तळेगावच्या एका लहानशा माडीवर एका भटक्याच्या, प्रतिभावंताच्या व छंदिष्टाच्या बिर्हाडात सूरांचा सम्राट व ठेकेदार गीतांच्या बादशहाच्या कलेची ओळख झाली खरी पण " बहुत शुक्रिया बडी मेहरबानी, मेरी जिंदगीमे हुज़ूर आप आये " अशी प्रेमात पडल्याची कबूली द्यायला आणखी काही काळ जावा लागणार होता. आपले १९६१-६२ पासूनचे पहिले प्रेम शंकर जयकिशन यांची मोहिनी मनावर आपला ठसा उमटवून होती.गोनीदा व ओपी नय्यर यांच्यात साम्य असे की दोघेही घरातून या ना त्या कारणासाठी पळालेले अन दोघेही शैलीदार .गोनीदांची लेखणी व वाणी एकदम वेगळी तशी नय्यर साहेबांची "रिदम फ्युजन" शी खास शैली इतर संगीतकारात वेगळी.आपल्या शैलीत जितके जमेल तितकेच काम करायचे. हे चालते, खपते म्हणून ते करून पहा असा हव्यास दोघानीही धरला नाही.खाजगी जीवनात दोघांच्या काहीही साम्य नव्हते.
" कबाब-शराब-शबाब" या तीन सूत्राना नय्यरनी कधी सोडले नाही तर या तिन्ही ना गोनीदानी आपल्या आयुष्यात वर्ज्य मानले. साहजिकच ओपींकडे मसालेदार चहा प्यालात तर गोनीदांकडे जंगलातील विविध वनस्पतीपासून बनविलेला चहा कम काढा आपल्याला मिळणार .
१९७६ चे सुमारास चालून आली म्हणून मी टेलीफोन ऑपरेटरची नोकरी स्वीकारली व वाई येथे कालक्रमणा करू लागलो. पाचगणी येथे खुपशा चित्रपटांची चित्रिकरणे होत. नट , नटी , निर्माते यांच्याशी फोनवरून बोलणे होई.त्याना पटापट कॉल लावून दिले की चित्रीकरण जवळून पहाण्याची संधी मिळत असे.पुण्यातील वास्तव्यात एस पी कॉलेजसमोरचे दीपक म्युझिक सेंटर व पेरूगेट जवळचे केतकरांचे " फ्रेंडस" ही ठाणी गाणी ऐकण्याची होती. डेक्क्न वरचे कॅफे सनराराईजचे जुक बॉक्स लांब पडत असायचे. केतकरांची मुलगी जर काउंटर वर असेल तर पोरं एक एक गाणे पाच पाच वेळा ऐकायची. घुटमळायची. दीपक म्युझिक त्या मानाने सर्वच बाबतील लहान होते. " आज कोई प्यारसे " हे सावनकी घटा तील ओपीचे गीत मी दीपक मधे सलग पाच सहा वेळा ऐकले आहे.वाई येथून मी ओ पी नय्यर यांचेशी फोनवरून वोलण्यासाठी एक टेलीफोन नंवर शोधून काढला व लावला. तो फोन ओम प्रकाश नय्यर नावाच्या मुंबईच्या एका व्यापार्याला लागला. " मै मुजिक मे कुछ जानता नही... नही " असे म्हणून फोन बंद. नंतर मला हवा असलेला नंबर सापडला. खूपदा प्रत्यत्न करून फोन कुणी उचलत नसे. अख्रेर एकदा फोन उचलला गेला. व "हू स्प्पीकिंग" ची विचारणा पलीकडून झालीं.विविध भारतीच्या जयमालात नय्यर यांचा आवाज ऐकलेला होता त्यामुळे
फोनवर ओपीच आहेत हे समजत होते. मी कोठून बोलतो, फोन का केला, भेटण्याची इच्छा आहे वगैरे सांगून झाल्यावर भेटायला जरूर या असा प्रतिसाद आल्याने मी प्रसन्न झालो नाही तर नवलच. गाणे कसे बनते ? चाल सुचते तरी कशी? असे नाना प्रश्न आता नय्यरना विचारता येतील याचा आनंद मनात मावेनासा झाला.
