देरसूचा निरोप............भाग-५ ......... दलदलीत......

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Oct 2013 - 6:12 pm

भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
भाग-३ - कोरियन गाव
भाग-४ - लेफू नदीतून

५-दलदल.

संध्याकाळी मी व देरसू नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना ऑलेन्टिएव्ह व मार्चेंको परत आले. धगधगत्या आगीवर किटली बारीक शीळ घालत होती. देरसूने ती जरा हलवली पण त्यातून येणारा आवाज काही कमी झाला नाही. त्याने ती अजून सरकविली.

‘कसा रडतोय बघ ! वाईट माणूस’

‘देरसू, हा माणूस कसा ?’’ मी विचारले.

‘तो रडतो, गातो व खेळतो सुद्धा’. देरसूने साधेपणाने उत्तर दिले. या आदिमानावाच्या कुळातील माणसाच्या मते पाण्यालाही जीव होता, भावना होत्या.

‘याला बघ ! हाही माणूसच आहे’शेकोटीतील आगीकडे बोट दाखवत देरसू म्हणाला. मी त्या आगीकडे बघितले. क्षणभर मलाही त्या ज्वाळांमधे जीव असल्याचे भासले. ती लाकडे फुटत होती व त्यातून ठिणग्या बाहेर पडत होत्या. मधेच लवलवणाऱ्या जिभेप्रमाणे एखादी ज्वाळा वर झेपावत होती. त्या धुसमसणाऱ्या निखाऱ्यांमधे अनेक कपारी असल्याचा भास होत होता. तेथे क्षणात कल्लोळ माजत होता तर क्षणात शांतता. देरसू शांत बसला होता पण मी मात्र त्या ‘जिवंत’ आगीकडे तंद्रीत बघत बसलो.

मागच्या नदीत माशांची सळसळ झाली आणि मी भानावर आलो. मी देरसूकडे पाहिले. तो अजून डुलक्या काढत होता. चांदण्यांमुळे मध्यरात्र झाली हे सहज समजत होते. मी शेकोटीत अजून थोडी लाकडे टाकली आणि देरसूला झोपण्यास सांगितले. थोड्याचवेळात आम्ही दोघेही निद्रेची आराधना करायला लागलो.

दुसऱ्या दिवशी सगळ्यांना अचानकपणे पहाटेच जाग आली. पहाटेने आपले काम चोख बजावले होते. पक्षांच्या जगताला तिने जाग आणली. आकाशात पक्षांच्या रांगा दिसू लागल्या. पहिल्यांदा गूज पक्षी आकाशात उडाले व त्यानंतर हंस. त्यानंतर बदकांनी व इतर पक्षांनी आकशात झेप घेतली. सुरवातीला ते बरेच खालून उडत होते पण जसा प्रकाश पसरु लागला तसे ते उंचावर दिसू लागले.

आम्ही चार पाच मैल गेलो असू, तोपर्यंत सूर्य चांगला डोक्यावर आला होता. आम्ही आता फायरवूड हिल नावाच्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो होतो. या डोंगरावर एल्म, रोवान व आस्पेनच्या वृक्षांची दाट झाडी होती. या येथे लेफूचे पात्र अचानक रुंदावते. जवळ जवळ 20 मैल रुंद. डाव्या किनाऱ्यावर नजर पोहोचेपर्यंत दलदलच आहे. लेफूला अनेक फाटे फुटतात. अशा फाट्यांची लांबी दहा,वीस मैल असते. अशा फाट्यांची लेफूच्या उजव्या बाजूस जाळेच पसरले आहे. लेफूतून प्रवास करताना या फाट्यांचे कायम भान ठेवावे लागते. नाहीतर शॉर्टकट घेण्याच्या नादात चुकण्याची हमखास शक्यता .

