आमची पहिली गाडी
झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती. आणि गाडीत बसून जायला मिळालं तरी मी तेवढ्यावर खूष होते. शिवाय ड्रायव्हिंग शिकून घेतलं तर नवरा तेही काम माझ्यावर सोपवून आरामात राहील अशी साधार भीती होती. त्यामुळे नवरा एकटाच ड्रायव्हिंग स्कूलला गेला. त्या शिकवणार्या गुरूने काय पाहून देव जाणे पण याला प्रोफेशनल लायसन्स काढायचा अर्ज भरायला लावला. साहजिकच आर टी ओ ने प्रथेनुसार एकदा नापास करून दुसर्या टेस्टमधे त्याला एकदाचे लायसन्स दिले.
लायसन्स काढून झाले. आता गाडी घेऊया म्हणून विचारविनिमय सुरू झाला. तेव्हा नवी मारूती ८०० तशी आमच्या आवाक्याबाहेर होती. माटिझ, इंडिका वगैरे नव्या नव्या दिसायला लागल्या होत्या. गाड्यांची कर्जे आतासारखी स्वस्त आणि सहज मिळत नव्हती. आणि आवाक्याबाहेर कर्ज काढायचं नाही हा आमचा कोकणातला बाणा. साहजिकच तेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली एखादी सेकंड हॅण्ड प्रीमियर पद्मिनी ऊर्फ "फियाट" घेऊया असा विचार सुरू झाला. ती गाडी प्रीमियर पद्मिनी हे मला माहित आहे पण तिचं प्रचारातलं नाव फियाटच. तेव्हा मी तेच म्हणणार! ही १९९६-९७ ची गोष्ट आहे हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात नंतरही बरीच वर्षे फियाट गाड्या चालत होत्या, पण गोव्यात फियाट तेव्हा खूप स्वस्त मिळायला लागल्या होत्या. तसेही तिथे सगळे वर्रात गोंयकार! आमच्या बँकेतला शिपाई म्हणे, "तू फियाट घ्यायच्यापेक्षा ट्रक का घेत नाहीस?" पण आपण नवीनच ड्रायव्हिंग शिकलोय, तेव्हा भलीभक्कम लोखंडी फियाटच बरी. कुठे आपटली तर काय घ्या! असा विचार करून माझ्या नवर्याने फियाटच घ्यायची ठरवली.
दर पावसाळ्याच्या आधी तो स्कूटर रंगवायला द्यायचा त्या गॅरेजवाल्याचा चारचाकी गाड्या रंगवणे आणि दुरुस्ती करणे हा खरा प्रमुख धंदा. त्याच्या कानावर आम्हाला फियाट घ्यायची आहे हे पडताच त्याने उत्साहाने जुन्या गाड्या शोधायला सुरुवात केली. एक दिवस त्याचा फोन आला. "पात्रांव, उसगावला एकाची जुनी फियाट विकायची आहे. बघून येऊया." माझा नवरा लगेच धावला. गाडी पाहताच कोणीही प्रेमात पडेल अशी देखणी. फिकट निळ्या रंगाची डौलदार गाडी पाहून माझा नवरा खूश झाला. शिवाय गाडीचा मालक आर टी ओ चा भाऊ. तेव्हा कागदपत्रांचाही काही प्रॉब्लेम नव्हता. गाडी फारशी चाललेली नाही हे ऐकल्यावर आम्हाला वाटलं की गाडी नव्यासारखी असेल, टायर बरे दिसत होते. शेवट २५००० ला गाडी घ्यायची ठरली. तिथून बाहेर पडताना गाडीच्या मालकाची मुलगी सहज म्हणाली, "तुम्ही आमची गाडी घेताय? आम्ही आता नवी गाडी घेणार आहोत. ही गाडी एकसारखी बंद पडते!" तेव्हा शंकेची पाल खरं म्हणजे चुकचुकायला हवी होती. पण आम्हाला वाटले की गाडी फार वापरात नाही, त्यामुळे असं होत असेल. बरं मेक्यानिक मोहंमद म्हणाला "पात्रांव तू भिऊ नको. मी गाडी नीट ठेवीन तुझ्यासाठी." झालं. गाडीची बारीक सारीक कामे करून गाडी एकदाची घरी आली आणि आम्ही गाडीचे मालक झालो!
ही फियाटची कामे म्हणजे काय याचा कोणी अनुभव घेतला असेल त्याला कळेल. एक तर ती पत्र्याची गाडी, त्यामुळे गंज येणे, पत्र्याला भोके पडणे, काहीवेळा पत्रा कोणीतरी खाल्ल्यासारखा दिसणे इ नाना प्रकार असतात. उन्हापावसात फियाट ठेवली की तिची रया गेलीच! ही गाडी बराच काळ छप्पराखाली जागेवर उभी असायची त्यामुळे पत्र्याची कामे नसली तरी विजेची, ब्रेक वगैरेची दुरुस्ती, पॉलिश, सीट कव्हर्स इ इ करायला हवे होते. तर त्या कामांचे आणखी १० एक हजार झाले. पण गाडी दिसत होती फारच सुरेख. माझा नवरा गाडीला रोज इंजिन चालू करून सोसायटीत चक्कर मारून आणायचा. तेवढ्यात सासूसासरे आले होते. मग प्ल्यान केला की आपल्या गाडीने देवळात जाऊया. दिवसभर बाहेर रहायचे आणि नवर्याला तर गाडी चालवायची सवय नाही म्हणून एक धंदेवाईक ड्रायव्हर बरोबर घेतला आणि आमची गाडी निघाली.
