भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
भाग-३ - कोरियन गाव
४
दुसऱ्या दिवशी मी ऑलिन्टिएव्ह व मार्चेंको नावाच्या रायफलमनला माझ्याबरोबर घेतले आणि इतरांना चेर्निगोव्हका नावाच्या गावाजवळ आमची वाट पहायला सांगितले. गावपुढाऱ्याच्या मदतीने आम्ही एक सपाट बुडाची, बऱ्यापैकी सुस्थितीतील बोट मिळविली पण त्यासाठी आम्हाला त्याला तब्बल १२ रुबल्स रोख व तीनचार व्होडकाच्या बाटल्या द्याव्या लागल्या. तो सारा दिवस आम्ही ती बोट आवश्यक सामानाने भरण्यात व ती प्रवासास योग्य करण्यात घालवला. देरसूने स्वत: वल्ही तयार केली. त्या बोटीला आडव्या फळ्या ठोकून बसायची जागा केली व वल्ह्याच्या खुंट्या तयार केल्या. त्याला काम करताना बघणे हे हा एक अनुभवच होता माझ्यासाठी. त्याने अत्यंत सफाईने त्याचे काम उरकले. कोठेही गोंधळ, गडबड नव्हता. त्याच्या प्रत्येक कृतीतून काहीतरी निर्माण होत होते व एकदाही त्याच्या तोंडातून पश्चत्तापाचा हुंकार मला ऐकू आला नाही. सगळे कसे रेखीव आखीव काम चालले होते त्याचे ! त्याचे प्रशिक्षण जगाच्या शाळेत झाल्याचे स्पष्ट समजत होते. त्याच्या हालचालीतून वाहणारा उत्साह व ठाम घाई हेच सांगत होते. एका घरात आम्हाला ताजी बिस्किटे मिळाली. आम्हाला तेवढेच कमी होते. बाकीचे, म्हणजे चहा, साखर, मीठ व डबाबंद खाणे या वस्तूंचा आमच्याकडे भरपूर साठा होता. संध्याकाळी त्या गोल्डीच्या सल्ल्यानुसार आम्ही सर्व सामान बोटीवर चढविले व बोटीच्या कडेलाच किनाऱ्यावर आमची पथारी पसरली.
रात्री चांगलीच थंडी पडली व वारेही वाहत होते. सरपण जास्त नसल्यामुळे भरपूर जाळताही येत नव्हते त्यामुळे रात्रभर कुडकुडत आम्हाला झोपही व्यवस्थित लागली नाही. मी माझा कोट गुंडाळून उब मिळवायचा प्रयत्न केला पण कधी उघडा पडलेला खांदा गोठत होता तर कधी माझी उघडी पडलेली पाठ. ते सरपणही फालतू होते. त्यातून आगीऐवजी ठिणग्याच जास्त उडत होत्या व उब कमी मिळत होती. देरसूच्या पांघरुणाला तर त्या ठिणग्यांनी एक भोक पाडले. मी माझ्या कोटाच्या फटीतून बघितले तेव्हा देरसू त्या जळणाऱ्या लाकडांना त्याच्या खास भाषेत शिव्या देत होता. ‘हलकट माणूस !’
‘हा असाच जळतोय मगापासून’ त्याने नंतर त्या कडकड करणाऱ्या लाकडाची नक्कल केली व वैतागून त्या काल्पनिक माणसाला उद्देशून म्हणाला ‘थांब तुला फेकूनच देतो.
त्या नंतर मला पाण्यात विझणाऱ्या लाकडाचा येतो तसा चर्रचर्र आवाज आला. त्याने शेवटी ते चोर लाकूड पाण्यात फेकले. त्यानंतर माझे डोळे मिटू लागले व का कोणास ठाऊक थोडी उब आल्यामुळे मला झोप लागली.