आम्ही मात्र लेफूचे मुख्यपात्र कधीच सोडले नाही. अगदी क्वचित एखाद्यावेळी आम्ही उपप्रवाह पकडला असेल पण लगेचच आम्ही मुख्य प्रहावास येऊन मिळत होतो. या छोट्या छोट्या ओघळांमधे गवत माजलेले आहे व त्यात आमची बोट सहज लपत होती. कधी कधी पक्षी अचानकपणे आमच्या पासून हातभर अंतरावर येत होते. त्यांची शिकार करण्याऐवजी आम्ही आता त्यांचे निरिक्षण करु लागलो.
पहिल्यांदा माझ्या नजरेस पडला तो म्हणजे पांढरा हेरॉन.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्याचे पाय काळे व चोच पिवळटसर हिरवी होती. तो पाण्याकाठी मोठ्या रुबाबदारपणे पाण्याकडे नजर ठेऊन चालत होता. आमच्या बोटीची चाहूल लगताच त्याने शांतपणे आपले पंख पसरले व थोड्या अंतरावर जाऊन तो परत पाण्याकडे नजर लाऊन बसला. त्यानंतर आम्हाला दिसला तो बिटर्न. त्याच्या पिसांचा फिकट पिवळटसर करडा रंग, मळकट रंगाची चोच, पिवळे डोळे व त्याच रंगाच्या पायांनी हा पक्षी फार कोणाला आवडलेला दिसला नाही. अर्थात त्याला त्याचे काही घेणे नव्हते. तो शांतपणे वाळूत पुढे झुकून ‘ऑयस्टर कॅचर’ पक्षांना त्रास देत चालत होता. एक ऑयस्टर कॅचर त्याच्यामुळे उडाला व थोड्या अंतरावर जाऊन बसला तर याने त्याच्यावर एकदम चाल केली व त्याला आपल्या तीक्ष्ण चोचीने भोसकण्याचा प्रयत्न केला. आमच्या बोटीची चाहूल लागताच बिटर्नने आपला गाशा गुंडाळला व तो त्या गवतात नाहीसा झाला. आमची बोट त्याला पार करुन जात असताना मार्चेंकोने त्याची शिकार करायचा प्रयत्न केला पण त्याचा नेम हुकला व गोळी गवताला घासून गेली. देरसूच्या चेहर्‍यावर हास्य उमटले.

‘फार कावेबाज माणूस. नेहमी फसवतो’

तो बिटर्न त्या गवताच्या पार्श्वभूमीवर इतका मिसळून गेला होता की त्याला आता हुडकणे अवघडच होते. पाण्यावर झुकलेल्या फांदीवर आम्हाला एक किंगफिशर दिसला. त्याची मोठी चोच व डोके सांभाळून तो त्या फांदीवर झोपल्यासारखा दिसत होता पण अचानक त्याने पाण्यात सूर मारला. त्या फांदीवर परत येताना त्याच्या चोचीत एक मासा होता. त्यावर ताव मारुन त्याने परत एकदा झोपेचे सोंग घेतले. बोटीच्या आवाज आल्यावर त्याने एकच कर्कश्य शीळ घातली व तो जंगलात नाहीसा झाला. क्षणभर त्याच्या निळाईने आम्ही सुखावून गेलो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आम्ही दोनदा कूट मारले. त्यांची शिकार करणे एकंदरीत फार सोपे असते. ते त्या गवतावरुन नवोदितांप्रमाणे उडत असताना त्याचे पाय बावळटासारखे खाली लोंबकळत असतात व खरोखरच असहाय्य असतात. मधेच ग्रीब पक्षी त्यांच्या डोक्याची चमकदार पिसे मिरवीत फिरताना दिसत होते. आम्हाला बघून त्यांना उडण्याची गरज वाटत नव्हती. ते पटकन पाण्यात डूबी मारुन अदृष्य होत.

आज हवामान आमच्या बाजूने होते असे म्हणायला हरकत नाही. ऑक्टोबरमधील एखादा उबदार दिवस असावा तसा युसोरियाचा एक मस्त दिवस होता. आकाशात ढग नव्हते व पश्चिमेचे मंद वारे वहात होते. अर्थात असे हवामान हे वादळापूर्वीची शांतता असू शकते याची आम्हाला जाणीव होती. जितक्या जास्त काळ हे सुंदर हवामान टिकेल तेवढाच त्यातील बदल अचानक असणार.