१९७८ चे दरम्यान कोणत्यातरी निमिताने मी मुंबईस गेलो असताना सहज मरीन ड्राईव्ह वर फिरावयास जावे म्हणून बाहेर पडलो. चालत चालत जात जात चर्चगेट स्टेशन कधी आले कळले नाही. ओपींचा पत्ता मनात कोरलेला होताच. ए रोड वरच्या " शारदा " या इमारती समोर उभा राहिलो . मनांत धास्तावलो होतो. ओपी हा फिल्मी जगतातला माणूस. आपण असे अचानक गेल्यास त्यांची प्रतिक्रिया काय असेल? घरात घेतील ते आपल्याला ? जिना सुरू होतो तिथे वॉचमन बसला होता. त्याला विचारले 'ओ पी नय्यर इथेच रहातात ना ?" हा, वो फिलीमोमे बाजा बजाता है ना ? त्याचा सवाल. रोज ओपीना पहाणार्या त्याच्या नजरेत ओपी एक केवळ वादक होते. माझ्या नजरेत जादूगार ! " अरे भाई , वो तो बडे कलाकार है! क्या मै जा सकता हुं असे विचारत मी जिना चढू देखील लागलो.लाकडी फळ्यांचा जिना चढून जात फ्लॅट क्र ८ समोर उभा राहिलो. दारावर ओ पी नय्यर अशी लहानशीच पाटी लावलेली. बेल वाजल्याबरोबर दार उघडले ते ओपीनीच . बाहेरूनच मी त्याना लांबून भेटायला आलो आहे असे सांगताच मला आत घेतले व पहिले काय केले असेल तर एक कडक हस्तांदोलन. अन मी प्रतिक्षिप्तपणे काय केले असेल तर झुकून त्यांच्या पायाला स्पर्श केला, पायात नक्शीदार जोडे घातलेले नय्यर लालसर गोरेपान .साधारण पन्नाशीला आलेले. केसांनी अर्ध्या डोक्यावरून पलायन केलेले. धारदार नाकाखाली तरवारकट मिशी. अंगात मोतिया रंगाचा कुर्ता व तशाच रंगाची लुंगी.त्यांच्याकडे दो॑न तीन म्युझिशियन काम मागायला आले होते व नय्यर त्याना परोपरीने सांगत होते " अरे आजकल मेरे पासही काम न आ रहा मै आपको कहांसे काम लाउ ?"मी त्यांचा संवाद ऐकत एका बाजूस बसून हॉलचे निरिक्शण करीत होतो. एका बाजूस कपाटात होमिओपाथीच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत होत्या. संगीतकाराकडे या एवढ्या बाटल्या कशाला ? असा प्रश्न माझ्या मनात येत असतानाच दुसर्या बाजूस पियानोसारखे एक वाद्य पण सिनेमात दिसतो तसा ग्रॅण्ड पियानो नव्हे ,ठेवलेले दिसत होते. त्यावर धूळ बसून नये म्हणून तांबड्ट रंगाचे मखमलीचे कापड टाकलेले होते.ती माणसे गेल्यावर " हं आता बोल ! " अशा अर्थाने नैय्यर माझ्याकडे वळाले . मी गोनीदां म्हणजे कोण . त्यांच्याकडे कसा गेलो .ओपींच्या चाहतेपणाची सुरूवात कशी झाली हे सगळे सांगितले. त्यानीही विचारले कुठे रहातोस काय करतोस वगैरे.माझे आडनांव ऐकताच एकदम म्हणाले " तुम्हारे नाम वाला एक मेरे ऑर्केस्ट्रामे आता हे , तुम्हारा कोई रिलेटिव तो नही ? मी नाही म्हणून सांगितले. " नय्यर साब, आपके गानेमे इन्ट्रो और इ़नटरल्युडकी खाह जगह रही है | ये कैसे बनते है ?" हा प्रश्न विचारल्याबरोबर आता ते खुलवून काही सांगतील ही माझी अपेक्षा होती. पण त्यांचे उत्तर खूपच कॅज्युअल होते. ते म्हणाले "औरतके लिय जैसे गहने वैसे पोएट्री और धुनके लिये एन गहनोंकी जरूरत होती है ना ? " मग मी विचारले " या कशेदाकारीला कोण जबाबदार असते तर त्यानी पटकन सांगीतले वो एक टीम वर्क रहता है | ( हेच उत्तर त्यानी पुणे येथील एका कन्सर्ट मधे माझ्या याच प्रश्नाला दिले) .
"फ़िर नय्यर साब, धुन कैसी पैदा होती है ?" बहुतेक प्रतिभावंतांचे जे उत्तर असते असेच टिपिकल उत्तर आले. " बस उपरवालेकी देन , जैसेही शायरी सामने आये अल्फ़ांस ही धुन बना देते है । एकंदरीत मी फ़ार वेगळे काही प्रश्न त्याना विचारू शकत नव्हतो. जे विचारत होतो त्यांची उत्तरे पूर्वी त्यानी दिलेल्या मुलाखतीत आलेलीच होती. मी मग त्यांच्या गाण्याच्या प्रेमात किती पडलो आहे की सलग बारा तेरा वर्षे एकही दिवस असा नाही की एकही ओपी गीत ऐकले नाही वगैरे बोललो. जाताना पुन्हा एकदा पाया पडत उदगारलो " नय्यर साब , शायद आपकोही पता नही की आप कितने महान कलाकार है बहोत बडे की सालोंमे ऐसा हुनर किसीको मिलता है । माझे हे उदगार ऐकून माझ्याकडे पहात ते म्हणाले तुम्हारी आत्मा पवित्र है । तुम पाचगनी के पास रहते हो ना ? मै उधर एक घर बनाना चाहता हुं । अगर कोई प्लॊट है तो मुझे फ़ोन करना ।" मी बाहेर पडलो .माझ्या दैवताला भेटल्याचा आनंद अवर्णनीय होता.
