आमची पहिली गाडी

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
8 Jan 2013 - 12:54 am

आमची पहिली गाडी

झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती. आणि गाडीत बसून जायला मिळालं तरी मी तेवढ्यावर खूष होते. शिवाय ड्रायव्हिंग शिकून घेतलं तर नवरा तेही काम माझ्यावर सोपवून आरामात राहील अशी साधार भीती होती. त्यामुळे नवरा एकटाच ड्रायव्हिंग स्कूलला गेला. त्या शिकवणार्‍या गुरूने काय पाहून देव जाणे पण याला प्रोफेशनल लायसन्स काढायचा अर्ज भरायला लावला. साहजिकच आर टी ओ ने प्रथेनुसार एकदा नापास करून दुसर्‍या टेस्टमधे त्याला एकदाचे लायसन्स दिले.

लायसन्स काढून झाले. आता गाडी घेऊया म्हणून विचारविनिमय सुरू झाला. तेव्हा नवी मारूती ८०० तशी आमच्या आवाक्याबाहेर होती. माटिझ, इंडिका वगैरे नव्या नव्या दिसायला लागल्या होत्या. गाड्यांची कर्जे आतासारखी स्वस्त आणि सहज मिळत नव्हती. आणि आवाक्याबाहेर कर्ज काढायचं नाही हा आमचा कोकणातला बाणा. साहजिकच तेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली एखादी सेकंड हॅण्ड प्रीमियर पद्मिनी ऊर्फ "फियाट" घेऊया असा विचार सुरू झाला. ती गाडी प्रीमियर पद्मिनी हे मला माहित आहे पण तिचं प्रचारातलं नाव फियाटच. तेव्हा मी तेच म्हणणार! ही १९९६-९७ ची गोष्ट आहे हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात नंतरही बरीच वर्षे फियाट गाड्या चालत होत्या, पण गोव्यात फियाट तेव्हा खूप स्वस्त मिळायला लागल्या होत्या. तसेही तिथे सगळे वर्रात गोंयकार! आमच्या बँकेतला शिपाई म्हणे, "तू फियाट घ्यायच्यापेक्षा ट्रक का घेत नाहीस?" पण आपण नवीनच ड्रायव्हिंग शिकलोय, तेव्हा भलीभक्कम लोखंडी फियाटच बरी. कुठे आपटली तर काय घ्या! असा विचार करून माझ्या नवर्‍याने फियाटच घ्यायची ठरवली.

दर पावसाळ्याच्या आधी तो स्कूटर रंगवायला द्यायचा त्या गॅरेजवाल्याचा चारचाकी गाड्या रंगवणे आणि दुरुस्ती करणे हा खरा प्रमुख धंदा. त्याच्या कानावर आम्हाला फियाट घ्यायची आहे हे पडताच त्याने उत्साहाने जुन्या गाड्या शोधायला सुरुवात केली. एक दिवस त्याचा फोन आला. "पात्रांव, उसगावला एकाची जुनी फियाट विकायची आहे. बघून येऊया." माझा नवरा लगेच धावला. गाडी पाहताच कोणीही प्रेमात पडेल अशी देखणी. फिकट निळ्या रंगाची डौलदार गाडी पाहून माझा नवरा खूश झाला. शिवाय गाडीचा मालक आर टी ओ चा भाऊ. तेव्हा कागदपत्रांचाही काही प्रॉब्लेम नव्हता. गाडी फारशी चाललेली नाही हे ऐकल्यावर आम्हाला वाटलं की गाडी नव्यासारखी असेल, टायर बरे दिसत होते. शेवट २५००० ला गाडी घ्यायची ठरली. तिथून बाहेर पडताना गाडीच्या मालकाची मुलगी सहज म्हणाली, "तुम्ही आमची गाडी घेताय? आम्ही आता नवी गाडी घेणार आहोत. ही गाडी एकसारखी बंद पडते!" तेव्हा शंकेची पाल खरं म्हणजे चुकचुकायला हवी होती. पण आम्हाला वाटले की गाडी फार वापरात नाही, त्यामुळे असं होत असेल. बरं मेक्यानिक मोहंमद म्हणाला "पात्रांव तू भिऊ नको. मी गाडी नीट ठेवीन तुझ्यासाठी." झालं. गाडीची बारीक सारीक कामे करून गाडी एकदाची घरी आली आणि आम्ही गाडीचे मालक झालो!