सकाळी साधारणत: ११ वाजता आम्ही लेफूच्या एका फाट्यावर विश्रांतीचा मोठा मुक्काम ठोकला. जेवण झाल्यावर बहुतेकजण वामकुक्षीची तयारी करायला लागले. मी त्या पाण्याच्या काठाने फेरफटका मारण्यास बाहेर पडलो. ज्या दिशेला बघू त्या दिशेला गवत व दलदल नजरेस पडत होते. लांब पूर्वेला डोंगरांच्या गूढ अस्पष्ट रांगा दिसत होत्या. निष्पर्ण दऱ्यात मधेच एखाद्या ओॲसिसमाणे दाट झाडीचे पुंजके नजरेस पडत होते. मी त्या झाडीत घुसल्याबरोबरोबर एक दलदली घुबड फडफडले व उडाले. मी त्याला बहुदा घाबरवले असणार. हा एक निशाचर आहे जो दिवसा गवतात झोपतो व रात्री बाहेर पडतो. माझ्याकडे त्याने दुर्लक्ष केले व थोडासा उडून तो जरा दूर जाऊन बसला. त्या गवताळ जमिनीवर मी विश्रांतीसाठी जरा बुड टेकवले तेवढ्यात मला सळसळ ऐकू आली. मी दचकून इकडे तिकडे बघितले पण माझी भीती निरर्थक ठरली. गवता आडून त्यांची शेपटी वरखाली करत छोटे वार्बलर माझ्याकडे पहात होते. त्यानंतर मी रेन्स पाहिले. हे सुंदर छोटे पक्षी अचानक हवेत दिसून गायब होत होते. छोटे रंगीबेरंगी बंटींग पक्षी गवतावर चढून माना उंचावत माझ्याकडे कुतुहलाने बघत होते व गायब होत होते. मला माहीत नसणारे अनेक प्रकारचे छोटे पक्षी मी तेथे पाहिले. जणू छोट्या पक्षांचे ते एक वेगळे विश्व होते.

एका तासाभराने मी परत आलो. मार्चेंकोने चहा तयार ठेवला होताच. तो ढोसून आम्ही परत आमची बोट प्रवाहात ढकलली. मला माझी रोजनिशी पूर्ण करायची असल्यामुळे मी देरसूला त्याला लेफूच्या खोऱ्यात कुठल्याकुठल्या प्राण्यांचे माग आढळले ते विचारले. त्याने सांगितले की त्याला हरणे, रॅकून, बॅजर, लांडगे, कोल्हे, ससे, उदमांजर, ऑटर, पाणघुशी, व्होल व श्रुज एवढे प्राणी किंवा त्यांच्या खुणा आढळल्या.

दिवसाच्या पूर्वार्धात आम्ही अजून आठ दहा मैल कापले व शेवटी नदीतील एका छोट्या बेटावर मुक्काम करायचा ठरवला. आजचा सुर्यास्त जरा जास्तच चमकदार होता. सुरुवातीला आकाश अत्यंत निरस होते मग ते निळेजांभळे झाले. या गडद पार्श्वभूमीवर क्षितिजावर सोनेरी रंगाच्या किरणांचे दोन झोत अवतरले. थोड्याच वेळात तेही अंतर्धान पावले. हिरवट आकाशाचा रंग नारिंगी होऊ लागला व त्यातून लाल रंग अवतरु लागला. क्षितिजावर अंधारुन आले व पूर्वेकडे सावल्यांनी आक्रमण केले. त्या सावल्यांची एक रेषा उत्तरेला टेकली होती तर एक दक्षिणेला. या सावलीची किनार जांभळट होती व जसा सूर्य खाली जात होता तशी ही सावली वर चढत होती. थोड्याच वेळात ही किनार व पश्चिमेच्या सूर्यास्ताचे मिलन झाले व त्या रंगमंचावर रात्रीचे आगमन झाले.
मी भारावून हे सगळे पहात होतो पण तेवढ्यात देरसूची कुरकुर ऐकू आली.‘

‘ छ्या ! समजत नाही’’.

