त्यावेळी गोरेगाव खरंच एक छोटंसं गाव होतं. गावातले बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. पश्चिमेला ग्रामदैवत अंबाबाईचं देऊळ आहे. त्याला लागूनच, एका बाजूला अ. भि. गोरेगावकर शाळा आणि दुसर्या बाजूला केशव गोरे स्मारक ट्रस्टची इमारत. मंदिरात नेहमीच येणं जाणं असल्यामुळे केशव गोरे हे नाव अगदी ओळखीचं आणि आठवणीत फिट्ट बसलेलं.
गोरेगाव त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. प. बा. सामंत, कमल देसाई, आशाताई गवाणकर (ज्यांना आख्खी दुनिया प्रेमाताई म्हणून ओळखत असे) असे एकाहून एक अग्रणी गोरेगावातलेच किंवा मग गोरेगावात सक्रिय. आमची शाळा ज्या संस्थेची ती पण याच मंडळींनी चालवलेली. शाळेतला पहिला धडा गिरवून घेतला तो प्रेमाताईंनी. एखाद्या ध्येयासाठी झोकून देऊन आयुष्य पणाला लावणारी ही व्रतस्थ मंडळी.
एक तर गाव लहान आणि मुख्य म्हणजे साधी राहणी यामुळे ही सगळी व्यक्तिमत्व अगदी जाता येता रस्त्यात नजरेस पडत. ज्यांच्याशी आमच्या वडिलधार्यांच्या ओळखी होत्या त्यांच्याशी तर रस्त्यात उभे राहून गप्पाही होत. ही माणसं इतकी मोठी आहेत हे कसं कळणार मग? कळलंही नाहीच म्हणा आम्हाला. आणि, थोडं फार कळेपर्यंत एक तर हे सगळे वृद्धत्वाकडे झुकले होते किंवा प्रचंड बदललेल्या जीवनमूल्यांच्या रेट्यामुळे बाजूला फेकले गेले होते. अर्थात, त्यामुळे त्यांचे मोठेपण, वेगळेपण यत्किंचितही बाधित होत नाही हे आहेच.
याच वातावरणात एक नाव सातत्याने आणि खूप जिव्हाळ्याने घेतलेलं कानावर यायचं... मृणाल गोरे.
गोरेगावात 'महिला मंडळ' नावाची एक संस्था आहे. खूपच जुनी आहे ती. इ. स. १९५० साली स्थापन झालेली आहे ती संस्था. तिची स्वतःची एक टुमदार वास्तूही आहे. आसपासच्या भागातील सांस्कृतिक जीवनावर या वास्तूचे प्रचंड उपकार आहेत. नाव जरी महिला मंडळ असले तरी तिथे सगळ्यांचाच राबता असे. या महिला मंडळापासून मृणालताईंचे गोरेगावातील कार्य सुरू झाले असे म्हणता येईल. या महिला मंडळात समाजातील सर्वच स्तरातील स्त्रियांचा सहभाग होता हे अजून एक वैशिष्ट्य.
गोरेगावात तेव्हा ग्रामपंचायत होती. त्यात मृणालताईंचा सक्रिय सहभाग असे. पुढे, १९६०च्या सुमारास ही ग्रामपंचायत, मुंबई महानगरपालिकेत सामाविष्ट झाली आणि मग मृणालताईंचे कार्यक्षेत्रही विस्तारले. त्या नगरसेविकाही झाल्या. मुंबईतील आणि बाहेरीलही प्रत्येक लढ्यात त्या नेहमीच आघाडीवर राहिल्या. त्यांचा खूप गाजलेला लढा म्हणजे पाणीप्रश्नावरील आंदोलन. त्यानंतर त्या 'पाणीवाली बाई' म्हणूनच संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झाल्या. लाटणे, हंडे अशा, सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्यात रोज साथ देणार्या वस्तू घेऊन पाण्यासाठी, महागाईविरोधासाठी मोर्चे, आंदोलनं करणे ही अभिनव कल्पना अंमलात आणली आणि मंत्रालयावर जोरदार धडका देत त्यांनी सरकारला अक्षरशः पळता भुई थोडी केली. वसंतराव नाईकांसारख्या महाराष्ट्राच्या अतिशय शक्तिमान मुख्यमंत्र्याला घेराव घालून स्त्रीशक्तीची चुणूक दाखवली.
