भाग१- http://www.misalpav.com/node/22214
उपरा कुणी जर वाकड्या नजरेन तिला पहाता तर ती उघड उघड विरोध करु शकली असती, पण हे सगळच अवघड होउन बसल होत. तिच्या नकाराची त्याला गंमत वाटत होती. जीव मुठीत घेउन पळणार्या उंदराशी खेळाव तसा उंदीर मांजराचा खेळ तो खेळत होता.
पुढे...
यातून कसा मार्ग काढावा हे काही तिला सुचत नव्हत. खरतरं जगण्याच्या अन दोन मुलांच्या जबाबदारीत तिला हे नवीनच पडलेल कोडं अक्षरशः असह्य झाल होत. घटस्फोटिता म्हणुन झालेला अपमान कमी की काय; म्हणुन हे दहशतीच नवचं लोढणं तिला शिणवून टाकत होत. सगळा वेळ नुसता संताप! वांझोटा संताप!
शेजारपाजारचे संबंध तसे बरे होते, हे एक त्यातल्या त्यात बरं होत. दोनच घर सोडुन रहाणारे मोहिते काका काकु तर अगदी कुठलं तरी पुर्वजन्मीचं नात असाव तसे! दोन्ही मुल नोकर्यांच्या निमित्तान कधीची घर सोडुन गेलेली. कधी सहा आठ महिन्यान दहा पंधरा दिवसांसाठी येणं व्हायच त्यांच. काका काकु तसे तब्येतीन धडधाकट अन म्हणूनच होतंय तोवर स्वतःच्या घरी रहायच्या विचाराचे. ती लग्न होउन आली तेंव्हा तिच्या पाठभर केसांच काय कौतुक होत काकुंना! आत्तासुद्धा अडीनडीला तिला तेच एक घर हक्काच राहिल होतं.
संक्रात होऊन गेलेली. सार्यांच्या घरी हळदी कुंकवाचा धडाका लागला होता. दरवर्षी ती ही मोठ्या हौसेनं हे सारं करायची. पण आता तिन करावं की नाही ? असा एक प्रश्न होताच. भरीत भर म्हणजे आता एक एक पैसा गाडीच्या चाकाएव्हढा झालेला. अन आता ती सवाष्णं होती का? नक्की कोण होती ती? पूर्वी टाकलेल्या बायका काय करायच्या? तशीच पुढे व्रत वैकल्य चालु ठेवायच्या? असाच छळणारा भ्रतार जन्मोजन्मी लाभावा अस मागायच्या? या एका घटनेन तिचं साधसुधं संस्कारित आयुष्य अगदी ढवळुन निघाले होत. हल्ली तर देवपुजा सुद्धा नकोशी झालेली. दिवसेंदिवस ते देव सुद्धा पारोसेच राह्यले होते.
मोहिते काकुंनी नेहमीच्या हक्कानं तिला हळदी कुंकवासाठी मदतीला बोलावल. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. दरवर्षीचा तो एक पायंडाच पडला होता. दुपारभर आवराआवरी करुन संध्याकाळी काकुंच्या बरोबरीन ती छानशी साडी नेसुन उभी राहिली. नेहमीच्याच ओळखिच्या स्त्रिया आल्या. पण तिला पहाताच चेहरे बदलु लागले. नेहमी सारख्या गप्पा न रंगता, गुपचुप सारे उपचार उरकले जाउ लागले. मधुनच एखादी तिला,' कशी आहेस?' अस ओढुन ताणुन विचारु लागली. त्यातच पलिकडच्या गल्लीचा सात आठ जणींचा घोळका येउन धडकला. बाहेर वाणं देण, कुंकु लावण हे काकु करत होत्या तर खायप्यायचं सार ती पहात होती. ती सरबताचा ट्रे घेउन बाहेर आली अन दिवाणकाकु चमकल्या.
"ही कशी काय इथे?" त्यांनी मोहिते काकुंना विचारल.
"अहो दरवर्षी तर असते. हिच्या शिवाय का जमणार मला असले उद्योग आता?" मोहिते काकु कौतुकान बोलुन गेल्या.
"पण हा सवाष्णींचा कार्यक्रम ना? " दिवाणांनी स्पष्टच बोलुन टाकलं अन वादाला तोंड फुटलं. मघापासुन अवघडुन बसलेल्या सार्याचजणी बोलु लागल्या. अन सार्याचजणींच म्हणन तिचा नवरा जिवंत असल्यान ती या कार्यक्रमाला येउ शकते अस होत. ती गोंधळुन गेली. असा कसा तो जिवंत? घटस्फोटानं त्याला अन तिला वेगळ नाही का केल? शेवटी न राहवून ती बोललीच.
