नमस्कार मंडळी,
माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष आणि अरसिक माणसाचा चित्रपट परिक्षणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.तेव्हा परिक्षण विस्कळीत वाटल्यास ते समजून घ्यावे ही विनंती.
त्याचे झाले असे की गेल्याच आठवड्यात एन.डी.टी.व्ही वर २०१२ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास नक्की कसे निकाल लागतील याविषयीचा ओपिनिअन पोल दाखवला होता.हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी तो कार्यक्रम अर्थातच चुकविला नाही.त्या कार्यक्रमात निवडणुकविषयक प्रश्नांबरोबरच सर्वेक्षणात विचारलेल्या इतर प्रश्नांनाही लोकांनी नक्की कसे प्रतिसाद दिले हे पण दाखविले होते.त्यातच एक प्रश्न होता-- भारताने पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला प्रयत्न करावा का? त्याला ५७% प्रतिसादकर्त्यांनी "नाही" असे उत्तर दिले. पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला महाराष्ट्रातील ८०% प्रतिसादकर्त्यांनी विरोध दर्शविला. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची मोठी झळ मुंबईला लागली आहे त्यामुळे या प्रश्नाला महाराष्ट्रातून नकारात्मक मत येणे समजण्यासारखे आहे.पण उत्तर भारतातील दिल्लीत ६६%,पंजाबात ७२% तर हरियाणात ८०% प्रतिसादकर्त्यांनी पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला पाठिंबा दर्शविला याचे मला आश्चर्य वाटले. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील पंजाबमधून निर्वासित होऊन आलेले हिंदू उत्तर भारतातील याच राज्यांमध्ये स्थायिक झाले होते.तसेच पाकिस्तानात हिंदूंच्या झालेल्या कत्तलींची सर्वात जास्त प्रतिक्रिया उत्तर भारतात विशेषत: आपल्या पंजाबमध्ये (त्यावेळी हरियाणा आणि दिल्ली पण पंजाबमध्येच होते) उमटली होती.या दु:खद घटनांमुळे आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानातून आलेले निर्वासित जास्त उत्तर भारतात स्थायिक झाले असल्यामुळे पाकिस्तानविरोध उत्तर भारतात असेलच असे मला वाटले होते.या घटना अनुभवलेली पिढी आता म्हातारी झाली आहे. त्यातले अनेक लोक कदाचित हे जग सोडूनही गेले असतील/आहेत.तरीही आपल्या आई-वडिलांना/आजी-आजोबांना पाकिस्तानात मिळालेल्या वागणुकीबद्दल नव्या पिढीच्याही मनात प्रचंड राग असेल अशी माझी कल्पना होती.पण ते तितक्या प्रमाणात सत्य दिसत नाही.
या प्रकारावर मी माझ्या फेसबुकवर स्टेटस लिहिले.त्यावर माझा "मग्गू" अडनावाच्या आय.आय.एम मधील मित्राने मला ई-मेल करून काही गोष्टी लिहिल्या."मग्गू" हे "मट्टू" या काश्मीरी अडनावाशी साधर्म्य असलेले अडनाव आणि गोरा रंग यामुळे तो काश्मीरी असावा अशीच माझी बरेच दिवस समजूत होती.पण "मी काश्मीरी नसून पंजाबी आहे" असे त्याने सांगितल्यावर मी त्याला विचारायचे इतर काही प्रश्न विचारणे टाळले होते.पण माझ्या फेसबुक स्टेटसवर पाठविलेल्या ई-मेलमध्ये त्याने लिहिले की त्याचे आजी-आजोबा पश्चिम पंजाबमधील "झांग" मधून दिल्लीला निर्वासित म्हणून आले.तसेच दिल्लीमध्ये आजही पाकिस्तानातील ठिकाणांवरून काही भागांची नावे आहेत.उदाहरणार्थ १९४७ नंतर दिल्लीमध्ये गुजरॉंवाला टाऊन,मियॉंवाली व्हिलेज अशा प्रकारच्या नावांच्या वस्त्या झाल्या.तसेच पश्चिम पंजाबातून १९४७ मध्ये आलेल्या निर्वासितांच्या पुढच्या पिढ्या आजही एकमेकांना त्यांच्या मुळच्या ठिकाणावरून ओळखतात.म्हणजे माझा मित्र मुळचा "झांग" चा म्हणून "झांगी", मुळचे "बन्नू"चे असलेले "बन्नूवाला" म्हणून तर मुळचे लाहोरचे "लाहोरी" म्हणून ओळखले जातात. माझ्या मित्राने एक वाक्य लिहिले: "All of such people who have roots in Pak can't imagine that the people there wud be different." म्हणजेच १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सिरिल रॅडक्लिफने नकाशावर एक रेषा आखली आणि भारत आणि पाकिस्तान हे वेगळे देश झाले तरी आपल्या पंजाबातील आणि त्यांच्या पंजाबातील लोकांची राहणी, जीवनमान, सवयी इत्यादी सारखेच आहे आणि त्यामुळे उत्तर भारतातील त्या भागातून पाकिस्तानशी मैत्री करायला जास्त पाठिंबा मिळतो असे म्हणायचा माझ्या मित्राचा उद्देश आहे असे वाटते.तसेच माझ्या मित्राने मला "खामोश पानी" हा पाकिस्तानी चित्रपट बघ असेही सांगितले.हा चित्रपट युट्यूबवर उपलब्ध असल्यामुळे मी तो ताबडतोब बघितला.हा चित्रपट पंजाबी-उर्दूमध्ये असला तरी इंग्रजी सबटायटल असल्यामुळे तो समजायला काही प्रश्न आला नाही.
