१० वी 'क' - भाग ३

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
24 Sep 2012 - 7:18 am

१० वी 'क' - भाग १

१० वी 'क' - भाग २

शाळेत जावं की नाही या विचारात असतानाच आईसाहेबांनी फर्मावलं "सच्चू, आज शाळेत जायचंय रे. आज कंटाळा करशील तर संपूर्ण वर्षभर दांड्याच मारत राहशील." आता मातोश्रींचा हुकूम मोडणं तर शक्यच नव्हतं. पहिलाच दिवस असल्यामूळे वर्गशिक्षक नेमण्यात, मुला-मुलींची ओळख करून घेण्यात आणि सर्व विषयांचं दिवसाचं आणि आठवड्याभराचं वेळापत्रक ठरवण्यातच दिवस जायचा म्हणून मग मराठी, हिंदी या दोन पुस्तकांसोबत एक वही दप्तरात टाकली आणि पाल्याच्या घरी निघालो.

माझी शाळा मोतीलाल हरगोविंददास म्हणजेच मो.ह.विद्यालय! विंग्रजीत एम.एच.हायस्कूल.! या इंग्रजीतल्या एम्.एच मुळे बराच घोळ होतो, कारण न्यु इंग्लिशची पोरं आमच्या शाळेतल्या पोरांना एम्.एचची म्हणजेच मेंटल हॉस्पीटलची पोरं म्हणून चिडवतात. त्यावरून त्यांच्या आणि आमच्या शाळेतल्या पोरांमध्ये बर्याच वेळा मारामारीही झालेय. कधीकधी दादाही मला मेंटल हॉस्पीटलचा पोरगा म्हणून चिडवतो मग मी त्याच्या अंगावर धावून जातो.

इंग्रजीतल्या 'एल' अक्षरासारख्या दिसणार्या आमच्या शाळेला एकूण तीन मजले आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर समोरच विद्येची देवता असलेल्या सरस्वतीची गोजिरी मुर्ती काचेच्या पेटीत ठेवलेली दिसते. परिक्षेच्या दिवसात आणि असंच मध्ये कधी कधी आम्ही त्या मुर्तीच्या पाया पडूनच पुढे वर्गात जातो. खाली तळघरात मोठ्ठं ग्रंथालय आहे. ग्रंथालय फक्त नावालाच असावं कारण त्यातली पुस्तकं एखाद्याला दिलेली मी तरी कधीच पाहिली नाहीत. पहिली ते सातवीचे सगळे वर्ग सकाळच्या शाळेत भरतात. आणि आठवी ते दहावीवाल्यांसाठी शाळा दुपारच्या वेळेत भरते. सकाळची शाळा १२ ला सुटल्यानंतर १२.३० वाजता आमच्या दुपारच्या शाळेचे टोल पडतात. बाहेरून, रस्त्यावरून पाहिल्यावर दिसत नाही पण आतल्या बाजूस खेळण्यासाठी एक बर्यापैकी मैदानही आहे. शाळेसमोरच प्रभात नावाचं मराठी चित्रपटांचं एक टॉकीज आहे. नावाला फक्त मराठी चित्रपटांचं असावं कारण तिथे मराठी सिनेमे लागलेले तर मी कधीच पाहिले नाहीत. तिथे नेहमी त्या पडेल मिथूनचे महापडेल सिनेमे लागलेले असतात. त्यांची नावंही एकदम भयानक 'आग ही आग', चंडाल, यमराज! कधी कधी मॉर्निंग शो ला 'तसले' सिनेमेही दाखवतात. आम्ही त्या पोस्टरकडे पाहून एकमेकांना डोळे मारत हसतो. उतावळा बापलेकर एकदा पाहून आला होता तो सकाळचा शो, मग नंतर दिवसभर त्यानं माझं नि पाल्याचं डोकं खराब केलं होतं.

प्रभातच्या पलिकडे फक्त मुलींसाठी असणारी कन्या शाळा आहे. आयला! हे लय भारीय. फक्त पोरींसाठी शाळा. एकपण पोरगा नाही. मुख्यध्यापकापासून ते शिपाईपर्यंत तिथे सगळ्या बायकाच असाव्यात कदाचित. आमच्या शाळेत ज्यु.कॉलेज पण आहे तिथल्या काही पोरांचे 'माल' कन्या शाळेत आहेत. सफेद शर्ट आणि काळी पॅंट अशा वेटरच्या वेशातले आमच्या ज्यु. कॉलेजचे मजनू आणि कन्या शाळेतल्या लैला हातात हात घालून रस्त्याने बर्याच वेळा एकत्र जाताना दिसतात. मला आणि पाल्याला ह्या असल्या गोष्टी खुप कमी माहित आहेत. मात्र बापलेकरला अशा बर्याच पोरांच्या भानगडी माहित आहेत ज्यामुळे आमचे 'सामान्य ज्ञान' खुप वाढलेय. कुठला मुलगा कोणत्या पोरीसोबत कुठे पिच्चर बघायला जाणारेय हे त्याला बरोब्बर माहित असतं.वासकाढ्या आहे एक नंबरचा. ते दादर का फादर काहितरी आहे खुप लांब. तिथूनही बरीचशी पोरं आमच्या शाळेत येतात.

