भाग-१ - निशाचर
२
रानडुक्कराची शिकार
चहाचे दोन तीन कप प्यायल्यानंतर सैनिकांनी घोड्यांवर सामान लादायला सुरवात केली. देरसूनेही त्याचे सामान आवरायला घेतले. माझे त्याच्याकडे बारीक लक्ष होते. त्याने पहिल्यांदा त्याचा पिट्टू एका झटक्यात पाठीवर चढवला व झाडाच्या बुंध्याला टेकवून ठेवलेली त्याची रायफल उचलली. थोड्याच वेळात आमची पलटण मार्गस्थ झाली.
ज्या घळीतून आम्ही मार्ग काढत होतो ती एखाद्या सापासारखी पसरली होती. तिला मधेच अनेक छोट्या घळी येऊन मिळत होत्या. त्या सगळ्या मार्गावर झरे व धबधबे त्या दरीत पाणी ओतत होते. हळूहळू ती घळ रुंद होत त्याचे रुपांतर एका दरीत होणार अशी चिन्हे दिसू लागली. आजुबाजुला जळक्या झाडांचे बुंधे आम्हाला रस्ता दाखवत होते. आमचा गोल्डी मात्र सगळ्यांच्या पुढे चालला होता व चालताना त्याचे लक्ष जमिनीकडे होते जणू काही त्याचे काहीतरी हरविले होते. मधेच तो जंगलात नजर टाकत होता तर जमिनीवरची पडलेली पाने घेऊन ती निरखून पहात होता.
‘काय आहे ते ?’ मी न राहवून विचारले.
देरसूने चालण्याचा वेग कमी केला. त्याने सांगितले की हा रस्ता घोड्यांसाठी ठीक नाही कारण या वाटेवर सापळे लावलेले आहेत. माणसाचे ठीक आहे ते खाली बघून चालू शकतात. गंमत म्हणजे त्याने हेही सांगितले की याच वाटेवरुन काही दिवसापूर्वी माणसे गेली असणार व ती बहुदा चिनी असावीत. ते ऐकून आम्ही सगळेजण पडायचेच बाकी होतो. आमच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्यालाच आश्चर्य वाटले.
‘कसे कळत नाही तुम्हाला ? तुम्हीच बघा !’
‘ आता लगेच झोपडी’ देरसू नेहमीप्रमाणे थोडक्यात म्हणाला.
हे म्हणताना त्याने झांडांच्या बुंध्याकडे बोट दाखवले. ‘याची सालं - काढली’. मला आता त्याला काय म्हणायचे आहे ते समजू लागले होते. त्याला म्हणायचे होते की त्या झाडाची साले कोणीतरी पाहिजेत म्हणून काढली होती व बहुदा ती एखादे झोपडे शाकारण्यासाठी काढली असावीत. आम्ही देरसूचे ऐकले व तसेच पुढे निघालो. दहाच मिनिटात आम्हाला एका झऱ्याच्या काठावर एक झोपडे नजरेस पडले. बहुदा एखाद्या शिकाऱ्याने किंवा जिनसेंग वनस्पती शोधणाऱ्या माणसाने ती उभी केली असावी. आमच्या पाहुण्याने इकडे तिकडे त्याची शोधक नजर फिरवली आणि परत एकदा जाहीर केले की काहीच दिवसांपूर्वी येथून एक चिनी माणूस गेला असणार व त्याने येथे एक रात्र काढली आहे. आम्हाला लक्षातही न आलेल्या वस्तू त्याच्या नजरेने बरोबर टिपल्या होत्या. शेकोटीची पावसाने भिजलेली राख, गवताची गादी व कोपऱ्यात फेकलेले चिनी बनावटीचे बुटावर घालायचे गेटर्स यावरुन हेच सिद्ध होत होते.
आत्तापर्यंतच्या घटनांवरुन माझी खात्री पटली होती की देरसू हा काही सामान्य माणूस नव्हे. माझ्याबरोबर जंगलातील एक यक्षच असल्याचा मला भास झाला. जादू येत असलेला यक्ष. जंगलात काय चाललेले आहे हे सर्व जाणणारा जादूगार.
