भाग १- http://www.misalpav.com/node/22214
भाग २- http://www.misalpav.com/node/22227
आत येउन तिने हातपाय धुतले अन देवाला दिवा लावला. आज कित्येक दिवसांनी घरात पणतीचा पिवळसर उजेड पसरला. तिने हात जोडले, डोळे मिटले पण आज त्या मनातुन कोणतच मागण नाही उमटल. आतल्या आत ती शांत शांत होत होती अन आतल्या आतच उजळतही होती.
पुढे...
आता नक्की काय करावं याचा तिने विचार करायचा थोडाफार प्रयत्न केला. पण जे जसं समोर येइल तसं तोंड देणं एव्हढंच एक उत्तर दिसत होतं. ठरल होतं एकच. आजवर तो बोलायला लागला की त्याच्या त्या निलाजर्या मागणीनं तीच शरमिंधी होत होती. पण आज पहिल्यांदाच तिला जाणवलं होतं की जर करणार्याला शरम नाही तर विरोध करणार्या तिने का शरमिंध व्हावं? तो जर येऊन असला घाणेरडा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवु शकतो, तर विरोध करताना तिची मान का खाली जावी? असेल तो पुरुष? पण ती ही स्त्री आहे. त्यान स्वतःहोउन तोडलेलं नातं, आता तो त्या नात्याचा अधिकार कसा काय वापरु शकत होता? कारण ती त्याला तो वापरु देत होती. एकुण आजवर त्यानं तिला ज्या एका पत्नी, वा सुसंस्कारित रुपात पाहिली होती, त्यामुळेच तिचा कमकुवत पिंड त्यानं पुरा जोखला होता. अशी करुन करुन काय करेल ? काय अक्कल आहे तिला, अशी काहिशी तुच्छ भावना घेउनच तो तिच्याशी वागत होता. वर दोन मुलांचा भार तिच्या एकटीवर टाकुन तर त्यानं तिला त्या मातृत्वाचा दबावच आणला होता. स्वतःसाठी काहीही करु जावं तर दोन मुलं समोर असायची. ज्या मायेनं तिने आपली मुलं आपल्या जवळ राह्यल्या बद्दल देवाची करुणा भाकली होती, त्याच मायेचा साखळदंड हाती घेउन तो तिच्यावर स्वामित्व गाजवायला पहात होता. आजवर लग्न या गोंडस नावाखाली हाच साखळदंड अस्तित्वात होता, पण त्या गोंडस नावामुळं त्याचा काच हा 'बाईचे भोग' या नावाखाली ती पचवत असावी, वा समाजात या एका प्रतिष्ठीत चौकटीत रहायला मिळण्याचं मोल असाव ते. काहीही असो पण जोवर त्या चौकटीतुन ती बाहेर नव्हती पडली तोवर तिला हे जाणवलं नव्हतं हेच खरं. हाच प्रसंग जर दुसर्या कोणावर आला असता, अन ती चौकटीतुन पहात असती, तर कसा असता तिचा व्यवहार त्या दुसर्या व्यक्तीशी? उत्तर द्यायला तीच स्वतःच मनसुद्धा तयार नव्हत. एक नवाच आरसा तिच्या मनासमोर उभा ठाकत होता अन त्यात स्वतःला पहाण्याचं धाडस तिला होत नव्हतं. स्वतःबद्दलच्या या नव्याच माहितीने तिला शहारुन आलं. काही का असेना, पण आजपासुन निदान एका बदलेल्या दृष्टीकोणातुन ती स्व्तःकडे पहायला शिकणार होती हे मात्र खरं.
अश्यातच कुठुन तरी तिला दोन मुल सांभाळते का? अस विचारल गेल. खुपच लहानं मुलं होती, अन पैसेही भरपुर द्यायची त्यांची तयारी होती. जर व्यवस्थीत केल तर निदानं दोनचार वर्षतरी मुलं तिच्या कडेच ठेवावी लागली असती एव्हढी लहानं. दर महिन्याची रेग्युलर मिळणारी रक्कम तिला थोडासा तरी स्थिरपणा देउन गेली असती. नाहीतरी आज काम मिळाल आता उद्या काय? अस बिनभरवश्याच जगणं असह्य होत होतच. तिने हो म्हणुन सांगितल. नाहीतरी तिची दोन मुल ती सांभाळत होतीच.
