यांच्या समन्वयानं उपलब्ध होतो.

पण अंतिम नाही.

प्रसाद गोडबोले's picture

12 Mar 2014 - 11:36 pm | प्रसाद गोडबोले

लय म्हणजे लय म्हणजे लयच भारी प्रतिसाद =))))

आशिष दा's picture

13 Mar 2014 - 6:01 pm | आशिष दा

अगदी अगदी

विकास's picture

12 Mar 2014 - 8:38 pm | विकास

चांगला विषय. विंदांच्या अष्टदर्शन कवितासंग्रहात जगभरातल्या प्रमुख नास्तिक विचारवंतांवर काव्य आहे. भारतातले चार्वाक दर्शन त्यांनी चांगले सांगितले आहे. अर्थात हे काव्य असल्याने संशोधन म्हणून अधिकृतपणे गृहीत धरता येणार नाही. पण त्यातली माहिती निव्वळ कवीकल्पना नाही हे देखील नक्की.

भारत हा असा एकमेव देश असावा जेथे धर्मांतर्गत देखील कालानुरूप/गरजेनुसार बदल घडले आहेत. त्याचे एक कारण म्हणजे अगदी सर्व (भारतीय) तत्वज्ञानांचे सार असलेल्या गीतेत देखील "यदा यदा ही धर्मस्य..." म्हणत धर्म हा युगानुसार गलीतगात्र होतो आणि त्याचे पुनरुत्थान करण्यासाठी मग ईश्वरी अवतारकार्याची पण गरज भासते. त्यातला ईश्वर आणि अवातार हा भाग तुर्तास लांब जाउंदेत, पण मूळ (फंडामेंटल्स) न सोडता कालानुरूप लागणारे वरकरणी बदल आत्मसात करायला भारतीय मन सहज तयार असते.

पण लोकायत हे असे तत्वज्ञान होते/आहे की ज्यात मुळावर घाव घालून बदलायला सांगितले जात होते. कर्मकांडावर टिका केली म्हणून बुद्धांचे बिघडले असे वाटत नाही. पण सगळेच भौतिक तत्वज्ञान करण्यामुळे चार्वाक पंथिय हे फार पुढे जाऊ शकले नाहीत असे मात्र नक्की वाटते. तरी देखील शैवदर्शनाप्रमाणेच चार्वाक देखील दर्शनच मानले गेलेले आहे.

आता या सर्वाचा आत्ता (दुरू/)उपयोग करताना डावी विचारसरणी चार्वाकाला जवळ करत असेल तर त्यात आश्चर्य काहीच नाही. कारण त्यातील केवळ नास्तिक भाग हा चार्वाकदर्शनाच्या जवळ जाणारा आहे. सध्याच्या "हिंदू" विचारसरणीकडून मी चार्वाकाबद्दल वेडेवाकडे ऐकलेले नाही. ॠणंकृत्वाघृतंपिबेत हे नक्की ऐकले आहे पण ते अज्ञानातून असावे असा समज झाला. ("आमच्याकडे हे देखील मान्य केले जाते" असे काहीसे...).

चार्वाक शंकराचार्य लांब राहूंदेत. पण महाराष्ट्रातील संत संप्रदायास (रामदासांना अपवाद धरून) राजवाड्यांनी उपरोधाने संताळे म्हणले होते. सावरकरांनी एकदा वैतागून "अल्लाउद्दीन खिल्जी येत आहे, हे रामदेवरायास सांगण्याचे साधे पोस्टमनचे काम ज्ञानेश्वरांनी केले नाही" असे काहीसे म्हणाले होते. या दोघांच्या म्हणण्यातला गर्भितार्थ हा परत कर्मकांड आणि त्याही पेक्षा संतसंप्रदायाने निव्वळ भक्तीमार्गाचा पुरस्कार केल्याने जनता कर्तव्ये त्या भक्तीच्या पांघरूणाखाली लपवू लागली असे म्हणणे असावे असे वाटते. एका अर्थाने अधुनिक चार्वाकच पण बाकी (विशेष करून सावरकर) जनतेशी नाते न तोडण्याची वृत्ती, त्यामुळे लोकायतासारखे नामशेष झाले नाहीत.

चार्वाकाला दर्शन का मानले गेले असावे? कारण हिंदू धर्म मूलभूत तत्वज्ञान आणि चार्वाकदर्शन यात फार फरक आहे असे वाटत नाही. आपले सर्व संतमहंत ह्यांनी परब्रम्ह मानला आहे कारण सॄष्टीची उत्पत्ती करायला कोणीतरी कारण आहे, आपल्यापेक्षाही मोठी कोणीतरी शक्ती असावी (टिळकांचे कोर्टातले भाषण?) हे पाय जमिनीवर ठेवून काम करायला मदत करते... शंकराचार्यांचे ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या इतकेच लक्षात ठेवतो पण पुढचे जीवो ब्रम्हौव नापर: अर्थात जीव हाच ब्रम्ह आहे हे लक्षात ठेवणे अवघड जाते. तुकारामाचा विठ्ठल लक्षात ठेवतो आणि तशी ती भूक असली म्हणून काही वावगे नाही, पण व्यवहारात तुकाराम, "तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना" असे देखील म्हणतो हे विसरले जाते...असे अनेक ठिकाणी अगदी वेदांपासून सर्वत्र सांगता येईल असे वाटते.