मधेच मध्यरात्री मला जाग आली तेव्हा देरसू त्या शेकोटीच्या शेजारी बसलेला दिसला. वारा सुटला होता आणि आता शेकोटीच्या ज्वाळा चांगल्याच भडकल्या होत्या. मला माझ्या अंगावर अजून काहीतरी असल्याचे जाणवले. बघतो तर तो देरसूचा कोट होता. त्या रात्री अचानक वाढलेल्या उबेचे व झोपेचे रहस्य मला तेव्हा उलगडले. देरसूने उरलेल्या दोघांच्या अंगावरही त्याचा तंबू पांघरला होता. मी देरसूला थोडावेळ माझ्या जागेवर झोपतोस का असे विचारल्यावर त्याने नम्रपणे नकार दिला.
‘नाही. तुम्ही झोपा ! मी याच्याकडे बघतो. हा माणूस फारच वात्रट आहे’ आगीकडे बोट दाखवून तो म्हणाला.
या माणसाचा मला जसा जसा अनुभव येऊ लागला तसा तो मला जास्तच आवडू लागला. दररोज त्याच्या स्वभावाचे नवनवीन पैलू माझ्या नजरेस पडत होते व मी आश्चर्यचकित होत होतो. याआधी मला वाटत होते की सभ्यता, मानवता, दानशूरपणा या सगळ्या गुणांवर ख्रिश्चन व युरोपियन वंशाचाच मक्ता आहे व जंगली, आदिवासींचा याच्याशी काही संबंध नाही. ते स्वार्थी, उद्धट व दुराभिमानी असतात. बऱ्याच काय, जवळ जवळ सगळ्याच युरोपियन लोकांचा हाच समज असावा. असे समजणे हाच मोठा गुन्हा आहे असे आता मला वाटू लागले. त्याच विचारात मला झोप लागली....
सकाळी फटफटल्यावर देरसूने आम्हा सगळ्यांना उठविले. त्याने चहा उकळला व मासाचा एक तुकडा त्या शेकोटीवर खमंग भाजला. अशी चवदार न्याहारी झाल्यावर मी माझ्या घोड्यांना व सैनिकांना परत पाठवून दिले व आम्ही आमची बोट पाण्यात ढकलली.
बांबूंनी पाण्यात ढकलत आम्ही ती बोट नदीच्या मुख्य प्रवाहात नेली. तिने आता चांगलाच वेग पकडला होता. चार एक मैलावर आम्ही नदीवर असलेल्या रेल्वे पुलाखाली पोहोचलो. तेथे आम्ही थोडी विश्रांती घेण्यासाठी थांबलो. देरसूने तो लहानपणी त्याच्या वडिलांबरोबर या प्रदेशात जंगली बोकडाच्या शिकारीला आला होता ते सांगितले. त्याने रेल्वेबद्दल चिनी लोकांकडून ऐकले होते पण असले काही तो प्रथमच पहात होता.
थोड्याशा विश्रांतीनंतर आम्ही परत एकदा आमची नाव पाण्यात ढकलली. त्या रेल्वेपुलाजवळ डोंगररांग संपत आली . मी बोट किनाऱ्याला लावायला सांगितली व त्या छोट्या टेकडीवर जाऊन सभोवताली नजर टाकली. त्या निसर्गाने माझे मन उल्हसित झाले. आमच्या मागे पूर्वेला दूरवर पसरलेले डोंगर दिसत होते तर दक्षिणेला डोंगरात लार्चची घनदाट जंगले होती. उत्तरेला नजर पोहचेल तेथपर्यंत जमिनीवर गवत माजलेले दिसत होते. मी दुरवर न्याहाळले पण त्या गवताळ जमिनीचा अंत मला काढता आला नाही. पार क्षितिजापर्यंत त्याने जमीन व्यापली होती. प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीबरोबर त्या गवतावर शांत समुद्रावर उठतात तशा हळूवार लाटा उठत होत्या. मधे मधे बर्च झाडांचे पुंजके एकामेकांच्या साथीने उभे होते. लेफूचे पात्र दिसत नव्हते पण तिच्या काठाला अगणीत आल्डर व विलो वृक्षांमुळे तिची वळणे सहज ओळखू येत होती. प्रथम ती इशान्येला वहात होती पण डोंगरांपर्यंत पोहोचण्याआधीच ती थोडीशी पूर्वेला वळून उत्तरेला वळली होती. हे खोरे तसे वस्तीहीन दिसत होते. नदीच्या आजुबाजुला दिसणारी असंख्य डबकी या नदीला पावसाळ्यात आलेल्या पूरामुळे अवतीर्ण झाली असणार.