मला वाटले माझे त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे तो असे म्हणत असावा. मी विचारले, ‘ देरसू काय झाले ?’

‘वाईट माणूस !‘ त्याने आकाशाकडे बोट दाखवून म्हटले. ‘वाटते मोठे वादळ’’.

त्या रात्री आम्ही बराच वेळ शेकोटीच्या भोवती गप्पा मारत बसलो. दिवसभराच्या कष्टाने आम्ही सर्वजण थकलो होतो. आम्ही अगदी मुडद्यासारखे ठार झोपलो. मला तर थोडा अशक्तपणा व कणकण आल्यासारखेही वाटत होते. गंमत म्हणजे इतरांनाही तसेच वाटत होते. मला तर भीती वाटू लागले की आम्हाला सगळ्यांना कसला ताप आला की काय. पण देरसूने सांगितले की घाबरायचे कारण नाही. हवामान अचानक बदलले की हे असे होतेच. आम्ही तसेच रेटून प्रवास चालू केला. हवा गरम होती व वातावरण कुंद होते. वाऱ्याची एक झुळुकही येत नव्हती. गवताची पाती झोपल्यासारखी निस्तब्ध होती. दुरवर दिसणारे डोंगर आता धुरकट झाले. आकाशात तुरळक पण लांबलचक ढग दिसत होते तर सूर्याला खळे पडले होते. काल दिसणाऱ्या या जागेत व आत्ता दिसणाऱ्या या जगात कसलेही साम्य नव्हते. सगळे पक्षी जणू अदृष्य झाले होते. फक्त वर उंचावर गरुड घिरट्या घालत होते. बहुदा त्यांचा या मर्त्य जगाशी काही संबंध नसावा.

‘ठीक आहे ! सूर्य अर्धा गेला की वादळ येईल असे वाटते‘. देरसू म्हणाला.

‘पण मग पक्षी उडायचे का थांबलेत ? मी त्याला विचारले.

त्याने त्यावर पक्षांच्या स्थलांतरावर एक भले मोठ्ठे भाषण दिले. त्याच्या म्हणण्यानुसार पक्षांना नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उडायला आवडते. जर वारा वहात नसेल तर किंवा उष्ण हवामानात पक्षी दलदलींकाठी शांत बसतात. जर वारे त्यांच्या मागून वहायला लागले तर त्यांना त्यांच्या पोटाला थंडी वाजते. त्यावेळी ते गवतात आश्रय घेतात. त्या काळात जर अचानक बर्फवृष्टी झाली तरच ते त्यांची जागा सोडतात व परत उडू लागतात.

जसे आम्ही हान्का सरोवराजवळ आलो तसे दलदल वाढू लागली. किनाऱ्यावरची झाडे तुरळ झाली व झुडपांची गर्दी दिसू लागली. पाण्याचा वेगही कमी होऊ लागला व त्याचे प्रतिबिंब आढळणाऱ्या वनस्पतींमधे पडू लागले. पाण्यातील वेली, लिली, वॉटरनेटच्या वेली दिसू लागल्या. काही ठिकाणी गवत इतके दाटले होते की आम्हाला आमची बोट त्यातून काढता येत नव्हती. अशावेळी आम्हाला जमिनीवर उतरावे लागत होते. एका ठिकाणी आम्ही चुकलो आणि परत मागे आलो. ऑलेन्टिएव्हला जमिनीवर जाऊन रस्ता सापडतो का ते बघायचे होते पण बोटीतून उतरल्या उतरल्या तो कमरेइतक्या चिखलात रुतला. आम्ही परत मागे येऊन मुख्य प्रवाहाला लागलो. थोडक्यात वाचलो म्हणून आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. दिवसेंदिवस रस्ता सापडायला कठीण जात होते. या अगोदर काठावरील झाडांमुळे मुख्य प्रवाहात राहण्यास मदत होत होती आता ती झाडेच नसल्यामुळे तेही कठीण जात होते. त्यामुळे ज्या प्रवाहात आम्ही होतो त्याचे पुढे काय होणार आहे हे कळत नव्हते.