या सगळ्या धावपळीतच अचानक एक दिवस तो उगवला. नेहमी सारखा संध्याकाळ धरुन तो घरात शिरला. सायली हल्ली पहिलीला असल्यान थोडावेळ मोहिते काकांकड पाढे म्हणायला अन थोडाफार अभ्यास करायला जायची. ती आतमध्ये पोळ्या करत होती. दारातुन आत येताना अगदी बिनधास्त शिट्टी घालत तो आत शिरला अन तिच्या डोळ्यात निखारे फुलले. स्वयपाक घरातुन बाहेरच्या खोलीच्या दाराला येउन ती उभी राह्यली. तो निवांत सोफ्यावर बसलेला. अगदी हातपाय ताणुन.
"काय? काय म्हणतेस?" अगदी जवळीक दाखवत त्यानं विचारल. ती तशीच उभी . नक्की काय बोलाव हे अजुन उमगत नव्हतं पण मनात तिरस्कार असा जळजळत होता. तिला गप्प बघुन तो उठुन तिच्या जवळ आला. हसत हसत त्यान तिच्या खांद्याला हात लावला अन काही कळायच्या आत तिच्या हातात असलेल लाटणं त्याच्या चेहर्यावर दणकन उतरलं. हबकुन तो माग सरकला. आपल्या हातात लाटण असलेलं तीलाही प्रथमच जाणवल.
एक क्षण असाच गेला अन दातओठ खात तो पुढ धावुन आला.
"हात उचलतेस? माझ्यावर?"
"मग ? तू हात कसा लावलास?"
"अरे जारे? डोक फिरलय का काय तुझ?"
"तुझ तपासुन ये जा ज्जा!' ती त्वेषानं उद्गारली.
"कुठ रहातेस माहिताय ना? माझ्या घरात उभी आहेस?"
"जा. कोर्टातुन ये तुझं घर घ्यायला"
"बरीच शहाणी झालेली दिसतेस? एक थोबाडीत बसली की समजेल तुला"
"आत्त्तातरी तूच खाल्लायसं. माझ्या अंगाला हात लावलेला मी खपवुन घेणार नाही."
"का? आजवर तर गुमानं झोपत होतीस."
"ते नात संपल. आता तू परका पुरुष आहेस अन परकाच रहा. जराजरी घाणेरडे शब्द वापरलेस तर जीभ हासडेन तूझी"
"परका? अग दहा वर्ष राह्यलीस माझ्या जीवावर. मी कमवुन आणलेल खाउन, निवांत मजा मारलीस अन आता परका झालो होय?"
" ते तू कोर्टाला विचार? पण पहिला इथुन चालायला लाग. तिन्हीसांजेच माझ्या घरी आलेलं मला चालणार नाही. इथे रहायला तुला परवानगी नाही"
"मला? मला परवानगी? " तो दातओठ खात पुढ आला अन खस्स्कन तिच्या खांद्याला धरुन त्यान तिला भिंतीवर आदळली. हातातल्या लाटण्यानं त्याला दुर लोटायचा तिचा प्रयत्न अपुरा पडत होता. तसच त्याला लाटण्यान खुपसत ती माग आदळली, अन एव्हढा वेळ बाजुलाच उभा असलेल्या प्रज्वलन मोठ्यानं भोकाड पसरल. त्याच्याकड दुर्लक्ष करत त्यान तिला एक मुस्काटात भडकावली. तिच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधार पसरला.
"आई? पप्प्पा?" सायली दारात उभी राहुन किंचाळली अन तिच्या पाठोपाठ दारात मोहिते काका उभे राहिलेले दिसले तिला.
"बाजुला हो! मारतोस तिला चांडाळा?" मोहिते काकांच सार शरीर संतापान कापत होत.
"तुम्ही मध्ये पडु नका. हा माझ्या घरातला प्रश्न आहे. " तो गुरगुरला
"कुठल तुझं घर?" या एका क्षणात ती सावरली. आत्त्ता नाही तर कधीच नाही जमणार आपल्याला ही जाणवल तिला.
"हे घर कायद्यान माझ आहे. तू घटस्फोट दिल्यानं तू माझा कोणीही लागत नाहीस. तेंव्हा तू चालता हो. या हो मोहिते काका . बसा तुम्ही ." तिच्या डोळ्यात आव्हान उभ ठाकलं होत.
