(लाडू सांगे...)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
19 Jul 2008 - 5:53 pm

पुरे आता, बास । कवितांची रास ।
किती किती त्रास । कवींचा या । ।

पाहवेना नेत्री । रात्री अपरात्री ।
कवितांना कात्री । लागलेली । ।

पुरे दादागिरी । आता माझी बारी ।
वदतो अंतरी । विडंबक । ।

इरसाल स्वारी । बसे खाटेवरी ।
पुंगी वेळेवरी । वाजवाया । ।

'काळा' की 'कावळा' । 'प्रेम' की 'पाचोळा' ।
भरल्या मी चुळा । कल्पनांच्या । ।

कवितेचा घास । करुनिया खास ।
सोडला उपास । लेखनाचा । ।

ओळींना वळण । शब्दांचे दळण ।
करितो कांडण । कवितांचे । ।

शिव्यांचाही भार । घेई शिरावर ।
खरा गुन्हेगार । कवितेचा । ।

काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळावं ? माकड ते । ।

प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा विडंबने । कवी व्हाया । ।

जाणा एक धर्म । 'केसु' हाच पंथ । ।
सांगे लाडू आज । सकलांना । ।

लाडू म्हणे ऐसे । कवींना पिडावे ।
कोणी न धजावे । लिहावया । ।

प्रेरणा: प्राजुताईंचा विठू काय सांगतो ते

कविताविडंबनमौजमजाप्रतिसादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

19 Jul 2008 - 5:59 pm | केशवसुमार

लाडूशेठ,
ज ह ब ह रा हा.. _/\_
आमच्या आधी पांडुरंगाने तुमच्या हातून पाप करवले हे उत्तम.. विठ्ठल.. विठ्ठल..
केसु..
स्वगतः ह्याला पंथाचा संपर्क अधिकारी नेमावे का? :W

स्वाती दिनेश's picture

19 Jul 2008 - 5:59 pm | स्वाती दिनेश

बेला ..
मस्त! आवडले.
स्वाती

प्रियाली's picture

19 Jul 2008 - 6:02 pm | प्रियाली

सर्वांच्या प्रतिभांना जाम उधाण आलेलं दिसतंय.

जाणा एक धर्म । 'केसु' हाच पंथ । ।
सांगे लाडू आज । सकलांना । ।

अगदी! आम्ही फार पूर्वीच जाणून घेतलं आहे. आपल्या अमृतवचनांबद्दल आभारी/ आनंदी आहोत.

चतुरंग's picture

19 Jul 2008 - 6:38 pm | चतुरंग

कविता वा ओवी | कोणीही रचावी |
झणी विडंबावी | 'केसु'पंथे ||

ऐसा परिमळू | 'लाडू' वा 'आंबोळू' |
व्यंगाचा सुकाळू | म्हणे 'रंगा'||

चतुरंग

बेसनलाडू's picture

19 Jul 2008 - 6:41 pm | बेसनलाडू

विडंबाचे रंग | संग चतुरंग |
डोलण्यात दंग | मिपाकर ||
(पांथस्थ)बेसनलाडू

सहज's picture

19 Jul 2008 - 6:50 pm | सहज

ओव्या की काव्य| केले उत्तम|
रमवले मन| बेलानी||

लिहल्या ओळी | चढाल सुळी
वाट पाहे गोळी | कविंची ||

केसु अन बेला | अमोलु आंबोळी
रंगाचा दंगा| बास आता||

प्राजु's picture

19 Jul 2008 - 6:53 pm | प्राजु

बेला...

काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळावं ? माकड ते । ।

प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा विडंबने । कवी व्हाया । ।

जाणा एक धर्म । 'केसु' हाच पंथ । ।
सांगे लाडू आज । सकलांना । ।

लैच भारी... ;)
धन्य आहे तुमची..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

20 Jul 2008 - 3:47 pm | ऋषिकेश

ग्रेट. झकासच :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रमोद देव's picture

20 Jul 2008 - 5:26 pm | प्रमोद देव

हे शीर्षक वाचून मला वाटले होते की.. ..
माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी
ह्या भावगीताचे विडंबन आहे की काय..... लाडू सांगे हलवायाला हाती मज वळविशी...... वगैरे! ;)

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धोंडोपंत's picture

20 Jul 2008 - 7:14 pm | धोंडोपंत

वा वा वा वा वा,

भन्नाट. लय भारी.

आपला,
(प्रभावित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Jul 2008 - 7:56 pm | श्रीकृष्ण सामंत

काव्य आवडलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 8:57 am | विसोबा खेचर

पुरे आता, बास । कवितांची रास ।
किती किती त्रास । कवींचा या । ।

हेच म्हणतो..! :)