बसंतचं लग्न..१४

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 Jul 2008 - 6:57 pm

II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

बसंतचं लग्न..१ (ओळख)
बसंतचं लग्न..२ (यमन, यमनकल्याण)
बसंतचं लग्न..३ (भूप)
बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)
बसंतचं लग्न..५ (बिहाग)
बसंतचं लग्न..६ (मालकंस)
बसंतचं लग्न..७ (हमीर)
बसंतचं लग्न..८ (भीमपलास)
बसंतचं लग्न..९ (मुलतानी)
बसंतचं लग्न..१० (तोडी)
बसंतचं लग्न..११ (शुद्धसारंग, गौडसारंग)
बसंतचं लग्न..१२ (अहीरभैरव)
बसंतचं लग्न..१३ (केदार)

राम राम मंडळी,

आमच्या बसंतचं लग्न अगदी दृष्ट लागेल असं सुरू आहे बरं का! एकापेक्षा एक दिग्गज असे राग स्थानापन्न झाले आहेत. वेगळ्यावेगळ्या भरजरी स्वरांनी, सुरावटींनी, राग-रागिण्यांच्या सौंदर्यानी आता तो मंडप नटला आहे. मोठमोठ्या रागांची गळाभेट होते आहे. मुलतानी, मल्हार सारखे दिग्गज राग मालकंसासारख्या योग्याची आदबीने विचारपूस करत आहेत. तर कुठे नट, हमीर, केदारासारखी जवान मंडळी बुजुर्ग अशा आमच्या दरबारीला काय हवं नको ते विचारत आहेत! यमन सगळ्यांना हळवेपणाने भेटतो आहे तर तोडीच्या चेहेर्‍यावरूनही उगाचंच थोडीशी स्मितहास्याची रेषा उमटते आहे! अहो आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताची श्रीमंती वर्णावी तरी किती?

पण, त्या रागदारीच्या मांदियाळीमध्ये एक 'देस' नावाचा पाहुणाही आहे बरं का! बसंतच्या लग्नाचा आनंद, रागदारीतली इतर भावंडं भेटल्याचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय त्याच्या चेहेर्‍यावरून!

राग देस! कसं आहे हो या देसचं व्यक्तिमत्व?

आपला देस तसा हळवा आहे, प्रेमळ आहे, वृत्तीने अगदी रसिक आहे, अन् मोठ्या मनाचा आहे! परंतु स्वभावाने मात्र तसा प्रवाही आहे. एके ठिकाणी फार वेळ थांबणं, गुंतून राहणं त्याच्या स्वभावात नाही. याच्यात सतत पुढे जाण्याची अत्यंत उत्साही वृत्ती आहे.

देस रागाचं स्वरूप पटकन लक्षात येण्यासाठी हे क्लिपिंग ऐका. आग्रा गायकीतल्या माझ्या आवडत्या गायिका शुभ्रा गुहा यांचं हे किल्पिंग आहे. खूप छान आहे ही बंदिश!

देवगंधर्व भास्करबुवा बखले! ग्वाल्हेर, आग्रा, व जयपूर या घराण्यांवर अनन्यसाधारण हुकुमत असलेला एक दिग्गज गवई, त्याचसोबत मराठी संगीतरंगभूमीवरचा एक दिग्गज संगीतदिग्दर्शक. शैला दातार या त्यांच्या नातसूनेने गायलेली आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली,

"पिया कर धर देखो धडकत है मोरी छतिया!"

ही एक अतिशय लोकप्रिय बंदिश इथे ऐका. आहाहा, काय सुरेख बंदिश आहे! भास्करबुवांच्याच शिष्य परंपरेतले मास्तर व त्यांचे शिष्योत्तम संगीतभूषण पं राम मराठेदेखील ही बंदिश फार अप्रतीम गायचे. पण भास्करबुवा एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी याच बंदिशीवर आधारीत संगीत स्वयंवरात काय सुंदर नाट्यपद बांधलं पाहा -

"मधुकर वन वन फिरत करी गुंजारबाला"

आणि अहो साक्षात नारायणराव बालगंधर्वांच्या स्वरांचा परिसस्पर्श झाला या पदाला! आणखी काय पाहिजे?! सुजन कसा मन चोरी, नाथ हा माझा, मधुकर वन वन अशी एकापेक्षा एक सरस पदं भास्करबुवांनी बांधावीत आणि नारायणराव बालगंधर्व या त्यांच्या शिष्योत्तमाने आपल्या स्वर्गीय स्वरांनी ती अजरामर करावीत! भास्करबुवा-बालगंधर्वांची किती थोर शिष्यपरंपरा आहे ही! मन भरून येतं!

