भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
३
कोरियन गाव...
सकाळी मी उठलो तर काय सगळेच उठून आवराआवर करत होते. ‘जरा उशीरच झाला उठायला’ मी मनात म्हटले. पण उठल्या उठल्या माझ्या लक्षात कोणती गोष्ट आली असेल तर ढगाळ आकाश. सूर्यमहाराज त्या ढगाआड अदृष्य झाले होते. सगळे जण संभाव्य पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांचे सामान काळजीने बांधत होते. ते बघून देरसू म्हणाला,
‘घाई नाही. आज रात्री पाऊस. आत्ता नाही.’ मी त्याला विचारले हे तो कसे काय सांगू शकतो तर तो म्हणाला,
‘तुम्हीच बघा. छोटे पक्षी येतात जातात. चिवचिव. पाऊस येणार हे गप्प बसतात. झोपतात.’
खरेच होते ते. पाऊस येणार असेल तर वातावरण कसे कुंद होते. सगळे स्तब्ध होते. पण आता तर पक्षांची गडबड उडाली होती. ते एकामेकांना साद घालत होते तर सुतार पक्षी एका लयीत लाकडावर टोचे मारत होते.
आम्ही देरसूला पुढचा रस्ता विचारला व निघालो.
टुडिंट्सी डोंगरापलिकडे लेफूचे पात्र रुंद होते व लेफूच्या काठी याच जिल्ह्यात माणसाने प्रथम वस्ती केली असे म्हणतात. अंदाजे दोन वाजता आम्ही निकोलेव्हका नावाच्या वाडीला फोहोचलो. थोड्याशा विश्रांतीनंतर मी ऑलेन्टीएव्हला त्या गावातून घोड्यांसाठी ओट विकत घेण्यास सांगितले व देरसूला घेऊन मी पुढे निघालो. मला लवकरात लवकर काझकेव्हिचेव्हो नावाच्या कोरियन गावात पोहोचून मला त्या गावात आज रात्रीच्या मुक्कामाची काही सोय करता येते का हे बघायचे होते. बहुदा देरसूने आज रात्री पाऊस येणार सांगितलेले माझ्या डोक्यात पक्के बसलेले असावे.
थंडीमधे तसा अंधार लवकरच पडतो. पाच वाजता पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. आम्ही पावले पटपट उचलायला लागलो. थोड्याच अंतरावर रस्त्याला फाटे फुटले. एक नदीकडे जात होता तर एक डोंगरावर. आम्ही तो डोंगरावर जाणारा रस्ता पकडला. त्या रस्त्याला असंख्य पायवाटा छेदत होत्या. दोनतीनदा चुकून त्या कोरियन खेड्याला पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार झाला.
त्याच वेळी आमच्या सैनिकांची तुकडी त्या तिठ्यावर पोहोचली. कुठला रस्ता घ्यायचा हे न कळल्यामुळे त्यांनी आमचा ठावठिकाणा समजण्यासाठी हवेत गोळीबार केला. आम्हीही त्यांना आमची जागा समजावी म्हणून हवेत दोन तीन गोळ्या झाडल्या. जवळच्याच एका घरातून आम्हाला एक आरोळी ऐकू आली व पाठोपाठ गोळी झाडल्याचा आवाज. त्यानंतर दुसऱ्या घरातून, नंतर अजून एका असे करत त्या खेड्यातील सर्व घरातून आमच्यावर गोळ्यांच्या फैरींचा वर्षाव होऊ लागला. पावसाने, त्या आरोळ्यांनी व गोळीबाराने मी गोंधळून गेलो. अचानक एका घरामागून एक कोरियन माणूस एका हातात रॉकेलचा कंदील व एका हातात रायफल घेऊन अवतीर्ण झाला. तो त्याच्या भाषेत काहीतरी ओरडत होता. त्याला बघून आम्ही त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्याकडे धावलो. त्या कंदीलाच्या प्रकाशात त्याचा भयभीत चेहरा आम्हाला स्पष्ट दिसला. जसे त्याने आम्हाला पाहिले त्याच क्षणी त्याने हातातील कंदील फेकून दिला व देरसूवर अगदी जवळून गोळी झाडली. खाली पडून फुटलेल्या कंदीलातील रॉकेलने पेट घेतला व तेथे धूर झाला.