घोड्यांना पाणी व चारा टाकण्याची वेळ झालीच होती. मीही माझे सामान उतरवून एका मोठ्या देवदारच्या वृक्षाखाली मस्त ताणून दिली. थोड्याच वेळात ऑलेन्टीएव्हने मला हलवून उठवले. मी चहूबाजुला नजर टाकली. देरसू लाकडे फोडत होता. फोडल्यावर ते सरपण व ढलप्या झोपडीत नेऊन त्याचा ढीग लावत होता. मला वाटले त्याला ती झोपडी जाळून टाकायची आहे म्हणून तो ती लाकडे रचतोय. मी त्याला त्या विचारापासून परावृत्त करायचा प्रयत्नही केला. माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळून त्याने माझ्याकडे थोडे मीठ व मुठभर तांदूळ आहते का याची चौकशी केली. मीठ व तांदूळ घेऊन तो काय करणार आहे याची मला उत्सुकता होतीच. मी माझ्या माणसांना त्याला मीठ व तांदूळ देण्यास सांगितले. देरसूने मात्र तांदूळाच्या व मीठाच्या पुरचुंड्या तयार केल्या. एक आगकाड्यांचीही केली व त्या सर्व त्या झोपडीच्या छताला काळजीपूर्वक लटकवल्या.
‘तू लवकरच परत इकडे येणार आहेस का ? मी विचारले.
त्याने नकारार्थी मान हलविली. ‘मग कोणासाठी हे सगळे ठेवतो आहेस तू ?’ मी विचारले.
‘कोणीतरी येईल. वाटसरु..वाळलेले लाकूड, तांदूळ काड्या त्याला उपयोगी पडतील. कदाचित त्याचा जीव वाचेल’
ते ऐकून मी थक्क झालो. तेथे कोणी येणार आहे का ? आला तरी तो माहितीचा नसणार. त्यालाही हे सामान कोणी ठेवले आहे हे कधीच समजणार नाही. हे सगळे असताना देरसूला त्या माणसाची काळजी वाटत होती. माझ्या माणसांची उधळपट्टी आठवून माझी मलाच शरम वाटली. ते तर उरलेले सर्व अन्न, सरपण इ. जाळून टाकत. अर्थात ते त्याकडे एक करमणूक म्हणून बघत असत व मीही त्यांना त्याबद्दल कधी टोकले नव्हते. आणि हा माणूस अशाही परिस्थितीत दुसऱ्याचा विचार करत होता. शहरातील माणसांना हे शहाणपण केव्हा येणार कोणास ठाऊक !
‘चला ! घोडे तयार आहेत’ ऑलेन्टीएव्हने आवाज दिला. ‘कॅप्टन सर निघायचे ना ?’
मीही होकार दिला व सैनिकांना कूच करण्याचा हुकुम दिला. संध्याकाळी आम्ही दोन ओढ्यांच्या संगमावर पोहोचलो. हा संगमच लेफू नदीचा उगम समजला पाहिजे. शिकारीसाठी अत्यंत योग्य जागा. आम्ही तेथेच मुक्काम टाकण्याचा निर्णय घेतला. थोडेसे जेवल्यावर मी जो झोपलो तो सकाळीच उठलो. बघतो तर सगळे माझ्या आधी उठून आवरत होते. मी घोडे तयार करायची आज्ञा देऊन देरसू बरोबर पुढे निघालो. ज्या दरीतून आम्ही मार्ग काढत होतो तिने आता पश्चिमेला वळण घेतले होते. डाव्या बाजूला उंच कडे तर उजव्या बाजूला खोल दरी असा आमचा प्रवास चालू होता. रस्ताही आता चांगला व मोठा होऊ लागला होता. एके ठिकाणी देरसूच्या नजरेस काही तोडलेली झाडे पडली. देरसूने त्या झाडांकडे बघितले आणि म्हणाला,
‘वसंत ऋतूत तोडली आहेत. दोघे ! एक उंच, एक बुटका. उंच माणसाच्या कुऱ्हाडीला धार नाही. दुसरा धारधार कुऱ्हाड’
या माणसापासून काहीच लपून रहात नव्हते. जंगलात घडणारी प्रत्येक गोष्ट जणू त्याला विचारुनच केली जात होती. त्याचे ते पहाणे बघून मीही जंगलाकडे लक्षपूर्वक पहायला सुरुवात केली. थोड्याच वेळात माझ्या दृष्टीस एक तोडलेले झाड पडले. त्याच्या ढलप्या इतरस्त्र उडून पडल्या होत्या व त्यातील डिंक बाहेर पडत होता. कोणीतरी त्या डिंकासाठी झाडाला खाचा पाडण्याचा उद्योग केला असणार. पण पुढे काय ? मला तर काहीच सुचेना.