गोष्ट आहे १९७९ मधील.स्थळ-- पश्चिम पंजाबमधील चरखी हे लहानसे गाव.या गावात आयेशा नावाची एक पापभीरू स्त्री राहत असते. तिला सगळे गाव आयेशा चाची नावाने ओळखत असते.तिचे सगळे विश्व तिचा मुलगा--सलीमभोवती फिरत असते.आपल्या दिवंगत पतीच्या पेन्शनवर आणि गावातील मुलींसाठी कुराणाचे क्लास घेऊन ती आपली गुजराण करत असते.ती स्त्री गावात सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागत असते.पण या स्त्रीविषयी एक गौडबंगाल असते.ती स्वत: विहिरीवर पाणी भरायला कधीच जात नसे तर गावातील इतरांना पाणी भरून आणायला सांगत असे.
एक दिवस गावच्या मुखिया चौधरीच्या घरी लग्न असते.तिथे दोन पाहुणे येतात.त्यांच्या एकंदरीत हावभावावरून, पेहरावावरून आणि दाढीवरून ते मुलतत्ववादी असणार हे लगेच कळते.लवकरच अफगाणिस्तानवर रशिया आक्रमण करणार असून आपल्या भाईबंदांना आपण वाचवायला हवे, जनरल झिया उल हकनी इस्लामी कायदा आणला आहे ही चांगली गोष्ट आहे आणि आपण सगळ्यांनीच मूळच्या इस्लामला अभिप्रेत असलेली जीवनपध्दती अंगिकारायला हवी अशा प्रकारचा प्रचार करायला ते सुरवात करतात.असा प्रचार ऐकून घरी आलेल्या सलीमला त्याच्या आईने-- आयेशाने विचारले--"सब ठिक है?" आणि त्याला सलीमने उत्तर न देता चित्रपटात दाखवलेली शांतता बरेच काही सांगून जाते.पुढे हे दाढीवाले पाहुणे सलीमला रावळपिंडीला "प्रोफेसर साहेबांचे" भाषण ऐकायला घेऊन जातात. "१९४७ मध्ये आपण धर्माच्या नावावर हा देश मिळवला पण ती "पाक" भूमी कुठे आहे?राजकीय नेत्यांनी/टीव्हीने देशाला बिघडवले आहे.आज आपल्या देशात स्त्रिया त्यांचे डोके आणि चेहरा उघडा ठेऊन बाहेर पडूच कशा शकतात?इस्लामचा खरा अर्थ समजून या आणि पुढच्या जगातही काही मिळवायचे असेल तर रशियनांविरूध्द जिहादसाठी पुढे या" अशा स्वरूपाचे विखारी भाषण या प्रोफेसरसाहेबांनी केले.या प्रचाराचा सलीमवर परिणाम होत असलेला दिसतोच.हे भाषण ऐकून भारावलेला सलीम घरी परत येत असतानाच त्याच्या आईने--आयेशाने "केवळ मुस्लिमच जन्नतमध्ये जायला पात्र आहेत असे नाही तर चांगली कृत्ये करणारे सगळेच जन्नतमध्ये जाऊ शकतात" असे क्लासच्या मुलींना सांगणे यातला विरोधाभास दिग्दर्शकाने अगदी प्रभावीपणे दाखविला आहे.तसेच झियांच्या इस्लामी कायदा आणायच्या निर्णयानंतर गावात कसा बदल व्हायला लागला--नमाजाच्या वेळी आपली दुकाने बंद करून मशिदीत नमाजाला जावे असे फर्मावणारे डोके भडकलेले तरूण दिसू लागले आणि यापूर्वी दाढी-मिशा न वाढवणारा सलीमही दाढी ठेऊ लागला यातून सगळ्या वातावरणाचा सलीमवर झालेला परिणाम पण तितक्याच प्रभावीपणे दाखविला आहे.आपला मुलगा धर्मांधांच्या मार्गाला गेलेला बघून आयेशाच्या मनात होत असलेली कालवाकालव बघून खरोखरच वाईट वाटते.तसेच "लव्ह मॅरेज" ही आपली संस्कृती नाही या पाहुण्यांच्या सांगण्यामुळे सलीम झुबेदाला टाळायला लागला आणि ते दु:ख झुबेदाच्या डोळ्यात दिसते आणि नकळत आपल्यालाही वाईट वाटते.
यानंतर आयेशाच्या आयुष्यात एक वादळ येते.भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक करार होतो आणि या कराराप्रमाणे काही शीख तीर्थयात्रींना पाकिस्तानातील त्यांच्या देवस्थानांना जायची परवानगी मिळते.१९४७ मध्ये मुसलमानांकडून नासविले जाऊ नये म्हणून अनेक शीख कुटुंबांमध्ये वडिलांनी आपल्या मुलींना, पतींनी आपल्या पत्नींना आणि भावांनी आपल्या बहिणींना ठार मारले होते.तसेच अनेक शीख स्त्रियांनी आपल्या शीलाचे रक्षण करण्यासाठी विहिरींमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती (हे तमसमध्ये पण बघायला मिळाले होते).आयत्या वेळी आत्महत्या करू न शकलेल्या काही शीख स्त्रिया गावात अजूनही राहिल्या आहेत अशी वदंता यात्रेकरूंमध्ये आधीच पसरलेली असते.या यात्रेकरूंमध्ये एक जसवंत सिंह नावाचा यात्रेकरू असतो.तो पत्ता काढत आयेशाच्या घरी पोहोचतो आणि मला माझ्या बहिणीला--विरोला भेटायचे आहे असे म्हणतो.आणि आपली आई मुळातली शीख होती हे सलीमलाही कळते.हळूहळू गावातले सगळे आयेशाला टाळू लागतात.मी मुसलमान आहे हे सर्वांसमक्ष आयेशाने जाहिर करावे अशी धर्मांधांची अपेक्षा असते.एकीकडे जसवंत सिंह तिला त्यांच्या वडिलांना प्राण सोडण्यापूर्वी तिला भेटायचे आहे हे सांगत असतो आणि दुसरीकडे आयेशा मी तुमच्याशिवाय माझे आयुष्य नव्याने सुरू केले हे सांगते. यापुढचा जसवंत सिंहला तिने विचारलेला प्रश्न मात्र अनुत्तरीतच करतो. एक तर आपली मुलगी मुसलमान झालेली बघून वडिल "शीख जन्नत" मध्ये जातील का? आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे "वडिल निदान शीख जन्नतमध्ये तरी जातील.पण माझे काय?मी शीख जन्नतमध्ये जाईन की मुस्लिम जन्नतमध्ये"?
