वळु

राजस's picture
राजस in जनातलं, मनातलं
27 Jun 2008 - 10:15 pm

वळु

बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे.

तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळु. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळुने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफीसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकर्यांना एकत्र जमवुन डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते. त्यात संगीची प्रेमकथा असे उपकथानक सुद्धा आहे. डॉक्यमेंटरी करुन संपते आणि त्यानंतरच्या एक-दोन प्रयत्नांमधे वळु पकडला जातो, व चित्रपट संपतो.

मला चित्रपट आवडला नाही. कथानकात तस काही दम नाही. अगदीच साधे आहे. म्हणुन मग त्यात गावातल्या तरुण नेत्याची कुरघोडी करण्याची धडपड. भटजीबुवांचे (दिलीप प्रभावळकर) विनोद आणि संगीचे (अमृता सुभाष) प्रेमप्रकरण त्यात आले आहे. वळु बघितल्यानंतर त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते. वळु बिचारा एकदमच शांत आहे. चित्रपटात तो नुसताच इकडुन तिकडे जातो. तर त्याला लोक एवढे घाबरतात का हे काही समजत नाही. वळुचे पुर्ण दर्शन अगदी शेवटी घडते. तोपर्यंत त्याचा त्याला अर्धवट दाखवुन बॅकग्राउंडला त्याचा जोरात उच्छवास ऐकवण्यात आला आहे. त्यावरुन तो हिंसक झाला आहे असे आपण समजायचे. वळु पकडण्यासाठी गेलेला फॉरेस्ट ऑफीसर डॉक्युमेंटरी बनवण्यात मध्यांतरापर्यंत वेळ घालवतो. त्यानंतर त्याने केलेले प्रयत्न एका अननुभवी माणसाने केलेले प्रयत्न वाटत रहातात. शेवटी वळु पकडला जातो परंतु त्या प्रसंगात काही थ्रिल नाही.

अतुल कुलकर्णी हा एक चांगला अभिनेता आहे हे हा चित्रपट बघुन कोणीही म्हणणार नाही.काही मनाविरुद्ध घडले तर 'शिट शिट शिट' आणि मनासारखे घडले तर 'येस येस येस' असे संवाद त्याच्या तोंडी आहेत. वळु पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरला आवश्यक असलेली लीडरशीप कुठेही जाणवत नाही. त्याच्यासारख्या अभिनेत्याला वाया घालवलेले आहे एवढेच म्हणता येइल.

दिलीप प्रभावळकरांनी ही भुमिका का स्वीकारली असावी असा प्रश्न पडतो. दिवस/रात्री कोणत्याही वेळेस परसाकडला जाणे य पलिकडे या भुमिकेत काहीच नाही. विनोद निर्मीती साठी हे पात्र असावे असे म्हटले तर सारखे 'लागली आहे' असा अभिनय करत इकडुन तिकडे जाणार्‍्या पात्रात कसली आली आहे विनोदनिर्मीती. त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे.

चित्रपटात काही प्रसंग उगाच घुसडल्यासारखे वाटतात. आता छोट्या मुलाला त्याची आई देवळाबाहेरच शु करायला लावते. यात दिग्दर्शकाला काय म्हणायचे आहे? विनोदनिर्मीतीसाठी असेल तर यात विनोद काय आहे. त्यात बाकी चित्रपट विनोदी अंगाने जात नाही. मला तर एकाही ठिकाणी खळखळुन हसु आले नाही.

चित्रपटात सगळेच काही निगेटिव्ह नाही. गावाची वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. जीवन्याची भुमिका करणार्या नटाने (गिरिश कुलकर्णी) उत्तम अभिनय केला आहे. फॉरेस्ट ऑफीसरला सगळी मदत केल्यानंतर ऑफीसर निघुन जाताना एकदम हळुवार होणे हे त्याने मस्त दाखवले आहे. चित्रपट तांत्रिक दृष्ट्या चांगला वाटतो.