"माझ्यामुळ अपशकुन होतो का?"
"असा कसा होइल? तुझा नवरा तर जिवंत आहे ना? "
" काय उपयोग? त्यान तर मला घटस्फोट दिलाय"
"हो ! पण मध्यंतरी दोन तीनदा दिसले ते आमच्या ह्यांना. आले होते ना?"
"आले होते. पण मुलांना भेटायचा कोर्टान अधिकार दिलाय त्यांना म्हणुन"
"त्यान काय फरक पडतो? आला म्हणजे आला. होइल पुन्हा दिलजमाई."
"मला नको आहे असली दिलजमाई."
'अग ओळखल असेल त्या दुसरीचं पाणी आत्तापावेतो. खरच बाई! अस कस एखाद्याच घर मोडुन स्वतःच घर बसवतात या बायका?"
"मला तिच्याशी देणघेण नाही."
"कस काय? तिनच तर लावलं ना नादाला त्यांना? तुझ एव्हढ मुलाबाळांच घर तिनेच तर फोडलं! नरकात पडेल ती!"
" आत्ता तरी माझाच नरकवास चाललाय"
"बदलेल ग! होइल सार छान."
अजुन दिवाणबाईंचा घुस्सा निघायचा होता. त्यांनी आपल घोड दामटल.
"हे बघ. घर वसवणं, सांभाळणं बाईच्या हातात असत. आमचे 'हे' बघ! रोज पिउन येतील. भांडतील जरा . पण सोडुन म्हणुन नाही जायचे"
तिला हसु फुटल. अन मग सार्याचजणी हसायला लागल्या. गोर्यामोर्या झालेल्या दिवाण अक्षरशः उठुनच निघाल्या. तिनेच त्यांना बळे हात धरुन बसवल. अन पहिल्यांदाच कोणतीही शरम न बाळगता तिची कहाणी सार्यांनाच ऐकवली. खरच तिचा काहीही दोष नसताना हे घडल होत. बाकी काही नाही पण निदान रस्त्यात भेटल तर तोंड लपवण तरी संपल असत. अन तिला कामाची असलेली गरजही सर्वांपर्यंत पोहोचली. हे ही नसे थोडके.
कार्यक्रम झाल्यावर मात्र तिचा बांध फुटला . मोहिते काका काकुंना तिन त्यानं नव्यान सुरु केलेला जाच जमेल तसा मोडक्या तोडक्या शब्दांत सांगितला. खरं तर शब्दांची गरजच नव्हती. काकांनी तिला पोलिसांची मदत घ्यायला सुचवल. पण आजवर कधी तिने पोलिस स्टेशन बघितल सुद्धा नव्हत. काकांची बरोबर यायची तयारी होती पण काकु गंभीरपणे बोलल्या ," नाही . तू एकटीन जायच. बघ तूला जमतं का? आधी स्वतःच्या पायावर उभा रहायला शिक. फारच पडल झडल तर आम्ही आहोतच. पण तू पहिला खंबीर हो. " एव्हढे काका यायला तयार असताना काकुंनी घातलेल्या मोडत्यानं नाही म्हंटल तरी ती हिरमुसली. पण काहीतरी करण भाग होतच.
दुसर्या दिवशी मुलीला शाळेतुन घरी आणताना तिने कसबस धाडस केल अन पोलिस स्टेशनच्या पायर्या चढुन ती आत गेली. आत दोन चार टेबलं, त्या माग खुर्च्या अन खुप सारे पेपर्स, असा एकुण देखावा होता. भिंतींना खुप सार्या खुंट्या अन त्यावर टांगलेले कपडे अन बॅगा. तिला पाहुन एकजणं पुढे आला. हाताच्या तळव्यावर तंबाखु मळता मळता त्यान तिची दोन मुलं आणि तिला पुर निरखलं. काय बोलाव हेच मुळी तिला उमजत नव्हतं. कोरड्या पडलेल्या ओठावरुन तिने जीभ फिरवली अन काही तरी बोलायचा प्रयत्न कराव म्हणुन तोंड उघडल. पण एव्हढा वेळ तिच्याकडे पहात असलेला तो आता मात्र तिला तोडत बोलला.
"कोण तुम्ही?" त्या गुरकावणीनं तिला आल्या पावली परत फिरावस वाटल.