त्यानंतर बरीच वर्षे मधे गेली.ओपींची गाणी रोज ऐकत असलो तरी ओपींबरोबर प्रत्यक्ष भेट झालीही नाही. ते ही व्यावसायिक सिनेमातून जवळ जवळ दूर झाले होते. नाही म्हणायला मुकद्दरकी बात नावाचा सिनेमा त्याना मिळाला असे कळले पण तो आलाच नाही.मग ओपीनी रूना लैला या हरहुन्न्नरी बांगला देशी गायिकेला घेउन खाजगी अल्बम काढला. रूनाची त्यातील गाणी तिच्या गायकीची रेंज सिद्ध करणारी होती. ’अब कहा प्यारमे पाकिजगीका नामोनिशां " अशा सारखी गज़्ल असो वा " अए मेरे दिलबर हसीना " सारखे डिस्को गीत असो. नय्यर नी अजूनही आपण विझलेलो नाही हे दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर मी एकदा मागच्या सारखाच वेळ न मागताच त्यांच्या दरवाज्यासमोर उभा राहिलो. यावेळीही नय्यर साहेबानीच दार उघडले व मी पुण्याहून भेटायला आलो आहे व अजूनही आम्ही रसिक आपल्याला विसरलो नाही हे सांगायला आलो आहे असे म्हणालो . माझे उदगार ऐकून ओपीनी मला आत घेतले. आत सफ़ेद कपड्यातील चार पाच माणसे बसली होती. माझ्याकडे बोट करून ओपी त्या माणसाना म्हणाले " हा पुरावा पहा ! आजही आम्ही आपले संगीत व ओपी दोघानाही विसरलो नाही हे सांगण्यासाठी हा माझा चाहता इथे आला आहे.कडक शेकहँड करून स्वागत करण्याची ओपींची संवयच असावी बहुदा.यावेळेसही त्यानी माझ्याशी हस्तांदोलन केल्यावर् मी ही त्या माणसांदेखत खाली वाकून नमस्कार केला. मग माझ्या कडे वळून ओपीनी मला बाजूला घेतले/" मला नवीन एक फिल्म मिळ्तीय आमची बोलणी चालू आहेत तू साधारण तासाभराने ये मग तुझे काय ते ऐकतो? अशी मला सूचना केल्यावर मी बाहेर पडलो. आता काय कसा एक तास घालवायचा असा विचार करीत कफ परेड पर्यंत भटकत गेलो. परत आल्यावर ओपीनी दार उघडले. त्यावेळी तिथे एक माणूस फक्त उरला होता.मी तो माणूस व ओपी असे राहिल्यावर ओपीनीच सुरवात केली " मला एक नवीन सिनेमा मिळतोय नाव "सुभानल्ला" असे असणार आहे आताच बोलणी पक्की झाली व साईनिंग अमाउंट म्हणून त्यानी ७५००० चा चेक दिला." मी ही बोलता झालो. " नय्यरसाब , मुबारक बात देता हूं और मुबारक बात आप भी हमे दें क्योकी अभी बहोत सालोंसे आपकी वापसीका हमे इंतजार है " अगदी असेच्या असे वाक्य मी बोललो नसेल पण माझ्या प्रतिक्रियेचे सार असेच होते. एकदम गाडी फिमेल सिंगर कोण घेणार या वर आली. नैय्यर साहेबानी विचारले " तुला मी कोणाला घ्यावे असे वाटते? " हा म्हणजे माझ्या नय्यरभक्तीचा सत्कारच होतो आहे की काय असे मला वाटले. " आशाजीका सवालही नही तो मुझे रुना लेला की काबिलियत पर सबसे ज्यादा भरोसा है , वो किसी भी किस्मका गाना गा सकती है |" मी उदगारलो. " उनकी काबिलियत का सवालही नही फिर भी ये पोसीबल नही लगता. उनके रहनेका खर्चा मुझे करना पडेगा | आय काण्ट अफोर्ड इट | " नय्यर नी त्यांची अडचण पेश केली. मेलसिंगर महेद्रकपूर ना घेणार ना " मी विचारले.बहुतेक नाहीच अन त्यानी चरणदास कोंणत्यातरी गायकाचा आवाज आवडत असल्याचे सांगितले. ( विशेष म्हणजे एक गजल टाईपचे व एक टांगा टाईपचे गाणे त्यानी शेवटी महेंद्र कपूरनाच या चित्रपटात दिले.चित्रपट डब्यात गेला पण गाणी दुसर्या चित्रपटाच्या नावाखाली प्रसिद्ध झाली. पण गाजली नाहीत ).तेवढयात चहा आला. चहा घेता घेता नय्यर साहेब शायर लोकांच्या बद्द्ल सांगताना म्हणाले मी नेहमी इतर लोक न घेणाच्या शायराना संधी दिली आहे व सुंदर रचना त्यानीही केल्या आहेत." अब कहां प्यारमें पाकीजगीका नामोनिशा जिस्म की भूख है और उसके सिवा कुछ मी नही " किती मस्त गजल आहे पहा ! " आता इतक्या वर्षानंतर अधिक काय झाले आठवत नाही. तो दुसरा माणूस जायला निघाल्यावर मीही निघालो. बाहेर आल्यावर दोघेही लिफ्टमधे शिरलो. खाली जाता जाता मी त्याला म्हणालो' ती नय्यर साहेबानी सांगितलेली ओळ शायरानी काय लिहिले आहे नाही.' त्याने विचारले " ती गझल तुम्हाला आवडली का" " ती लिहिली आहे खास वा गायलीही रूनानी खास " मी बोललो. आता चकित होण्याची पाळी माझी होती. " ती मीच लिहिली आहे ...... एस नाचीज को नूर देवासी कहते है |" मी त्याचा हात पकडून गदगद हालवला. " देवासी साहब आपके पांच छे गाने तो मैने सुने है और आपका कलाम काफी अच्छा है " असे म्हणून मी त्याचा निरोप घेतला.