यातील बर्याचशा गोष्टी या माझ्या जन्माआधीच्या किंवा मी अगदीच न कळत्या वयातला असतानाच्या आहेत. मात्र, मी चांगला कळता झाल्यावर आलेलं 'आणिबाणी' नावाचं वादळ मात्र मी व्यक्तिशः कधीच विसरू शकणार नाही. त्या लहान वयातही आलेल्या प्रसंगाचं गांभिर्य आणि त्यावेळी होणारा भूमिगत लढा नीटच जाणवत होता. माझ्या सख्ख्या नात्यातले लोक तुरूंगात गेले होते. त्यामुळे आणिबाणी घरात आली होतीच. पण गोरेगावातील समाजवादी मंडळींनी उडवलेला भूमिगत लढ्याचा दणका अगदी जाणवण्याइतपत होता. ते दिवसच भारलेले होते. त्या दिवसात तर मृणाल गोरे हे नाव घेणंही संकटाला आमंत्रण देण्यासारखं होतं. पुढे त्या सापडल्या आणि त्यांना तुरूंगात टाकलं गेलं. मात्र लढा चालूच राहिला. 'पानीवाली बाई दिल्लीमे, दिल्लीवाली बाई पानीमे' ही घोषणा 'वंदे मातरम'च्या लेव्हलला पोचली होती.
याच संदर्भातली आमरण लक्षात राहिल अशी घटना म्हणजे, आणिबाणी उठवल्यानंतरच्या निवडणुका. प्रचाराचा धुरळा. ते नांगर खांद्यावर घेतलेल्या शेतकर्याचं चिह्न. गोरेगावात झालेल्या प्रच्च्च्चंड प्रचारसभा. अटलबिहारी वाजपेयी, एसेम जोशी, मोहन धारिया, जॉर्ज फर्नांडिस ही नावं माझ्या आयुष्यात तेव्हाच प्रवेश करती झाली. पण या प्रच्च्च्चंड सभांवरही मात करेल अशी गर्दी झाली होती ती निकालाच्या दिवशी. त्यावेळी मृणालताई रहायच्या त्या टोपीवाला बंगल्यापाशी जमलेली गर्दी हा एक महासागर होता. तिथे एक खूप मोठा काळा लाकडी फळा उभारला होता आणि त्यावर निवडणुकीचे निकाल लिहिले जात होते. जसजसे निकाल जनता पार्टीच्या बाजूने लागायला लागले तस तसा हा महासागर ढवळून निघत होता. आणि त्यानंतर झालेली अभूतपूर्व विजयसभा. ज्याने ते क्षण भोगले तो भाग्यवान...
... या सगळ्यात मृणालताईंचे योगदान खूपच महत्वाचे.
पुढे जनता पक्ष फुटला. दुर्दैवाने या घटनेतही त्यांचे योगदान महत्वाचेच राहिले. पण आयुष्यभर फक्त तत्वालाच सर्वोच्च स्थानी ठेवलेल्यांना या पक्षफुटीचे फारसे काही वाटले नाही. पुढच्या निवडणुकीत त्या हरल्या. अर्थात, राजकारण हे समाजकारणाचे एक हत्यार म्हणून त्याकडे बघत असल्याने, त्या नाऊमेद झाल्या नाहीत. त्यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर काम सुरूच ठेवले. हुंडाविरोध, हुंडाबळी, बलात्कार इत्यादी विषयांवर काम करण्यासाठी 'स्वाधार' या संस्थेची स्थापना करून त्यायोगे त्यांनी खूप मोठे काम उभे केले. नोकरीपेशा आणि श्रमजीवी स्त्रियांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी श्रमजीवी महिला संघाची स्थापना केली.
१९८५च्या निवडणुकीत मात्र त्या पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेल्या... त्यावेळी इंदिराहत्येनंतर काँग्रेसला सगळीकडेच सहानुभूती मिळाली होती आणि राजीव गांधीच्या रूपात तरूण रक्त मुद्दा जोरात होता, तरीही त्या सहजपणे जिंकल्या. त्यावेळी त्यांना विरोधीपक्षनेतेपदही मिळाले.
आज(ही) ऐरणीवर असलेल्या स्त्रीभ्रूणहत्येवर पहिल्यांदा आवाज उठवणार्या मृणालताईच होत्या. याबाबतीतले विधेयक त्यांनीच सर्वप्रथम विधानसभेत मांडले. पुढे सरकारनेही ते उचलून धरले आणि लिंगनिदानबंदी कायदा १९८६ साली अस्तित्वात आला.
ज्या काळात स्त्रिया नुकत्याच कुठे घराबाहेर पडू लागल्या होत्या त्याच काळात केवळ राजकारणात प्रवेशच नाही तर अगदी सर्वोच्च वर्तुळापर्यंत त्या गेल्या. आणि सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याला स्पर्श करणार्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी जागरूक राहून सरकारला सतत धारेवर ठेवले. असा विरोधीपक्षनेता क्वचितच लाभला असेल विधानसभेला. आणि हे सगळं करताना, त्यांनी कधी पातळी सोडली नाही की संबंध कलुषित केले नाहीत. एकीकडे मोर्च्यांमधे रौद्ररूप धारण करत असतानाच, कार्यकर्त्यांच्या नवीन पिढीला पोटाशी धरण्याचे अमूल्य कार्यही त्यांनी केले. रणरागिणी आणि प्रेमळ आई या दोन्ही भूमिका त्यांनी सारख्याच ताकदीने निभावल्या.
