हिटलरचे शेवटचे १० दिवस......युद्धकथा - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 May 2012 - 2:55 pm

जनरल रोमेलचे शेवटी काय झाल..युद्धकथा -१.
कामीकाझे.............युद्धकथा – २ भाग-१
कामिकाझे .............युद्धकथा -२ भाग-२

हिटलरचे शेवटचे १० दिवस......
बरोबर ६७ वर्षापूर्वी.
बंकरच्या बाहेर-

नाझी जर्मनीच्या पाडावानंतर तीनच आठवड्याने रशियन पोलिसदलाचा प्रमुख मेजर इव्हान निकितीन याने बर्लिनहून अहवाल पाठवला की फ्युररने स्वत:ला गोळी वैगरे काही घालून घेतलेली नाही ना त्याच्या प्रेताचे तेथे कुठे दफन झाले आहे. पण तशी अफवा मात्र जरूर होती. तो मृत्यू पावला आहे की नाही याचीच शंका आहे. हिटलर जिवंत आहे या अफवेची ही सुरवात होती.

या अफवा अशाच पसरत राहिल्याने दोस्त राष्ट्रांच्या गुप्तहेर खात्याने १९४५ साली या बाबतील सखोल चौकशी करायचा आदेश दिला आणि हळूहळू त्या काळात काय काय झाले होते याची कहाणी उभी राहिली. जी २८ माणसे हिटलरबरोबर त्याच्या बंकरमधे रहात होती त्यांना नंतर पकडण्यात आले आणि त्यांना वेगवेगळ्या खोल्यात ठेवून प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांचा प्रत्येक उत्तराशी व बाहेरच्या माहितीचा ताळमेळ घालण्यात आला. या सगळ्यातून हिटलरच्या अखेरच्या दिवसांचे एक स्पष्ट चित्र उभे राहिले. पण तसे हे अपूर्णच म्हणायला हवे कारण त्याच्या मनात काय चालले होते हे कोणीच सांगू शकत नव्हते...... ते हे अपूर्ण चित्र.

१९४५च्या ३० एप्रीलच्या दुपारी २.३० वाजता हिटलर त्याच्या पत्नीबरोबर फ्युररबंकरमधे बसला होता. त्याच वेळी त्याने आपल्या स्वयंचलीत वाल्थरची नळी आपल्या तोंडात घातली आणि त्याचा चाप ओढला व त्याच वेळी त्याची पत्नी इव्हा हिटलरने आपल्या दाताखाली सायनाईडची कॅपसूल चावली. रात्री १०.३० वाजता जनरल राटेनहबर आणि त्याच्या विश्वासू सैनिकांच्या तुकडीने ती दोन प्रेते अनेक वेळा पेट्रोलमधे भिजवली. त्याला आग लावल्यावर जे काही अवशेष उरले ते त्यांनी पुरून टाकले. रात्रभर रशियन तोफा गडगडत होत्या आणि त्यांच्या मार्‍यात १००० वर्षाचे आयुष्य असणार्‍या राईशस्टाग आणि ती वल्गना करणार्‍या हिटलरच्या थडग्याच्या (?) चिंधड्या ऊडत होत्या.

हिटलरच्या जन्मदिवसालाच म्हणजे २० एप्रिललाच त्याच्या शेवटास सुरवात झाली होती. त्या दिवशी चॅन्सेलरी गार्डनच्या ५० फूट खाली असलेल्या बंकरमधे जर्मन सैन्यातील वरीष्ठ अधिकारी तेथे त्यांच्या सुप्रीम कमांडरचे अभिष्टचिंतन करण्यास जमले होते. सगळ्यांचे गणवेष, पदके व बूट चकाकत होते पण ती चकाकी त्यांच्या चेहर्‍यावरून परावर्तीत होत नव्हती. ते ओढलेले आणि तणावग्रस्त दिसत होते. साहजिकच आहे. सर्व आघाड्यांवरून जर्मन फौजेच्या माघारीच्या बातम्या येत होत्या. रशियन फौजा बर्लिनची दारे ठोठावत होत्या तर एल्ब नदी पार करून त्यांच्याशी हातमिळवणी करायला ब्रिटन, फ्रान्स व अमेरिकेचे सैन्य मोठ्या तडफेने निघाले होते.

दहा महिन्यापूर्वी त्याच्या हत्येच्या कटाच्या वेळी झालेल्या स्फोटातून सहीसलामत वाचल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वात बराच बदल झाला होता. तो आता एक पाय ओढत, पाठीत वाकून चाले आणि त्याच्या डाव्याहातातील कंप थांबविण्यासाठी तो डावा हात उजव्या हाताने दाबून धरत असे. पण त्याच्या आवाजाती जरब आणि नाट्य तेच होते व डोळ्यात तीच पूर्वीची चमक.