चित्रपटात फ्लॅशबॅकमधून कळते की मुसलमानांनी त्यांच्या अंगाला हात लावायच्या आत शीख मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या करावी असा थोडासा दबावच त्यांच्यावर आलेला असतो.आयेशा म्हणजे मुळातली विरो मात्र त्या दबावाला बळी न पडता तिथून पळून जाते.काहीही म्हटले तरी स्वत:चा जीव द्यायला जबरदस्त धाडस लागते आणि ते तिच्यात नसेल तर चित्रपटाचा प्रेक्षक तिला नक्कीच दोष देऊ शकणार नाही.पुढे तिला मुसलमान पळवून नेतात.पण विरोच्या सुदैवाने तिला पळवून नेणारा माणूस चांगला निघतो.तो तिच्याशी लग्न करतो आणि अर्थातच लग्नापूर्वी विरोची आयेशा बनते.तरीही ज्या विहिरीच्या पाण्यात आपला जीव जायची शक्यता होती त्या विहिरीवर पाणी भरायला मात्र ती त्यानंतर कधीच जाऊ शकत नाही.
पण आयेशाच्या आयुष्यात आलेल्या या वादळानंतर तिचे सगळे जीवनच बदलून जाते.आणि शेवटी ती त्याच विहिरीत उडी मारून स्वत:ला संपविते. जे १९४७ मध्ये घडायचे टळले होते तेच १९७९ मध्ये घडते.
चित्रपटात जनरल झिया उल हक यांनी आणलेल्या इस्लामीकरणामुळे कसे दुष्परिणाम झाले हे दाखवायचा एक चांगला प्रयत्न केला आहे.मानवी स्वभावातले विविध कंगोरेही यातून पुढे येतात. मेहबूब नावाचा तेलमालिश करणारा आणि केस कापायचे काम करणारा म्हणून जातो की "काफिरांनी" आपले नक्की काय वाईट केले होते आणि "The question is whom does General Zia Ul Haq represent?" असे प्रश्न विचारतो. सलीमला धर्मांधतेच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करणारी त्याची प्रेयसी झुबेदा असे काही घटक पाकिस्तानी समाजात असतील तर ते आशेचे किरण आहेत असे नक्कीच वाटायला लावते.
चित्रपटाचे चित्रीकरण पाकिस्तानात केले आहे.फाळणीच्या वेळी सामान्यांना जे काही सोसायला लागले त्याबद्दल कोणाही सहृदय माणसाप्रमाणे मलाही खूप वाईट वाटते.त्यातूनही विरो/आयेशा सारख्या स्त्रियांचे नक्की काय झाले असेल?विरोला चांगला नवरा मिळाला पण सगळ्या स्त्रिया तितक्या सुदैवी असतील का?अशा कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत स्त्रियाच दोन्ही बाजूंच्या शिकार बनतात हे सत्य या निमित्ताने परत अधोरेखित होते.
या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय आणि पाकिस्तानी समाजात असलेली काही साम्ये आणि फरकही अगदी ठळकपणे समोर येतात.उदाहरणार्थ लग्नात "तुझी सासू चांगली निघो" अशी शुभेच्छा लग्नमुलीला देणे हा प्रकार आपल्याकडे उघडपणे होत नसला तरी मनातल्या मनात अशा शुभेच्छा नक्कीच दिल्या जात असतील.तर लग्नप्रसंगी "मर्द" आणि "जनाना" पडद्याद्वारे विभक्त करणे हा आपल्याकडे नसलेला प्रकार चित्रपटात बघायला मिळतो.मधूनच एखादी पंजाबी शिवी पण येते.तरीही एक गोष्ट मात्र खटकते आणि ती म्हणजे सलीम आणि झुबेदाचे चुंबनदृश्य. पाकिस्तानी चित्रपटात असे दृश्य बघायला मिळेल अशी अपेक्षा नसल्यामुळे ते धक्कादायक वाटते हे नक्कीच.
हे माझे पहिलेच चित्रपट परिक्षण आहे त्यामुळे ते बरेच विस्कळीत आहे याची खात्री आहे.आणि चित्रपट हा माझा आवडीचा विषय नक्कीच नाही.तरीही फाळणीविषयी (किंबहुना त्यावेळी झालेल्या रक्तपाताविषयी आणि सर्वसामान्यांना ते अमुक एका धर्माचे असल्याच्या "गुन्ह्याबद्दल" जे सोसावे लागले त्याविषयी) मला खूपच दु:ख वाटते.आणि त्यामुळेच चित्रपट परीक्षण या ओळखीच्या नसलेल्या प्रदेशात पाऊल टाकले आहे. सध्या मी इमरान खानचे पाकिस्तानवर लिहिलेले पुस्तकही वाचत आहे.वेळ मिळाल्यास त्याचेही परिक्षण जरूर लिहेन.
प्रतिक्रिया
3 Sep 2012 - 12:30 am | मन१
ह्या चित्रपटाची बरीच चर्चा ऐकली आहे.
भीष्म सहानींचे "तमस" भीषण होते; क्रूर होते. कधीच धड पहावले गेले नाही; अर्थात हेही त्याचे यशच.
अलिकडचा "खुदा के लिये" हा ह्यावरून आठवला. तोही पाकिस्त्ना, कट्टरपंथ अशाच विषयावर आहे.