ही फियाटची कामे म्हणजे काय याचा कोणी अनुभव घेतला असेल त्याला कळेल. एक तर ती पत्र्याची गाडी, त्यामुळे गंज येणे, पत्र्याला भोके पडणे, काहीवेळा पत्रा कोणीतरी खाल्ल्यासारखा दिसणे इ नाना प्रकार असतात. उन्हापावसात फियाट ठेवली की तिची रया गेलीच! ही गाडी बराच काळ छप्पराखाली जागेवर उभी असायची त्यामुळे पत्र्याची कामे नसली तरी विजेची, ब्रेक वगैरेची दुरुस्ती, पॉलिश, सीट कव्हर्स इ इ करायला हवे होते. तर त्या कामांचे आणखी १० एक हजार झाले. पण गाडी दिसत होती फारच सुरेख. माझा नवरा गाडीला रोज इंजिन चालू करून सोसायटीत चक्कर मारून आणायचा. तेवढ्यात सासूसासरे आले होते. मग प्ल्यान केला की आपल्या गाडीने देवळात जाऊया. दिवसभर बाहेर रहायचे आणि नवर्‍याला तर गाडी चालवायची सवय नाही म्हणून एक धंदेवाईक ड्रायव्हर बरोबर घेतला आणि आमची गाडी निघाली.

१०/१२ किमि जाईपर्यंत कसला तरी जळका वास यायला लागला. थोड्याच वेळात इंजिनाकडून धूर यायला लागला आणि गाडी बंद पडली. आम्ही पटापट गाडीतून बाहेर आलो. ड्रायव्हरने गाडीचा जबडा उघडला आणि थंड व्हायला दिली. तोपर्यंत त्या गावातले लोक जमा होऊन सल्ले द्यायला लागले होते. गाडी सुरू होत नाही हे लक्षात आल्यावर सगळे प्ल्यान गुंडाळून ठेवले आणि आमची वरात परत घरी गेली. नवरा स्कूटर घेऊन महंमदकडे धावला.

महंमदने गाडी सोडून दिली होती तिथे जाऊन पाहणी केली आणि सुवार्ता दिली की इंजिनात पाणी गेलंय. गाडीचं इंजिन उतरवायला पाहिजे. झालं होतं असं की रेडिएटर गळका होता. फियाटच्या रेडिएटरमधे रोज पाणी भरून त्याची पातळी बघत बसावी लागते. आता या गाडीचा रेडिएटर गळका आहे हे त्या महंमदच्या आधीच लक्षात आलं का नाही देवजाणे. शंका घ्यायला वाव नक्कीच होता. पण हे आम्हाला तेव्हा माहित नव्हतं. गाडी टो करून तो घेऊन गेला. मग नवर्‍याचे त्याच्या गॅरेजकडे हेलपाटे सुरू झाले. दोन एक महिने काढून, कायबाय करून गाडी परत चालती झाली. दरम्यान महंमदचं "हे काम करूया ते काम करूया" वगैरे सुरूच होतं. शेवटी त्याच्याकडचा इलेक्ट्रिशियन सांतान हळूच म्हणाला, "महंमदचं सगळं ऐकू नको रे! गाडी चालू झाली की पुरे!" झाली एकदाची गाडी तयार.

