मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिले क्रुसेड........... भाग -१

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
या सगळ्या क्रुसेडमधे ख्रिश्चनांनी फक्त एकच जिंकले. सलादीनच्या युद्धाचा अभ्यास करता करता जमा झालेली माहिती थोडक्यात मांडत आहे. पिटर द हर्मिट योध्यांना जेरूसेलेमचा रस्ता दाखवताना,,, Image removed. क्रुसेडची पार्श्वभूमी. ६२२-१०९० इतिहासातील घटना त्यावेळी अचानक उद्भतवल्या असे वाटले तरी आत्ता त्याचा अभ्यास करताना त्या तशा अचानक उद्भवल्या नाहीत हे आपल्याला कळते. ते कळाल्यावर त्या तशा का घडल्या याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. १०९० साली मुसलमानांविरूद्ध पहिली क्रुसेड झाली त्याची कारणे चारशे वर्षांपासून घडणार्‍या घटनांमधे दडलेली आहेत तेव्हा त्याचा अगोदर शोध घेतला पाहिजे. या चारशे वर्षात मुसलमानांचा उत्कर्ष आणि त्यांनी अवलंबलेला तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार याने ख्रिश्चन धर्म धोक्यात आला होता हे सत्य आहे. मुसलमान धर्माचा विस्तारवाद हा या धर्माचा मुळ पाया असल्यामुळे थोड्याच काळात त्या धर्माने युरोपमधेही आपले पाय रोवायला सुरवात केली होती. जर चार्ल्स मार्टेल याने चार लाख मुस्लीम योध्यांचा पराभव केला नसता तर ख्रिश्चन धर्म युरोपमधे राहिला असता का नाही हा संशोधनाचा विषय आहे. ( हे युद्ध मध्य फ्रान्सच्या उत्तरेला उमय्याद खलिफांच्या विरूद्ध झाले. अल-आंडुलासचा गव्हर्नर अब्दूल रहमान अल-गाफिकी हा मुसलमान सैन्याचा सेनानी होता तर फ्रॅंक्सचा सेनानी होता हा मार्टेल. त्या काळी युरोपमधे मुसलमान उर्वरीत लोकांना फ्रॅंक या नावाने ओळखत. या युद्धात गाफिकी मारला गेला आणि मुस्लीम धर्माचा युरोपमधे प्रसार थांबला.) चार्लस मार्टेल. Image removed. पूर्वेचे मुसलमान आणि पश्चिमेचे ख्रिश्चन यांच्या दोन धर्मांमधे आणि या दोन अतिशय भिन्न विचारसरणींमधे सतत झगडे चालू होते. ख्रिश्चन सरदारांनी मुसलमानांना स्पेनचा काही भाग सोडल्यास युरोपमधून जवळजवळ हाकलून लावले होते. हा झगडा क्रुसेडमधे अधिक तीव्र झाला. क्रुसेडच्या प्रारंभीच्या काळात भ्रष्ट धर्मवेड हे या झगड्याचे एकमेव कारण नव्हते तर इतरही अनेक कारणे होती. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचाही त्यात महत्वाचा सहभाग होता. सामान्य जनतेचे धर्मवेड जाणून बुजून जोपासले जात होते व काव्य, शास्त्र, कला, राजकारण, मौज मजा या गोष्टी फक्त राज घराण्यातच दिसत होत्या. सामान्यांचे आयुष्य हे धर्मगुरू आणि त्यांचे बागलबच्चे यांच्याच हातात होते. सत्ता यांच्या हातात एकवटल्यामुळे भ्रष्टाचार व अनागोंदी बोकाळली होती व अंधश्रद्धेपायी अनेक जीव जात होते तरीही धर्माचा पगडा अभेद्य होता. धर्म हे जनतेचे वेड होते आणि त्याचे आंधळे अनुकरण करण्यात जनता धन्यता मानत होती. नीच प्रथा पाळल्या जात होत्या आणि अशा वातावरणात लष्करी सत्ता व त्यात राहून गाजावायला मिळणारे शौर्य याचे सर्वसामान्यांमधे