त्याच दिवशी जालेल्या बैठकीत फिल्ड मार्शल कायटेलने हिटलरला बिकट वस्तुस्थितीची पूर्ण कल्पना दिल्यावर हिटलरने जे उत्तर दिले त्यावर जमलेल्यांचा विश्वास बसेना. हिटलरने कायटेलला बाजूला सारले आणि तो म्हणाला “मूर्खपणा ! रशियाला बर्लिनच्याबाहेर आता एका रक्तरंजीत युद्धाला सामोरे जावे लागेल ज्याच्यात त्यांचा दारूण पराभव निश्चित आहे. त्यानंतर आपण दोस्तांच्या सैन्याला समुद्रापर्यंत मागे ढकलू”.
त्याच्या डोळ्यात आता वेगळीच चमक दिसत होती. सगळीकडे शांतता पसरली आणि कोणाच्या तोंडातून शब्द फुटेना.
राईश मार्शल हर्मन गोअरींगने पसरलेल्या भयाण शांततेचा भंग करत म्हटले “विजय शेवटी जर्मनीचाच होणार आहे पण आमचे एवढेच म्हणणे आहे की फ्युररने बर्लिन सोडून एखाद्या सुरक्षित जागी जावे आणि तेथून आपल्या सेनेचे संचलन करावे”.
हिटलरने त्याच्याकडे भेदक नजर टाकली. “ याचा अर्थ तुला एखाद्या सुरक्षित जागी जायचे आहे एवढाच आहे. तू जाऊ शकतोस”. गोअरींगने त्याचा राईश मार्शलचा बॅटन खाकेत धरला आणि त्याला एक सॅल्युट ठोकला व तेथून घाईघाईने बाहेर पडला. जाताना ट्रक भरून त्याच्या मौल्यवान वस्तू आणि मर्सडिस घेतली आणि बव्हेरीयाच्या दिशेने त्याने कूच केले. जणू काही बव्हेरियात गेल्यावर त्याची सुटका होणार होती.

गोअरींग गेल्यावर हिटलर परत त्याच्या नकाशांकडे वळाला आणि त्याचे नवीन डावपेच समजावून सांगायला लागला. त्या आठवणी सांगत असताना एक जनरल म्हणाला “ सैन्याच्या ज्या डिव्हिजन्स घेऊन तो हे नवीन डावपेच आखत होता त्या अस्तित्वात नाहीत हे आम्हाला चांगलेच ठाऊक होते पण त्याचे बोलताना एकताना आम्हाला असे वाटत होते की अजूनही काहीतरी होईल आणि आम्ही परत लढाईत उतरू शकू.”

त्या दिवशी तेथे जमलेल्या माणसांमधे एकच माणूस असा होता जो भ्रमिष्ट हिटलरच्या प्रभावाखाली नव्हता. त्याला जर्मन जनतेची काळजी लागली होती आणि तो म्हणजे अल्बर्ट स्पीअर. याच माणसाने युद्धसामग्रीचे अनाकलनीय उत्पादन करून हिटलरच्या युद्धाचा गाडा चालू ठेवला होता. पराभव झाल्यास हिटलरने त्याचे राइश नष्ट करायची एक योजना आखली होती व मार्च मधेच त्याला हिटलरच्या या भयानक योजनेचा पत्ता लागला होता. सर्व जिल्ह्याच्या नाझी प्रमुखांना त्याच्या हद्दीतील सर्व कारखाने, महत्वाच्या इमारती, खाणी, अन्नाचे साठे इ. नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. लष्कराला सर्व नदीवरील सर्व पूल, रेल्वे, कालवे, जहाजे इ. उध्वस्त करायचे आदेशही देण्यात आले होते. अल्बर्ट स्पिअरने सर्व जर्मनीत वादळी दौरे करून त्या सर्व प्रमुखांना हा आदेश पाळणे जर्मनीच्या हिताचे कसे नाही हे समजावून सांगितले. हिटलरच्या वाढदिवसाला हा आदेश परत घ्यायची विनंती करून जर्मनीला वाचवायचा प्रयत्न करायचा ठरवले पण ती विनंती ऐकल्यावर हिटलरने शुन्यात नजर लावली आणि म्हणाला “जर जर्मन नागरिकांनी शरणागती पत्करली तर त्यांची तीच लायकी आहे हे सिद्ध होईल. तसे झाले तर त्यांचा नाश व्हायलाच पाहिजे.”
हे उत्तर ऐकल्याव्र स्पीअरने स्वत:च्या जिवाची काळजी न करता करून हिटलरच्या या योजनेला सुरूंग लावायचा ठरवला. गेस्टापोंची त्याच्यावर नजर असतानाही त्याने परत जर्मनीभर दौरे आखले व सर्व प्रांत प्रमुखांना भेटून त्यांना हिटलरच्या या आज्ञा पाळू नयेत अशी आवाहने केली. कार्ल कौफमनने त्याला महत्वाची बंदरे नष्ट करण्यात येणार नाहीत असे आश्वासन दिले. बाकीच्यांनीही घाबरत का होईना याला मंजूरी दिली.

हिटलरच्या कडव्या दुराग्रही पाठिराख्यांच्या हातात त्याच्या ताब्यातील कारखान्यातील दारूगोळा पडू नये म्हणून तो विहिरींमधे आणि पाण्याने भरलेल्या खाणींमधे टाकून द्यायचे त्याने आदेश दिले. त्याच्या या आदेशामुळे अनेक प्राण वाचले असे म्हणायला हरकत नाही.

