१० वी 'क' - भाग २

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
17 Sep 2012 - 1:33 pm

१० वी 'क' - भाग १

गावाहून आलो त्यादिवशीच मुंबईतला धुमशान पाऊस अनुभवायला मिळाला. रस्त्यावरचं साचलेलं गढूळ पाणी बाजूने चालणार्‍यांच्या अंगावर फराफर उडवत गाड्या पळत होत्या. ज्याच्या अंगावर पाणी उडायचं तो त्या गाडीवाल्याच्या अनेक पिढ्यांचा उध्दार करायचा. मला जाम हसायला येत होतं. कसेबसे धावतपळत आम्ही घरी पोहचलो. मुसळधार पाऊसातून येताना आमची बरीच दैना उडाली.

घरात पाऊल टाकल्या टाकल्या वडीलांना प्रश्न केला"अण्णा, पुस्तकं आणायला कधी जायचं?"

"तुला काही धीर-दम आहे की नाही मेल्या, आत्ताच गावाहून आलोय ना." "उद्या परवा आणू." एकदम वरच्या पट्टीतल्या आवाजात आईने ओरडा आणि आश्वासन दोन्ही एकदम देऊन टाकलं.

म्हटलं उद्या तर उद्या. तसंही शाळा चालू व्हायला अजून आठवडा बाकी होता. या सगळ्यात दादाचं गालातल्या गालात हसणं सुरू होतं. मला त्याचा भयंकर राग आला. अण्णा किंवा आई, कोणीही ओरडलं तरी मला दादाचाच राग का येतो याचं कोडं मला अजूनही उलगडलेलं नाहीये.

पाल्या आणि बापलेकरचं काय चाल्लयं याची उत्सूकता लागली होती. 'त्यांनी घेतली असतील का पुस्तकं?', 'क्लास लावला असेल का?' असे अनेक प्रश्न मनात आले. पावसाने थोडी उघडीप दिली की पाल्याला भेटून येण्याचं ठरवलं. पण च्यायचा हरामखोर पाऊस! उघडायचं नावच घेत नव्हता. म्युन्सिपाल्टीच्या फुटलेल्या एखाद्या मोठ्ठ्या पाईपासारखा बदाबदा गळतच होता.

दोन तीन दिवसांनी दुपारी कधीतरी अण्णा आणि दादा पुस्तकं खरेदीसाठी गेले होते. खेळून घरात पाऊल टाकल्यावर थोरले बंधूराज कुठे दिसेनात म्हणून आम्ही आईसाहेबांना विचारणा केली तेव्हा उलगडा झाला. मी घरात नाहीये याचा फायदा घेऊन त्यांनी बरोबर गेम केला होता. दादा मोठा म्हणून त्याला अशा सगळ्या गोष्टीत पुढं पुढं करतात याचाच मला जाम राग येतो. पण काही करू शकत नाही. कुठं खरेदीला जायचं असेल किंवा एखादं महत्वाचं काम असेल तर अण्णा असोत वा आई, यांची पहिली पसंती दादालाच. मला विचारतच नाही. साला जाम वैताग येतो याचा. लांब कशाला, एखाद्या कपड्याच्या दुकानात आम्ही जेव्हा खरेदीसाठी जातो तेव्हा अण्णा आधी दादालाच विचारतील. मी मात्र त्याने निवडलेला शर्ट असो वा पँट, तस्सच अगदी दुसरं घेऊन दुकानाच्या बाहेर पडायचं. रेडिमेड असेल तर लहान साईज आणि मोठी साईज. आणि कपड्याचा पीस असेल तर पाच मीटर कपडा! ह्या गोष्टींसाठी मी नेहमी वैतागतो. दोघांना सारखीच कपडे का? कधी कधी मग वडील मला समजवतात"सच्चू तुम्ही दोघं भाऊ ना मग काय वाईट आहे सारखी कपडे घालायला." पण मला हे कधीच पटत नाही.

चला! पुन्हा एकदा आपल्याला नविन कोर्‍या पुस्तकांचा वास घ्यायला मिळेल. मी मनाशीच म्हटलं आणि त्यांची वाट पाहू लागलो. नव्या-कोर्‍या पुस्तकांचा वास घ्यायला मला खूप आवडतं. दरवर्षी हट्टाने नविन पुस्तकांची मागणी करतो ते एवढ्यासाठीच! संध्याकाळी आठ नऊच्या सुमारास वडील आणि भाऊ घरी परतले. दादाला दारात पाहताच त्याच्यावर झडप घालून मी त्याच्याकडची पिशवी पळवली. मला वाटलं माझी पुस्तकं असतील त्यात. पण पुस्तकं बाहेर काढल्यावर पाहिलं तर ती दादाची कॉमर्सच्या शेवटच्या वर्षाची पुस्तकं होती. माझ्या पुस्तकांची पिशवी अण्णांच्या हातात होती. आता त्यांच्या हातातली पिशवी खेचण्याचा सवालच नव्हता. असा आगाऊपणा केला असता तर आईकडून पाठीत जोरदार रट्टा खावा लागला असता. वडीलांनी शांतपणे पिशवी खाली ठेवल्यावर मग मी हावर्‍यासारखं त्यातलं एक एक पुस्तक बाहेर काढून ते न्याहाळायला सुरूवात केली, त्या नविन पुस्तकांचा कोरा करकरीत वास नाकात साठवून घ्यायला लागलो.

रात्री दादा त्याचं इकोचं पुस्तक घेऊन नोट्स काढत बसला होता. त्याच्या बाजुला बसत इमानदारीने मी वह्या-पुस्तकांना खाकी कवर घालायला सुरूवात केली. आता शांत बसतील ते भाऊसाहेब कसले..!

"सच्चू तुला माहितेय का, निकालानंतर विद्यार्थ्यांना शाळेतल्या तुकड्या कशा विभागून देतात ते." मला गोंधळात टाकणारा प्रश्न विचारत दादाने सुरूवात केली. त्याच्या आवाजतला खट्याळपणा मला लगेच जाणवला. म्हटलं बघू काय म्हणतोय ते.

"नाही." "का?"

"'अ' तुकडी अभ्यासू मुलांसाठी..."

"'ब' तुकडी अभ्यासात बर्‍यापैकी असणार्‍या मुलांसाठी..."

"'ड" तुकडी डब्बू मुलांसाठी..."

आणि.....

गाडी कुठे वळणार याची आता मला चांगलीच कल्पना आली होती. तो काय म्हणतोय हेच बघायचं होतं.

"'क' तुकडी अभ्यासात कच्च्या असणार्‍या मुलांसाठी...."

"म्हणजे.? मी अभ्यासात कच्चाय असं म्हणायचंय का तुला.??" किंचाळत मी त्याला विचारलं. आता माझाही धीर सुटू लागला होता.

"तसं नाही रे. मी आपलं एक सांगितलं तुला."

"हॅ...जास्त शहाणपणा नको करूस. असं असेल तर मग नव्वद टक्के मिळवलेला पाल्या कसा काय 'क' तुकडीत आला?"

मग मुद्दामच मला दाखवण्यासाठी हनूवटीवर हात ठेऊन विचार करण्याचं नाटक चालू झालं. माहितेय, उघडपणे न चिडवता त्याने हे नविनच काहीतरी शोधून काढलं होतं.

पुस्तकांना कवर घालायचं बंद करून मी सरळ झोपायला गेलो. सकाळी जाग आली ती ह्या तिघांमध्ये चाललेल्या चर्चेमुळे. मला चांगलंच ऐकू होतं. मुद्दाम झोपेत असल्याच भासवत अंथरूणात पडून राहिलो आणि त्यांच्या चर्चेचा अंदाज घेऊ लागलो.

"सच्चूला निदान ह्या वेळी तरी क्लास लावलाच पाहिजे. नाहीतर तो अभ्यास नीट करायचा नाही. एकतर हे दहावीचं वर्ष आहे. त्याच्या बाबतीत असं गहाळ राहून चालायचं नाही." मातोश्री आमच्या १० वी च्या अभ्यासाची काळजी वाहत होत्या.

"काही क्लास वैगेर नको लावायला. चांगला मन लावून घरी सुध्दा अभ्यास होऊ शकतो आणि मी आहे ना. मी घेत जाईन त्याचा अभ्यास." इति बंधुराज.

"तु? तुझं नि त्याचं तर जराही पटत नाही मग तो तुझं ऐकायचा कसं?" आईची काळजी वाढतच होती.
मग वडीलांनीही मोठ्या भावाची बाजू घेत त्याच्या हो ला हो केलं. आता आई एकटी पडली. मग तो सामना आई दोन विरुध्द एक अशी हरली.

या सगळ्या गोंधळात शाळेचा पहिला दिवस उजाडला...१४ जून!

क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मी_आहे_ना's picture

17 Sep 2012 - 1:51 pm | मी_आहे_ना

सही..पुढच्या भागाची उत्सुकता लागली आहे ... पु.भा.प्र.

sagarpdy's picture

17 Sep 2012 - 2:06 pm | sagarpdy

+1

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2012 - 2:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

लगे रहो किस्ना भाई.

कपिलमुनी's picture

17 Sep 2012 - 2:30 pm | कपिलमुनी

मोठ्या भावंडांची जुनी पुस्तके वापरणे ..
हे फार मोठ दु:ख असायचं !!

