ज्यां दूधकि नदियां बाहे...

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
11 Aug 2012 - 1:41 am

१९७६ साली, म्हणजे माझ्या जन्माच्या जवळपास प्रदर्शित झालेला "मंथन" मी आजवर पाहिला नव्हता. मला आता राहून राहून याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे गाजलेला प्रत्येक सिनेमा मी पाहिलेलाच आहे, किंवा पाहिलेला असायला हवा वगैरे काही मनात नाही; पण माझ्याच डोक्यात घोळत असलेल्या "प्रांतांच्या गोष्टीं" च्या अनेक बीजांपैकी एक जणू साकार होऊन चित्रपटरुपात आपल्या समोर येतंय असं वाटत राहिलं. म्हणून आश्चर्य.

ही समीक्षा नाही. चित्रपट समजणे आणि तो समजाऊन सांगणे एवढी प्रगल्भता माझ्याकडे नाही. हे एक शेअरिंग आहे.

चित्रपट गाजलेला तर आहेच. एक उत्कृष्ट चित्रपट, श्याम बेनेगल - विजय तेंडुलकरांचा, ऑस्करसाठी भारताची एंट्री असलेला, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसिरुद्दिन शाह, डॉ मोहन आगाशे, अनंत नाग, अमरीश पुरी अशी तगडी स्टारकास्ट असलेला म्हणून दखलपात्र तर आहेच आहे. पण त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे "अमूल" चे आणि श्वेत क्रांतीचे शिल्पकार डॉ वर्गीस कुरीयन यांनी लिहीलेली कथा, स्वत:वर बेतलेले नायकाचे पात्र, आणि 'गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन' च्या पाच लाख शेतकरी भागधारकांनी प्रत्येकी दोन दोन रुपये जमा करुन निर्मीलेला सिनेमा या दोन बाबी या सिनेमाला एका वेगळ्या "एकमेव" कॅटॅगरीत नेऊन ठेवतात.

मंथनमधील मला भावलेल्या काही बाबींबद्दल, आणि मंथन पाहून मनात आलेल्या गोष्टींबद्दल लिहिण्याआधी थोडक्यात कथेची रुपरेखा सांगणे आवश्यक वाटते.

***********

गुजरातमधील एका दूर कोपर्‍यातील खेड्यामध्ये लोकांचे आयुष्य संथ आणि सुरळीत सुरु असते. दारिद्र्याने गांजलेल्या लोकांना त्याची सवय होऊन काही खुपत नसते. गावामध्ये एक दूध डेअरी असते. डेअरीमालक मिश्रा त्याच्या मर्जीनुसार दुधाचे दर ठरवून भरपूर पैसा जोडत असतो आणि सोबत सावकारीही करत असतो. कुणालाच त्यात काही वावगे वाटत नसते. मोठ्यांची बरोबरी लहानांनी करु नये हे साधे सरळ तत्व लहानांच्या अंगवळणी पडलेले असते, आणि मोठ्यांच्या तर सोयीचेच असते. गावात दलितांचे प्रमाण लक्षणीय असते. त्यांना आर्थिक आणि सामाजिक असा दुहेरी दारिद्र्याचा शाप असतो.

अशा वेळी दारिद्र्यनिर्मूलन योजनांआंतर्गत खेडोपाडी सहकारी तत्वांवर डेअरी सुरु करण्यासाठी एक टीम गावात येते. टीम लीडर डॉ राव हा तिशीतील उमदा आशावादी व्हेटरनरी डॉक्टर असतो. त्याची दॄष्टी केवळ जनावरांच्या आरोग्यापुरती किंवा डेअरी सुरु करण्यापुरती सीमित नसते. सहकारी सोसायटी स्थापन करुन गरीबांना आणि दलितांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देण्याचे स्वप्न तो पहात असतो. त्याच्या टीमला त्याच्या या व्हिजनशी फारसे देणेघेणे नसते. एकजण पूर्ण निराशावादी असतो. हे असले सहकारी सोसायटीचे प्रयोग बोलायला ठीक असतात, प्रत्यक्षात कधी येत नसतात वगैरे. एकजण पूर्ण प्रॅक्टिकल असतो. आपण फक्त डेअरी बघायचीय. ते सामाजिक समता आणि गावातील राजकारण याच्याशी आपला काय संबंध? तिसरा आपला मस्तपैकी लाल शर्ट घालून गावातील सौंदर्य न्याहाळण्यात (आणि जमलेच तर हाताळण्यात) मग्न असतो. ही टीमची अवस्था. गावातही परिस्थिती फारशी बरी नसते. मिश्राला तर हा तापच असतो. गावचा सरपंच सोसायटीकडे त्याचा नवा प्लॅटफॉर्म म्हणून बघत असतो. गावातील अन्य लोक उदासीन असतात.

