फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.
जन्म: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख १८ फेब्रुवारी, पहिल्या मराठी शब्दकोशाचे आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज १९ फेब्रुवारी, - महात्मा फुले यांचा जन्म २० फेब्रुवारी . अर्थातच या मराठी महिन्यातला अजून एक विशेष दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी 'मराठी भाषा दिवस' कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्म दिवस. ह्याच फेब्रुवारीची २१ तारीख आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन घेऊन येते तर २६ तारीख मराठी पारिभाषेस समृद्ध करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण करवते.
हो पण या फेब्रुवारी महिन्याची सुरवातही विसरून चालत नाही कारण २ फेब्रुवारी म्हणजे पहिल्या मराठी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म दिवस.(फेब्रुवारी महिन्याचा एक योगायोग असा कि १ फेब्रुवारी १८८३ ला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित झाली). तर अशा या फेब्रुवारी महिन्याच्या निमीत्ताने काही संकल्पानांचा परिचय करून देण्याचा ह्या लेखाच्या निमीत्ताने हा अल्पसा प्रयास.
ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. ज्या भाषेत ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान आणि माहिती सूचनांची देवाण घेवाण होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भविष्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो. हेही लक्षात ठेवले पाहिजे की, ललित साहित्यामुळेच भाषा समृद्ध होते असे मानून चालणार नाही. जगभर ललित साहित्याला लोकाश्रय मोठा असतो, हे खरे आहे. तथापि, भाषा जेव्हा ज्ञानभाषा होते, तेव्हाच ती खर्या अर्थाने समृद्ध होते. इंग्रजी तशी होती व आहे. भारतातील हिंदीसह कोणतीही भाषा ज्ञानाची झालेली नाही. तशी होण्यासाठी अनेकविध शास्त्रांवर मान्यता मिळवणारी ग्रंथनिमिर्ती व्हायला लागते. (संदर्भ गोविंद तळवळकर) आणि आपली भाषा ज्ञानभाषा म्हणून टिकवायची असेलतर कोशसाहित्य आणि ज्ञानकोशांचे महत्व कमी लेखून चालत नाही.
कोश म्हणजे विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा. कोश ह्या शब्दाचा मूळ अर्थ धनाचा साठा, संग्रह असा आहे.अर्थातच शब्दकोश म्हणजे शब्दांचा साठा.तर ज्ञानकोश म्हणजे ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ (compendium) होय.
सारसंग्रह म्हणजे एखाद्या ज्ञान शाखेचा संक्षीप्त, तरीही बहुसमावेशक/व्यापक संकलीत संग्रह ग्रंथ होय.सारग्रंथ एखाद्या बृहत ग्रंथाचा संक्षीप्त सारांश देऊ शकतात.बहुतांशवेळा ज्ञानशाखेच्या मानवी हितसंबंध किंवा प्रयासाच्या मर्यादित परिघाशी बांधील असतो (उदाहरणार्थ, जलभूशास्त्र,मत्स्यशास्त्र, वनस्पतिसमाजशास्त्र) एका अर्थाने वैश्विक ज्ञानकोश/विश्वकोशास सर्व मानवी ज्ञानाचा सारग्रंथ म्हटले जाऊ शकते.
आजच्या घडीला मराठी आंतरजाल चार ज्ञानकोश आपल्या माय मराठी भाषेतून उपलब्ध करत.त्यात पहिला मान अर्थातच केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा पाठोपाठ क्रमांक लागतो तो तर्कतीर्थांचे आशिर्वाद लाभलेल्या मराठी विश्वकोशाचा असाच एक चांगला प्रयत्न म्हणून एकहाती प्रयत्नाने मराठी ज्ञानकोश उभे करणार्या निलेश छडवेलकरांच्या बलई.कॉम उल्लेख करता येईल.पण प्रत्येक माणसाकडून ज्ञान संकलीत करून सर्वांना मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देणार्या मराठी विकिपीडियाचही नाव न घेता आपण राहू शकत नाही.
अशा या मराठी ज्ञानकोशांच्या परंपरेचे जनक होते केतकर. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर (२ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत) हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास-संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.
विहंगावलोकन
शब्दकोशाची व्याप्ती भाषेतील शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार आणि व्याकरण देण्यापुरतीच मर्यादित असते. शब्दकोशात अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रसंगी चित्रे आणि क्वचित नकाशेही असतात. पण कोणत्याही प्रकारची सखोल माहिती नसते. याउलट, ज्ञानकोश ज्ञानशाखेतील विविध संज्ञांची तपशीलवार माहिती देत असतो. आणखी त्यापलीकडे जाऊन, या माहितीचे विश्लेषण करणे, ज्ञानशाखांशी असलेली विस्तृत पार्श्वभूमी विशद करणे, आणि संदर्भ उपलब्ध करून देणे ही कामेही ज्ञानकोश करतो.