शाळेच्या डाव्या बाजुला प्रचंड मोठ्ठा तलाव आणि मागच्या बाजूला एक मशीद आणि कब्रिस्तान आहे. मशिदीच्या बाजूला आईने मनाई केलीय त्यामुळे आम्ही सहसा तिकडे फिरकत नाही. घरातून शाळेकडे यायचा रस्ता तलावाच्या बाजूनेच येतो. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जायला आम्ही हटकून तलावाच्या बाजूचा रस्ता पकडतो. जाम मजा असते. तलावाच्या काठावर बरीचशी पोरं-पोरी प्रेमाचे चाळे करत बसलेली असतात. ह्याचा हात तिच्या गळ्यात आणि तिचे हात ह्याच्या कंबरेभोवती. दोघांच्या मधून मुंगीही जावू शकणार नाही इतके चिटकलेले.

दादूचंही कॉलेज दुपारचं असतं म्हणून मग बॅग गळ्यात अडकवत त्याने कॉलेजला जाण्यास सायकल बाहेर काढली.
"सच्चू, चल सोडतो तुला." निघता निघता मला म्हणाला. नको म्हटलं. जाता जाता मध्येच चिडवायला सुरूवात केली तर. शाळा साडेबाराची होती पण अर्धा तास लवकर जावं म्हणून साडेअकरालाच घरातून बाहेर पडलो. पाल्याच्या घरी पोहचलो तेव्हा तो ही सगळं आवरून शाळेतच निघाला होता. बापलेकरचा, साल्याचा अजूनही पत्ता नव्हता. कुठे तडमडला होता देव जाणे. घरापासून थोडं पुढे गेल्यानंतर एक बरंच मोठं आब्यांच झाड आहे. एकदम डेरेदार! ते ठिकाण म्हणजे आमची हक्काची थांबण्याची जागा. आमचा अड्डा.! झाडाखाली जावून थांबलो. शाळा भरायला तसा १०-१५ मिनिटांचा अवधी होता. मग निवांत बसलो. वर्गात कोणता बेंच पकडायचा ते कोणती पोरं-पोरी वर्गात असतील इथपासून ते वर्गशिक्षक म्हणून कोणी याव ते कोणते विषय कोणी शिकवावेत इथपर्यंत बर्याच प्रश्नांवर मी आणि पाल्याने चर्चा केली. वर्गशिक्षक म्हणून महाजन बाई किंवा दळवी बाई याव्यात यावर आमचं एकमत होतं. पण पुन्हा सुर्यवंशी सरच यावेत कि पाटील सर यावेत यावर मात्र आमच्यात मतभेद झाले. टोल पडण्याआधीच शाळेत पोहचलं पाहिजे या विचाराने ती चर्चा मग तिथेच थांबवून आम्ही पळत पळत बारा पंचवीसला शाळेत पोहचलो.

पहिलाच दिवस असल्याने बरीचशी पोरं शाळेत आली नव्हती. काही मोजकेच विद्यार्थी दिसत होते. वर्गातलं कोणी दिसतंय का, या आशेने आम्ही सगळीकडे नजर फिरवली. मग साळुंखे, केदारी, हरेकर, कदम हि सगळी मध्यम हुशार कॅटेगरीतली पोरं जिन्यात उभी दिसली. आमचा वर्ग दुसर्या मजल्यावर होता.

टण..टण्..टण्..टण्..टण..

टोल पडल्यानंतर संथपणे चालत आम्ही आमच्या वर्गात जाऊन बसलो. आमच्या सोबत ९ वी 'क' मध्ये असणारे काही ओळखीचे चेहरे, ९ वी 'ब' आणि ९ वी 'ड' मधून आलेले काही अनोळखी चेहरे यांनी सगळा वर्ग भरून गेला. वर्गात प्रवेश करण्यासाठी डाव्या बाजुला एक दरवाजा आहे त्यासमोरच्या दोन ओळींमध्ये मुलींचे बेंच होते आणि त्यापलीकडच्या दोन ओळी मुलांच्या बेंचच्या होत्या. फळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक बेंच होता. त्यातला मुलांच्या बाजुला ठेवलेला बेंच पटकवायचा हे मी आणि पाल्याने आधीच ठरवून टाकलं होतं. वर्गातली वर्षभर बसण्याची एखागी फिक्स जागा मिळवायची असेल तर पहिल्याच दिवशी शाळेत येण्याला पर्याय नसतो हे आम्हाला आधीच माहित होतं.