दरम्यानच्या काळात हिटलरने रशियन फौजांना बर्लिनच्या बाहेर फेकण्याच्या योजना बारीकसारीक तपशिलासह तयार केल्या होत्या. हे रशियन सेनेवरचे आक्रमण एस.एस चा जनरल फेलिक्स स्टाईना याच्या अधिपत्याखाली करण्यात येणार होते. त्याच्याशी टेलिफोनवर बोलताना हिटलर जवळजवळ किंचाळलाच “जो अधिकारी आपला एखादाही सैनिक या आक्रमणात मागे ठेवेल त्याला पाच तासात ठार केले जाईल”.

२२ एप्रिलच्या दुपारी हिटलरने त्या बंकरमधे स्टाईनाच्या पहिल्या विजयाची घोषणा केली. एस.एस.चा विकृत मनोवृत्तीचा प्रमुख हिमलरने टेलिफोनवरून बातमी दिली की स्टाईनाची फौज मोठ्या शौर्याने लढत आहे आणि रशियन फौजा बर्लिनमधून मागे हटत आहेत. पण त्याचवेळी कर्नल जनरल अल्फ्रेड जोडलच्या टेबलावर अनेक संदेश येऊन पडत होते. ते बघितल्यावर त्याची वाचाच बसली. त्याला काय करावे ते कळेना. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तो बघून हिटलरने त्याला विचारले “काय झाले ?”
“फ़्युरर, स्टाईनाने हल्ला केलेलाच नाही. मार्शल झुकॉव्हचे रणगाडे बर्लिनमधे घुसलेत”.
हिटलरने समोर बघितले आणि त्याचा चेहरा काळानिळा पडला. “एस.एस. ! माझा विश्वासघात एस.एस. ने केला. पहिल्यांदा लष्कराने, मग लुप्फ़्तवाफने आणि आता तुम्ही....विश्वासघातकी सगळे.. ....” तीन तास हिटलर रागाने गुरगुरत होता, येरझार्‍या घालत होता. अखेरीस निराश होत त्याने एका खुर्चीत आपले अंग टाकले. “तिसरे राईश संपले ! संपले !” तो पुटपुटला. “आता माझ्यापुढे मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. मी येथेच थांबणार आहे आणि शेवटी मी आत्महत्या करेन. लढाई करायची असेल तर करणार तरी कशाने... गोअरींगला सांगा...तहाची बोलणी सुरू करायला.....”

हिटलरचे हे शब्द गोअरींगला सांगण्यात आले. १९४१ साली झालेल्या कायद्याने त्याला हिटलरचा वारस नेमण्याची तरदूत झाली होतीच. त्याला दोस्तराष्ट्रांबरोबर तहाच्या वाटाघाटी करायचा आत्मविश्वास होता आणि कमीत कमी त्याच्या स्वत:च्या सुटकेचे तरी प्रयत्न करता येतील या विचाराने त्याने हिटलरला रेडिओवर संदेश पाठवला – आपण घेतलेल्या निर्णयानुसार मी राईशचे नेतृत्व स्विकारावे हे आपल्याला मान्य आहे का ? मला जर आज रात्री १० पर्यंत आपले उत्तर आले नाही तर मी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी समजेन. - गोअरींग”

हा संदेश पाठवून गोअरींगने आपल्या शरीररक्षकांची संख्या १००० केली आणि तो जनरल आयसेनहॉव्हर यांना भेटायच्या तयारीला लागला. त्याने आयसेनहॉव्हरला संदेश पाठवण्यासाठी तो लिहायला घेतला तेवढ्यात हिटलरचा संदेश येऊन धडकला.-
तू जे केले आहेस त्यासाठी खरे तर तुला मृत्यूदंडच द्यायला पाहिजे. पण तू राजिनामा दिलास तर मी या शिक्षेचा आग्रह धरणार नाही. नाही दिलास तर मला पुढील कार्यवाही करावी लागेल. – हिटलर”.

अविश्वासाने या कागदाकडे गोअरींग टक लाऊन बघत असतानाच बुटांचा खाडखाड आवाज झाला आणि काही एस.एस.चे जवान आत आले आणि त्यांनी गोअरींगला अटक केली. हिटलरला खरे तर वारस नकोच होता.

गोअरींग हिटलरच्या बंकरमधून बाहेर पडल्यापडल्या तासाच्या आतच हिटलरने त्याची चिता रचायची योजना मोठ्या काळजीपूर्वक आखायला चालू केले. शांतपणे आणि विचार करून त्याने अमेरिकेच्या सैन्याबरोबर लढणार्‍या जनरल वेंक्सच्या १२व्या आर्मीला बर्लिनला माघारी बोलावले. बर्लिनमधील प्रत्येक माणसाला व मुलाला रशियाच्या सेनेला थांबवण्याच्या लढाईत सामील व्हायच्या आज्ञा देण्यात आल्या. जे टाळतील त्यांना जागेवरच फासावर चढवण्यात येणार होते.

