शोध तुकारामाचा

रमताराम's picture
रमताराम in जनातलं, मनातलं
11 Jun 2012 - 3:44 pm

तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव - निदान विशी उलटलेल्या - मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातला कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत. पण या भक्तिभावाची परिणती ही की तुकोबाचे चार निवडक अभंग, त्याची 'कर्कशा' पत्नी आवली, त्याचा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी झालेला संघर्ष, इंद्रायणीतून पुन्हा वर आलेली त्याची गाथा नि त्याच्या सदेह वैकुठागमनाचे गूढ एवढ्यात तुकोबारायाबद्दलची आपली माहिती - नि रुचीही - संपते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्याची जडणघडण यावर प्रभाव पाडणारे अनेक घटक असतात. मानसशास्त्रात माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा बहुधा त्याच्या बालपणाच्या परिस्थितीपासून सुरू होतो. संस्कारक्षम वयात त्या व्यक्तीने जगलेले आयुष्य, त्याला मिळालेले कौटुंबिक संस्कार, सामाजिक वारसे, काळाच्या नि भूगोलाच्या जो तुकडा त्याच्या वाट्याला आला तो, इ. अनेक घटक त्याच्या व्यक्तिमत्त्वाला घडवत जातात. तुक्याचा तुकोबाराय होण्याचा प्रवास या घटकांच्या अनुषंगाने समजावून घ्यायला हवा.

चित्रपटाबद्दल बोलायचे तर चित्रपटाच्या पटकथेबद्दल अधिक बोलायला हवे. माझ्या चित्रपटविषयक लेखनात सातत्याने आवर्जून मांडलेला मुद्दा असतो तो हा की पटकथालेखक-दिग्दर्शक तुम्हाला काय सांगू पहात आहे, दाखवू पहात आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे. आपला 'तुकाराम' आपण चित्रपटात शोधता कामा नये. तसे असेल तर हा तुकारामा पाहण्यापूर्वीच त्याच्याव 'नापास' चा शिक्का पडेल. कारण तुकोबारायाचे आयुष्य माध्यमातून आपण पाहिले, आपल्या मनात ठसले ते त्याच्या आयुष्यातील संतपदी पोहोचल्यानंतरचे, त्याचा गावच्या तुक्यापासून तुकोबाराय होण्यापर्यंतचा प्रवास बहुधा माहितीचा नसतो, असलाच तर फारसा महत्त्वाचा नसतो.

चित्रपटातून, कथा-कादंबर्‍यातून आपण तुकोबा पाहिला तो बव्हंशी तुक्याचा तुकोबाराय झाल्यानंतरचा. तुकोबाचे चरित्र म्हणजे बहुधा चार चमत्कारांचे गाठोडे, सोबतीला त्यांचे चार अभंग, तोंडी लावण्यास अद्भुताची जोडी, विनोद अथवा कारुण्य निर्मितीसाठी त्याच्या कर्कशा पत्नीचे आवलीचे पात्र नि अखेर स्वर्गारोहणाची हक्काची कथा. मुळात तुक्याचा तुकोबा कसा झाला याचा प्रवास बहुधा आपल्या माहितीच्या, अनुभवाच्या कक्षेच्या बाहेरचा. माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक स्वभावपैलूंचा मागोवा त्याच्या बालपणातून घेता येतो असे आधुनिक मानसशास्त्र मानते. त्यामुळे प्रशांत दळवी-अजित दळवी लिखित नि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ’तुकाराम’ची सुरवात होते ती तुकोबाच्या बालपणाचा वेध घेत. या चित्रपटात रंजनमूल्य अथवा स्मरणरंजनात्मक मूल्य शोधायला गेल्यास फसगत होणार आहे. किंबहुन तशी अपेक्षा असलेल्यांनी हा चित्रपट न पाहिलेला बरा. चित्रपटाचा उद्देश आहे तो तुकारामाचा, त्याच्या जडणघडणीचा शोध घेण्याचा, त्याच्या प्रेरणा उलगडून पाहण्याचा, तुका असतानाच्या त्याच्या पाउलखुणांचा वेध घेण्याचा.

गावच्या मित्रमंडळींबरोबर, लगोर्‍याचा, आबाधुबीचा खेळ खेळणारा तुकोबा; कसल्याशा अनामिक प्रेरणेने विठ्ठलाच्या मूर्तीलाच कवटाळून ब्रह्मानंदी टाळी लागलेला विठोबा,'आपल्या गावच्या विठोबात नि पंढरपूरच्या विठोबात काय फरक आहे' असा प्रश्न अगदी लहानपणीच पडलेला तुकोबा, केवळ मडके घडवून पाहण्याचे कुतूहल शमवण्यासाठी हातीच्या दोन सलकड्यांपैकी एक सहजपणे हातावेगळे करणारा तुकोबा, आपल्या ऋणकोंबाबत बोलताना सावजीदादाच्या 'त्यांचे घर-दागिने आपल्याकडे गहाण पडलेले नाहीत, आपले पोट त्यांच्याकडे गहाण पडले आहे' या स्पष्टोक्तीने अंतर्मुख झालेला तुकोबा, आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल बाळगणारा नि ते शमवण्यासाठी असंख्य प्रश्न विचारून आई-वडिलांना भंडावून सोडणारा तुकोबा. तुकोबाचे हे असे बालपण आपण कधीच अनुभवलेले नसते, चिंतिलेले नसते.

तुक्याची घरची पार्श्वभूमीच मुळी विसंगतीचा वारसा घेऊन आलेली. वडील नित्यनेमाने पंढरीची वारी करणारे नि त्याचवेळी सावकारी करणारे. व्यवहाराच्या वेळी भक्तिमार्गाचा कळवळा अजिबात आड न येऊ देणारे, केवळ नजरेने धान्य तोलणारे नि दुष्काळाची चाहूल घेऊन ऋणवसुली आधीच करून घ्यायला पाहिजे हा भावनाशून्य चाणाक्षपणा असलेले. या सार्‍या व्यवहाराकडे पाठ फिरवून बसलेला सावजीदादा हा थोरला बंधू. अशा व्यवहारशून्य ज्येष्ठ पुत्रा मुळे व्यवहाराची जबाबदारी अगदी लहानपणीच तुकोबाच्या अंगावर आलेली आहे. हे व्यवहारी आयुष्य तुकोबाने लीलया अंगीकृत केलेले. आयुष्याची व्यावहारिक, कौटुंबिक बाजू सांभाळत असतानाही मूळचा चिकित्सक नि सारासारविवेकाला प्राधान्य देणारा स्वभाव मात्र सोडून गेलेला नाही. गावच्या वेशीतून प्रवेश करताना द्यायच्या करात जातीच्या, व्यवसायाच्या आधारे डावेउजवे होण्याची शक्यता दिसताच, कराचे नियम सार्‍यांना समान असावेत असा आग्रह धरणारा त्यासाठी कर देण्याचे ठामपणे नाकारणारा तुकोबा ’कठीण वज्रास भेदू ऐसे’ चा पहिला प्रत्यय देतो. कौटुंबिक पातळीवर मधला असून थोरल्याची जबाबदारी स्वीकारून सार्‍या कुटुंबाचा जणू पोशिंदाच होतो. पाठच्या भावाला मदतीला घेऊन वडिलांचा व्यापार नि संसार दोन्हीची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा. यात तुकोबा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हे दुहेरी आयुष्य जगतो आहे.

