महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
26 May 2013 - 9:07 pm

टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली

रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली

जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली

मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली

होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली

एखादी कविता, एखादं काव्य किंवा एखादं कडवं आपल्याला एवढं आवडून जातं की आपल्या मनात, विचारात कित्येक दिवस ते थैमान घालत असतं. टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली हे जेव्हा वाचले होते तेव्हा अशीच काहीशी अवस्था माझ्या मनाची देखील होती. आपण जे जगतो जे जीवन आपल्याला मिळालेले आहे, नशीबाने, दैवयोगाने आपली परिस्थिती अशी कधी कधी होते की जे मिळालेले आहे ते अपुर्ण आहेच पण जे मिळालेले आहे कोणीतरी दान दिले आहे अशी भावना जेव्हा मनात उत्त्पन्न होते तेव्हा जी बिकट अवस्था होते त्यांचे शब्दात वर्णन करणे अवघड आहे. अनेकदा जे घडले ते वाईट, जे घडत आहे ते वाईट की जे घडणार आहे ते वाईट या संभ्रमात एखादा/एखादी असते तेव्हा वरील ओळी सहजच मनातून उभारत.. निस्तेज कागदावर आकार घेऊ लागतात....

टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली

सगळेच अस्ताव्यस्त आहे, काय चालू आहे काय बिघडलं आहे याचा काहीच कुठे अर्थ लागत नाही आहे. दिवस दिवस निघून जात आहेत, जगणं चालू आहे पण तुकड्या तुकड्यात. एखादा तुकडा दिवसाचा असा की वेळ करायला देखील फुरसत नाही व एखादा तुकडा असा की 'तो' विचार करायला वेळच का मिळाला असा.. दिवसाचं ठीक आहे, कोणी येतं कोणी जातं.. विचारांची शृखला तुटत राहते.. थोडा उसंत मिळते, वेळ कामात निघून जातो पण रात्रीचे काय? जेवढं नशीबात दान आहे तेवढं मिळणारचं पण हे जे घडते आहे, दिवस व रात्र क्षण क्षण जळणे हा भोग कसा सुटणार?

धज्जी धज्जी रात मिली... सरळ साधा अर्थ घेतला तर ती रात्रभर तळमळते आहे, घडलेल्या घटनेमुळे अस्वस्थ आहे ती. पण मला लागलेला अर्थ असा आहे की, ती थोडीफार झोपु शकत आहे, पण त्याच्या आठवणीमुळे तो स्वप्नात येण्यामुळे ती चलबिचल आहे, जे घडायचे ते घडून गेलं आहे पण तीला तो निसटता धागा सोडायचा नाही आहे, त्यासाठी तीची आंतरिक तळमळ चालू आहे. निसटत्या धाग्याला एक वेळ प्रयत्नपुर्वक एका जागी बांधता येईल, पण तो धागा हातचाच सुटला तर सगळचं रंगहीन होऊन जाईल.. त्यामुळे तीची धडपड ही तो धागा सूटू नये म्हणून आहे.

रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली

सगळे ठीक आहे, पण दु:ख देणाराच समोर हसत हसत उभा राहीला तर काय? निलकंठेश्वर व्हावे लागते हो अश्या अवस्थेत. तो भेटला याचा आनंद असतो, पण यांनेच आपली प्रताडना केली, याच्यामुळेच आपल्याला त्रास झाला हे विसरून तो हसला म्हणून हसावे देखील लागते.. वर वर.. पण आत ह्दय? त्याचे काय? तो घाय मोकळून रडू पण शकत नाही मग दोन्ही अवस्था सुखाची व दु:खाची देखील प्यावी लागते, जसे विष!
कवयत्रीने यह अच्छी बरसात मिली या ओळी अत्यंत कल्पकतेने वापरला आहेत व ती रिमझिम शब्दाला जोडून येते म्हणून छान वाटते असे नाही.. हिंदी मध्ये एक शब्द आहे "सौगात" हा लक्षात घेतला तर बरसातचा पंच आपल्याला लगेच समजेल.

जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली

जेव्हा नाती तुटतात, एखादा जवळचा दुर जातो. सुरवातीला आपल्याला वाटत असतं की हट्ट मला काही फरक पडत नाही. त्याला माझी नाही तर मला त्याची का कदर असावी, पण तसं नसतं आपल्या आतून एवढं दु:ख, वेदना झालेल्या असतात की जसे आपल्या ह्दयाचा एक तुकडा कोणीतरी कापून आपल्या सोबत घेऊन गेला आहे व त्या तुकड्याची त्याला कदर नाही. पण आपण आपल्याला आपल्या मनाला समजावत असतो की ठीक आहे गेला ना / गेली ना काही फरक पडत नाही. मी खुष तर जग खुष! आपण वर वर खूप खुष असतो स्वतःवर व जगावर देखील पण जेव्हा आर्ततेने आपण जेव्हा आपल्याकडेच पाहतो (येथे कवयत्रीने हँसने की आवाज सुनी हे कडवं वापरलं आहे) तेव्हा कळतं की हे सगळं खोटं आहे, आपल्याला माहीती आहे आपल्या काय त्रास व दु:ख आहे ते.... ले फिर तुझको मात मिली या ओळी हेच सांगतात की तुला असे वाटत असेल की तुझी अवस्था कोणाला माहीती नाही आहे पण.. तुझ्या अंतरमनाला नक्कीच माहीती आहे साहेबा.. काय घडलं व का असे खोटं खोटं जगतो आहेस.

मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली

कशी बिकट अवस्था होते पहा, आपण थांबलो म्हणून जग थांबत नाही, ते चालतच राहते, जसे ते चालणार आहे. आपण पण आपल्याला हवे तसे थोडेफार जागायचा प्रयत्न करतो पण जेव्हा जिवनसाथी, आपला सदासर्वकाळ सोबत राहणारा आपला हमसफर.. आपला मित्र जेव्हा आपल्या जगण्यावागण्यात विसंगती शोधण्याचा किंवा दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न करतो तेव्हा आपण बेचैन होतो.. आपली आत्मा आत गुदमरु लागते. कसे आहे कसे जगावे हा प्रत्येकाचा व्यक्तीगत मामला आहे पण एखादा जेव्हा नवरा होतो किंवा एखादी जेव्हा बायको होते त्यांना वाटतं की अरे समोरचा बिघडलेला आहे त्या सुधरवायलाच हवा... मी प्रयत्न करते.. मी प्रयत्न करतो.. पण या प्रयत्नाचीच कधी कधी बंधने होतात अभिजात कलावंताची कलाकृती त्या बंधनामुळे मरणासन्न अवस्थेत जाते. हे समजून उमजून एखाद्याला तथाकथित सुधारण्याचा प्रयत्न करावा.. बघा ना कवयत्री म्हणते आहे की मला हवा तसा साथी मिळाला नाही असे नाही पण त्याच्यासाठी व त्याच्या नुसार आठ पहर चालावे देखील लागत आहे व शेवटी हाती काय तर बेचैनपणा! अशांती!

होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली

मनात असलेलं, खरं खुरं अगदी बाहेर येण्याच्या बेतात असतं कधी कधी, पण आपणच स्वतःवर बंधने घालतो व वेळ मारून नेतो, का? तर आपल्याला माहीती असते समोरचा एवढा देखील वाईट नाही आहे, तो आपली काळजी करतो किंवा किमान तेवढं भासवतो तरी आहे.. मग आपण तोंडात आलेले वाक्य बदलतो व त्या आवेगाने बाहेर पडलेल्या शब्दाला एक वेगळाच आयाम देतो व आपली सुटका करून घेतो.. समोरचा कसा आहे हे व्यक्त करण्यासाठी कवयत्रीने जलती-बुझती आँखों में हे कडवं वापरलं आहे.

कसं आहे, प्रेम व त्याची अभिव्यक्तीची रुप अनंत आहेत.. फक्त ते व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा नजरीयां अलग!