‘तुला गोळी लागली नाही ना ? ’ मी देरसूला विचारले.
‘नाही’ असे म्हणून त्याने तो कंदील उचलला.
ते त्याच्या वर गोळ्या झाडत होते पण देरसू तेथे न घाबरता त्यांना तोंड देत हातवारे करून त्या कोरियन लोकांना ओरडून काहीतरी सांगायचा प्रयत्न करु लागला.
या सगळ्या गोळीबाराचा आवाज ऐकून ऑलेन्टिएव्हने आमच्यावर दरोडेखोरांनी हल्ला चढविला असे समजून काही सैनिकांना घेऊन जागेवर धाव घेतली. तोपर्यंत गोळीबारही मंदावला व देरसूने त्या कोरियन माणसांबरोबर बोलणी चालू केली. देरसूने त्यांची समजूत घालायचा बराच प्रयत्न चालवला होता पण त्या कोरियन माणसांनी त्यांच्या घराची दारे आमच्यासाठी उघडली तर नाहीतच परंतु उलट परत गोळीबार करायची धमकी दिली.
एवढे सगळे घडल्यावर आता तंबू ठोकण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. आम्ही त्या नदीच्या किनारी तळ ठोकला व शेकोटी पेटविली. एका बाजूला कोरियन झोपडी होती तर दुसऱ्या बाजूला त्यांनी थंडीसाठी साठवलेले सरपण. गंमत म्हणजे गावाच्या वेशीवरच्या घरातून अजूनही बंदूकांचा आवाज मधून मधून येत होता. कोण होते ते ? कोरियन लोकांनाच ते माहीत नव्हते. आरडा ओरडा व मधेच बंदूकीचा आवाज असा धांगडधिंगा रात्रभर चालू होता.
दुसऱ्या दिवशी मी विश्रांतीचा हुकूम सोडला. मी सैनिकांना त्यांची कपडे सुकवण्यास सांगितले व त्यांची हत्यारेही साफ करण्यास सांगितले. पाऊसही थांबला. वाऱ्याने ढग पांगले व सूर्याचे दर्शन झाले. मी कपडे चढविले व गावात फेरफटका मारण्यास बाहेर पडलो.
मला एका गोष्टीचे भयंकर आश्चर्य वाटले. काल रात्री जे काही झाले त्याची चौकशी करण्यास खरे तर त्या गावकऱ्यांनी आमच्या तळाला भेट द्यायला हवी होती म्हणजे ते कोणावर गोळ्या झाडत होते हेही त्यांना कळले असते. पण तसे काहीही झाले नाही. जवळच्याच घरातून दोन माणसे बाहेर पडलेली मी बघितली. त्यांनी पांढऱ्या रंगाचे अघळपघळ कोट घातले होते व खाली त्याच कापडाची विजार. ते आमच्या शेजारुन गेले पण त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. तेथेच एका घराच्या पडवीत एक म्हातारा माणूस विणत बसला होता. मी त्याच्याकडे गेलो. त्याने शांतपणे मान उचलून माझ्याकडे बघितले. त्याच्या डोळ्यात ना आश्चर्य होते ना कुतुहल. तेवढ्यात एक बाई त्या घरातून बाहेर आली. तिनेही पांढरा पेटीकोट व एक सूती शर्ट घातला होता ज्याची छातीवरची बटणे खुली होती. डोक्यावर एक घागर घेऊन, जमिनीकडे पहात ती शांतपणे चालत आमच्या शेजारुन गेली पण तिनेही मान वर करुन आमच्याकडे पाहिले नाही. मी त्या गावात जेथे जेथे गेलो त्या ठिकाणी हा विचित्र अलिप्तपणा मला जाणवला. कोरियन माणसे यासाठी प्रसिद्ध आहेत, पण हे जरा जास्तच होत होते. हा शांतपणा म्हणावा तर तो निरसतेकडे झुकणारा होता असेच म्हणावे लागेल. त्यांच्या हालचालीही यंत्रवत होत होत्या. जणू काही या गावात माणसे रहात नसून यंत्रेच राहतात अशी शंका कोणालाही यावी.