मात्र, ऐंशीचे दशक संपेतो त्यांच्या तब्येतीचे प्रश्न उभे राहू लागले, हळूहळू बळावायला लागले आणि त्यांनी सार्वजनिक जीवनातून हळूहळू अंग काढून घ्यायला सुरूवात केली. मात्र, त्या संपूर्णपणे निवृत्त कधीच झाल्या नाहीत. एन्रॉन प्रकल्पविरोधी आंदोलन असो किंवा नर्मदेतील सरदार सरोवर विरोधी आंदोलन असो, त्यांचा सक्रिय पाठिंबा होताच. अगदी, २१व्या शतकाच्या पहिल्या दशकातही नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी गरिबांना घरे मिळवून दिली.
अशी ही पाणीवाली बाई कालच पंचत्वात विलीन झाली. मोठे लोक गेले की, एक युग संपले वगैरे म्हणण्याची पद्धत आहे. मात्र, काही लोक गेले की त्याबद्दल बोलायला हे असले शब्दही लटके पडतात. आज मृणालताई आपल्यात नाहीत पण त्यांनी केलेलं काम आणि दाखवून दिलेली कार्यपद्धती नक्कीच अभ्यासण्याजोगे आहे. अंगी बाणवण्याजोगे आहे.
मृणालताईंना माझा सलाम!
प्रतिक्रिया
18 Jul 2012 - 12:02 pm | जाई.
आज गोरेगावात अगदी ऊदास वातावरण आहे
मंदिराचा पूर्ण रस्ता माणसांनी भरुन गेलाय
मनपूर्वक श्रध्दांजली
18 Jul 2012 - 12:04 pm | प्रचेतस
अतिशय उत्तम परिचय मृणालताईंच्या कार्याचा.
18 Jul 2012 - 12:11 pm | मी_आहे_ना
लेखातून दिलेला परिचय आवडला. मृणालताईंना श्रद्धांजली.
18 Jul 2012 - 12:13 pm | मन१
समाजकारण आणि राजकारनात सक्रिय राहिलेल्या व्यक्तिचा चांगला परिचय.
18 Jul 2012 - 1:27 pm | ढब्बू पैसा
पाणीवाली बाई कायम स्मरणात राहील. कार्याची उत्तम ओळख करून दिली आहेस. मला मृणालताई फक्त फुटकळ बातम्यांमधून ठाऊक होत्या. लढवय्या ही त्यांची ओळख माहिती होती. तू घेतलेल्या आढाव्यामुळे बरेच तपशील कळत गेले! कार्यकर्ता ही जमात लुप्त होत असताना, मृणालताईंसारख्या हाडाच्या कार्यकर्त्या कायमच फूर्तिदायक ठरतील.
धन्यवाद बिपिन दा.
मृणाल ताईंच्या कार्याला सलाम आणि त्यांना आदरांजली.
18 Jul 2012 - 12:34 pm | फारएन्ड
आम्हालाही थोडीफारच माहिती होती त्यांची. छान लेख आहे. गेल्या १०-१५ वर्षांत फारसे ऐकायला आले नव्हते नाव त्यांचे.
त्यांच्या विरोधातील उमेदवाराच्या प्रचाराला इंदिरा गांधी येउनसुद्धा याच निवडून आल्या असे आज पेपर मधे वाचले.
18 Jul 2012 - 12:45 pm | प्यारे१
समयोचित लेख.
भावपूर्ण श्रद्धांजलि.
18 Jul 2012 - 12:54 pm | चित्रा
श्रद्धांजली, मृणालताईंना.
तरुण वयात उच्च शिक्षणाचा धरलेला मार्ग सोडून त्यांनी मनाला पटेल अशा चळवळीत भाग घेतला असे आजच वाचले.
लेख समयोचित आहे. आभार.
18 Jul 2012 - 1:02 pm | सर्वसाक्षी
आज मिपावर कुणीतरी लेख नक्की लिहिणार याची खात्री होती आणि तुम्ही तो लिहिलात, अगदी अपेक्षित शिर्षकासह. या समयोचित आणि व्यक्तिमत्वाचा परामर्ष घेणारा लेख लिहिल्याबद्द्ल धन्यवाद.
आणिबाणीच्या पर्वात जेव्हा तथाकथित विचारवंत वगैरे जेव्हा गुळणी धरुन बसले होते तेव्हा मृणालताईचा लढा सुरूच होता. राजकारण म्हणजे समाजसेवा, अर्थकारण नव्हे असे मानणारी आणि तसे आचरणारी म्हणजेच पदरचे खाऊन लष्करच्या भाकर्या भाजणारी जी काही मोजकी मंडळी आहेत त्यातले एक नाव कमी झाले.