आपल नाव सांगाव नाही सांगाव या गोंधळात ती नुसतीच उभी राहिली. अन एव्हढा वेळ हे सारं पहाणारा दुसराच एकजण तिकडुन बोलला," कंप्लेंट असेल तर तीन नंबरवर जा." आता हा तीन नंबर कोठे? अन तिला कसली कंप्लेंट नोंदवायची होती? एव्हढा संभ्रम तिने तिच्या आयुष्यात नव्हता अनुभवला. नकळत तिच्या डोळ्यात पाणी तरळल अन समोरच्यानं हातातली तंबाखु तोंडात टाकली. "या इकडे. बसा खुर्चीवर. काय ग? नाव काय तुझ? शाळेत जातेस? कुठल्या?" ही सारी सरबत्ती तिच्या मुलीवर होती. मुलीचा हात धरुन तो तिला एका टेबलकडे घेउन गेला. पाठोपाठ ती. बसल्यावर त्यान तिच्याकड पाहिल. 'काय काम आहे?' आत्त्ताच्या अन मघाच्या आवाजात जमिन अस्मानाचा फरक होता.
" मी या गल्लीत रहाते...मला थोडी ...म्हणजे...??"
त्यान शांतपणे तिच्याकडे पहिलं. " कोणी त्रास देतय?'
"हो. पण त्रास म्हणजे..."
" कोण आहे? हे पहिला सांगा'
" म्हणजे ..माझा घटस्फोट झालाय्...पण म्हण्जे"
"घटस्फोट...." एकदम छोटा प्रज्वल बोलु लागला. "आई रडते ना? पप्पा रागावतो "
समोरच्याच्या अनुभवी नजरेला बरचस समजल होत. तिच्याकडे तेव्हढ्याच शांतपणे पहात त्यान विचारल, " परत येउन त्रास देतो? मारहाण करतो? पोटगी देत नाही?"
"नाही. असल काही नाही." त्याच्या त्या प्रश्नांनी तिची बरीचशी भीड चेपली . पण जे सांगायच होत ते कोणत्या शब्दात सांगायच हे काही तिला उमजत नव्हत.
पुन्हा समोरचाच बोलला. "मग मानसिक त्रास? येऊन भांडण करतो? अपमान करतो?"
तिन एक थरथरता श्वास सोडला. तिच्या नाकपुड्या नकळत फुलल्या. खालमानेनच तिन नकारात्मक मान हलवली अन तिच्या शेजारच्या खुर्चीवर एक लेडी कॉन्स्टेबल अवतरली. एव्हढा वेळ ती कोठे होती कुणास ठाउक. "बोला बाई."
त्या आश्वासात्मक आवाजान तिला खुप बरं वाटल. " काय करतो? पुन्हा एकत्र राहु म्हणतो? जमेल तेंव्हा?" या प्रश्नांनी तिचे सारे प्रश्न सोडवले.
"हो. म्हणजे...."
"सबंध ठेवायला पाहतो आहे?"
कसे सुचतात हे शब्द यांना? अचूक?
"हो. पण मला नको आहे ते." आता मात्र तिला थोडा धीर आला.
"मग ? कंप्लेंट नोंदवायची आहे? आम्ही नोंदवतो. तुम्ही घटस्फोटाचे कागद घेऊन या. आम्ही ते तुमच्या कंप्लेंटसह कोर्टात पाठवु. तुमचा वकील असेलच ना? अन जे काय घडतं आहे त्याचा कोणी साक्षीदार? "
तिचे डोळे विस्फारले. पुन्हा कोर्ट? वकील? अन साक्षीदार ? ते कुठुन आणायचे?
समोरचा शोधक नजरेने तिच्याकडे पहात होता. तिन त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानं नजर फिरवली अन बाहेरच्या उन्हाकडे पाहु लागला. लेडी कॉन्स्टेबलही गप्प झाली.
तिच्या डोळ्यात पाणी थरथरु लागल. एकुण या सार्याला अंत नव्हता तर.
"नाव काय बाई तुमच?" पुन्हा समोरच्याने विचारल. तिने कसबसं सांगितल.
"किती दिवस झाले घटस्फोटाला ? " तिने माहिती दिली.
" अन पोटगी पुरते?" तिने नकारार्थी मान हलवली.
थोडावेळ तो ही गप्प झाला. "आम्ही काय कराव अशी अपेक्षा आहे तुमची?"
"मी काय करु शकते?"