आता माझा नवरा अगदी लक्ष देऊन रेडिएटरमधे पाणी भरणे वगैरे कामे करायला लागला. जवळपासच्या फेर्‍या सुरू झाल्या. एकदा आम्ही त्या सांतानलाच बरोबर घेऊन रत्नागिरीला सुद्धा जाऊन आलो. आणि गाडी नीट चालते आहे म्हणून आम्ही सुटकेचा श्वास टाकला. पुढच्या वेळेला माझ्या नवर्‍याने एकट्याने गाडी चालवत सुखरूप रत्नागिरी गाठली. ४ दिवसांनी परत येताना निघायला जरा उशीरच झाला होता. कुडाळला पोचेपर्यंत ५ वाजून गेले. बाजारात चहा प्यायला थांबलो आणि परत निघताना गाडी सुरूच होईना! फियाट बंद पडली की बरेच लोक जमा होतात हा माझा अनुभव आहे. तसेच बरेच जण आले, आणि एकाने न सांगताच बाजूला असलेल्या गॅरेजवाल्याला बोलावले. तो दुरुस्ती करीपर्यंत आणखी उशीर झाला आणि मग काळोखातून ड्रायव्हिंग नको म्हणत आम्ही तिथेच मुक्काम ठोकला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून गोव्याला आलो. त्यामुळे आणखी एक रजा घ्यावी लागली. आणखी काही दिवसांनी रविवारी फिरायला म्हणून गेलो आणि तिथे गाडी बंद पडली. मजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच! तशी मोठी गुणाची गाडी!

फियाट जास्त चाललेली नाही हा प्लस पॉइंट नव्हे हे आतापर्यंत आम्हाला कळले होते. दरम्यान माझ्या नवर्‍याने गाडीचा डॉक्टर बदलला. हा दत्ता मेक्यानिक कायम दारू प्यायलेला असायचा. दारू प्यायला नाही तर त्याचे हात थरथरायचे म्हणे! त्याच्या गॅरेजमधे एक झुरळांनी कुरतडल्यासारखा दिसणारा फियाटचा सांगाडा होता आणि त्यात एक नरकासूर कायमचा उभा करून ठेवलेला होता. मुलांना पण तिथे गेले की मज्जा वाटायची. फियाटचे स्पेअर पार्ट्स खूप स्वस्त मिळायचे आणि मेक्यानिकची फी पण अगदी थोडी. त्यामुळे गाडीची दुरुस्ती महाग वाटत नसे. काही दिवस बरे गेले. आम्ही एक दोन वेळा बेळगाव, एकदा मालवण, आणि एकदा रत्नागिरीला फार काही न होता जाऊन आलो.

पण आतापर्यंत माझ्या नवर्‍याचा गाडीबद्दलचा उत्साह कमी झाला होता. रोज इंजिन सुरू करणे म्हणजे कंटाळवाणे काम. त्यामुळे हळूहळू २ दिवसांनी, मग ४ दिवसांनी, मग आठवड्याने अशी गाडीला सुरू करण्यातली गॅप वाढत चालली होती. साहजिकच गाडीची बॅटरी चार्ज न झाल्यामुळे इंजिन सुरू न होणे वगैरे प्रकार व्हायला लागले होते. बॅटरी काढून २/३ वेळा चार्ज करून आणावी लागली होती. फियाटचा एक दुर्गुण म्हणजे तिला जर रोज स्टार्ट मारला नाही तर इंजिन पटकन सुरू होत नाही. मग शेजारच्या पोरांना बोलावून ती ढकलायला लागते. तेही प्रकार सुरू झाले होते. मग गाडीचे टायर्स एकदा बदलून झाले. नंतर गाडी हळूहळू घरापेक्षा जास्त वेळ दत्ताच्या गॅरेजमधे पडून रहायला लागली होती.

अशातच एकदा नवरा मुलीला आणायला तिच्या शाळेत गेला. घरी येताना बस स्टॆँडच्या बाजूच्या मुख्य चौकात गाडी बंद पडली. लगेच दोन पोरांनी मदत करून गाडी बाजूच्या पेट्रोलपंपावर ढकलून ठेवली आणि मग दत्ताला बोलावून आणून ती परत चालू करणे वगैरे सोपस्कार पार पडले. पण घरी येताच कन्यारत्नाने जाहीर केले की बाबाने मला घरी न्यायला यायचे असेल तर फियाट आणता कामा नये. स्कूटर चालेल. तोपर्यंत चिरंजीवसुद्धा फियाटमधून कुठेही जाऊया नको म्हणायला लागले होते. मग आम्हीच कधीतरी हायवेवर एक फेरी मारून यायचो. होता होता एक दिवस एक भंगारवाला विचारायला आला, "साहेब तुमची गाडी द्यायची आहे काय?" आम्हाला कसंतरीच वाटलं. कारण काही झालं तरी ती आमची पहिली गाडी. दिसायला फार सुंदर. आणि गुणीसुद्धा. हो. कधीही मेक्यानिकपासून लांब बंद पडली नाही! त्या भंगारवाल्याला पळवून लावला. पण मग आणखी भंगारवाले यायलाच लागले.