१०/१२ किमि जाईपर्यंत कसला तरी जळका वास यायला लागला. थोड्याच वेळात इंजिनाकडून धूर यायला लागला आणि गाडी बंद पडली. आम्ही पटापट गाडीतून बाहेर आलो. ड्रायव्हरने गाडीचा जबडा उघडला आणि थंड व्हायला दिली. तोपर्यंत त्या गावातले लोक जमा होऊन सल्ले द्यायला लागले होते. गाडी सुरू होत नाही हे लक्षात आल्यावर सगळे प्ल्यान गुंडाळून ठेवले आणि आमची वरात परत घरी गेली. नवरा स्कूटर घेऊन महंमदकडे धावला.
महंमदने गाडी सोडून दिली होती तिथे जाऊन पाहणी केली आणि सुवार्ता दिली की इंजिनात पाणी गेलंय. गाडीचं इंजिन उतरवायला पाहिजे. झालं होतं असं की रेडिएटर गळका होता. फियाटच्या रेडिएटरमधे रोज पाणी भरून त्याची पातळी बघत बसावी लागते. आता या गाडीचा रेडिएटर गळका आहे हे त्या महंमदच्या आधीच लक्षात आलं का नाही देवजाणे. शंका घ्यायला वाव नक्कीच होता. पण हे आम्हाला तेव्हा माहित नव्हतं. गाडी टो करून तो घेऊन गेला. मग नवर्याचे त्याच्या गॅरेजकडे हेलपाटे सुरू झाले. दोन एक महिने काढून, कायबाय करून गाडी परत चालती झाली. दरम्यान महंमदचं "हे काम करूया ते काम करूया" वगैरे सुरूच होतं. शेवटी त्याच्याकडचा इलेक्ट्रिशियन सांतान हळूच म्हणाला, "महंमदचं सगळं ऐकू नको रे! गाडी चालू झाली की पुरे!" झाली एकदाची गाडी तयार.
आता माझा नवरा अगदी लक्ष देऊन रेडिएटरमधे पाणी भरणे वगैरे कामे करायला लागला. जवळपासच्या फेर्या सुरू झाल्या. एकदा आम्ही त्या सांतानलाच बरोबर घेऊन रत्नागिरीला सुद्धा जाऊन आलो. आणि गाडी नीट चालते आहे म्हणून आम्ही सुटकेचा श्वास टाकला. पुढच्या वेळेला माझ्या नवर्याने एकट्याने गाडी चालवत सुखरूप रत्नागिरी गाठली. ४ दिवसांनी परत येताना निघायला जरा उशीरच झाला होता. कुडाळला पोचेपर्यंत ५ वाजून गेले. बाजारात चहा प्यायला थांबलो आणि परत निघताना गाडी सुरूच होईना! फियाट बंद पडली की बरेच लोक जमा होतात हा माझा अनुभव आहे. तसेच बरेच जण आले, आणि एकाने न सांगताच बाजूला असलेल्या गॅरेजवाल्याला बोलावले. तो दुरुस्ती करीपर्यंत आणखी उशीर झाला आणि मग काळोखातून ड्रायव्हिंग नको म्हणत आम्ही तिथेच मुक्काम ठोकला. दुसर्या दिवशी सकाळी उठून गोव्याला आलो. त्यामुळे आणखी एक रजा घ्यावी लागली. आणखी काही दिवसांनी रविवारी फिरायला म्हणून गेलो आणि तिथे गाडी बंद पडली. मजा अशी की गाडी जिथे बंद पडायची तिथून १००/१५० मीटर्सच्या अंतरात एखादे गॅरेज नक्की असायचेच! तशी मोठी गुणाची गाडी!
फियाट जास्त चाललेली नाही हा प्लस पॉइंट नव्हे हे आतापर्यंत आम्हाला कळले होते. दरम्यान माझ्या नवर्याने गाडीचा डॉक्टर बदलला. हा दत्ता मेक्यानिक कायम दारू प्यायलेला असायचा. दारू प्यायला नाही तर त्याचे हात थरथरायचे म्हणे! त्याच्या गॅरेजमधे एक झुरळांनी कुरतडल्यासारखा दिसणारा फियाटचा सांगाडा होता आणि त्यात एक नरकासूर कायमचा उभा करून ठेवलेला होता. मुलांना पण तिथे गेले की मज्जा वाटायची. फियाटचे स्पेअर पार्ट्स खूप स्वस्त मिळायचे आणि मेक्यानिकची फी पण अगदी थोडी. त्यामुळे गाडीची दुरुस्ती महाग वाटत नसे. काही दिवस बरे गेले. आम्ही एक दोन वेळा बेळगाव, एकदा मालवण, आणि एकदा रत्नागिरीला फार काही न होता जाऊन आलो.