हा सारा प्रकार बघुन बिथरलेल्या प्रज्वलन हातातली प्लॅस्टीकची बॅट त्याला घुडघ्यावर मारत किंचाळायला सुरवात केली अन तो हतबुद्ध झाला.
"पोर बिथरवतेस माझ्या विरुद्ध?"
"घेउन जा तूझी पोरं."
" हे बघा तुम्ही निघुन जा इथुन ." काका बोलले. "शोभत नाही तुम्हाला हे वागण"
" तुम्हाला का त्रास होतोय? की मजा मारायला मिळतेय तुम्हाला?"
त्याची ती घाणेरडी भाषा ऐकवेना तिला.
"मी आरडा ओरडा करुन पुरी गल्ली जमा करेन तू गेला नाहीस या क्षणी तर." तिनं धमकावलं.
"बघु कशी बाहेर काढतेस?" तो आरामात कोचावर पसरला.
"ठिक आहे. मी पोलिस बोलावते" ती निकरान म्हणाली अन तो चमकला.
"बरचं शहाणपण आलेल दिसतयं." तो रोखुन पहात म्हणाला." मी माझ्या मुलांना भेटायला येऊ शकतो माहिती आहे ना? का मला कायदा शिकवायला लागलीस?"
"मग फक्त मुलांनाच भेटत जा. माझ्याशी बोलायची, अचकट विचकट मागण्या करायची गरज नाही आहे. तूला इथे जेवायला मिळणार नाही. ना ही तू इथे राहु शकतोस. " तीन खडसावुन सांगितल. इतक मोठ्यान बोलुन तिचा आवाज घोगरला होता.
त्यान तिच्याकड पाहिल. अन मग तो मुलांकड वळला.
"प्रज्वल? बाळा! " त्याच ते नाटक पाहुन तिला शिसारी आली.
त्यान पुढे केलेल्या हाताला प्रज्वलन धुडकावुन लावल अन तो तिच्याकडे धावला. "आई लागलं?" अस विचारत तिच्या चेहर्यावरुन तो हात फिरवु लागला. त्याच्या पाठोपाठ सायलीनं तिला मिठी घातली. त्या तिघांकड पहात तो उठला अन दाराशी जाउन उभा राहिला.
"तूला दाखवतोच बघं! फार पुढ गेलीस तू! ' दारात उभ्या त्याच्याकडे तिन फक्त तिरस्कारानं पाहिलं. आणखी तोंडी लागायला तिच्यामध्ये बळ नव्हत उरलं. तो निघुन गेला. जवळच उभ्या काकांना शब्दही फुटत नव्हता. इतका घाणेरडा आरोप! अन त्यांना समजवायला तिच्याकडे शब्द नव्हते. आत मध्ये तव्यावर असलेली पोळी कधीची करपली होती. त्या जळकट वासानं अन धुरानं सार घर व्यापल होत. सारी संध्याकाळच जणु करपली होती. तिच्याशी काहीही न बोलता काका तसेच निघुन गेले. दोन्ही मुलांना घेउन ती तशीच जमिनीवर बसली. झाल्या प्रकारान तीच सारं अंग कापत होत. अश्या मारहाणीचा तिला अनुभव नव्हता. अन मुख्य म्हणजे त्याच्या हात लावण्यान संतापलेल्या तिनेच पहिला वार केला होता. गॅसवरचा तापलेला तवा अन तिच मन जणु एकच झालं होत.
ज्या दोन मुलांबद्दल तिला विचारल गेल होतं, त्यांच्याकडुन तिला भेटायला येण्याबद्दल निरोप आला. मुल तिच्या घरी रहाणार असल्यानं, त्या लोकांना तिच्या घरी येउन बोलायचं होत. तिने होकार कळवला.
तीने हो म्हंटल अन एक दिवस देवांग तिच्या घरी आला. त्याच्या हातातला छोटा मानस फकत आठ महिन्यांचा होता. अन बरोबर चालणारी मिनल अडीच वर्षांची. ती बावरलेली मुल पाहुन तिला भडभडुन आलं. घटस्फोटा दरम्यानची स्वतःची मुल तिला आठवुन गेली.
