कामिकाझे .............युद्धकथा -२ भाग-२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Apr 2012 - 2:39 pm

जनरल रोमेलचे शेवटी काय झाले....युद्धकथा -१
कामीकाझे.....युद्धकथा – २ ....भाग-१

काही कामिकाझे -

अशा रितीने कामिकाझेचा मार्ग मोकळा झाला आणि तरूण वैमानिक या त्यागासाठी मोठ्या अहमहमिकेने या स्वर्गीय वार्‍यावर स्वार होण्यासाठी नावे नोंदवू लागली. जपानच्या मुख्य भुमीवरूनही कामिकाझेमधे सामील होण्यासाठी अनेक तरूण पुढे सरसावले व बोलावणे यायची वाट पाहू लागले..............

पण काळ आणि होणार्‍या गोष्टी कोणासाठी थांबत नाहीत. जशी जशी दोस्तराष्ट्रांच्या आक्रमणाची तीव्रता वाढत गेली तशी तशी कामिकाझेच्या हल्ल्यांची संख्याही वाढत गेली. दुर्दैवाने जपानी अधिकार्‍यांना आता विमाने कमी पडू लागली होती. एक निकाराचा प्रयत्न म्हणून ५ जानेवारीला एक सगळ्यात मोठा कामिकाझे हल्ला योजण्यात आला. १५ विमाने लिंगायेनच्या आखातात अमेरिकेच्या युद्धनौकांच्या काफिल्यावर आदळली. त्यात अमेरिकेच्या युद्धनौकांचे बरेच नुकसान झाले.

जपानच्या भुमीवरच्या अनेक पराभवानंतर जपानला अखेरीस फिलिपाईन्सवरचा ताबा सोडावा लागला. दोस्तांनी फेब्रुवारीत इवो जिमा वर आक्रमण केले. एप्रिलमधे त्यांनी ओकिनावावर आक्रमण करून या युद्धावरची आपली पकड घट्ट केली. याने जपानची भुमिका बदलली. आता ते आक्रमक राहिले नाहीत तर आता त्यांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणासाठी लढायचे होते. कामिकाझे आता फार मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणण्यात आले. कामिकाझे वैमानिकांसाठी खास विमाने तयार करण्यात आली व प्रशिक्षण केंद्रेही उघडण्यात आली. या लढाईसाठी एका नवीन आत्मघाती अस्त्राची निर्मीती करण्यात आली. बाँबरला एक १८०० किलोचे मिसाईल जोडण्यात आले. लक्ष टप्प्यात आले की हे मिसाईल सोडून त्याच वेळी ते विमान नौकांवर धडकविण्यात येई. या विमानांच्या वैमानिकांना नाव ठेवण्यात आले जिनराई बुताई. (स्वर्गीय वज्र ) अमेरिकन मात्र याला “बाका बाँब” म्हणत. म्हणजे मुर्खांचा बाँब !

हे अस्त्र ओकिनावावर १२ एप्रिलला जपान्यांनी जो हल्ला केला त्यादरम्यान डागले गेले. ज्या विमानाने पहिला हल्ला केला त्याचा वैमानिक शेवटपर्यंत शांत होता. तो या हल्ल्यावर जायच्या अगोदर एका वसतीगृहाच्या पर्यवेक्षकाच्या भुमिकेत होता. त्या मृत्यूच्या दारी चाललेल्या विमानात चढताना तो खाली उभ्या असलेल्या त्याच्या सहाय्यकाला म्हणाला “मी आपल्या
वसतीगृहासाठी काही चटया मागवल्या आहेत त्याच्यावर जरा लक्ष ठेव. ओकिनावा येईपर्यंत हा वैमानिक शांतपणे झोपला होता आणि सत्य हे आहे की त्याला उठवावे लागले होते.
ओकिनावाच्या युद्धातच १८०० आत्मघातकी हल्ले करण्यात आले. जपानने शरणागाती पत्करली तो पर्यंत २५१९ कामिकाझे वैमानिकांनी आपले बलिदान दिल्याची नोंद आहे.