हे चित्रपट परिक्षण नाही, तर नुसतेच माझे मत आहे. या वरुन चित्रपट पहायचे की नाही हे ठरवु नका. पण मराठी चित्रपटात सुधारणा व्हावी. किंबहुना मराठीत आंतरराष्टीय दर्जाचे चित्रपट निघावेत असे वाटते. त्यामुळे 'वळु' खरोखरच चांगला असता तर किती छान झाले असते असे चित्रपट बघितल्यानंतर वाटत राहीले म्हणुन चार ओळी खरडल्या एवढेच.

- - राजस

कलानाट्यचित्रपटप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

27 Jun 2008 - 10:20 pm | बेसनलाडू

चित्रपट खरोखरच चांगला आहे.तुम्ही मांडलेली चित्रपटाची डावी बाजू हीच त्याची उजवी बाजू कशी,हे सविस्तर सवडीने लिहीन. आज शुक्रवार असला,तरी कार्यालयीन व्यापातून सवड नाही :(
(संक्षिप्त)बेसनलाडू

अघळ पघळ's picture

28 Jun 2008 - 10:47 pm | अघळ पघळ

चालेल चालेल आम्ही वाट पाहू!
नाहीतर तुमच्या 'आत्मचरित्रात' तरी ह्यावर नक्की लिहा! ;)
-अघळ पघळ

भाग्यश्री's picture

27 Jun 2008 - 10:40 pm | भाग्यश्री

राजस तुमच्याशी सहमत! मलाही आवडला नाही.. किंवा मी म्हणीन हाईपच्या मानाने बोर वाटला.. वळू माजलेला वाटत नाही,त्याला पकडण्याचा सीनच आवडला नाही, प्रभावळकर, अमृता सुभाष वगैरेंचं काहीही काम नव्हतं पिक्चर मधे ई. ..

मला बरं वाटतय अजुन कुणी तरी आहे असं वाटणारं! माझ्या ब्लॉगवर आणि इथे लिहीले आहे.. परत लिहायचा कंटाळा आला.. :(

http://bhagyashreee.blogspot.com/

कोलबेर's picture

28 Jun 2008 - 3:20 am | कोलबेर

मला बरं वाटतय अजुन कुणी तरी आहे असं वाटणारं!

मला पण :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2008 - 10:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला चित्रपट आवडला नाही. कधी एकदा तो वळु पकडतील आणि आम्ही याच्यातून सुटू असेच झाले होते.
वळु पकडण्यासाठी गावक-यांच्या मुलाखती, प्रेमी जोडीचे फरार होणे, गावातील ते दोघे नेते, जाऊ दे !!!
वळुला आता पकडतील तेव्हा पकडतील संपुर्ण चित्रपट पाहतांना मलाच दमुन गेल्यासारखे झाले होते.
ग्रामीण भाषेतील संवादात त्यांचे हेल काढुन बोलणे काहीच्या काहीच. असो, चित्रपट नाहीच आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

28 Jun 2008 - 8:17 am | डॉ. श्लोक _भातखंडे

सर्वसाधारणपणे मला चित्रपट आवडला..
व्यक्तिरेखा मस्त होत्या... पहिला अर्धा पाउण तास मला तरी भरपूर मजा आली... हसलो...
दोन नेत्यांची चढाओढ, डॉक्युमेंटरीची गंमत छान...प्रभावळकर आणि निर्मिती सावंत यांचा पहिला सीन उत्तम...
नंतर सिनेमा एकदम संथ झाला, काही घडेना...
..
खटकलेल्या गोष्टी
१. अतुल कुलकर्णी इतका गोंधळलेला कधीच पाहिला नव्हता. म्हणजे नेहमीसरखी इन्टेन्स (!) ऍक्टिंग करायचीय की चित्रपटाच्या जॉनरप्रमाणे विनोदी हे काही ठरेना बुवा त्याचे.
२. वळू अगदीच सुमार .... ( लांबून एकदा बरा दिसला पण मागे लागतो त्या दृश्यात लोक उगीच का घाबरतात असे वाटले मग सगळा पर्पजच बोंबलला सिनेमाचा)
३. प्रभावळकरांचे सतत परसाकडेला जाणे यात विनोद काय ते कळेना...
______________________________________-

