भाग १- http://www.misalpav.com/node/22214
भाग २- http://www.misalpav.com/node/22227
भाग ३- http://www.misalpav.com/node/२२३२८
भाग ४- http://www.misalpav.com/node/२२६२१
( तीने प्रज्वलला आरती केली. केक कापला. सायलीने अगदी उत्साहाने सगळ्यांना केक वाटला अन इन्स्पेक्टर माने उठले.
"चला आता मात्र निघायला हवं. काय ? चला देवांग पुन्हा भेटुच. अन चला हो प्रज्वलचे बाबा. तुम्हाला शेवटची बस मिळेल कदाचित आत्त्ता निघालो तर. अन पुढच्या वेळी काही तरी घेउन या..मुल वाट पहातात. अन जरा दिवसा उजेडी येत जा ..म्हणजे मुलांबरोबर खेळता वगैरे येइल . काय?"
जडशीळ पावलांनी तो उठला. त्याच्या हातात अजुन तसाच केक होता. इन्स्पेक्टर मानेंच्या पाठोपाठ अगदी एक नजरही तिच्याकडे न टाकता तो बाहेर पडला अन निघुन गेला.)
त्याच ते तसं जाण नाही म्हंटल तरी तिला वेदना देऊन गेल. पण आता सगळाच नाईलाज झाला होता.
घरातले बाकीचे खर्च चालवायला तिला आणखी थोड्या पैश्याची गरज होती. ओळखीच्यांनी सुचवलेल्या दोन बी.एड. च्या मुलींना तिने घरात राहायला जागा दिली. बाहेरच्या खोलीत एक बेड घालून तिने कशीबशी त्यांची व्यवस्था केली.
त्या मुलींच्या रूपाने जणू पुन्हा एक नव जग तीच्यासमोर उघडल. त्यांचे कपडे, त्याचं बोलण, सारख ताई ताई करून तिच्या आगेमागे फिरणं. कॉलेजातल्या गप्पा. अन कायम खुदु खुदु हसण! तिचं सार नैराश्य जणू गायब झालं. त्या दोघींच्या आगमनान घराच सार रूपच जणू बदलून गेल. नव्या नव्हाळीच्या त्या दोन कन्यांनी तिच्या घरातलं हसण, खेळ पुन्हा परत आणले. कुठे ऐकलेले, कुठे खाल्लेले असे नवे पदार्थ बनवून पाहण्याच्या त्यांच्या हौसेने ताटात असेलेल दोनच पदार्थ रुचकर होऊ लागले. घरातल्या चारी मुलांबरोबर त्या दोघी अगदी सहज मिसळून गेल्या.
जसंजसा मनावरचा ताण कमी होता गेला तसतशी ती बदलत गेली. काळाची गरजच होती ती. घरातल्या वीज बिलापासून ते बाजार रहाटापर्यंत सारया जबाबदाऱ्या अन सारे निर्णय तिला एकटीला स्व-बळावर घ्यावे लागत होते हल्ली. घरफाळा, पाण्याची, विजेची बिल या साऱ्यांनी तिला जगात कस वागायचं याची धडे शिकवले. आपण कश्याला बोला? हा दृष्टीकोण जाऊन मीच बोललं नाही तर काम कस होणार? असा थोडा धाडसी स्वभाव बनू लागला.
अश्यातच मानस आजारी पडला. तापान फणफणलेल्या त्या बाळाला त्यातच उलट्या सुऊ झाल्या. संध्याकाळी देवांग जेंव्हा त्याला न्यायला आला तेंव्हा अक्षरश: कोमेजला होता मानस. तिने एकट्या मिनलला पाठवून बाळाला स्वत:जवळ ठेवून घेतलं. रात्रभर त्याच्या उलट्यांचे कपडे बदलून सकाळी थकलेल्या तिला पाहून मिनलला सोडायला आलेला देवांग कळवळलाच ! त्यातच बाजूचा तो कपड्यांचा ढीग बघून अवाक झाला.