सूप्त आकर्षण होते. सर्व सरदारांचे खडे सैन्य असे व ते सतत एकामेकांमधे लढाया करत त्यामुळे शोर्याला एक प्रकारची आदराची किनार युरोपभर होती. या सरदारांना युरोपमधे शांतता का युद्ध हे ठरवायचा पूर्ण अधिकार होता. क्रुसेडही त्या काळातील समाजाचे प्रतिबींब होते असे म्हणायला हरकत नाही. पराक्रम आणि शौर्य याला सरकार दरबारी मान होता व नाईटहूड मिळवण्यासाठी युवक काहीही करावयास तयार होते. राजांना ते मिळे व त्या काळात कुठल्याही लहान मुलाला तुला मोठेपणी काय व्हायचे आहे असे विचारल्यास नाईट हेच उत्तर मिळे. या अशा वातवरणात क्रुसेडमधे दोन परस्पर विरोधी शक्ती एकवटल्या गेल्या. एका बाजूला धर्मामधे सांगितलेली सत्कर्मे आणि दुसर्‍या बाजूला शौर्य गाजवताना कुठल्याही थराला जाणारे क्रौर्य. चर्चमधे नाइटहूड प्रदान करण्याचे समारंभ होऊ लागले आणि या वेळी बिशप आणि योद्धे हजर रहात होते. तरूणांना कॅथॉलिक पंथाशी निष्ठा वाहिल्याशिवाय त्यांच्या ध्येयाच्या जवळपासही जाता येईना. प्रसंगी त्यांना धर्मासाठी रक्त सांडायचीही प्रतिज्ञा घ्यावी लागे आणि ती घेण्यात त्यांना मोठे भुषण वाटे. क्रुसेड चालू व्हायच्या अगोदर वातावरण हे असे रानटी होते आणि तो (रानटीपणा) धर्म आणि शौर्य या कोंदणात चपलखपणे बसवण्यात चर्चला चांगलेच यश आले होते. ख्रिश्चन राष्ट्रात पॅलेस्टाईनच्या तिर्थयात्रेवरची श्रद्धा हे या झगड्यामागचे असेच एक महत्वाचे कारण होते. ही श्रद्धा बर्‍यापैकी अंधश्रद्धेकडे झुकलेली होती आणि ही तिर्थयात्रा एक कर्मठ परंपराच झाली होती. चवथ्या शतकात कॉस्टनटाईन आणि त्याच्या आईने ख्रिश्चन धर्म स्विकारल्या बरोबर चर्चला खूष करण्यासाठी म्हणा किंवा श्रद्धेतून म्हणा जेरूसलेममधील त्यांच्या श्रद्धास्थानाला –जेथे येशूला सुळावर चढवण्यात आले होते, उर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा पासून या शहराची वारी करण्याची जी प्रथा पडली ती आजतागायत चालू आहेच. जसा जसा काळाच्या ओघात ख्रिश्चन धर्म भ्रष्ट होऊ लागला तसे ही वारी केल्यावर या पापापासून मुक्ती मिळते या कल्पनेने येथे भाविकांची युरोपमधून रीघ लागू लागली. ही वारी केलेल्याला समाजात मान मिळू लागल्यामुळे त्याचे महत्व अतोनात वाढले व जेव्हा हे पुण्य पदरी पडण्याच्या कामात अडथळा येऊ लागला तेव्हा साहजिकच तो दूर करायचे प्रयत्न केले गेले. हळूहळू ख्रिश्चन धर्माच्या दृष्टीने हे शहर एक पवित्र शहर मानले जाऊ लागले. ज्या ठिकाणी येशू चालला ती जमीन पवीत्र, ज्या ठिकाणी त्याने खाल्ले ती जागा पवित्र, जेथे त्याला पकडले ती जागा पवित्र, जो दरवाजा त्याने उघडला तो पवित्र, ज्या ओढ्यात त्याने स्नान केले त्याचे पाणी पवित्र........ अशा पवित्र ठिकाणांची मोठीच रेलचेल उडाली. एवढेच काय ज्या ठिकाणी येशूने श्वास घेतला ती हवाही पवित्र थोडक्यात ज्याच्या ज्याच्यावर येशूची दृष्टी पडली ते सर्व पवित्र मानले जाऊ लागले व त्याचे दर्शन घेणेही त्यामुळे क्रमप्राप्त होते. या सगळ्यात अजून एका भानगडीची भर पडली. १० व्या शतकात जगबूडी येणार व येशू जेरूसलेममधे परत दर्शन देणार अशी अफवा ऊठली आणि जेरूसलेममधे तोबा गर्दी उडाली. येशूची आराधना करून व पापाची कबूली देऊन हा विनाश वाचवता येईल असा त्यांचा दृढ विश्वास होता. या भावनेने उचंबळून आलेली असंख्य मने जेरुसलेममधे जमा होऊ लागली. एकट्या बल्गेरियामधून असे म्हणतात त्या काळात १२००० स्त्री पुरूषांनी जेरूसलेमच्या दिशेने प्रस्थान ठेवले. हा प्रदेश जेव्हा रोमन साम्राज्याच्या अधिप्त्याखाली होता तेव्हा या यात्रेकरूंना कसल्याच अडचणींना तोंड द्यावे लागत नव्हते. उलट त्यांच्या मार्गावर त्यांची चांगली सरबराई ठेवली जात असे. पण जेव्हा मुसलमानांनी जेरूसलेम ताब्यात घेतले तेव्हा सगळे चित्र पालटले. मुसलमानांच्या राज्यात स्थानिक ख्रिश्चन व या यात्रेकरूंना भयंकर छळाला सामोरे जावे लागले. प्रसंगी क्रौर्याची परिसीमाही गाठली जऊ लागली. अर्थात ख्रिश्चनांनीही ती नंतर ओलांडलीच पण त्याबद्दल पुढे येईलच. जसा जसा हा अत्याचार वाढू लागला तशी तशी जेरूसलेमला भेट देण्यार्‍यांची संख्या वाढू लागली कारण जेरूसलेमचे दर्शन घेऊन जिवंत परत येणे हा एक मोठा चमत्कार मानला जाऊ लागला अर्थात हे येशूच्या कृपेनेच शक्य होते आणि या कृपेच्याच मागे सर्वजण होते. जे हजारो यात्री आशियामधे जात होते दुर्दैवाने त्यातील काहीच परत येत होते. पण ते येताना युरोपमधील राज्यातून येत आणि त्यांनी भोगलेल्या छळांच्या रक्तरंजीत कहाण्या स्थानिकांना ऐकवत. पवित्र जेरूसलेमच्या कहाण्या ऐकायला त्यांना चांगला श्रोतृवर्ग मिळे व छळाच्या या कहाण्या युरोपमधे दूरदूरवर पसरत. त्यांचा खडतर प्रवास, त्यांच्यावर व जेरूसलेममधील त्यांच्या धर्मबांधवावर होणार्‍या अत्याचाराच्या कहाण्या अशा रितीने युरोपभर पसरल्या व सूडाची आग धगधगू लागली. वर्षामागून वर्षे उलटली आणि ही आग भडकतच गेली. एक काळ असा आला की या आगीत काय जळणार हा प्रश्न उभा राहिला. क्रुसेडने त्याचे उत्तर दिले...... मुसलमानांना धडा शिकवायच्या कल्पनेने आता मुळ धरलेलेच होते पण १० व्या शतकाच्या शेवटी शेवटी याला चालना दिली पोप सिल्व्हेस्टर याने लिहिलेल्या एका पत्राने. हे पत्र त्याने युरोपातील सर्व चर्चना लिहिले ज्यात त्याने जेरुसलेमच्या चर्चसाठी मदतीची याचना केली होती. त्याच्या दुर्दैवाने इटलीमधी पिसा या शहरानेच फक्त त्याची हाक ऐकली पण त्यांनी सिरियाच्या किनार्‍यावर थोड्याफार हालचाली केल्या तेवढ्याच. त्यानंतर या याचनेकडे कोणी लक्षही दिले नाही पण १०७३ मधे या कल्पनेने परत एकदा उचल खाल्ली. या वेळी मदतीची याचना केली होती ढासळत्या कॉस्टनटिनोपॉलच्या मान्युएल नावाच्या राजाने. त्याने नववा पोप ग्रेगरी याला मदतीसाठी साद घातली. या पत्रात या पूर्वेच्या राजाची पश्चिमेच्या चर्चच्या प्रती असलेली निष्ठा त्याने स्पष्टपणे मांडली होती. पोप ग्रेगरी अशा संधीची वाटच बघत होता. या पत्राने युरोपमधील सगळी चर्च एकत्र आणता येतील असा त्याला विश्वास वाटला आणि त्याने लगेचच सगळ्या लॅटीन आणि ग्रीक