मी पूर्ण पाहिलेला नाही, पण त्यातला गाजलेला नसीरुद्दीन शहा आणि दुसर्अय एका पात्राचा कोर्टातला संथ लयीत चालणारा वैचारिक सीन , साक्षीप्रसंग प्रभावी वाटला.(पटला, न पटला ते सोडून द्या. संयत ; तरीही प्रभावी होताच.)
3 Sep 2012 - 1:24 am | अन्या दातार
हा चित्रपट अर्धवट राहून गेला होता. पहिलाच प्रयत्न असला तरी परीक्षण उत्तम जमले आहे.
3 Sep 2012 - 1:31 am | अर्धवटराव
छान झालय हो परिक्षण क्लिंटनजी.
थोड्याफार याच वळणावरचा डॉ. चंद्रप्रकाशजींचा चित्रपट होता.. बहुतेक "पींजर" नावाचा. तिथे पार्श्वभूमी केवळ फाळणीची नसुन खानदानी दुश्मनी वगैरेची भर होती. त्यातही मुलीला सक्तीने पळवुन नेणारा तिच्याशी लग्न करतो (आणि मनापासुन प्रेमही). शेवटी मुलगी देखील त्याच्या प्रेमाचा अव्हेर करु शकत नाहि. (पण सगळ्याच स्त्रिया इतक्या सुदैवी नव्हत्या असा मॅसेज याही चित्रपटात आहेच)
अर्धवटराव
3 Sep 2012 - 8:40 am | सुहास झेले
अरे मस्त झालंय परीक्षण... लवकरचं बघण्यात येईल :) :)
3 Sep 2012 - 9:37 am | श्री गावसेना प्रमुख
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची मोठी झळ मुंबईला लागली आहे त्यामुळे या प्रश्नाला महाराष्ट्रातून नकारात्मक मत येणे समजण्यासारखे आहे.पण उत्तर भारतातील दिल्लीत ६६%,पंजाबात ७२% तर हरियाणात ८०% प्रतिसादकर्त्यांनी पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला पाठिंबा दर्शविला याचे मला आश्चर्य वाटले
ओपिनिअन पोल मध्ये किती लोक मत प्रदर्शन करतात्,१००% ५०% १०% की ०.१%
बाकी तिथे पृथ्वीराज चव्हाण हे उत्तम ?मुख्यमंत्री आहेत हे दाखवलय
3 Sep 2012 - 10:37 am | पुण्याचे वटवाघूळ
परिक्षण आवडले. मी कॉलेजात असताना रात्री दूरदर्शनवर तमस ही भीष्म सहानींची मालिका लागायची.त्या मालिकेचे सर्व भाग मी रात्री जागून बघितले होते. विशेषतः शेवटी शीख स्त्रिया "सत श्री अकाल" म्हणत स्वतःला विहिरीत झोकून देताना बघून अंगावर काटा आला होता.
इम्रानखानच्या पुस्तकाचे परि़क्ष्ण वाचायला आवडेल.
3 Sep 2012 - 11:43 am | मस्त कलंदर
अतिशय सुंदर चित्रपट. यात आयेशाची भूमिका किरण खेरने छान वठवलीय. छोट्या छोट्या प्रसंगांमधून मुलाचं परिवर्तन दाखवणंही खासच. तो शाळेभोवती उंच कुंपण बांधून घेत असताना झुबेदाच्या बदलत जाणार्या नजरांमधून बरंच काही कळतं.
पिंजर ही अमृता प्रीतम यांची कथा. त्यांच्या बहुतेक कथा या फाळणी-आणि त्यामुळे लोकांना भोगावे लागलेले तत्कालीन व दूरगामी भावनिक-शारिरिक त्रास यांभोवती गुंफलेल्या दिसतात. मी 'पिंजर' आधी पुस्तक वाचलं आणि त्याच रात्री सिनेमा पाहिला. सुदैवाने अमृता प्रीतम यांनी लिहिलेले संवाद जसेच्यातसे ठेवले आहेत पण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून सुखांत शेवटासाठी काहीबाही केलंय. तरीही तो चित्रपट ही छानच वाटला. पिंजर पुस्तकाबद्दल मी इथे लिहिलं होतं. नंतर हा लेख खूपच बाळबोध झालाय आणि पुन्हा मनासारखा लिहावा असं खूपदा मनात आलं, पण लिहायची वेळ अजून आली नाही.
भारत-पाकिस्तानवर आणखी एक सिनेमा आहे-रामचंद पाकिस्तानी. खेळता खेळता पाक मुलांचा चेंडू सरहद्द ओलांडून भारतात येतो. त्याला शोधायला त्याचा बाबा पाठोपाठ येतो आणि मग या जेलमधून त्या जेलमध्ये पाक गुप्तहेर म्हणून त्यांच्या रवानग्या इकडून तिकडे होत राहतात. 'पाकि ' म्हणून मिळायची ती वागणूकही मिळत राहते. शेवट काय होतो ते इथे सांगत नाही. पण आपलेही लोक चुकून तिकडे गेल्यावर त्या निरपराध्यांनाही विनाकारण शिक्षा कशी होत असेल असे सिनेमाभर राहून राहून वाटत राहते. या पूर्ण पाक कलाकारांसोबत या मुलाच्या 'रामचंदच्या' आईची भूमिका नंदिता दास हिने केली आहे.
आणखी काही फाळणीमुळे इकडे तिकडे गेलेल्या पण मनांत जन्मभूमी कायम असलेल्या लोकांच्या कथा या दुव्यावर आहेत. मूळ कथा विविध भाषेत असून त्या इथे हिंदीमध्ये अनुवादित आहे.