हा आदेश मिळाल्यावर नाझी पार्टीचा एक जेष्ठ पुढारी वेगेना याने हिटलरला फोन करून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला “ पश्चिमेला जर अमेरिकन आणि ब्रिटनच्या सैन्यासमोर ताबडतोब शरणागती पत्करली तर रशियन सेनेला थोपवता येईल आणि बराच विध्वंस टाळता येईल” हे ऐकल्यावर हिटलर म्हणाला “ विध्वंस ! मला आता तोच पाहिजे आहे. त्या विध्वंसानेच माझा पराभव उजळून निघेल”. दुसर्‍याच दिवशी २५ एप्रिलला रशियन सैन्याने बर्लिनला वेढा घातला.

गेल्या सात दिवसात बंकरमधे
हिटलरच्या भोवती असलेल्या त्याच्या सहकार्यांमची संख्या हळुहळु कमी होत चालली होती. गोबेल्स आणि त्याच्या बायकोने त्यांची सहा मुले आता बरोबर आणली होती. या मुलांना त्याने स्वत: आत्महत्या करायच्या अगोदर ठार मारले हे आपल्याला माहीत आहेच. (पण या मुलांना ठार मारल्यानंतर ती बाई शांतपणे पत्ते खेळत होती हे कदाचित माहिती नसेल)

गोबेल्स कुटुंब -

हिटलरचा आजवरच्या वाटचालीतील साथीदार मार्टीन बोरमन याने तेथेच रहायचा निर्णय घेतला. ईव्हा ब्राऊनने तेथून जायला नकार दिला. हिटलरच्या खोलीच्या शेजारी असलेल्या या मोठ्या खोलीत २६ वरीष्ठ सेना अधिकारी आणि इतर जण होते.

जसे जसे रशियनसैन्याच्या तोफांचा आवाज एकू यायला लागला तसे तसे बंकरमधील वातावरण बदलू लागले. थोड्याच वेळात त्या तोफांच्या गोळ्यांनी तो बंकर हादरायला लागला तसे ते फारच बदलून गेले. सगळ्यांच्या मनावरील ताबा सुटला व दारू पाण्यासारखी वाहू लागली. शिस्तीचा बाऊ करणारे प्रशियन सेनानी आपले कपडे काढून सेक्रेटरींबरोबर बेफाम नृत्य करू लागले, कोणालाच कसले भान उरले नाही.
इकडे हिटलर मात्र भ्रमिष्टासारखा नकाशासमोर उभा राहून बैठका बोलवत होता. कोणी हजर रहात होते, तर कोणी हजर रहात नव्हते. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की रशियन सैन्य बर्लिनच्या एका ट्युब रेल्वेच्या मार्गातून त्याच्या बंकरपर्यंत विनाविलंब येऊ शकते. त्याने लगेचच तो मार्ग पाण्याने भरून टाकायचा आदेश दिला. ज्याला हा आदेश दिला तो जनरल क्रेबने नापसंती दर्शवत सांगितले की तसे करणे शक्य नाही कारण त्यात हजारो जखमी जर्मन सैनिक लपलेले आहेत. हिटलरने त्याचे वाक्य तोडत आज्ञा केली “मी सांगतो तसे करा.” थोड्याच वेळात ती आज्ञा पाळण्यात आली.

२८ एप्रिलला स्टॉकहोमच्या वार्ताहराच्या एका प्रेस रिपोर्टवरून एक वाईट बातमी कळाली ती म्हणजे हिटलरचा सगळ्यात जास्त विश्वास ज्याच्यावर होता तो एस.एस.चा प्रमुख हाईनरिश हिमलर काऊंट बेनाडोट याच्या बरोबर जर्मनीच्या शरणागतीच्या वाटाघाटी करतोय. हा मात्र न पचणारा धक्का होता. ते ऐकल्यावर हिटलर किंचाळला “उंड येट्झ ड ट्वाय हाईनरिश” म्हणजे आता माझा विश्वासू हाईनरीशही !” पण त्याचा हा शेवटचा आक्रस्तळेपणा फार थोड्यावेळ टिकला. तो एकदम शांत झाला. बहुतेक त्याला आता काय झाले आहे आणि काय होणार आहे हे कळाले असावे. हा शेवट होता !

त्या बंकरमधील शेवटचे दोन दिवस तर सगळ्यात विचित्र होते असे म्हणायला हरकत नाही. २९ एप्रिलला चॅन्सेलरीवर पडणार्या बाँबच्या साक्षीने एका साध्या सुटसुटीत समारंभात हिटलरचे आणि इव्हा ब्राऊनचे लग्न झाले.