त्यानंतर एक्दा आमच्या ऑफिसात पुण्यातील " मेलडी मेकर्स " या गाजलेल्या ऑर्केस्ट्राचे एक संस्थापक श्री सुरेंद्र अकोलकर आले होते. गप्पात त्यानी नय्यर साहेबानी मरीन ड्राएव्हची जागा मुलाला देऊन ते घराबाहेर पडून विरारला रहात असल्याचे सांगितले. त्याना इस्माईल श्रॉफ नावाचा दिग्दर्शक शोधत गेला मग दोन सिनेमे आले पण नय्यर साहेबांची जादू कमी झाल्याचे दिसत होते. मग त्यानी या सांगितिक
जीवनापासून जणू फारकतच घेतली. पुण्याची काही मंडळी त्याना भेटायला ठाणे येथे गेली. व आता अज्ञातवास सोडा अशी गळ घालूनच परत आली. त्यांचा ७५ वा वाढदिवस पुणेकर चाहत्यानी साजरा केला. नय्यर आपले जुने सहकारी शामराव कांबळे याना मिठी मारून भेटले. असाच पुन्हा एकदा कार्यक्रम झाला. त्यानाही ओपी आले होते, शेवटी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. त्यात मी उभा राहिलो. स्टेजवर स्वरांचे बादशहा उभे. मी म्हणालो. " नय्यर साहब, लोग जानते है कि आपने बाकायदा क्लासिकल म्युझिककी तालीम नही ली है लेकिन मै कहता हुं , ली है | " माझ्या या वाक्यावर क्षणभर स्टेजवर उभे असलेले नय्यर साहेब व स्थानापन्न सुमारे हजारभर लोक चकितच झाले असावेत .क्षणही वाया न दवडता मी लगेच बोलता झालो " नय्यर साहब आपकी मौसिकी साज और आवाजके धागोसे बनी हुई कशमीरी शॉल जैसी है दोनेकी कशीदाकारी बराबरीसे तीन मिनिटका जादू तीन घंटतक चलाती है और इसकी वजह ये की आपका संगीत सेलेस्टीयल है ,उधर ही आपने जनमके पहलेही यक्ष और किन्नरोंसे तालीम पायी है | " माझ्या या वाक्यावर टाळ्यांचा कदकडाट झाला. दुसरा एक प्रश्न मी लगेचच विचारला " आपके गानेमे इन्ट्रो, इंटर ल्युड और पोस्ट साँग म्युझिककी खास जगह रहती है क्या आपके असिस्टंट जी एस कोहली और सबॅस्टीयन दिसूझा को क्रेडीट देना चाहिये ?
" देखिये हर गाना एक टीम वर्क होता है कभी रेकोरडिस्ट बी एसमे शामील होता है , तो क्रेडीट सबको है " नय्यर साहेबानी मुद्दा स्पष्ट केला. माझा सर्वांसमक्ष चा शेवटचा प्रश्न होता " नय्यर साहेब आपल्याला कधी कॉपी करण्याचा मोह झाला का ? "
पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या सेलेव्रीटीला इतका धाडसी प्रश्न तो ही चाहत्याकडून " अशी शांतता पसरली, पण नय्यर साहेबानी लगेचच उत्तर दिले" हां एकबार ओपी ने कॉपी की है वो गाना था सुन सुन सुन सुन जालीमा ..... " इसका मुखडा एक कॉपी है लेकिन अंतरा मैने ही बनाया है उसके बाद मैने कभी भी किसीकी कॉपी नही की लोकिन मेरी कॉपी जरूर की गई है |
शेवटची एकच आठवण अशी की पुन्हा एकदा ओपींच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पुण्यात झाला. निमित्त त्यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे. मध्यल्या सुटीत ते पुढच्या रांगेत मधोमध बसले. बरेचसे थकलेले दिसत होते. मी जवळ जाउन दोन्ही हात हातात घेऊन खाली झुकलो नमस्कार केला. तोडाने हलक्या सुरात " सौ साल जिय तुम जान मेरी ...मेरे उमरभी लग जाये तुमको " ह्या त्यानीच स्वरबद्ध केलेल्या ओळी
म्हणून मोकळा झालो. तीच त्यांची व माझी शेवटची भेट. त्यांच्या वाद्यवृंदात माझ्या आडनावाचा माणूस बासरी वादक होता. व त्याना अकरा वर्षे पित्याची जागा देणार्याचे नाव माझे नाव एकच . त्यामुळे या ना त्या निमित्ताने कधीतरी नय्यर साहेबानी आपले नाव आडनाव सतत उच्चारले असेल असा माझ्या भाग्याचा बादारायण संबंध माझे सांगितिक गुरू. आदर्श व सांगितिक पिता ओपी नय्यर यांचेशी होता. आपण १९४३ च्या दरम्यान जन्माला आलो असतो तर ऐन तारुंण्यात फिर वही दिल लाया हु, , एक मुसाफिर एक हसीना हे चित्रपट व त्यांचे संगीत आपल्या आयुष्यात आले असते अशी रुखरुख वाटते. असो.
विसू - या आठवणी मी लिहाव्या म्हणून माझ्या शी अबोला धरण्याच्यी गोड धमकी देंणार्या मिपाकर संजय क्षीरसागर यांचे खास आभार .
आपला चौ रा .
प्रतिक्रिया
30 Apr 2012 - 4:24 pm | JAGOMOHANPYARE
छान.... कालच यु ट्युब वर सी आय डी पाहिला.... ओ पींची जादू आजही कायम आहे. कहि पे निगाहे गाण्यात मुखड्याच्या आधी आणि नंतर सारंगीवर पिलू रागाची सुरावट वाजते.. जीव थक्क होतो.. शास्त्रीय गायनवाले वीस मिनिटं आळवून ज्या जागा दाखवतात त्या ओपी अर्ध्या मिनिटात दाखवतात, पिलु असो वा पहाडी .
ही ओपींनी केलेली एक कॉपी .. पण मुखडा कॉपीड असला तरी ओपींचे गाणे मात्र अगदी ओरिजिनलच आहे.. :) http://www.youtube.com/watch?v=nzCSTMWix3g
30 Apr 2012 - 4:26 pm | जयंत कुलकर्णी
// शास्त्रीय गायनवाले वीस मिनिटं आळवून ज्या जागा दाखवतात त्या ओपी अर्ध्या मिनिटात दाखवतात, पिलु असो वा पहा/////
????????
:-(
30 Apr 2012 - 4:28 pm | मुक्त विहारि
आणि आभार,
लेख लिहिला म्हनूण तुमचे
आणि
तुम्हाला हा लेख लिहायला भाग पाडल्याबद्दल, संजयक्षीरसागर यांचे...