अनेक ज्ञानकोशांत चित्रे, नकाशे, आराखडे, आधारभूत पुस्तकांचे संदर्भ आणि सांख्यिकीय माहिती असते. सामन्यतः सुशिक्षित, माहिती-विशेषज्ञ अशा तज्ज्ञांच्या संशोधनाने आणि मार्गदर्शनाखाली ज्ञानकोशांची निर्मिती होत असते.
ज्याला एखाद्या विषयाची संक्षिप्त आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल असा माणूस कधी ना कधी ज्ञानकोशाची पाने चाळतो. अशा ज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते.
इथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.
सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..
तर असा हा फेब्रुवारी महिना,अशीही मराठीची लेणी, असे ज्ञानकोश आणि असेहे ज्ञानकोशकर्ते !
चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
प्रतिक्रिया
31 Jan 2014 - 4:14 pm | अमोल केळकर
छान माहिती
अमोल केळकर
31 Jan 2014 - 4:17 pm | माहितगार
प्रतिसादाकरिता धन्यवाद
31 Jan 2014 - 4:30 pm | अनिरुद्ध प
छानच माहिती
31 Jan 2014 - 7:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम उपक्रम आणि माहिती.
31 Jan 2014 - 8:01 pm | माहितगार
अनिरुद्ध प आणि इस्पीकचा एक्का प्रतिसादांकरिता आभारी आहे
31 Jan 2014 - 7:38 pm | चित्रगुप्त
छान माहिती आणि एक प्रश्न:
जुन्या मराठी काव्यात वापरली जाणारी वृत्ते (भुजंगप्रयात, पृथ्वी, मालिनी, शिखरिणी, शार्दूलविक्रीडित इ. इ.) यांच्याबद्दल संपूर्ण माहिती देणारा लेख जालावर उपलब्ध आहे का? असल्यास कुठे?
31 Jan 2014 - 7:59 pm | माहितगार
मराठी विकिपीडीयावर संबंधीत लेखांचे दुवे वर्ग:वृत्त येथे उपलब्ध आहेत.
बाकी आपली मराठी संकेतस्थळे गुगलावी लागतील पण वृत्त शब्द इतर अर्थानेही वापरला जात असल्यामुळे आणि हिंदीतही असल्यामुळे अनावश्यक शोध टाळण्याच्या दृष्टीने हिंदी टाळण्या करता सोबत आहे अथवा म्हणजे हा शब्द वापरावा जसे की वृत्त आहे वृत्त म्हणजे तरीही अनावश्यक सर्च येतील ते टाळण्या करता काव्य कविता गझल इत्यादी शब्द जोडून पुन्हा पुन्हा शोध घेता येतील.मराठी संस्थळे शोधण्या करता वृत्त site:misalpav.com/
वृत्त site:marathivishwakosh.in
वृत्त site:ketkardnyankosh.com/
वृत्त site:mr.wikipedia.org
वृत्त site:maharashtratimes.indiatimes.com/
इत्यादी पद्धतीने गूगलता येईल.
प्रतिसादा करिता धन्यवाद
5 Feb 2014 - 10:58 pm | बॅटमॅन
यांच्याबद्दल माहिती देणारा एक दणदणीत ठोकळा आहे छंदोरचना नामक- लेखक आहेत मा. त्र्यं. पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन्.
लिंक खालीलप्रमाणे.
https://archive.org/details/Chandorachana
हे झालं जण्रल माहिती अन बर्याच सैद्धांतिक उहापोहाबद्दल. या वृत्तांच्या चाली बघायच्या असतील तर यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे. आवाज अंमळ चिरकल्यासारखा वाटतो वयपरत्वे- पण तरी क्लीअर आहे.
http://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA
6 Feb 2014 - 7:54 am | माहितगार
कॉपीराईट फ्री असल्याने छंदोरचना युनिकोडीकरणा करता मराठी विकिस्रोत प्रकल्पात घेता येईल. धन्यवाद
8 Feb 2014 - 2:14 pm | माहितगार
माननीय बॅटमन साहेबांनी माधव ज्युलियनांच्या छंदोरचना म्हणून ग्रंथ उपयूक्त असल्याचे सूचवले म्हणून मराठी भाषिक कवी आणि अभ्यासूंकरता मराठी विकिस्रोत प्रकल्पात छंदोरचना ग्रंथ उपलब्ध केला आहे.
मराठी विकिस्रोत प्रकल्पात एवढ्याकरता की तिथे एका बाजूला वाचन आणि एका बाजूला युनिकोडात टंकन करण्याची दुवे देण्याच्या इत्यादी सोई उपलब्ध आहेत. युनिकोडात टाईप केल्याने एकीकडे अभ्यास बारकाव्याने होण्यास अभ्यासूंना मदत होईल आणि दुसरीकडे संदर्भ देण्या करता गूगल मधून शोधण्यासाठी युनिकोडात एक ग्रंथ उपलब्ध होऊ शकेल. अर्थातच ज्यांना टायपिंग करायचे नाही पण केवळ वाचन करावयाचे त्यांना केवळ वाचनही शक्य आहे तरीपण किमान शंभर शब्द तरी माय मराठीच्या प्रेमापोटी प्रत्येकाने युनिकोडात टंकून साहाय्य करावे अशी नम्र विनंती आहे.