त्या दिवशी दुपारनंतर आम्ही आमचा प्रवास परत चालू केला व जरा लवकरच मुक्कामाची जागा निवडली.
त्या बोटीत एवढा वेळ बसून आमचे पाय आंबले होते त्यामुळे किनाऱ्यावर जायचे ठरल्यावर सगळ्यांनाच जरा हायसे वाटले. आता जरा पायही मोकळे करता येतील या विचाराने हा निर्णय घेण्यात आला. उतरल्या उतरल्या ऑलेन्टिएव्ह व मार्चेंक मुक्कामाच्या तयारीस लागले तर मी व देरसू पोटासाठी काही शिकार मिळते का हे बघण्यासाठी पुढे निघालो.
सगळीकडे गवत माजले होते. ते इतके दाट व उंच होते की आम्ही त्यात बुडून गेलो. पायाखाली गवत, बाजूला गवत, मागे गवत, डोक्यावरही गवत असा सगळा गवताचा मामला होता. जणू काही आम्ही गवताच्या समुद्रात पोहोत होतो. एका छोट्या टेकाडावर पोहोचल्यावर तर आम्हाला हे अधिकच प्रकर्षाने जाणवू लागले. त्या गवताच्या अथांग सागरावर वारा हळूवारपणे लाटा उठवत होता. ते बघून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. ते दृष्य डोळ्यात साठवून मी दचकत परत एकदा त्या समुद्रात उडी मारली व पुढे निघालो. एक वेळ जंगलात तुम्ही रस्ता चुकणार नाही पण अशा गवतात तुम्ही सहज हरवू शकता. आम्हीही अनेक वेळा भरकटलो पण लगेचच रस्ता पकडत होतो. एका टेकडीवर पोहोचल्यावर मी आमची जागा बघण्यासाठी कंपास उघडला तर देरसूने गवत उपटून त्याच्या बरोबर काही हिरवी पाने बांधून एक खूण तयार केली.
लेफूच्या या खालच्या दलदली भागातील वन्यप्राण्यांचे विश्व पक्षांनीच व्यापले आहे. या पक्षांच्या स्थलांतर करण्याच्या काळात तेथे गेल्याशिवाय मी काय म्हणतो आहे ते कळणे अवघड आहे. लाखो छोट्या मोठ्या पक्षांचे न संपणारे थवे आभाळात उडत असतात. काही उत्तरेकडे उडत होते तर काही पक्षांच्या माळेला पार करत होते. त्या निळ्याशार आभाळाच्या पार्श्वभूमीवर पक्षांचे थवे उठून दिसत होते. काही उंच जात होते तर काही हळुवारपणे खाली येत होते. क्षितिजावर पाखरांच्या थव्यांनी तेथे एक कोळ्याचे जाळे तयार केल्याचा भास होत होता. मी ते दृष्य अनिमिष नजरेने बघत राहिलो. सगळ्यात उंचीवर गरुड उडत होते. त्यांच्या शक्तिशाली पंखांवर ते लिलया त्या आकाशात घिरट्या घालत संचार करत होते, मधेच वर झेप घेत होते. माझ्या मनात आले, ‘या गरुडांना अंतराची काय तमा ?’ काही तर ठिपक्याएवढे दिसत होते.