हे कोरियन छोटे शेतकरी गरीब आहेत. त्यांची घरे एकमेकांपासून बरेच अंतर राखून बांधलेली असतात व प्रत्येक घराभोवती त्यांची शेती असते. म्हणून कोरियन गावाची लोकसंख्या कमी असली तरी गाव मोठे असते. असा अनुभव आल्यावर मी चुपचापपणे तळावर परत आलो. आल्यावर मी त्यांच्या जवळच्याच घराला भेट दिली. कुडाच्या भिंती मातीने सारवल्या होत्या. घराला तीन दरवाजे व उघड्या खिडक्या असून त्याला कागद लावलेले होते. घर वाळलेल्या गवताने शाकारले होते.
ही सगळी घरे एक सारखीच असतात. प्रत्येक घरात मातीचा ओटा असतो ज्याला ते कँग म्हणतात. हा ओटा निम्मे घर व्यापतो कारण याच्या खालून उष्णता वाहून नेणारे पाईप असतात. ही उष्णता घर व फरश्या गरम ठेवतात. या सगळ्या नळ्या शेवटी झाडाच्या एका पोकळ केलेल्या बुंध्याला जोडून तो धूर हवेत सोडलेला असतो. घराच्या ज्या भागात कँग असतो त्यात घरातील माणसे राहतात तर उरलेल्या जागेत ते त्यांची जनावरे बांधतात. तट्ट्यांनी घरात खोल्या पाडून सोय केलेली असते. एकात मोठी माणसे तर एकात लहान मुले किंवा पाहूणे झोपण्याची सोय असावी. या घरात मी मघाशी पाहिलेली बाई बघितली. ती टाचा उंच करून एका भांड्यात लाकडी मगने पाणी ओतत होती. तिने माझ्याकडे दुर्लक्ष करत तिचे काम चालू ठेवले. त्या ओट्यावर एक म्हातारा शांतपणे त्याचा पाईप ओढत बसला होता. माझ्या अभिवादनाला त्याने साधे उत्तरही दिले नाही. काही क्षण अशा अवघडलेल्या वातावरणात बसून मी शेवटी माझ्या सहकाऱ्यांत परतलो.
जेवणानंतर मी परत फेरफटका मारण्यास बाहेर पडलो. नदी पार करुन मी त्या डोंगरावर थोडीशी भटकंती केली व शेवटी टोकाच्या कड्यावर पोहोचलो. दिवस मावळायला आला होता. क्षितिजावर गुलाबी रंगाच्या ढगांचा कापूस पिंजून उधळला होता. मावळत्या सूर्याच्या फाकलेल्या किरणांमधे दुरचे डोंगर जांभळट रंगाने उजळून निघाले होते. निष्पर्ण झाडांनी करडा रंग धारण केला. ते कोरियन खेडे नेहमीप्रमाणे शांत होते. घरावरच्या धुराड्यांमधून पांढऱ्या रंगाचा धूर वरच्या थंड हवेत तेवढ्याच शांतपणे मिसळत होता. गावात मधेच एखादा कोरियन रस्त्यावर दिसे व नाहीसा होत होता. नदीच्या वाळूत मला आग दिसली. तो आमचा तळ होता.
मी तळावर पोहोचेपर्यंत अंधार गडद झाला. नदीचे पाणी आता काळे दिसत होते व त्याच्या पृष्ठभागावरुन आमच्या शेकोटीचा प्रकाश परावर्तीत होत होता. आकाशात चांदण्या चमचम करत होत्या. शेकोटीभोवती माझे सैनिक बसले होते. एक जण काहीतरी सांगत होता तर बाकी सगळे खो खो हसत होते.
‘जेवण तयार आहे !’ आमच्या खानसाम्याची आरोळी आली. हास्यविनोद त्याच क्षणी थांबले व तेथे शांतता पसरली. जेवणानंतर थोडे चहापान झाल्यावर मी शेकोटीच्या प्रकाशात आजची रोजनिशी लिहीत बसलो. देरसूने त्याचा पिट्टू नीट लावत लावत शेकोटी पेटत ठेवली होती.