देवांग आयटी मध्ये होता. चांगला शिकलेला. बराच पगार होता. बायको रजनी पण अकौंटट होती. छोटसं कापल्याच निमित्त्य काय अन पटकन देवाघरी निघुन गेली. दोन महिने नातेवाईकांच्या सहानुभुतीवर निघाले होते. पण पुढे काय? दोनचार ठिकाणी त्याने पाळणाघरात चौकशी केली, पण तेथल्या धंदेवाईकपणानं त्याच मन धजेना. कुठुन तरी तिच्या बद्दल माहिती मिळाली अन तो चौकशीसाठी घरी आला. तिच स्वच्छ टापटिप रहाणं , दोन मुलं अन पैशाची गरज....
"मी उद्या पासुन मुलांना आणुन ठेवल तर चालेल का? निकडच आहे तशी. मला मुलं सकाळी आणुन सोडायची वेळ सांगता येइल न्यायची नाही. चालेल का? "
तिचा होकार होताच. अजुन व्यवहारीपणान तिला पुरत नव्हत व्यापलं. तो बाहेर पडताना तीने पटकन बाळाच्या टाळुवर तेल घातल.
'आमच्यात लहाण मुलाला निदान एव्हढ तरी करतातच" ती बोलुन गेली
"चालेल.."
अन मग बघता बघता दोन्ही मुलं तिला चिकटली. आपली दोन्ही मुलं शाळेत सोडुन ती धावतपळत या मुलांसाठी घरी येउ लागली. मोठीची पहिली अन धाकट्याची नुकतीच बालवाडी सुरु झाली होती.
अशीच एकदा ती धावपळ करत घरी येत होती. येताना मधेच गल्लीच्या सुरवातीला एक छोटासा बाजार होता. एक चार दोन भाजीवाले, एक दोन चहाचे स्टॉल, किराणामाल अस काहीबाही मिळायचं तिथे. बर्याचदां त्या चहाच्या टपरीवर कुणीनां कुणी उभ असायचं.ती चालत असताना एकदम तिला जाणवलं की कुणी तरी तिच्याबरोबर चालत तिला बोलावत आहे. तीन मान वळवुन पाह्यल. एक माणुस "बाई जरा थांबा " अस म्हणत तिच्या बरोबर चालत होता. ती थांबली. कोण हा? हा प्रश्न मनात यायच्या आधी हे आणि काय नविनं ? हाच प्रश्न तिच्या मनात उमटला. तीने आठवायचा प्रयत्न केला पण काहीच ओळख लागेना. तिला तशी गोंधळलेली पाहुन त्यान स्वतःहुन ओळख द्यायचा प्रयत्न केला.
"तुम्ही त्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये आल्या होत्या. मीच बोललो होतो तुमच्याशी."
बरोब्बर! आता तिला आठवलं. पण मग हा असा रस्त्याला का अडवतोयं? तिला घरी परतायची गडबड होती. अन अस रस्त्याला उभ राहुन बोलणपण अवघडून टाकत होतं.
"तुम्हाला वेळ आहे का थोडा ? मला बोलायच होत तुमच्याशी." तो परत बोलला
आता हे आणि काय? काय बोलायच आहे त्याला? ती नाही म्हंटल तरी जरा बावचळलीच. तिचा तो गोंधळ पाहुन तो ही जरा विचारात पडलेला दिसला.
"तुमच्या घरी आलं तर चालेल?" बापरे ! घरी ?
"नको माझ्या घरी कुणी नाही आहे. बरं नाही दिसणार" कुणाला बरं नाही दिसणार? हल्ली तिच मन नाही म्हंटल तरी जरा जास्तच प्रश्न विचारत होत.
त्यानं जरा विचार केला. मग म्हणाला "ठिक आहे. आपण इथेच बोलु. "
तिला एक क्षणभर त्याला घरी चल म्हणावस वाटलं, पण मग त्याचा नक्की उद्देश काय हे न कळाल्यान तीने ते ताबडतोब रद्द केलं. तो तिच्याकडे अगदी शांतपणे पहात होता. जणु तिच्या मनात चाललेल सार काहुर त्याला सहज वाचता येत होत. आता तिने त्याच्याकड पाहिल. थोडेफार पिकलेले केस. थंड, अंगावर शहारा आणणारे डोळे. अंगात एक साधाच शर्ट. पायात बुट.
