घुसमट-४

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
31 Aug 2012 - 10:43 am

भाग १- http://www.misalpav.com/node/22214
भाग २- http://www.misalpav.com/node/22227
भाग ३- http://www.misalpav.com/node/22328

"तर मी जे सांगतो ते ऐका. एकदा जे घडल ते घडल. त्याची पुन्हा पुन्हा चर्चा नको. पण इथुन पुढे कधीही शारिरीक मारहाण टाळा. तुमच्याच फायद्याच आहे ते. अन दुसरं अन महत्वाच तुम्ही जरी तक्रार नसली नोंदवली तरी मी थोडाफार हस्तक्षेप करु शकतो. कधी यायचे आहेत ते परत? यावेळी जरा पँट भरवुन पाठवु त्यांची."
त्याच्या त्या राकट बोलण्यान ती एकदम बावरली. तीचा तो चेहरा पाहुन त्यान स्वतःला आवरल. थोडस चुचकारत म्हणाला," काही नाही हो! नुसता येउन बोलुन जाईन थोडसं. बघु काही फरक पडतो का?"
पंधरा दिवसावर प्रज्वलचा वाढदिवस होता. त्यावेळी तो येण शक्य होतं.
"ठिक आहे. साधारण किती वा़जता उगवतात?'
आजवर तो कायम संध्याकाळ धरुनच घरात आला होता. मग साधारण त्या वेळेसच यायच ठरवुन सब्-इन्स्पेक्टर माने. निघुन गेले.

पुढे..

दारात जाई गर्भतेजानं जणु चमकत होती. तिच्या माहेरची वेल ही. प्रज्वल पोटात असताना दोन वर्षाच्या सायलीला घेउन तिने ही छोटीशी काडी आणुन दारात लावली होती. आज चार वर्षांत तिचा बराच मोठा वेल दारावरच्या कमानीवर पसरला होता. संध्याकाळी अंगण साफ करताना तिच्या पानापानाआड लपलेल्या टप्पोर कळ्या तिला खुणवुन गेल्या. छोट्याश्या कुडीत घमघमाट घेउन त्या जणु मिश्किल हसत होत्या. सडा टाकुन झाल्यावर तिने आतुन परडी अन एक स्टुल आणल. एक एक कळी हळुवार हातान खुडताना; तिची ती वेल तिच्या अंगाखांद्याला स्पर्शुन तिला वेडावुन टाकत होती.