( पण तरी सिनेमा आवडला असंच म्हणेन... आपलं कसं आहे, एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही... चालायचंच)

राजस's picture

28 Jun 2008 - 9:07 am | राजस

एकदा डोक्यावर घ्यायचा म्हटलं की अगदी गुदमरून जाईल इतकं कौतुक करायचं आणि ठोकून काढायचं म्हटलं की मग बरं काही पहायचंच नाही

या दोन्ही गोष्टींना माझा विरोध आहे. परंतु डोक्यावर घ्यायचा तर त्यासाठी चित्रपट सुद्धा तेवढाच चांगला हवा ना.

- राजस.

राजस's picture

28 Jun 2008 - 8:31 am | राजस

चित्रपट आवडला नाही याच्याशी सहमत मित्र आहेत हे बघुन फार बरे वाटतेय. मला तर वाटले होते थोड्याफार शिव्या खाव्या लागतील. एखादा मराठी चित्रपट / दिग्दर्शक पुढे चाललाय तर मराठी माणसेच लागली पाय ओढायला असे ऐकायला मिळेल असे वाटले ;). त्यामुळे फक्त माझे मत आहे हो असा पवित्रा घेतला ;)). भाग्यश्री मायबोलीच्या दुव्याबद्दल धन्यवाद. तिथे सुद्धा दोन्ही मते वाचायला मिळतात. 'आवडला व नाही आवडला' अशी. आवड्ला असे म्हणणार्‍यांचे, साधा चित्रपट आहे, म्हणुन आवडला असे काही म्हणतात तर काही वळु हा प्रतिक आहे फक्त म्हणुन आवड्ला असे म्हणतात. परंतु त्यांनी toilet jokes (हा तिथे वापरलेला शब्द आहे) चा मुद्दा वगळलाय. असो.
आतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट हवा म्हणजे वळु ज्युरासिक पार्क सारखा दिसायला हवा असे नव्हे. तर कथा, पटकथा, संवाद हे उत्कृष्ट पातळीवरचे हवेत असे वाटते.
असो. कदाचित वळु ची बर्‍याच ठिकाणी चर्चा झाल्यामुळे इथे जास्त प्रतिक्रीया आल्या नसतील. परंतु तरीसुद्धा मि.पा. करांनी आपली मते इथे मांडावीत. बेसनलाडु आपण सुद्धा वेळ काढुन प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो.

अवांतर - माझे मराठी संस्थळावरचे पहिलेच लिखाण, मि.पा. वरच चालु करतोय. त्या दृष्टीने लिखाणाचे सुद्धा परिक्षण केले तरी चालेल.

आपला

राजस.

विजुभाऊ's picture

28 Jun 2008 - 1:28 pm | विजुभाऊ

मराठी चित्रपटात पहिल्यांदाच इतक्या प्रकारची भाषा एकाच गावातले गावकरी बोलतात
नगरकडची
साता-याची
पुणेरी ग्रामीण
पुणेरी नागरी
कोल्हापुरी
आणि औरंगाबादची
आणि वैदर्भी
हीसर्व वैषिश्ठ्ये असणारी भाषा असणारे गाव महाराष्ट्रात कोठे आहे.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 4:40 pm | विसोबा खेचर

अलिकडे मराठी चित्रपट पाहणं सोडूनच दिलंय. म्हणजे तसे पाहतो, तेवढ्यापुरते बरे वाटतात परंतु चिरकाल स्मरणात राहतील इतके खास वाटत नाहीत.

राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही!

तात्या.

सूर्य's picture

28 Jun 2008 - 9:28 pm | सूर्य

राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही!
सहमत
- सूर्य.