एका गोष्टीचे राहुन राहुन वाईट वाटते आणि आश्चर्यही वाट्ते ते म्हणजे 'अबु आझमी आणि मुलायम सिंग' यांच्या समाजवादी पक्षात मृणालताई कशाकाय राहिल्या. हा त्याना अभिप्रेत असलेला 'समाजवाद' नव्हे.
18 Jul 2012 - 1:05 pm | बिपिन कार्यकर्ते
साक्षीजी, हा प्रश्न तुम्हाला पडावा?
त्यावेळच्या समाजवादी पक्षाचे आणि आजच्या समाजवादी पक्षाचे नामसाधर्म्य फक्त आहे. अन्यथा काहीही संबंध नाही.
18 Jul 2012 - 1:23 pm | सर्वसाक्षी
मृणालताई या असल्या सपा मध्ये कशा याचे आश्चर्य आणि वाईटही वाटते.
18 Jul 2012 - 1:37 pm | बिपिन कार्यकर्ते
किंबहुना अशा नावाच्या पक्षात अबू आणि मुलायम इ. सारखे लोक कसे असे वाटायला हवे.
18 Jul 2012 - 3:49 pm | श्रावण मोडक
मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षात मृणालताई नव्हत्या. त्या समाजवादी विचारांच्या. त्या काळच्या प्रजा समाजवादी पक्षाशी त्यांचा संबंध होता. त्या पक्षातही त्या अधिकृतपणे होत्या किंवा नाही याची मला कल्पना नाही. पण असल्या तरी त्याची तुलना मुलायम यांच्या समाजवादी पक्षाशी होत नाही. मुलायम यांच्या समाजवादी पक्षाची स्थापना जेव्हा झाली (ती अलीकडेच झाली, जनता दलाचा अमिबा झाला तेव्हा), तेव्हा मृणालताई जनता दलातच होत्या. मुलायमसिंह यादव यांच्या पक्षाचे नावच मुळी समाजवादी पार्टी असे आहे. येथे स्थापनेविषयीची माहिती आहे.
अगदी आत्ता त्यांचे निधन झाले तेव्हाही त्यांचा संबंध समाजवादी विचारांशी, आणि पक्ष म्हणून जनता दलाच्या निधर्मी गटाशी होता. या काळातच जनता दलाचा जनता दल संयुक्त नावाचा अवतार आला, त्याने भाजपशी साटेलोटे केले, त्याच्याशीही मृणालताई संबंधित नव्हत्या. त्या निधर्मी जनता दलातच होत्या. आणि तेथेही त्यांनी देवेगौडा यांना चार शब्द सुनावण्याची हिंमत दाखवली.
ही फक्त तपशिलाच्या चुकीची दुरूस्ती.
18 Jul 2012 - 1:40 pm | चौकटराजा
एका गोष्टीचे राहुन राहुन वाईट वाटते आणि आश्चर्यही वाट्ते ते म्हणजे 'अबु आझमी आणि मुलायम सिंग' यांच्या समाजवादी पक्षात मृणालताई कशाकाय राहिल्या. हा त्याना अभिप्रेत असलेला 'समाजवाद' नव्हे.
यात काय वेगळे वाईट वाटायचे ?.. आजचा भाजपा रामभाउ म्हाळगींचा जनसंघ राहिला आहे काय?
कामराजांची काँग्रेस राहिली आहे काय ? प्रत्येक पक्ष उपर्यानी घुसून " हायजॅक केलेला आहे. आणि त्यातील मोजके सच्चे असहायपणे ही परिस्थेती पहात आहेत.
बाकी मृणाल गोरे हे लढाउपणाचे ब्रॅन्डनेम म्हणून कायम स्मरणात राहील .
18 Jul 2012 - 1:07 pm | नाना चेंगट
समयोचित लेख.
श्रद्धांजली !
18 Jul 2012 - 1:20 pm | स्वाती दिनेश
समयोचित लेख.
श्रद्धांजली !
असेच ,
स्वाती
18 Jul 2012 - 1:07 pm | सहज
ना.ग. गोरे, एस.एम. जोशी, मधु लिमये, मधु व प्रमिला दंडवते, ग प्र प्रधान, मृणाल गोरे शाळेत असताना ऐकलेली नावे. तेव्हापासुनच त्यातले हिरे गळायला लागले होते, पाणीवाल्या बाई बहुतेक शेवटच्या... समाजवादी नेते - एक अध्याय संपला.
आदरांजली.