त्यांच्या खालच्या पतळीवर गूज पक्षी सावधपणे पण अस्ताव्यस्त थव्यात उडत होते. पंख झपाझप मारत असताना ते हाँक हाँक अशी साद घालताना बघून मला मोठी मौज वाटली. त्यांच्या शेजारुन ब्रेन्ट व स्वान पक्षी विहार करताना बघून त्याच्या खाली उडणाऱ्या बदकांना त्यांचा हेवा वाटत असणार बहुदा. नाहीतर ती त्यांच्या थव्यात मधेच घुसली नसती. मालार्ड पक्षांच्या पंखातून येणारी शिट्टीही ऐकू येत होती. पाण्यावर हजारो बदकांची गडबड उडाली होती. ती पोहताना पाण्यात उठणारी नक्षी बघताना ते मुद्दाम पाण्यात नक्षीकाम करताहेत की काय असे वाटत होते. मधेच एखादा बझार्ड व केस्ट्रेल उडताना दिसत होता. जमिनीकडे आपली तिक्ष्ण नजर रोखून ते आपले भक्षाच्या शोधात शांतपणे आकाशात घिरट्या घालत होते. मधेच जागा बदलत होते. खाली काही दिसल्यावर आपले पंख मिटून ते बिनधास्त जमिनीवर झेप घेऊन गवतावर आपल्या पंखांनी वारा घालून ते विस्कटत होते. रुबाबदार पांढरेशूभ्र गल व टर्न पक्षी त्या सगळ्यात चांदण्यासारखे उठून दिसत होते तर कर्ल्यू पक्षांची उथळ पाण्यातील धावपळ बघण्यासारखी होती. गोल्डन प्लॉव्हरांच्या थव्यांनी काही भागात काठावर ठाण मांडले होते. गंमत म्हणजे हे सर्व पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करत होते. अप्रतिम देखावा !
तेवढ्यात दोन हरणे आमच्या समोर अचानकपणे अवतरली व त्या गवतात नाहीशी झाली. शंभर एक पावलावर ती थबकून आमच्याकडे बघत होती. मी बार टाकला पण तो चुकला. त्या बाराचा आवाज त्या जंगलात घुमला आणि पाण्यावरुन पंखांचा आवाज करत हजारो पाखरे आकाशात उडाली. त्या आवाजाने दचकून ती हरणे पळत असतानाच देरसूने नेम घेतला व घोडा आवळला.
बंदुकीचा धूर विरळ झाला पण त्या हरणांचा कुठेच पत्ता नव्हता. देरसूने शांतपणे त्याच्या रायफलमधे काडतूस भरले व त्या दिशेला पाऊल टाकले. मी चुपचाप त्याच्या मागे दबकत पावले टाकली. देरसूने इकडे तिकडे नजर टाकली.
‘ती हरणे गेली. काय शोधतो आहेस तू ?’ मी विचारले.
‘नाही. माझी गोळी लागली. डोक्यात.’
मीही ते हरीण शोधायला सुरुवात केली. पण ते त्याला समाधान वाटावे म्हणून. मला खात्री होती की दोन्ही बार वाया गेले होते. दहा मिनिटातच देरसूला ते हरीण सापडले व गोळी खरोखरच त्याच्या डोक्यातून आरपार गेली होती. देरसूने शांतपणे ते खांद्यावर टाकले व तो परत फिरला. आमच्या तळावर पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली.
संधिप्रकाश टिकण्यासाठी धडपडत होता पण अंधारापुढे त्याचे काही चालत नव्हते. थोड्याच वेळात अंधाराने त्याची क्षितिजापलिकडे हकालपट्टी केली आणि एकदम नभात चांदण्या चमकू लागल्या. जणूकाही सूर्याने त्यांना नभांगणात येण्यास परवानगी दिल्यामुळे त्या खुष झाल्या होत्या. अंधारात झाडे आहेत हे समजत होते पण झाडे वेगवेगळी दिसत नव्हती. त्या झाडांमधून आमच्या शेकोटीचा प्रकाश चमकत होता. रात्र स्तब्ध व निरव शांतता वातावरणात भरुन राहिली होती. जवळच पाण्यात टिल बदके पाण्यावर उतरत होती. त्यांच्या उडण्याच्या पद्धतीने ते टिल आहेत हे सहज कळत होते.
संध्याकाळचे जेवण झाल्यावर ऑलेन्टिएव्ह व देरसूने ते हरीण सोलायला घेतले आणि मी माझ्या लिखाणाकडे वळलो. रोजनिशी लिहिल्यावर मी पांघरुण ओढले पण माझ्या डोळ्यासमोरुन गवताच्या लाटा काही जात नव्हत्या त्याच लाटांमधून बदके व गुज अंतर्धान पावत होती. शेवटी पहाटे कधीतरी माझा डोळा लागला.