इव्हा ब्राऊ -

त्यानंतर हिटलरने त्याच्या चिटणीसाला त्याच्या शेवटचे राजकीय मृत्यूपत्र लिहायला सांगितले अर्थात त्यात त्याने आत्तापर्यंत जे म्हटले होते त्याचीच पुनरावृत्ती होती. त्यात गोअरींग आणि हिमलरला नाझी पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे अशीही नोंद त्याने मुद्दामहून करायला लावली आणि एडमिरल डॉनिट्झला त्याने आपला उत्तराधिकारी नेमले. त्यानंतर त्याने एका वर्तमानपत्रातून ( ही त्याच्याकडे नियमीत आणली जात ) मुसोलिनीच्या मृत्यूची व त्याच्या आणि क्लाराच्या प्रेतांच्या विटंबनेची बातमी सविस्तर वाचून दाखवली. हिटलरने अगोदरच आज्ञा केली होती की आत्महत्येनंतर त्यांची प्रेते पूर्णपणे नष्ट करण्यात यावीत पण आता त्याने ती आज्ञा परत परत वाचून दाखवली.

दुपारी नेहमीप्रमाणे त्याने रशियन फौजांच्या आक्रमणाचा आढावा घेतला. १ मेला चॅन्सेलरीवर हल्ला होईल असा अंदाज बांधण्यात आला.
“मग आपल्याकडे फार वेळ नाही. मला त्यांच्या हातात जिवंतपणी पडायचे नाही. काय वाट्टेल ते होऊ देत !”
त्याच रात्री उशीरा त्याच्या नोकराने सगळ्यांना मुख्य बंकरमधे बोलावले. हिटलरला सगळ्यांचा निरोप घ्यायचा होता. सगळे जमल्यावर हिटलरने शांतपणे प्रत्येकाशी हस्तांदोलन कारून प्रत्येकाचा निरोप घेतला. उपस्थित असलेल्या एका माणसाने नंतर आठवणीत सांगितले “ त्याच्या नजरेत वेगळेच भाव होते. मला वाटले तो आमच्यातून तेव्हाच निघून गेला होता”

इकडे स्टाफ कॅंटीनमधे हलकल्लोळ माजला होता. कोणीतरी दारूची एक बाटली घेतली. टेबलावर उडी मारून त्याने ती तोंडाला लावली व तो ओरडला “मृतांच्या आत्म्यास शांती लाभो” अजून कोणीतरी ग्रामोफोन चालू केला. मग त्यावर लावलेल्या गाण्याच्या तालावर नाचगाणी आणि गोंधळ पहाटेपर्यंत चालूच होता. कोणीतरी हिटलरने हे सगळे थांबवायला सांगितले आहे आहे असा निरोप आणला पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच्या आज्ञा ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हते.

३० एप्रिलला बरोबर दोन वाजता हिटलरने नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण घेतले. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता पण त्याने चवीने जेवण केले. जेवणानंतर तो आणि ईव्हा त्या बंकरच्या हॉलमधे गेले. इव्हाने पांढर्‍या रंगाच्या स्कर्टवर गडद निळ्या रंगाचा कोट घातला होता. तेथे त्याचे आजवरचे साथीदार – बोरमन, गोबेल्स इ.. त्याची वाट बघत थांबले होते. त्या सगळ्यांनी एकामेकांचा न बोलता निरोप घेतला आणि ते आपापल्या खोल्यांमधे परतले.

हिटलरच्या खोलीचा दरवाजाचा बंद झाला आणि एका सैनिकाने त्या दरवाजासमोर जागा घेतली. काहीच क्षणात गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि सगळा खेळ संपला.

जे राईश हजार वर्षे टिकणार होते ते त्या क्षणी नष्ट झाले..............

उध्वस्त फ्युररबंकर -

बरोबर ९ वर्षानंतर जन्मलेला, :-)
जयंत कुलकर्णी.

इतिहासकथालेखमाहिती

प्रतिक्रिया

इष्टुर फाकडा's picture

1 May 2012 - 3:21 pm | इष्टुर फाकडा

फ्युरर चे शेवटचे दिवस जाणून घायायचे असतील तर 'देर उंटर्गांग' (Der Untergang) हा चित्रपट पहावाच पाहावा. ब्रुनो गांझ या अभिनेत्याने फ्युरर असा साकारला आहे कि तुळणा नसे!
त्याची एक झलक

इष्टुर फाकडा's picture

1 May 2012 - 3:23 pm | इष्टुर फाकडा

जयंतराव, वाढदिवसाच्या शुभेच्छा :)

रणजित चितळे's picture

1 May 2012 - 3:25 pm | रणजित चितळे

बरोबर हा लेख ३० एप्रिलला दिलात.

छान माहिती.

त्याच बरोबर आपल्याला बिलेटेड वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सर्वसाक्षी's picture

1 May 2012 - 4:01 pm | सर्वसाक्षी

वाहिनी आठवत नाही पण हिटलतचा अंत, गोबेल्स् कुटुंबिंचे अर्धवट जळलेले देह हे सर्व आजच दुपारी पहिले. अखेर हिटलर पर्व संपले. तो क्रूरकर्मा होता, त्याची महत्वाकांक्षा राक्षसी होती मात्र तरीही त्याचे असामान्य नेतृत्व, कर्तृत्व आणि राष्ट्रप्रेम अमान्य करता येत नाही.

समयोचित लेखासाठी धन्यवाद

विकास's picture

1 May 2012 - 11:24 pm | विकास

त्याची महत्वाकांक्षा राक्षसी होती

सहमत

मात्र तरीही त्याचे असामान्य नेतृत्व, कर्तृत्व आणि राष्ट्रप्रेम अमान्य करता येत नाही.