१५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या शरणागतीनंतर युद्धबंदीची घोषणा झाल्यावर जपानच्या पाचव्या एअर फ्लीटचा प्रमुख एडमिरल उगाकी याने कामिकाझे प्रमाणेच आपली आयुष्य संपवायचे ठरवले. “मी माझ्या वैमानिकांना मरण स्विकारायला लावले, मलाही आता त्याच रस्त्याने जायला पाहिजे”. असे म्हणून त्याने आपल्या गणवेषावरील सर्व पदचिन्हे, मानसन्मान काढून टाकले व इतर कामिकाझेप्रमाणे त्याने आपले साहित्य उचलले व जमलेल्या इतर वैमानिकांना तो म्हणाला “ मी ओकिनावावर आत्मघात करणार आहे. ज्यांना माझ्या बरोबर यायचे आहे त्यांनी हात वर करावेत”. हाताशी असणार्‍या विमानांच्या संख्येपेक्षा वैमानिकांची संख्या जास्त होती. अकरा विमानांपैकी सात विमानांच्या वैमानिकांनी (त्यात एडमिरल उगाकीही होता.) ओकिनावावर अमेरिकन लक्षावर धडकण्याअगोदर ते तसे करत असल्याचा संदेश पाठवला.

त्याच संध्याकाळी एडमिरल ओनिशी जो नॅव्हल जनरल स्टाफचा उपप्रमुखही होता त्याने एक चिठ्ठी लिहायला घेतली
“ माझ्या सहकार्‍यांनी जे अतुलनीय शौर्य गाजवले आहे त्यांच्या अमर आत्म्यांना मी वंदन करतो. मी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची क्षमा मागून माझी जीवनयात्रा संपवत आहे. जपानच्या युवकांनी कामिकाझेप्रमाणे जपानच्या पुनर्बांधणीस व जागतीक शांतीसाठी वाहून घ्यावे” असे लिहून त्याने त्याची सामुराईची तलवार स्वत:च्या पोटात खूपसून घेतली. पण तो लगेचच मेला नाही. त्याने काईशाकुनिनही नेमला नव्हता. वैद्यकीय मदत नाकारून तो संध्याकाळ पर्यंत तो तसाच विव्हळत पडला. ही शिक्षा त्याने स्वत:ला करून घेतली होती -

एडमिरल ओनिशी

त्याचा गुन्हा दुसर्‍या महायुद्धातील अमानवी कामिकाझेची निर्मिती हाच असणार कारण तो पर्यंत त्याच्या आयुष्यात पश्चात्ताप व्हावा असे कुठलेही कृत्य त्याने केले नव्हते...............

(एखादा जपानी जेव्हा सेपूकू (आत्महत्या) करतो तेव्हा तो एका दुसर्‍या माणसाला त्याचे शीर धडावेगळे करण्यासाठी नेमतो. त्याला म्हणतात काईशाकुनिन. पण काही वेळा पश्चात्ताप टोकाचा असेल तर हा दुसरा माणूस नेमला जात नाही. वेदनेत तडफडत मरणाला कवटाळले जाते)

ले. सेकी -

ज्याने बंकर हिल नौका बुडविली तो कामिकझे कियोशी -

कामिकाझे - स्मारक....

जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Apr 2012 - 3:18 pm | मुक्त विहारि

अजून येवू देत लेख...

इरसाल's picture

26 Apr 2012 - 4:06 pm | इरसाल

चेहर्‍यावरील भावांमुळे डोळ्यात पाणी तरळले.
अप्रतिम लेख

उत्तम माहिती, आत्महत्या ह्या फक्त भ्याडपणातुनच येत नाहीत तर.

अपूर्व कात्रे's picture

28 Apr 2012 - 5:19 pm | अपूर्व कात्रे

दुसऱ्या महायुद्धात या जपानी कामिकाझेंनी जे काही केले त्याला आत्महत्या म्हणत नाहीत. त्याला बलिदान म्हणतात.

जयंत कुलकर्णी's picture

26 Apr 2012 - 7:56 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

प्रचेतस's picture

26 Apr 2012 - 10:02 pm | प्रचेतस

अपरिचित युद्धकथांची उत्तम माहिती.

पण या कामिकाझेंच्या चेहर्‍यावरचे भाव पाहता पोटात तुटून येतंय. कुत्र्याच्या पिल्लाबरोबर खेळणारी ही तरूण पोरं असा आत्मनाश करायला का तयार होत असतील? आणि ते पथक तयार करणार्‍या अधिकार्‍यांना जिवंत असताना कोणत्या मानसिक यातनांमधून जावं लागलं असेल?