18 Jul 2012 - 1:10 pm | क्लिंटन
मृणाल गोरेंना भावपूर्ण श्रध्दांजली. वैचारिक भूमिका पटो वा न पटो पण ज्यांच्या कार्याविषयी आदर वाटल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांच्या साधेपणाविषयी आणि प्रामाणिकपणाविषयी कोणीही शंका घेऊ शकणार नाही अशी समाजवादी आणि डाव्या विचारांची माणसे एकेक करत हरपत गेली (एस.एम.जोशी, गोदुताई परूळेकर, प्रमिला दंडवते, मधू दंडवते, ग.प्र.प्रधान आणि अहिल्या रांगणेकर). मृणालताई हा त्यातला बहुदा शेवटचा दुवा.
लेखातून मृणाल गोरेंविषयी माहिती नसलेल्या अनेक गोष्टी कळल्या.मी राजकारण फॉलो करायला लागलो साधारण १९८९ पासून. त्यावेळी मृणालताई विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.पण त्यानंतरच्या काळात त्यांचे नाव राजकारणात फारसे नव्हते त्यामुळे या अनेक गोष्टींची माहिती कधी झालीच नाही. या लेखातून त्यांच्या कार्याविषयी माहिती दिल्याबद्दल बिकांनाही धन्यवाद.
18 Jul 2012 - 1:26 pm | स्मिता.
मृणाल गोरेंना भावपूर्ण श्रद्धांजली.
आतापर्यंत त्यांचे नाव वर्तमानपत्रात काहितरी बातम्यांतच तेवढे वाचले होते पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मृणालाताईंच्या कार्याची ओळख करून देणार्या या लेखाबद्दल धन्यवाद!
18 Jul 2012 - 9:13 pm | रेवती
असेच म्हणते. :(
18 Jul 2012 - 1:24 pm | विसुनाना
लाटणी मोर्चाच्या आद्य प्रवर्तिका मृणाल गोरे यांना आदरांजली.
बाई एकदा तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला हव्या होत्या.
पण मधु दंडवते, एसेम असले असले दिग्गजही आता कुणाच्या खिजगणतीत नाहीत.
असे नेते 'समाजवादी पार्टी'त होते असे सांगणेही लज्जास्पद वाटते.
प्रच्च्च्चंड शब्द आवडला.
राम नाईक जिथे निवडणूक हरतात त्या मुंबईत आता काही राम नाही.
18 Jul 2012 - 2:38 pm | कवितानागेश
या पिढितल्या अशा मोठ्या माणसांबद्दल फार कमी माहिती आहे लोकांमध्ये.
मृणाल गोरेंना आदरांजली.
18 Jul 2012 - 9:13 pm | अमोल खरे
राम नाईकांविरुद्ध प्रचंड असंतोष होता. अनेक कारणे होती. मृणालताईंवरील लेख असल्याने जास्त लिहित नाही, पण राम नाईक पहिल्या वेळेस पडले तेव्हा असे होईल का क्लिअर अंदाज मला होता. माझ्या त्या वेळेच्या बॉस ना पण हेच वाटले होते. मी जेव्हा हा अंदाज माझ्या काही मित्रांना सांगितला तेव्हा सर्वांनी ते हसण्यावारी नेले. गोविंदा जिंकल्यावर तो स्टार म्हणुन जिंकला, ठाकुर बंधुंच्या सपोर्ट मुळे वसईमधील मते मिळाली वगैरे बोलले गेले. खरे कारण राम नाईकांविरुद्ध लोकांमध्ये असलेला असंतोषच होता. गोविंदा ऐवजी आणखी कोणी उभा असता तरीही तो जिंकला असता. पुढील निवडणुकीतही हाच असंतोष दिसला आणि मनसेने २ लाखांच्या जवळ मते घेतली. आता जी निवडणुक येईल त्यात जर राम नाईकांना उमेदवारी दिली तरीही ते पडायची खुप शक्यता आहे. असंतोष अजुनही मिटला नाही. एकेकाळी ह्याच आमच्या एरिआमधुन ते भरघोस मतांनी निवडुन येत असत, पण पेट्रोलिअम मंत्री असताना जे काही आरोप झाले, जे काही कोर्टाने ताशेरे ओढले, ते रामभाऊ लोकांना आवडले नाहीत. मतदार संघात विशेष कामही झाले नाही. अनेक कट्टर भाजपा / संघ कार्यकर्त्यांनी पहिल्या निवडणुकीत (जेव्हा पहिल्यांदा राम नाईक पडले) तेव्हा मतदान केले नाही अशी माहिती मला नंतर मिळाली होती. मृणालताईंना माझी श्रद्धांजली. पण बरेचदा कै मृणाल गोरे, मेधा पाटकर ह्यासारखी लोकं झोपडपट्टीवाल्या लोकांची बाजु कितीही चुकीची असली तरी ज्या पद्धतीने मांडतात (वोट बँक पॉलिटिक्स वगैरे असेल कदाचित ) त्यामुळे मध्यमवर्ग ह्या लोकांपासुन मनाने दुर जात राहतो. आत्ताही मेधा पाटकरांनी प्लॅस्टीक बंदीविरुद्ध जी भुमिका घेतली ती अनेकांना खटकली आहे. पण मिडलक्लास आज काहीही करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.