‘जवळच घर असणार ’ जणू काही माझे विचार अडकलेले पाहून देरसूने उत्तर दिले.
आता सालं काढलेली झाडे जास्त संख्येने दिसू लागली व थोड्याच वेळात काही यार्डांवर आमच्या दृष्टीस ते घर पडले. ते एक छोटेसे घर होते व बहुदा रिकामेच असावे. त्याचा दरवाजा बाहेरुन अडसर लाऊन बंद करण्यात आला होता. घराभोवतालची छोटी बाग डुकरांनी उध्वस्त केली होती. शेजारीच एक लाकडी देउळ नेहमीप्रमाणे दक्षिणेकडे तोंड करुन उभे होते.
त्या घराच्या भिंती तशा ओबडधोबडच होत्या. कुडाच्या भिंती मातीने सारवलेल्या दिसत होत्या. एक पत्र्याची किटली, तेलकट स्टोव्ह, तीन चार लाकडाची भांडी व एक लाकडाचा जग, एक गंजलेली मोठी सुरी, एक मोठा डाव, धुळीने माखलेल्या बाटल्या व जमिनीवर फेकलेली जनावरांची कातडी एवढेच सामान त्या घरात होते. बहुदा ती एखाद्या शिकाऱ्याची खोली असावी. लेफूच्या दरीतून वर जाण्यासाठी तीन रस्ते होते. एक आम्ही येतानाच वापरला होता एक पूर्वेला डोंगरात जात होता तर तिसरा पश्चिमेला जात होता. पश्चिमेचा घोड्यांसाठी चांगला दिसत होता. तोच आम्ही पकडला. सैनिकांनी त्यांच्या घोड्यांचे लगाम सोडून दिले व त्यांना थोडी चालण्याची मोकळीक दिली. त्या हुषार प्राण्यांनी त्या रस्त्यावरुन सामानाची काही पाडधाड न करता चांगलीच चाल धरली. घसरड्या जागांवरुन तर ते फारच काळजीपूर्वक चालत होते. टाईगा प्रदेशातील घोड्यांची हीच तर खासियत आहे.
त्या शिकाऱ्याच्या घरापासून लेफू नदी आग्नेय दिशेला वळते. त्या रस्त्यावर आम्ही काही मैल चालले असू तोच नदीच्या किनाऱ्यावर एका टेकडीच्या पायथ्यापाशी आम्हाला शेतकऱ्यांची घरे लागली. या टेकडीला चिनी टुडिंट्सी या नावाने हाका मारतात. एकदम अवतिर्ण झालेली आमची पलटण बघून त्या गावकऱ्यांची गडबड उडाली. मी देरसूला त्यांच्याशी बोलायला सांगितले व त्यांनी न घाबरता त्यांचे काम करावे असे सुचविण्यास सांगितले. ही चिनी माणसे कशा प्रकारचे जीवन जगतात याचीही माहिती मला गोळा करायची होतीच.
अजून आंधार पडायला बराच अवकाश असल्यामुळे मी टुडिंट्सीवर फिरायला जायचे ठरवले. देरसूही यायला तयार झाला. आम्ही फक्त आमच्या बंदूका घेतल्या व निघालो. हा डोंगर म्हणा टेकडी म्हणा लेफूच्या कडेला उभा होता. उंच सरळसोट कडे एका बाजूला व उरलेल्या भागावर घनदाट झाडी असे त्याचे स्वरुप अत्यंत निसर्गरम्य होते. झाडांची पाने पिवळी पडायला सुरुवात झाली होती व जमीन पानगळीने झाकली गेली होती. झाडी पानगळीने विरळ झाली होती व फक्त ओकच्या झाडांचीच वस्त्रे जागेवर होती. बराच चढ असल्यामुळे आम्ही वाटेत दोनदा थांबलो. सगळी जमीन उखडली गेली होती. देरसू सारखा थांबून त्या मातीत उमटलेल्या खुरांची पहाणी करत होता. त्यावरुन तो त्या प्राण्याचे वय आणि मादी का नर असावा हे सांगू शकत होता. एका लंगड्या रानडुकराचा मागही त्याने मधेच मला दाखविला. त्याने एक जागा अशी दाखविली ज्या ठिकाणी त्याच्यामते दोन डुकरांची चांगलीच जुंपली असणार. तो हे सांगताना माझ्या डोळ्यासमोर सगळे दृष्य उभे रहात होते. हे सगळे मला कळले असते का ? अगदी लक्षपूर्वक पाहिले असते तरी कळले असते की नाही शंकाच आहे. जास्तीतजास्त ते प्राणी कुठल्या दिशेला चालले आहेत एवढेच काय ते मी सांगू शकलो असतो. तासाभरातच आम्ही वर पोहोचलो. श्वास घेण्यासाठी आम्ही एका दगडावर आमचे बूड टेकले आणि सभोवताली नजर टाकली.