गवि's picture

17 Sep 2012 - 2:33 pm | गवि

हळूहळू पात्रपरिचय होतोय आणि कथेत इनव्हॉल्वमेंट सुरु झालीय.. वाचतोय. लवकर येऊ दे. ग्याप नको जास्त.

अभ्या..'s picture

17 Sep 2012 - 4:07 pm | अभ्या..

किसन देवा सूर लागला हो आता. जाऊ द्या जोरात. मोठे स्टेशन फक्त घ्या आता. ;-)

पाल्या आणि बापलेकरचं काय चाल्लयं
आडनावं बदलता येत नाहीत पण वाचताना साऱखं पाल्य आणि बापलेकरांचं काय चाल्लयं असं वाटत होतं ;-)

प्रचेतस's picture

17 Sep 2012 - 5:30 pm | प्रचेतस

मस्तच रे किस्ना.

कथा छान रंगायला लागलीय.
पुढचा भाग लवकर येऊ देत.

पैसा's picture

17 Sep 2012 - 7:48 pm | पैसा

पुढचा भाग लवकर येऊ दे!

मदनबाण's picture

17 Sep 2012 - 7:54 pm | मदनबाण

किसना वाचतोय रे... :)

मन१'s picture

17 Sep 2012 - 8:18 pm | मन१

वाचता आहे

प्यारे१'s picture

17 Sep 2012 - 8:28 pm | प्यारे१

मस्तच रे.... लौकर लौकर येवन्दे!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Sep 2012 - 9:23 pm | निनाद मुक्काम प...

वाचत आहे

छान ओघवत लिहितोयस रे.
कीप इट अप.

५० फक्त's picture

17 Sep 2012 - 10:45 pm | ५० फक्त

मस्त लिहिलंस रे, धन्यवाद.

लेखनशैली आवडली. पहिल्यापासून वाचतिये हो किसनमहाराज.

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Sep 2012 - 8:07 pm | ब्रिटिश टिंग्या

अंमळ मोठे भाग येऊ द्यात!

- टिंग्या

वपाडाव's picture

21 Sep 2012 - 6:30 pm | वपाडाव

येइच्च बोल्ता मय...

"नाहीतरी चाळीत राहणार्‍या माणसांना पाचव्या खोलीचा वास घेउन घेउन कंटाळा आलेलाच असतो... मग निदान पहिले २ आठवडे तरी तो पुस्तकाचा वास नाकात भरुन घेण्याची घाइ नसेल तो सच्चु कुठला"...

शुचि's picture

20 Sep 2012 - 2:58 am | शुचि

हा भागही आवडला.

मृत्युन्जय's picture

20 Sep 2012 - 10:37 am | मृत्युन्जय

वाचतोय रे. तिसरा भाग लवकर टाक.

आगे बढो. वाट पहातोय.

सहज्-सरळ अन निरागस लेखनशैली.
नववीतल्या मुलाचे विचारच वाचतोय असे वाटले..

सुहास..'s picture

21 Sep 2012 - 5:21 pm | सुहास..

रंगवतोय रे मस्त !!

प्रभाकर पेठकर's picture

21 Sep 2012 - 6:40 pm | प्रभाकर पेठकर

वाचतो आहे. लवकर पुढचा भाग येऊ द्या.

जयनीत's picture

22 Sep 2012 - 7:34 pm | जयनीत

' मुंगी सा॑खरेचा रवा ' लहानपणी कधीच आवडत नसतो पण मोठं त्याचाच गोडवा आठवत राहतो..
लिखाण आवडले.
येउ द्या पुढचा भाग लवकरच.

अनिल तापकीर's picture

4 Jan 2013 - 3:49 pm | अनिल तापकीर

मस्तच ,किसनराव .
खुपच छान

सासुरवाडीकर's picture

9 Jan 2013 - 12:08 pm | सासुरवाडीकर

चला! पुन्हा एकदा आपल्याला नविन कोर्‍या पुस्तकांचा वासघ्यायला मिळेल. मी मनाशीच म्हटलं आणि त्यांची वाट पाहू लागलो. नव्या-कोर्‍या पुस्तकांचा वास घ्यायला मला खूप आवडतं. दरवर्षी हट्टाने नविन पुस्तकांची मागणी करतो ते एवढ्यासाठीच!:हहगलो:
:

प्रचेतस's picture

9 Jan 2013 - 2:06 pm | प्रचेतस

आँ..........

मलाही तसंच झालं.. म्हणजे तसं नव्हे, आँ? असं..

बॅटमॅन's picture

9 Jan 2013 - 2:25 pm | बॅटमॅन

+१.

सारखाच चिमटा!! ;)

किसन शिंदे's picture

9 Jan 2013 - 2:32 pm | किसन शिंदे

:हहगलो:

नेमकं काय करताय? :D