तोपर्यंत गाडीची १५ वर्षे पुरी झाली होती. एकदा ग्रीन टॅक्स भरून गाडी परत पास करून घ्यावी लागली. शेवटी नवराही कंटाळला. "गाडी दुरुस्तीला दिली आहे का?" याऐवजी, "गाडी दत्ताकडून परत आणली वाटतं!" असं शेजारी विचारायला लागले. तेव्हा अगदीच अति झालं असं म्हणून एका भंगारवाल्याला ती गाडी दहा हजाराला देऊन टाकली आणि माझ्या नवर्‍याने सुटकेचा श्वास टाकला. त्या गाडीची त्याला इतकी दहशत बसली होती की नंतर जेव्हा दुसरी गाडी घेणं सोपं झालं तेव्हाही तो गाडी घ्यायला कसाच तयार होईना. मग “आता तू जर दुसरी गाडी घेतली नाहीस तर मी ड्रायव्हिंग शिकून मीच गाडी घेईन” अशी धमकी द्यावी लागली, तेव्हा कुठे आमच्याकडे मारुती ८०० आली. पण तरी गाडी म्हटली की अजून ती फियाटच आठवते!

जीवनमानमौजमजालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मोकळा वेळ असल्याने निव्वळ तांत्रिक मुद्दा:

"पहिली" गाडी "लई वेळा" येऊ शकत नाही.

तांत्रिक मुद्दा समाप्त.

दादा कोंडके's picture

10 Jan 2013 - 8:44 pm | दादा कोंडके

मोकळा वेळ असल्याने...

असं चारचौघात कबूल करू नहा हो, पब्लिक जुने धागे 'मोकळे' करण्यासाठी लिस्टा देतील. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2013 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

@"पहिली" गाडी "लई वेळा" येऊ शकत नाही.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif

भटक्य आणि उनाड's picture

8 Jan 2013 - 2:05 pm | भटक्य आणि उनाड

बायकांपेक्षा गाडीच्या अंगात खोड्या कमी असतात. गाडी समजूतदार असून निदान कंट्रोल तरी होते..
सत्य्मेव जयते !!!

स्मिता.'s picture

8 Jan 2013 - 3:58 pm | स्मिता.

मजेदार, खुसखुशीत लेख आहे पैसाताई! त्यावरून आमच्याकडची जुनी लुना आठवली. माझ्या शाळेच्या पहिल्याच दिवशी माझा पाय बाबांच्या सायकलच्या चाकात अडकला आणि दुसर्‍या दिवशी ते लुना घेऊन आले.
आणि त्यांची ती बजाजची स्कूटर! आता आम्ही सगळे सांगत असतो की तिला भंगार मधे विका, काही वर्षांनी भंगारवाला फुकट सुद्धा घेणार नाही. पण बाबा ती विकायला तयारच नाहीत. त्यांच्या भावना अडकल्यायेत तिच्यात :)

नि३सोलपुरकर's picture

8 Jan 2013 - 4:17 pm | नि३सोलपुरकर

वाह..मस्त एका पेक्षा एक जबरदस्त किस्से.
@ योगप्रभु :- सादर प्रणाम स्विकारावा ....__/\___

बाकी पहिलेपणाची मजा काही वेगळीच असते

मोदक's picture

10 Jan 2013 - 12:11 am | मोदक

पहिलेपणाची मजा

आमच्या बुवांनी असेच पहिल्या अनुभवावर (ट्रेकच्या) श्लेष मारले होते... ते आठवले एकदम! :-))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2013 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुसखुशीत लेख. आवडला. :)

-दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Jan 2013 - 4:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मज्जा आली वाचतांना असे म्हणवत नाही हो, आजच सकाळी सकाळी हवालदाराने डोक्याचे भजे केले..
काय तर म्हणे, गाडी चालवतांना इयरफोन लावायचे नाही!!
लायसंस जमा केलेय बैलाने...