शेवटी देरसूची बत्तीशी वठली असेच म्हणावे लागले. दुपारी दक्षिणेकडून जोरदार वारे वहायला लागले आणि खरोखरच गुजपक्षी व बदके परत कमी उंचीवरुन उडायला लागली. एके ठिकाणी आम्हाला तुटलेल्या व पुरात वाहून आलेल्या बोटीच्या फळ्या दिसल्या. या असल्या प्रवासात ते सरपण आमच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. काहीच मिनिटात आमच्या सैनिकांनी बोट सरपणाने पूर्ण भरुन टाकली. सरपणाची सोय झाल्यावर देरसूने आपला तंबू ठोकला व त्याची पथारी पसरली.

आता या ठिकाणाहून हान्का सरोवर फार दूर नव्हते. मला ही नदी ईशान्येला वळून स्वान गल्फमधे पाणी ओतते हे माहीत होते. या आखाताला तेथे प्रचंड संख्येने येणाऱ्या हंसांमुळे हे नाव पडले होते. हे आखात रुंदीला एक मैल व आत अंदाजे पाच मैल पसरले आहे. ते अत्यंत उथळ व हान्काला एका ओढ्याने जोडले गेले आहे. बोटीने हान्कात जायला अजून दहा मैलाचा तरी प्रवास करावा लागला असता पण तसे सरळ अंतर दोन तीन मैलच होते. आम्ही असे ठरवले की दुसरऱ्या दिवशी मार्चेंको व ऑलेन्टिएव्ह यांनी तेथेच मुक्काम करायचा व मी आणि देरसूने चालत हान्का गाठायचे.

संध्याकाळी आम्हाला सर्वांना भरपूर वेळ होता. आम्ही मस्तपैकी शेकोटीभोवती चहा पीत गप्पा मारत बसलो. ते वाळलेले तेल प्यायलेले लाकूड मस्त जळत होते व त्यातून स्वच्छ प्रकाश पडला होता. गवताची सरळसोट पाती वाऱ्यावर डोलत होती त्यामुळे वारा जरा जास्तच वेगाने वहात असल्याचा भास होत होता. आकाशातील धुक्यामुळे फक्त मोठे तारेच दिसत होते. तलावावर उठणाऱ्या लाटांचा आवाज घुमत होता.

पहाटेपर्यंत आकाश ढगांच्या थरांनी व्यापले व आता वारे ईशान्येकडून वहायला लागले. हवामान वाईट होते पण आमची मोहीम रद्द करण्याइतके काही वाईट वाटले नाही............

क्रमशः

जयंत कुलकर्णी

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

17 Oct 2013 - 6:49 pm | अनिरुद्ध प

वाचतोय्,पु भा प्र

लाल टोपी's picture

17 Oct 2013 - 8:48 pm | लाल टोपी

भाग चांगल्याच वेगात येत असल्यामुळे वाचायला मजा येत आहे. भाषांतर अतिशय सुरेख आहे.

मला वाटलं कि प्रकरण संपतय कि काय :(
पण क्रमशः वाचुन आनंद झाला :)

विनोद१८'s picture

17 Oct 2013 - 10:44 pm | विनोद१८


अतिशय ओघवती, वाचनीय व ओढ लावणारी आणि एका लयीत चाललेली लेखमालिका कधीच संपू नये असे वाटते.

*pleasantry*

विनोद१८

जयंत कुलकर्णी's picture

17 Oct 2013 - 11:05 pm | जयंत कुलकर्णी

लेखाचे नाव "देरसूचा निरोप" असा आहे. व आत्तापर्यंत पाच प्रकरणे झाली आहेत.

पैसा's picture

18 Oct 2013 - 10:21 am | पैसा

अगदी तपशीलवार वर्णन!