माणसाची जडणघडण जशी अंगभूत गुणांमधून कौटुंबिक संस्कारांतून होते तशीच लाभलेल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थिती नि काळाच्या तुकड्यावर ती अवलंबून असते. तुकारामाच्या आयुष्यात निर्णायक भूमिका बजावली ती () साली पडलेल्या दुष्काळाने. ऐन दुष्काळाच्या तोंडावर वार्धक्याने वडिलांचे नि त्यांच्या पाठोपाठ मातेचे निधन झालेले, थोरला भाऊ तर आधीच नि:स्संग. यातून पोशिंद्याच्या भूमिकेबरोबरच तुकोबाच्या खांद्यावर आलेले कर्तेपणाचे ओझे. यातच ज्याची चाहूल होती तो दुष्काळ आलाच. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत कुणी वृद्ध दामाजीपंतांची गोष्ट सांगतो. त्यावर ’आपल्या इथे असा सरकारी अधिकारी वा महाजन, कोणी नाही जो आपले कोठार गरीब गुरिबांसाठी खुले करेल’ असे कुणीसे म्हणतानाच तुकोबा अस्वस्थ होतो. कदाचित त्याला जाणवले असेल की इथे ज्याच्या कडे कणग्या भरून धान्य आहे असा आपल्याखेरिज दुसरा आहेच कोण? यात आपणच पुढाकार घ्यायला हवा हे त्याला जाणवते. ज्यांच्याकडे जे धान्य शिल्लक आहे ते सगळे खुले करावे नि सर्वांनी ते वाटून घ्यावे असा प्रस्ताव तो मांडतो. सूचना आपली त्यामुळे तिचा श्रीगणेशा आपणच करायला हवा या भावनेतून आपले कोठार खुले करतो. पण धान्यवाटणीच्या वेळी पायली पायलीने वाटून न घेता हपापलेपणे हुल्लडबाजी करून स्वार्थीपणे आपली तुंबडी भरून घेणारे किडके म्हणा अगतिक म्हणा असे लोक पाहून तो व्यथित होतो. कदाचित यातून त्याला जाणवले असेल की देणार्‍याची दानत पुरेशी नसतेच, घेणार्‍याचे शहाणपणही तेवढेच आवश्यक असते. हे शहाणपण नसले तर इथे रुजवले पाहिजे अशी खूणगाठ त्याने आपल्या मनाशी बांधली असावी. दुष्काळासारख्या तुटवड्याच्या वेळी माणसातलं जनावर जागं झालेलं पाहून, त्यांच्या उत्थानाची सुरुवात त्यांच्या मनातूनच व्हायला हवी हे त्याने मनी जाणले. इथूनच तुक्याचा तुकोबाराय होण्याचा प्रवास सुरू होतो.

याचवेळी कौटुंबिक पातळीवर पडलेली मृत्यूची कृष्णछाया त्याला अधिकच अंतर्मुख बनवते. पहिली पत्नी रखमा, भावजय यांच्या मृत्यूनंतर नि सावजीदादाच्या परागंदा होण्याचे घरात आलेले रितेपण त्याला वेढून राहते. सावजीदादाच्या मनात सारे आयुष्य घर करून राहिलेली विरक्तीची, भक्तिमार्गाची भावना (तुकोबाच्या दुसर्‍या पत्नीच्या भाषेत ’त्या काळ्याचा शाप’) प्रबळ होऊ लागते. आता तुकोबा त्याच्या समोरच्या मालातून जाताजात थोडा चोरून पळणार्‍या चोराकडे दुर्लक्ष करून पोथी वाचण्यात गर्क झालेला दिसतो. इथे तो तो दहा-बारा वर्षांचा असताना सावजीदादाच्या आत्ममग्नतेने गमावलेले सामान नि ते वाहून नेणारी गाढवे आठवत राहतात. थोडक्यात आवलीच्या भाषेत त्या घराण्यात असलेल्या ’काळ्याची शापाची’ छाया आता तुकोबाला वेढून घेते. तुकोबा आता सावकारी सोडून देतो, गहाण ठेवलेली शेते, दागिने मूळ मालकाला परत करतो. ज्यांचा यावरही विश्वास बसत नाही त्यांना ’आपले काही देणे लागत नाही’ असे लिहूनही देतो. आता तुक्याचे रुपांतर आपल्याला परिचित असलेल्या तुकोबामधे झालेले असते.

इथून पुढचा भाग बहुतेकांना माहित असलेलाच आहे. परंतु माहिती आणि सादरीकरण, माहिती आणि तपशील यातही काही बाबी, काही फरक नोंदवून ठेवाव्या लागतात. शिवछत्रपतींची नि तुकोबांची भेट नि राजांनी राज्याच्या सनदा त्यांच्या झोळीत टाकणे वगैरे नाट्यमय भाग इथे येत नाही. राजे हे द्रष्टे नेते होते हे गृहित धरले तर अशा नि:संग संताच्या हाती ते राज्य सोपवतात हे तसे पटणारे नाहीच. भावनिकतेचा अतिरेक म्हणून ही प्रतीकात्मता येते, पण ते वास्तव नव्हे याचे भान लेखकांनी ठेवले आहे. इथे शिवछत्रपतींच्या नि तुकोबांच्या तोंडी जे संवाद आहे ते दोन्ही ऐतिहासिक व्यक्तींच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असणे ठसवणारे. राजे म्हणतात ’आमच्या थोरल्या महाराजांनीही स्वराज्य स्थापण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर तुम्हा संतांनी आमच्या प्रजेला जे आत्मभान दिले त्यातून आम्हाला लक्ष्मणासारखे स्वराज्याचे पाईक मिळाले. त्यामुळे हे श्रेय जितके आमचे तितकेच तुमचेही.’ यावर तुकोबा म्हणतात ’तुमच्या आईसाहेबांची इच्छा आमचा सन्मान करण्याची आहे. पण तुमच्या सारख्या राजाने अशा फकीराचे श्रेय मानणे हाच मोठा सन्मान आहे. तुम्ही तुमचे काम करत रहा आम्ही आमचे करत राहू.’ इथे ’सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान’ हे ध्वन्यर्थाने, लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते, शब्दश: नव्हे. हे भान लेखकद्वयाने राखले आहे.