चर्चना पत्रे लिहिली. हे सगळे जर एकत्र झाले तर त्याला पूर्वेच्या मुसलमानांचा पराजय करता येणार होता. त्या पत्रांपैकी एक सम्राट हेन्रीला व एक लिहिले होते सर्व ख्रिश्चन जनतेला. या आवाहनाला रोमन धर्माधिकार्‍याने ताबडतोब मान्यता दिली. या कल्पनेनेच तो इतका उत्साहित झाला की त्याने ५०,०००चे सैन्य उभारून स्वत: त्याचे नेतृत्व स्विकारायचे कबूल केले. पण काहीच काळानंतर त्याचे लक्ष या पूर्वेच्या चर्चवरून उडाले आणि पश्चिमेला ख्रिश्चन धर्माचे बस्तान बसविण्याच्या नादात ही क्रुसेडची मोहीम कालांतराने थंडावली. पण पोप ग्रेगरीच्या पत्रांनी जे अपेक्षित होते त्या कामाची सुरवात तर केली होती. मुसलमानांच्या विरोधात एक संतापाची लाट युरोपमधे पसरली आणि यांना एकदा धडा शिकवायलाच पाहिजे असे उघडपणे बोलले जाऊ लागले. सूडाची व संतापाची धग जी आत धुमसत होती तिला वर यायला वाट मिळाली व पुढच्या संघर्षाची बीजे रोवली गेली. ख्रिश्चन जगातात मुसलमानांच्या विरुद्धच्या या लढाईच्या तयारीचे काम आणि लढाईचे नेतृत्व एका माणसाला देण्यात आले ज्याचे नाव होते पिटर द हर्मिट. पिटर द हर्मिट.- Image removed. हा फ्रान्समधील अमाईन या गावचा होता आणि तो खरेतर एका श्रीमंत राजघराण्यातील स्त्रीशी लग्न करून चांगले सुखवस्तू आयुष्य जगत होता. हा तरूणपणी एक सैनिक होता पण नंतरच्या आयुष्यात त्याने संन्यास घेऊन धर्माला वाहून घेतले व त्यामुळे त्याला हर्मिट या नावाने ओळखले जाऊ लागले. हा एक बुटका पण रुंद खांद्याचा, समोरच्यावर विशेष छाप न पडणारे व्यक्तिमत्व, असा सामान्य अवतार असलेला प्राणी होता पण एकदा का त्याने तोंड उघडले की त्याचे डोळे एका विलक्षण तेजाने झळकू लागत व तो जे बोले त्याने त्याच्या समोरच्याचे मतपरिवर्तन होऊन त्याचे रक्त उसळू लागे. त्याचे आयुष्य त्याने ख्रिश्चन मठात, एका विचाराने भारून जात, धर्माची स्वप्ने बघत घालवले होते त्यामुळे अशा कडव्या पण अतिरेकी विचारांच्या माणसाकडे या मोहिमेचे नेतृत्व आल्यावर समस्त जनता भारून गेली त्यात नवल ते कसले ! त्या काळातील प्रथेप्रमाणे पिटरनेही जेरुसलेमची यात्रा केली. खडतर ३००० मैलांचा प्रवास करून तो तेथे पोहोचला. पोहोचल्या पोहोचल्या त्याला त्या शहराच्या वेशीवर सोन्याचा एक तुकडा कर म्हणून भरावा लागला. त्याने जेरुसलेममधी सर्व पवित्र ठिकाणे भक्तिभावाने पालथी घातली आणि शेवटी त्याने एका स्थानिक लॅटिन ख्रिश्चन माणसाकडे मुक्काम टाकला. रात्रभर जेरूसेलेमचे गतवैभव आणि आत्ताची हालाखीची परिस्थिती यावर त्याने त्या माणसाशी चर्चा केली. दुसर्‍या दिवशीही त्याने अनेक पवित्र जागांवर प्रार्थाना अर्पण केल्या व तेथे येणार्‍या अनुभवामुळे त्याच्यातील सूडबुद्धी अधिकच प्रज्वलीत झाली. तुर्कांनी इतर धर्माच्या जनतेवर चालवलेले अत्याचार बघून त्याचे मन खवळून उठले आणि त्याने जेरुसेलेमच्या चर्चचा प्रमुख सिमॉन याची गाठ घेतली. सिमॉन व पिटर.. Image removed. त्या म्हातार्‍या प्रमुखामधे त्याला अपार करूणा दिसली. ग्रीक असल्यामुळे