मंडळी, आपली सर्वांचीच पूर्वपुणाई म्हणून या देस रागात अजून एक अप्रतीम गीत जन्माला आलं आणि तुमचेआमचे कान अगदी तृप्त झाले!

उदास का तू, आवर वेडे नयनातील पाणी
लाडके कौसल्ये राणी!

वसंत आला तरुतरूवर, आली नवपालवी
मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी
कानी माझ्या घुमू लागली सादावीण वाणी, लाडके कौसल्ये राणी...

ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी,
चार बोबडे वेद रांगतील तुझ्या धर्मरत घरी
विचार माझा मला जागवी, आले हे ध्यानी, लाडके कौसल्ये राणी....

महाराष्ट्रवाल्मिकी गदिमांच्या सिद्ध लेखणीतून हे शब्द उतरले आणि ते वाचतावाचताच स्वरगंधर्व बाबूजींच्या मनात देस रुंजी घालू लागला आणि एक अप्रतीम गाणं जन्माला आलं. मंडळी, या गाण्याला दाद देतांना गदिमांबाबूजींइतकीच आमच्या देसलाही दाद द्यायला विसरू नका बरं का! :)

खरंच मंडळी, अहो ह्या देसमुळे मन प्रसन्न होतं अगदी! मनातले सगळे विकार नाहीसे करण्याची ताकद आहे याच्यात!

वसंत पवारांसरखा संगीत दिग्दर्शक आणि आशाताई-बाबुजींसरखे गायक एकत्र येतात आणि देस रागातलं एक केवळ अन् केवळ अप्रतीम गीत जन्माला येतं! कोणतं गीत?

रुपास भाळलो मी,
भुललो तुझ्या गुणांना
मज वेड लाविले तू
सांगू नको कुणाला!

एकान्त पाहुनिया,
जे तू मला म्हणाला,
ऐकून लाजले मी
सांगू नको कुणाला!

क्या बात है! प्रेम करणार्‍या दोन जिवांतलं हे गूज देसमध्ये ऐकायला किती सुंदर वाटतं, तरल वाटतं! क्या बात है वसंत पवारसाहेब! जियो...!

"सुखदां वरदां मातरम्, वन्दे मातरम् !"

काय ओळखलंत का मंडळी? अहो हा पण देसच की! अहो हा तर हा आपल्या देशाचा देस! :) उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अखंड भारताला एका सूत्रात बांधून ठेवायची अजब किमया साधली आहे देस मधल्या या राष्ट्रगीताने! या गीतातील देसच्या स्वरात आपल्या भारतीयांच्या संस्कृतीची, परंपरांची अन् सभ्यतेची, उत्सवप्रियतेची एक छानशी सावली दिसते! आणि म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यवर्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आमच्या अण्णांसारख्या दिग्गज गवयाचे 'वन्दे मातरम्'चे सूर संसदेत उमटतात, मनात देसप्रेम आणि देशप्रेम दोन्हीही जागृत होतं आणि जीव धन्य होतो!

आत्ताही माझ्या कानात काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर अण्णांनी गायलेल्या,

"बजे, सरगम बजे,
हर तरफसे सरगम बजे, गुंज बनके देस राग!"