शेवटचा गाथा बुडवण्याचा प्रसंग चित्रपटाचा कळस मानावा. गाथा बुडली खरी पण ती तरली ती साध्याभोळ्या कष्टकरी विष्णुदासांच्या मनात. तुकोबा नदीकिनारी अन्नत्याग करून बसला ते गाथा गमावल्याने आयुष्याचे सारे संचित गमावल्याच्या वैफल्याने. त्याचे प्रायोपवेशन हे नदीला घातलेले साकडे नव्हे तर विफलतेतून अंताकडे जाणार्‍या प्रवासाची वाटचाल होती. पण तुकोबांनी शहाणे करून सोडलेले ’सकळ जन’ तुकोबाला असे कसे जाऊ देतील? हां हां म्हणता तुकोबाचे सहप्रवासी जमा होतात, त्याला सोबत करू लागतात. अचानक एका भक्ताच्या तोंडून एक अभंग प्रकट्तो. त्यावरून दुसर्‍याला दुसरा आठवतो. पाहता पाहता ’अवघा रंग एकचि' होऊन सारे विष्णुदास अभंगगायनात तल्लीन होऊन जातात. वैफल्यग्रस्त होऊन बसलेल्या तुकोबाला जाणवते ’अरे आपण ज्याला आयुष्यभराचे संचित समजत होते ते होते चार कागद. अखेर ज्यांच्यासाठी ती गाथा अवतरली त्यांच्या मनात ती तरली आहेच की. आयुष्याचे खरे संचित म्हणायचे ते हे.’ सार्‍या आप्तगणांच्या सहाय्याने तुकोबा पुन्हा माणसात येतो. इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा वैष्णवांचा मेळा अवतरतो. तुकोबा आपल्या वीणेला नि चिपळ्यांना साथीला घेऊन विठ्ठलनामात दंग होऊन जातो, अवघा भावस्वरूप होतो. इथून पुढे त्याच्या जडदेहाचे पतन नक्की कसे झाले हा केवळ तपशीलाचा भाग उरतो.

कलासमाजजीवनमानचित्रपटप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

विशेषतः शेवटच्या पॅरामुळे पिच्चर पाहीन असे वाटतेय :)

सहज's picture

11 Jun 2012 - 4:00 pm | सहज

People who read this article also read - तुकाराम... हे राम !

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2012 - 4:02 pm | बिपिन कार्यकर्ते

आपण तर आधीच बोल्लोय! बघणार म्हणून. :)

बाकी रराशेटशी सहमत... दिग्दर्शक, पटकथाकार वगैरेंना काय सांगायचंय ते समजून घेऊन तेवढ्याच परिप्रेक्ष्यामधे सिनेमा बघावा... त्याबाहेरचे प्रथमतः तरी शोधायला जाऊ नये. अर्थात, या मंडळींची झेपच तोकडी पडली तर मात्र टीका अटळ आहे. तुकाराम सिनेमाबद्दल नेमकं आजकाल काही जाणत्या मंडळींकडून नेमकं असंच काहीसं ऐकायला मिळतंय. म्हणून काहीही अपेक्षा न बाळगता जाईन म्हणतो.

काही गोष्टी प्रोमोज मधेच खटकल्या आहेत. ही एक पिरियड फिल्म आहे. तसा फील येणं आवश्यक आहे... ते तसे होत नाहीये असे वाटते आहे प्रोमोज बघून. असो.

फार छान प्रकटन.
चित्रपट पाहावा लागेल

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2012 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार

चर्चा प्रत्यक्ष भेटीत.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2012 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा

यथोचित परिक्षण... धन्यवाद हो रमताराम. --^--

या नव्या ''तुकारामातला'' तुकाराम त्याच्या मुळस्वरुपाकडे वाटचाल करणारा तर आहेच. शिवाय संशोधनाच्या दिव्यातून सिद्ध झालेला आणी तितकाच ''सहजं''ही आहे.

चित्रपटात तुकारामाचे बालपण ते संतत्व प्राप्ती हा विषय अपरिहार्य आहे... कारण तो हताळला गेला नाही(लोकांसमोर आला नाही) तर त्याच्या संतत्वावरची दैवतीकरणाची आणी चमत्काराची पुटं निघणार नाहीत. हे काम या ''तुकारामात'' नीट पार पाडलेले आहे. मुळात एखाद्या व्यक्तिला जन्मतः किंवा पुढील आयुष्यात अचानक संतत्वाची प्राप्ती होणं,ही घटनाच अनैसर्गिक आणी खोटारडी असते.

जो आहे मुळचा नेका,त्याचाच पुढे होतो तुका...
ईतरांनी मारलेल्या फेका, गर्दभ स्वरूप जाणाव्या...

प्रचेतस's picture

11 Jun 2012 - 4:10 pm | प्रचेतस

अत्यंत समतोल परि़क्षण.

प्रशु's picture

11 Jun 2012 - 4:13 pm | प्रशु

ह्या विषयाचे आता हत्ती आणि चार आंधळे ह्या गोष्टी सारखे झाले आहे. जो तो आपला तुका हिरीरीने मांडतो आहे. माझ्यापुरता सांगायचे झाले तर माझा तुका हा 'अ'भंगातुन भेटलेला आणि गोनिदाच्या 'तुका आभाळायेवढा'त भेटलेला.

कादंबरीतला तुका मला जास्त भावतो....

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2012 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार

शिकलेली लोकं पण येवढी गल्लत कशी काय करत आहेत? का लेखन न वाचताच , अर्धवट वाचून प्रतिसाद देत आहेत ?

मिपावरती जे लेखन होत आहे ते 'तुकाराम' हा चित्रपट आणि त्याच्या योग्य-अयोग्य बाजूंबद्दल होत आहे. तुकारामांचा इथे संबंधच कुठे येतो ? तुकाराम, त्यांचे कार्य, जीवन, त्यांची थोरवी ह्या विषयी कुठलेही दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र ते प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे येते का नाही ह्यावरती चर्चा निश्चित होऊ शकते. आणि ह्या चर्चेत पुढे आलेल्या मतांचा कोणी तुकारामांशी संबंध लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र कहर आहे !