18 Jul 2012 - 1:27 pm | प्रास
समयोचित लेख.
भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
18 Jul 2012 - 1:31 pm | इनिगोय
उत्तम लेख, श्रद्धांजलीचा ठराविक साच्यातला असेल असं वाटलं होतं, पण पहिल्या वाक्यातच वेगळेपण, अनुभवाचं खरेपण जाणवलं. या सगळ्या व्यक्तींना जवळून पाहत असताना, घेतलेल्या अनुभवांबद्दल तुम्ही लिहिलंय का ठाऊक नाही, पण नसेल तर जरूर लिहा.
दैनंदिन कटकटींनी त्रासणार्या, कुरकुरणार्या माझ्यासारख्या माणसांना हा अचंबा वाटतो, की समाजाशी, यंत्रणेशी लढा घ्यायला आयुष्यभर पुरेल इतकी ऊर्जा या माणसांना मिळते कुठून? अखेरपर्यंत चेहर्यावरचं हसू कसं टिकतं?
मृणाल गोरेंच्या स्मृतींना अभिवादन.
18 Jul 2012 - 1:35 pm | बिपिन कार्यकर्ते
हे अगदी खरं आहे. एक तर आम्ही खूपच लहान तेव्हा. आणि मोठे होई पर्यंत ते युग प्रत्यक्ष जीवनातून बहुतांशी गेलंच होतं. त्यामुळे जवळून असं काही बघता आलं नाही.
18 Jul 2012 - 1:47 pm | गणेशा
लेखातून दिलेला परिचय आवडला. मृणालताईंना श्रद्धांजली.
18 Jul 2012 - 1:49 pm | पांथस्थ
विनम्र श्रध्दांजली
18 Jul 2012 - 2:48 pm | दिपक
ताईंच्या कार्याचा घेतलेला आढावा आवडला. प्रतिसादातुन अजुन त्यांच्या कार्याची माहिती आली तर वाचायला आवडेल.
म्रुणालताईंना अभिवादन.
18 Jul 2012 - 3:02 pm | प्रभाकर पेठकर
मृणाल गोरे. एक मंतरलेलं व्यक्तिमत्व. त्यांची तत्व, भाषणातील त्यांची आक्रमकता आणि सच्चेपणाने मिळविलेली प्रसिद्धी आम्हा तरूणांना त्याकाळी भाराऊन टाकायची.
त्यांच राजकारणातील महत्त्व, जनतेच्या मनांतील त्यांचे आदरणीय उच्च स्थान हे तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनाही अस्वस्थ करू लागलं होतं परिणामी आणिबाणीच्या काळी त्यांनी मृणालताईंना जेल मध्ये टाकलं. तेही कोणासोबत तर एका महारोगी कैद्या बरोबर. त्यावर बराच वादंग झाला आणि नंतर त्यांचा सेल बदलण्यात आला.
पाठोपाठच्या निवडणूकांत मृणालताईंच्या भाषणाला धार चढली होती. त्यांच्या सभांना जनतेचा अक्षरशः महासागर लोटायचा. त्यांच्या विरोधी उमेदवाराने अगदी खालच्या पातळीवर उतरून 'एका विधवेला निवडून देऊ नका' असे आवाहनही केले होते. पण मृणालताईंना जनतेचा वाढता पाठींबा मिळत गेला. शेवटी, खुद्द इंदिराजींना गोरेगावात सभा घ्यावी लागली. त्याने समाजवादी पक्षाचे काही नुकसान होण्या ऐवजी फायदाच झाला. लडवय्या मृणालताईंचे सर्वांनाच कौतुक वाटले. आणि मृणालताई ती निवडणूक जिंकल्या. तेंव्हाच, 'दिल्लीवाली पानीमें, पानीवाली दिल्लीमे' ही विजयी घोषणा जन्मास आली.
तेंव्हा मी गोरेगावच्या पाटकर कॉलेजात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होतो. मृणालताईंची मुलगी अंजली गोरे तेंव्हा आम्हाला सिनियर होती. तिचे आणि दिलीप वर्तक ह्यांचे प्रेमसंबंध होते. पुढे त्यांचे लग्न झाले. दिलीप वर्तकचे वडील (मला वाटतं भाऊसाहेब वर्तक) वसई-विरार पट्यात काँग्रेसचे अत्यंत नावजलेले व्यक्तिमत्व होते. मृणाल ताईंचे विरोधक. त्यामुळे मृणालताईचा ह्या लग्नाला कडाडून विरोध होईल अशी आम्हा मित्रांची अटकळ होती. पण मुलीच्या सुखाच्या आड त्यांचे राजकिय वैमनस्य त्यांनी येऊ दिले नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल.