"हे बघा कायद्यानं तो तुम्हाला आता परका आहे. त्यामुळे त्यानं केलेल वर्तन बेकायदेशीर ठरु शकत. पण मग तो ते नाकारणार अन ते सिद्ध करायला तुम्हाला साक्षीदार आणावे लागतील. मुल सांगतील काही?"
"मुल? नाही. नको. लहाण आहेत हो दोघेही " ती कळवळली.
"मग एकच उपाय. तुम्ही खंबीर व्हा. दरडवा त्याला. कायद्यान तो हे करु शकत नाही याची तुम्हाला जाणीव आहे हे समजु द्या त्याला. "
तिने निराश होत मान हलवली . उठुन बाहेर पडली.
समोर उन्हं झळकत होती. पण त्यांचा आता त्रास नव्हता जाणवत. कायद्याची वाट खर्चिक तर होतीच पण त्याहुनही ती तिच्या मुलांच निरागसपण हिरावणारी होती. आजवरच्या भांडणात तिने जिवापाड जपल होत ते मुलांच निरागसपण. ते बळी देउन तिला काय न्याय मिळायचा होता? अन कधी? अन सारेच जण; अगदी मोहिते काकु अन पोलिस सुद्धा तिलाच खंबीर व्हायला सांगत होते. आणि किती भोगायच होत तिनं?
घर कधी आल ते तिला समजलं सुद्धा नाही. कुलुप काढुन आत जाउन ती पहिला घटाघटा पाणी प्याली. मुलांचे हातपाय धुवुन, खायचं टेबलावर ठेवुन ती तशीच अंगणातल्या पायर्यांवर जाउन बसली.
किती वेळ गेला कुणास ठाउक. समोरच्या चिवचिवाटानं तिला जाग केलं. ती विचारात हरवली असताना कधीतरी चिमण्यांचा थवा अंगणात उतरला होता. अंगणात सांडलेले दाणे टिपत होता. ती तशीच खिन्न नजरेनं त्यांच्याकड पहात राहिली . दहा एक चिमण्या असतील. दाणे टिपता टिपता त्यातला एक चिमणा एकीशी सलगी करु पहात होता. पंख खाली पाडुन त्याच आपल प्रणयाराधन सुरु होत. चिमणीला समोर बसलेली 'ती' दिसत होती. तिन हुसकावयाच्या आत मिळतील तेव्हढे कण टिपणार्या तिला त्याची नको तेंव्हाची लाडीगोडी नको असावी. पण चिमणा आपला खाणं सोडुन नर्तनातच गुंग होता. अन एकदम दाणे टिपणार्या तिला तो सामोरा गेला. "चिक्क" एकच त्वेषाचा उद्गार चिमणीन काढला अन चिमणा भुर्रकन उडुन बाजुला गेला. ती अवाक ! एव्हढासा मुठभर जीव स्वत्व राखु शकतो, मग एव्हढी हातीपायी धड ती का कमजोर होती? काकु जे सांगु पहात होत्या, पोलीस जे सुचवत होते; ते हेच का?
अचानक तिला समोरच्या अंगणात पडलेला कचरा दिसु लागला. किती दिवस झाले साफ करुन? आपण जगणं विसरलो की काय?
कुठल्याश्या एका अनामिक उत्साहान ती उठली. अंगणाच्या कोपर्यात पडलेला झाडू पहिला साफ केला, अन मग भराभर सार अंगण साफ केल. आत जाऊन बादलीभर पाणी आणुन सडा घातला. आईच हे काम करण पाहुन सायली बाहेर आली, अन परत आत जाउन तिने रांगोळीचा डबा आणला. दोघी मायलेकींनी कित्येक दिवसात न घातलेली रांगोळी आज परत तिच्या बोटातुन झरु लागली.
आत येउन तिने हातपाय धुतले अन देवाला दिवा लावला. आज कित्येक दिवसांनी घरात पणतीचा पिवळसर उजेड पसरला. तिने हात जोडले, डोळे मिटले पण आज त्या मनातून कोणतच मागणं नाही उमटलं. आतल्या आत ती शांत शांत होत होती अन आतल्या आतच उजळतही होती.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
11 Jul 2012 - 7:06 pm | कपिलमुनी
ओघवती शैली आहे ...
पुढील भागात नाट्य अपेक्षित
11 Jul 2012 - 7:10 pm | पैसा
पुढच्या भागात काय होणार आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे...
11 Jul 2012 - 7:15 pm | सूड
हाही भाग खिळवून ठेवणारा.