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Jun 2008 - 10:36 pm | डॉ.प्रसाद दाढे

वळू.. एकदम अचूक निरिक्षण राजसराव! अनेक लोका॑नी आवर्जून बघायला सा॑गितला म्हणून परवा पाहिला.. स्टार काष्ट असूनही मला बोअर झाला... बिबटे पकडणार्‍या गड्डमवारसाहेबा॑ना अ॑गावरची माशीसुद्धा न उडवणार्‍या वळूला पकडणे एव्हढे अवघड का जावे.. खर॑ म्हणजे दुर्गम गावात राहणारी माणसे बैलाला घाबरणे ही गोष्टच अशक्य वाटते..गावात दोन तट असणे ह्यातही नवीन काय आहे.. न॑दू माधवने (नेहमीप्रमाणे) अभिनय छान केला आहे पण मुळात कथानकातच (स्क्रिप्ट) काही दम वाटला नाही..
जीवन्याने चा॑गले काम केले आहे.
हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा!

अघळ पघळ's picture

28 Jun 2008 - 10:44 pm | अघळ पघळ

हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा!

अगदी मनातलं बोललात दाढे साहेब.
(मिपाचे चित्रपट तज्ञ लाडू साहेबांच्या एक्सपर्ट मताच्या प्रतिक्षेत) अघळ पघळ :)

शैलेन्द्र's picture

28 Jun 2008 - 10:50 pm | शैलेन्द्र

"बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे.""

कोणते हो ते चित्रपट?

राजस's picture

29 Jun 2008 - 9:00 am | राजस

अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक हे चित्रपट आठवावेत.

आपला अभिजित's picture

29 Jun 2008 - 9:43 am | आपला अभिजित

परीक्षण कर्‍अणार्‍या इथल्या अनेकांना त्याची पार्श्वभूमी माहिती नाही, असे जाणवले. `जीवन्या'ने, `जीवन्या'ची भूमिका करणार्‍या नटाने, असे उल्लेख काहींनी केले आहेत. तो गिरीश कुलकर्णी या चित्रपटाचा कथा-पटकथा लेखक आणि निर्माता आहे, हेही माहीत नसेल, तर बोलण्यात काही अर्थ नाही.

`हल्ली मी मराठी सिनेमाच पाहत नाही,` असं म्हटलं, की प्रत्येक जण मराठी सिनेमांना बोल लावायला मोकळा होतो. गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे.

तुम्ही अप्रतिम रहस्य आणि मनोवैज्ञानिक गूढ असलेला `कदाचित` पाहिलाय? श्वास, तुझ्या-माझ्यात, टिंग्या, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, एक उनाड दिवस, सरीवर सरी, तू तिथं मी, सरकारनामा, बिनधास्त, क्षण असे उत्तमोत्तम चित्रपट पाहिलेत?
काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते.

`वळू' हा काही शतकातील सर्वोत्तम चित्रपट आहे, असं मी म्हणत नाही. पण तो उत्तम आणि वेगळा आहे. वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे, आणि तो साध्य झालाय.

चित्रपट ज्याभोवती घडतो, तो वळू अगदीच गरीब वाटतो, असं मलाही वाटलं. पण हा अगदी लो बजेट चित्रपट होता. नावाजलेल्या कलाकाराना घेण्याचं काही प्रयोजन नव्हतं, पण ती प्रसिद्धीसाठीची व्यवस्था असावी. दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं.

हा चित्रपट तयार झाल्यानंतर `मुक्ता आर्टस' त्याच्याशी जोडली गेली, हे विसरता कामा नये.

जेवढी प्रसिद्धी झाली, तेवढा वळू ग्रेट नाही, हे कबूल. (या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही. निदान मराठी चित्रपट नियमितपणे न बघणार्‍यांना तरी तो अधिकार नक्कीच नाही!

भाग्यश्री's picture

29 Jun 2008 - 10:24 am | भाग्यश्री

मी तुम्ही उल्लेखलेले जवळपास सगळे पिक्चर्स पाहीलेत.. आणि बरेचसे आवडले आहेत. निदान करमणूक या क्रायटेरीयामधे ते पास झालेत.. मला वळू पाहून करमणूक नाही झाली म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येकाची आवड.. ! तुम्हाला जर मला आवडणारा पिक्चर, आवडला नाही तर उद्या मी हे नाही म्हणणार की तुम्हाला असं म्हणायचा अधिकार नाही.. पिक्चर पाहणार्‍या प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे,आणि दुसर्‍याच्या मताचा आदर करावा हे समजते..
बाकी,वळू हे प्रतीक वापरून गावचं उत्तम चित्र उभारणं, हा मूळ उद्देश आहे
ते वळू प्रतिक बितिक बर्‍याच लोकांना झेपलं नाही, हे अपयश नाही का वाटत? मला तरी वाटले..म्हणून हा खटाटोप..