" मी सबइन्स्पेक्टर माने. " त्यान ओळख करुन दिली." तुम्ही तुमच्या पतिबद्दल... घटस्फोटित...तक्रार घेउन आला होता"
"पण मी तक्रार नव्हती नोंदवली" तिने स्पष्ट केलं. एकुण सारा प्रकार तिला कळत नव्हता अन त्यामुळच ती अस्वस्थ होती. स्वतः खंबीर हो अस सांगितल्यावर परत आणि कश्यासाठी हा असा रस्त्यात आडवा आलाय हेच तिला उमगत नव्हतं.
"मी पहिला बोलतो, मग तुम्ही तुमच म्हणनं सांगा" त्याच्या बोलण्याचा सुर काहिसा अधिकारयुक्त पण तरीही थोडासा, अगदी थोडासा आर्जवी. तिला काहीच अंदाज येइना.
"परत आला होता तुमचा नवरा?"
"हो."
"काय झाल? सांगाल का? मला ऐकायच आहे."
ती जरा विचारात पडली. मग अगदी थोडक्यां शब्दांत तिने जे काही घडलं ते सांगितल.
"अस्स! पुन्हा कधी यायचा आहे? काही सांगितलय त्यानं?"
"मला काही कल्पना नाही" तिचा गोंधळ वाढतच होता.
"जे तुम्ही सांगितल त्यावरुन सांगतो, तुम्ही त्याच्यावर हल्ला करुन चूक केलीत. अस करायला नको होतं तुम्ही. शेवटी पुरुषांच्या ताकदीसमोर स्त्री कमी पडते. "
"हल्ला? मी कसा काय हल्ला केला? त्यान हात लावला मला? "
"हो खर आहे. पण त्याच्यावर तुम्ही जे रिअॅक्ट झालात ते चुकीच होतं. काय होत, बर्याचदा अश्या अपघाती हत्या होउन जातात. त्यान जी मारहाण केली त्यात चुकुन कुठं वर्मी लागल असत तर? दोन मुल आहेत तुम्हाला. विचार करुन वागायला हवं तुम्ही"
"एकुण सारी चुक माझीच तर." ती वैतागत म्हणाली. ती हे म्हणाली खरं, पण त्याच्या एका मुस्काटातीत डोळ्यासमोर पसरलेला अंधार आठवुन तिचा जीव थरारला. " शेवटी बाई म्हणुन असच जगायचं का मी? तुमचा कायदा सुद्धा माझ्यासाठी दुरापास्त !"
तिच्याकडे त्याच थंड नजरेन पहात तो म्हणाला" तुमच्यावर अन्याय होतो आहे हे माहीत आहे मला, पण तुम्हीच विचार करुन वागायला हवं. कायद्याच म्हणाल तर ...." तो जरासा अडखळला. जणु बोलु, नको बोलु अश्या काहीश्या संभ्रमात तो तसाच उभा राहिला. ती त्याच्या पुढे बोलण्याची वाट पहात तेथेच उभी राह्यली.
"मी सब्-इन्स्पेक्टर माने." त्यान बोलायला सुरुवात केली." राखीव जागात भरती झाली माझी. बॅकवर्ड क्लास! पण आमच्या समाजात लवकर लग्न करतात. मी बी.ए. व्हायच्या आधिच मला एक मुलगी सुद्धा झाली होती. तिथुन पुढे नेमणुक होउन नोकरी लागली. पण घरच्यांनी तोवर चौदा पंधरा वयाच्या माझ्या मुलीचं माझ्या संमती शिवाय लग्न ठरवुन टाकल. मुलाकडच्यांना माझी पोलीसातली नोकरी म्हणजे एक घबाडच सापडल्या सारख झाल. एव्हढीशी पोर माझी...."
त्याचा आवाज किंचीत कापला. तिला घरी जायची गडबड होती. देवांग मुलं घेउन यायची वेळ झालेली. बोलणं वेगळ्याच मार्गाला लागलेल पाहुन तिने त्याला घरी चालता चालता बोलु म्हणुन सुचवलं. दोघे चालायला लागले.
एव्हाना सब्-इन्स्पेक्टर माने सावरले होते. त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
" तर्...माझ्याकडुन पैसे आणावेत म्हणुन तिचा छळ सुरु केला अन एक दिवस त्यातच ती दगावली. "
ती अवाक!