पहाटे आम्ही सगळेच लवकर उठलो. चहा झाल्यावर आम्ही ताबडतोब बोटीत सामान भरले व बोट पाण्यात लोटली. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तशी लेफूची वळणे अधिक तीव्र होत होती. काही वेळा वळण पूर्ण करण्याच्या नादात ती वर्तूळ पूर्ण करतेकी काय असे वाटते तोच ती परत दिशा बदलत होती. बराच वेळ आम्हाला सरळ प्रवाह लागलाच नाही.
आमचा अन्नाचा साठा संपत आल्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही बोट किनाऱ्याला लावली आणि हॉकिडॉन नावाच्या गावात गेलो. रशियाच्या हद्दीतील हे शेवटचे गाव. गावातील मुख्य रस्ता रुंद होता व घरे मात्र बरेच अंतर सोडून बांधली होती. येथील शेतकरी बरीच वर्षे येथे स्थायिक झाले होते व प्रत्येक कुटुंबाला २५० एकर जमीन देण्यात आली होती. मी आम्हाला लागलेल्या पहिल्या घरात शिरलो. त्या घराचे शिवार अस्वच्छ होते पण आतूनही ते घर अत्यंत अस्वच्छ होते. सगळीकडे कचरा पडला होता तर कुंपणाची फारच वाईट अवस्था झाली होती. फाटक बिजागऱ्या सोडून खाली लोंबकळत होते. घराच्या दरवाजाची अवस्थाही काही फार वेगळी नव्हती. अंगणात आम्हाला एक लहान मूल कडेवर घेतलेली बाई दिसली. माझे अभिवादन तिने लाजत स्वीकारले पण माझे तिच्याकडे लक्ष नव्हते. माझे लक्ष होते त्या घराच्या खिडक्यांकडे...
त्या खिडक्यांना आत बाहेर असे दोन दोन दरवाजे व काचा होत्या. मधली पोकळी हिरवट करड्या रंगाच्या लाकडाच्या भुशाने जवळ जवळ भरली होती. त्या बाईला मी विचारले की तो भुस्सा का भरलाय तेथे ?
‘भुसा?’ तिने विचारले ‘तो भुसा नाही तर डास आहेत वाळलेले’
मी जवळ जाऊन बघितले तर ते खरोखरच मेलेले वाळलेले डास होते.
‘त्यांना तोंड द्यायचे म्हणजे हाच एक उपाय आहे’ ती म्हणाली. ते आत शिरतात व मरतात. आम्ही घरात उदबत्यांचा धूर करतो त्यामुळे ते आत येऊ शकत नाहीत’.
‘तुम्ही खरे तर गवत जाळायला पाहिजे.’ मार्चेंको म्हणाला.
‘पण वाळलेले गवत मिळणे कठीण आहे व त्या पाण्यात त्यांची सारखी पैदास होत असते’ ती वैतागून म्हणाली.
तेवढ्यात ऑलेन्टिएव्ह आला. त्याच्या हातात पावाची लादी होती. गावात एक फेरफटका मारुन आम्ही बोटीकडे परतलो. देरसूने मासाचे तुकडे खमंग भाजून तयार ठेवले होते. त्यावर ताव मारुन व चहा पिउन आम्ही बोट परत पाण्यात घातली. गावातील मुले उत्सुकतेने आमच्या मागे मागे करत होती. काही अंतर ती मुले आमच्या बरोबर किनाऱ्यावर धावत होती पण शेवटी त्यांनी आमचा नाद सोडला. नदीने एक वळण घेतले आणि ते गाव दृष्टीआड झाले.
थोड्याच वेळात आम्ही मुख्य प्रवाहाला लगलो. लेफूला पाणी पुरवणारे ओढे, उपनद्या इतक्या आहेत की मुख्य नदी कुठली हे ओळखणे खरेच अवघड जाते. कधी लेफूचे पात्र वीस यार्ड होते तर कधी शंभर यार्ड. त्याच्या पाण्याच्या फुगवट्यातून अनेक ओढे जन्म घेतात व जवळच्या छोट्या छोट्या तलावला पाणी पुरवतात. या तलावातून अनेक ओढे लेफूच्या खालच्या पात्राला पाणी पुरवतात. जसे जसे आम्ही हांका सरोवरापाशी येऊ लागलो तसा प्रवाहाचा वेग वेग कमी झाला व दलदल सुरु झाली. ज्या बांबूंनी आम्ही बोट ढकलत होतो, ते आता चिखलात रुतू लागले. कधीकधी तर ते त्या चिखलात अडकू लागले. काही ठिकाणी याउलट परिस्थिती होती. तेथे आमचे बांबूच जमिनीचा तळ गाठत नव्हते. या भागात लेफूची खोली अत्यंत उंचसखल होती.