रामपुरी's picture

27 Apr 2012 - 2:11 am | रामपुरी

वरील प्रतिक्रिया वाचून छायाचित्रे दिसत नाहीत याबद्दल पहिल्यांदाच समाधान वाटले.

कामिकाझेंच्या मनाची तयारी कशी काय झाली असेल हा आत्मघात करायला. आता देशासाठी असा आत्मघात कोणी करुन घेईल का? हा पण एक प्रश्न पडला आहे.

- पिंगू

रघुपती.राज's picture

27 Apr 2012 - 4:23 pm | रघुपती.राज

नम्स्कार,

अत्यन्त सुन्दर लिखाण. तुमचे लेख वाचनीय असतात आणि सन्ग्राह्य देखिल.
आपल्या एका जुन्या ले़खातील फोटो दिसत नाहीत.
दुवा देत आहे:

http://www.misalpav.com/comment/reply/13264

कदाचित फ्लिकर खात्यात काहि गदबद झाली असावी.

त्रास देतो आहे. माफ करा. पण जरुर फोटो टाका. वाट पाहीन.

रघु

अपूर्व कात्रे's picture

28 Apr 2012 - 5:40 pm | अपूर्व कात्रे

खरच चांगले आणि हृदयस्पर्शी वर्णन आहे. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास शिकताना जपानी वैमानिकांनी शत्रूच्या बोटींवर झेप घेऊन त्या निकामी केल्याचे ऐकले होते. मात्र त्याचे वर्णन पहिल्यांदाच वाचले.

@ पैसा
सैनिकासाठी देश आणि देशाचे रक्षण हेच पहिले आणि इतिकर्तव्य असते. जीव घेऊन किंवा जीव देऊन ते कर्तव्य पार पडलेच पाहिजे अश्याच प्रकारे त्यांना घडवले जाते. त्याला आत्मनाश म्हणत नाहीत. त्याला बलिदान म्हणतात. हे बलिदान सर्वोच्च ध्येयासाठीच होत असते. असे बलिदान देणाऱ्या सैनिकाच्या वर असलेला अधिकारी निश्चितच भयानक मानसिक यातनांमधून जात असणार. काही वर्षांपूर्वी Gen. वेद प्रकाश मलिक (Retd.) यांचा कारगिल युद्धावरचा लेख वाचला होता. दररोज सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर त्यांच्या हाताखालचा अधिकारी त्यांना आदल्या दिवशी शहीद झालेल्या सैनिकांचा आकडा सांगायचा त्यावेळचा हताशपणा त्यांनी त्या लेखात मांडला होता.

अपूर्व कात्रे's picture

28 Apr 2012 - 5:40 pm | अपूर्व कात्रे

खरच चांगले आणि हृदयस्पर्शी वर्णन आहे. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास शिकताना जपानी वैमानिकांनी शत्रूच्या बोटींवर झेप घेऊन त्या निकामी केल्याचे ऐकले होते. मात्र त्याचे वर्णन पहिल्यांदाच वाचले.

@ पैसा
सैनिकासाठी देश आणि देशाचे रक्षण हेच पहिले आणि इतिकर्तव्य असते. जीव घेऊन किंवा जीव देऊन ते कर्तव्य पार पडलेच पाहिजे अश्याच प्रकारे त्यांना घडवले जाते. त्याला आत्मनाश म्हणत नाहीत. त्याला बलिदान म्हणतात. हे बलिदान सर्वोच्च ध्येयासाठीच होत असते. असे बलिदान देणाऱ्या सैनिकाच्या वर असलेला अधिकारी निश्चितच भयानक मानसिक यातनांमधून जात असणार. काही वर्षांपूर्वी Gen. वेद प्रकाश मलिक (Retd.) यांचा कारगिल युद्धावरचा लेख वाचला होता. दररोज सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर त्यांच्या हाताखालचा अधिकारी त्यांना आदल्या दिवशी शहीद झालेल्या सैनिकांचा आकडा सांगायचा त्यावेळचा हताशपणा त्यांनी त्या लेखात मांडला होता.

मन१'s picture

29 Apr 2012 - 6:04 pm | मन१

दोन्ही भाग जमलेत.