‘बघा कपितान ! काय आहे ?’ देरसूने मला हाक मारली. तो एका ठिकाणी बोट दाखवून माझे लक्ष वेधायचा प्रयत्न करत होता.
मी त्या दिशेला पाहिले तर मला एक काळसर सावली दिसली. ढगाची असावी तशी. मी तसे बोलून दाखविल्यावर देरसू फक्त हसला. त्याने खांदे उडवून आकाशाकडे बोट दाखविले. ते शूभ्र निळे होते. ढगांच्या सावलीचा प्रश्नच नव्हता.
‘मग काय आहे ते? ’ मी विचारले.
‘काहीच ठावं नाही तुम्हाला. बघू !’
आम्ही तो डोंगर उतरायला सुरुवात केली. थोड्याच वेळात ती सावली आमच्या दिशेने सरकत असल्याचा मला भास होऊ लागला. दहा मिनिटातच देरसूने मला एका दगडावर बसण्याची खूण केली व तो स्वत:ही बसला.
‘इथेच बसूया. गुपचूप. बोलायचे नाही, काटकीबी मोडायची नाही’ त्याने मला सुचना दिली.
आम्ही मग वाट बघत थांबलो. ती छाया आता बरीच मोठी झाली होती आणि आता मला त्यातील प्राणी स्पष्ट दिसायला लागले होते.
‘रानडुकरे’ मी हळू आवाजात म्हटले. तो जवळजवळ शंभर ते दिडशे रानडुकरांचा कळप होता. काही रानडुकरे त्या कळपातून बाजूला होत होती पण परत त्या कळपास जाऊन मिळत होती. हळू हळू त्यातील प्रत्येक रानडुक्कर दिसायला लागला.
‘ एक माणूस लय दांडगा आहे’ देरसू म्हणाला.
मी त्याच्याकडे चमकून बघितले. ‘कुठल्या माणसाबद्दल तो बोलत होता कोणास ठाऊक !’
त्या कळपात मध्यभागी एखाद्या टेकाडासारखा तो भला मोठा रानडुक्कर त्या कळपात उभा होता. त्याचे वजन सहाशे पौंडाच्या आसपास निश्चितच असेल. तो कळप आमच्याच दिशेने येऊ लागला. त्या खुरांखाली वाळलेल्या पानांचा चुराडा होऊन त्याचा मोठा आवाज येत होता. त्यांच्या त्या वजनाखाली वाळलेल्या फांद्याही तुटून त्याचा कडकड येणाऱ्या आवाजाने ते वातावरण भरुन गेले. त्या आवाजात त्यांचे गुरगुरणे मिसळून एक वेगळाच भ्रम निर्माण होत होता.
‘मोठा माणूस काही जवळ येत नाही.’ मला तो कोणाविषयी बोलतोय हेच कळत नव्हते.
तो दांडगा रानडुक्कर मध्यभागी उभा होता पण बाकी सगळी रानडुक्करे कधी इकडे तर कधी तिकडे भरकटत होती. त्यातील काही आमच्या जवळही आली. पण हा पठ्ठ्या मात्र त्याची जागा सोडेना. आम्ही तसेच स्तब्ध बसलो. तेवढ्यात आमच्या जवळ आलेल्याने त्याचे नाक वर केले. तो काहीतरी चावत होता. मला ते दृष्य कालच पाहिल्यासारखे अजुनही आठवते. त्याचे डोके भले मोठे होते व कान कातरल्यासारखे होते. नजर कृर व बथ्थड होती. त्याचा खालचा जबडा हलत होता व बाहेर तीक्ष्ण सुळे डोकावत होते. भयंकर ! त्याला बहुदा आमचा वास आला असावा कारण तो थबकला. त्याने त्याचे डोळे आमच्या दिशेने रोखले. तो मोठ्याने फुरफुरला व त्याच बरोबर तो कळप उधळला.