' हे कपडे कोण धुणार?" त्यानं विचारलं.
"धुवेन मी'
'नको. किती दमलेल्या दिसता तुम्ही !माझ्याकडे काम करणारी बाई नाहीतरी फुकाचेच पैसे उपटतेय, थांबा! मी तिलाच धुवायला लावतो" तो म्हणाला.
त्यातच चारही मुलांना घेऊन ती जेंव्हा शाळेसाठी बाहेर निघाली तेंव्हा मात्र त्याला रहावल नाही. त्यान अगदी सहज मदतीचा हात पुढे केला.आपल्या मुलांना तिच्या घरी सोडुन निघताना, तो तिच्या मुलांना वाटेवरच असलेल्या शाळेत पोहोचवायला लागला. संध्याकाळी घरी जाताना तिच्या दारातुनच मुलांना घेउन जाणारा तो, ती पायावर घेउन धाकट्याला भरवते म्हंटल्यावर आत येउन बसु लागला.व्यवहार तर होताच पण त्यात भावनेचा ओलावा असलेल तिच वागण त्याला मोकळ करत गेल.
हो नाही करता करता, तो अन त्याची दोन्ही मुल, तिच्या आयुष्याचा कधी एक भाग होउन गेली तिला कळलच नाही. मुलांना आईच प्रेम नाही म्हणुन खंतावणार्या त्याला, तिच्या मुलांची बापाविणा धडपड दिसु लागली. स्वतःच्या संसारात जोडिदाराची उणीव साह्ताना, त्याला तिच एकटेपण जाणवु लागल. आतापावेतो तिच्या मुलांच ऐकुन त्याची मुलही तिला आई म्हणुनच बोलावु लागली होती. हळु हळु उभा राहणारा मानस लबाडपणे दारातुन तिच्या कडे झेपावत असे.
अश्यातच एकदोनदा 'तो' घरी येउन गेला. पूर्वी सारखा जरी नसला तरी थोडा बहुत मालकीहक्क अजून उरला होताच.
"काय घराचा नुसता पोरवडा करुन ठेवलाय." त्यान शेरा मारला.
इतक्या कामात आता तिला संतापाचा विसर पडला होता. त्या दोनचार दिवसातला तिचा वैताग नाही म्हंटल तरी देवांगला जाणवलाच. अन त्याच्या नजरेतली सहानुभुती न समजायला ती अबोध नव्हती. पण दर रोजी नव्या प्रश्नांना घेउन सामोर येणार आयुष्य त्यांना त्यांच्या भावनांसाठी वेळच नव्हत देत. दोन्ही मुलांच्या शाळेच्या रोजच्या नव्या नव्या खर्चांना तोंड देता देता ती रडकुंडीला येत होती. पैसे कमवायला आणि काय नविन उपाय काढायचा तिने? अन कामाच्या बोजाखाली दबलेला अन आपण मुल बघाव तेंव्हा तिच्याच कडे ठेवतोय या विचारान हैराण देवांग; बर्याचदा ऑफिसातल काम अर्धमुर्ध ठेउन परतत होता.
असाच एकदा; सकाळी सकाळी सर्वर डाउन झाल्यान, तेव्हढाच वेळ मुलांबरोबर काढावा म्हणुन तो तिच्या घरी आला. बाहेरच्याच खोलीत मानसला पायावर घेउन ती बळेबळेच भरवत होती. हल्ली त्याला पाय फुटल्या पासुन तो अजिबात एके ठिकाणी रहात नसे. तिची नुकतीच आंघोळ झाली असावी. तिचे ओले पाठभर केस त्यान पहिल्यांदाच पाहिले. वळुन त्याच्याकडे पहात ती आनंदान बोलली "अरे वा! आज पप्पांना सकाळी सकाळीच सुट्टी मिळाली वाटत?"