रात्री सारी काम आटोपल्यावर तिने मोठ्या आवडीने त्यांचे चार गजरे विणले. दोन लहान, सायली अन मिनलसाठी अन दोन मोठ्ठे मोहितेकाकु अन तिच्यासाठी.
दुसर्‍या दिवशी सकाळी मुलांना शाळेला सोडायला जाताना तीने स्वतःला अन सायलीला गजरा माळला. त्या पांढर्‍या शुभ्र मोहक फुलांचा तिला फार सोस होता. मोहिते काकुंचा गजरा घेउन ती मोठ्या आनंदान त्यांच्या घरात शिरली. काकु बाहेरच काहीतरी निवडत बसल्या होत्या. नेहमीच्याच आत्मियतेनं तिने गजरा त्यांच्यापुढे धरला. पण का़कु मात्र तिच्याकडे पहात होत्या. चेहर्‍यावर नाराजी. गजर्‍याकडे पुरं दुर्लक्ष्य करीत त्या म्हणाल्या
"कशाला हवा हा थाटमाट? कुठ मिरवायची आहेस गजरा घालुन?"
तिला काहीच उमजेना. "काकु? गजरा घालुन का कुठ मिरवतात?
" तर मग घातलाहेस कश्याला? आधीच झाल थोड अन्...म्हणतात ना?"
तिला काहीच कळेना. काकु तश्याच फणकार्‍यानं उठल्या, आत जायला वळलेल्या एक क्षणभर थांबल्या अन म्हणाल्या,
"आता सोडा हे सारं. अन ते पदराला अन ओढणीला पिना लावायच्याही थांबवा. कस सुचत बाई एकेकाला देवजाणे? उगा जवळच्यांना त्रास!"
काकु आत निघुन गेल्या. आत मध्ये काका काहीतरी बोलल्याचा आवाज अन त्यावर काकुंचा " तुम्ही नका पडु यात" असा जवाब तिने ऐकला. त्या शब्दांचा तिला उमग नाही पडला पण ती नजर तिला आतवर कुठतरी कापत गेली. एक खोलवर चरा पडावा अन तो पडताना त्याचा आवाज ऐकू यावा तस झाल तिला. तश्याच पडलेल्या चेहर्‍यान अन दोन्ही बावरलेल्या मुलांच्या चेहर्‍याकडे न पहाता ती शाळेकडे चालु लागली. मुलांना शाळेत पोहोचवुन घरी पोहोचेतो देवांग दारात उभा होता. त्याच्या कडुन दोन्ही मुलं घेउन ती घरात शिरली. जिव्हारी काहीतरी ठसठसत होत, पण त्या ठसठसण्याकडं लक्ष द्यायला तिच्याकडे वेळ नव्हता. लहानग्या मानसच भरवनं जोजवणं, त्यातच मिनलच पुस्तक काढुन दे, कपडे बदलुन दे. दुपारचा स्वैपाक. सारं आवरेतो मुल घरी यायची वेळ झाली. मानसला अन मिनलला घेउन ती पुन्हा शाळेकडे गेली. चौघा मुलांना घरी येउन खाऊपिऊ घातल अन तिच काम जरा थंडावल. बाहेर उन्हं चांगली तापली होती. बघता बघता पश्चिमेकडे ढग उठले. वारा पडला. थकलेली मुलं दुपारच्या त्या उष्म्यान पेंगुळली अन झोपुन गेली. ती बाहेरच्या खोलीत येउन बसली. अलगद गजरा काढुन हातात घेतला. सकाळच्या धावपळीत गाडली गेलेली ती भावना आता दुप्पट आवेगान उसळली. काय ? काय म्हणत होत्या काकु? तिने गजरा घालायचा नाही? का? आजच एकदम तिच्या कपड्यांवर असे ताशेरे का ओढले त्यांनी? तिच्या पाठभर केसांच किती कौतुक करायच्या त्या? अन आज असं काय घडल की त्याच केसांचा त्यांना असा तिटकारा यावा?
अन एकदम तिला उमगल्ं....नवरा...तो नाही उरला म्हणुन. म्हणजे थोडक्यात तिने विधवेच जीणं जगायच होत तर?
बाहेर कडाडुन विज चमकली बघता बघता वारा बेभानला. दारची जाई त्या बेभान वार्‍याने पुरी घुसळुन निघाली. अजुन न भरलेल्या कळ्यांचा तिच्याच पायाशी सडा पडला. त्या वादळाने वेडवाकड झुलणार्‍या जाईकडे पाहुन तीला हुंदका फुटला. त्या तडतडणार्‍या पावसासोबत तिचे डोळेही वाहु लागले. किती सोस होता तिला या फुलांचा! लहाणपणापासुन कायम गजर्‍याचा हट्ट असायचा तिचा. त्या वासान एक वेगळीच धुंदी जाणवायची तिला. जणु एक बोटभर वर तरंगत असायची ती. थोडी मोठी झाल्यावर, वयात आल्यावर एकप्रकारचा मद चढायचा त्या फुलांचा. कुठतरी दुर स्वप्नांच्या गाजेवर स्वार असाव अन अलगद त्या फुलांसारखच आपणही उमलाव अश्या भावना जागायच्या. अन आज त्या भावनांवरच काकुंच्या नजरेन ओरखाडे काढले होते. नुसत्या गजरा माळण्यावरच नव्हे तर तिच्या कपड्यांवरही त्यांनी ताशेरे ओढले होते.
दाराशी चाहुल जाणवली अन तिने नजर उचलुन दाराकडे पाहिल. त्या भरल्या डोळ्यातुन तिला दिसेचना.
"काय झाल?' आवाज देवांगचा होता. गडबडीने तिने डोळे पुसले. उठुन उभी राहीली. पण तोंडातुन शब्द फुटेना. छत्री मिटवुन ठेवत देवांग आत आला. तिने डोळे पुसले. हातातला गजरा पुन्हा नजरेसमोर आला.
"थोड बोलाल? पाणी हवयं?" त्याच्या त्या शब्दांनी तिला पुन्हा गहिवरुन आल.
"गजरा घातला म्हणुन काकु....माझ्या दारच्या वेलीचा ...मी नाही घालायचा"
तिच्या त्या अस्फुट शब्दांनी देवांग गप्प बसुन राहिला. ती आत गेली . चेहरा पुसुन परत बाहेर आली. कुणा परक्या समोर आपण अस वागायला नको होत याची बोच तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती.
"मुल झोपली आहेत. तुम्ही लवकर आला?"
"वळीवाची लक्षंण दिसली. म्हंटल घाबरतील मुल म्हणुन आलो."
......
"एक सांगु? माणस कावळ्यासारखी असतात. आज तुम्ही गजरा घातला म्हणुन त्यांना टोचा माराव्याश्या वाटतील. उद्या तुम्ही श्वासही घेउ नये असही ते म्हणतील. म्हणुन आपण जगण थांबवायच का? रजनी....गेली तेंव्हा मला सुद्धा असच ...भांडण झाली होती का? तिचं बाहेर काही लफड होत का? अगदी.....कितीचा इंश्युरन्स आहे? इथपर्यंत मजल गेली लोकांची. अहो एव्हढी लहाण मुल माझी ...त्या इंश्युरन्सच्या पैश्यान का ती उब मिळणार आहे त्यांना?माझा एव्हढासा मानस....त्याला आठवायची सुद्धा नाही त्याची आई. तोच काय पण मिनल सुद्धा विसरेल तिला. उगा फोटोकडे पहात बसते."
तिला हे नविन होत. इतका शिकलासवरलेला देवांगसुद्धा समाजाच्या नजरेत गुन्हेगार होता? कुणीही उठुन त्याला अस दुखवु शकत होत?
"मी जरा जाउन येतो. मुलपण झोपलेत अन तुम्हीसुद्धा ठिक नाही दिसत आहात. मुल उठेपर्यंत पडा जराश्या. बर वाटेल." तो अगदी उठलाच. तसाच बाहेर निघुन सुद्धा गेला. त्याला थांबवाव, बस म्हणाव अस काहीही तिला सुचल नाही. तो गेला अन घर पुन्हा शांत झाल.
त्या शांततेत एक तिच मनच फक्त थार्‍यावर नव्हत. पुर्वी अस नव्हत. अतिशय शांत स्वभावाची म्हणुनच तिला नावाजल जायच. पण आजकाल त्या शांतपणाचा अर्थ पडतं घेणारी असा होउन राह्यला होता. शांत स्वभावाची म्हणजे काय?
आईवडीलांच्या आज्ञेत रहाणारी. का रहायची ती त्यांच्या आज्ञेत? स्वतःचा असा काही विचार मांडायची मुभा तिने कधी घेतलीच नाही. तिच्या नात्यातली एक समवयीन मुलगी अगदी अगोचर म्हणुन उल्लेखली जायची. "सटाक फटाक बोलते. काय सासरी नांदणार आहे देव जाणे . आईवडीलांना घोरच" अस काहीबाही बोलल जायचं. त्या दोघी समवयस्क म्हणुन त्यांची तुलनाही व्हायची अन अनुकुल मतांच झुकत माप कायम हिच्या पदरी असायच. त्या मतांनीच तर जडणघडण केली तीची.
"आपण इतक शिकलो" तिच्या मनात विचार आला. शिकलो? नक्की काय शिकलो? शालेय पुस्तक वाचुन जश्शीच्या तश्शी आखिव रेखिव उत्तर ! आणि काय शिकलो आपण? अगदी बी.ए. होइतो प्रत्येक प्रश्नाच उत्तर कुठेना कुठे लिहलेलं असायच. फक्त ती उत्तर शोधुन काढुन एखाद्या तुकड्या तुकड्यांच्या कोड्याप्रमाणे जिथल्या तिथे बसवणे. त्याच्या पलिकडे शिक्षणाकडं आपण काही वेगळ्या नजरेन पाहिल का?
हातातल्या गजर्‍याकडे तीने विषण्णपणे पाहिल. मोहिते काकु जे काही बोलल्या त्याचा रोख तिला स्पष्ट जाणवला होता. बाजुला झोपलेला मानस कुशीवर वळला अन झोपाळु डोळ्यांनी त्यानं तिच्याकडे पाहिल. एका हातान त्याला हळुवार थोपटत ती उठली. मानसची बाटली भरुन घेउन येउन त्याला दिली. लागोपाठ सायली अन मिनल उठल्या त्यांना दुध अन बिस्किटं देइतो देवांग परत आला. बाहेर त्याची गाडी आल्याचा आवाज ऐकल्यावर का कुणास ठाउक पण तीने चहाच आधण चढवल. त्याला चहा देउन ती स्वतःचा चहा घेउन बाहेर आली तर दारात मोहिते काकु!
"नाही, म्हंटल परत का आली गाडी मानसच्या बाबांची? काय झाल ?" त्या तिच्याकडे पहात बोलल्या.
हॉलमध्येच पडलेल्या गजर्‍यावर दोघींचीही नजर एकदमच गेली. इतकी वर्ष रुजलेल काही अस अचानक मुळासकट उपटल गेल होत. मोहिते काकु उगाचच इकडचतिकडच काही बोलुन निघुन गेल्या. त्यांना थांबा म्हणावस, देवांग परत का आला याचा खुलासा करण्याच, वा साधा चहा घेता का? अस विचारावस यातल काहीही तिला वाटल नाही, अन तीने केल नाही.
पंधरा दिवस म्हणता म्हणता प्रज्वलचा वाढदिवस आला सुद्धा. तीने घरातच केक केला. हल्ली शाळेत ऐकुन, बघुन मुलांना वाढदिवसाचं फार अप्रुप वाटायच. तीच्याकडे ना तेव्हढा उत्साह होता ना तेव्हढा पैसा. मुलांच्या उत्साहाला हळुवार शब्दांनी आटोक्यात आणता आणता तीची अगदी दमछाक झाली. संध्याकाळ झाली. देवांग दोन्ही मुलं घेउन गेला अन तीने देवासमोर दिवा लावला. प्रज्वलला जे होते तेच नविन कपडे घातले. त्याच्या खट्टु चेहर्‍याकडे पहाताना तिला हृदयाला मुंग्या डसल्यासारख्या वाटत होत. अगदी आजच एका शेजार्‍यांकडुन गावात नवीनच उघडलेल्या बी.एड कॉलेजाच्या दोन मुली रहायला घेता का अस विचारल गेल होत. आपल्याला रहायला, झोपायला अस कुणी घरात चालेल का या प्रश्नाच उत्तर प्रज्वलच्या खट्टु चेहर्‍यानं सोडवल.
ती अशी विचारात गुरफटलेली असतानाच दारात 'तो' आला.आजच त्याच येण हे जरा खुनशी जाणवल तिला. मागच्या वेळच्या प्रसंगाचा ताण दोघांवरही होता. क्षणार्धात तो ताण पूर्‍या घरावर पसरला. मुल जराशी घाबरल्यासारखी होउन तिला बिलगली. त्यांची ती अवस्था बघुन ती अक्षरशः कळवळली. आता पुढे काय?
अन अचानक दारातून "काय बेत आज वाढदिवसाचा?" अशी खणखणीत विचारणा झाली.
तिने दारात सब-इन्स्पेक्टर माने पाहिले अन 'निदान आज वाढदिवसादिवशी तरी नको हे सारं....' एव्हढा एकच विचार तिच्या मनात घुमला. तसा 'तो'ही दचकला होता. कारण स्पष्ट होत. इन्स्पेक्टर माने फुल्ल खाकी वर्दीत आले होते.
तिला तशी गडबडलेली बघुन मग सब-इन्स्पेक्टर माने स्वतःच बोलु लागले.
"कुठाय उत्सवमुर्ती? बघु? अरे व्वा! छान आहेत कपडे. नवे का?" त्यांनी अगदी नको तो प्रश्न विचारला अन आधीच खट्टु असलेला प्रज्वल आणखीच हिरमुसला.
"नाही. आई म्हणते पुढच्या वाढदिवसाला घ्यायचे अन मग मोठ्ठं विमानपण घेणार आहे पुढच्या वाढदिवसाला. पण मला आज हवेत ना?"
" अस? अरे व्वा ! आई सांगते म्हणजे खरच असणार ते नाही का? अन हे कोण?"
"हे माझे पप्पा. पण त्यांनी आईला ......."
"अरे व्वा! पप्पा आले का वाढदिवसाला? काय गंमत आणली मग पप्पांनी तुझ्यासाठी? काय दिलं ?" प्रज्वलला अगदी योग्य ठिकाणी तोडत सब-इन्स्पेक्टर माने बोलत राहिले.
आता प्रज्वलन 'त्या'च्याकडे पाहिलं. 'तो' जरासा गडबडला.पुरता गोंधळला.
"नाही , मी जरा गडबडीत आलो. वेळ झाला आधीच निघायला, त्यामुळे ....आपण ?" आता त्याला थोडा धीर आला.
पण त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करीत सब-इन्स्पेक्टर माने तिच्याशी बोलु लागले.
"मग काय देवळात वगैरे जाउन आला की नाही वाढदिवसाप्रित्यर्थ? अरे! बरं असत. हे बघा तुम्ही दोन्ही मुलांना घेउन अर्धा-एकतास देवळात जाउन या . आम्ही थांबतो तोंवर इथेच. देव नाही विसरायचा. तो महत्वाचा . होय ना?"
माने काय बोलताहेत हे उमजायला तिला थोडा वेळ लागला पण मग मात्र तीला अक्षरशः सुटल्या सारख वाटल. जे काही व्हायच ते दृष्टीआड घडलेलच बरं. तीने झटकन सायलीला तयार केलं अन जवळच्याच गणपती मंदिराकडे ती निघाली.
मन तर थार्‍यावर असण शक्यच नव्हत. पण हे सार कुठेतरी थांबायला हव होत. मंदिरात जाउन दर्शन घेउन ती तिथेच कट्ट्यावर विसावली. कधी नव्हे ते घड्याळाचा काटा अतिशय हळु सरकताना जाणवला तीला. बाजुला सायली अन प्रज्वल दोघेही तीला अनेक प्रश्न विचारुन इकडे तिकडे लक्ष वेधुन नुसते भंडावुन सोडत होते. मुलांना घेउन अशी ती पहिल्यांदाच बाहेर आली होती. जवळच एक फुगेवाला होता. मग प्रज्वलला त्याच्या वाढदिवसासाठी म्हणुन तीने चार-पाच रंगीबिरंगी फुगेच घेउन दिले. तेव्हढ्यानही किती खुष झाला तो बालजीव! एकदाचा अर्धातास सरला, अन ती घरी निघाली.
बाहेरच्या खोलीत 'तो' ती जाताना जिथे बसला होता तिथेच बसला होता. ती आत आली तर नजर वर करुन तिच्याकडे बघायची हिम्मत त्याच्यात नव्हती उरली. तीने इन्स्पेक्टर मानेंकड पाहिल. ते अगदी सहज भाव चेहर्‍यावर घेउन बसले होते. त्यांनी खिशातुन एक मोठ्ठ कॅडबरीच चॉकलेट काढल अन प्रज्वलला दिल.
"चला निघतो मी." ते म्हणाले.
"पण अजुन केक कुठे कापला?" प्रज्वलने विचारल.
"अरे व्वा! मज्जा आहे बुवा . फुगे काय? केक काय? पण मला गडबड आहे रे."
" मी एव्हढ्यात आरती करते. केक खाउन जा" आता तिनेही आग्रह केला. 'तो' अगदी दगडा सारखा बसुन होता. स्तंभीत!
ती आरतीच ताट तयार करत असतानाच दारातुन छोटी मिनल दुडुदूडु धावत आत शिरली. तिच्या चेहर्‍यावर उत्साह असा ओसंडुन वाहत होता. आश्चर्यचकित होत ती बाहेर आली तर मानसला घेउन हसर्‍या चेहर्‍याने देवांग आत आला. तीचा एव्हढुसा हॉल बघता बघता जणु भरुन गेला.
"मिनल एकसारखी, 'दादाचा वाढदिवस 'म्हणु लागली . मग म्हंटल चला जाउन येउ. तुम्ही बोलला नाही ते?" त्याने एका दमात बोलुनं अन विचारुनही टाकल.
"काही विषेश नाही हो केल मी" ती ओशाळत म्हणाली.
"अहो मुलांची हौस असते. अगदी एव्हढुश्यानही खुश होतात हो! काऽही विशेष लागत नाही त्याला" देवांग म्हणाला.
"बरोब्बर!" इनस्पेक्टर मानेंनी भर घातली. त्यांनी स्वतः होउन पुढे होत देवांगशी हास्तांदोलन केलं . ओळख करुन घेतली. तिला पहाताच छोटा मानस कधीच तिच्याकडे झेपावला होता, एका हाताने त्याला उचलुन घेउन तीने आरतीचा पाट मांडला. मानसला परत देउन तीने प्रज्वलला आरती केली. केक कापला. सायलीने अगदी उत्साहाने सगळ्यांना केक वाटला अन इन्स्पेक्टर माने उठले.
"चला आता मात्र निघायला हवं. काय ? चला देवांग पुन्हा भेटुच. अन चला हो प्रज्वलचे बाबा. तुम्हाला शेवटची बस मिळेल कदाचित आत्त्ता निघालो तर. अन पुढच्या वेळी काही तरी घेउन या..मुल वाट पहातात. अन जरा दिवसा उजेडी येत जा ..म्हणजे मुलांबरोबर खेळता वगैरे येइल . काय?"
जडशीळ पावलांनी तो उठला. त्याच्या हातात अजुन तसाच केक होता. इन्स्पेक्टर मानेंच्या पाठोपाठ अगदी एक नजरही तिच्याकडे न टाकता तो बाहेर पडला अन निघुन गेला.