हे सर्व सुरवातीच्या काळात असले तर असेल. पण राष्ट्रप्रेम असते तर नंतर तमाम जर्मन नागरीकांची आणि वरील लेखात आल्याप्रमाणे बोगद्यातील सैनिक तसेच एकूणच देशाची वाताहात केली नसती.

त्या शिवाय ज्यू, जिप्सी, समलिंगी, मनोरूग्ण यांचे जे काही हाल केले, मारले त्यातून ह्या माणसाचे स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षा सोडल्यास कशावरही प्रेम असेल असे वाटत नाही... दुर्दैव इतकेच की तमाम जर्मन नागरीकांना वेळेवर समजू शकले नाही. असो.

शैलेन्द्र's picture

1 May 2012 - 11:58 pm | शैलेन्द्र

असामान्य नैतृत्व होते, पण आंधळे कर्तुत्व व दुराग्रही, हट्टी राष्ट्रप्रेम.. शेवटी राष्ट्र म्हणजे तरी काय हो? त्यात रहाणारे लोक, समाज सोडता राष्ट्राला काय अर्थ आहे?

रयतेस त्रास होवु नये म्हणुन पुरंदरचा तह करुन शत्रुच्या दरबारात हजर होणारे आमचे थोरले महाराज आम्हाला राष्ट्रप्रेमाची जी व्याख्या सांगतात त्यात हिटलरचे राष्ट्रप्रेम बसत नाही.. स्वत:च्या अतिरेकी विचारांवर त्याने एक राष्ट्र जोडले आणी तोडले.. शेवटी फक्त स्मशानशांतता..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Jun 2012 - 2:29 pm | घाशीराम कोतवाल १.२

रयतेस त्रास होवु नये म्हणुन पुरंदरचा तह करुन शत्रुच्या दरबारात हजर होणारे आमचे थोरले महाराज आम्हाला राष्ट्रप्रेमाची जी व्याख्या सांगतात त्यात हिटलरचे राष्ट्रप्रेम बसत नाही

+१ सहमत

मुक्त विहारि's picture

1 May 2012 - 4:11 pm | मुक्त विहारि

नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेख.

सुहास झेले's picture

1 May 2012 - 4:12 pm | सुहास झेले

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख... हिटलरचा मृत्यू हे मला कधी न उलगडलेलं कोडं होतं, पण आज एकदम डिटेलवार माहिती मिळाली..... त्यासाठी अनेक अनेक आभार !!!

आणि हो उशिराने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .... :) :)

पैसा's picture

1 May 2012 - 5:02 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. स्वतःच्या जगात राहणार्‍या हुकुमशहाची अखेर झाली, तेव्हा त्याच्याबरोबर इतर अनेक निरपराधांच्या आयुष्यांचा शेवट झाला. गोबेल्सची निष्पाप मुलं आणि ईव्हा ब्राऊन यांचे फोटो पाहताना हेच जाणवलं, की केवळ हिटलरच्या जवळच्या लोकांमधे असल्यामुळे त्यांची अशी भयानक अखेर झाली... केवळ दुर्दैव.

तिमा's picture

1 May 2012 - 5:03 pm | तिमा

लेख आवडला व नवीन माहिती पण मिळाली. आपल्याच देशाचे व लोकांचे नुकसान करण्याची आज्ञा देणारा, आपल्याच जखमी सैनिकांची पर्वा न करता, ट्युब रेल्वे पाण्याने भरण्याची ऑर्डर देणारा, हा क्रूरकर्माच म्हणायचा.
अशा माणसाबद्दल कोणाला कशी आत्मीयता वाटू शकते ?

चित्रगुप्त's picture

1 May 2012 - 8:30 pm | चित्रगुप्त

हिटलरविषयी साद्यंत माहिती उत्तम रीतिने मिळाली.
नेपोलियन विषयी असे लिखाण आपण केले आहे का? किंवा सत्रा ते एकोणिसाव्या शतकातील कोणत्याही युरोपियन व्यक्ती विषयी वाचायला आवडेल.
युरोपचा सांस्कृतिक इतिहास मराठीत कुठे वाचायला मिळेल ?

जयंतराव, अत्यंत समयोचित लेख लिहिला आहे. तो नेहमीप्रमाणेच उत्तम उतरला आहे हे सांगायला नकोच. बाकी, या लेखामधली छायाचित्रे छानच आहेत.

जयंतराव, वाढदिवसाच्या (विलंबित) शुभेच्छा!

आपण ब्वॉ जयंतरावांचं भिरभिरं हौतच....

दादा कोंडके's picture

1 May 2012 - 10:17 pm | दादा कोंडके

हिटलरचा शेवट असा झाला अशी साधारण माहिती होती, पण हा लेख वाचताना ते सगळं डोळ्यासमोर उभं राहीलं आणि एक-दोन मिनिटं सुन्नं झालो.