एक सजेशन ( अर्थ बदलतोय म्हणून)
भ्रतार: भाऊ
भर्तार: नवरा
11 Jul 2012 - 7:20 pm | मन१
भ्रतार हा शब्द इथे अयोग्य नसावा.
मी जितक्या पब्लिक कडून ऐकलय त्यांनी "मराठीने केला कानडी भ्रतार" असाच उच्चार करुन "मराठी पोरीने कानडी दादला केला" ह्या धर्तीवरचा अर्थ सांगितलाय.
अर्थात, लिखित काहिच मजकडे नाही.
11 Jul 2012 - 7:24 pm | पैसा
भ्राता म्हणजे भाऊ, भ्रतार म्हणजे नवरा.
11 Jul 2012 - 8:49 pm | सूड
अस्संय होय !! शब्द मागे घेतो.
12 Jul 2012 - 6:44 pm | स्पंदना
कपिलमुनी, पैसा, सुड, मन१ धन्यवाद! तुमच्या प्रोत्साहनानेच पुढ लिहायच बळ मिळाल.
पैसा तुमच्या वेळेवरच्या मदतीमुळे लेख प्रकाशित झाला. नाहितर काय खर नव्हत.
12 Jul 2012 - 3:49 am | स्पंदना
भर्ता bhartA - husband
आपल्याकडे बोलताना भरतार असा थोडासा अपभ्रंशित उच्चार आहे, त्यामुळे थोडी गडबड झाली.
चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
11 Jul 2012 - 7:22 pm | मन१
वाचतोय.
11 Jul 2012 - 7:28 pm | रेवती
तिचे विचार थोडे बदलतायत म्हणून पुढील कथेबद्दल उत्सुकता आहे.
12 Jul 2012 - 11:39 am | अन्या दातार
असेच बोलतो :-)
11 Jul 2012 - 7:28 pm | स्पा
हम्म :-)
12 Jul 2012 - 6:47 pm | स्पंदना
क्यो स्पाउ? डर गये?
रेवती , अन्या दातार्(कोल्हापुरकर) स्पा, स्वाति दिनेश अन बॅटमन धन्यवाद.
11 Jul 2012 - 7:38 pm | स्वाती दिनेश
दोन्ही भाग आत्ताच वाचले, छान लिहिते आहेस.
पु भा प्र
स्वाती
11 Jul 2012 - 7:46 pm | बॅटमॅन
अब आयेगा मजा!!
11 Jul 2012 - 7:49 pm | चिगो
आता रंगात येतेय कथा.. अगदी मनातलं सांगायचं झाल्यास "हाणा तिच्यायला” ,(म्हंजी त्या दादल्याला..);-)
11 Jul 2012 - 7:57 pm | गणेशा
प्रत्यक्ष प्रसंगाला तोंड देणार्या व्यक्तीच्या मनातील घालमेल आणि त्याचबरोबर तिला कसे वागले पाहिजे सांगणार्यांचा सल्ला दोन्हीही मस्त सांगितले आहे.
नायिकेचे चित्रण खरे वाटते आहे एकदम..
11 Jul 2012 - 8:00 pm | प्रचेतस
ओघवते लिखाण.
11 Jul 2012 - 8:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय.
-दिलीप बिरुटे
11 Jul 2012 - 8:53 pm | जाई.
वाचतेय
11 Jul 2012 - 9:03 pm | अर्धवटराव
एक्सलंट लेखनशैली.
आता क्लायमॅक्स कि ट्विस्ट?
अर्धवटराव
12 Jul 2012 - 6:49 pm | स्पंदना
चिगो, गणेशा, वल्ली,प्रॉडो, जाई अन अर्धवटराव मनापासुन धन्यवाद
11 Jul 2012 - 9:56 pm | गणपा
कथा म्हणुन आवडली. लेखन शैली ही छान आहे.
पहिल्या भागही वाचला होता पण खालचे प्रतिसाद वाचल्या नंतर तेथे प्रतिसाद द्यायच टाळलं.
11 Jul 2012 - 11:34 pm | पिंगू
कथानायिकेला नविन बळ देण्याची हातोटी आवडली. हेच बळ नेहमीच हातात असेल, तर काय बिशाद संकटांची...
11 Jul 2012 - 11:39 pm | मुक्त विहारि
हा पण भाग चांगला जमला आहे.
12 Jul 2012 - 6:33 am | मराठमोळा
विंटरेष्टींग पण अॅज एक्स्पेक्टेड :)!!!