आणि हो, सांगायचेच राहीले या महज़बीन बानो म्हणजे कवयत्री नाज़
नाज़ म्हणजे तुम्हाला अर्थ बोध होणार किंवा नाही माहीती नाही, जाता जाता सांगायचे म्हणून सांगून जातो.. नाज़ म्हणजे अभिनेत्री, ट्र्जेडी क्वीन मीना कुमारी!

क्रमशः

मुक्तकप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

१००मित्र's picture

26 May 2013 - 9:41 pm | १००मित्र

अत्यंत सुंदर लेख.
मीना कुमारी म्हणजेच ही ! - सुखद धक्का....
तिच्याच मनाच्या घालमेलींचा पट आहे की काय हा सारा !

उगीचंच

कतरा कतरा मिलती हैं

ची आठवण झाली.

आणी मीना कुमारी म्हटल्यावर

"शब-ए-इंतजार आखिर, कब होगी मुक्तसर भी"
ह्या "चलते-चलते" मधल्या ओळी सुद्धा आठवल्या....

दशानन's picture

26 May 2013 - 10:04 pm | दशानन

धन्यवाद.

पैसा's picture

26 May 2013 - 9:43 pm | पैसा

मीनाकुमारी, तिचा दु:खाने जड झालेला आवाज आणि ते काळेभोर डोळे, पडद्यावर साकार मूर्तिमंत दु:खच जणू. रूढ अर्थाने अल्पशिक्षित, पण जगाच्या शाळेत खूप काही शिकलेली महजबीन. इतकी सुंदर कविता आणि तिचं रसग्रहण इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

यशोधरा's picture

26 May 2013 - 10:17 pm | यशोधरा

मीनाकुमारीने लिहिलेली शेरोशायरी अत्यंत शब्ददेखणी आहे.

अर्धवटराव's picture

29 May 2013 - 9:57 pm | अर्धवटराव

शब्ददेखणी.... काय यथार्थ वर्णन आहे. मस्त.

अर्धवटराव

स्पंदना's picture

27 May 2013 - 5:05 am | स्पंदना

आता मात्र पुढच्या लिखाणाची वाट पहावी वाटते आहे.
लिहित रहा.

लाल टोपी's picture

27 May 2013 - 12:24 pm | लाल टोपी

आणखी एक मनाला भावणारा लेख. फारच छान. ब-याच वर्षांपूर्वी रसरंग वगैरे सारखी चित्रपट विषयक साप्ताहिके, मासिके यायची त्यामध्ये असे लेख असायचे आता असे लेख वाचायला मिळ्त नाहीत. त्या दिवसांत घेऊन गेल्याबद्द्ल धन्यवाद.

माझीही अत्यंत आवडती गझल - मीनाकुमारीच्या आवाजात इथे ऐकता येईल -
http://www.youtube.com/watch?v=BL8zvlbOSVY

वेल्लाभट's picture

27 May 2013 - 2:10 pm | वेल्लाभट

अप्रतिम ! निव्वळ अप्रतिम

दशानन's picture

27 May 2013 - 7:04 pm | दशानन

सर्वांचा आभारी आहे :)

अर्धवटराव's picture

29 May 2013 - 10:01 pm | अर्धवटराव

मी अशा कविता, लेख, एक-दोन कडव्यांपलिकडे वाचु शकत नाहि. गळी उतरतच नाहि. तुम्ही लोकं काय रसायन आहात... दु:खाला इतकं लडीवाळपणे अलवार हातळणं... आपल्याला तर भैय्या अशक्य वाटते ते.

अर्धवटराव

आपलं जवळचं असलं की लळा लागतोच ;)

अर्धवटराव's picture

29 May 2013 - 10:59 pm | अर्धवटराव

.

अर्धवटराव

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

29 May 2013 - 11:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

दशानना __/\__ स्विकारा.
मुळ रचना खुप सुंदर खुलवता आपण.

दशानन's picture

24 Jun 2013 - 10:14 pm | दशानन

धन्यवाद.... मंडळी.. !
तांत्रिक अडचणीमुळे काही प्रतिसाद गेले असतील तर त्या प्रतिसाद लेखकाचे देखील आभार व्यक्त करतो व तुमचे ते प्रतिसाद वाचू शकलो नाही याबद्दल खेद देखील..