बंदूकीचा एकच बार उडाला व एक रानडुक्कर जमिनीवर कोसळला. देरसूच्या हातातील रायफलमधून धुराच्या रेषा निघालेल्या पाहिल्यावर काय झाले ते मला उमजले. सगळे जंगल त्या रानडुकरांच्या कोलाहलाने दुमदुमून गेले व पुढच्याच क्षणी त्या जंगलात परत शांतता पसरली.
युसोरियाची रानडुकरे जपानी रानडुकरांशी नाते सांगतात. त्यांचा आकार महाकाय असतो व वजन सहाशे पौंडापर्यंत सहज भरते. लांबी सरासरी साडेसहा फूट व उंची तीन फूट ते साडेतीन फूट भरते. त्याचे सुळे साधारणत: आठ इंच बाहेर आलेले असतात. देवदारच्या झाडांवर त्यांना अंग घासायची आवड व सवय असल्यामुळे त्यांच्या राखरखीत केसांना त्या झाडांचा गोंद चिकटलेला आढळतो. थंडीमधे ते चिखलात लोळून आपल्या अंगाला चिखल फासून घेतात...... त्याने त्यांचे थंडीपासून संरक्षण होते. काही माद्यांची सडे इतकी मोठी होतात की त्यांना हालचाल करणेही अवघड जाते. बर्फात त्यांच्या राठ केसांवर बर्फ साठतो व त्याचा इतका ढीग होतो की ते ओझे घेऊन त्यांना चालणे मुष्कील होते.
रानडुक्कर एक अतिशय ताकदवान जनावर आहे व वेळ पडल्यास तो चपळ हालचालीही करु शकतो. त्याची दृष्टी व श्रवणशक्तीही चांगली असते. त्याच्या घाणेंद्रियांबद्दल तर बोलायलाच नको. जखमी अवस्थेत त्याच्यासारखा खुनशी प्राणी जगात नाही. जखमी झाल्यावर रानडुक्कर शिकाऱ्याच्या वाटेत पडून रहातो व तो जवळ आल्यावर त्याच्यावर चाल करुन जातो. त्यावेळी त्याचा वेग इतका प्रचंड असतो की शिकाऱ्याला त्याची बंदूक खांद्यास लावण्यासही वेळ मिळत नाही. देरसूने मारलेला रानडुक्कर ‘पिल्लू’होते. असेल एक दोन वर्षाचे. मी देरसूला त्याने एखादा मोठा रानडुक्कर का नाही मारला ते विचारले.
‘तो म्हातारा माणूस. त्याच्या मासाला वास मारतो.’ अच्छा म्हणजे इतक्या वेळा तो माणूस माणूस म्हणत होता तो म्हणजे डुक्कर होता तर.
‘माणूसच तो. त्यालाही सगळे कळते. सापळे कुठे लावले ते समजते. चिडतो. त्यालाही सगळे जंगल तोंडपाठ. त्याचा कुडता फक्त वेगळा.’
माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. या आदिमानवाचा जंगलाकडे व निसर्गाकडे बघायचा दृष्टीकोन गूढ होता. प्रत्येक नैसर्गिक वस्तूला आत्मा असतो यावर त्याचा दृढ विश्वास दिसत होता. त्यामुळे तो प्रत्येक सजीव वस्तूत मानव पहात होता.
थोडावेळ त्या डोंगरावर घालवून आम्ही दिवस संपायच्या आत परत जावे असा विचार केला. देरसूने त्या रानडुकराचे पाय एकत्र बांधले व तो खांद्यावर टाकला. आम्ही तासाभरात आमच्या तळावर परतलो. त्या कोंदट चिनी घरात माझा जीव गुदमरु लागल्यावर मी चुपचाप बाहेर येऊन देरसूजवळ पडलो. देरसूने आकाशकडे पडल्यापडल्याच एक नजर टाकली.