समयांत's picture

8 Jan 2013 - 5:10 pm | समयांत

मस्त लिहलंय :)

शिवप्रसाद's picture

8 Jan 2013 - 5:20 pm | शिवप्रसाद

सही ....

मस्त खुसखुशीत लिखाण !!

अवांतरः त्या कोकणी शिकवणीच्या लेखांचं काय झालं ?? ;)

पैसा's picture

8 Jan 2013 - 5:35 pm | पैसा

आमच्या शालेतल्या दुसर्‍या मास्तरीणबै सध्या फरार आहेत.

अरुण मनोहर's picture

8 Jan 2013 - 6:28 pm | अरुण मनोहर

फियाट जास्त चाललेली नाही हा प्लस पॉइंट नव्हे हे आतापर्यंत आम्हाला कळले होते.

वाह! एकूण पूर्ण लेखच भ्रमणरंजनाचा (नोस्टॅलजीया) उत्तम नमुना आहे.

योगप्रभू's picture

8 Jan 2013 - 6:39 pm | योगप्रभू

अनंतजी,
नोस्ताल्जिया = स्मरणरंजन
भ्रमणरंजनाला वेगळा शब्द तयार करावा लागेल.

चिमणरावांचा किस्सा आठवला. :)

प्रभो's picture

8 Jan 2013 - 8:04 pm | प्रभो

:)

रणजित चितळे's picture

8 Jan 2013 - 8:11 pm | रणजित चितळे

अनूभव कथन वाचून. झक्कास जमले आहे

चिर्कुट's picture

8 Jan 2013 - 8:16 pm | चिर्कुट

त्या प्रिमियर पद्मिनीला "डुक्कर फियाट" का बरं म्हणत? पण मजा वाटायची "डुक्कर फियाट" म्हणायला.

याच प्रिमियर पद्मिनीमधून रत्नागिरी, पावस आणि गणपतीपुळे अशी एक सहल आम्ही लहान असताना केली होती. ४ फुल आणि ४ हाफ शीटा. एका चढावर इंजिन तापून का काय, आजूबाजूला दूर-दूरपर्यंत साधं दुकानही नाही असं बघून जे बंद पडली गाडी, मग बसलो ३-४ तास मस्त रस्त्यात.. :)

dukkar fiat

वर पैसातै म्हणतात ती प्रिमियर पद्मिनी, आणि इथं दिली ती डुक्कर फियाट, ही थोडीफार हिंदुस्तान मोटार्सच्या अँबॅसिडर सारखी दिसायची, हॅट्स ऑफ टु अ‍ॅबॅसिडर आजपर्यतची भारतातली सर्वात देखणी गाडी....

पैसा's picture

9 Jan 2013 - 9:06 am | पैसा

खरे तर ही जुनी फियाट दिसायला जास्त छान होती. फोंड्यातला एक म्हातारा गेल्या वर्षीपर्यंत ही वापरताना पाहिला आहे. पण हिला डुक्कर हे नाव का मिळालं? अ‍ॅम्बेसेडर सगळ्यात राजेशाही आणि देखणी गाडी यात काही वाद नाही. आताच्या मिस इंडिया हिरविणी आणि जुन्या मधुबाला मीनाकुमारी यात जो फरक आहे तोच आताच्या नव्या गाड्या आणि अ‍ॅम्बेसेडर, फियाट यात आहे असं मला वाटतं. गाडीच्या तंत्रज्ञांनी वाद घालायला येऊ नये कारण मला गाडी चालवता येत नाही! :D

श्रीरंग_जोशी's picture

10 Jan 2013 - 2:52 am | श्रीरंग_जोशी

प्रिमिअर पद्मिनीला कुणी फियाट म्हंटले की म्हणायचो, हि फियाट नव्हे, फियाट म्हणजे अ‍ॅम्बेसेडरला जर काही महिने एक वेळच जेवू घातलं तर ती सुकून जशी दिसेल तशी दिसणारी गाडी म्हणजे फियाट.

नंतर सर्वसाक्षी यांच्या पं पं पं पं दारोदार धाग्यावर मला प्रथमच कळलं लोक प्रिमिअर पद्मिनीला फियाट का म्हणतात ते...:-).