3 Sep 2012 - 12:03 pm | चिगो
चित्रपट बघेन.. 'पिंजर' आणि 'रामचंद पाकिस्तानी' दोन्ही चित्रपट बघितलेयत आणि आवडले आहेत. चित्रपट परीक्षण जमलेय हो, हिलरीपती.. :-)
3 Sep 2012 - 7:00 pm | पैसा
चित्रपट परीक्षणात क्लिंटनची घुसखोरी आवडली. चित्रपट सहज मिळाला तर पाहू. पाकिस्तानात अशा प्रकारचा विचार करणारे कोणी असतील यावर सहज विश्वास बसत नाही.
मस्त कलंदर चा प्रतिसाद आणि त्यातले दुवे आवडले.
4 Sep 2012 - 7:42 pm | विकास
चित्रपट परीक्षणात क्लिंटनची घुसखोरी आवडली.
सहमत! :-)
मला देखील पिंजर आठवला. तो चित्रपट त्यातील व्यक्तीरेखा आणि भुमिकांमुळे खूप आवडला होता. जेंव्हा सुरवातीस पाहीला होता, तेंव्हा ती (येथे मिळालेली ड्युप्लि़केट डिव्हीडी) अचानक शेवटच्या प्रसंगास, म्हणजे उर्मिला नक्की काय निर्णय घेते, त्या सेकंदालाच अडकली आणि पुढे ब्लँक! असला वैताग आला चार लोकांना पिंजर पाहीला का आणि शेवट काय हे विचारताना! असो. हा चित्रपट नक्कीच बघेन आणि तेच रामचंद पाकीस्तानी बद्दल. राजकपूरचे जुने-सुरवातीचे स्वप्न असलेला आणि त्याने शेवटी चालू केलेल्या पण त्याच्या पश्चात प्रकाशीत झालेल्या याच विषयावरील हिना चित्रपटाने प्रचंड अपेक्षाभंग केल्याचे या निमित्ताने आठवले. "गॉड मेड लँड आणि मॅन मेड बॉर्डर्स" का असेच काहीसे म्हणत त्याची भावनात्मक जाहीरात होयची...
काही इतर कॉमेंट्स -
क्लिंटन यांना ज्यामुळे हा चित्रपट पहावासा वाटला त्याच्या मुळाशी असलेला मुद्दा: भारताने पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला प्रयत्न करावा का? हा एनडीटिव्हीचा प्रश्न.
मला वाटते हा प्रश्न निष्कर्ष काढण्यासाठी फसवा आहे, फक्त सणसणाती बातमी होऊ शकते, जे एनडीटीव्हीने केले आहे. "भारताने पाकीस्तानशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करणार्यास" विरोध करणारे सर्वचजणं, "एका भारतीय नागरीकाने एका पाकीस्तानी नागरीकाशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास" विरोध करतीलच अशातला भाग नाही. त्याच बरोबर राष्ट्रांच्या संदर्भात (पक्षी: एनडीटीव्हीने विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात) मैत्रिपूर्ण संबंध म्हणजे नक्की काय हे त्यांनी कधी जाहीर केले आहे का? यात नक्की दोन्ही राष्ट्रांकडून काय अपेक्षित आहे? आपण जर मैत्रीचा हात पुढे करणार असलो तर त्याचा अर्थ नक्की काय पुढे करणार आहोत? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
क्लिंटन यांचे असे म्हणणे आहे असे मला वाटत नाही, पण असल्या कुठल्याही चित्रपटांवरून (आणि हा चित्रपट देखील पिंजरप्रमाणेच मला देखील आवडेल याची खात्री आहे.), तसेच असल्या अनेक वास्तवकथांवरून कुठलेच राष्ट्रीय हिताचे निष्कर्ष काढू नयेत असे वाटते. दुर्दैवाने, किमान आजच्या घडीस त्या दोन भिन्न गोष्टी आहेत. उद्या पाकीस्तान सरकार, आय एस आय आदींचे जर भारत आणि एकूणच जगाबाबत आणि त्याही पेक्षा स्वतःच्या जनतेबाबतचे धोरण खर्या अर्थाने बदलले तर त्यावेळेस बदललेल्या संदर्भाप्रमाणेच निष्कर्ष आणि ओपिनियन पोल्स मधील मते बदलू शकतील असे वाटते.
बाकी विरंगुळा म्हणून...
फाळणीच्या वेळी सामान्यांना जे काही सोसायला लागले त्याबद्दल कोणाही सहृदय माणसाप्रमाणे मलाही खूप वाईट वाटते
कदाचीत क्लिंटनसाहेब बँकेत काम करत असल्याने स्वतःची प्रत्यक्ष गणना सहृदय माणसांमधे करत नसावेत असे वाटले. पण त्यांनी तसे काही करायची गरज नाही असे देखील वाटले. ;)
4 Sep 2012 - 8:46 pm | बहुगुणी
विकासः
असल्या अनेक वास्तवकथांवरून कुठलेच राष्ट्रीय हिताचे निष्कर्ष काढू नयेत असे वाटते असं म्हणता ते थोडंसं पटलं तरीही 'असल्या अनेक वास्तवकथांवरून कुठलेच राष्ट्रीय हिताचे निर्णय घेऊ नयेत' असंही वाटतं का? मला वाटतं आपापल्या देशातील बहुसंख्य जनतेच्या भविष्यावर विपरित परिणाम करीत, देशाला चुकीच्या मार्गाने नेणार्या 'सरकारां'ना त्यांचे चुकीचे मार्ग सोडण्यासाठी, शांततेसाठी, रेटा लावणं हे अशाच वास्तवकथांचं, चित्रपटांचं महत्वाचं योगदान ठरेल.
4 Sep 2012 - 10:39 pm | अन्या दातार
आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणताही देश सर्वकाळ शत्रू वा मित्र नसतो. देशाच्या आर्थिक्+सामरिक सामर्थ्याच्या दृष्टीने (आणि अनेकदा राजकारण्यांच्या वैयक्तिक लाभाचाही) विचार करुन शत्रू वा मित्रत्व निभावले जाते. सर्वसामान्य जनता नेहमीच एक प्यादे असते.