"होय. सर्वर डाउन आहे" बोलत बोलत तो शुज काढुन तसाच मानस जवळ बसला. त्याचे दोन्ही हात धरुन त्याला खेळवता खेळवता नकळत त्याची नजर तिच्या चेहर्याकडे वळली. आंघोळीन तिचा चेहरा अगदी टवटवीत दिसत होता. ओल्या केसातुन ओघळणार्या थेंबानी तिच्या पदराला जणु पाउसकळ्या वाहिल्या होत्या.
"प्रज्वल किती वाजता येणार?" त्यान विचारायच म्हणुन विचारल.
"अजुन अर्धा तास. " उत्तर देता देता बाळाच बाउल मधल खाणं सारख करत ती पुढ झुकली आणि पाठिवरचे केस समोर ओघळले. त्याच्या अगदी जवळ आलेला तिचा चेहरा...झरकन त्यान तिचे केस तिच्या पाठीवर टाकले. ती ताठ झाली, त्याचा गोंधळलेला चेहरा पाहिल्यावर त्याचा सहजपणा तिला कळला, पण तिच्या अंगावर उमटलेला शहारा तिला नवखा होता.
"सॉरी. माझ्या लक्षात नाही आल" तो शरमुन म्हणाला.
"हं." ती हुंकारली. पण दोघांचेही ठोके चुकले होते.
पुढचे सारे दिवस दोघेही न बोलता सगळ करत होते. रुटीन कुठेच थांबल नव्हत. थांबला होता तो 'तो' क्षण!
आपण रजनी शिवाय कुणाकडे अस बघु शकतो ? या प्रश्नावर तो; आणि अजुन माझ्यात ही भावना जागृत आहे? या प्रश्नावर ती.
शेवटी एक दिवस धाडस करुन तो म्हणाला, "तुम्ही रागावल्या? माझ चुकल हो!"
"नाही. " ती अगदी मनापासुन उत्तरली.
"मग? तुम्ही बोलत नाही माझ्याशी?" त्याच्या रडवेल्या चेहर्यात, तिला त्याचाच मानस दिसला. खुदकन हसत ती म्हणाली, "तुमच्यावर नाही रागावले. मी माझ्यावरच रागावलेय. ही भावना कुठे शिल्लक असेल अस वाटल नव्हत."
"नाही हो ! तुम्ही अजुन तरुण आहात"
"काय जाळायचय?" ती म्हणाली
तिच्याकडे पहातच तो माग वळला. तिच्या नजरेतला तो उद्वेग, ते दु:ख त्याला नव होत.
नाही तरी हल्ली कुणी ना कुणी त्याला नविन लग्नाबद्दल सुचवत होतच. 'अजुन तरुण आहात. देवाची मर्जी' इथपासुन 'हल्लीच आमची एक नातेवाइक इथे जॉइन झालीय. आपण भेटु एकत्र' इथपर्यंत
सहज पहुडल्या पहुडल्या त्यान स्वतःला विचारल 'आपण काय इच्छितो? कुणीतरी साथीदार हवा अस अजुनही वाटत्य पण मग मुलांच काय? जी कोण येइल तिला कितपत जमेल? तिच्या स्वतःच्या अपेक्षा? आणि आपली अपेक्षा? अर्थातच तीन माझ्या मुलांची आई व्हाव्...आई शब्दापाशी त्याच्या डोळ्यासमोर आली ती मानसला भरवणारी 'ती'. स्वतःच्या मुलांना कुरवाळणारी अन त्याच्याच सारखी दु:खान होरपळणारी.
अन मग देवांगन पुढाकार घेतला. त्याची आई दुसर्या गावी वडिलांच्या आजारपणान बांधली गेलेली. ती वेळ काढुन दोनदा तिच्या घरी येउन मुलांबरोबर राहुन गेली. तिसर्या वेळी तिच्यासाठी ओटीच सामान घेउन आली.