मदनबाण's picture

8 Jan 2013 - 8:57 pm | मदनबाण

सुरेख लेखन ! :)
योगप्रभूंचे प्रतिसाद फारच मोलाचे वाटले ! ;)

इष्टुर फाकडा's picture

8 Jan 2013 - 10:44 pm | इष्टुर फाकडा

मला फियाट ची गिअर सिस्टीम लय आवडायची. दम्बुक कॉक केल्यासारखे वाटायचे :)

मराठे's picture

8 Jan 2013 - 11:17 pm | मराठे

ड्रायविंग शिकायला त्या स्कूलात मला फियाटच होती. पहिल्याच आठवड्यात ब्रेकच्या ऐवजी जोरात अक्सलरेटर दाबून मास्तराचे डोळे पांढरे केले होते. त्यानंतर मी गाडी चालवली ती उसातच.

चित्रा's picture

9 Jan 2013 - 3:53 am | चित्रा

भारी लेख! खूप आवडला.

आमची पण एक सेकंड-हँड फियाटच होती.
आमच्या पूर्वीच्या जुनाट लँडमास्टर पेक्षा ती फारच लहान आणि कमी जुनाट होती. पण मला गाडी नंतर आवडायला लागली.
ती चालवायला तशी सोपी होती. फक्त आमच्या गावातल्या भयाण आणि उंच उंच स्पीडब्रेकरांवरून ती लहानशी गाडी हमखास खाली घसटून जायची. मी दरवेळी स्पीडब्रेकरजवळ आले आणि क्लचवर पाय ठेवला रे ठेवला, आणि आमचे पिताश्री बाजूला असले की ते दोन्ही कानांवर हात ठेवत आणि मी भयंकर खजील व्हायचे ते आठवले :-)

तुमची गाडी विशेष चालली नसेल नीट पण तुमच्या आठवणी तशा रम्य आहेत ना!
एकंदरीत फियाटवरच्या कामांबद्दल सहमत.

लाल टोपी's picture

9 Jan 2013 - 4:42 am | लाल टोपी

छान लेख आवडला...

स्पंदना's picture

9 Jan 2013 - 8:48 am | स्पंदना

प्रिमियर पद्मिनी? अगो बाबा आंबोलीच्या घाटापास्न ढकलत होतो, मी, नवरा, नव्या लग्नाची जाऊ, अन गाडीच्या आत आम्ही गाडी धल्कल्तोय हे पाहुन तारस्वरात रडणारी दोन वर्षाची कन्या. ती अशी रडत होती की आत स्टीयरिंगवर बसलेला दिर बाहेर येउन गाडी ढकलतो म्हणाला. मग आळीपाळीने स्टीअरिंग घेतल आम्ही. पहिल गराज लागेपर्यम्त रात्री सात आठवाजता गाडी ढकलत अम्ही व्यायाम केला होता. आता हसु हसुन डोळ्यातुन पाणी गळतय तेंव्हा घाम गळला होता.
मस्त पैसा. फार छान आठवण.

मन१'s picture

9 Jan 2013 - 10:58 am | मन१

आवडलं.
लेख आवडला तशाच काही भन्नाट प्रतिक्रियाही. त्यातल्या त्यात विकास आणि योगप्रभूचें प्रतिसाद.
सर्वांना ----/\----

मनराव's picture

9 Jan 2013 - 11:23 am | मनराव

मस्त लेख.........आमची सुद्धा पहिली गाडी सेकंड हँड्च होती..........मारुती ८००....... लै जीव होता तिच्यावर.......

दिसायला चांगली गाडी मिळते पण ती फार खर्चात टाकते. पंचमात राहू असलेले लोक जुन्या वस्तू घेतात आणि पस्तावतात .पंचमात मकरेचा किंवा कुंभेचा शनी असला तर षष्ठेश आणि पंचमेश एकच असल्याने गाडी वारंवार रस्त्यात बंद पडते. लग्नी शुक्र असलेले लोक्स स्वत:ची गाडे नसूनही सुखी असतात करण ते नेहेमी दुसर्‍यांच्या गाडीतून प्रवास करतात. शुक्र बिघडलेला असला तर वाटेत थांबवून पाठच्या सिटचाही वापर करू शकतात.
पुढच्या भागात मेक्यानीकांच्या कुंडलीचा विचार करण्यत यील.
पैसाताई : लेख सुंदर जमला आहे.