प्रार्थनेचे टोल पडले. 'या कुन्देन्दू तुषार हार धवला' सरस्वती स्तवन सुरू झालं आणि बेंचमध्येच आम्ही उठून उभं राहिलो. मग वंदे मातरम झालं. वर्गशिक्षक म्हणून अजूनही कोणी आलं नव्हतं त्यामुळे वर्गात नुसता गोधंळ सुरू होता. पाच-दहा मिनिटांनी इंगळे बाईंनी घाईघाईत वर्गात प्रवेश केला.

"गुड आफ्टनून मॅडम!" आफ्टरनून मधला 'र' मधल्या मध्ये खात सगळा वर्ग गडबडीत उठून उभा राहिला.

"अं...हं. बसा बसा."

"मी तुमची वर्गशिक्षिका म्हणून आलेय, तुम्हाला इतिहास शिकवणार." इंगळे बाईंनी असं म्हणतात वर्गातल्या बर्‍याच जणांच्या कपाळावर एक सुक्ष्म आठी पडल्याचं मला दिसलं. त्याला कारणही तसंच होतं. हि इंगळी एक नंबरची मारकुटी बाई होती. हिच्या इंगळीचा ज्याला ज्याला डंख होई तो दुसर्‍या दिवशी हमखास गैरहजर राहत असे. ऐला!! गेलाबाजार ठोंबरे बाई किंवा जाधव बाईसुध्दा चालल्या असत्या. हि नसती ब्याद उगाच आमच्या वर्गाला आली. माझ्यासोबत वर्गातल्या प्रत्येकाच्या मनात हेच विचार आले असणार.

"चला. प्रत्येकाने आपापली नाव सांगा बर." इंगळी आल्या आल्याच सुरू झाली.

पहिली सुरूवात मुलींकडूनच झाली. सुरूवातीच्या आठ-नऊ मुलींनी नावं सांगितली असतील तोच मराठीचं पुस्तकं हातात घेतलेल्या ठोंबरे बाईंनी अचानक वर्गात अवतरल्या.

"अहो इंगळे मॅडम हा माझा वर्ग आहे, १० वी 'क'!"

"अहो पण हा १० वी 'ब' आहे ना?" इंगळी गोंधळली. १० वी ब मध्ये जायच्या एवजी इंगळे बाई चुकून आमच्या वर्गात आल्या होत्या. आता वर्गातल्याही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी आशेची पालवी फुटू लागली.

"नाही हो बाई. हा १० वी 'क' चा वर्ग आहे." सारा वर्ग एकसुरात ओरडला.

"ओह. सॉरी हं." ठोंबरे बाईंची माफी मागत इंगळे बाई निघून गेल्या.

वर्गातल्या तणावपुर्ण चेहर्‍यांची जागा आता खेळकर हसर्‍या चेहर्‍यांनी घेतली. इंगळे बाई गेल्याचा जवळ जवळ प्रत्येकालाच आनंद झाला होता. आता परत एकदा 'गुड आफ्टरनून मॅडम' झालं. ठोंबरे बाई पाच मिनिटं जरा निवांत बसल्या मग डोळा मिचकावत म्हणाल्या "वैतागला होतात ना, इंगळे बाईंना पाहून?"

सारा वर्ग हसला.

पुन्हा एकदा ओळख परेड सुरू झाली. प्रत्येक जण उठून आपलं नाव आणि आधीची तुकडी सांगू लागला.

"मे आय कम इन मॅडम?" दरवाज्यातून एक मुलगी अतिशय मधाळ आवाजात विचारत होती. माझं लक्ष मराठीच्या पुस्तकात गुंतलं होतं. इतका गोड आवाज कानावर पडल्यानंतर मी चमकून वर पाहिलं.

"मी आकांक्षा कुलकर्णी.! घरातून निघायला थोडा उशीर झाला." शाळेत यायला उशीर झाल्याने थोडसं ओशाळतच तिने आपली ओळख करून दिली.