30 Apr 2012 - 4:44 pm | चैतन्य दीक्षित
सोनू निगम सारेगम चं सूत्रसंचालन करायचा तेव्हाच्या स्पेशल एपिसोड्स मध्ये आलेले ओ.पी. आठवले या लेखामुळे.
लेखाबद्दल धन्यवाद :)
30 Apr 2012 - 4:44 pm | प्रचेतस
सुंदर लेख.
चौराकाका, तुमच्या आठवणींच्या पोतडीतून अजूनही असेच काही क्षण येऊ द्यात.
30 Apr 2012 - 6:42 pm | अत्रुप्त आत्मा
असेच म्हणतो... :-)
30 Apr 2012 - 5:24 pm | सस्नेह
व्वा ! ओ.पीं.चे जरा हटके असे व्यक्तिमत्व छान उतरवले आहे... त्यांच्या गाण्यांमधील झटक्यांसारखेच ! त्या गाण्यांचा बाजच वेगळा !
बाकी एक अपेक्षा होती की ओ.पी. अन लताजी यांचे सूर नेहमी समांतर का गेले, कधी मिळाले नाहीत, याचे कुठेतरी विवेचन येईल अशी. याबद्दल काही सांगता का चौकटभाऊ ?
30 Apr 2012 - 6:25 pm | चौकटराजा
त्यासाठी "क्या बात है इस जादूगरकी " नावाचा ओपीच्या संगीताचे माझे आकलन या धर्तीचा लेख लवकरच मिपाकरांसाठी येणार आहे.यासाठी सध्या " फिर मिलेंगे कभी इस बातका वादा कर दो हमसे एक और मुलाकात का वादा कर दो " हे ओपींचेच गीत गुणगुणावे.
30 Apr 2012 - 6:31 pm | चित्रगुप्त
माझ्यासारखे हजारो ओपी-दिवाणे ज्याची नुस्ती कल्पनाच करत झुरत असतील, ते त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचे भाग्य तुम्हाला अनेकदा लाभले... याबद्दल शिरसाष्टांग दंडवत.
अतिशय सुंदर, भावपूर्ण रीत्या केलेले लेखन वाचून आनंदलो.
ओपींच्या संगीतात कालानुसार कसकसे बदल होत गेले, याचा आढावा घेणारे लिखाण सोदाहरण करावेत, अशी विनंती करतो.
उदाहरणार्थ, "आंखों ही आंखों मे इशारा हो गया" या १९५५ च्या 'सीआयडी' च्या गाण्यात पुढे अनेक वर्षांनंतरच्या 'एक मुसाफिर एक हसीना' वगैरे च्या संगीताची चाहूल त्यांना लागलेली होती, असे दिसते.
ओपी यांची काही अगदी वेगळ्या ढंगाची गाणी :
मेरी नींदोंमे तुम.... (नया अंदाज १९५६)
गरीब जानके... (छू मंतर १९५६)
मै सोया अखिया मीचे... (फागुन १९५८)
प्यार पर बस तो नही है मेरा लेकिन फिरभी.... (सोने की चिडिया १९५८)
मन मोरा बावरा... (रागिणी १९५८)
आप के हसीन रुख पे आज नया नूर है....(बहारें फिर भी आयेगी १९६६)
.... आता सहजच एवढी आठवली, आणखी खूपच असतील.
आभार.
30 Apr 2012 - 6:34 pm | चित्रगुप्त
.... फिर मिलेंगे कभी इस बातका वादा कर दो हमसे एक और मुलाकात का वादा कर दो " हे ओपींचेच गीत गुणगुणावे.....
अगदी कबूल, आणि "क्या बात है इस जादूगरकी " च्या प्रतिक्षेत झुरत....
30 Apr 2012 - 6:53 pm | चौकटराजा
त्या लेखात ओपी एक व्यक्ती, गीतांचे प्रकार, रागांची निवड, वाद्ये, तालाची वजने, वापरलेली गायक मंडळी, शायर, न्रिर्माते, नायक, नायिका, चित्रपटांचे प्रकार व ऑर्केस्टेशन चे माझे आकलन असा मालमसाला असेल.
30 Apr 2012 - 8:24 pm | प्रदीप
आपले गोनीदांवरचे लेख आवडले होते, त्यात आपल्याला लहानपणी त्यांचा व त्यांच्या कौटुंबियांचा सहवास कसा लाभला ह्याविषयी फार सुंदर प्रतिपादन होते, अगदी त्यांच्या पत्नि चिवडा तुमच्यापुढे ठेवतांना काय म्हणाल्या, ह्या बारीक पण सहज आलेल्या व मर्मग्राही तपशिलासकट त्या लेखांतील सगळेच अत्यंत उत्कट होते.
ह्यामुळे तुमच्या ओपीवरील लेखाविषयी माझ्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ह्या लेखाने अत्यंत निराशा केली. कारण लेख अगदी भाबड्या दृष्टीकोनातून लिहीला गेला आहे, आपली एका थोर कलाकाराबरोबर पहिली भेट, मग इतर भेटी कशा झाल्या, ह्याविषयी दिला गेलेला तपशिल प्रामाणिक आहे ह्याविषयी अजिबात शंका नाही. पण ह्या सर्वात cloying शिवाय काहीही हाती लागले नाही, हे दुर्दैवी म्हणावे. मला वाटते एखाद्या उच्च दर्जाच्या कलाकारास भेटावयास (व तेही ठरवून) जातांना मनाशी त्याच्या कार्याची काही उजळणी व्हावी, कुठली माहिती कशी काढून घ्यायची आहे ह्याविषयी काही पूर्व तयारी असणे जरूरीचे आहे. ते नसले की लेख नुसताच भोंगळ होऊन बसतो, तसे इथे झाले आहे. उत्तम माहिती, अभ्यासू वृत्ति व समोरच्याशी सहज संवाद साधण्याची कला, ह्यांमुळे शिरीश कणेकरांचे अनेक अशा दर्जांच्या कलाकारांच्या मुलाखतीचे लेख खरोखरीच वाचनीय झालेले आहेत. त्यांत त्यांनी ओपीची दोनदा घेतलेल्या मुलाखतींवरील लेखाचाही समावेश आहे. तसेच डॉ. मंदार बिच्चू ह्यांच्या लताच्या मुलाखती अत्यंत वाचनीय आहेत.