पण दुर्दैवाने सामान्यांना काहीतरी अधिक लागते. अगदी संगणक चालवताना आपण कोड लिहून रन करत नाही तर आयकॉनवर क्लिक करतो, तर तत्वज्ञान नुसतेच पोथीनिष्ठ करून कसे चालेल? दुर्दैवाने भारतात कम्युनिस्ट आणि डावे विचारवंत हे पोथीनिष्ठ झाले आहेत. किंवा त्यांना त्यातून बाहेर येण्याचे भय वाटत असेल जसे कर्मकांडातून बाहेर पडण्याचे धर्ममार्तंडांना भय वाटते तसेच... असो.

विकास रोचक प्रतिसादा बद्दल धन्यवाद. विंदांच्या अष्टदर्शन कवितासंग्रहाबद्दल अधिक माहिती वाचण्यास आवडेल. आपल्या सवडीनुसार आवर्जून लिहावे.

चार्वाकाला दर्शन का मानले गेले असावे?

हाच प्रश्न मलाही होता. षडदर्शनांबद्दलची व्याख्यानमाला अटेंड केली होती व्याख्यात्याच्या नेमक्या तशाच शब्दात व्यक्त करणे मला जमणार नाही; (तरीपण जसे आठवते त्यानुसार) "अर्थ काम मोक्ष" यातील अर्थ आणि काम आणि गृहस्थाश्रम हे सुद्धा भारतीय तत्वज्ञानांच्या दृटीकोणातून महत्वाचेच आहेत. इतर सर्व तत्वज्ञान मोक्ष-उन्मुख करत असताना चार्वाक तत्वज्ञान त्यातील ऐहीक व्यवहार जपण्याचा समतोल साधण्यास गृहस्थाश्रमास साहाय्यभूत ठरते.(व्याख्यात्यांची स्वतःची मते अद्वैतवादाच्या जवळची होती) अर्थात कदाचित ती त्या व्याख्याता महोदयांची व्यक्तीगत मते असतील पण तरीही मला ऐकताना महत्वाची वाटली होती असे होते.

बाळ सप्रे's picture

14 Mar 2014 - 12:23 pm | बाळ सप्रे

बाय द वे ..
हे 'दर्शन' म्हणजे नक्की काय??
मतप्रवाह असा अर्थ असावा असे वाटते.. की याहून अधिक काही आहे..
म्हणजे जसा माणसे एखाद्या 'धर्माची' असतात तशी एका 'दर्शनाची'ही असतात (किंवा असत) का??

जाणकारांनी/ माहितगारांनी प्रकाश टाकावा..

माहितगार's picture

14 Mar 2014 - 1:14 pm | माहितगार

>>बाय द वे .. 'हे 'दर्शन' म्हणजे नक्की काय??' >> माझा लक्ष्य विषय मुख्यत्वे भारतीय दर्शन तत्वज्ञानात वापरले गेलेले प्रमाण असा असल्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर इतर जाणकार अधिक व्यवस्थीत देऊ शकतील असे वाटते. मी आपल्या दुसर्‍या प्रश्नाबद्दल व्यक्तीगत मत नोंदवू इच्छितो

म्हणजे जसा माणसे एखाद्या 'धर्माची' असतात तशी एका 'दर्शनाची'ही असतात (किंवा असत) का??

ज्युडायिक परंपरेपेक्षा भारतीय परंपरेत धर्म या शब्दास वेगळ्या अर्थछटा होत्या. भारतीय संस्कृतीत पुस्तकी नियम आणि तत्वज्ञानाशी संबंध प्रत्यक्ष कमी आणि अप्रत्यक्ष अधिक होता, सर्वसामान्याच्या जीवनात कौटूंबीक, जातीय आणि सामूहीक परंपरांना अनन्य साधारण महत्व होते, त्यांच्या असंख्य परंपरा पुस्तकी तत्वज्ञानाशी मेळ खात याची खात्री नसे. सर्वसामान्य भारतीय समूह मुख्यत्वे संत आणि गुरुवर्य मंडळींच्या प्रभावाखाली असत, संत आणि गुरुवर्य मंडळीं सांगतील तेच तत्वज्ञान सर्वसामान्यांकडून अनुसरले जाण्याचे प्रमाण अधिक असावे. सर्वच संत किंवा गुरू सुद्धा स्वतः तत्वज्ञानी असतचं असे नाही असे भारतात दर्शन तत्वज्ञाने होती पण त्याच्या तात्वीक चर्चा विशीष्ट ज्ञानी/तत्वज्ञानी लोकांपर्यंत मर्यादीत असत; गुरूवर्य मंडळी त्यांना फॉलो करत आणि सामान्य जनता या गुरूंना फॉलो करे. काही संत मंडळी केवळ अद्भूत चमत्कार आदींच्या आधारावर आपला शीष्यवर्ग जमवे अशा असंख्य संत गुरुंना कोणते विशीष्ट तत्वज्ञानाचा काहीही परिचय असण्याची शक्यता नसे.