तुकारामांचा इथे संबंधच कुठे येतो ? तुकाराम, त्यांचे कार्य, जीवन, त्यांची थोरवी ह्या विषयी कुठलेही दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र ते प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे येते का नाही ह्यावरती चर्चा निश्चित होऊ शकते. >>>

अगदीच सहमत ! अरे तुम्ही अ‍ॅज अ डायरेक्टर ऐतिहासिक चित्रपट आणि मराठी सिरियल्स मध्ये किमान फरक तरी लक्षात ठेवाल की नाही ;)

असो ...परिक्षण , पुन्हा एकदा एखाद्या उच्च दर्ज्याच्या लेखकाला आवडेल असे आहे ...

मला एक मुलभुत प्रश्न पडला आहे

आता रिलीज झालेला तुकाराम पाहुन सामान्य ( ज्यांच्या साधं " तुम्हा संतांनी आमच्या प्रजेला जे आत्मभान दिले त्यातून आम्हाला लक्ष्मणासारखे स्वराज्याचे पाईक मिळाले. त्यामुळे हे श्रेय जितके आमचे तितकेच तुमचेही.’ यावर तुकोबा म्हणतात ’तुमच्या आईसाहेबांची इच्छा आमचा सन्मान करण्याची आहे. पण तुमच्या सारख्या राजाने अशा फकीराचे श्रेय मानणे हाच मोठा सन्मान आहे. तुम्ही तुमचे काम करत रहा आम्ही आमचे करत राहू.’ इथे ’सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान’ हे ध्वन्यर्थाने, लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते, शब्दश: नव्हे. हे भान लेखकद्वयाने राखले आहे." हे वाक्य डोक्यावरून जाईल.) प्रेक्षकासमोर तुकाराम महारांजाची काय प्रतिमा उभी राहील ..

धन्यवाद

छोटा डॉन's picture

11 Jun 2012 - 4:20 pm | छोटा डॉन

सदर लेखाचा अन्वयार्थ पटतो आहे आणि मान्य आहे.
परंतु गंमत अशी आहे की जे ह्या परिक्षणात लिहले आहे ते तसे चित्रपटात असायला अथवा प्रसंग, व्यक्तिरेखांच्या माध्यमातुन समर्थपणे उभा रहायला हवे होते ते तसे होत नाही. तुम्हाला चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममागची लेखक, दिग्दर्शक ह्यांची भुमिका संपुर्णपणे कळाली आहे असे तुमच्या प्रभावी परिक्षणाच्या साक्षीने मानायला हरकत नसली तरी ती भुमिका प्रत्यक्ष चित्रपटात सादर करणे त्यांना का जमले नाही ही शंकाच आहे.
एखाद्या स्थिर चित्रातुन अथवा चलचित्रातुन नक्की काय अर्थ घ्यायचा किंवा कोणत्या भागाकडे दुर्लक्ष करुन सोडुन द्यायचे हा जरी प्रेक्षकाचा निर्णय असला तरी टाळता येण्याजोग्या आणि अनावश्यक चूकांवर पांघरुण घालावे असे आम्हाला वाटत नाही.
बिकांचे जो पिरियॉडिक फिल्मबद्दल आक्षेप आहे तेच म्हणणे माझेही आहे.

असो, सदर सिनेमामधला 'अभिनिवेष' जर काढुन टाकला तरी आहे त्या सेटपमध्ये सिनेमा अंमळ सुसह्य होऊ शकतो असे आम्हाला वाटते, इथेच सिनेमाने वाट सोडली असे आमचे मत आहे.
बाकी लेख/दिग्दर्शकाच्या मनातल्या विचारांचा थांगपत्ता शोधण्याचा प्रयत्न करणारे आणि त्याआधारे सिनेमाचे वस्तुनिष्ठ परिक्षण करणारा लेख आवडला असे सांगतो

- छोटा डॉन

रमता राम साहेब, अतिशय मौलिक व अचुक पण सुंदर परीक्षण.
मी हा चित्रपट २ वेळा पाहीला आहे व मला तो आवडला आहे. जुना चित्रपट नक्किच चांगलाच होता पण नविन तुकाराम चित्रपट पण मला आवडला आहे.
मुळात तुकाराम महाराज समजण जितक सोप्प वाटत तितकच ते अवघड आहे. एका बाजुला ते स्वताला मेण्याहुनही मऊ म्हणत असताना दुसरी कडे ते नाठाळ्याच्या माथी हाणु काठी असही म्हणतात. तसच त्या मुळे हाही नविन तुकाराम मध्ये त्यांच आवाज चढवुन बोलण हे जुन्या तुकाराम चित्रपटातील त्यांच्या सौम्य आवाजा एव्हढच खर वाटत.३

परीक्षण उत्तम झाल आहे.

मी मिपाकराना एक विनंती करतो.
आधी प्रत्यक्ष जाउन चित्रपट बघा मग मत बनवा.

राजघराणं's picture

11 Jun 2012 - 4:34 pm | राजघराणं

तुका आभाळाएव्हढा

प्यारे१'s picture

11 Jun 2012 - 4:39 pm | प्यारे१

>>>>तुकोबा नदीकिनारी अन्नत्याग करून बसला ते गाथा गमावल्याने आयुष्याचे सारे संचित गमावल्याच्या वैफल्याने. त्याचे प्रायोपवेशन हे नदीला घातलेले साकडे नव्हे तर विफलतेतून अंताकडे जाणार्‍या प्रवासाची वाटचाल होती. पण तुकोबांनी शहाणे करून सोडलेले ’सकळ जन’ तुकोबाला असे कसे जाऊ देतील? हां हां म्हणता तुकोबाचे सहप्रवासी जमा होतात, त्याला सोबत करू लागतात. अचानक एका भक्ताच्या तोंडून एक अभंग प्रकट्तो. त्यावरून दुसर्‍याला दुसरा आठवतो. पाहता पाहता ’अवघा रंग एकचि' होऊन सारे विष्णुदास अभंगगायनात तल्लीन होऊन जातात. वैफल्यग्रस्त होऊन बसलेल्या तुकोबाला जाणवते ’अरे आपण ज्याला आयुष्यभराचे संचित समजत होते ते होते चार कागद. अखेर ज्यांच्यासाठी ती गाथा अवतरली त्यांच्या मनात ती तरली आहेच की. आयुष्याचे खरे संचित म्हणायचे ते हे.’ सार्‍या आप्तगणांच्या सहाय्याने तुकोबा पुन्हा माणसात येतो. <<<

पटत नाही.
हे असं असेल तर तुकाराम महाराजांच्या अभंगरचनांच्या कालखंडांकडे पुन्हा एकदा नव्यानं पाह्यलं पाहिजे..!
कुठला अभंग कधी लिहीला? 'आनंदाचे डोही आनंद तरंग' हा अभंग लिहील्यावर तुकाराम महाराज विफल वगैरे होतील असे वाटत नाही! अथवा त्यांची मनःस्थिती एवढी बदलेल असे देखील वाटत नाही...
काहीतरी गल्लत होते आहे एवढं निश्चित वाटतंय.