खरे तर तो चर्चच्या दृष्टीकोनातून पाखंडी होता पण पिटरच्या दृष्टीने तो ख्रिश्चन होता हेच खूप होते. सिमॉनने डोळ्यात पाणी आणणार्‍या कहाण्या त्याला सांगितल्यावर पिटर द हर्मिट त्याला म्हणाला “लिही ! हे सर्व तू माझ्या मालकाला म्हणजे पोपला पत्रात लिही. त्याच्या प्रती रोमच्या पोपला, सर्व राजांना आणि त्याच्यावर तुझी मुद्रा उमटावयाला विसरू नकोस. मी स्वत: त्या सगळ्यांना भेटून तुमच्यावर जे अत्याचार होत आहेत ते दूर करण्यासाठी मदत मागेन “. त्या प्रमुखाने तशी पत्रे लिहून पिटर द हर्मिटच्या स्वाधीन केली. हर्मिटला आता तो ख्रिश्चन समुदायाचा दुखहर्ता असल्याचा भ्रम होऊ लागला. गेल्या काही दिवसात आलेल्या अनुभवांमुळे व सिमॉनच्या कहाण्यांमुळे त्याला तीच स्वप्ने पडू लागली. त्याच रात्री त्याच्या स्वप्नात येशू स्वत: आला आणि म्हणाला “ हे पिटर उठ आणि त्वरा कर. तुझ्यावर जी कामगिरी सोपवण्यात आली आहे त्याला न्याय दे. माझ्या अनुयायांची मदत कर.” ही आकाशवाणीच झाली असे समजून पिटरने ताबडतोब निघण्याची तयारी केली. किनार्‍यावरून त्याने एक जहाज पकडले आणि तो इटलीला पोहोचला. पोहोचल्यावर त्याने वेळ न दवडता पोपची गाठ घेतली. त्यावेळी पोप होता “दुसरा अर्बन”. त्याने त्याची आस्थेने विचारपूस केली कारण तो जेरुसेलेमला जाऊन आला होता आणि त्याला सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली व क्रुसेडची कल्पना उचलून धरली. या बैठकीने प्रोत्साहीत होऊन त्याने त्याचा प्रवास चालू केला. इटलीमधून त्याने आल्प्स पर्वत पार केला आणि युरोपमधील सर्व राज्यांना त्याने भेटी दिल्या. प्रत्येक दरबारात, प्रत्येक चर्चमधे, प्रत्येक किल्ल्यात त्याने जेरूसेलेमच्या ख्रिश्चन जनतेच्या हालाचे वर्णन केले व त्यांना मदतीची कशी आवश्यकता आहे हे पटवून दिले व त्यांच्या मनात तुर्कांविरूद्ध सूडाची भावना प्रज्वलित केली. तो एवढेच करून थांबला नाही तर रानोमाळ हिंडत त्याने खेडेगावातील जनतेला तुर्कांची भीती दाखविली व त्यांच्यामधेही जागृती केली. त्याचा वेष त्याच्या नावाला शोभणारा असे. तो एका खेचरावरून प्रवास करी व एक सधा लोकरीचा बिनबाह्याचा अंगरखा घाले. सर्व चर्चचे पाद्री व इतर अधिकार्‍यांपेक्षा लोकांबद्दल त्याच्या मनात अपरंपार करूणा भरलेली असे व तो त्यांच्या खाजगी भानगडींमधेही त्यांना मदत करे. झगमाटापासून दूर राहून तो अत्यंत साधा आहार घेई त्यामुळे लोकांच्या मनात त्याची एक संत म्हणून प्रतिमा तयार झाली होती. तो जाईल तेथे त्याच्या भोवती लोक गोळा होऊन त्याचे भाषण ऐकत असत व त्याला भेटवस्तू देत असत. त्याला हळू हळू देवत्व प्राप्त झाले व त्याच्या खेचराचे केस लोक एक शुभलक्षण म्हनून स्वत:कडे जपून ठेऊ लागले. त्याची प्रवचनांनी ख्रिश्चन समाज ढवळून निघाला. त्याच्या एकेका शब्दांनी सर्व राजे सिंहगर्जना करून तलवारींवर आपल्या मुठी आवळू लागले व ते येणार्‍या युद्धाच्या आमंत्रणाची वाट बघत तयारीला लागले..................... जयंत कुलकर्णी

वाचन 24746 प्रतिक्रिया 0