पैसा's picture

9 Jan 2013 - 11:33 am | पैसा

फियाट होती तेव्हा आमचे सगळेच ग्रह बिघडलेत आणि मेक्यानिक लोकांचे उच्चीचे आहेत असं वाटायला लागलं होतं खरं!! =))

शिल्पा ब's picture

10 Jan 2013 - 12:34 am | शिल्पा ब

हा १००.

पिवळा डांबिस's picture

10 Jan 2013 - 2:48 am | पिवळा डांबिस

पैसाच्या पहिल्या गाडीवरचा लेख गंमतीशीर वाटला. छान लिहिलंय...
मला प्रिमियर पद्मिनी कधीच आवडली नाही. आमच्यासारख्या अघळपघळ आणि अस्ताव्यस्त माणसासाठी आंबाशिडर मस्त!!!:)
बाकी भारतात असतांना गाडी घ्यायची ऐपत नव्हती. ते वयदेखील गाडी वगैरे घ्यायचं नव्हतं. उसात आल्यावर पहिली गाडी घेतली ती म्हणजे सेकंडहॅन्ड होंडा अ‍ॅकॉर्ड. घेतल्यानंतर एकदा फ्रंट अ‍ॅक्सल आणि क्लच बदली करून नवीन घालून घेतले पण त्यानंतर काही त्रास दिला नाही तिने. फक्त आमचं तत्कालीन गाव हे डोंगरात होतं. चढ-उतारावर सिग्नलला मॅन्युअल ट्रान्समिशन असल्याने गाडी मागे-मागे जायला लागायची आणि काकूच्या (ती चालवत असली तर) शिव्या खायची!! बस इतकंच मनोरंजन!! :)

पाषाणभेद's picture

10 Jan 2013 - 8:27 am | पाषाणभेद

नॉस्त्लेजीयन लेख आवडला. काही वाक्ये पंच मारून गेली.

लहान असतांना गल्लीत कोणाचीतरी फियाट चालू झाली की मागच्या स्टिलच्या बॉनेटवर बर्‍याचदा बसलेले आठवते.

अजूनही मुंबईत टॅक्सीज फियाट आहेत. त्या तर व्यवस्थित चालतात. मग फियाट वारंवार बंद पडते/ पडायची (पैसातांईंची नव्हे पण एक सर्वसाधारण) हे कितपत खरे आहे?

प्रीत-मोहर's picture

10 Jan 2013 - 10:29 am | प्रीत-मोहर

बिच्चारा उदयकाका!!!!

पैसा's picture

10 Jan 2013 - 5:36 pm | पैसा

मंडळी, एवढ्या संख्येत प्रतिसाद देऊन आमची "पद्मिनी" "लाइकल्या" बद्दल सर्व वाचक आणि प्रतिसादक यांना मनापासून धन्यवाद! प्रत्येकाला खवमधे जाऊन धन्यवाद द्यायला आवडले असते, पण आता शक्य नाहीये!

सानिकास्वप्निल's picture

10 Jan 2013 - 9:16 pm | सानिकास्वप्निल

लेख एकदम चटपटीत, मजेदार आहे :)
आवडला

एस's picture

11 Jan 2013 - 12:24 am | एस

इतका खुमासदार लेख व तितकेच खुसखुशीत प्रतिसाद...

अनिल तापकीर's picture

11 Jan 2013 - 2:41 pm | अनिल तापकीर

लयच भारि किस्सा आवडला

नन्दु मुळे's picture

11 Jan 2013 - 10:13 pm | नन्दु मुळे

खुप मस्त!

सूनिल's picture

18 Jan 2013 - 5:02 pm | सूनिल

मस्त!

सुहास..'s picture

2 Nov 2013 - 1:32 pm | सुहास..

अChछान आ अनुaअनुभanuअनुभअनुaan

सुहास..'s picture

2 Nov 2013 - 1:33 pm | सुहास..

अChछान आ अनुaअनुभanuअनुभअनुaan