पोटात गपकन खड्डा पडला तिला पाहिल्यानंतर. सर्वांगातून एक गोड कळ झिणझिण्या मारत मेंदूपर्यंत पोहचली. ह्रदयाचे ठोके एकदम जलद गतीने वाढू लागले होते. वर्गातल्या बाकीच्या मुलांचा एकदम विसर पडला.

ऐ काश के अब होश में हम आने ना पाऐ......

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सूड's picture

24 Sep 2012 - 8:01 am | सूड

हम्म्म!! बरं.

प्रचेतस's picture

24 Sep 2012 - 9:08 am | प्रचेतस

सच्चुचं काही खरं नाही आता.

शिल्पा ब's picture

24 Sep 2012 - 9:16 am | शिल्पा ब

शाळा ! चांगलं लिहिलंय.

पैसा's picture

24 Sep 2012 - 9:33 am | पैसा

पुढे काय झालं? :D

स्पा's picture

24 Sep 2012 - 9:43 am | स्पा

जे बात
हिरवीणीची वेणट्री झाली तर..

भारीये बाप्पू

sagarpdy's picture

24 Sep 2012 - 11:20 am | sagarpdy

+१

गवि's picture

24 Sep 2012 - 10:12 am | गवि

ओहो... सच्चूचं रोलिंग सुरु झालेलं आहे.... सरसावून बसतो..

किती किती चेहरे डोळ्यासमोर आले म्हणून सांगू?! अगदी पावडरच्या सुगंधासहित,,,

मी_आहे_ना's picture

24 Sep 2012 - 3:12 pm | मी_आहे_ना

गवि, तुमचे प्रतिसाद सुद्धा तुमच्या लेखांसारखे 'अरे हे तर आपल्या मनातलेच' असतात
;)

संजय क्षीरसागर's picture

24 Sep 2012 - 10:16 am | संजय क्षीरसागर

कथेची मांडणी उत्तम!

अन्या दातार's picture

24 Sep 2012 - 10:41 am | अन्या दातार

ब्वार्र

लिहिण्याची शैली छान आहे, पण...

'खरं सांगु, फार सरधोपट मार्गानं जातंय सारं, पहिल्या भागात म्हणलं होतं ना, वाचण्यापासुन वाचा.
ते' सिनेमे आणि दुस्-या शाळेतल्या मुली हे सोडुन नववी दहावीच्या वर्गात शाळेत बरंच काही होत असतं, ते जे होतं त्याला थोडासा स्पर्श केलात तर अजुन मजा येईल.

आणि भुत्-वर्तमान- भविष्यकाळाचं पण बघा जरा.

स्पा's picture

24 Sep 2012 - 10:50 am | स्पा

@आणि भुत्-वर्तमान- भविष्यकाळाचं पण बघा जरा.

ह्म्म्म्म... खरय

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Sep 2012 - 10:48 am | विश्वनाथ मेहेंदळे

आयला किसन्या, भारी लिवलय बे. तू इतके चांगले लिहितोस हे माहित नव्हते. ;-)

समीरसूर's picture

24 Sep 2012 - 11:32 am | समीरसूर

एकदम मस्त चाललीये ही लेखमाला! अगदी शाळेच्या आठवणीत अलगद नेऊन सोडणारी! आणि आत तर काय 'मधाळ आवाज', ' गोड झिणझिण्या' वगैरे सुरु झाल्यात; म्हणजे मज्जा येणार हे नक्की! :-)

बाय द वे, या गोड झिणझिण्या वयाच्या कुठल्या वर्षापर्यंत येतात? जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? ;-)

स्साला, कंपनीच्या बसमध्ये एखादी छान मुलगी शेजारी आली की या झिणझिण्या (अजूनही) सुरु होतात आणि मग दिवसभर छळत राहतात. मी बसमध्ये सहसा वर्तमानपत्र वाचत असतो. असं कुणी मधाळ शेजारी आलं की मग कसलं वर्तमानपत्र आणि कसलं काय. नजर पानांवरून नुसती भिरभिरत असते; अक्षरं दिसत नाहीत; बातम्यांची ठळक अक्षरे फेर धरून हृदयात 'तुमसे मिल के दिल का जो है हाल क्या कहें, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे...' मुक्त स्वरात गायला लागतात आणि मग बसमधून उतरेपर्यंत हा अंताक्षरीचा खेळ सुरु असतो. खाली उतरल्यावर पुन्हा सगळी अक्षरे ताळ्यावर येतात; ममता बॅनर्जी पुन्हा थयथयाट करतात; पंतप्रधान पुन्हा एकदा सिंगल ब्रँडची महती गातात; पेट्रोलचा भडका उडतो; डिझेलची चकमक झडते वगैरे वगैरे.......