चार्वाक समजण्यास सोपा असला तरी सर्वसामान्यांच्या असुरक्षीत मनांना भावनिक सुरक्षा पुरवणार्‍या श्रद्धा अंधश्रद्धांची आर्थीक शीष्यपरंपरा चालवण्यास लागणार्‍या आर्थीक मॉडेलची कमतरता असावी. वैशेषिक आणि न्याय दर्शनात तत्वज्ञानाची क्लिष्टता वाढत जाते वैशेषिक आणि न्याय एवढे नसले तरी सर्वसामान्यासाठी सांख्यही क्लिष्टच होते. राहतात ते पुर्वमीमांसावादी (कर्मकांड अधिक असणारे); अद्वैत; जैन आणि बौद्ध; ज्ञानी>> गुरू यांनी तत्वज्ञान बदलले प्रवचन कर्त्यांनी तत्वज्ञान बदलले की सावकाश पणे सर्वसामान्य जनतेचे तत्वज्ञान बदलत असे गुरूंच 'दर्शन' (तत्वज्ञान) ते अप्रत्य़क्ष पणे शीष्यांच असल्या मुळे "तुमच दर्शन कंच ?" असा प्रश्न क्वचीतच उपस्थीत होत असावा; झालाच तर अद्वैत अथवा जैन अथवा बौद्ध ही उत्तरे देण्यास सोपी होत असावीत.

आपापसात मतभेद असलेले लोकही समोर शत्रू दिसल्यावर एक होतात तसेच काहीसे इस्लामी आणि तदनंतर ख्रिश्चन आगमना नंतरच्या प्रतिक्रीयेत होऊन आधीच प्रगती करत असलेला अद्वैतवादाच्या एक परमात्मा वादास ज्युडायीक परंपरेतील एक परमेश्वरवादास तत्वज्ञानाच्या लेव्हलवर परास्त करणे सोपे असल्याने बाकी दर्शने तात्वीक चर्चांच्या अभ्यासाच्या पातळीवर सर्वसामान्य जनते पासून अधीकच मागे पडण्याची प्रक्रीया झाली असण्याची शक्यता वाटते. अर्थात हि माझी व्यक्तीगत ओपन माईंडेड मते असल्यामुळे प्रतिवाद केला गेल्यास बदलूही शकतात.

माहितगार's picture

14 Mar 2014 - 1:57 pm | माहितगार

भारतीय तत्वज्ञानी मंडळींनी आपापसातील वादविवादांकरीता 'प्रमाणमीमांसे'चा आधार घेतला तर सर्वसामान्यांपर्यंत रुपक कथांचा आधार घेतला या कथा किर्तनकारादी विवीध रंजक लोककलांच्या माध्यमातूनही प्रसवित केल्या गेल्या त्यातील काही कथातील पात्रांचे पर्सोनीफिकेशन होऊन ती पात्रे मुर्तीपुजेतही पोहोचली. प्रत्येक रुपक कथा वेगळ्या वेगळ्या तत्वज्ञानाची मांडणी करत असू शकते; त्यामुळे उत्तर काळात लोककलाकारांचा मोठा आश्रय अद्वैतीं तत्वज्ञानाला लाभला; पण रुपक कथा तत्वज्ञान कोणत ते अत्यंत स्पष्ट शब्दात सांगत नाहीत त्यामुळे अद्वैतीचा प्रभाव असलेल पण सर्व तत्वज्ञानांच्या मिळून कडबोळ झालेल्या रुपक कथा सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचत राहील्या.

म्हणजे मग तत्वज्ञानाची कोणतीच गरज नसलेल विवीधतापूर्ण परंपरांच/रुढींच गाठोड, त्यास गुरूंनी आणि लोककला लोकविश्वासातून तत्वज्ञानांची अप्रत्यक्ष होत असलेली बेरीज यातून भारतीय समाज घडत गेला. म्हणून तुम्ही (इथे मी या अर्थाने) स्वतः तत्वज्ञानी नसाल तर 'षडदर्शनांपैकी तुमच दर्शन कंच ?' या प्रश्नाच खर उत्तर 'मी या सर्व दर्शनांचा' अस देण्यास अधीक आवडेल.

इथे याच चर्चेचा मुख्य विषय नसला तरी; दर्शन तत्वज्ञानींमधले वादविवाद सहसा पुर्वपक्ष म्हणजे (विरोधी पक्षाचे मत आधी) मग आपला उत्तरपक्ष मांडून तर्कशास्त्रावरील आधारीत प्रमाणे मांडून होत. उद्देश समाजाचा गुरु असलेला शिष्य आणि लोकरंजन करणारा धार्मीक वर्ग आपल्याकडे वळवून घेण्याचा असल्यामुळे आणि तत्वज्ञानातील बदल हा समाजात सावकाश उत्क्रांत होत असे. दर्शनशास्त्रींमध्ये क्वचीत तणावाचे हिंसांचे अपवादात्मक प्रसंग होतही असतील तरी मुख्य भर वाद प्रतिवादातून जन्मणार्‍या संवादावर असल्यामुळे (जिथे वैचारीक संवादच होत नाही तिथे हिंसेचा प्रश्न येतो, जिथे रेग्युलर संवादाची व्यवस्था आहे तेथे संघर्ष टोकास पोहोचण्याचे प्रसंग येण्याची शक्यता कमी असते ) ; कोणत्याही पुराव्याशिवाय, भारतीय दर्शनशास्त्रींनी कोणत्याही मोठ्याप्रमाणावर हिंसा झाली असण्याचे लावले जाणारे अलिकडच्या काळातील तर्क सर्वासामान्याम्ची दिशाभूल करणारे, कपोलकल्पीत आणि भ्रामक म्हणावेत असे माझे व्यक्तीगत मत आहे.

विकास's picture

14 Mar 2014 - 11:33 pm | विकास

दर्शन म्हणजे "माझ्या मते" ज्याला इंग्रजीत "स्कूल ऑफ थॉट" म्हणतात ते... a collection or group of people who share common characteristics of opinion or outlook of a philosophy.
हिंदू धर्मातील (म्हणजे भारतात तयार झालेल्या तत्वज्ञानातील) दर्शनांमधे दोन भाग अहेत. वेदप्रामाण्य - आस्तिक आणि वेदांना प्रमाण न मानणारी नास्तिक.

आस्तिक दर्शने: सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मिमांसा आणि वेदांत

नास्तिक दर्शने: चार्वाक, जैन, बुद्ध

पैसा's picture

14 Mar 2014 - 6:42 pm | पैसा

मिसळपाव वर यापूर्वी या विषयावर २ धागे येऊन गेले आहेत.

http://www.misalpav.com/node/15418 शरद
http://www.misalpav.com/node/25678 प्रास

त्या दोघांना संपर्क केल्यास अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2014 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चार्वाकाचा दृष्टीकोण मला आवडतो. लेखावरील प्रतिसादही आवडले.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

14 Mar 2014 - 7:48 pm | प्रसाद गोडबोले

ह्या लेखाच्या निमित्ताने जैन , बौध्द आणि आजीवक तत्त्वज्ञानांची चिकित्सा करणारेही लेख लिहावेत अशी विनंती !

विशेषतः आजीवक ह्या तत्त्वज्ञाविषयी जाणुन घ्यायची खुप उत्सुकता आहे !!

संजय क्षीरसागर's picture

14 Mar 2014 - 11:42 pm | संजय क्षीरसागर

दर्शन या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ `सत्याचं दर्शन होणं' असायं. ज्याला सत्य दिसलं (किंवा जो सत्य दर्शन घडवू शकतो) त्याला दार्शनिक म्हणतात.

तत्वज्ञान (फिलॉसॉफी) आणि दर्शन (आध्यात्म) यात फरक आहे. तत्वज्ञान हा शब्द `तत्वाचं ज्ञान' या रुढार्थानं जरी आध्यात्मिक भासला तरी तो `जगण्याची शैली' असा आहे. चार्वाकाच्या मतप्रणालीला दर्शन म्हटलं असलं तरी ते तत्वज्ञान आहे. How to Lead the Life. कारण चार्वाकाला मुळात `सत्य' ही गोष्टच अमान्य आहे. त्याच्या मते अविनाशी असं काही नाही. `भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:' हा त्याचा फंडा आहे. आणि `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्ति मृत्युरगोचर:' ही त्यानं सांगितलेली जीवनपद्धती आहे.

दार्शनिकाला देहाची नश्वरता मान्य आहे. त्याचा शोध `नैनं छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावकः चा आहे. खरं तर `भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:' ही आध्यात्माची सेंट्रल थिमच नाही! जो जन्म घेत नाही किंवा मृत्यू पावत नाही अश्या आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे दर्शन.