‘ आज जरा थंडी ’ तो म्हणाला.
‘ एखाद्या खोलीत जाऊन झोप’ मी म्हणालो.
‘नाही. मी नेहमी बाहेरच झोपतो’ देरसू.
असे म्हणून देरसूने झाडाच्या फांद्या जमिनीत रोवल्या व वरती तंबूचे कापड टाकले. खाली जमिनीवर बोकडाचे कातडे अंथरुन तो त्याच्यावर बसला. त्याचा कोट त्याने खांद्यावरुन ओढून आपला पाईप पेटवला. थोड्याच मिनिटात मंद घोरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो गाढ झोपला होता. त्याची हनुवटी छातीवर झुकली होती व ओठातील पाईप गळून त्याच्या पायाशी पडला होता.
‘हा माणूस असा आयुष्यभर झोपला असेल तर कठीण आहे’ मी मनाशी म्हटले.
त्याच्याकडे बघताना माझ्या मनात त्याच्या कष्टप्रद जीवनाविषयी अपार करुणा दाटून आली. त्याचवेळी माझ्या मनात दुसरा विचार आला की हा माणूस त्याचे हे स्वातंत्र्य कितीही प्रलोभन दाखविले तरी त्यागणार नाही.
तो त्याच्या आयुष्यात त्याच्या परीने परमसुखी होता.
माझ्यामागे नदीचे पाणी कुजबुजत होते. दूर कोठेतरी एका कुत्र्याने आवाज टाकला. त्याचवेळी एका घरात एक लहान मुल रडू लागले. मी माझ्या स्लिपिंगबॅगमधे स्वत:ला गुंडाळून घेतले. थोड्याच वेळात मी गाढ निद्रेच्या स्वाधीन झालो.
सकाळी आम्ही उठलो तर चांगलेच उजाडले होते. काल रात्री चरण्यासाठी मोकळे सोडलेले घोडे चरायला न मिळाल्यामुळे बरेच दूरवर गेले होते. आता त्यांना शोधायला जाणे भाग होते. काही सैनिक त्यांना शोधायला गेले तोपर्यंत आमच्या खानसाम्याने चहा आणि काशा तयार केले. घोडे आणि त्यांना शोधायला गेलेली माणसे परत येईपर्यंत आम्ही तयार होऊन मार्गस्थ झालो. सकाळचे आठ वाजले होते.
कोरियन खेड्यानंतर दोन मैल अंतरावर दोन रस्ते फुटले. एक खाली दरीत जात होता तर एक न मळलेला नदीच्या डाव्या काठावर जात होता. आम्ही दुसरा रस्ता पकडला. जसे जसे आम्ही पुढे जाऊ लागलो तसे जास्त गवताळ जमीन दिसायला लागली. आम्ही सपाटीला आल्याचे हे लक्षण होते. उंच कडे, डोंगर आता मागे पडले व त्यांची जागा आता छोट्या छोट्या खेळण्यात असाव्यात अशा मोहक टेकड्यांनी घेतली. घनदाट झाडांची जागा झाडाझुडपांनी घेतली. मधेच ओकची व लिंबाची झाडे आपली मान उंचवून सभोवताली टेहळणी करण्यासाठी उभी होती. नदीच्या काठावर मात्र विलो, अल्डर व जांभळाच्या झाडांची रेलचेल होती. आमच्या रस्त्याने डावीकडे वळण घेतले व थोड्याच वेळात आम्ही नदीपासून दोन तीन मैल दूर आलो.
त्या दिवशी आम्ही उशीर झाल्यामुळे लिआलिकाला पोहोचू शकलो नाही. शेवटी आम्हाला त्या गावापासून चार मैलावर एका वळसे घालणारऱ्या झऱ्याकाठी मुक्काम ठोकायला लागला. त्या रात्री मी देरसू बरोबर आमच्या पुढच्या प्रवासाबद्दल चर्चा करत असताना त्याला सांगितले की मला ‘हांका’ लेक बघायची इच्छा आहे. हा तलाव श्री. प्रेवाल्स्की यांनी शोधून काढला होता. गोल्डीने मला सांगितले की पुढे रस्ता अवघड व दलदलींनी भरलेला आहे व त्यात रस्ता शोधणे अशक्य आहे. त्याने असाही सल्ला दिला की सैनिक व घोडे लिआलिकाला सोडून बोट घेऊन पुढे जाणे योग्य ठरेल.