(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

इरसाल's picture

31 Aug 2012 - 10:51 am | इरसाल

लाइन लावली त्याची.
आवडले.

निनाद's picture

31 Aug 2012 - 11:31 am | निनाद

जिव्हारी काहीतरी ठसठसत होत, पण त्या ठसठसण्याकडं लक्ष द्यायला तिच्याकडे वेळ नव्हता. तगमग मनाला भिडणारी आहे. लहान मुलांच्या विश्वालाही सहज जाणारे तडे धारदार आहेत.
जबरदस्त लेखन आहे.
वाचत आहे... पुढील भागाची प्रतीक्षा असेलच.

मी_आहे_ना's picture

31 Aug 2012 - 11:58 am | मी_आहे_ना

वाचतोय..अशीच पॉसिटिव्ह सरकूदे पुढे, पु.भा.प्र.

चिगो's picture

31 Aug 2012 - 12:14 pm | चिगो

लेखन जबरदस्त.. तिच्या नव-याची मानेंनी कशी घेतली असेल, हे आमचं आम्ही समजून घ्यायचं. मराठी चित्रपटांनी 'गुलाबाची फुले' वैग्रे वापरुन कल्पनाशक्ती वाढवली आहेच.. ;-) गंमत अलहिदा, लेखमाला सुरेख जमतीय ताई..

प्रचेतस's picture

31 Aug 2012 - 12:58 pm | प्रचेतस

मस्त लेखमाला चाललीय.
कथानक जाम रंगतय.

अप्रतिम लेखन ..

लिहित रहा... वाचत आहे..

भारी जमतीये
पुभाप्र पुलेशु

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2012 - 3:08 pm | बिपिन कार्यकर्ते

आवर्जून वाचतोय! मात्र दोन भागात अंतर नका ठेवू, मजा जातेय!

५० फक्त's picture

31 Aug 2012 - 4:02 pm | ५० फक्त

उत्तम लिखाण, पुढं काय होईल याची वाट पाहात राहावी असं.

बॅटमॅन's picture

31 Aug 2012 - 4:32 pm | बॅटमॅन

सध्या ही आणि क क कपलचा या दोन सेरीज फुल्टू हिट आहेत. लैच भारी लिखाण!

सानिकास्वप्निल's picture

31 Aug 2012 - 4:45 pm | सानिकास्वप्निल

वाचतेय

पैसा's picture

31 Aug 2012 - 7:00 pm | पैसा

यावेळी मात्र जरा वाट बघावी लागली!

वाचतेय. कृपया पुढचे लेखन लवकर येऊ द्या अपर्णाताई. :)

जाई.'s picture

1 Sep 2012 - 6:39 pm | जाई.

असेच म्हणतेय

मन१'s picture

1 Sep 2012 - 7:54 pm | मन१

लवक्र येउ द्यात पुढले अंक.

निरन्जन वहालेकर's picture

1 Sep 2012 - 9:14 pm | निरन्जन वहालेकर

छान ! लेखन !!!
पुढील भागाची प्रतिक्षा ! ! !

तर्री's picture

1 Sep 2012 - 10:17 pm | तर्री

पु.भ.प्र.

स्पंदना's picture

4 Sep 2012 - 5:27 am | स्पंदना

लेख आवर्जुन वाचल्याबद्दल धन्यवाद.
पुढील लेख लवकर टाकायचा प्रयत्न करेन.
@चिगो- पोलीसांची भाषा आणी कशी असणार भाउ? म्हणुन नाही लिहिलं.

अरुण मनोहर's picture

7 Sep 2012 - 2:29 pm | अरुण मनोहर

रंगतदार लेखन! पु.ले.शु.