" मी पोलिसात. तर पोलीसांकडुन खालच्या वर्गावर अत्याचार अश्या बातम्या द्यायला सुरु केली अन खात्यानं मला माघार घ्यायला लावली. वर, माझ्या मुलीचेच अनैतिक संबंध वगैरे वाभाडे काढले गेले. घरच्यांनी जरा माझ ऐकलं असत्...समाजातं ..समाजातं एव्हढ एकच टुमणं ! काय असत. अत्याचार करणारा बाई वा पुरुष नसतो. असतो तो बळी तो कान पिळी हा न्याय. आज एक पुरुष असुन, एक पोलिस अधिकारी असुन ..मी माझ्या मुलीसाठी काहीही नाही करु शकलो." तिच घर आल होत. दारात देवांग मुलं घेउन उभा होता. त्याची माफी मागत तिने दोन्ही मुल घेउन दार उघडलं अन सब्-इन्स्पेक्टर मानेंना आत बोलावल.
"तर मी जे सांगतो ते ऐका. एकदा जे घडल ते घडल. त्याची पुन्हा पुन्हा चर्चा नको. पण इथुन पुढे कधीही शारिरीक मारहाण टाळा. तुमच्याच फायद्याच आहे ते. अन दुसरं अन महत्वाच तुम्ही जरी तक्रार नसली नोंदवली तरी मी थोडाफार हस्तक्षेप करु शकतो. कधी यायचे आहेत ते परत? यावेळी जरा पँट भरवुन पाठवु त्यांची."
त्याच्या त्या राकट बोलण्यान ती एकदम बावरली. तीचा तो चेहरा पाहुन त्यान स्वतःला आवरल. थोडस चुचकारत म्हणाला," काही नाही हो! नुसता येउन बोलुन जाईन थोडसं. बघु काही फरक पडतो का?"
पंधरा दिवसावर प्रज्वलचा वाढदिवस होता. त्यावेळी तो येण शक्य होतं.
"ठिक आहे. साधारण किती वा़जता उगवतात?'
आजवर तो कायम संध्याकाळ धरुनच घरात आला होता. मग साधारण त्या वेळेसच यायच ठरवुन सब्-इन्स्पेक्टर माने. निघुन गेले.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
22 Jul 2012 - 2:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
22 Jul 2012 - 2:54 pm | स्मिता.
अंगावर काटा आणणारं कथानक आहे. वाचतेय.
22 Jul 2012 - 3:11 pm | पैसा
छान चाललीय कथा. पुढव्च्या भागाची वाट पहात आहे.
22 Jul 2012 - 3:23 pm | सानिकास्वप्निल
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
22 Jul 2012 - 3:28 pm | नंदन
वाचतो आहे, कथेने आशावादी वळण घेतल्यासारखं वाटतंय. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
24 Jul 2012 - 5:13 pm | स्पा
कथेने आशावादी वळण घेतल्यासारखं वाटतंय.
+१
असेच म्हणतो
22 Jul 2012 - 3:32 pm | अँग्री बर्ड
सहन न होणारे वास्तव. शेवट सकारात्मक होईल ही आशा !
22 Jul 2012 - 4:42 pm | स्वाती दिनेश
वाचते आहे, पुढे काय झाले?
स्वाती
22 Jul 2012 - 5:34 pm | अन्या दातार
शहारा आणणारे लिखाण. तितकेच उत्कंठावर्धक. :-)
22 Jul 2012 - 6:22 pm | प्रभाकर पेठकर
हम्म्म्म..! नविन पात्रांच्या प्रवेशाने कथा एका नव्या वळणावर येऊन उभी राहिल्याचं जाणवत आहे. अर्थात, पुढे काय होते ही उत्सुकता वाढली आहे.
लवकर येऊ दे पुढचा भाग.
22 Jul 2012 - 7:52 pm | जाई.
वाचत आहे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
22 Jul 2012 - 9:03 pm | बॅटमॅन
बाईने धीर धरून तिखट प्रतिकार केल्याचे वर्णन आवडले.
22 Jul 2012 - 11:02 pm | वीणा३
खरोखर बरं वाटलं तिने प्रतिकार केला हे वाचून. पुढे काय होईल ते होऊ दे पण किमान प्रतिकार तरी केला. पुढच्या भागाची वाट बघत्ये.
23 Jul 2012 - 3:42 am | रेवती
वाचतिये.
23 Jul 2012 - 8:21 am | ५० फक्त
खुप छान वेग घेतलाय आता कथेनं, धन्यवाद.