"माझ्या मुलाला तु आवडलीस. स्वतःपेक्षा त्याला मुलांची काळजी जास्त वाटते अन कुणाकडुन आई होण्याची अपेक्षा करताना मोबदल्यात तो स्वतःच पितृत्व देउ शकतो. तुम्ही दोघ एकाच बोटीत आहात, तर एकत्रच राहिलेल काय वाईट? माझा आशिर्वाद आहे तुम्हाला. " स्पष्ट शब्दात अन एका श्वासात त्याची आई बोलुन गेली.
या अनपेक्षित वळणान ती घाबरून गेली. स्वत:च सुख बघावं की मुलाचं? विचाराव म्हंटल तरी कुणाला विचाराव? मोहिते काकू तर दुरावल्या होत्या. तिला सब इनस्पेक्टर मानेंची आठवण आली. पण सगळ्यात पाहिलं गरजेच होत ते देवांगशी सरळ सरळ बोलण. अन आजकाल तेव्हढ बळ तिला आल होत. एक दिवस तिने विषय काढला.
" माझ्या मुलाचं काय? ती तुमच्या घरात उपरी होऊन राहिली तर या लग्नाचा काय उपयोग?"
"पण मी तुम्हाला तुमच्या मुलांसकट स्वीकारतो आहे न?" देवांग उत्तरला." अन तुम्हीही मला तश्याच स्वीकारता आहात. " एकूण त्याच्या लक्षात तिची घालमेल येत नव्हती. आपण काहीतरी जगावेगळ करतोय अन ते तडीस न्यायचच अश्या विचारानं तो पुरता भारलेला!
पण या उत्तरान तीच समाधान नव्हत होत. काही तरी डाचत होत. शेवटी ती परत एकदा पोलीस स्टेशनला गेली. तिला पाहून माने बाहेर आले. थोडक्यात अन उभ्या उभ्या बोलण्यासारखा असा हा विषय नव्हताच. या वेळी अगदी निर्भरपणे तिने त्यांना घरी बोलावलं.
सगळ्यात पहिल्यांदा मानेना झाला तो आनंद ! त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आश्चर्य मिश्रित आनंद पाहून आपण योग्य माणसाचा सल्ला घेतोय हे पटलं तिला. पण असं नुसत हुरळून जाऊन करायचं असत तर तिने केंव्हाच देवांगला होकार दिला असता.
"मला माझ्या मुलाचं भविष्य माझ्या सुखापायी पणाला नाही लावायचं! " तिने आपला मुद्दा मांडला. "इथे तर स्वत:ची मुलंसुद्धा सोडून गेला 'तो' स्व सुखासाठी. मग मी कुणा उपरयावर कशी भरवसा ठेवू? मान्य आहे त्यांनी पण दु:ख पाहिलंय. पण उद्या मन फिरलं? माझी मुल नकोशी झाली तर ? पुन्हा हे सगळ? आताशी कुठे सावरते आहे मी. "
माने तिच्याकडे पाहतच राहिले. आठदहा महिन्यापूर्वी अगदी बावरलेली अन झटक्यात डोळे भरणारी 'ती' आज बरीच खंबीर वाटली त्यांना. मग त्यांच्यातला व्यवहार जागा झाला. त्यांनी तिला पहिलं तिची स्वत:ची अशी जी काही मालमत्ता आहे त्याची मोजदाद करायला सांगितली. असं काय होत तिच्याकडे? एक रहात घर, अन चार अगदी मोजून चार दागिने.
"ठीक आहे. हे घर काही कमी मालमत्ता नाही पोरी! " माने म्हणाले. " हे बघ नीट देवांगशी बोलून घे. तुझ म्हणन खर आहे. आज त्याची अन तुझी गरज जरी एक असली तरी उद्या मन बदलू शकत . खर सांगायचं तर आज भावनेपेक्षा डोळसपणाची जास्त गरज आहे. अन तो डोळसपणा तू दाखवलास. बरीच शहाणी झालीस तू पोरी. अन अशीच रहा."