दलित वस्तीमधील भोला हा तरुण आक्रमक वृत्तीचा असतो, त्याचाही शहरी लोकांवर अकारण (अकारण म्हणा किंवा वैयक्तिक कारणांमुळे म्हणा. त्याच्या आईला एका शहरी बाबाने फसवलेले असते असा एका संवादात पुसट उल्लेख आहे) राग असतो. अशा सर्व बाजूंनी हताश वातावरणात हार न मानता डॉ राव आपले प्रयत्न जारी ठेवतात. एका प्रसंगात जनावरांचे इंजेक्शन एका मृत्युघटका मोजणार्‍या लहान मुलाला देऊन त्याचा जीव ते वाचवतात, आणि कृतज्ञता म्हणून त्या मुलाचे पालक त्यांच्या सोसायटीत यायला तयार होतात आणि गाडी रुळाला लागते. तरी भोलाला आपल्या बाजूला आणणे, आपल्या रंगील्या टीममेंबरला अर्ध्या रात्री सामानासकट गावाबाहेर काढणे, मिश्राच्या फोडा आणि झोडा कारवायांना पुरुन उरणे हा सर्व संघर्ष डॉ रावना करावाच लागतो. बरे, पत्नीची या सर्वात साथ असावी, तर तेही नाही. तिला या लष्करच्या भाकरी आजिबात पसंत नसतात. अशातच सोसायटीच्या निवडणुकीचा प्रश्न येतो. सरपंचाचा या निवडणुकीला विरोध असला तरी डॉ राव आग्रह धरतात, आणि भोलाच्या आक्रमक भूमीकेमुळे दलित मोती सरपंचाला हरवून अध्यक्ष बनतो. हे सहन न होऊन सरपंच आपल्या लोकांकरवी दलित वस्तीला आग लावून देतो. वर कायदा सुव्यवस्थेचे कारण दाखवून पोलीस दलितांनाच आत टाकतात. त्यांना बाहेर काढण्याचे आणि सर्व सहाय्य करण्याचे नाटक करुन मिश्रा पुन्हा सर्वांना आपल्या दावणीला बांधतो. डॉ रावचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावातील एका गरजू बाईकरवी त्यांच्यावर बलात्काराची खोटी तक्रार करवतो. इकडे डॉ रावांवर वैतागलेला सरपंच त्यांची बदली करवण्याच्या पक्क्या इराद्याने राजधानीला जातो. रावांची बदली होतेच. निराश मनाने डॉ राव कुणाचाही निरोप न घेता गाव सोडून निघून जातात. पण जिद्दी भोला सोसायटी पुनर्जीवित करतो, आणि हिंमतीने चालवायला घेतो.

**********

ही झाली थोडक्यात कथेची रुपरेखा. प्रत्यक्षात सिनेमा अनेक तरल बाबींना स्पर्शून जातो. स्मिता पाटीलने साकारलेली बिंदू ही व्यक्तिरेखा म्हणजे एक आख्खा वेगळा सिनेमाच आहे असे म्हणले तरी चालेल. डॉ राव यांच्या पत्नीच्या पात्राला जेमतेम एखादा संवाद असेल नसेल, पण डॉ रावांच्या अनेक लाएबलिटीजपैकी अजून एक असे ते ओझे संपूर्ण सिनेमाभर जाणवत राहते. डॉ मोहन आगाशे त्यांच्या कॅज्युअल रिमार्क देण्याच्या शैलीत ते पात्र गावातील राजकारणापासून किती अलिप्त असावे याचा एक स्पष्ट दाखला देऊन जातात. अशा किती म्हणजे किती गोष्टी सांगाव्यात! गिरीश कर्नाडांविषयी काहीही बोलण्याची मज पामराची आजिबात लायकी नाही एवढेच बोलतो. संपूर्ण सिनेमाला व्यापून हे पात्र उरते. एखादा आदर्शवादी, तरीही व्यवहारी हिंमतवान तरूण एखादे काम तडीस नेण्यासाठी कशा प्रकारे वागेल हे अतिशय वास्तविक रीतीने या सिनेमात दाखवले आहे.
चित्रपटाचे शीर्षक गीत म्हणजे एक वेगळाच विषय आहे. अलीकडेच अमूल ने सुनिधी चौहानच्या आवाजात पुनर्मुद्रित केले आहे. छानच आहे; पण मूळ गाण्यातील गोडवा काही वेगळाच. मेरो गांव काठाबाडे ज्यां दूधकि नदियां बाहे मारो घर आंगणाना भूलो ना...सिनेमात स्मिता पाटीलच्या भावमुद्रांवर हे चित्रित केले आहे.

***********

सिनेमात सहकारी चळवळ एका दुर्गम गावामध्ये प्रतिकूल परिस्थितीत रुजवण्याचे प्रयत्न चित्रीत केलेले आहेत. अतिशय सुंदर रीतीने हे चित्रण झालेले आहे. कुठेही अतिरेक नाही. अवास्तव प्रसंग नाहीत. साहजिकच आहे. स्वतःच्या अनुभवांवर आधारित अशी कथा पद्मविभूषण डॉ वर्गीस कुरीयनांनी लिहिलेली आहे, आणि तीही श्याम बेनेगलांसोबत. विजय तेंडुलकरांची पटकथा. परफेक्ट.

************

सिनेमाची गोष्ट आणि खरी गोष्ट यात थोडे अंतर आहे. काही महत्वाचे सत्याचे अंश असे, की दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणात दुधाचे मूल्य देणे ही पद्धत कुरीयनांनी सुरु केली. त्यातून सचोटीला इंसेटिव्हाइज करण्यात आले. दुसरे म्हणजे (जात हा मागासलेपणाचा निकष ठरवून) जातीवर आधारीत गरीबांचे संघटन करण्यात आले, आणि त्यातून सहकारी चळवळ उभी राहिली. (ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा; पण अमूलचा खरा इतिहास हा असाच आहे). डॉ रावांचा आदर्शवाद आणि त्यासाठी त्यांनी झटून केलेले परिश्रमही इतिहासावर आधारित आहेत.

पण हा सिनेमा म्हणजे अमूलचा इतिहास असे मानण्यापूर्वी काही मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत. खरी गोष्ट अशी आहे, की ज्या आनंदमध्ये डॉ कुरीयननी ही चळवळ रुजवली, ते आनंद मुळीच दुर्गम नव्हते. अहमदाबाद मुंबईला जोडणार्‍या रेल्वे लाईनवर होते. (सिनेमातही रेल्वे लाईन दाखवली आहे म्हणा.) सहकारी चळवळीचे बीज आनंदमध्ये गांधीजी आणि सरदार पटेलांनी १९१८ मध्येच खेडा सत्याग्रहाने रुजवले होते. त्यामुळे सहकार तिथे नवा नव्हता. दूध व्यवसायही तिथे नवा नव्हता. पॉलसन डेअरी आनंदमधील दूध गोळा करुन मुंबईला विकायची. त्रिभुवनदास पटेलांनी या मक्तेदारीला आळा घातला. हे सरदार पटेलांचे चेले. सतत पंधरा दिवस पॉलसनला दूध द्यायचे नाही केवळ या अट्टाहासापाई शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतले. हे १९४६ साली. त्यांनी खेडा डिस्ट्रिक्ट मिल्क प्रोड्युसर्स युनियन स्थापन केली. वर्गीस कुरीयनांचे भारत सरकारशी काँट्रॅक्ट होते. त्यांना सरकारने स्कॉलरशिप दिली होती. परदेशात शिकायला. त्याबदल्यात त्यांना आनंद इथे दूध पावडर करायचे एक काम करावे लागत होते. ही म्हणजे या मेटलर्जी आणि न्यूक्लियर फिजिक्स मध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या माणसाची थट्टा होती. पण माणूस जबरदस्त सामाजिक जाणीव असलेला. राजीनामा देऊन कुरीयन तिथून काढता पाय घ्यायच्या बेतात असताना त्रिभुवनदासांनी त्यांना गाठले आणि थांबण्यासाठी गळ घातली. कुरीयनही थांबले. त्रिभुवनदास चेअरमन आणि कुरीयन जनरल मॅनेजर अशी नेता-टेक्नोक्रॅट जोडी जमली. सचोटीचे अधिष्ठान होतेच. सरकारी पाठींबा होता. लोकांचे संघटन करायला त्रिभुवनदासांची काँग्रेस आणि सरदारांची पुण्याई गाठीला होती. अमूल असे आकाराला आले.

अमूल ने केलेली तीन प्रकारे क्रांती केली असे म्हणता येते - १. गरीबांचे संघटन, आणि त्या संघटनाला अर्थकारणाची जोड, त्यातून ग्रामीण अर्थकारणाचे "मॉनेटायझेशन". २. जातीवर आधारीत संघटनातून सहकारी चळवळीचा विकास. (योग्य की अयोग्य माहीत नाही). ३. पायाभूत सुविधांचा ग्रामीण भागात प्रसार आणि डेअरीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची ग्रामीण भागाला ओळख.

अमूल अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अमूल गर्ल, अमूल साँग, मंथन सिनेमा, तसेच अमूलचे अजून एक अमूल्य योगदान स्वतंत्र भारताच्या इतिहासात आहे - नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. राष्ट्रीय पातळीवरील ही एकमेव संस्था अशी आहे, की जी अमूल सारख्या एका स्थानिक संस्थेने, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थेने निर्माण केलीय. अमूलचा प्रयोग देशभरात रिप्लिकेट करण्यासाठी आजवर या संस्थेन ९६००० सहकारी संस्थाचे जाळे तयार केलेय. राजकीय नेतृत्वाने ठरवले तर कसले जबरदस्त सामाजिक काम होऊ शकते याचे अमूल जितेजागते उदाहरण आहे.

अमूलची फिलॉसॉफी समजून घेण्यासाठी मंथन हा सिनेमा अवश्य पहावा.

समाजअर्थकारणराजकारणप्रकटनशिफारससमीक्षा

प्रतिक्रिया

ओळख अतिशय आवडली, चित्रपट बघायला पाहिजे.

सिनेमा बघायला हवा. तुमचे लेखन आवडले.

मन१'s picture

11 Aug 2012 - 12:37 pm | मन१

चित्रपट चांगला असेलसे वाटते. आजवर तो "आर्ट फिल्म दिसते साली" ह्या पूर्वग्रहामुळे पाहिला नव्हता.
.
.
.
स्मिता पाटीलने साकारलेली बिंदू ही व्यक्तिरेखा म्हणजे एक आख्खा वेगळा सिनेमाच आहे असे म्हणले तरी चालेल.
आख्खी सिन्माची ओळख वाचून "कोण बिंदु" असा प्रश्न पडलाय.
.
.
१. गरीबांचे संघटन, आणि त्या संघटनाला अर्थकारणाची जोड, त्यातून ग्रामीण अर्थकारणाचे "मॉनेटायझेशन". २. जातीवर आधारीत संघटनातून सहकारी चळवळीचा विकास. (योग्य की अयोग्य माहीत नाही). ३. पायाभूत सुविधांचा ग्रामीण भागात प्रसार आणि डेअरीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची ग्रामीण भागाला ओळख.
स्वातंत्र्योत्तर काळात रुजवण्यात येत असलेला हा टिपिकल समाजवाद दिसतो आहे.
(म्हणजे संघटन + सहकारी संस्थेचे तत्व)
हासुद्धा भारतभर प्रामाणिकपणे खरोखर अंमलात आला असता तर चित्र नक्कीच वेगळे असते. तुम्ही राजकपूरचा प्रचंड गाजलेला १९५० च्या दशकातला"श्री ४२०" पाहिलात?
त्यातला बॉलीवूडीपणा, भंपकबाजी सोडून द्या. पण एकूणच त्यावेळेला वारे कसे वाहत होते ते त्यातून दिसते.चित्रपटाच्या शेवटी "शंभर रुपयात घर देइन हो" असे म्हणत खलनायक आख्ख्या मुंबैतून हजारो लोकांच्या जमा केलेल्या पैशाला घेउन पोबारा करण्याच्या तयारीत असतो, सुरुवातीला राजकपूरनेही त्याला साथ दिलेली असते पैसे जमवण्यात. शेवटी खलनायकास तो रोखतो . क्रुद्ध जमावापुढे भाषण देतो, शेवटची दोन वाक्ये बोलतो "सौ रुपिये में कोइ घर नही बनता. लेकिन करोडो रुपियों में लाखो घर जरुर बन सकते है.(तुमच्याकडे एकत्रित भांडवल बरच आहे, इतके सगळे लोक आहात म्हटल्यावर एकेकट्या कडे काहीच नसले तरी संघटित कौशल्य बरेच आहे. संघटित श्रमही बरेच आहेत. तुमच्यापैकी कुणी विटा पाडू शकतो, कुणी रंग देउ शकतो. उरलेले घर बांधणीत श्रमाचे भागीदार होउ शकतात. एकमेकांस सहकार्य केल्यास प्रत्यक्ष घर बांधणे ते किती दूर? हे सगळ्म अध्याहृत)"
हा सगळा आदर्श्वाद १९५० च्या दशकात भारतात होता.कुठल्ही सेक्टार ऑर्गनाइझ्ड असावं, पण "कॉर्पोरेट" म्हण्वल्या जाणार्‍या प्रकारापेक्षा वेगळं असावं, त्याला काही स्थानिक अधिष्ठान असाव. स्थानिक समस्येशी एकरुप असं तो प्रोजेक्ट त्या समस्येवर एक स्वतंत्र उत्तर असावं. असा तो दृष्टिकोन होता.
तो सर्वत्र आला नाही म्हणून १९९२ पासून ट्रॅक बदलावा लागला.(बदलूनही नक्की सगळंच चांगलं चाललय की नाही ते ठाउक नाही.)
.
.
१९५०च्याच दशकात दिलीपकुमारचा "नया दौर " प्रचंड गाजला. कल्पना साधीशीच. एका श्रमकरी वस्तीचा रोजगार कायमचा जाण्याची वेळ आलेली. कारण, कारखान्याच्या मालकाने आणलेले यांत्रिकीकरण. पण "संपूर्ण यांत्रिकीकरण करुन असा मजुरांच्या पोटावर पाय द्यावा का?" असा विचार स्वत: कारखानदार(बडे मालिक) करत असो, पण छानछोकित राहणरा, निव्वळ नफ्याचा विचार करणारा कारखानदारचा मुलगा(छोटे मालिक) नाही. नाय्क(दिलीपकुमार) त्याचे च्यालेंज स्वीकरतो. आणि एका अवघड, डोम्गरदर्‍यातूंन जाणार्‍या मार्गात कारखानदारचा मुलगा ट्रक्/ट्र्रॉली घेउन निघतो, दिलीपकुमारला आव्हान असते ते ह्या ट्रॉलीच्या आधी नियोजित स्थळी पोचण्याचे. अर्थातच तो ते करतो आणि शर्यत जिंकतो. त्याचा शेवटचा डायलॉग काय आहे ? "साहब, हमें मशीनों से कोइ दुश्मनी नही है| लेकिन कुछ ऐसा रस्ता निकालिये जिसमे आप भी हो, हम भी रहे , मशीनें भी रहें|" तीच काहीशी समाजवादी शैली. योग्य अंमलबजावणी झाली असती तर शुद्ध समाजवादी वगैरे राहूनही भारत खूपच चांगला बनू शकला असता.
अर्थात, हे माझे विचार, दोन्ही पिक्चर पूर्ण पाहिलेले नाहेत, तुकड्या तुकडयत, च्यानेल बदलत पाहिलेले आहेत.
.
.
.
सरकारी पाठींबा होता. राजकीय नेतृत्वाने ठरवले तर कसले जबरदस्त सामाजिक काम होऊ शकते याचे अमूल जितेजागते उदाहरण आहे.
अगदि अगदि. व्यवस्थेवर प्रभाव असणार्‍यांची इच्छाशक्ती नि सचोटी असेल तर बरेच काही चांगले होउ शकते. तीच गोष्ट एकेकट्याला करणे दहा जन्मातही पूर्ण होणे अवघड आहे. बिहारातल्या "पहाडबाबा" केसबद्दल कुणाला ठाउक आहे का?( दोन गावात रस्ता नव्हाता, वर्षानुवर्षे, तर हे गृहस्थ स्वतः जन्मभर खोदत/बनवत बसले, एकटेच.)
चांगले, टिकाउ रस्ते बांधणे हे खरोखर इतके अवघड काम आहे का? सरकार(कुठलेही, जि प, मनपा, राज्य, केंद्र वगैरे) ते करुच शकत नाही का? असा जबरदस्त निगरगट्टपणा कुठुन येतो ह्यांच्याकडं? ह्यांचे काम हे करत नाहीत म्हणून
प्रयत्न केल्याबद्दल सामान्याचे कौतुक करण्यापेक्षा व्यवस्थेचे काम असे एकट्या दुकट्याला करावे लागते आहे ह्याबद्दल कुणालाच चीड कशी आली नाही, येत नाही ह्याचे मला त्याही वेळेला आश्चर्य वाटले होते.

रमताराम's picture

13 Aug 2012 - 7:44 pm | रमताराम

मनोबा, प्रतिसाद एकदम आवडला.
हल्ली समाजवादी विचारधारा म्हटले की 'हॅ हम्बग' असे म्हणायचे दिवस आहेत. नीरक्षीरविवेकाची आपल्या समाजाला अ‍ॅलर्जी आहे. कोणत्याही इझमला डाव्या-उजव्या बाजू असतात हे जाणून न घेता एकच इझम जणू जादूची कांडी असल्यासारखा त्याचा आक्रमक, हिंसक प्रचार करण्याची प्रवृत्ती अधिकाअधिक वाढत चाललेली असताना समाजवादी विचारातही काही - निदान तत्त्वतः - योग्य असू शकते हे लिहिणे - ते ही मराठी आंतरजालावर ! - हे सुद्धा मोठेच धाडस म्हणायला हवे. मानलं तुम्हाला.

निशदे's picture

13 Aug 2012 - 8:01 pm | निशदे

लेख आणि हा प्रतिसाद दोन्ही बहोत खूब....... :)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2012 - 2:18 pm | बिपिन कार्यकर्ते

नमस्कार, मालक!

सिनेमा नीट 'बघितला' आहे हे जाणवतंय आणि अर्थात तुमच्याकडे लिहिण्याची शक्ती असल्यामुळे लिहिलेही उत्तम आहे.

***

ही समीक्षा नाही. चित्रपट समजणे आणि तो समजाऊन सांगणे एवढी प्रगल्भता माझ्याकडे नाही. हे एक शेअरिंग आहे.

हे तुम्हाला फारसे शोभत नाही तरी अनेकांना शोभेल.

पैसा's picture

12 Aug 2012 - 8:37 pm | पैसा

मंथन सिनेमा मी ही अजून पाहिला नाही. अमूलच्या इतिहासाबरोबर इतर गोष्टी सुरेख आल्या आहेत. त्या काळात आणि त्या समाजात सहकार चळवळ रुजवण्यासाठी जातीचा आधार कदाचित अपरिहार्य झाला असावा. सिनेमाची ओळख आवडलीच. आधी कुतुहल होतं, की श्वेतक्रांती आणि सहकार चळवळीबद्दल काय सिनेमा असावा? आता नक्कीच हा सिनेमा पाहीन.

सुनील's picture

12 Aug 2012 - 9:07 pm | सुनील

त्या काळात आणि त्या समाजात सहकार चळवळ रुजवण्यासाठी जातीचा आधार कदाचित अपरिहार्य झाला असावा.

ग्रामीण भागात आजदेखिल कित्येक व्यवसाय हे जातीवर आधारीत आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ठ व्यवसाय करणार्‍यांची संघटना ही आपोआपच एका विशिष्ठ जातीचीदेखिल ठरते. हे मुद्दाम घडत नसावे.

दादा कोंडके's picture

12 Aug 2012 - 9:57 pm | दादा कोंडके

अमुलचा श्वेतक्रांतीबद्दल माहित होतं पण हा सिनेमा माहित नव्हता. सिनेमा नक्कीच बघेन. वर मनोबांचा प्रतिसाद पण वाचनीय.

या सिनेमाबद्दल माहीती नव्हती. आता बघेन.

चित्रा's picture

14 Aug 2012 - 5:45 am | चित्रा

इतक्या प्रतिसादकांना कसा माहिती नाही असे वाटले.

लहानपणी चित्रपट पाहिला होता, आता परत पाहीन. नव्याने करून दिलेली ओळख आवडली.

मन१'s picture

9 Sep 2012 - 2:11 pm | मन१

वर्गिस कुरियन गेल्याचं आताच समजलं; विनम्र श्रद्धांजली.

उत्तम समीक्षण झालेय..
चित्रपट नक्की पहावाच लागेल..
:)

सुकामेवा's picture

9 Sep 2012 - 4:13 pm | सुकामेवा

वर्गिस कुरियन गेल्याचं आताच समजलं; विनम्र श्रद्धांजली.

किसन शिंदे's picture

9 Sep 2012 - 5:10 pm | किसन शिंदे

मेरो गांव काठाबाडे ज्यां दूधकि नदियां बाहे मारो घर आंगणाना भूलो ना

अमुलची जाहिरात लागली कि गाणं चालू व्हायचं आणि पडद्यावर डॉ.गिरीश कर्नाड आणि स्मिता पाटिल यांच दर्शन व्हायचं(मिर्च मसालाची आवर्जून आठवण व्हायच :)) आणि डोळे आणि कानांना एक प्रकारचा गोडवा जाणवायचा. त्या वेळेला महित नव्हतं कि हा चित्रपट आहे. फक्त वाटायचं अमुलच्या जाहिरातीसाठी हे गाणं खूप पुर्वी चित्रीत केलं असावं.
तुमच्या लेखामूळे कळालं कि हा सिनेमा आहे.

नक्कीच पाहिल्या जाईल.

वर्गिस कुरियन यांना विनम्र श्रद्धांजली.

कलंत्री's picture

9 Sep 2012 - 8:05 pm | कलंत्री

अश्या कथा आणि त्यांचे नायक ही भारताची खरीखुरी एकात्मका शिकवित असतात.

कुरीयन स्वर्गाची वाट आज चालत गेले परंतु खरा स्वर्ग त्याअगोदरच निर्मुण गेले असे म्हणता येईल.

चिंतामणी's picture

9 Sep 2012 - 9:04 pm | चिंतामणी

भारताच्या या महान सुपुत्राला विनम्र श्रध्दांजली.

मंथन सिनेमा इथे बघा.

भाग १
भाग २

बहुगुणी's picture

10 Sep 2012 - 8:41 am | बहुगुणी

(अशा अनेकांपैकी आणखी) एका राहून गेलेल्या एका चित्रपटाचा फार छान परिचय करून दिलात राजेसाहेब, आणि आजच डॉ. कुरियन यांच्या निधनाचं वृत्त यावं हा विचित्र योग! एका परीने तुम्ही श्रद्धांजलीच वाहिलीत...खूप आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2012 - 11:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, आपण म्हणालात आणि आम्ही एक उत्कृष्ट सिनेमा (युट्युबवर) पाहिला. खरं म्हणजे तुम्ही हे लिहिलं नसतं तर सालं आम्हाला हे कळलं तरी असतं का असं वाटलं. डॉ.वर्गीस कुरियन यांना विनम्र श्रद्धांजली आणि एक उत्कृष्ट सिनेमा पाहण्याचे सुचवल्याबद्दल किती आभार मानावे..........लॉट लॉट आणि लॉट ऑफ थॅ़क्स....!

-दिलीप बिरुटे

मन१'s picture

13 Sep 2012 - 5:26 pm | मन१

यूट्यूबवर कालच पाहिला(शेवटची वीसेक मिनिटे पहायची राहिलीत, लाइट गेल्ती.)
मूळ विषय, मांडाणी वगैरेबद्दल जे काही लिहिलय ,चर्चिलय ते सर्व ठीकच, किंबहुना उत्तमच.
शंका एकचः-
चंदावरकर नावाच्या इसमाला फक्त गावातून "घालवून देतात" इतकच दाखवलय. मुख्य कथानकाशी संबंधित नाही म्हणून तो विषय तसाच सोडून द्यावा अशी अपेक्षा आहे काय? की त्याला इतरत्र अजून काही शिक्षा करण्यात आली आहे, असे अध्याहृत आहे?
त्याच्या उचापत्या ह्या फौजदारी कलमाखाली येतात. त्याला काहीएक वर्षे सक्तमजुरीही होउ शकते असे आसपासची ,पेपरात येणारी उदाहरणे पाहून वाटते.
ते घडते का? की त्याचा प्रेक्षकाने विचारच करायचा नाही, असे अपेक्षित आहे?
.
स्त्रीला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती केले गेले असल्यास किंवा तिच्याशी संबंध प्रस्थापित केलेले असल्यास भारतात हा कायदेशीर गुन्हा आहे.(बहुतेक उलट दिशेने तो न्याय नाही; पण तो मुद्दा वेगळा.) तर त्याला सोडून का दिले जाते?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2012 - 4:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चंदावरकर नावाच्या इसमाला फक्त गावातून "घालवून देतात" इतकच दाखवलय. मुख्य कथानकाशी संबंधित नाही म्हणून तो विषय तसाच सोडून द्यावा अशी अपेक्षा आहे काय? की त्याला इतरत्र अजून काही शिक्षा करण्यात आली आहे, असे अध्याहृत आहे ?