प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या मृणालताई ह्या दुनियेत राहिल्या नाहीत, ह्याचे फार दु:ख आहे. पण त्यांचा समाजवाद, धडाडीचे कार्य आणि भाषणातील तडफ कायम लक्षात राहील.
18 Jul 2012 - 3:40 pm | रमताराम
सुरेख लेख बिपिनशेट. लास्ट ऑफ द मोहिकन्स.... :(
18 Jul 2012 - 3:41 pm | अत्रुप्त आत्मा
--^--^--^--
18 Jul 2012 - 4:38 pm | नितिन थत्ते
उत्तम समयोचित लेख.
मृणाल गोरे यांना आदरांजली.
18 Jul 2012 - 4:58 pm | चित्रगुप्त
पाणीवाल्या बाईंना सलाम आणि श्रद्धांजली.
थोडक्यात करून दिलेला त्यांच्या जीवन कार्याचा परिचय आवडला.
18 Jul 2012 - 5:58 pm | sneharani
उत्तम लेख
श्रध्दांजली.
18 Jul 2012 - 6:11 pm | पैसा
अगदी समयोचित आणि उत्तम लेख. पाणीवाल्या बाईंची छान ओळख करून दिली आहे. मृणालताई अगदी आपल्यातल्या वाटायच्या. तशाच कुसुमताई अभ्यंकर होत्या. तसेच मधू दंडवते होते. खासदार आणि मंत्री मधू दंडवतेंना हातात बॅग घेऊन रत्नागिरीच्या बस स्टँडवर चालत जाताना अनेक रत्नागिरीकरांनी पाहिलं आहे. आताचे तर्हेतर्हेचे पुढारी पाहता या मंडळींचं साधेपण, वेगळेपण उठून दिसतं. आता ही सगळी पिढी काळाच्या पडद्याआड झाली आहे.
मृणालताई कायम मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या होत्या. जेव्हा मुंबईतला हा वर्ग कमी झाला तेव्हा त्या निवडणुकींच्या राजकारणातून बाजूला पडत गेल्या. १९८० च्या दशकात राजकारणाला जो चेहरा मिळाला त्या प्रकारात त्या मागे पडणं ओघानंच आलं. तरीही त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं होतं. अशा मंडळींना सत्ता असली आणि नसली तरी काही फरक पडत नाही.
मृणालताईंना श्रद्धांजली.
18 Jul 2012 - 6:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिका, मृणालताई गोरे यांच्या कार्याची छान ओळख करुन दिली आहे.
माझीही श्रद्धांजली.
-दिलीप बिरुटे
18 Jul 2012 - 6:33 pm | सुहास झेले
मुणालताईंच्या कारकीर्दीचा उत्तम परिचय....
मनापासून आदरांजली ....
18 Jul 2012 - 7:27 pm | प्रदीप
ह्यांच्या निधनाने, महाराष्ट्रातील गेल्या पिढीतील राजकीय व सामाजिक पटलावरील निस्पृह कार्यकर्त्यांच्या मांदियाळीतील अजून एक रत्न हरपले आहे. माकपच्या कॉ. अहिल्याबाई रांगणेकर ह्या माझ्या अगदी निकटच्या आप्तांपैकी होत्या. त्यांचे राजकीय व सामाजिक जीवन मी अगदी जवळून पाहिलेले, अनुभवलेले आहे. साठीच्या दशकात ह्या दोघींच्या राजकीय ब सामाजिक कार्याच्या वाटचाली, मुंबईच्या दोन भिन्न भागांत समांतरच झाल्या. दोघी तळागाळांत जऊन निष्ठेने काम करणार्या कार्यकर्त्या होत्या. दोघींची स्त्रीयांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ त्यांच्या कार्यांत प्रतिबिंबीत होई. दोघीही झुंझार लढवय्या! त्या अर्थात एकत्र न आल्या तरच नवल! लाटणे मोर्चा, पाण्यासाठी सत्याग्रह असे अनेक उपक्रम त्यांनी समवेत आखले व धूमधडाक्यात पार पाडले. दोघीही १९७७ च्या निवडणूकीत मुंबईतून लोकसभेत गेल्या होत्या.
नंतर मृणालताई विधानसभेत निवडून गेल्यावर, मला आठवते त्यानुसार ८०च्या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले ह्यांच्या सिमेंट व्यवहारास उघडकीस आणले. ह्यामुळे पुढे अंतुलेंना पदच्युत व्हावे लागले. ह्याअगोदर (नक्की साल आठवत नाही) महाराष्टृ राज्याचे अन्नमंत्री भाऊसाहेब वर्तक ह्यांच्याशी त्यांचे विधानसभेत बरेच खटके उडाले होते. दैवदुर्विलास म्हणतात तो असा की त्यांच्या कन्येने ह्याच वर्तकांच्या मुलाशी प्रेमविवाह केला. अर्थात ह्यामुळे मृणालताईंच्या राजकीय व सामाजिक कार्यांत तसूभरही फरक पडला नाही.