जाता जाता: शूटर नावाच्या एका सिनेमातले वाक्य आठवले. पीसकिपींग फोर्समधला एक स्नायपर आपल्या स्पॉटरला सांगतो ते असे-
"There is no peace; its only shit awful calm"
4 Sep 2012 - 10:40 pm | विकास
असल्या अनेक वास्तवकथांवरून कुठलेच राष्ट्रीय हिताचे निर्णय घेऊ नयेत' असंही वाटतं का?
हा प्रश्न (अप्रस्तुत म्हणू इच्छित नाही कारण त्या शब्दातला रोख अपेक्षित नाही, कृपया गैरसमज नको, पण) भारताच्या बाजूने विचार केल्यास irrelevant आहे. मला सांगा आजपर्यंत भारतसरकारने नक्की काय केले आहे ज्यामुळे आपण भारतीय म्हणून यावरून आपल्या सरकारने राष्ट्रीय हिताचे निर्णय घेतले पाहीजेत असे म्हणायला हवे? या बाबत मला काय म्हणायचे आहे या संदर्भात -
या आणि अशा इतर अनेक प्रश्नांच्या संदर्भात भारताची भुमिका ही जर कधीच स्वतःहून कागाळी करण्याची अथवा त्याहूनही अधिक त्या राष्ट्रास काही हानीकारक करण्याची नसली, तर मग मला वाटते, आपण हा उपदेश आपल्या राज्यशासकांना करण्याची गरज नाही आणि काहीच चुकीचे केलेले नसताना उगाच स्वतः बद्दल अपराधी भावना बाळगण्याची गरज नाही. उलट, जर असे (चांगल्या अर्थाने, उपहासाने नव्हे!) उदात्त वागत असताना, आपण आपले राष्ट्रीय हीत विसरत असलो तर त्याचीच आठवण करून देणे मला महत्वाचे वाटते, इतकेच.
म्हणूनच, आपण म्हणता तसे, " देशाला चुकीच्या मार्गाने नेणार्या 'सरकारां'ना त्यांचे चुकीचे मार्ग सोडण्यासाठी, शांततेसाठी, रेटा लावणं हे अशाच वास्तवकथांचं, चित्रपटांचं महत्वाचं योगदान ठरेल." हे पाकीस्तानसाठी महत्वाचे आहे. पण तुम्हा-आम्हालाच काय आता सार्या जगाला समजले आहे, पाकीस्तान इतरांसाठीच नाही, तर स्वतःच्या जनतेविषयी, राष्ट्राविषयी देस्खील काय आहे ते...
5 Sep 2012 - 3:00 am | बहुगुणी
विकासः केवळ भारत-पाकिस्तान हे दोनच देश विचारात घेतले तर माझं स्वतःचं मत तुमच्या मताशी पूर्णपणे जुळतं, भारताने मोठया मनाचा शेजारी असल्याचं वारंवार दाखवून दिलंय हे तर सत्यच आहे, आणि पाकिस्तानी सरकारचा प्रतिसाद अत्यंत अपुरा आहे हेही उघड आहे. पण माझ्या प्रतिसादात मी जरा 'वैश्विक' पवित्रा घेतला होता, ज्यात अशा कोणत्याही दोन देशांत दीर्घ-काळच्या मतभेदांमुळे होणार्या जीवित-वित्त हानीच्या संदर्भात, असे 'विचारी आणि विचारप्रवर्तक' चित्रपट सतत आले तर त्या-त्या सरकारांना शांततेच्या दिशेने वाटचाल करायला भाग पडू शकतील असा (भाबडा?) आशावाद होता.
5 Sep 2012 - 4:08 pm | क्लिंटन
धन्यवाद बहुगुणी, विकास आणि अन्या.
मला वाटते की कोणत्याही दोन देशांमध्ये कायमस्वरूपी वैर राहू शकत नाही. मध्ययुगात युरोपात (किंवा अगदी अलीकडच्या काळात महायुध्दांमध्येही) भारत-पाकिस्तान दरम्यान जितके रक्त सांङले आहे त्यापेक्षा अनेक पटींनी रक्त सांडले आहे. तरीही युरोपात आज त्या कटुतेचा (काही कट्टरपंथी वगळले तर) नामोनिशाण नाही.तेव्हा संबंध सुधारणवण्यात दोन्ही देशांच्या नेतृत्वाची दूरदृष्टी महत्वाची आहे. भारताने आपल्या बाजूने प्रयत्न सुधारायचा होईल तितका सगळा प्रयत्न केला आहे आणि दर वेळी पाकिस्ताननेच पाठीत खंजीर खुपसला आहे.पुढच्या काही वर्षांत हे संबंध सुधारतील अशी चिन्हे दिसत नाहीत तरी कधीच हे संबंध सुधारणार नाहीत असा निराशावाद न ठेवलेले बरे.