तरी आता वर प्रॉमिस केल्यानुसार, ओपीच्या कारकीर्दीवरील माहितीपूर्व, त्याच्या संगीतातील बलस्थाने, त्यातील मर्मे इत्यादींचा उहापोह असलेला लेख अपेक्षित आहे.
जाता जाता-- बर्वे हे कलाकार नौशाद, ओपी, शंकर जयकिशन वगैरेंकडे बासरी वाजवायचे. हिंदी चित्रपट संगीतातील त्यांची स्वतःची (म्हणजे बासरीवादक म्हणून) कामगिरी काय होती ती मला ठाऊक नाही, पण सहज, नकळत त्यांनी एकदा दुसर्या एका कलाकाराविषयी जे उद्गार काढले, त्यातून त्या चित्रपट सृष्टीस 'अब्दुल करीम' नामक अत्यंत उच्च दर्जाचे लेणे लाभले, असे मी दत्तारामांकडून ऐकले आहे. अब्दुल करीम हा गुलाम महमदचा भाऊ, तो स्वतः उत्तम तबला वादक होता, पण त्याच्या कारकीर्दीच्या सुरूवातीस (म्हणजे सुमारे ५५ ~ ५६ साली) त्याला ढोलकचे फारसे अंग नव्हते. एकदा म्हणे शंकर जयकिशनच्या कुठल्यातरी गाण्याच्या वेळी त्याला, शंकर सांगत होता त्यानुसार काही वाजवावयास जमेना. तेव्हा तेथे उपस्थित वादकांसमोर ' अरे, ये तो इसके बस की बात नही है' असे काहीतरी म्हणे बर्वे उद्गारले. तेव्हा अपमानाने व्यथित अब्दुल करीम तसाच तेथून बाहेर पडला. जाता जाता तो बर्वेंना म्हणाला ' एक दिन मै इधर आके ऐसा ढोलक बजाऊंगा, की देखते रहना, मै जरूर कुछ इनाम पाऊं गा'. नंतर सुमारे वर्षभर तो कुठेच दिसला नाही. त्यानंतर शंकर जयकिशनक्डे एका गाण्यास त्याने ढोलक इतका बहारीचा वाजवला, की 'देखते रहेना'! तेव्हा लताने खूष होऊन त्याला बक्षीस दिले. रेकॉर्डींग संपल्यानंतर स्वारी ते बक्षीस घेऊन थेट बर्वेंच्या घरी , गोरेगावकर चाळींत, दाखल झाली. 'देख, मैने कहा था नं, मु़हे इनाम मिलेगा?' ह्या स्वारीने त्याच्या बहारदार तबला व ढोलक साथीने पुढे इतिहास घडवला. त्याच्यासारखा ढोलक इतर कुणीही वाजवला नाही, असे म्हटले तर ते अजिबात बेजबाबदार विधान होऊ नये. तेव्हा सांगायचे म्हणजे, बर्वेंचे ह्यामुळे माझ्यासारख्या ढोलकप्रेमीवर असंख्य उपकार आहेत!
30 Apr 2012 - 11:01 pm | संजय क्षीरसागर
शिवाय माझ्याकडे आशा पारेखनं टीवीसाठी घेतलेली ओपीची फुल मुलाखत आहे त्यात सुद्धा ओपीनं चाल कशी सुचते? आणि तुम्ही शास्त्रिय संगीत शिकलेले नसताना चाली कशा देता? या प्रश्नांना "वो तो खुदाकी देन है" असंच उत्तर दिलय. आपण मुझिक इल्लिटरेट आहोत (म्हणजे गाण्याच नोटेशन सांगता येत नाही) हे त्यांनी स्पष्ट कबूल केलंय.
जर ओपीला चाल कशी सुचते हे जाणून घ्यायचं असलं तर कुणी दर्दी सतत त्याच्या सहवासात हवा, गीत मिळाल्यावरची त्याची चित्तदशा, मागच्या सर्व काँपोझिशनमधून बाहेर पडून सर्वस्वी नवं काँपोझिशन कसं तयार होतं त्याची प्रक्रिया, त्याचा रिदमसेन्स, गाण्यातला मूड व्यक्त करण्यासाठी त्यानी निवडलेला आवाज आणि वाद्यमेळ अशा अनेक गोष्टी आहेत.
आज इतक्या गोष्टी प्रथम समजावून घेवून मग एकेका गाण्याविषयी ओपीशी चर्चा व्हावी तर दुर्दैवानं ओपी नाही. तरीही चौरांनी एक सुरेख विषय छेडला आहे, आपल्या ज्या काही लिमीटेशन्स आहेत त्या मंजूर करून तो विषय आपण रंगवू आणि तुम्हाला आवडलेल्या पैलूंची तुम्ही भर घालावी असं वाटतं
1 May 2012 - 2:29 am | अन्या दातार
याबद्दल सहमत.
ओपींना शास्त्रीय संगीताचे ज्ञान नव्हते असे ते जे सांगतात त्यावर माझा अजुनही विश्वास नाही. याचे कारण म्हणजे रागिणी चित्रपटातले "छोटासा बालमा" हे गाणे. संपूर्णतः शास्त्रीय संगीतावर आधारीत असे हे गाणे आहे. इतरही काही आहेत (अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच; पण आहेत!). इतका शास्त्रशुद्धपणा fluke by chance कसा काय येईल बरे? त्यामुळे ओपींना शास्त्रीय संगीत माहित होते अशी शंका घेण्यास वाव आहेच.