श्रावण मोडकांच्या प्रतिसादात एक फॅक्च्युअल चूक आहे ती दुरूस्त करतो-- बंडू व मृणाल गोरे, प्रजा समाजवादी पक्षाचे सभासद नव्हते. ते प्रथमपासूनच संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते. (ना. ग. गोरे, मुंबईतील प्रकाश मोहाडीकर ही प्रजा समाजवादी पक्षातील दोन मला आता आठवत असलेली ठळक नावे. संयुक समाजवादी पक्षातील काही ठळक नावे-- साथी एसेम जोशी, मधू लिमये, बापूसाहेब काळदाते, मॄणालताई, प. बा. सामंत --मला वाटते प्रेमा पुरवही ह्याच पक्षाच्या).
[राजेश खन्नाच्या निधनावरील येथील धागा येण्याअगोदर बिपीन ह्यांनी सदर धागा टाकून मला उपकृत केले आहे. त्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद].
18 Jul 2012 - 9:15 pm | श्रावण मोडक
माझी चूक दुरूस्त केल्याबद्दल धन्यवाद. :-)
मला ती शंका होती, की आपलं काही तरी चुकतं आहे. संयुक्त समाजवादी पक्ष मला आठवलाच नाही. मी एकच समाजवादी पक्ष समजून चाललो (ही एक वेगळीच चूक माझी. :-))! मी आपलं सावधानतेनं "त्या काळच्या प्रजा समाजवादी पक्षाशी त्यांचा संबंध होता. त्या पक्षातही त्या अधिकृतपणे होत्या किंवा नाही याची मला कल्पना नाही." असं लिहून ठेवलं. :-)
18 Jul 2012 - 8:18 pm | तिमा
अशा व्यक्ती आपल्याला सोडून जात आहेत आणि आता आधारासाठी कुणाकडे पहावे अशी स्थिती आली आहे.
बिका, उत्तम लेखाबद्दल शतशः धन्यवाद.
18 Jul 2012 - 8:42 pm | मराठे
आदरांजली.
18 Jul 2012 - 9:04 pm | कलंत्री
"महाराष्ट्र्धर्म राहिला केवळ तुमच्या कारणापायी" असे काहिसे म्हणावेसे वाटते.
18 Jul 2012 - 9:39 pm | सुनील
समयोचित, मृणाल गोरे यांची चांगली ओळख करून देणारा उत्तम लेख.
पाणीवाल्या बाईंना श्रद्धांजली.
19 Jul 2012 - 9:42 am | नगरीनिरंजन
वाईट झालं.
श्रद्धांजली.
19 Jul 2012 - 10:30 am | शिल्पा ब
मला फक्त हे नाव माहीती होते त्यांचे कार्य नाही.
श्रद्धांजली.
21 Jul 2012 - 5:07 pm | निनाद मुक्काम प...
पानी वाली बाई दिल्लीमे, दिल्ली वाली बाई पानीमे' चाबूक घोषणा ह्या बद्दल विशेष धन्यवाद.
८० च्या दशकात समाजवादी , इतर डाव्या पक्षांच्या माथ्यावर घाशीराम कोतवाल लादण्यात आला. त्यामुळे गोरे किंवा इतर नेत्यांची राजकारणातून पीछे हाट होणे स्वाभाविक होते.
21 Jul 2012 - 8:52 pm | यकु
मृणालताई गेल्यानंतर पेपरांमध्ये बरेच लेख वाचायला मिळाले - पण बिकाचा हा लेख मात्र मृणालताईंच्याच घरातल्या कुणीतरी लिहिल्याइतपत उत्तम वाटला - मृणालताईंची नीट ओळख करुन देणारा.
धन्यवाद बिका.
21 Jul 2012 - 11:38 pm | श्यामल
मृणालताई गोरे यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
मृणालताई गोरे यांच्या कार्याची ओळख करुन देणारा उत्तम लेख !
22 Jul 2012 - 4:37 am | अर्धवटराव
ताईंच्या कार्याची इतकी छान ओळख करुन दिली बिका शेठ. धन्यवाद.
अर्धवटराव
22 Jul 2012 - 2:03 pm | स्पंदना
अतिशय उत्तम मांडणी. माहितीपुर्ण लेख.
धन्यवाद बिका.
भावपुर्ण श्रद्धांजली.
23 Jul 2012 - 10:38 am | सायली ब्रह्मे
विनम्र श्रध्दांजली :-(