1 Feb 2014 - 1:14 am | सुवर्णमयी
छान माहिती
1 Feb 2014 - 1:30 am | विकास
लेखातली माहिती चांगली आहेच पण जर असे प्रत्येक महीन्याच्या सुरवातीस करू शकलात तर हा प्रकल्प देखील खुप छान होईल. अर्थातच तसे करावेत ही विनंती.
श्रीधर व्यंकटेश केतकरांसंदर्भात उडत उडत वाचलेले यामुळे आठवले (जर काही चुकीचे असल्यास अवश्य सांगावेत): अर्थातच बुद्धीवान पण तर्कट. मला वाटते भारतात असताना परीक्षेत फार काही यशस्वी नव्हते पण कॉर्नेलमधे मात्र त्यांच्या अभ्यासावरून त्यांना एकदम (डायरेक्ट) पिएचडी मिळाली. ज्ञानकोश तयार करायची संकल्पना अनेकांना वेडगळपणाची वाटली आणि कोणी लक्ष देत नव्हते. अर्थात असल्या "वेड्यांना" त्या वेळेस एक व्यक्ती हमखास मदत करायची / प्रोत्साहन देयची - त्या व्यक्तीनेच म्हणजे लोकमान्य टिळकांनी त्यांना प्रोत्साहन दिले (आणि मला वाटते सुरवातीस आर्थिक मदत केली). त्याआधारे ते जर्मनीत गेले होते.
सावरकरांच्या बाबतीतः २६ फेब्रुवारीस जरी त्यांचे देहावसन झाले असले तरी त्यांनी प्रायोपवेशनाची सुरवात १ फेब्रुवारीस अन्न नि औषध वर्ज्य करून केली.
1 Feb 2014 - 5:40 pm | माहितगार
महीन्यांनुसार लेखाची कल्पना छान आहे.ज्या महिन्यात सवड मिळेल त्या प्रमाणे करूयात.
केतकर ज्ञानकोश डॉट कॉम वरील त्यांच्या जीवनक्रमाचा काही भाग खाली जोडला आहेच.आपण म्हणता तसे केतकरांना टिळकांचा आशिर्वाद होता असे दिसते. सोबतच महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या पहिल्या खंडाचा ग्रंथ प्रवेशाचा खालील भागही मननीय आहे तोही देत आहे.आर्थीक मदत करणार्या व्यक्तींच नाव मिळाल नाही कदाचित इतर चरित्र ग्रंथ अभ्यासावे लागतील.
5 Feb 2014 - 5:02 pm | पैसा
लेख आणि प्रतिसादातून उत्तम माहिती मिळाली. धन्यवाद!
5 Feb 2014 - 8:04 pm | माहितगार
आंतरजाल चाळताना आणखी मराठी एक फेब्रुयोग लक्षात आला.प्राच्यविद्यापंडीत आणि संस्कृत ऋग्वेद संहितेचे मराठी अनुवादक सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्म १ फेब्रुवारी १८९४ चा. आणि योगायोग असा की सिद्धेश्वरशास्त्री हे केतकरांच्या महाराषट्रीय ज्ञानकोशाचे इस १९२१ मध्ये सहसंपादक म्हणून नियूक्त झाले होते.
पैसा प्रतिसादा करता धन्यवाद. प्रतिसाद पाहून आंतरजाल चाळले तर चित्रावांच्या जन्म तारखेकडे लक्ष गेले.
5 Feb 2014 - 11:02 pm | बॅटमॅन
केतकर हे कॉर्नेल विद्यापीठाचे विद्यार्थी ही नवी माहिती कळाली. ग्रेट माणूस खरेच.
6 Feb 2014 - 9:04 am | माहितगार
मी मागे मिपावरऑनलाईन मराठी टायपींग स्पर्धे करता कोणते निकष असावेत ? हा धागा काढला होता. मराठी विकिस्रोत प्रकल्पात मराठी टायपींग स्पर्धेच्या निमीत्ताने एका दगडात अनेक पक्षी मारावेत मराठी भाषेकरता काही उद्दीष्ट साध्य करता यावीत असा मानस होता.
एकीकडे स्पर्धा होते दुसरीकडे जुन्या ग्रंथांचे युनिकोडीकरण पार पाडता येते तिसरीकडे टायपिंग वेगाची रेकॉर्ड तोडणार्या मंडळींना टिव्ही आणि इतर माध्यमातून प्रसिद्धी देऊन मराठीत कॉम्प्युटर्स हाताळण्याबद्दल पब्लिक कॉन्फिडन्स बिल्डअप करणे असे वाटत होते. सुरवात या मराठी भाषादिनास २७ फेब्रुवारीस करता येईल का याचा विचार करत होतो.पण मराठी विकिपीडियावर आणि मिपावर दोन्ही ठिकाणी या बाबत उत्साह अद्याप फारसा वाटला नाही हे काम पुढे कसे न्यावे याबाबत संभ्रमात द्विधा मनस्थितीत आहे.
कुणी काही उपाय सुचवू शकेल काय ?