पण आतापर्यंत माझ्या नवर्याचा गाडीबद्दलचा उत्साह कमी झाला होता. रोज इंजिन सुरू करणे म्हणजे कंटाळवाणे काम. त्यामुळे हळूहळू २ दिवसांनी, मग ४ दिवसांनी, मग आठवड्याने अशी गाडीला सुरू करण्यातली गॅप वाढत चालली होती. साहजिकच गाडीची बॅटरी चार्ज न झाल्यामुळे इंजिन सुरू न होणे वगैरे प्रकार व्हायला लागले होते. बॅटरी काढून २/३ वेळा चार्ज करून आणावी लागली होती. फियाटचा एक दुर्गुण म्हणजे तिला जर रोज स्टार्ट मारला नाही तर इंजिन पटकन सुरू होत नाही. मग शेजारच्या पोरांना बोलावून ती ढकलायला लागते. तेही प्रकार सुरू झाले होते. मग गाडीचे टायर्स एकदा बदलून झाले. नंतर गाडी हळूहळू घरापेक्षा जास्त वेळ दत्ताच्या गॅरेजमधे पडून रहायला लागली होती.
अशातच एकदा नवरा मुलीला आणायला तिच्या शाळेत गेला. घरी येताना बस स्टॆँडच्या बाजूच्या मुख्य चौकात गाडी बंद पडली. लगेच दोन पोरांनी मदत करून गाडी बाजूच्या पेट्रोलपंपावर ढकलून ठेवली आणि मग दत्ताला बोलावून आणून ती परत चालू करणे वगैरे सोपस्कार पार पडले. पण घरी येताच कन्यारत्नाने जाहीर केले की बाबाने मला घरी न्यायला यायचे असेल तर फियाट आणता कामा नये. स्कूटर चालेल. तोपर्यंत चिरंजीवसुद्धा फियाटमधून कुठेही जाऊया नको म्हणायला लागले होते. मग आम्हीच कधीतरी हायवेवर एक फेरी मारून यायचो. होता होता एक दिवस एक भंगारवाला विचारायला आला, "साहेब तुमची गाडी द्यायची आहे काय?" आम्हाला कसंतरीच वाटलं. कारण काही झालं तरी ती आमची पहिली गाडी. दिसायला फार सुंदर. आणि गुणीसुद्धा. हो. कधीही मेक्यानिकपासून लांब बंद पडली नाही! त्या भंगारवाल्याला पळवून लावला. पण मग आणखी भंगारवाले यायलाच लागले.
तोपर्यंत गाडीची १५ वर्षे पुरी झाली होती. एकदा ग्रीन टॅक्स भरून गाडी परत पास करून घ्यावी लागली. शेवटी नवराही कंटाळला. "गाडी दुरुस्तीला दिली आहे का?" याऐवजी, "गाडी दत्ताकडून परत आणली वाटतं!" असं शेजारी विचारायला लागले. तेव्हा अगदीच अति झालं असं म्हणून एका भंगारवाल्याला ती गाडी दहा हजाराला देऊन टाकली आणि माझ्या नवर्याने सुटकेचा श्वास टाकला. त्या गाडीची त्याला इतकी दहशत बसली होती की नंतर जेव्हा दुसरी गाडी घेणं सोपं झालं तेव्हाही तो गाडी घ्यायला कसाच तयार होईना. मग “आता तू जर दुसरी गाडी घेतली नाहीस तर मी ड्रायव्हिंग शिकून मीच गाडी घेईन” अशी धमकी द्यावी लागली, तेव्हा कुठे आमच्याकडे मारुती ८०० आली. पण तरी गाडी म्हटली की अजून ती फियाटच आठवते!
प्रतिक्रिया
8 Jan 2013 - 1:04 am | मोदक
फटू द्या की तुमच्या गाडीचे...
8 Jan 2013 - 1:10 am | पैसा
तेव्हा आमच्याकडे रोलवाला क्यामेरा होता. तेव्हाचे फटु गेले कधीच ढगात!
8 Jan 2013 - 1:04 am | अँग्री बर्ड
छान अनुभव आहे, अनुभव अनेकदा खर्चिकच का असतो कोणास ठाऊक !
8 Jan 2013 - 8:10 pm | रणजित चितळे
म्हणून जास्त काळ लक्षात राहातो व अनूभव बनतो. नाहीतर सुखद आठवण बनून राहातो :-)
9 Jan 2013 - 11:13 am | मनराव
लाखाची गोष्ट सांगितलीत राव......... पण काही काही खर्चिक अनूभव पण सुखद आठवणी होतात....... ;)
10 Jan 2013 - 9:04 pm | रणजित चितळे
कोण आहे ती???????????
11 Jan 2013 - 10:18 am | अमोल खरे
हॅहॅहॅहॅ. आता बोला मनराव. कोण आहे ती ? आं आं ?
8 Jan 2013 - 1:06 am | शैलेन्द्र
भन्नाट...