23 Jul 2012 - 8:24 am | किसन शिंदे
तिचं प्रतिकार करणं आवडून गेलं. :)
पुढचा भाग कधी???
23 Jul 2012 - 9:13 am | प्रचेतस
खूपच सुरेख लिहिताय.
23 Jul 2012 - 10:37 am | मी_आहे_ना
कथेला चांगलं वळण दिलयंत, वाचतोय..
23 Jul 2012 - 3:02 pm | सुमीत भातखंडे
वाचतोय...
23 Jul 2012 - 3:34 pm | RUPALI POYEKAR
पुढिल भागाच्या प्रति़क्षेत
23 Jul 2012 - 3:41 pm | sneharani
वाचतेय, येऊ दे पुढच भाग, उत्कंठा वाढतेय.
23 Jul 2012 - 7:51 pm | निशदे
प्रसंग आणि त्यामागच्या भावना रंगवायची तुमची हातोटी विलक्षण आहे. अजून येऊ देत.
23 Jul 2012 - 8:00 pm | मन१
वाचत आहे.
प्रसंग चांगले उभे केले आहेत.
23 Jul 2012 - 8:10 pm | गणेशा
सुंदर वेगवान...
लिहित रहा... वाचत आहे...
24 Jul 2012 - 4:30 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय.
24 Jul 2012 - 5:13 pm | कवटी
छान. वाचतोय... प्रसंग चांगले उभे केलेत...
नवरा अगदीच डार्क ब्लॅक रंगात रंगवलाय.... अगदी ६०-७० च्या दशकातल्या मराठी पिच्चर मधल्या व्हीलन सारखा. आलका कुबल ला घेउन चांगला पिच्चर बनेल या श्टोरी वर.
अवांतरः यावरून एका परिचयाच्या कुटुंबात घडलेली कथा आठवली. ३ वर्ष वयाचा मुलगा असतानाही काही किर्कोळ कारणावंरुन भांडून बायकोने हट्टाने घटस्फोट घेतला.... कोर्टातून बाहेर पडल्यावर तो नवरा तिला म्हणला "हे काय होउन बसले? आपण परत लग्न करू". पण हिने ऐकले नाही. नंतर 'मुलाला भेटायला ये' असे निमित्त करून ती नवर्याला आठवड्यातून २-२ दिवस बोलाउन-ठेउन घ्यायची. एकदा तर गरोदर रहायची वेळ आली होती. शेवटी तीला कंटाळून त्याने दुसरे लग्न केले. अता हिच्याकडे तो फिरकत नाही.
या बाईचे सध्या भेटेल त्या पुरुषाच्या प्रेमात पडणे चालू आहे. हिच्या सर्व मैत्रींणींनी हिला घराचे दरवाजे बंद केलेत.
आणि वर अता नवरा त्या दुसर्या बायको बरोबर सुखी नाही वगैरे समज करुन घेउन त्याला कॉल करून ' काय झाले काय प्रोब्लेम आहे? तु सुखी नाहिस का?' ('नसलास तर ये मी आहेच', एट्सेट्रा ओळींच्या मधले वाचन) वगैरे रिकामचो* उद्योग चालू आहेत. असो. पुरषाला फारच डार्क रंगात रंगावल्यामुळे प्रतिक्रीया म्हणून हा किस्सा आठवला तो तसाच मांडला.
25 Jul 2012 - 5:12 am | स्पंदना
प्रथम सर्वांचे आभार! अगदी स्पाचे सुद्धा.
नाऊ कवटी....इन्स्पेक्टर माने? पुरुष! मोहिते काका ...? पुरुष! देवांग?? पुरुष्ष!
अन आता तुमची हिरॉइन्...स्त्री...अन अस असुनही त्याला सुखी संसारात साथ देणारी...स्त्री च!
व्यक्तीव्यक्तीवर आधारलेल आहे हे. कुणाचाही पुरुष वा स्त्री म्हणुन विचार करायची सवय नाही मला. बर्याचदा बरोबरीच्या मैत्रीणीही अवाक होतात, पण खरच लहाण्पणापासुन माझ्या बालपणाची वाट लावणारी स्त्रीच असल्यान हा फरक नाही उरला माझ्यापुरता. जो जसा वागेल तसा! चांगला वा वाईट.