डॉक्टर ज्या उद्देशासांठी आपल्या टीमला गावात घेऊन आले आहे, तो उद्देश अशा कारणामुळे दुर जाईल. सामाजिक काम करतांना आपलं वर्तन हे विश्वासार्ह आणि मुळ कामावर विश्वास टाकणारं पाहिजे असे त्यातून व्यक्त होत आहे असे मला वाटते. डॉक्टरांची पत्नी आजारी आहे, पण डॉक्टरांची द्विधा अवस्था दाखवली आहे, कुटुंब की सामाजिक कामाला प्राधान्य यात होणारी कुचंबणा या चित्रपटात दिसतेच आहे.

-दिलीप बिरुटे

मैत्र's picture

14 Sep 2012 - 2:38 am | मैत्र

अमूल ने केलेली तीन प्रकारे क्रांती केली असे म्हणता येते - १. गरीबांचे संघटन, आणि त्या संघटनाला अर्थकारणाची जोड, त्यातून ग्रामीण अर्थकारणाचे "मॉनेटायझेशन". २. जातीवर आधारीत संघटनातून सहकारी चळवळीचा विकास. (योग्य की अयोग्य माहीत नाही). ३. पायाभूत सुविधांचा ग्रामीण भागात प्रसार आणि डेअरीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची ग्रामीण भागाला ओळख.

अमूल अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अमूल गर्ल, अमूल साँग, मंथन सिनेमा, तसेच अमूलचे अजून एक अमूल्य योगदान स्वतंत्र भारताच्या इतिहासात आहे - नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. राष्ट्रीय पातळीवरील ही एकमेव संस्था अशी आहे, की जी अमूल सारख्या एका स्थानिक संस्थेने, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थेने निर्माण केलीय. अमूलचा प्रयोग देशभरात रिप्लिकेट करण्यासाठी आजवर या संस्थेन ९६००० सहकारी संस्थाचे जाळे तयार केलेय. राजकीय नेतृत्वाने ठरवले तर कसले जबरदस्त सामाजिक काम होऊ शकते याचे अमूल जितेजागते उदाहरण आहे.

एका माणसाने काही प्रमाणात राजकीय पाठबळ असलं (म्हणजे किमान नेहमीचा अतीव स्वार्थी विरोध नसण्याइतपत)
तर भारतात सहकारी पद्धतीने व्यवसाय करून लाखो लोकांना रोजगार देऊन अगदी संपूर्ण प्रांत बदलून टाकून आणि तरीही उत्तम बिझनेस करता येतो याचं अद्वितीय उदाहरण तयार केलं. आणंद मिल्क उद्योग म्हणून एका खेड्यात एका डेअरीने सुरु झालेला उद्योग आता २.५ बिलियन डॉलर्सचा (११६६८ कोटी रुपये) वार्षिक उत्पन्न मिळवत आहे आणि ३२ लाख शेतकर्‍यांना याचा फायदा होत आहे. अमुलने २०११-१२ मध्ये दिवसाला सरासरी १ कोटी किलो दूध विकत घेतले.
सर्वात जास्त दूध फेब्रुवारीत प्रोसेस केले गेले - सुमारे १४० लाख किलो प्रति दिवस.

काही कोटी लोकांच्या आयुष्यात बदल घडवणार्‍या एका महान माणसाला - वर्गीस कुरियन यांना विनम्र श्रद्धांजली..