मी गुगल बुक्सवर पाकिस्तानात भारताचे हेर म्हणून गेलेल्या आणि तिथे पकडले जाऊन तिथल्या तुरूंगात ८ वर्षे नरकयातना भोगलेल्या जालंधरच्या किशोरीलाल शर्मा यांचे My yeras in a Pakistani prison हे पुस्तक वाचत आहे. लवकरच ते विकत घ्यायचाही उद्देश आहे. मी पुस्तक जेवढे वाचले आहे त्यावरून लेखकाला पाकिस्तानी लोकांविषयी अजिबात द्वेषभावना नाही आणि पाकिस्तानातही आपल्यासारखेही लोक आहेतच असे लेखकाला म्हणायचे आहे असे जाणवते.तेव्हा आपण आपल्या बाजूने दहशतवाद्यांना अगदी १०००% ठोकण्याबरोबरच आपल्यासारखे लोक तिथे असतील तर त्यांना बरोबर घ्यायचाही प्रयत्न आपण करत आहोत तो सोडू नये असे वाटते. आणि त्याचबरोबर जर पाकिस्तानशी युध्दाची वेळ आलीच तर मात्र त्यांनी आपल्यावर अणुबॉम्ब टाकून मग आपण उत्तर देण्यापेक्षा (आपली फॉल आऊट सांभाळायची तयारी असेल तर) आपणच त्यांच्यावर पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकून त्यांचे कंबरडे मोडावे असे मला वाटते हे मी पूर्वीपण लिहिले आहे. तरी तशी वेळ येत नाही तोपर्यंत आपण आपल्या परिने ते टाळायला शक्य तेवढे करावे असेच मला वाटते.
इमरान खानचे पुस्तक वाचून झाले की त्याचे परिक्षण लिहिणारच आहे आणि किशोरीलाल शर्मांचे पुस्तक विकत घेऊन वाचल्यावर त्याचेही परिक्षण लिहिणार आहे. चर्चेत भाग घेतलेल्या सगळ्यांना धन्यवाद आणि मकीला दुव्यांबद्दल विशेष धन्यवाद.
क्लिंटन
8 Sep 2012 - 12:09 pm | मन१
My yeras in a Pakistani prison
मला उलट वाटते आहे. काही आंतरराष्त्रिय नॉर्म्स असावेत(आहेत.) ज्यानुसार गुप्तहेरांना आणि युद्धकैद्यांना मानुष वागणूक देणे उचित नाही. परवाच तीस्-चाळीस वर्षांनतर(!!) पाकिस्तानी जेलमधून सुटून आलेला भारतीय गुप्तहेर "सुरजित सिंग" हा पत्रकार परिषदेत काहीसं सूचक बोलला. त्यातून ज्काणवलं ते इतकच "पाकिस्तानी अधिकारी आपल्याल वाटतात तितके वाईट नाहीत. पाकिस्तानात भारताची जशी सुनियोजित इमेज बनवली जाते, संभाव्य धोका म्हणून, तशीच आपल्याकडेही केली जात असावी.सुरजित आणि सरबजित गेला बराच काळ सोबत आहेत. सरबजितलाही तुरुंगात मुद्दाम त्रास दिला जात नसून उचित व्यवहार होतो आहे असे सुरजितच्या बोलण्यावरून वाटले."
.
हे माझे विचार नाहीत. सुरजित च्या बोलण्याअतून हे सूचित होत होते. प्रत्येक बातमीचा धागा(विशेषतः काही थराविक विषयांवर तेच तेच विषय शीर्षक बदलून मांडाणार्यांनी) ह्या वेगळ्या बातमीकडे सोयीस्कर केलेले दुर्लक्ष खटकले.
8 Sep 2012 - 6:01 pm | क्लिंटन
या करारांना पाकिस्तानी सैन्य (निदान पाकिस्तानी सैन्यातील काही तुकड्या) किती किंमत देते हे सौरभ कालिया प्रकरणावरून समजलेच आहे.गुप्तहेरांच्या बाबतीत आणखी एक गुंतागुंत वाढवणारी गोष्ट (जी युध्दकैद्यांच्या बाबतीत नसते) म्हणजे पकडलेले लोक म्हणजे आपण पाठवलेले गुप्तहेर आहेत हे सरकार मान्य करत नाही/करू शकत नाही.त्यामुळे पाकिस्तानात पकडल्या गेलेल्या गुप्तहेरांची अवस्था अगदी बिकट होते.समजा पाकिस्तानात एखादा गुन्हा घडला आहे आणि पोलीस त्या गुन्ह्याचा तपास लावू शकले नाहीत.तर अशा वेळी अशा पकडलेल्या लोकांचा छळ करून त्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबूली त्यांच्याकडून वदवून घेऊन पोलीस स्वत:ची कातडी बचावू शकतात. किशोरीलाल शर्मांवरही ते अमरिक सिंह असून त्यांनी गुन्हा केला आहे असे त्यांच्याकडून वदवून घ्यायचा प्रयत्न झाला होता. आणि किशोरीलाल शर्मांना दिलेल्या अमानुष वागणुकीची एक झलक इथे आहे.
हो.किशोरीलाल शर्मांनाही असे काही चांगले पाकिस्तानी अधिकारी भेटलेच होते.याविषयी अधिक मी जेव्हा पुस्तकाचे परिक्षण लिहेन तेव्हा (कधी ते माहित नाही).
8 Sep 2012 - 12:04 pm | मन१
आपण जर मैत्रीचा हात पुढे करणार असलो तर त्याचा अर्थ नक्की काय पुढे करणार आहोत?
"अमन की आशा" ठाउक नव्हे काय आपणास गुरुवर्य?(ह्यास "नाही " असे म्हणत असाल तर केवळ ती आमची गंमत करण्यासाठी म्हणून मारलेली थाप आहे असे समजून आम्ही गप्प बसू.)
3 Sep 2012 - 7:31 pm | गणपा
चित्रपट परिचय आवडला.
मके दुव्या बद्दल आभार.
3 Sep 2012 - 8:18 pm | मदनबाण
चित्रपट परिचय आवडला... :)
4 Sep 2012 - 6:45 pm | क्लिंटन
धन्यवाद मंडळी.
चित्रपट परिक्षण हा माझा प्रांत नाही.त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली नव्हती.मी जवळपास चित्रपटाची सगळीच स्टोरी लिहिली आहे. त्याविषयीचे डिस्क्लेमर टाकायला हवे होते. खरे सांगायचे तर मी वर्तमानपत्रातले एकही चित्रपट परिक्षण कधीही वाचलेले नाही आणि अगदी लहानपणापासून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त चित्रपट मी बघितले नसतील (त्यातील २५+ हिलरीच्या आग्रहाखातर). तेव्हा या बाबतीत माझा अनुभव अगदी शून्य. तरीही परिक्षण ते एक डिस्क्लेमर वगळता फार फसलं नाही याचेच समाधान आहे.