"मला स्वत:ची काही मिळकत नाही त्याच फार वाईट वाटत. मी स्वत: काही कमवू शकते तर बर असत. म्हणजे हे माझे पैसे मी माझा मुलांसाठी वापरू शकते असं ठाम सांगू शकले असते मी. नाही मला त्याच्या मुलांबद्दल प्रेम आहे. लळाहीं लागलाय त्यांचा मला. पण जो कमावतो तो हक्क गाजवू शकतो असा वाटत मला. शेवटी एकदा बोट पोळली आहेत माझी . आता सारच फुंकून पारखून घ्याव नाही का?"
मानेंनी तिला अन देवांगला एकत्र भेटायचं ठरवलं . त्यांच्या स्वत:च्या मुलीसाठी ते उणे पडले होते. त्याची भर निदान दुसरी त्या वयाची मुलगी एकटी पडली असताना तिला मदत करून; तिच्या पाठीशी उभ राहून करावी असं त्यांना वाटत होत.
तस बघायला गेल तर ती खरच भाग्यवान म्हंटली पाहिजे. असा, वय असताना दुसरा डाव मांडायला मिळण दुरापास्तच . अन तिला पडलेला स्वत:च्या मुलांचा भवितव्याचा प्रश्न अगदी योग्यच होता. शेवटी घर कायम असं मुलींना भाड्याने देऊन त्याच उत्पन्न हे फक्त तिच्या मुलाचं राहील. लग्नात तिच्या मालकीच्या गोष्टी या कायम तिच्या मुलांच्या हक्काच्या राहतील अशी तरतूद करून देवांगने हे सारे कागदपत्र वकिलांच्या सल्ल्याने तसे कायदेशीर करून घेतले.
ज्या दिवशी हे सारे कागदपत्र पूर्ण झाले त्याच्या दुसर्या दिवशी देवांग बरोबर जाउन तिने कोर्टात लग्नाची नोटीस दिली. तिन आठवड्यानंतर लग्नाची तारिख ठरली. या मधल्या काळात 'तो' येउ नये म्हणुन ती देवाला विनवीत राहिली. पण 'तो' आलाच. आणि सगळी माहिती काढुन आला. "काय धंदा उघडलास का काय? बाई आहेस गप्प बाई म्हणुन रहा. मला 'नाही' म्हणतेस अन त्याच्या बरोबर लागु होतेस? थांब तु कशी लग्न करतेस तेच पहातो" शारिरीक बळाशिवाय त्याच्याकडे काहीही नव्हत अन आता ती झुकणार नव्हती. तसाही तो काहीच करु शकणार नव्हता. जे घटस्फोटाचे पेपर त्याला दुसर लग्न करण्यासाठी हवे होते तेच आज तिच्या कामी आले होते. अन कायद्याची धमकी त्याच उरलसुरल बळ घेउन गेली.
'अरे! तु मला फसवते आहेस. मी आलो होतो ना परत? माझी मुल मी देणार नाही. माझ घर तु उद्धवस्त केलस." तो आकांडतांडव करत राहिला. तो काय बोलतोय याच त्याला भानच नव्हत उरल, उरला होता तो फक्त एक पुरुषी हेका.
दोन्ही मुल घेउन ती देवांगच्या घरी हक्कान जाउन राहिली. त्याच वर्तुळ पुर करताना तिच स्वतःच वर्तुळ पुर झाल होत.
(संपूर्ण )
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
8 Oct 2012 - 9:32 am | बिपिन कार्यकर्ते
कथा आवडली. मात्र भाग अंतराने आल्यामुळे जरा विस्कळित वाटलं. आणि शेवटही किम्चित घाईत झाल्यासारखा वाटला. पण शैली, गोष्ट रंगवण्याची पद्धत, लहान सहान तपशीलांकडे लक्ष वगैरे गोष्टी आवडल्या!
8 Oct 2012 - 9:51 am | प्रचेतस
बिकांशी सहमत.
कथा छानच पण अजून एखादा भाग चालला असता.
8 Oct 2012 - 3:02 pm | स्पंदना
नविन भाग टाकायला वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व्.पण बहुतेक सारा वेळ गणपती मग मुलांच्या सुट्ट्या यात गेला. आज पासुन शाळा सुरु झाल्या अन थोडी उसंत मिळाली.
आता तुम्ही दोघांनी अन फक्त ५० यांनी म्हंटल्या प्रमाणे लेख उरकल्या सारखा वाटतोय खरा पण एकदा एखाद चक्र फिरायला लागल आयुष्यात की असे झटपट निर्णय अन गोष्टी घडत जातात या तत्वाला धरुन लिखाण झालय. थोड्याफार तिच्या मना शरिराच्या भावना दाखविता आल्या असत्या पण मग ते थोडस कंटाळवाण झाल असत अस मला वाटत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
8 Oct 2012 - 9:37 am | श्रीरंग_जोशी
एक गंभीर व नाजूक विषय ज्या संवेदनशीलतेने आपण हाताळलाय त्याला तोड नाही.
सकारात्मक शेवट वाचून मनापासून समाधान वाटले.
8 Oct 2012 - 9:47 am | जाई.
+१
असेच म्हणते
8 Oct 2012 - 11:02 am | ५० फक्त
उत्तम लिहिलंय, धन्यवाद.
खरं सांगु, शेवट थोडा उरकल्यासारखा वाटला.
8 Oct 2012 - 11:27 am | अन्या दातार
अजून २ भाग तरी हवे होते.
8 Oct 2012 - 12:40 pm | यशोधरा
सकरात्मक शेवटाची कथा आवडली.
फुकटचा फाफटपसारा करुन उगाच वाढवली नाही, हे अजूनच आवडलं.
8 Oct 2012 - 6:14 pm | बहुगुणी
फुकटचा फाफटपसारा करुन उगाच वाढवली नाही, हे अजूनच आवडलं.
+१8 Oct 2012 - 6:36 pm | गणपा
असेच म्हणतो.
8 Oct 2012 - 7:34 pm | बॅटमॅन
तंतोतंत. आणि सकारात्मक (गोड) शेवट तर आवडतोच हेवेसांनल.
8 Oct 2012 - 1:35 pm | सस्नेह
हेही वळण अगदी सहज घेतलं गेलं आहे.
8 Oct 2012 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर
बिपिन कार्यकर्त्यांच्या शब्दाशब्दाशी सहमत. लहानसहान तपशिलांकडे बारकाईने लक्ष दिल्याने कथेची रंगत जेवढी वाढली तेवढीच, शेवट घाईघाईत उरकल्याच्या भावनेला ते कारणीभूत ठरले.
देवांगशी लग्न केल्याने व्यावहारीक समस्येतून 'सुटल्याची' भावना जेवढी प्रकर्षाने समोर आली तेवढी 'भावनिक आधाराची' भावना, नव्याने जन्म घेतल्याची भावना किंवा कोर्या केलेल्या पाटीवर नव्या आयुष्याची आकर्षक रंगात चित्रे रेखाटण्याची भावना ह्या सर्वांचा अभाव फार जाणवला.
तरीही, कथानक सकस आहे ह्यात वाद नाही. पुढील कथेसाठी शुभेच्छा..!
8 Oct 2012 - 4:42 pm | रेवती
कथा आवडली. शेवट चांगला आणि अपेक्षित असाच आहे.
8 Oct 2012 - 6:05 pm | मी_आहे_ना
अगदी असेच म्हणतो... शेवट आवडला.
8 Oct 2012 - 5:30 pm | अद्द्या
बरेच दिवस वाट बघितली..