ह्या गाण्याचे स्वर रुंजी घालत आहेत....!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतसंस्कृतीवाङ्मयअनुभवआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

9 Jul 2008 - 7:44 pm | प्रमोद देव

देस राग खरंच गोड आहे. तात्या वर्णन मस्त जमलंय! उदाहरणं ही ओळखीतली असल्यामुळे पुन:प्रत्ययाचा अनुभव आला.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

संदीप चित्रे's picture

9 Jul 2008 - 7:46 pm | संदीप चित्रे

माझ्या एकदम आवडत्या रागावर लेख लिहिलास :)
'बजे सरगम...' ! भीमसेनजींचा बुलंद मधुर आवाज अजूनही कानांत घुमतोय !!
त्याच चित्रफितीमधे बासरीवर जादुई कलाकुसर करणारी हरिजींची बोटं आणि फुंक किती वेळा पाहिली ह्याची गणनाच नाही :)
(हरिभक्त) संदीप
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 10:15 pm | बेसनलाडू

ओळखीच्या गाण्यामुळे लेखही चटाचट उलगडत गेला.
खंडित विवाहसोहळा पुन्हा मार्गस्थ झाला,हे पाहून बरे वाटले.
(बाराती)बेसनलाडू

सर्किट's picture

9 Jul 2008 - 10:55 pm | सर्किट (not verified)

क्या बात है !

(बसंतच्या लग्नाची मालिका अशीच सुरू राहावी ही शुभेच्छा. जरा मारव्याकडेही लक्ष द्या तात्या. ते बेणं लग्नात नुस्तंच जिलब्या हादडायला आलंय, असं वाटायला नको.)

- सर्किट

अमित.कुलकर्णी's picture

9 Jul 2008 - 11:06 pm | अमित.कुलकर्णी

नेहमीप्रमाणेच छान
-अमित

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2008 - 12:14 am | llपुण्याचे पेशवेll

नेहमी प्रमाणेच उत्तम.. बाकी देस रागात इतकी छान छान गाणी आहेत हे माहीतच नव्हते.
सुंदर रागाची ओळख करून देण्याबद्दल तात्याचे आभार मानावे तितके कमीच.

(अवांतरः बाकी तात्यासारखे दिग्गज गवई आणि इतर अनेक रसिक वाचकांचा प्रतिसाद बघता मिसळपाव नावाचे एक नविन घराणे सुरू करायला हरकत नाही असे वाटते.
मिसळपाव एक घर तर आहेच, आता एक सांगितिक घराणे देखील होईल.
ह.घ्या. हे.वे.सां. न. ल.)
पुण्याचे पेशवे

कोलबेर's picture

10 Jul 2008 - 12:46 am | कोलबेर

नेहमी प्रमाणेच बंदीशींच्या क्लिपिंग्ज ऐकत आणखी एका रागाची ओळख करुन घ्यायला छान वाटले.

प्राजु's picture

10 Jul 2008 - 1:00 am | प्राजु

सुंदर वर्णन रागाच्या स्वभावाचं. क्लिपिंग्जमुळे आणखीच छान वाटलं. गाण्यांमुळे राग उलगडत गेला.
असो.. लग्नाची वरात मध्येच कुठेतरी आडकली होती आता पुन्हा रस्त्याला लागली.. लवकरच मुहुर्त गाठेल अशी आशा करायला हरकत नाही. :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

10 Jul 2008 - 4:36 am | नंदन

रागाचे वर्णन आवडले. ओळखीच्या गाण्यांमुळेही छान वाटलं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

10 Jul 2008 - 7:01 am | सहज

असेच म्हणतो.

धनंजय's picture

10 Jul 2008 - 5:31 am | धनंजय

क्लिपांचा वापर छानच.

विकास's picture

10 Jul 2008 - 7:28 am | विकास

माझ्या "दारी राग" नसल्याने या विषयात तसा अनभिज्ञ आहे. पण उदाहरण म्हणून दिलेली एकापेक्षा एक मस्त गाणि सांगितल्यामुळे समजायला सोपे गेले.

मुक्तसुनीत's picture

10 Jul 2008 - 7:58 am | मुक्तसुनीत

हाही भाग खूप आवडला ! धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2008 - 9:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संगितातले राग वगैरे काही कळत नाही, पण बसंतच्या लग्नात 'देस' रागाचे वैभव वाचायला आवडले.

जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

ऋषिकेश's picture

10 Jul 2008 - 9:53 am | ऋषिकेश

संगितातले राग वगैरे काही कळत नाही, पण बसंतच्या लग्नात 'देस' रागाचे वैभव वाचायला आवडले.