जाता जाता, जिवन्याच काम करणारा तो गिरीष कुलकर्णी आहे,त्याने काय काम केलय, हे माहीत आहे, पण जर ते माहीत असल्याने काय फरक पडतो?? आणि ते माहीत नसेल तर बोलायचा अधिकार नाही?!! काहीही हा!
लोकं त्यांना वाटतय ते बोलतात,बर्‍यापैकी मुद्दे मांडून बोलतात, तर ते त्यांच मत, असं समजून तुम्ही फक्त चांगल्या बाजू मांडा की राव.. उगीच नावं ठेवणार्‍या लोकांना का नावं ठेवताय??

राजस's picture

29 Jun 2008 - 10:25 am | राजस

अभिजीत आपल्या मताचा मी आदर करतो. एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल मत मांडणे किंवा त्याचे समीक्षण करणे म्हणजे त्या चित्रपटाला बोल लावणे नव्हे. 'वळु' या चित्रपटाचा एवढा गवगवा होतो आहे तर तो खरोखरच चांगला आहे की नाही या बद्दल मत मांडणे यात काय चुक आहे ? कि बाकीचे (पेपरमधे व इतर ठिकाणी ) चांगले म्हणत असतील म्हणुन आपणही 'चांगला आहे' असे आंधळेपणाने म्हणायचे. माफ करा अभिजीत साहेब पण हे नाही जमत आपल्याला.

गदिमा-बाबूजी-राजा परांजपे यांच्या आठवणींत विव्हळ होणेही खूप सोपे आहे.
होणारच हो. ते चित्रपट आठ्वुन तर बघा.

काही त्रुटी वगळता सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव आदी चित्रपटही आधुनिकता आणि तंत्राच्या बाबतीत उत्तम होते.

तंत्राच्या बाबतीत वळु सुद्धा चांगला आहे असे माझे मत मी मांडले आहे. तुम्ही बहुतेक लेख नीट वाचलेला दिसत नाही.

दिलीप प्रभावळकरांचा विनोद थोडा पातळी सोडून आहे, हे खरं.
थोडा ? तो बराच पातळी सोडुन व खालच्या दर्जाचा आहे असे माझे मत आहे.

(या न्यायाने साडे-माडे तीन आणि दे धक्का तर प्रसिद्धीच्या मानाने शतपटीने वाईट होते.) पण तरीही वळू `वाईट' कुठल्याही प्रकारे म्हणता येत नाही.
याच न्यायाने वळु ला चांगले म्हणता येणार नाही.

अभिजीत साहेब जर मराठी चित्रपटाचा दर्जा चांगला व्हावा असे वाटत असेल तर आपण एवढ्या तेवढ्या वर खुष होउन चालणार नाही हो. एकदा लो बजेट चित्रपट आहे म्हटले तर कसाही चित्रपट काढण्याचे लायसन्स मिळाले असे नाही.

बाकी जिवन्या या कलाकाराबद्द्ल. त्याने केलेल्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केले आहे. याचा अर्थ त्याच्या बाकीच्या भुमिका काय आहेत हे माहीत नाही असा होत नाही. असो.