‘ वाटते ..आज गरमी...उद्या रात्री पाऊस’
मला झोपच येत नव्हती. डोळ्यासमोर सारखी ती रानडुकरांची झुंड येत होती. त्यांच्या लाल नाकपूड्या व त्यातून बाहेर येणारे ते भयानक सूळे ....पहिल्यांदा ठिपक्यासारखे दिसणारे ते..थोड्याच वेळात त्यांनी महाकाय आकार धारण केल्याचे दृष्य माझ्या डोळ्यासमोरुन जातच नव्हते. कधी डोंगर तर कधी ते सूळे अशी माझ्या पापण्यांच्या आड दृष्यांची सरमिसळ होऊ लागली.....
माणसाचा मेंदू म्हणजे एक आश्चर्यच आहे. दिवसभर आपण एवढ्या घटना पाहतो पण त्यातील एखादेच दृष्य आपल्या मनात घर करुन रहाते मग ते महत्वाचे असो किंवा नसो. अशा कितीतरी जागा आहेत की जेथे काही विशेष घडले नसताना सुद्धा मला अजून स्पष्ट आठवतात. हजारो झाडांतील एकच झाड का बरे आठवते ? एखादेच मुंग्यांचे वारुळ का आठवत असेल ? एखादे वाळलेले लालसर पिवळ्या रंगाचे पान, शेवाळ्याचा पुंजका आता याच्यात काय विशेष आहे? पण या वस्तू आठवतच राहतात.
या सगळ्या गोष्टी आठवत आहेत तोपर्यंत त्यांची अचूक रेखाचित्रे काढून ठेवली पहिजेत..........
क्रमशः
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
15 Oct 2013 - 10:24 am | मुक्त विहारि
पु भा, प्र,
15 Oct 2013 - 10:39 am | आतिवास
तुम्ही हे चित्रपटावरून लिहिता आहात? की लेखनाचा अनुवाद आहे? मूळ लेखनाचा दुवा मिळाल्यास आभारी राहीन.
15 Oct 2013 - 10:42 am | नन्दादीप
मस्त कथा..... अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद.....
15 Oct 2013 - 10:42 am | जयंत कुलकर्णी
मुळ पुस्तक......
15 Oct 2013 - 2:00 pm | आतिवास
प्रतिसाद डोक्यावरुन गेला :-)
16 Oct 2013 - 12:27 am | प्यारे१
+१.
मूळ पुस्तक .... असं लिहीलंय.
शेवटी पत्ते उघडतील बहुधा.
सुंदर अनुवादात्मक लिखाण. (कुठंतरी मेलेल्या ऐवजी मरलेल्या असं काही झालंय.)
16 Oct 2013 - 7:30 am | जयंत कुलकर्णी
अहो, त्यांनी देरसूच्या सिनेमावरुन लिहिले का असे विचारले आहे...मी म्हटले आहे की नाही मुळ पुस्तकावरुन.....पत्ते सुलटेच टकले आहेत.......:-)
15 Oct 2013 - 10:51 am | मुक्त विहारि
हे असले काही अस्सल विचार ऐकले/वाचले की मी तरी शून्य होतो...
15 Oct 2013 - 10:24 pm | अर्धवटराव
अगदी नेमकी प्रतिक्रिया.
15 Oct 2013 - 12:17 pm | अनिरुद्ध प
उत्क्रुष्ठ लेखन शैली (भाषांतर्),पु भा प्र.
15 Oct 2013 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त !
पहिल्या भागाचा दुवा देऊ शकाल काय?
पुभाप्र
15 Oct 2013 - 1:28 pm | जयंत कुलकर्णी
भाग-१ - निशाचर
15 Oct 2013 - 2:10 pm | पैसा
अजिबात वाट बघावी न लागता दुसरा भाग लिहिल्याबद्दल धन्यवाद! अगदी मस्त झालाय हाही भाग!
16 Oct 2013 - 5:28 am | खटपट्या
ज ब री !!!! पु.भा.प्र.
18 Oct 2013 - 10:42 am | कोमल
देसूर वरुन मला सतत "एका रानवेड्याची शोधयात्रा" मधला केता आठवतोय..
आणि जंगलावरून "पाडस"
प्रचंड सुंदर भाषांतर. सॉलिड.. ४ भाग आत्ता एका दमात वाचून काढले..
सगळ्यांचा हा एकत्र प्रतिसाद गोड मानून घ्या..
पुभाप्र.