अगदी मनातलं बोललात प्रा डॉ. :)
निव्वळ सुंदर लेख! क्लिपिंग तर मस्तच!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 9:40 am | विसोबा खेचर

शैला दातार या त्यांच्या नातसूनेने गायलेली आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली,

शैला दातार या माणिकताईंकडे गाणं शिकलेल्या आहेत. त्यांच्या गाण्याच्या काही चांगल्या मैफली मी ऐकल्या आहेत. पूर्वी त्या भास्करबुवा बखल्यांवर 'देवगंधर्व' नावाचा एक कार्यक्रमही करत असत, अजूनही बहुधा करत असाव्यात. त्यांचे पती सुधीर दातार यांचंही चांगलं गाणं मी ऐकलं आहे. त्यांनी रामभाऊ मराठ्यांकडे गाण्याची तालीम घेतलेली आहे...

आपला,
(भास्करबुवाप्रेमी) तात्या.

प्रमोद देव's picture

10 Jul 2008 - 9:49 am | प्रमोद देव

ह्या नावाचे भास्करबुवांचे चरित्र देखिल शैला दातार ह्यांनी लिहिलेले आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

रामदास's picture

10 Jul 2008 - 10:18 am | रामदास

देस ऐकतो तेव्हा मला कसरती मध्ये हातात रीबन धरून करण्याच एक इवंट असतो.माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र उभं राहीलं.
य खेळाला काय म्हणतात ते आठवत नाही.

नंदन's picture

10 Jul 2008 - 11:44 am | नंदन

रिबन डान्सच म्हणत असावेत बहुधा. उदा. एक व्हिडिओ येथे

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 12:22 pm | विसोबा खेचर

आमचा नंदन अन् तो दुसरा एक शशांक! कुठून कुठून शोधून काढून दुवे देण्यात दोघंही एकदम तरबेज आहेत... :)

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

10 Jul 2008 - 4:26 pm | भडकमकर मास्तर

छान ..दोन्ही क्लिपिंग ऐकल्या.. ...
आणि तो रिबन डान्स सुद्धा छान होता
:)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सुमीत भातखंडे's picture

10 Jul 2008 - 4:53 pm | सुमीत भातखंडे

देस रागाची एवढी छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

आनंदयात्री's picture

10 Jul 2008 - 5:24 pm | आनंदयात्री

सुंदर विवेचन तात्या.

वरदा's picture

11 Jul 2008 - 12:03 am | वरदा

जरा सवडीनं क्लीपा ऐकल्या....
मस्त आहेत्...छान समजावलयत...

पुढ्च्या भागांना खूप शुभेच्छा!
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मनीषा's picture

11 Jul 2008 - 7:33 am | मनीषा

तुम्ही खरोखरीच व्यासंगी आहात

विसोबा खेचर's picture

11 Jul 2008 - 7:41 am | विसोबा खेचर

आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार... :)

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

--
आगामी तात्या अभ्यंकर :
"चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १
(गाणं - 'पिया बावरी', चित्रपट - रेखाचा खूबसूरत)

अरुण मनोहर's picture

12 Jul 2008 - 1:41 pm | अरुण मनोहर

राग रागीणी क्षेत्रातले काही कळत नसल्याने वाचायला उशीरच झाला. एक अभ्यासपूर्ण लेख. तात्यांनी येवढे सविस्तर लीहून संगीत क्षेत्रासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Jul 2008 - 10:43 pm | डॉ.प्रसाद दाढे

मस्त लिहिला आहे बर॑ का तात्या.. थोडा उशिरा वाचला.. माफ करालच

चतुरंग's picture

14 Jul 2008 - 3:35 am | चतुरंग

'गूंजे मंतर देस राग' वा! दूरदर्शनवरची ती क्लिप अजूनही मनात गाजू लागते.
एकदम सुरेख वर्णन.
शुभ्रा गुहांची क्लिप देखील सुंदरच!
नाट्यपद"मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला" असे हवे पण ती नजरचूक असावी.

बसंतच्या लग्नाची वरात कधी संपूच नये असे वाटते! अजून येऊ देत तात्या!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

14 Jul 2008 - 8:07 am | विसोबा खेचर

अरूणराव, डॉ दाढे, आणि रंगा,

आपल्या तिघांचेही मनापसून आभार. रंगा तू म्हणतोस ते बरोबर आहे. माझी टंकनचूक झाली....

तात्या.