असो. ८-९ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले जेंव्हा ओपी व नौशाद या कलाकारांना भेटण्याचा आटोकाट पण निष्फळ प्रयत्न केला होता. आता हसू येते व विषादही वाटतो.
1 May 2012 - 11:16 am | संजय क्षीरसागर
प्रत्येक व्यक्ती काही जन्मजात गुणवत्ता घेऊन जन्मते, म्हणजे पाच संवेदनांपैकी त्याची एक संवेदना अधिक प्रखर असते. ज्यांची श्रवणसंवेदना प्रखर असते त्यांना लहानपणापासून योग्य मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी तिचा पाठपुरावा केला तर ते संगीतात दिग्गज होतात. ज्यांना दृष्टीचं प्राबल्य लाभलंय ते रंगारंगातला सूक्ष्म फरक, आकारातलं सौंदर्य, मांडणीतला तोल जाणून चित्रकार होतील किंवा त्या अवलोकनाला तैलबुद्धीची आणि कार्यकारणाचा मागोवा घेण्याची सवय असेल तर शास्त्रज्ञ होतील. ज्यांना स्वादाचा पैलू गवसलाय ते बल्लवाचार्य होतील, अशा अनेकानेक संभावना आहेत.
आता श्रवणसंवेदना प्रगल्भ असणार्यात दोन संभावना आहेत, जे निव्वळ स्वरांचे भोक्ते आहेत ते शास्त्रीय संगीताकडे वळतील आणि ज्यांना शब्दांचा मोह आहे ते सुगम किंवा उपशास्त्रीय संगीतात रमतील.
आपल्यातले बहुतेक जण शब्दांच्या मोहात असतात म्हणून सहज म्हणता येणारी गाणी आपल्याला आकृष्ट करतात; स्वरास्वरातले भेद, श्रुती, एकाच फ्रेजची अनेकानेक वेरीएशन्स, तालाचं भान इतकी अवधानं राखणं आपल्याला जमत नाही.
ओपी शब्दप्रधान संगीतकार आहे, समोर शायरी येत नाही तोपर्यंत त्याला चाल सुचणार नाही, मूड आला आणि ओपीनं तानपुरा घेऊन रागदारी सुरू केली असे होणे नाही.
उस्ताद अमीरखान आणि ओपींची जानी दोस्ती होती, ओपीनी "देखो बिजली डोले बीन बादलकी" हे गाणं केल्यावर अमीरखान नाराज झाले. ओपींनी त्यांना नाराजीचं कारण विचारलं तर ते म्हणाले, " शास्त्रीय संगीत तू शिकलायस हे माझ्यापास्नं इतके दिवस का लपवलस?’" ओपी म्हणाले कशावरून? तर ते म्हणाले "हा श्री राग (आणि आडाचौताल का काय ताल) आहे आणि असली रचना एखादा दिग्गजच करू शकतो" ओपी म्हणाले " आपल्या दोस्तीची शपथ, तुम्हाला सांगतो, त्या रागाचं नांव आणि असा काही ताल आहे हे तुम्ही सांगीतल्यावर मला समजलंय!"
1 May 2012 - 5:27 am | चौकटराजा
आपल्या अपेक्षा वाढल्या असणे साहजिकच आहे. पण मी व शिरीष कणेकर यांच्या पातळीतच फरक आहे. मी शिरीष कणेकराना भेटलो आहे. त्यांच्या ऑफीसमधे ही गेलो होतो व घरीही. लेख लिहिणे हा त्यांचा नुसता छंद नसून व्यवसाय ही आहे. त्यामुळे जी खास तयारी लागते ती त्यानी केली आहे. तशी मी अजूनही केलेली नाही. माझा ओपींवरचा लेख चाहता या पातळीवरचाच असणार आहे. त्यामुळे एखाद्या गा़ण्यात लीड गिटार असताना बेस गिटार वापरले आहे अशी माहितीही येउ शकते.दुसरे मुख्य फरक असा की गोनीदा आमच्या गावातच रहात होते. आपल्या कृतींविषयी बोलण्यात त्याना जेवढा रस असे तेवढा नय्यर याना नव्हताच . अगदी कणेकरांच्याही लेखात त्याचा उल्लेख नाही. ओपी नय्यर चाल पातळीवर प्रतिभावान कलाकार होते तर वाद्यवृंद पातळीवर कारागीर !
त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या जाणीवे विषयी- एक गोष्ट स्प्ष्ट आहे की शिकलेले असणे व संस्कार असणे यात फरक आहे . मी स्वत: एकही
दिवस शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही पण बिहाग व मारू बिहाग यातील फरक कोणता स्वर मुख्यत्वे करतो हे मलाही कळते. तसे ओपीनी खूप शास्त्रीय संगीत ऐकलेले असेलच. कित्येक जण संगीतात डोक्टरेट करूनही त्यांचे गायन रंजक होत नाही कारण शिक्षण व संस्कार यातील फरक हे होय. मी ज्यावेळी त्याना भेटलो त्यावेळी मी ना पत्रकार होतो ना व्यावसायिक वादक व वयही २२ २४ चे आसपास असेल. त्यामुळे संगीत चिकित्से पेक्षा भक्त्तीभावचा भाग जास्त आला असेल हे मान्य आहे. आपल्या प्रतिभेवर नय्यर एवढेच म्हणतात की " मी नियतीने बनविलेला संगीतकार आहे. नियतीला वाटले तेव्हा व तेवढेच काम तिने माझ्याकडून करून घेतले. चाली कशा सुचल्या मी काय सांगणार कारण मी केवळ निमित्त होतो. "
1 May 2012 - 10:13 am | संजय क्षीरसागर
तुम्ही लिहा बिन्धास्त! फक्त एक करा कंपॅरीटिव लिहू नका (म्हणजे अमक्यापेक्षा ओपी ग्रेट असं, कारण अनेकजण वेगवेगळ्या अँगलनं ग्रेट आहेत). मेलडी हा एकमात्र निकष ठेवून लिहा मग प्रतिसाद भरकटणार नाहीत आणि सॉलिड मजा येईल.