8 Jan 2013 - 1:12 am | कवितानागेश
आता कोण चालवतं गाडी? :)
8 Jan 2013 - 1:20 am | पैसा
न धरी चक्र करी मी! नाहीतर नवरा ते काम माझ्यावर सोपवून आरामात राहील.
2 Nov 2013 - 1:02 pm | विजुभाऊ
ज्योति तै
तुम्ही माझ्या सौं ना कधी भेटलात. दोघिंची मते इतकी जु़ळतात? संशय येतोय..................
8 Jan 2013 - 1:12 am | संजय क्षीरसागर
आणि
हे एकदम भावलं!
8 Jan 2013 - 1:21 am | उपास
शाळेत अस॑ताना आम्हाला चिमणरावांचा धडा होता त्यात त्यांनी घेतलेल्या अशाच जुन्या मोटारीचे अनुभव होते.. मजा आली वाचून !
8 Jan 2013 - 2:07 am | रेवती
ही ही ही. चिवि जोशींच्या गाडीच्या कथेची आठवण झाली. तुमची गाडीही गाभार्याला फेर्या मारण्याऐवजी संपूर्ण देवळाला घालणार असे वाटत होते. फियाटच्या तक्रारी पूर्वी बर्याच ऐकू येत असत. माझा असा अनुभव दुचाकीचा आहे. लूना नावाचा प्रकार होता. गाडी बरी लागली तर लागली नाही तर रखडमपट्टी ठरलेली. लेखन आवडले, मनोरंजक आहे.
8 Jan 2013 - 3:19 am | श्रीरंग_जोशी
प्रथमतः लुनासारख्या गुणी वाहनाला प्रकार म्हणून हिणवल्याबद्दल निषेध.
दुसरे म्हणजे लूना होती नाही, अजूनही आहे.
काही महिन्यांपूर्वी आमच्या गावात डॉमिनोजच्या पिझ्झा पोचवणार्या युवकाला लूना वापरताना पाहिले अन त्याच्याकडून लुनाचे कौतुक ऐकून भरून पावलो. इथे (अमेरिकेत) सुद्धा अजूनही लूना खरेदी करता येते.
मी सायकल नंतर प्रथम लूना चालवायला शिकलो. विद्यार्थीदशेत लूना माझी सुखदु:खातली मूक भागीदारीण होती. आजही महाराष्ट्रातील अनेक भागांत लूना वापरली जाते...
अवांतराबद्दल क्षमस्व. लेख आवडला.
8 Jan 2013 - 4:51 am | शुचि
हो लूना ला नावं ठीवयचं काम नाही याशी अनेकदा सहमत. कॉलेजमध्ये लूनाच चालवली आहे, धडपडले आहे :)
8 Jan 2013 - 11:26 pm | माझीही शॅम्पेन
अगदी बरोबर लुनाला नाव ठेवायच काम नाही , कॉलेज मध्ये असताना लुना हे एक स्वप्न होतो , तेंव्हा कधीच स्वतचि अशी कधीच नव्हती , तेंव्हा असती तर तो आज BMW असल्याचा आनंदा इतका नक्कीच असता
10 Jan 2013 - 5:54 pm | १००मित्र
हो हो , एकदा तर माझ्या लूनाची धडक बसून एक ट्रकवाला मरता मरता वाचला होता
10 Jan 2013 - 6:21 pm | शैलेन्द्र
तेंव्हा तो ट्रकमध्ये नव्हता हे लिहायच राहील बहुदा :)
10 Jan 2013 - 11:47 pm | एस
वरील दोन्ही प्रतिसाद वाचून हसून हसून मेलो आहे... पोपट, पिंजरा आणि ट्रकड्रायवरचा विनोद आठवला..
11 Jan 2013 - 12:09 am | मोदक
मला तर ब्वा मिपावरचीच ती गोष्ट आठवली.
दुचाकीची धडक बसून जीप पुलावरून खाली कोसळली.. आणि जीप ड्रायव्हर मेला... :-))
8 Jan 2013 - 4:54 am | शुचि
खरं तर नवर्याला भेटायला फर्ग्युसनला लूनावरच गेले आहे , तोंडभर गॉगल घालून. नवरा अजूनही त्या गॉगलला नावं ठेवल्याखेरीज सोडत नाही. आणि मला वाटलेलं गॉगलमध्ये मी फार चिकनी दिसत असेन तेव्हा :( मुलगा लट्टू होईल =)) ....
8 Jan 2013 - 9:07 am | श्रीरंग_जोशी
नवर्याला की 'होणार्या' नवर्याला?
9 Jan 2013 - 4:48 am | शुचि
तेव्हा होणारा होता हो.
फसला म्हणून आता नवरा आहे :)
8 Jan 2013 - 2:40 am | विकास
अनुभव कथन आवडले... गाडीचे (बंद पडणे वगैरे) अनुभव हे घेताना डोकेदुखी करणारे असतात पण नंतर आठवले की मजा वाटते...
अग्दी पहील्यांदा गाडी घेतली तेंव्हा मध्यरात्री एका हायवेच्या बाजूस हायवेवर येयच्या आधी गाडीचा टायर अचानक फुटला. मग लहान तात्पुरते चाक लावणे आले. माझ्यासकट बरोबरचे सगळे मित्र एकदम एक्सपर्टच... मग गाडीतले पुस्तक काढून गाडीच्या दिव्याच्या प्रकाशातच वाचायला सुरवात केली. चाक वर (जॅक अप) केले. चाकाचे नटबोल्ट्स काढले आणि गाडी नवीनच असल्याने सावधपणे, चाक हलवायचा प्रयत्न करू लागलो. पण काही केल्या चाक काही वर निघेना. मित्रांना पण जमत नव्हते. शेवटी रस्त्यावरून त्यावेळेस जाणार्या तुरळक गाड्यांना हात करू लागलो. एक गाडी थांबली. एक गोरा अनुभवी माणूस उतरला आणि रावड्या आवाजात काय झाले म्हणून विचारले? त्याला सांगितल्यावर त्याने एकदा चाक नीट वर केले आहे ना आणि सगळे बोल्ट्स काढले आहेत ना ते बघितले आणि मग जोरात लाथ मारली... चाक मुकाट्याने पडले! :-)
8 Jan 2013 - 4:49 am | शुचि
सॉलीडे =))
8 Jan 2013 - 4:51 am | शुचि
पैसा अनुभव फार आवडला. भंगारवाले मेले डँबीस दिसताहेत :(
8 Jan 2013 - 6:32 am | अत्रुप्त आत्मा
:-)
8 Jan 2013 - 6:53 am | स्पा
लोल्स
बेक्कार. :-D
8 Jan 2013 - 8:13 am | ५० फक्त
मस्त अनुभव कथन,गाडी हा आर्थिकदृष्ट्या फार लांबचा विषय होता तोपर्यंत जास्त लक्ष घातलं नाही, एकदा खिशानं संमती दिल्यावर प्रेम करु लागलो, आहे.
बाकी परवा आमच्याकडे ढगातुन काही फोटो पडले हा तुमचाच आहे का बघा बरं जरा पैसातै,
8 Jan 2013 - 8:17 am | पैसा
गाडी साधारण आमच्या गाडीसारखीच दिसतीय, पण ही ललना कोणीतरी ढगातलीच आहे!
8 Jan 2013 - 11:09 pm | मराठे
संगिताताई बिजलानी वाटतात.
10 Jan 2013 - 5:57 pm | १००मित्र
की सारिका कमल हसन [काही वर्शांपूर्वीची] ?
की सारिका [नुसतीच] ?
10 Jan 2013 - 8:54 pm | पिवळा डांबिस
नव्हे, ती हसनभार्या सारिका नव्हे...
ती अझरूद्दीनभार्या संगीताच आहे!!!
तत्कालीन पणत्या ओळखणे ही आमची पेशालिटी आहे!!!!
:)
10 Jan 2013 - 11:50 pm | एस
च्यामारी पण गाडीकडेच जास्त लक्ष जातंय.. :)
11 Jan 2013 - 2:10 pm | संजय क्षीरसागर
.
8 Jan 2013 - 8:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ही परी अस्मानीची... ;)
8 Jan 2013 - 10:31 pm | अभ्या..
गाडी प्रिमियर पद्मिनीच आहे, त्या पैसातै नाहीत पण तो मागचा सीन मात्र लै ओळखीचा वाटतोय.
अशोक सराफ, ल्क्ष्याच्या आणि बर्याच मराठी पिच्चरमध्ये असायचाच.
12 Jan 2013 - 6:47 pm | चौकटराजा
शक्याता अशी आहे ही जाग फिल्मसिटी गोरेगाव मधली आहे.खात्री साठी गुगल अर्थ चा वापर करावा अमीना !
8 Jan 2013 - 8:30 am | किसन शिंदे
ह्या ह्या ह्या..
पहिल्या वाहिल्या गाडीचं अनुभव कथन आवडलं.
8 Jan 2013 - 8:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
लेख आवडला :)..
प्रिमिअर पद्मिनि खरचं दणकट गाडी होती ह्यात काही शंकाच नाही. माझ्या मित्राकडे होती मी लहान असताना, पण तिचा दणकट पणा आमच्या मस्ती समोर टिकला नाही एवढं खर. द्या गाडीची खिडकी खाली वर करायची लिव्हर आम्ही दोघानी मिळुन किती वेळा तोडली हे पण आठवत नाही. जागच्या जागी तिच स्टीअरींग फिरऊन आम्ही गाडी गाडी खेळायचो तेही आठवतय. ह्या सगळ्या गोष्टी आठवुन नोस्ट्याल्गिक झालं. लेखबद्दल आभार.
अवांतर... कोणाच्या ओळखिमधे कोन्टेसा गाडी असेल विकायची तर सांगा. विकत घेउन मोडीफाय करायचा विचार आहे. :)
8 Jan 2013 - 10:27 am | कपिलमुनी
असतील तरच विचार करा ..
काँटेसा घेउन मॉडीफाय करणे म्हणजे ४ आण्याची कोंबडी आणि १२ आण्याचा मसाला
8 Jan 2013 - 2:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे बरोबर आहे. पण निट मोडिफाय केलेली कोन्टेसा अतिशय भारी दिसते. अमेरीकन मसल च्या तोडीची दिसते. पाहु जम्तय का ते कधी घेउन मोडिफाय करणं. :)
8 Jan 2013 - 8:55 am | नंदन
लेख आवडला, एकदम खुसखुशीत.
8 Jan 2013 - 9:00 am | प्रचेतस
मस्त किस्से.
बाकी धन्याने लिहिलेल्या हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस !!! ची आठवण झाली.
8 Jan 2013 - 9:03 am | यशोधरा
मस्त खुसखुशीत लेख.
8 Jan 2013 - 9:23 am | उपास
साला, त्यादिवशी व्हीटी वरुन चिराबाजारला येत असताना ट्क्सीच्या पासिंगचा विषय निघाला, मी आणि टॅक्सीवाला दोघेही हळहळलो.. प्रिमियर पद्म्मिनीचं उत्पादन थांबवलं त्यामुळे सगळ्या नविन पासिंगच्या टॅक्स्या सँट्रो आणि तत्सम. एकदम पिचकावणी. त्यात ते सी एन जी असलं की लगेजची बोंब. फियाट ट्क्सीवाल्यांची सुद्धा अजूनही फेव्हरेट, एकदम दणकट आणि मेंटेनंन्सला परवडणारी. पॅसेंजरना त्यांच्या भरपूर सामानासकट दमछाक न होता वाहून नेणारी.. काही वर्षांनी ह्या टॅक्स्या दिसणार नाहीत म्हणून आत्ताच वाईट वाटतय :)
8 Jan 2013 - 9:57 am | अनन्न्या
माझं लग्न ठरलं तेव्हा मैत्रिण म्हणाली, अगं तो निळ्या फियाट्वाला सरदेशपांडे होय? रत्नागिरीत आधी फियाट फेमस आणि तिच्यामुळे फियाट्वाला. सोनाराकडे आंगठी करायला टा़कायला गेलो तर गाडी मध्येच बंद!! पण लाल डब्यातून फिरलेल्या मला गाडी सुरू होईपर्यंत बाहेर उभं रहाताना इतकं भारी वाट्त होतं ना, बंद पड्ली असली तरी माझ्या नवय्राकडे चार चाकी आहे!!!!!!!!
8 Jan 2013 - 10:29 am | कपिलमुनी
४ व्हीलर वाल्यांच लग्नाचा मार्केट पहिल्यापासून वरती असते..
8 Jan 2013 - 10:12 am | ऋषिकेश
हा हा.. मस्त 'प्रिमियर' लेख!
8 Jan 2013 - 10:18 am | लीलाधर
जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मामाकडे पण पांढर्र्या रंगाची फियाट होती तीची आठवण आली बघ. 1957 ला पहीले मॉडेल आले ते डुक्कर फियाट, 1960 ला आले ते 1100 D आणि नंतर पद्मिनी नावाने :)
8 Jan 2013 - 10:19 am | तर्री
गाडीपुराण आवडले. पहली गाडी ही पहिल्या प्रेमाप्रमाणे कायम लक्ष्यात रहाते .
8 Jan 2013 - 10:34 am | सस्नेह
खुसखुशीत किस्सा !
बाकी ज्योती तू ड्रायव्हिंग शिकली नाहीस हे अगदी नामी केलेस.
आमच्याकडे ड्रायव्हिंगबरोबरच गाडीवर फडके मारणे हेही काम माझ्याच गळ्यात पडले आहे..
8 Jan 2013 - 10:59 am | पियुशा
हा हा हा मै निकला गड्डी लेके
रस्तेपे एक सडकपे एक मोड
आया मे उथ्थे गड्डी छोड आया
रब जाने कब गुजरा मालवण
..कब बेळ्गाव आया मे ...
मे निकला गड्डी लेके ............ ;)
8 Jan 2013 - 11:07 am | राजेश घासकडवी
खुसखुशीत लेख.
हे वाक्य तर फारच आवडलं.
8 Jan 2013 - 11:26 am | गवि
मस्त. नॉस्टाल्जिक आणि तरीही खुसखुशीत. पहिली गाडी म्हणजे एकदम आठवणींचं भांडार असतं हे खरंच..
8 Jan 2013 - 11:30 am | योगप्रभू
बायका कटकट/हट्ट्/रुसवेफुगवे अशा मार्गांनी चारचाकी घेण्यासाठी नवर्यांना घोड्यावर घालतात आणि नंतर त्यांच्या फजितीचे किस्से मैत्रिणींना डोळे मिचकावत सांगत बसतात. आपणच त्या फजितीला मूळ कारण होतो, हे त्या कधीही कबूल करत नाहीत. :)
8 Jan 2013 - 11:50 am | बॅटमॅन
एकच नंबर योगप्रभू. या टिप्स खूप कामाला येतील होतकरूंना ;)
बाकी, लेख मस्त नॉस्टॅल्जिक आहेच-मजा आली. आमच्या कॉलनीत अशा ३-४ जणांकडे गाड्या होत्या त्याची आठवण आली एकदम. लै भारी वाटायचे तेव्हा गाडीत बसणे म्हणजे.
8 Jan 2013 - 11:54 am | सस्नेह
जसं काही नवर्यांना हौसच नसते नव्या गाडीची !
8 Jan 2013 - 12:54 pm | योगप्रभू
आमच्या पहिल्या गाडीची चित्तरकथा लई भारी हाय. नवर्यांना खर्चाच्या टिपिंग पॉईंटकडे चतुराईने कसे ढकलत न्यावे, याचा उत्कृष्ट धडा. एका रम्य दिवशी एक छोटी बाई एका मोठ्या बाईच्या कानात कुजबुजली, 'आई! मी आज शर्वरीच्या गाडीतून शाळेत गेले. रिक्षावाले काका आजारी पडले आणि मग शरुच्या बाबांनी आम्हा सगळ्यांना शाळेत सोडलं. कसली भारी गाडी आहे. आपण पण घेऊया ना.' त्यावर त्या मोठ्या बाईच्या डोक्यात स्पार्क पडली. पुढचे काही दिवस 'गाडी घरात येणे कसे आवश्यक आहे' यावर विविध युक्तिवाद करण्यात गेले. घरातील पुरुष हा व्यवहारी आणि विशेषतः 'अंथरुण पाहून पाय पसरणारा' (ही एक चांगल्या अर्थाची म्हण आहे)असल्याने तो म्हणाला, 'कशाला पाहिजे गाडी? मोर नाचला म्हणून लांडोरीने नाचलेच पाहिजे का?' अशी वाक्ये कल्पनेचे रुपांतर दृढनिश्चयात करतात, हे त्या पुरुषाच्या ध्यानातच आले नाही.
'पोल्यूशन किती वाढलंय. टू व्हीलरवर मुलांना त्रास होतो.' असे सांगूनही पुरुष बधला नाही. पण विक्रमीने तिचा हट्ट सोडला नाही. 'नुसतं बघायला काय हरकत आहे?' असा बहाणा करुन ती शोरुमच्या दिशेने वळली. तिथे त्या पुरुषाच्या दुर्दैवाने त्याचा जुना मित्रच भेटला. मित्रप्रेमाला जागण्याऐवजी तो हलकट 'वहिनी'चा समर्थक ठरला आणि त्याने सुलभ हप्त्यांत गाडी कशी घेता येते, हे रहस्य मोठ्या बाईला सांगितले. तरीही तो पुरुष नकारघंटा वाजवत राहिला. बावळट पुरुषही आता स्वतःचे डोके चालवू लागले, हे पाहिल्यावर मोठ्या बाईचा संताप अनावर झाला, पण तिने धूर्तपणे डाव टाकला. तिने त्या छोट्या बाईला फूस दिली. छोट्या बाईने झोपताना पुरुषाकडून नवी गोष्ट ऐकून घ्यायला, एवढेच काय पण शाळेला जाताना गालाची 'प' द्यायला साफ नकार दिला. युगानुयुगे स्त्रियांच्या ज्या अमोघ अस्त्रापुढे पुरुष माघार घेतात, त्याचा प्रयोग झाला. छोट्या बाईची घमासान रडारड झाली. त्यातही 'लेकराच्या डोळ्यात पाणी आणताना काहीच कसं वाटत नाही?' अशा काड्या ती मोठी बाई टाकतच होती. अखेर दांडगट प्रवृत्तींचा विजय झाला आणि चारचाकी घरात आली.
पण एक गोष्ट मान्य. बायकांपेक्षा गाडीच्या अंगात खोड्या कमी असतात. गाडी समजूतदार असून निदान कंट्रोल तरी होते..असो.
8 Jan 2013 - 1:01 pm | सस्नेह
किस्सा मस्त आहे !
पण भाव कुणाचा वाढला त्यामुळे ?
8 Jan 2013 - 1:03 pm | बॅटमॅन
अशा धोक्यांची जाणीव करून दिल्याबद्दल अनेक आभार!! आपला किल्ला कसा लढवावा याच्या टिप्स फार मोलाच्या आहेत ;)
9 Jan 2013 - 11:58 pm | मोदक
ते सोड रे...
तू आधी "मतदार यादीत" नाव नोंदणी करून घे. पुढचे पुढे...
बरोबर का योगप्रभू..?
10 Jan 2013 - 12:36 am | बॅटमॅन
केलंय रे अलीकडेच केलंय नाव दाखल करण्यासाठी अॅप्लिकेशन, आता बोल =))
10 Jan 2013 - 1:14 am | योगप्रभू
आवडणारे संकेतस्थळ बघा, अॅडमिनिस्ट्रेशन अॅप्रूव्हल घ्या आणि स्थळाला संकेत द्या. मेलिंग व चॅटिंग सुविधा वापरा.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पेज ओपन करा. अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. माऊसचा वापर करुन स्क्रोल करा. मुख्य म्हणजे चाईल्ड लॉक सुरवातीलाच काढून टाका. :)
10 Jan 2013 - 1:16 am | बॅटमॅन
धन्यवाद ;)
10 Jan 2013 - 1:17 am | बॅटमॅन
धन्यवाद :)
8 Jan 2013 - 1:53 pm | संजय क्षीरसागर
अनेकानेक अर्थ, (म्हटलं तर अनर्थ) आणि तरीही `नेमका अर्थ' व्यक्त करणरी वाक्यरचना
8 Jan 2013 - 1:55 pm | नगरीनिरंजन
हा हा हा! जबर्या!
पुरुषजन्मा तुझी कहाणी!
8 Jan 2013 - 4:22 pm | वपाडाव
हे शिवधनुष्य पेलायला आपल्या दोहोंचे पेले आधी एकमेकांवर आदळले पाहिजेत.
-(बसुन बोलणारा)वपाडाव
8 Jan 2013 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> एक गोष्ट मान्य. बायकांपेक्षा गाडीच्या अंगात खोड्या कमी असतात. गाडी समजूतदार असून निदान कंट्रोल तरी होते.
योगप्रभुच्या धोरणाचा मी निषेध व्यक्त करतो. :)
-दिलीप बिरुटे
8 Jan 2013 - 4:33 pm | यशोधरा
हे वरील वाक्य
असे लिहायचे होते की नव्हते? :P
8 Jan 2013 - 6:09 pm | योगप्रभू
मिलॉर्ड,
मी हलकट हे विशेषण मित्रासाठी वापरले आहे. कृपया येथे स्वल्पविराम घेऊन या मुद्द्याला पूर्णविराम द्यावा.
8 Jan 2013 - 7:39 pm | यशोधरा
वाचताना भाषेचा खेळ पटकन लक्षात आला म्हणून एक गंम्मत म्हणून सांगावेसे वाटले, इतकेच.
8 Jan 2013 - 8:17 pm | योगप्रभू
यशोधरा ताई,
माझ्या वरच्या वाक्यातला शब्दांचा खेळ आणि गंमत घ्या ना लक्षात :)
सगळं खेळीमेळीत चाललंय हो. गंभीर नका होऊ.
8 Jan 2013 - 10:12 pm | यशोधरा
मग ठीके :)
9 Jan 2013 - 8:52 am | स्पंदना
काय योग आहे हो प्रभु? मोठ्याबाई लहाणबाई, गाडीबाई.
10 Jan 2013 - 6:02 pm | १००मित्र
क्या बात , क्या बात !
10 Jan 2013 - 12:02 am | उपास
स्त्री हट्टाची गोडी काय वर्णावी.. ग. दि. मांनी 'मज आणूनि द्या हो हरिण अयोध्यानाथा' मधे इतक्या सुंदर रितीने तो मांडलाय. राग, लोभ, अमिश, खुशमस्करी काय वाट्टेल त्यामार्गाने स्त्री तिच्या मनातलं करायला लावतेच. जिथे प्रत्यक्ष प्रभू राम हरले तिथे आपलं काय.. :)
किस्सा आवडलाच..!
10 Jan 2013 - 2:59 pm | खबो जाप
१०००००% जागतिक सत्य , लई भारी ........
8 Jan 2013 - 12:15 pm | पैसा
गाडी गैरसोयीच्या रस्त्याला वळवल्याबद्दल योगप्रभूचा तीव्र णिशेढ! :D
अति अवांतर: माझ्या सालस नवर्याला मी कधीही तुला भेटू देणार नाही!! :D
8 Jan 2013 - 12:12 pm | प्रकाश घाटपांडे
मस्तच माझी पण पहिली अशीच फियाट होती. फ्लोअर गिअर वाली. ग्यास किट बस्वुण घेतली. लई गुणाची होती. ५ हजारात विकली.
8 Jan 2013 - 12:29 pm | गणेशा
लेख मस्तच .. आवडली पहिल्या गाडीची गोष्ट
8 Jan 2013 - 12:39 pm | बाबा पाटील
माझ्या पहिल्या गाडीला मैत्रीण सवत म्हणायची.....मात्र लग्नानंतर पहिली जी मारुतीची ऑल्टो घेतली तीची आठवण बायको आजही काढते....
8 Jan 2013 - 12:49 pm | गवि
आहा.. !! भाग्य भाग्य ते हेच..
8 Jan 2013 - 1:08 pm | कानडाऊ योगेशु
जे न देखे रवी ते देखे गवि! ;)
8 Jan 2013 - 8:07 pm | चिर्कुट
>> जे न देखे रवी ते देखे गवि!
एक लंबर.. :)
8 Jan 2013 - 8:43 pm | बाबा पाटील
गवि,,,,,,गेले हो ते दिवस.......
8 Jan 2013 - 1:44 pm | नगरीनिरंजन
लेख मजेदार!
माझ्या आयुष्यात अजून पहिली गाडी यायचीय. (येईल असे वाटत नाही अजून तरी)
10 Jan 2013 - 6:03 pm | १००मित्र
येणार , येणार, लई वेळा येणार !
पण फियाट येनं जरा अवघडच दिसतंय