वा. थरारक आणि भीषण.
फ़ार उत्कृष्ट लेख.
1940 साल असं तुम्ही म्हटलंय. अन्यत्र वाचल्यानुसार 1945 आहे मृत्युवर्ष असं वाटतंय.

जयंत कुलकर्णी's picture

2 May 2012 - 1:15 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद ! दुरूस्त केले आहे. ...पहिल्यांदा टायपो मग शेवटची चूक झालीच..

विकास's picture

1 May 2012 - 11:17 pm | विकास

लेख आणि लेखनशैली दोन्ही छान आहे. याच पुढे "न्युरेनबर्ग ट्रायल्स" वर लिहीता आले तर अवश्य लिहावेत ही आग्रहाची विनंती. :-)

जयंत कुलकर्णी's picture

2 May 2012 - 1:16 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना, वाचून आवडले हे कळवल्याबद्दल धन्यवाद !

५० फक्त's picture

2 May 2012 - 7:46 am | ५० फक्त

छान लिहिलं आहे, वर सर्वसाक्षी म्हणतात तसं, कालच हे सगळं नॅशनल जिओग्राफिकवर दाखवलं आहे, अगदी नकाशासहित.
आज इथं वाचलं.

जयंतराव, धन्यवाद आणि वाढदिवसाच्या विलंबित शुभेच्छा.

ऐक शुन्य शुन्य's picture

2 May 2012 - 9:17 am | ऐक शुन्य शुन्य

http://en.wikipedia.org/wiki/Felix_Kersten
Felix_Kersten बदद्ल लिहा.
बाकी माहीतीपुर्ण लेख.....

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 May 2012 - 10:00 am | पुण्याचे वटवाघूळ

उत्तम लेख.

मला एक प्रश्न नेहमी पडतो. हिटलरच्या हत्येचा प्रयत्न करणारे लोक होते (रोसेनबर्ग वगैरे) त्यांना देशप्रेमी म्हणावे की देशद्रोही? हिटलर देशाचे फार मोठे नुकसान करत आहे हे लक्षात आल्यानंतर समजा कोणी रशियन/ अमेरिकन/ ब्रिटीश सैन्याशी हातमिळवणी केली असती आणि लवकरात लवकर युध्द थांबावे हे वैयक्तिक पातळीवर होईल तितके प्रयत्न केले असते तर अशा सैनिकांना देशभक्त म्हणावे की देशद्रोही?

असेच लेख अधिकाधिक यावेत ही सदिच्छा.

जयंत कुलकर्णी's picture

2 May 2012 - 10:23 am | जयंत कुलकर्णी

हिटलरच्या हत्येचे प्रयत्न करणार्‍यांच्या देशभक्तीबद्दल शंका घ्यायचे कारणच नाही. जेव्हढा हिटलर देशभक्त होता तेचढेच तेही होते. कदाचित ते जास्त होते असे म्हणावे लागेल कारण त्यांच्या डोळ्यासमोर देशाचे हित पहिल्यांदा आणि मग व्यक्तिपूजा असे होते...

ब्रिटिश जनतेचे मला या बाबतीत कौतूक वाटते. चर्चिल यांनी एवढे युद्ध जिंकून दिले पण त्यांची मते जनतेला तेव्हाही पटत नव्हती. त्यामुळे जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले. परत निवडून येण्यासाठी त्यांना त्या वयात प्रचंड कष्ट करावे लागले. अजून मागे जायचे झाल्यास अजून एक उदाहरण आहे. रॉबर्ट क्लाईव्ह आपल्याला सर्वांना माहिती आहेच. जेव्हा त्याची लबाडी उघडकीस आली तेव्हा ब्रिटनच्या मंत्रीमंडळाने त्याची सर्व संपत्ती जप्त केली. तो अक्षरशः भिकार्‍यासारखा लंडनच्या फूटपाथवर मेला. (त्याच्या अगोदर त्याने मनगटाची नस कापून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता)

मला वाटते आपली शंका फिटली असेल.

स्वतःच्या दुराग्राहापाई अन वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पनांपाई सगळ्या जगालाच वेठीस धरलं होतं!!

प्रचेतस's picture

2 May 2012 - 10:12 am | प्रचेतस

अप्रतिम लिखाण.

चिगो's picture

2 May 2012 - 11:53 am | चिगो

अत्यंत सुरसपणे इतिहास मांडलाय तुम्ही, जयंतजी..
वाढदिवसाच्या लेटलतिफ शुभेच्छा..

हिटलर हे इतिहासातील सर्वाधिक उलट-सुलट चर्चेस कारण असलेल्या पात्रांपैकी.. त्याची महत्त्वाकांक्षा जहरी, राक्षसी होती. त्याच्यात नेतृत्वगुण चांगले होते. पण आपल्या महत्त्वाकांक्षेला राष्ट्रप्रेमाचा मुलामा दिला, तरी शेवटी त्याला साथ देणार्‍या आणि त्याच्या निष्ठा ठेवणार्‍या सैन्याला त्याने फुकट, स्वतःच मृत्युमूखी लोटले. आणि ज्यु, युद्धबंदी इत्यादी लोकांसोबत त्याने जे काही क्रौर्य दाखवले, ते तर प्रचंड चीड आणणारे आहे..

त्याच्या मृत्युबद्दलही अनेक "थेअरीज" प्रसिद्ध आहेत. आजही बर्‍याच हॉलिवूडपटांत "हिटलर १९४५ नंतर बरीच वर्षे जिवंत होता" हे बोलल्या जाते. मला वाटतं, "द सेव्हन्थ सिक्रेट" नावाची कादंबरीपण ह्याच थीमवर आहे..

लेख प्रचंड आवडलाय..

मृत्युन्जय's picture

2 May 2012 - 11:57 am | मृत्युन्जय

नेहमीप्रमाणेच सुंदर आणी अभ्यासपूर्ण लेख.

पियुशा's picture

2 May 2012 - 1:13 pm | पियुशा

उत्तम लेख !!!!
तपशिलवार माहीती :)

पियुशा's picture

2 May 2012 - 1:13 pm | पियुशा

उत्तम लेख !!!!
तपशिलवार माहीती :)

सुहास..'s picture

2 May 2012 - 5:15 pm | सुहास..

थ रा र क !!

ऋषिकेश's picture

2 May 2012 - 5:22 pm | ऋषिकेश

बरं झालं स्वतःच संपला!
नाहितर जेत्यांनी संपवला असताच म्हणा!

विकीवर हिटलरचे पान वाचताना त्याचं बाळ असतानाचं (इन्फंट) चित्र दिसलं आणि विचित्र जाणिवा मनात आल्या..
लहानपणी पोरं खूपच निष्पाप असतात हे माहीत असूनही हा निष्पाप फोटो बघताना काळाच्या परिणामाची भयानक जाणीव झाली.

काय ते नेमकं सांगता येत नाही..

मन१'s picture

2 May 2012 - 7:13 pm | मन१

कुणाच्या महत्वाकांक्षेची दुसर्‍याच कुणाला किती किंमत मोजावी लागावी ह्याबद्दल आश्चर्य वाटते.
नेहमीप्रमाणेच प्रभावी लेख.
पण एवढे सर्व वाटोळे होउनही, अगदि बेचिराख होउनही, सर्व शक्तीस्थाने(औद्योगिक वसाहती) व फार मोठा टॅलंट पूल,जवळजवळ आख्खी कर्त्या वयाची कर्तबगार पिढी गमावूनही पुढच्या तीन्-चार दशकातच जर्मनी व जपान हे समृद्धीला पोचले, विविध क्षेत्रात अव्वल ठरले, त्यांच्या जनतेने पुन्हा उच्च जीवनमान प्राप्त केले ही गोष्ट त्यांच्या संहाराबद्दल वाचताना वारंवार आठवते.
हिटलर्,हुकूमशहा , व देशभक्तीबद्दल वटवाघूळ व जयंतकाकांचा प्रतिसाद अगदिच क्लास.
आणि हो:-
हॅप्पी बड्डे.

विकास's picture

2 May 2012 - 7:57 pm | विकास

पुढच्या तीन्-चार दशकातच जर्मनी व जपान हे समृद्धीला पोचले

खरे आहे. जपानच्या संदर्भात सोनी कंपनी ज्याने स्थापली त्या अकीओ मोरीटोचे "मेड इन जपान" हे पुस्तक वाचनीय आहे.

जर्मनीचे परत वैभवाला जाणे जसे दिसते तसे त्यांची गाडी परत मूळ पदावर येऊ लागली आहे का असे चॅन्सलर मर्कलबाईंच्या २०१० च्या खालील उद्गारावरून वाटते. (बातमी)

"We kidded ourselves awhile; we said, 'They won't stay, sometime they'll be gone.' But this isn't reality. And of course the approach to build a multicultural society — to happily live side by side with each other — this approach has failed, utterly failed,"

अन्तर्यामी's picture

14 Jun 2012 - 5:27 pm | अन्तर्यामी

हिटलर वर मि खुप काहि वाचले आहे....
हुकुमशाहा असावा तर असा ............

शिल्पा ब's picture

14 Jun 2012 - 10:08 pm | शिल्पा ब

??? म्हणजे? असा हुकुमशहा म्हणजे कसा?

तर्री's picture

14 Jun 2012 - 10:03 pm | तर्री

कुलकर्णी साहेब - जियो....काय ताकदीने लिहिलेत हो.....

अन्तर्यामी's picture

15 Jun 2012 - 2:25 pm | अन्तर्यामी

शिल्पा ब : ज्याने जर्मनीला आर्थिक सन्कटातुन बाहेर काढ्ले......

आनि हिटलर ला नाव ठेवन्या आधि त्याचे बाकिचे गुन पन पाहा.. :)

प्रचेतस's picture

16 Jun 2012 - 9:40 am | प्रचेतस

क्रूसेडचा पुढचा भाग कधी?

जयंत कुलकर्णी's picture

16 Jun 2012 - 2:03 pm | जयंत कुलकर्णी

मनोबांची प्रतिक्रिया अजून संपलेली नाही. ती संपल्यावर टाकेन....