लेफूच्या किनाऱ्यावरची जमीन तशी कठीण आहे पण थोडे जरी आत आले की लगेचच दलदल चालू होते. किनाऱ्यावरील विलो व आल्डरच्या जंगलात लपलेली लेफूची अनेक कोरडी पडलेली उपतळी आहेत. लेफूने गतायुष्यात अनेक वेळा आपले पात्र बदलले असावे.
संध्याकाळी आम्ही चेर्निगोव्हका नदीत प्रवेश केला. चेर्निगोव्हका व तिच्या एका उपनदीमधे असलेल्या एका जमिनीच्या चिंचोळ्या तुकड्यावर आम्ही मुक्काम करायचा ठरवले. आज जरा जास्तच पक्षांचे थवे स्थलांतर करताना आढळत होते. ऑलेन्टिएव्हने काही बदके मारली आणि आमच्या रात्रीच्या जेवणाची झकास सोय केली. अंधार पडल्यावर पक्ष्यांचे थवे उडायचे थांबले. आत्ता जर त्या प्रदेशावर कोणी नजर टाकली असती तर त्याला तेथे काही सजीव सृष्टी आहे की नाही याची शंका आली असती. पण त्या अंधारातही तेथे असलेल्या प्रत्येक पाण्याच्या ओढ्यात, तळ्यात, नदीत बदकांचे, गुजपक्षांचे, पाणकोंबड्यांचे थवेच्या थवे आराम करत असणार हे निश्चित.....
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
16 Oct 2013 - 11:17 pm | मुक्त विहारि
@ जयंत कुलकर्णी
मनापासून धन्यवाद...
२ गोष्टींसाठी...
१. एका अप्रतिम गोष्टी साठी.. आणि दुसरा
२. वेळेवर सगळे भाग टाकण्यासाठी..
(आमचा छगन कधी संपणार कुणास ठावुक)
16 Oct 2013 - 11:56 pm | अर्धवटराव
जे. के. सर... अनेकानेम धन्यवाद. मस्त चालु आहे सफर.
संगणकासमोर बसुन केवळ शब्दांच्या सहय्याने अवलीयांच्या निसर्गभमंतीत सामील होणे तुमच्यामुळे शक्य होतय.
17 Oct 2013 - 12:23 am | खटपट्या
ज - ब - र - द - स्त
17 Oct 2013 - 12:43 am | कपिलमुनी
hi safar sampu naye asa watat ahe
17 Oct 2013 - 1:13 am | रामपुरी
क्रमशः फार न लांबल्याने जास्त मजा येत आहे.
17 Oct 2013 - 1:20 am | प्यारे१
छान लेखन (अनुवाद नाही म्हणत मुद्दाम) सुरु आहे.
जयंतराव लेखमाला पूर्ण करतात असा अनुभव असल्यानं फक्त पुढच्या भागाची वाट बघतोय एवढंच म्हणतो.
17 Oct 2013 - 10:25 am | मृत्युन्जय
मस्तच आहेत सगळे भाग. अनुवाद अतिशय सुंदर जमला आहे.
17 Oct 2013 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट मजा येऊ लागलीय ! भाग भरभर टाकत असल्याने अधिक मजा. आधि केलेल्या गुगलफोटोवर चित्रे टाकायच्या विनंतिचा विचार करता आला तर पहावा. धन्यवाद !
17 Oct 2013 - 12:59 pm | जयंत कुलकर्णी
गुगलफोटो ?
17 Oct 2013 - 1:10 pm | अनिरुद्ध प
बहरत चालली आहे,पु भा प्र
18 Oct 2013 - 10:15 am | पैसा
वेगळ्यात जगात जाऊन येतोय आम्ही!