आवडली मालिका :)
8 Oct 2012 - 6:24 pm | पैसा
सुरेख आणि एकदम लॉजिकल शेवट. याहून वेगळा काही शेवट योग्य ठरला नसता. कथा गुंडाळल्यासारखी नाही वाटली कारण आधीच्या भागांमधे पुरेसे क्लूज होते.
8 Oct 2012 - 11:31 pm | अर्धवटराव
बरं वाटलं वाचुन.
छान झाली कथा.
अर्धवटराव
9 Oct 2012 - 11:50 am | नगरीनिरंजन
कथा आवडली!
9 Oct 2012 - 11:55 am | श्रावण मोडक
तुकड्यातुकड्यात लिहिण्याचे काही परिणाम असतात. त्यापैकी एकदोन इथं दिसले. एक तर, वाचकाला सलगतेनं वाचण्याचा अनुभव मिळाला नाही, हा तसा किरकोळ परिणाम. पण खरा विपरित परिणाम म्हणजे कथेला आकृतीचं सौष्ठव राहिलं नाही. कथासूत्र चांगलं आहे, पण तिला आकृती लाभली नाही तर त्या सूत्राचा प्रभावच रहात नाही. तसंच इथं झालं.
याचाच अर्थ, अपर्णा, यावर (म्हणजेच कथेवर, आणि तुझ्यात असलेल्या कथन करण्याच्या गुणावर) काम केलं पाहिजे.
:-)
9 Oct 2012 - 2:05 pm | खुशि
छान जमून गेली आहे गोष्ट. सुन्दर लिखाण.
10 Oct 2012 - 1:29 pm | सविता००१
सुंदर कथा वाचायला मिळाली. सकारात्मक शेवट आवडला.
10 Oct 2012 - 4:42 pm | स्मिता.
आधीपासून कथा वाचतेय. शेवट अपेक्षीत असला तरी कथा छान फुलवली आहे.
10 Oct 2012 - 7:10 pm | Pearl
या भागात ( संपूर्ण ) ही पाटी वाचली.
आता कथा वाचायला हरकत नाही :-)
( प्रत्येक भाग स्क्रोल करून मी खाली 'क्रमशः' आहे का 'समाप्त' पहायचे. आता पूर्ण कथा वाचून प्रतिक्रिया देईन.)
11 Oct 2012 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. कथा आवडली. शेवटचा भाग उशिरा आल्याने मालिकेत खंड आला तेवढाच. शेवट उरकल्यासारखा वाटतो, पण तसं केलं नसतं तर कदाचित शेवट कंटाळवाणाही झाला असता. त्यामुळे कथा योग्य ठिकाणी संपली आहे, कथनाची शैली छानच. अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
11 Oct 2012 - 2:37 pm | सानिकास्वप्निल
छान झाला हा ही भाग
शेवट अपेक्षित असा सकारत्मक झाला :)
11 Oct 2012 - 7:39 pm | गणेशा
लिखान मस्तच ... मना मनाचे असंख्य कंगोरे घेवुन आलेली ही तुमची कथा... पहिले सगळे भाग म्हणजे गर्दीतील माणसाचे स्वतंत्र उभे असणारे अस्तित्व दाखवत होते.
हा भाग कथेच्या द्रूष्टीने खुप सुंदर झाला असला तरी मनामनातील भावना खुपच भराभर आल्याने त्यांच्यात कृत्रीमता आली आहे असे वाटले... थोडे भाग अजुन हवे होते... दूसरे लग्न करताना होणारी घालमेल... त्याच्या भावना .. समाज ह्या सर्वांच चित्र जास्त परिनामकारक पाहिजे होते..
बाकी कथा उत्तमच.. नविन लिखान येवुद्या वेळ मिळेल तसे
17 Mar 2016 - 7:20 pm | मराठी कथालेखक
कथा छान आहे
19 Mar 2016 - 2:06 am | रुपी
सगळे भाग आत्ताच वाचले.
विषयाची हाताळणी छान केली आहे, लेखनशैलीही मस्तच आहे!