स्वाती दिनेश's picture

11 Jun 2012 - 4:50 pm | स्वाती दिनेश

प्रकटन आवडले,
मात्र ह्या चित्रपटाविषयीची टोकाची परीक्षणे वाचून संभ्रमात पडले आहे,
स्वाती

पैसा's picture

11 Jun 2012 - 5:15 pm | पैसा

पण अ. आ. आणि पराच्या लेखातले फोटो पाहून जितेन्द्र जोशी तुकाराम अजिबात वाटला नाही आणि त्याच्या दोन्ही बायका तसेच इतर लोकही अगदी आधुनिक काळातले वाटत आहेत. कथेमागचा विचार चांगला असला तरी कथेचे सादरीकरण कसं झालंय, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची कामगिरी कशी आहे याबद्दल ररानी फार लिहिलं नाही.

चित्रपटाचा समग्र विचार करताना लेखकबरोबरच संवाद लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार यांची कामगिरी यांचाही विचार झाला पाहिजे. जेव्हा तसा रिपोर्ट मिळेल तेव्हा चित्रपट बघेन तोपर्यंत विष्णुपंत पागनीस आणि गौरीचा तुकाराम आहेच! खरं तर कालच परत एकदा बघितला!

चित्रपटाचा समग्र विचार करताना लेखकबरोबरच संवाद लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार यांची कामगिरी यांचाही विचार झाला पाहिजे.
पण आम्ही कुठे दावा केला आहे की आम्ही चित्रपटाचा समग्र विचार करतोय म्हणून. :) आमच्या जाणीवा नि ज्ञान तेवढे प्रगल्भ आहे असा आमचा गैरसमज नाही. मी लिहितो ते मला काय दिसले ते सांगण्यापुरते. सार्‍या लेखात मला चित्रपट आवडला की नाही याबाबत मी एकही वाक्य लिहिलेले नाही, त्याचे बौद्धिक विश्लेषण तर दूरच राहिले.

तसंही एकामागोमाग एक सहप्रवासी तुकोबाचा एक एक अभंग आठवतोय, तसे भावना उचंबळून आलेले वैष्णव जनांचा चेहरे उजळतात नि अवघा कल्होळ होतो. त्या भावनेला साद देण्याऐवजी, त्यात चिंब भिजण्याऐवजी त्यातील कोणी एखादा विसंगत दिसतो आहे का याचा शोध घेत रहावे - एवढे भान रहावे - एवढी तटस्थ समीक्षकी वृत्ती आमच्यात नाही. :) काय करणार, जगात सगळेच तुकोबा झाले तर कसं व्हायचं. त्यांच्या संगे आमच्यासारखे चार संतूही हवेतच ना. :)

गणेशा's picture

11 Jun 2012 - 5:47 pm | गणेशा

दोन्ही परिक्षणे आवडली.

नाण्याची दुसरी बाजुही वाचली.
फार कष्ट न उचलता पहाण्याचा योग आला तर पाहु म्हणतो.

भडकमकर मास्तर's picture

11 Jun 2012 - 6:32 pm | भडकमकर मास्तर

अत्यंत आळशी प्रतिसादाला सह मत

मी एकही वाक्य लिहिलेले नाही! शाब्बास!!

जवाबदारी अजिबात घ्यायची नाही म्हणजे सगळ्या बाजूनं आर्ग्युमेंट करता येतात हे तुमच्या लेखनाचं वैशिष्ठ्य सुरुवातीपासून भावत आलं आहे.

मागे देखील ते आठ कवडसे टाकले आणि तात्पर्य काय?

लिमाऊजेटनं विचारलं :

एक शंका: ही गोष्ट ज्या काळात लिहिली गेली, त्या वेळेस 'बलात्कार' हा गुन्हा नव्हता का?
फक्त खून झाला की आत्महत्या केली यावरच 'न्याय' ठरणार होता का?

त्यावर उत्तर काय मासलेवाईक : http://www.misalpav.com/comment/reply/21489/391863
"पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा)"

कसले मूलभूत प्रश्न? मूळ प्रश्न अनुत्तरित आणि उगीच फेकाफेकी

तेच इथेही : आहो त्या चित्रपटाशी आम्ही रिलेटच होऊ शकत नाही आणि तुम्ही एकदम धडाक्यात सुरुवात करताय :

" माझ्या चित्रपटविषयक लेखनात सातत्याने आवर्जून मांडलेला मुद्दा असतो तो हा की पटकथालेखक-दिग्दर्शक तुम्हाला काय सांगू पहात आहे, दाखवू पहात आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे."

आहो तेच तर हुकलय कारण त्यात इंपॅक्टच नाहीये आणि मग शेवटापर्यंत जवाबदारी तरी घ्या तर हात वर करुन मोकळे :

" सार्‍या लेखात मला चित्रपट आवडला की नाही याबाबत मी एकही वाक्य लिहिलेले नाही, त्याचे बौद्धिक विश्लेषण तर दूरच राहिले."

मग वर लिहिलय त्याला काय म्हणायच? आणि मुख्य म्हणजे त्याचं प्रयोजन काय?

अर्थात तुमच्या सर्व वैचारिक लेखनाची अशीच अवस्था आहे पण पब्लिक पल्लेदार वाक्यात गुंगून जातं त्याला काय करणार?

मेघवेडा's picture

11 Jun 2012 - 8:31 pm | मेघवेडा

झकास लिहिलंय म्हातारबुवा. :)

सुहास झेले's picture

11 Jun 2012 - 8:48 pm | सुहास झेले

तिन्ही परीक्षणे वाचली... एकच कमेंट तिन्ही धाग्यांवर करतोय :)

मी नक्की बघणार... तद्दन फालतू हिंदी चित्रपट बघायला आपण थेटरात जातो, मग मायमराठीमध्ये केलेला एक प्रयोग म्हणून, हा चित्रपट नक्की बघणार :) :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Jun 2012 - 9:05 am | घाशीराम कोतवाल १.२

मी नक्की बघणार... तद्दन फालतू हिंदी चित्रपट बघायला आपण थेटरात जातो, मग मायमराठीमध्ये केलेला एक प्रयोग म्हणून, हा चित्रपट नक्की बघणार
+१ सहमत आहे

एखाद्या चित्रपटाचे परिक्षण (निरिक्षण) यथायोग्य प्रकारे करण्यात तुमचा हात कोणी धरू शकणार नाही पण माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकांचा गोंधळ वाढलाय अनेक परिक्षणं वाचून.

