मी, गोनिदा अन ओ पी नय्यर !
१९६५ चा सुमार. भारत पाक लढाई चालू. मी तळेगाव दाभाडे येथे सातव्या यत्तेत शिकत असावा. तेथील तरूणांचा एक क्रिकेट क्लव होता. त्यानी संरक्षण निधीला मदत म्हणून एक रांगोळी प्रदर्शन काही प्रवेश फी ठेवून आयोजित केले होते. त्यावेळी मुंबई आकाशवाणी ब केंद्रावरून शनिवारी सकाळी साडेसात वाजता " भावसरगम" हा भावगीतांचा कार्यक्रम सादर होत असे. परिकथेतील, ही वाट दूर जाते, पहिलीच भेट झाली, हात तुझा हातात अशी एकसो एक गाणी त्या कार्यक्रमातील निर्मिती आहेत. त्यांचा सरताज म्हणजे " शुक्रतारा मंदवारा" . या गीताच्या प्रथम प्रसारणाचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी वय ११ असेल. ते गीत मला व माझ्या पेक्षा दीड वर्षाने मोठया असणार्या व माझ्या पेक्षा जास्त तयारी असलेल्या माझ्या थोरल्या भावाला फारच आवडले. चारही शनिवार ते गीत ऐकले व पाठ करून टाकले. त्यातील सुधा मलहोत्रा यांची कडवी भाउ म्हणत असे तर मधले अरूण दाते यांचे कडवे हे माझे काम असे.
असे ते प्रदर्शन पहायला गेलो असताना तिथे लाउड स्पीकर वर गाणी चालू होती. तेथील माईकवाल्याला पटवून आम्ही दोघेही ते गाणे माईक वरून म्हणू लागलो. नेमके त्याच वेळी तळेगावचे रहिवासी असलेले गो नी दांडेकर उर्फ अप्प्पा खालून रस्त्या वरून चाललेले होते, गाणे ऐकून ते माडीवर आले व सरळ आम्ही गात होतो तिथेच आले. " पोरानो , नावं काय तुमची? " वगैरे चौकशी करून त्यानी दुसरे दिवशी आम्हा दोघाना त्यांचे घरी येण्याचे निमंत्रण दिले. दुसरे दिवशी आम्ही दबकतच त्यांचे कडे गेलो. कारण त्यांचेकडे लताबाई , आशाताई सहज म्हणून सुद्धा काही वेळेस चक्क्कर मारीत असत. त्यामुळे खरेतर अप्पा ना आम्ही घाबरूनच रहात होतो. पण गेल्यावर त्यानी आम्हाला त्यांचे बाहेरचे खोलीत वसविले. त्यांची उणीपुरी दोन खोल्यांची जागा. बाहेर बाल्कनी. स्वंयंपाक घराची जमीन सारवलेली. अप्पांची म्हातारी आई बाल्कनीत बसलेली दिसत असे." हा आमचा अप्पा लहानपंणी पळून गेला गाडगेबाबाकडे " अशी हकिगत त्या भेटणार्याना सांगत असत. बाहेरच्या खोलीत गाद्या एकमेकावर टाकलेल्या .एका बाजूला काही पुस्तके भरलेले कपाट व सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक वस्तू म्हणजे चावी मारायचा फोनो.
आम्ही गेल्यावर कोणकोणती गाणी येतात असे विचारल्यावरून माझ्या भावाने काही गाण्यांची नावे सांगितली. त्यात " मावळत्या दिनकरा " या भा रा तांबे यांच्या रचनेच्या समावेश होता. अप्पांच्या सुचनेप्रमाणे भावाने ते गीत गायला सुरूवात केली. गाणे लक्षपूर्वक ऐकल्या नंतर जो तो पाठ फिरवी मावळल्या असे हवे " जो तो पाठफिरवि मावळत्या असे नको वगैरे सूचना त्यानी दिल्या. व गाणे कसे गायचे ते मी तुम्हाला
ऐकवितो. असे म्हणून त्यानी एक तबकडी बाहेर काढली. " ही आशाबाईंनी मला दिली की जी ओपी नय्यर यानी त्याना भेट दिली होती अशी ही तब़कडी आहे." अशी माहिती देऊन त्यानी फोनोची चावी फिरविली..
गाणे चालू झाले. " ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा न घबराईये. ........." तीन मिनिटे तो उत्तम उतान गायकीचा डेमो आम्ही दोघेही मन लावून ऐकत होतो.माझ्यावर तर जादू झाल्यासरखेच झाले. मग ते गाणे मेरे सनम " या तील आहे हे कळले. मग आतापर्यत शंकर जयकिशन च्या प्रेमात असलेला मी एकदम ओ पी च्या नादी लागलो. मग रेडीओवर "कशमीरकी कली, फिर वही दिल लाया हू, ... पासून सावनकी घटा"
पर्यत गीतांची पारायणे होउ लागली.
क्रमशः
प्रतिक्रिया
17 Apr 2012 - 2:15 pm | प्रास
छान सुरूवात केलीय लेखमालेची.