आपला
- राजस

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jun 2008 - 10:35 am | llपुण्याचे पेशवेll

शेवटि ज्याची त्याची आवड म्हणायची आणि सोडून द्यायचे असेल तर वळू टु़कार म्हणून सोडून देता येईल. पण एकूनच वळूच्या अनुषंगाने उभे केलेले गाव आणि त्यातील भानगडी मात्र पटल्या. जसे डॉक्युमेंट्री जर सरकार दरबारी दाखवली गेली तर आपल्याला फायदा होईल म्हणून बर्‍याच लोकानी वैयक्तिक मागण्या बोलून दाखवणे. वळू खरेच मारतो का नाही हे न बघता तो केवळ मारकुटा आहे असा प्रचार करणे आणि इतर कोणतीही गोष्ट वळूच्या नावावर खपवणे. अशा गावातल्या इतर भानगडी उत्कृष्टपणे दाखवल्या आहेत.
वळू मला तर फार आवडला बुवा.
पुण्याचे पेशवे

वेताळ's picture

29 Jun 2008 - 10:35 am | वेताळ

माझ्या मित्रानी हा सिनेमा पाहिला अन मला सांगितले होते अजिबात बघु नकोस इतका रद्दड सिनेमा आहे.आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत.माझे एक मत आहे भरत जाधव ला अजिबात टाईमिंग जमत नाही. मकरंद ला आता हेल पुरे असे सांगण्याची पाळी आली आहे.बाकी अभिनेत्रीच्या बाबतीत बोलणे न बरे.
हळद रूसली कु॑कु हसल॑ कि॑वा लेक चालली सासरलाच्या तुलनेत 'बरा' एव्हढाच शेरा!

हे मात्र दाढे साहेब मला पटले नाही.लेक चालली सासर ला हा महाराष्ट्रात वळु पेक्षा खुप चालला व त्याने निर्मात्याला पैसा मिळवुन दिला. यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो? वळु सिनेमा विनोदी म्हणुन बघायला जाता व न हसता परत येता त्या पेक्षा लेक चालली सासरला पिक्चर बघुन किमान मुली तरी रडतात. काहीहि असो आता आपली आवड निवड बदललेली आहे. आमिरखान ने वळु पाहिला म्हणुन वळु पाहणारे खुप आहेत.जसे मुक्ता आर्टचे नाव वळु बरोबर आहे म्हणुन पाहणारे आहेत तसे. मला वाटत नाही आमिर ला व सुभाष घई ना नीट मराठी येत असावे. असो आता आपले बच्चनसाहेब ही मराठी सिनेमा काढणार आहेत.आता त्याना का मराठीचा पुळका आला आहे हे सांगायची गरज नाही.

वेताळ

देवदत्त's picture

29 Jun 2008 - 12:51 pm | देवदत्त

काल ही चर्चा वाचली व योगायोगाने रात्रीच 'वळू' पाहण्याचा योग आला. पण पूर्ण पाहता आला नाही. अर्धाच पाहिला. त्यामुळे सिनेमा किती चांगला/वाईट ह्याबाबत ठोस मत देणे चुकीचे ठरेल. पण जेवढा पाहिला तेवढा सिनेमा हळू हळू चालणारा वाटला. तेवढी पकड घेऊ शकला नाही म्हणजेच पुढे काय होणार ह्याची उत्कंठा लागून राहिली नाही. तरी जमेल तेव्हा हा सिनेमा मी पूर्ण पाहीनच.

त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफीसरची नेमणुक विचीत्र वाटते.
सुरूवातीलाच फोनवर बोलणे झाल्यावर तो (ऑफिसर) आपल्या बायकोला सांगतोच की 'महत्वाची मिटींग सोडून मला तिकडे का पाठवत आहेत ते कळत नाही. काहीतरी कारण असेल.' ते कारण सिनेमात पुढे सांगितले आहे का? नसेल तर मग त्या वाक्यातच आपल्याला उत्तर मानावे लागेल :)

त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भुमिका बघितल्यानंतर त्यांना या भुमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे.
ते तर आहेच हो. एका सिनेमात लोकांना एखाद्याचे काम आवडले की त्यांच्याबद्दल अपेक्षा वाढतात किंवा त्याच प्रकारच्या भूमिकेच्या अपेक्षा आपल्या मनात असतात. तसे म्हणायला गेलो तर सरकार राज मधील दिलीप प्रभावळकरांची भूमिका मला एवढी खास नाही वाटली. त्यामागे हेच कारण असेल. म्हणूनच अतुल कुलकर्णीही एवढा खास नसेल वाटला.