छान परीक्षण.
चित्रपटासारखेच नेमके आणि मोजके. आवडले.

श्रावण मोडक's picture

12 Jun 2012 - 12:31 pm | श्रावण मोडक

पटकथालेखक-दिग्दर्शक तुम्हाला काय सांगू पहात आहे, दाखवू पहात आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे.

'ते समजले पाहिजे ते आपोआपच.' अशी एक अपेक्षा असते. आणि ते 'समजण्यासाठी डोक्याला थोडा शॉट लागावा' असा कलाकृतींचा दुसरा प्रकार असतो. या दोन्ही अनुभूतीच असतात. पहिल्या चष्म्यातून पाहिले की, चित्रपट पूर्ण फसलेले असू शकतात. दुसऱ्या गटातील मंडळींना त्यात बरेच काही गवसत असते. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पहायचे की पटकथालेखक-दिग्दर्शकाचे एक माध्यम म्हणून पहायचे, यावर हे अवलंबून. 'स्कॉच' स्टीलच्या ग्लासमधूनही पिता येतेच, आणि देशी काचेच्या ग्लासमधूनही पितातच. दोघांनीही आपापल्या शिस्ती पाळल्या तर... तर हे प्रश्न येत नाहीत. :-)
त्याहीपलीकडे 'काय सांगू पहात आहे' याच्या जोडीनेच 'कसे सांगितले जात आहे,' हेही महत्त्वाचे असते हे तुम्हाला मान्य व्हावे. 'काकस्पर्श'चा एक किस्सा कळला (मी चित्रपट पाहिलेला नाही). नायिका गाणं गुणगुणताना बहिणाबाईंच्या ओळी गुणगुणते. चित्रपटातील कथानकाच्या कालखंडात ती वेळ बहुदा तीसच्या दशकातली आहे. कारण सत्याग्रह होण्याची वेळ आणि लग्नाची वेळ अशाशी संबंधित काही संवाद त्यासंदर्भात आहे. कालखंड तिशीचा. गुणगुणलेले गाणे मात्र पन्नाशीनंतर प्रकाशात आलेले, असा काही तरी प्रकार आहे तो. सांगणारा स्रोत पक्का आहे, म्हणून मी त्याला खरं म्हणतोय. दोन दशकांचा हा फरक समाजातही असतोच. आता असे काही दाखवले जात असेल तर प्रश्न निर्माण होतात. त्याकडे दुर्लक्ष करणे एरवी नुसतीच रंगसंगती असलेले चित्र म्हणून शक्य होते. पण, सामाजिक भाष्याची जाहिरात केली जाते तेव्हा ते शक्य नसते. शक्य असू नये. कारण, ती कलाकृती हा दस्तावेजच असतो. असो.
बाकी लेखन ररांचेच. म्हणजेच, चांगले. त्यातील मुद्दे पटोत वा न पटोत!

रमताराम's picture

12 Jun 2012 - 12:47 pm | रमताराम

धागे महत्त्वाचे असतातच की. पण मुळात वस्त्र हे वस्त्र म्हणून विणले गेले आहे ते वस्त्र म्हणून कसे दिसते, भावते, पटते, पटत नाही हे ही पहायला नको? हा धागा थोडा कमी रंगलाय, इथे काटकोनात छेदत नाहीत धागे इ. इ. गोष्टी निर्दोषत्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेतच की पण मुळात पुरे वस्त्र आपण पाहिले की केवळ धागे पाहिले या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने आपापले शोधावे. हिंदी चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नि बालगंधर्व कडे पाहण्याचा दृष्टीकोन सारखाच हवा की वेगळा, आपण समीक्षक आहोत की प्रेक्षक इ. आणखी काही प्रश्नही तपासून पहायला हरकत नसावी.

अवांतरः दासू वैद्यांची गाणी तर आज लिहिली गेली आहेत, तुकोबाच्या मृत्यूनंतर चारशे वर्षांनी. ती तुकारामाच्या, आवलीच्या तोंडी आहेत हा ही कालविपर्यासच म्हणायचा का? असेल तर प्रश्न मिटला, तुमचे बरोबर आहे. नसेल तर बहिणाबाईंचे गाणे असले तर काय हरकत आहे?

श्रावण मोडक's picture

12 Jun 2012 - 1:06 pm | श्रावण मोडक

मुळात पुरे वस्त्र आपण पाहिले की केवळ धागे पाहिले या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने आपापले शोधावे.

यातला पुरे वस्त्र पाहण्याचा भाग तितकाच महत्त्वाचा आहे. मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की 'पुरे वस्त्र' कशाला म्हणायचे हा तो प्रश्न आहे. तिथं प्रत्येकाची अनुभूतीजन्य व्याख्या वेगळी असते. मग धागे दिसतात. स्वतंत्रपणे दिसतात.
दासू वैद्यांची गाणी हा मुद्दा पूर्ण स्वतंत्र आहे बहिणाबाईंच्या संदर्भात. निदान मला जे म्हणायचे आहे, त्यासंदर्भात वेगळा आहे. तसं तर मग शिवाजी किंवा त्यापुरतेच बोलायचे तर इतरही कोणी गाणी म्हणत होतं का असंही ताणता येतं.
कालविपर्यास अशासाठी होतो - बहिणाबाईची गाणी ही व्यक्तीरेखा गुणगुणतीये... ही व्यक्तीरेखा सामाजिक विशिष्ट दाखवणाऱ्या चित्रपटातील आहे. ते सामाजिक विशिष्ट विशिष्ट कालखंडातील आहे. तो कालखंड समजून घ्यायचा असेल तर तेव्हाच गुणगुणली जाणारी गाणी असली पाहिजेत, मुळात ते गुणगुणणंही त्या काळाला धरून असलं पाहिजे. त्या काळात गुणगुणणं नसेल तर काहीही गुणगुणणं अनुचितच... आणि असं जेव्हा होत नाही तेव्हा मग 'एक ब्राह्मण कुटुंब घ्या', धर्तीचं काम होतं. माझी त्याला हरकत नाही. मी ते त्याच मापात मोजतो आणि सोडतो. त्याविषयी अशी चर्चा झाली की मात्र न राहवल्याने मत मांडतो, इतकंच. :-)
वास्तवात घडून गेलेल्या व्यक्तिरेखांबाबतचा कल्पनाविलासही काही कालचौकट धरून असावा अशी अपेक्षा गैर नसावी.