1 May 2012 - 11:53 am | चौकटराजा
माझे लाडके संगीतकार किमान पंधरा एक तरी आहेत. मी ओपींचा अंधभक्त नाही. खरे तर कुणाचाच नाही. ओपी काय सी आर काय सगळी माणसेच .हरेकाचा मेंदू वेगळा. त्यातून निघणारी स्वरांची भेंडोळीही वेगवेगळी . पण लताबाईच एकदा म्हणाल्या होत्या लता एक व्यक्ती म्हणून
माझा एखादा लाडका राग असेलच ना तो हंसध्वनी आहे" तद्वतच पंधरामधे ओपी हा माझा हंसध्वनी आहे.
2 May 2012 - 10:29 am | सस्नेह
>>>ह्यामुळे तुमच्या ओपीवरील लेखाविषयी माझ्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ह्या लेखाने अत्यंत निराशा केली. कारण लेख अगदी भाबड्या दृष्टीकोनातून लिहीला गेला आहे, आपली एका थोर कलाकाराबरोबर पहिली भेट, मग इतर भेटी कशा झाल्या, ह्याविषयी दिला गेलेला तपशिल प्रामाणिक आहे ह्याविषयी अजिबात शंका नाही. पण ह्या सर्वात cloying शिवाय काहीही हाती लागले नाही, हे दुर्दैवी म्हणावे. मला वाटते एखाद्या उच्च दर्जाच्या कलाकारास भेटावयास (व तेही ठरवून) जातांना मनाशी त्याच्या कार्याची काही उजळणी व्हावी, कुठली माहिती कशी काढून घ्यायची आहे ह्याविषयी काही पूर्व तयारी असणे जरूरीचे आहे. ते नसले की लेख नुसताच भोंगळ होऊन बसतो, तसे इथे झाले आहे. उत्तम माहिती, अभ्यासू वृत्ति व समोरच्याशी सहज संवाद साधण्याची कला, ह्यांमुळे शिरीश कणेकरांचे अनेक अशा दर्जांच्या कलाकारांच्या मुलाखतीचे लेख खरोखरीच वाचनीय झालेले आहेत.<<<
सदर लेखाबद्दल माझे वैयक्तिक मत असे झाले की तो म्हणजे मुलाखत अथवा संगीतसमिक्षा नसून व्यक्तीमत्वविषयक/ अनुभवात्मक आहे त्यामुळे त्यात संगीतविषयक तपशील येणे तसेच कणेकरांशी तुलना अनावश्यक वाटते. तसेच लेखकाने आलेले अनुभव प्रामाणिक व स्वसापेक्ष दृष्टीकोनातून मांडले असल्याने 'भाबड्या दृष्टीकोनातून' हेही अनाठायी वाटते. उदा. पु. ल. यांचे व्यक्तिचित्र अख्ख्या महाराष्ट्राचने मांडणे अन सुनिताबाईंनी मांडणे यात फरक पडू शकतो. मग कुणाचा अनुभव भाबडा मानायचा ?
30 Apr 2012 - 7:36 pm | संजय क्षीरसागर
आता तुमची आवडती ओपीची गाणी, त्यातल्या खास जागा, इंटरल्यूड, इंट्रो, शायरी असा जमेल तेवढा सिलसिला येऊ दे! मनःपूर्वक धन्यवाद!
30 Apr 2012 - 7:52 pm | सहज
लेखमाला आवडली.
30 Apr 2012 - 8:06 pm | प्रभाकर पेठकर
'ताल बादशहा' अर्थात 'र्हिदम किंग' ओपी साहेबांवरील लेख अतिशय मस्त जमला आहे. अजून वाचायला तर नक्कीच आवडेल.
धन्यवाद आणि अभिनंदन.
30 Apr 2012 - 10:09 pm | सुधीर काळे
"है दुनिया उसीकी जमाना उसीका, मुहब्बतमे जो हो गया हो किसीका" हे "काश्मीरकी कली"मधील गाणे माझे सर्वात आवडते गाणे आहे.
30 Apr 2012 - 10:54 pm | अर्धवटराव
नाईस टु सी यु !!
अर्धवटराव
1 May 2012 - 11:42 am | रणजित चितळे
मस्त आठवण, छान रंगलाय. आठवणी आवडल्या.
21 May 2012 - 5:03 am | चित्रगुप्त
ओपींचे ".. मी नियतीने बनविलेला संगीतकार आहे. नियतीला वाटले तेव्हा व तेवढेच काम तिने माझ्याकडून करून घेतले. चाली कशा सुचल्या मी काय सांगणार कारण मी केवळ निमित्त होतो.... " हे विधान मलातरी पटले, कारण मी स्वतःच्या चित्रनिर्मितीबद्दलही असेच म्हणू शकतो....
"क्या बात है इस जादूगरकी " च्या प्रतिक्षेत.....
14 Jan 2023 - 6:12 pm | चित्रगुप्त
आज अचानक हा लेख नजरेस आला. आता चौकटराजा या जगात नाहीत. त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मन भरुन आले आहे.