राजाभाऊ-गदिमा-बाबूजी, या त्रयीने दिलेला सुवर्णकाळ आता पुन्हा येणे नाही!
सहमत.
चालतं हो तात्या. हे सर्व बाबतीत आहे.
चितळे मास्तर म्हणालेच की 'एव्हरीथींग हॅज चेंज्ड'. ;) (अहो, इथे 'ज्' कसा वेगळा ठेवावा? :( )

आजकाल मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत हे म्हटले जाते ते कशाबद्दल अजुन कळाले नाही.का सबसिडी मिळवण्यासाठी हे लोक इतके गचाळ पिक्चर काढत आहेत.
यशस्वी सिनेमा म्हणजे कोणता? ज्याला चार समिक्षकानी पाहुन वाहवा दिली तो का जो हजारो प्रेक्षकानी तिकिट काढुन थियटर मध्ये पाहिला तो?
वेताळराव, एकाच प्रतिसादात तुम्ही परस्परविरोधी विधाने लिहिलीत असे वाटते.
एक वळू आवडला नाही म्हणून तुम्ही सर्व चित्रपटांना नावे ठेवत आहात का? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे इतके वर्षे मराठी सिनेमाला नावे ठेवणार्‍या प्रेक्षकांनी जर आता हजारोंच्या घरात सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे पाहणे सुरू केले, त्यांना यश दिले, मग का नाही म्हणावे की मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत?
मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे. :)

अभिजीत ह्यांचे म्हणणे पटते. पार्श्वभूमी माहित असली की आपल्या सिनेमाबद्दलच्या अपेक्षा/ मते बदलतात. (सिनेमाच का, बहुतेक सर्व गोष्टींत हे लागू पडते)
आणि सध्या मी एकच करतो, नवीन सिनेमा पाहायला जाताना/घेताना मी जास्त अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे मग थोड्या हलक्या वातावरणात सिनेमाची मजा लुटता येते :D

गिरिजा's picture

29 Jun 2008 - 7:49 pm | गिरिजा

मला असं वाटत की, "वळू" बद्दल खूप प्रसिद्धी झाल्यामुळे तो बघितला आणि आवडला नाही, म्हणुन अशा प्रतिक्रिया येत असाव्यात. पण चित्रपट वाईट / चांगला हा आपल्यापुरता असतो. त्याला "जनरलाईज्ड वाईट / चांगला" म्हणु शकत नाही. खूप प्रसिद्धी झाल्यावर आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जातो आणि आपल्याला आवडणारं काही नसलं की "वाईट" म्हणुन टाकतो. "सरकार राज" बद्दल ही मि. पा. वर बरीच चर्चा झाली आहे.
प्रत्येकाची आवड, विचार करण्याची पद्धत, स्वभाव, एखाद्या गोष्टीमध्ये इंव्हॉल्व्ह होण्याची सवय या सगळ्या गोष्टी या बाबतीत महत्वाच्या आहेत. जसं की - काहींना कथानक अगदीच साधे आहे असे वाटले आणि म्हणुन "वळू" आवडला नाही, तर काहींना कथानक साधे असुनही सादरीकरण आवडल्याने "वळू" आवडला.
मी वयाने आणि अनुभवानेही लहान आहे, पण मला राजा परांजपेंचा "जगाच्या पाठिवर" आवडला नाही. हा फरक विचार करण्याची पद्धतीत आहे. त्या पिक्चरमध्ये इतरांना जे भावलं, ते मला जाणवलच नाही, पण म्हणुन मी तो वाईट म्हणणार नाही.
अशा गोष्टींवर मी चर्चा करतच नाही कधी पण अगदीच राहवलं नाही, "सरकार राज" च्या चर्चेत मी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक गोष्टीत काही ना काही चांगले असतेच, आणि नेहमी असा विचार करून बघावा, आपण तर एवढंसुद्धा करू शकत नाही.

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

अभिरत भिरभि-या's picture

30 Jun 2008 - 11:32 am | अभिरत भिरभि-या

मी तर मानतो की मराठी सिनेमा बदलला आहे. त्यांना प्रेक्षक पुन्हा मिळाला. ह्यामागे नट, लेखक, दिग्दर्शक, जाहीराती, सरकार आणि मराठी वाहिन्या सर्वांचाच हातभार आहे. मी ही १० वर्षांपासून जो वाद घालत आलो आहे की 'तुम्ही चांगले सिनेमे द्या, आम्ही पाहू', हे आता माझ्या समोर साध्य झालेले दिसत आहे

संपूर्ण सहमत ..
गाण्यांच्या बाबतीत थोडी मेहनत घ्यायला हवी असे वाटते .. जितक्या संख्येने सिनेमे येतायेत तितकी चांगली गाणी मला ऐकायला मिळाली नाहीत.

सचीन जी's picture

30 Jun 2008 - 1:39 pm | सचीन जी

मी गेल्या कित्येक वर्षात - काय द्याचे बोला, देवराई आणि नवरा माझा नवसाचा हे दोन / तीनच मराठी सिनेमा पाहिले आणि क्षमस्व पण मला ते एकदम टुकार वाटले ( देवराई सुद्धा).
या पेक्षा सचिन आणि महेशचे काही जुने चित्रपट नक्किच फार बरे होते असं वाटतं.
दादा कोंडके, शांताराम बापु तर अप्रतिमच ! पण राजदत्त, जब्बार पण आवडले. मधे शरद पिळगावकरांचा अपराध बघण्याचा योग आला. काळाच्या पुढचा पण व्यावसायिक चित्रपट!
या दर्जाचे चित्रपट कधी येणार ?
मकरंद, भरत इ.इ. भरताड आणि मोनोटोनस मंडळीना आणि किती दिवस झेलायचं?

सचीन जी

भाग्यश्री's picture

30 Jun 2008 - 10:15 pm | भाग्यश्री

देवराई फार छान वाटला मला.. स्क्रिझोफेनिक लोकांबद्दल मला तरी तेव्हाच नीट कळाले,आधी फक्त नाव माहीत होते..आणि छान घेतलेत त्यांचे प्रॉब्लेम्स,त्याचं हळूहळू सुधारणे वगैरे.. तसा मला कायद्याच बोला पण आवडला(त्याचा ओरीजनल माय कझिन विनी, तर अप्रतीमच आहे!)असो.. पसंद अपनी अपनी!

बाकी मकरंद्,भरत जाधव मंडळींबद्द्ल सहमत! तेच तेच प्रकारचे जोक्स, तोच ऍक्सेंट वापरून केलेले ढीगानी मुव्हीजचा कंटाळा आलाय.. त्यामानाने सचिन्,महेशचे (जुनेच) पिक्चर्स खरेच बरे होते हे अगदी पटलं! त्या आधीचे बाबुजी-गदीमा जोडीचे तर अजुनच सुंदर..

आपला अभिजित's picture

30 Jun 2008 - 10:56 pm | आपला अभिजित

`वळू'बद्दल मते व्यक्त केलीच आहेत.
काल "सनई चौघडे' पाहायला गेलो होतो. "अलका'मध्ये दुपारी दोनच्या "शो'ला पावणेदोनलाच बाल्कनी संपली होती! चक्क ब्लॅक सुरू होते. तरुणाईची ही.........गर्दी बघून मी तर बेशुद्धच पडायचा बाकी होतो. कधी काळी सचिन, महेश कोठारेंचे चित्रपट बघून वाटायचं, हे कधी मोठमोठ्या चित्रपटगृहांत बघायला मिळणार? मल्टिप्लेक्‍स संस्कृती आली, तेव्हा वाटलं, आपले मराठी चित्रपट इथे कधी पोचणार? पण ती वेळही आलेय.
बाकी, "सनई चौघडे'सारखा चित्रपट बघायला दुपारच्या वेळी "अलका'सारख्या हल्लीच्या काळात "मागासलेल्या' थिएटरमध्ये गर्दी होणं, यातच त्याचं यश आलं. चित्रपट चांगला आहे. निदान, तरुण पिढीला आवडेल, असा. न पटणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण त्यानं तरुण प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवलंय, हे मात्र खरं!
---------