रमताराम's picture

12 Jun 2012 - 1:25 pm | रमताराम

बहिणाबाईच्या नि दासू वैद्यांच्या संदर्भातील मुद्द्याबाबत असहमती नोंदवून ठेवतो. बहिणाबाई एका कालखंडातील असेल तर दासू वैद्य, पागनिसांच्या तोंडचे 'आधी बीज एकले' लिहिणारे शांताराम आठवले आणखी तिसर्‍या कालखंडातील. माझ्या मते गाणे असले तर ते कुठल्या काळात लिहिले गेले हे महत्त्वाचे नाही, हां त्या गाण्यातील आशय मात्र कालसुसंगत, विषयसुसंगत हवा ,मग कवि कुठल्या शतकातला हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. दासू वैद्यांच्या कवितेत जर रेफ्रिजरेटरचा उल्लेख असेल तर ती कविता तुकाराम चित्रपटात चालणार नाही हे मला मान्यच आहे. तसेच बहिणाबाई नंतरच्या काळातील असेल पण तिची कविता काकस्पर्श'च्या कालखंडाशी सुसंगत असेल तर असल्या आक्षेपाला 'माझ्या दृष्टीने' काही अर्थ नाही.

ता.क. :
मी समीक्षकी दृष्टीने चित्रपट पहात नाही (हे मी वेळोवेळी सांगत आलो आहेच) त्यामुळे तांत्रिक बाजू, चित्रपटाचा माध्यम म्हणून विचार मी करत नाहीच. जे समोर येते ते कसे आहे याचा विचार मी करतो 'कसे असायला हवे' याचा नाही. तांत्रिक चुका असतील असे गृहित धरून देखील बालगंधर्वने, काकस्पर्शने, तुकारामने मला चित्रपट पाहण्याचा, प्रेक्षकाचा आनंद दिला आहेच. तांत्रिक चिरफाड करून शंभर चुका शोधून प्रेक्षक म्हणून मी फार काही मिळवतो असे मला वाटत नाही, आणि समीक्षक म्हणून ओळख निर्माण व्हावी ही माझी इच्छाही नाही. जर चित्रपट पाहताना माझ्या अल्पबुद्धीला त्या चुका दिसल्या नसतील, खटकल्या नसतील तर ते चित्रपटाचे यश - माझ्यापुरते - मानतो मी. कारण त्या चित्रपटाने मला तपशीलातल्या चुकांपेक्षा दखलपात्र असे अधिक काही दिले आहे. मग वस्त्राला छिद्रे किती हा प्रश्न माझ्यापुरता गौण आहे.

ता.क.२: अभिनयाबाबत जिच्याबद्दल अधिक ओरड होते आहे त्या आवलीचा अभिनयच मला अधिक भावला. निव्वळ त्रागा किंवा करवादणे नि पोटतिडकीने रागे भरणे यातील फरक तिने नेमका दाखवला आहे. एखाद्या जिवाभावाच्या माणसावर अनिच्छेने, त्याच्या भल्यासाठी रागवताना, चिडताना स्वतःशीच एकीकडे संघर्ष होत असताना आवाजात निव्वळ रागापलिकडे दिसणारा एक पोटतिडकीचा, ध्वनि पातळीवर चिरकेपणाचा आवाज तिने नेमका पकडला आहे. गाथा बुडवण्याच्या प्रसंगी तुकोबावर सतत केलेल्या शिव्याशापाच्या आड निगुतीने जपलेली गाथा तुकोबाने इंद्रायणी स्वाधीन करताच आलेली वैफल्याची, पराभूतपणाची भावना तिने लाजवाब वठवली आहे. अर्थात हे आपले माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाचे मत. समीक्षकाची साक्षेपी वृत्ती आमच्यात कुठून येणार.

श्रावण मोडक's picture

12 Jun 2012 - 1:32 pm | श्रावण मोडक

मालक, काही चुकलं का? दोन, दोन ताजे कलम का? मी लेखनात कुठंही अॅड होमिनीम केलंय की काय? एरवी, आम्ही तुम्हाला ओळखतो. :-)

रमताराम's picture

12 Jun 2012 - 1:40 pm | रमताराम

ता. क. खरं म्हणजे निव्वळ प्रतिसाद आहेत, तुम्हाला उपप्रतिसाद नाहीत. वेगळे टायपायचा टंकाळा आला म्हणून इथेच लिहिले.
स्वगतः 'एरवी आम्ही तुम्हाला ओळखतो' या वाक्यात श्रामो नक्की काय सुचवू पहात आहेत? .... घुसवला की नाही कुठलातरी भुंगा डोस्क्यात.. छ्या:.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2012 - 1:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ररा, चित्रपट पाहिला नाही. पण, लेख नेहमीप्रमाणेच आवडला. चित्रपट पाहतांना 'आपला 'तुकाराम' आपण चित्रपटात शोधता कामा नये' हे वाक्य मला विशेष आवडलं. या वाक्यावरुनच असे म्हणता येते की, चित्रपट रसिकांनी आपला तुकाराम आपल्या गाथेतच ठेवावा. उगाच तुकारामाची गाथा आणि चित्रपटातला तुकाराम यांचा तौलनिक अभ्यास करत बसू नये. आपला आणखी एक मुद्दा '' पटकथालेखक-दिग्दर्शक तुम्हाला काय सांगू पहात आहे, दाखवू पहात आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे'' बस मलाही तेच महत्त्वाचे वाटते.

चित्रपटात तुकोबाबद्दल नवे काही संशोधन नसावे, तसा काही दावा कोणाचा काही वाचनात आला नाही. पण, एक नवा प्रयोग म्हणून या चित्रपटाची परीक्षणं छापून आली आहेत. जालावर कुठेतरी एक पाचेक मिनिटाची झलकही बघायला मिळाली. 'पुन्हा तुकाराम' या दिलीप चित्रे यांच्या पुस्तकातला तुकाराम आणि चित्रपटातला पागनीसांचाच तुकाराम माझ्याही स्मरणात असल्यामुळे हा नवा तुकाराम किती भावेल माहिती नाही. . तुकोबाच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत चार शतकांचा काळ लोटून गेला आहे, पण तुकोबाची आणि तुकोबाच्या अभंगाची गोडी काही कमी झाली नाही. ज्ञानी तुकोबा, संत तुकोबा, तुकोबा कवी, तुकोबाची सामाजिक कळकळ, संसारी तुकोबा, अशा विविध रुपांपैकी कोणत्या एखाद्या तुकोबाची दिग्दर्शक भेट घडवून आणतो का इतक्याचसाठी मीतरी हा चित्रपट पाहीन.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jun 2012 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

'एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो' ह्या जालावरच्या सुप्रसिद्ध वाक्याची पुन्हा एकदा काही प्रतिक्रिया वाचून प्रचिती आलीच.