आमचं जीवनही गोनिदांनी आणि ओपींनी चांगलंच समृद्ध केलेलं आहे पण तुमच्यासारख्या वैयक्तिक भेटीचा अनुभव असा काही खास सांगता येणार नाही. तेव्हा तुमच्या या लेखाचे पुढचे भाग वाचण्यास खूपच उत्सुक आहे.
पुलेप्र
17 Apr 2012 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर
तुम्ही चितारलेला प्रसंग वाचून मन मोहरून आले आहे. नशिबवान आहात. अभिनंदन.
पुढील भागांची उत्सुकतेने वाट पाहात आहे, हे लक्षात असो द्यावे.
17 Apr 2012 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार
आज आमच्या गुगळे सरांची फार आठवण येते आहे. तुमची आणि त्यांची लिखाणशैली अगदी समान आहे.
17 Apr 2012 - 2:31 pm | स्वप्नाळू
" ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा न घबराईये. ........." अप्रतिम गाणे आहे. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत आहे.
17 Apr 2012 - 3:04 pm | संजय क्षीरसागर
संगीताचं कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण न घेतलेला, स्वतःला `आय एम म्युझिक इल्लिटरेट' म्हणणारा आणि लता मंगेशकर सारख्या संगीतावर अधिराज्य गाजवणार्या गायिकेचं एकही गाणं नसतांना यानं स्वतःची कारकिर्द हिट केलीये.
ओपीच्या गाण्यात वातावरणाचा मूड बदलवण्याची जादू आहे
तुम्ही ओपीबद्दल लिहाच!
17 Apr 2012 - 3:22 pm | प्यारे१
ज्जे बात!
मस्तच चौरा काका. छान लिहीताय की. असं नी असंच लिहा.... छान छान :)
17 Apr 2012 - 3:40 pm | चित्रगुप्त
वा साहेब ... खूपच छान.
खरंच, तुम्ही खूपच भाग्यवान. गोनिदा, ओपी अश्या प्रतिभावंतांशी प्रत्यक्ष भेटणं, बोलणं ...
मला सुद्धा गोनिदांचा अल्प सहवास लाभलेला आहे. म्हणजे त्यांनी माझ्या चित्रांच्या प्रदर्शनाचं उदघाटनच केलं होतं, (बहुधा १९७६ साली) पुण्याला बालगंधर्व मध्ये. त्यापूर्वी त्यांना त्याविषयी विनंती करायला तळेगावी त्यांच्या घरी गेलो होतो, पण आता एवढेच आठवते, बाकी तपशील विसरलो...
मी मित्रांना नेहमी म्हणायचो, की मला जर कधी ओपी दिसले, तर भर रस्त्यावर मी त्यांना साष्टांग नमस्कार घालेन... पण तसा योग कधी आला नाही, मीही प्रयत्न केला नाही... मात्र ओपींचे शतशः उपकार आहेत, आणि माझ्यासारखे त्यांचे दीवाणे हजारो आहेत, एवढे नक्की.
ओपींच्या रचनांमधील सौदर्यस्थळे, त्यांचे संगीत कसकश्या टप्प्यांमधून विकसित होत गेले, त्यांनी कोणकोणती वाद्ये वापरली, त्यांचे वादक कोणकोण होते, ते संगीत रचना कशी करत, वगैरे विषयी वाचायला आवडेल. जालावर ही महिती आहे का?
धन्यवाद, आणि पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
17 Apr 2012 - 4:46 pm | चौकटराजा
मी ओपी नय्यर " क्या बात है इस जादूगरकी " असा लेख लवकरच लिहितो. उदाहरणे देऊन.
दरम्यान एकच अंतरा असलेली ओ पी ची गाणी एकूण तीन आहेत . आठवून पहा बरे !
आप्ला च्यौ रा वन
17 Apr 2012 - 4:12 pm | चैतन्य दीक्षित
सुंदर अनुभव. तुम्ही खरंच भाग्यवान आहात.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
20 Apr 2012 - 1:03 am | चिंतामणी
फारच छोटासा भाग होता हा.
भाग-१ भाग-२ असे शिर्षकात टाकायला हवे होते.
20 Apr 2012 - 5:02 am | चौकटराजा
ते लक्षात आले पण ... प्रकाशित केल्यानंतर शीर्षक संपादित करता येइना. भाग लहान होण्याचे कारण आता खूप वर्षे उलटून गेल्याने आठवतय तेवढच लिहिले. मी त्यावेळी दुर्गवाला असतो तर मग आणखी बरेच लिहिते आले असते. गोनीदा व लेखन गोनीदा व भ्रमण ,गोनीदा व गोनीदा व
इतिहासप्रेम यावर प्रकाश टाकणारे तळेगावात आजही साठीच्या दरम्यान असलेले असतील पण त्यानी लिहिते झाले पाहिजे ना ?
एक आठवण - एकदा मी त्याना विचारले " तुमच्या भ्रमणगाथेत तळेगावला फारसे स्थान नाही , ते का?
त्यांचे उत्तर" तळेगावी आल्यानंतर हा आप्पा स्थिरावला, संसारी झाला व त्याच्यातले अलौकिकत्व संपले. "