( अवांतरः तरूण स्त्रियांना वासना नसते का, की फक्त पुरुषांनाच असते? म्हणजे विधवा किंवा घटस्फोटीत स्त्रिया काय करत असाव्यात बरं? प्रामाणिक प्रश्न आहे हा. )
12 Jul 2012 - 10:56 am | एमी
ममो,
तुम्ही घुसमट १ वरचा सुहास चा प्रतिसाद वाचला नाय का?
www.misalpav.com/node/22214#comment-411854
12 Jul 2012 - 6:56 pm | स्पंदना
गणपाभाउ, मुवी, पिंगु ममो अन पाहुणे धन्यवाद.
ममो असते. सर्व सामान्य प्राणीजनांना (सामान्य =नॉर्मल) वासना सारख्याच प्रमाणात असते. पण दहशत वा अपमानास्पद प्रकारे घडलेला संभोग हा त्या वासनेची पुर्ती करु शकत नाही. म्युच्युअल रिस्पेक्टवर जर हे सुख मिळत नसेल तर न मिळाल तरीही चालेल अशी अवस्था येते शेवटी.
12 Jul 2012 - 7:40 am | ५० फक्त
हा भाग सुद्धा उत्तम झाला आहे,
अवांतर - जेंव्हा भारतात याल तेंव्हा नक्की भेटुया.
12 Jul 2012 - 6:59 pm | स्पंदना
जेंव्हा भारतात याल तेंव्हा नक्की भेटुया
नक्कीच! मलाही आवडेल.
५०फक्त, पियु, सुमित भातखंडे, प्यारे१ ,मश्रीजोशी अन प्रभाकर काका धन्यवाद.
12 Jul 2012 - 9:50 am | सुमीत भातखंडे
दोन्ही भाग वाचले...
आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत
12 Jul 2012 - 10:27 am | पियुशा
मस्त. पु.ले.शु. :)
12 Jul 2012 - 10:32 am | प्यारे१
मस्तच....
येऊ दे अजून.
12 Jul 2012 - 11:16 am | मनोज श्रीनिवास जोशी
२ ही भाग आवडले .चांगली भाषा व चांगली शैली.
12 Jul 2012 - 3:59 pm | प्रभाकर पेठकर
एव्हढासा मुठभर जीव स्वत्व राखु शकतो, मग एव्हढी हातीपायी धड ती का कमजोर होती?
ये हुवी न बात!
12 Jul 2012 - 7:24 pm | राजघराणं
२ ही भाग आवडले
13 Jul 2012 - 9:17 am | लीलाधर
पूढील भाग लवकरच येउद्यात... पु.भा.शु. धन्यवाद :)
13 Jul 2012 - 10:13 am | sneharani
वाचत आहेच, येऊ दे तिसरा भाग!
13 Jul 2012 - 11:25 am | श्यामल
दोन्ही भाग आत्ताच वाचले. सहजसुंदर, ओघवत्या शैलीतील क्रमशः कथा अतिशय आवडली.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत........
13 Jul 2012 - 11:51 am | दिपक
दोन्ही भाग एकदम वाचले. सुंदर कथालेखन. पुढचा भाग लवकर टाका.
13 Jul 2012 - 12:04 pm | जेनी...
अचानक तिला समोरच्या अंगणात पडलेला कचरा दिसु लागला. किती दिवस झाले साफ करुन? आपण जगणं विसरलो की काय?
कुठल्याश्या एका अनामिक उत्साहान ती उठली. अंगणाच्या कोपर्यात पडलेला झाडू पहिला साफ केला, अन मग भराभर सार अंगण साफ केल. आत जाऊन बादलीभर पाणी आणुन सडा घातला. आईच हे काम करण पाहुन सायली बाहेर आली, अन परत आत जाउन तिने रांगोळीचा डबा आणला. दोघी मायलेकींनी कित्येक दिवसात न घातलेली रांगोळी आज परत तिच्या बोटातुन झरु लागली.
______________________________________
अप्रतिम ...
मनावरची जळमटं दूर झालेल्याची चिन्हं दाखवण्याचा हा प्रयत्न खुप खुप आवडला..
अपर्णा अमेझिन्ग ...
वाचतेय ...
13 Jul 2012 - 2:09 pm | नगरीनिरंजन
सविस्तर अभिप्राय कथा संपल्यावर.
15 Jul 2012 - 2:17 am | किसन शिंदे
खुपच छान होतेय कथा, दोन्ही भाग एकत्रच वाचले. पुढचा भाग कधी???