रराशी प्रत्यक्ष भेटीत चर्चा करायची इच्छा होती आणि आहे. इथे लिहायचे नाही असे ठरवले होते, कारण धाग्याला नको ते वळण लावायला काही महाभाग हजर होतील असे वाटले होते.

असो...

मी समीक्षकी दृष्टीने चित्रपट पहात नाही (हे मी वेळोवेळी सांगत आलो आहेच) त्यामुळे तांत्रिक बाजू, चित्रपटाचा माध्यम म्हणून विचार मी करत नाहीच. जे समोर येते ते कसे आहे याचा विचार मी करतो 'कसे असायला हवे' याचा नाही. तांत्रिक चुका असतील असे गृहित धरून देखील बालगंधर्वने, काकस्पर्शने, तुकारामने मला चित्रपट पाहण्याचा, प्रेक्षकाचा आनंद दिला आहेच. तांत्रिक चिरफाड करून शंभर चुका शोधून प्रेक्षक म्हणून मी फार काही मिळवतो असे मला वाटत नाही, आणि समीक्षक म्हणून ओळख निर्माण व्हावी ही माझी इच्छाही नाही. जर चित्रपट पाहताना माझ्या अल्पबुद्धीला त्या चुका दिसल्या नसतील, खटकल्या नसतील तर ते चित्रपटाचे यश - माझ्यापुरते - मानतो मी. कारण त्या चित्रपटाने मला तपशीलातल्या चुकांपेक्षा दखलपात्र असे अधिक काही दिले आहे. मग वस्त्राला छिद्रे किती हा प्रश्न माझ्यापुरता गौण आहे.

समीक्षक म्हणून मी देखील (ररा ही प्रतिक्रिया मला उद्देशून नाही आहे हे मला माहिती आहे, पण कुठेतरी हे लिहायचेच होते म्हणून ह्या प्रतिक्रियेचा आधार घेऊन लिहित आहे. गैरसमज नसावा.) कधी चित्रपट पाहिल्याचे मलातरी आठवत नाही. मी मराठी साठी १३० - १५० रुपये आणि इंग्रजी-हिंदी साठी १९०-२५० रुपडे मोजून जेंव्हा त्या अंधारात शिरतो तेंव्हा दिड दोन तासात माझ्या पदरात काय पडते ते माझ्यासाठी महत्वाचे असते. माझा पैसा, माझा वेळ आणि माझी आशा योग्य जागी खर्ची झाली का हे माझ्यासाठी महत्वाचे. अशावेळी जर हे सर्व खर्च करून देखील मला समाधान मिळत नसेल, तर मग ते का मिळाले नाही हे शोधून काढण्याचा हक्क मला नक्कीच आहे.

बरं ररा म्हणतात की 'जर चित्रपट पाहताना माझ्या अल्पबुद्धीला त्या चुका दिसल्या नसतील, खटकल्या नसतील तर ते चित्रपटाचे यश - माझ्यापुरते - मानतो मी.'
सहमत आहे. पण मग ह्याचा अर्थ असा नसावा की चित्रपटात चुका नाहीतच. एखाद्याच्या अल्पबुद्धील केवळ चुकाच दिसल्या असण्याची शक्यता जास्ती नाही काय ? चित्रपट 'तुकाराम' आहे का 'काकस्पर्श' आहे हे महत्वाचे नसून, त्या चित्रपटाने मला काय दिले, हे आणि हेच मला कायम महत्वाचे वाटले आहे आणि राहील. मराठी चित्रपट आहे, आपल्या तुकोबांच्या आयुष्यावरती आहे, कमर्शीअल अ‍ॅटिट्यूड न ठेवता बनवला आहे, वेगळ्या विषयाला हात घातला आहे इ. इ. गप्पा ऐकून देखील असे विचारावेसे वाटते की ह्या चित्रपटाने नक्की कोणाल आणि काय प्राप्त झाले ? ग्लॅमरस तुकोबा दिसले ह्याचे समाधान मानायचे, तुकोबांच्या आयुष्यातल्या ह्या आधी पडद्यावर न आलेल्या गोष्टी बघायला मिळाल्या (ज्या मिळाल्या नसत्या तरी तुकोबांना समजून घेण्यात काही अडचण आली असती असे अज्जिबात नाही.) ह्याचे सुख मानायचे ?

सध्या येवढेच कारण नेट ची फडफड चालू आहे. भेटल्यावरती कुस्ती खेळूच.

पराभूत थोरवीच्या शोधात हा लेख वाचला व त्या पार्श्वभूमीवर पुन्हा हे परिक्षण फारच रोचक वाटले. एकंदर लेखात म्हणल्याप्रमाणे ती थोरवी शोधताना नेमके काय बघायचे यावर ररांनी टाकलेला प्रकाश व इथे तुक्याचा तुकोबाराय होण्यातला प्रवास. मधुनच राजमाचीवर जाउन शोधलेला बुधाचा प्रवास आठवला... ररांना नेमके प्रत्येक लेखातुन काय सांगायचे हे अजुन चांगले कळायला मदत होते आहे (निदान असे वाटतेय तरी)....

सध्या ज्या नेमाने ररा लिहीत आहेत, फार फार मजा येत आहे. ररा तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचत आहोत.

मला कायम महत्वाचे वाटले आहे आणि राहील.

काकस्पर्शच्या वेळी मी हेच म्हटलं होतं! आपण त्या अनुभवात रंगून गेलं पाहिजे. उगीच वेगवेगळे अँगल्स काढण्यानं चित्रपट बदलत नाही.

अप्पा जोगळेकर's picture

3 Nov 2012 - 12:05 pm | अप्पा जोगळेकर

तुकारामांचा संत तुकाराम होण्यामागची पार्श्वभूमदाखवनेणे फारच परिणामदाखवनेणेले. मोठ्या भावाचे नाकर्तेपण, प्रलयंकारी दुष्काळ आणि त्यादरम्यान लोकांनी हरवलेली माणुसकी, घरातल्या पाच व्यक्तींचे एकापाठोपाठ घडलेले मॄत्यू, मोठ्या भावाने परागंदा होणे या गोष्टींचे उल्लेख संत तुकारामांच्या चरित्राबद्दलच्या चर्चेत कायम हरवलेले असतात. ते इथे आवर्जून दाखवले हे विशेष वाटले. अभिनयाच्या बाबतीत जितेंद्र जोशीचा विशेष उल्लेख करावा लागेल. बाकी ते स्वर्गारोहण, झोळीत टाकलेल्या सनदा परत करणे, विट्टल मंदिराचे तोंड पाडला, गाथा तरंगणे वगैरे आख्यायिका गाळून चित्रपटकाराने चांगला पायंडा पाडला.