उफ्फ आह या गोड झिणझिण्या सांगा का बरे छळती
धुंद सुवासामागे नेहमीच मनाचे घोडे का बरे पळती

है जवाब, किसी के पास?

वपाडाव's picture

24 Sep 2012 - 11:57 am | वपाडाव

आंदो... और आंदो...

बॅटमॅन's picture

24 Sep 2012 - 12:44 pm | बॅटमॅन

पुढचे लौकरच येऊदे.....ये...ये..ये!!!!!!!!!

गणपा's picture

24 Sep 2012 - 3:43 pm | गणपा

सगळे एका माळेच मणीच शेवटी. =))
७-८-९ मध्ये पोरींशी भांडणार्‍यांना १० वीत एकदम त्यांच्यासाठीच उसासे वैग्रे टाकता ना पहिलय. ;)

फक्त ५०रावांशी थोडासा सहमत.

इरसाल's picture

24 Sep 2012 - 5:17 pm | इरसाल

६/७/८ मधे भांडणार्‍यांना ९/१० मधे चिठ्ठ्या-चपाट्या देण्यासाठी झाड-तरुंच्या मागे पळताना/लपाछपी करताना पाहिलय. अब बोलो.

कवितानागेश's picture

24 Sep 2012 - 6:40 pm | कवितानागेश

छान लिहिलय..
बाकी, आकांक्षा कुलकर्णी नक्की दहावी-क मधलीच आहे ना? की तीपण चुकून आली? आणि आता इंगळीच्या वर्गात जाईल.... अशी शंका आली . ;)

आकांक्षा कुलकर्णी इंगळीच्या वर्गात जाण्याअगोदरच सच्चूला इष्काची इंगळी डसली हो ऽ ऽ ;)

मो.ह.विद्यालय,ही तर माझी शाळा ! :)
बरेच मिपाकर मो.ह. चे आहेत रे किसना ! ;)

अभ्या..'s picture

24 Sep 2012 - 11:08 pm | अभ्या..

काय खरं नाय आता. दहावीचं ;-)
(बनकर खाली बघ. पुस्तकात बघ मराठीच्या. दरवाज्याकडे काय आहे बघण्यासारखं ? ;-) )
लिहा लिहा किसन्धेवा.

रोमॅन्टिक टर्न येतो आहे तर !

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2012 - 1:45 am | श्रीरंग_जोशी

कथा प्रथमपासून रोचक वाटत होतीच पण या भागातील घडामोडीमुळे ती एका नाजुक वळणावर येऊन ठेपली आहे.

आता लेखक महोदय किती कौशल्याने वळवतात याची उत्कंठा लागून राहिलेली आहे.

मैत्र's picture

26 Sep 2012 - 4:20 am | मैत्र

मस्त चालली आहे कथा.. मुंबईचे उल्लेख असले तर उगाच काही संदर्भांमुळे "हाती घ्याल ते.." ची आठवण आली :)
"१०वीचं भयाण वर्ष.." या शेवटाला बदलून झकास नवी सुरुवात केली आहे..

अनिल तापकीर's picture

5 Jan 2013 - 3:37 pm | अनिल तापकीर

झकास चालु आहे
मजा येतेय वाचताना

हे वाचून एकदम शाळेची आठवण झाली. शाळेनंतर आजच इतक्या वर्षांनी ह्याचा उल्लेख ऐकलं. जबरा. ऑफिस च्या क्युबिकल मधून डायरेक्ट शाळेच्या वर्गात...अहाहा सगळा फ्लॅशबॅक समोर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2017 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर लिहितात का हे किसन शिंदे ?
भेटायचं आहे त्यांना.....

-दिलीप बिरुटे

याचा पुढचा भाग सापडत नाही. किसना, लिहीलायस का?

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2022 - 1:37 am | श्रीरंग_जोशी

भाग ४भाग ५ चे दुवे वर अनुक्रमणिकेत आहेत. परंतु त्यापुढे मालिका थांबलेली दिसत आहे. मालिका पूर्ण करण्याचे किसनदेवांनी मनावर घ्यावे.

५ भाग आलेत ते माहीत आहेच. पाचव्या भागावरही नऊ वर्षांपूर्वी प्रतिसाद दिलेला आहे. एकूण ही मालिका पुढे लिहीली का असे विचारायचे होते. या आळशी मनुष्याने ती लिहीली नाहीये हेही माहीत होते. पण एक आपली पद्धत म्हणून तसं म्हटलं. खरा अर्थ :" मेल्या किसना लिही की अता पुढचं .."