मला हा सल्ला पटला व मी तो पाळलाही फक्त माझ्या माणसांची व घोड्यांची थांबण्याची जागा बदलली........
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
16 Oct 2013 - 9:04 am | मुक्त विहारि
आवडला....
16 Oct 2013 - 9:15 am | लॉरी टांगटूंगकर
नेहमी प्रमाणे लेखमाला उत्तम चालली आहे.
भागांची वाट न बघायला लावल्या बद्द्ल लै लै धन्स :)
16 Oct 2013 - 11:07 am | धर्मराजमुटके
साहेब, हा कोणत्या पुस्तकाचा अनुवाद आहे ? ह्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे का ? नसेल तर तुम्ही लेखकाची किंवा त्यांच्या वारसांची परवानगी घेऊन मराठी पुस्तक काढा.
मी आगाऊ नोंदणी करण्यास तयार आहे. भावानुवाद वाचून "पाडस" ची आठवण झाली.
अवांतर : "पाडस" कोठे मिळेल काय ? मी मुंबई आणी ठाण्यात बर्याच लायब्रर्या / दुकाने पालथी घातली पण मिळाले नाही. कोणी माहिती देऊ शकेल काय ?
16 Oct 2013 - 11:46 am | जयंत कुलकर्णी
"देरसू उझाला'. पाडस्पासून प्रेरणा घेतली आहे...... पुस्तक छापायला हरकत नाही पण खपले तर ठीक नाहीतर त्यावर झोपायला लागेल......:-)
18 Oct 2013 - 11:23 am | कोमल
ठाण्यातल्या दुकानांची माहिती नाही, पण मी क्रॉसवर्ड मधून घेतलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही क्रॉसवर्ड मध्ये मिळेल, अन् उपलब्ध नसेल तर ते आणून देतात..
किंवा ऑनलाईन पण मागवता येईल.
16 Oct 2013 - 11:30 am | अभिजीतराव
सर,
जबरद्स्त आणि उत्कन्ठावर्धक लेखन.......... आपले लेखन नेहमीप्रमाणे वाचकान्साठी पर्वणीच असते.... पु.भा.प्र.
16 Oct 2013 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
कहाणी मस्त आहे... मजा येतेय वाचायला.
पण ही कहाणी कोरियातली की रशियातली ? बहुतेक सगळ्या माणसांची नावे रशियन आहेत. आणि हांका तलाव तर रशिया-चीनमध्ये विभागला गेलेला आणि कोरियन सीमेपासून ३००-४०० किमी दूर आहे.
16 Oct 2013 - 6:15 pm | जयंत कुलकर्णी
जो प्रदेश अर्सिनिएव्हने पालथा घातला त्याचा नकाशा खाली दिला आहे.........
17 Oct 2013 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद ! पण हे चित्र आणि इतर चित्रेही मला दिसत नाहीत !
शक्य असल्यास चित्रे गुगलबाबावर टाकावीत. कारण इतर ठिकाणची चित्रे (फ्लिकर, मेडियाफायर, इ) सगळ्या वाचकांना दिसत नाहीत असा सूर बर्याचदा प्रतिसादातून दिसतो. मीही त्यातला एक ! मस्त लेखातली चित्रे पहायला मिळाली नाही कि मजा जरा किरकिरी होते म्हणूनच केवळ हे लिहित आहे.
16 Oct 2013 - 10:21 pm | रामपुरी
वाचतोय... पु भा प्र
17 Oct 2013 - 12:48 pm | अनिरुद्ध प
पु भा प्र
18 Oct 2013 - 10:10 am | पैसा
ओघवता भावानुवाद!
18 Oct 2013 - 11:30 am | अभ्या..
सुरेख. आवडले.