परत एकदा धन्यवाद.
4 Sep 2012 - 7:00 pm | अत्रुप्त आत्मा
हम्म... बघायला हवा...
4 Sep 2012 - 7:16 pm | परिकथेतील राजकुमार
पहिल्याच झटक्यात चेंडू सिमापार गेला आहे हो मालक.
परिक्षण एकदम आवडेश. चित्रपटाचे ट्रेलर पाहिले होते, आता चित्रपट देखील नक्की बघणार. ह्याचे क्रेडिट तुमच्या परिक्षणाला.
हा चित्रपट तू-नळी वर देखील उपलब्ध आहे.
4 Sep 2012 - 7:27 pm | निशदे
परिक्षण आवडले. चित्रपटाबद्दल बरेच काही ऐकून आहे. अशा चित्रपटांबद्दल मुख्यत्वे कथेची मांडणी कशी आहे, व्यक्तिचित्रण कसे आहे अशा गोष्टींबाबत जास्त रस असतो त्यामुळे "त्याविषयीचे डिस्क्लेमर टाकायला हवे होत" याविषयी काही विशेष वाटले नाही..... :)
4 Sep 2012 - 8:37 pm | बहुगुणी
हा आणि इतर इथे चर्चेत आलेले आणि राहून गेलेले इतर चित्रपट पहायला नक्की वेळ काढणार. परीक्षणाबद्दल क्लिंटन यांना आणि एका चांगल्या दुव्याबद्दल मस्त कलंदर यांना धन्यवाद!
4 Sep 2012 - 10:43 pm | जाई.
+1
सहमत
5 Sep 2012 - 9:15 am | प्रीत-मोहर
मस्त परिक्षण. चित्रपट पर्याकडुन डाउन्लोड करुन घेउन नक्कीच बघितला जाईल.
6 Sep 2012 - 1:40 pm | दिपक
सुंदर झालेय परिक्षण क्लिंटनभौ. ह्या चित्रपटाबद्दल माहित नव्ह्ते. परा लिंकबद्दल धन्स रे. युट्युबवरुन डाऊनलोड करत आहे.
9 Sep 2012 - 3:15 am | निनाद मुक्काम प...
सिनेमा परीक्षण उत्तम झाले आहे: सदर सिनेमा आधीच पहिला होता: आणि प्रतिसाद सुद्धा दर्जेदार आहेत:
मी आधी माझ्या लेखात नमूद केल्याप्रमाणे मला लंडन मध्ये दोन्ही बाजूंच्या पंजाबी लोकांमध्ये सुसंवाद आढळला: ह्याचा अर्थ त्यांच्यात आलबेल आहे असे मुळीच नाही: पण भाषा व अनेक गोष्टी एकच असल्यामुळे कुठेतरी त्यांची नाळ जोडली जाते: इंग्रजांनी पूर्वी त्यांना हिणकस वागणूक दिली हे पतियाला हाऊस सिनेमात दाखविले आहे:
ह्यामुळे तेथे आपले बस्तान बसविण्यासाठी
कदाचित एक मेका साहाय्य करू :: असे धोरण ते राबवितात:
आज भारत पाकिस्तान ह्यांच्यात नाते सुधारले व व्यापारी संबंध वाढले तर ह्याचा सर्वात जास्त फायदा पंजाब ह्या दोन्ही कडील प्रांतांना होणार आहे ह्याची जाणीव त्यांना आहे: इंग्रजी काळात लाहोर ते अमृतसर व पुढे अफगाण पर्यंत रस्त्यांच्या द्वारे व्यापार चालायचा: आपल्याकडील काश्मीर मधून दिल्लीला जायचा सोपा मार्ग हा पाक प्र शासित काश्मिरातून जातो:
आपल्याकडील पंजाब ला १९८४ साली नेहरूंच्या नातवाच्या राज्यात जे काही भोगले: किंवा सध्या पाकिस्तानात पंजाबात दहशतवाद हा तेथील समाजात राजकारणी व आर्मीच्या समोर फोफावत आहे: ह्यामुळे भारत व पाकच्या सीमेवरील लोकांना आपल्या राजकारण्यांचा उबग आला आहे: व म्हणूनच त्यांना आता शांतता हवी आहे
: भारताने आशियात चीन समोर उभे राहावे ह्या साठी अमेरीकेला भारत व पाक ह्यांच्यात शांती ;सलोखा हवा आहे: चीन ने आखतात घुसू नये म्हणून भारताचे आखतात सौदी व इतर देशांशी संबंध सुरळीत करण्यासाठी अमेरीका प्रयत्नशील आहे: पण पाकिस्तानशी संबंध सुरळीत झाले नाही तर सर्व मुसळ केरात जाण्याची शक्यता आहे: पाकिस्तानी लष्कर व आय एस आय हे दोन गटात विभागलेले केले आहे: चीन व अमेरीका म्हणूनच चिनी माकडांच्या कह्यात असलेला गट ईशान्य भारतात दहशतवाद व अशांतता माजवत आहेत: भारत व पाकिस्तान मध्ये व्यापार वृद्धी झाली की दोन्ही कडील व्यापारी वर्ग संबंध सुरळीत ठेवण्यासाठी आपसूकच प्रयत्न करतील:
पण ह्यात मोठा अडथळा कट्टर पंथी आहेत: जे जनरल झिया च्या काळात पोसले गेले व आता स्वयंभू झाले आहेत: कालच कृष्णा ह्यांनी ही ना ह्यांची भेट घेऊन अनेक करार केले: ही चांगली गोष्ट आहे: माजवत आहे: