हे बंध रेशमाचे

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
9 Apr 2012 - 12:22 am

सकाळी चिवचिवत येणार्‍या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकावायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणु ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदुळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकिकडे चिवचिवाट सुरुच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येउ लागले आहेत. सकाळी ’आम्ही आलो, तांदुळ आणा’ असा एक बोल, आपल्या सख्यांना ’नाश्ता आला, या’ असा दुसरा आवाज आणि अगदी आकांताने केलेला चिवचिवाट म्हणजे ’हे दुष्ट पारवे आमचे तांदुळ फस्त करत आहेत, त्यांना हाकला’ असा आवाज. हे पारवे महा तापदायक. माझ्या चिमण्या जिथे पाच दहा मिनिटे रमत गमत दाणे टिपतात तिथे हे पारवे मधेच घुसुन सगळे दाणे क्षणात फस्त करतात. पूरग्रस्त वा भूकंपग्रस्तांना आलेली मदत परस्पर लाटणाऱ्या पुढाऱ्यांसारखे. वर छज्जावर घाण करतात तो आणखी त्रास.

तसाही या पारव्यांनी बराच ताप दिला. एकानं बेडरुमबाहेर छज्जावर बरोबर ए सी खाली घरटं केल. लक्षात आलं ते सकाळी होणाऱ्या फडफडाटान आणि पिलांच्या बारिक, पुसट आवाजान. ते इवलेसे जीव असताना घरटं कस उडवणार? मग ती पिलं मोठी होऊन उडेपर्यंत त्यांना बाळगाव लागलं. मग एकदाच ते घरट काढल, घाण केलेला छज्जा स्वच्छ केला तेव्हा कुठे निस्तरलं. हा त्रास वाढतच गेला. एकदा तर रात्री स्वयंपाकघराची खिडकी लावताना एक पारवा आत शिरला. त्याला हुसकायचे नाना प्रयत्न झाले पण तो पठ्ठा धुलाई यंत्र आणि शीतकपाट यांच्या खोबणीत अंग चोरुन बसुन राहीला. शेवटी नाद सोडला. सुदैवाने सकाळी आई लवकर उठली आणि सगळीकडच्या सरकत्या काचा तिने दूर सारल्या तेव्हा तो फडफडत उडुन गेला आणि त्याने रात्री स्वयंपाक घरात केलेल्या घाणीवरच भागलं. अखेर एक दिवस सर्व खिडक्या आणि कपडे वाळत घालायच्या भागाला पक्षी रोधक जाळी बसवुन टाकली आणि त्या उपद्रवी पक्षांचा बंदोबस्त केला.

त्याच सुमारास घरात नवा कोच आणला. जास्त माणसांना बसायची सोय आणि हल्ली जरा प्रचलित असा इंग्रजी एल आकाराचा कोच हौसेने आणला. मात्र त्याचा तोटा दुसर्‍याच दिवशी लक्षात आला. बाहेरच्या खोलिची भिंत नसलेली छज्जाची मोकळी बाजु आता बऱ्यापैकी अड्ली होती. पूर्वी तीन आसनी कोच लांब भिंतीलगत व त्याला काटकोनात मोकळ्या बाजुकडे पाठ करुन दोन स्वतंत्र अशा कोचाच्याच पद्धतिच्या खुर्च्या होत्या आणि त्यामुळे मोकळ्या भागाची बाजु बरी मोकळी होती. मुख्य म्हणजे दोन खुर्च्यांच्या मधुन चिमण्या आत यायच्या, डोकावायच्या, चिव चिव करायच्या आणि क्षणात भुर्रकन उडुन बाहेर छज्जावर तांदुळ येण्याची वाट पाहायच्या. या नव्या कोचामुळे मागची मोकळी बाजु कोचाच्या उंचीपर्यंत बंद झाली आणि चिमण्यांना आत येता येईना. त्या बिचाऱ्या दूर कठड्यावर बसुन साद देउ लागल्या. पूर्वी दाणे टाकायला उशीर झाला वा सकाळी कुणाचा फारसा वावर दिसला नाही तर चिमण्या बेशक हक्काने दुडकत दुडकत घसरत घसरत पटकन परत फिरता येइल अशा बेताने थेट आतपर्यंत यायच्या. ते आता शक्य नव्हते.

आणि एक दिवस तो प्रकार घडला. सकाळी दहाचा सुमार होता. आईची पूजा नुकतीच झाली होती. मी आणि माझी आई आम्ही बाहेर कोचावर बसलो होतो. माझी पत्नी अर्चना आतल्या खोलीत होती. कामवाल्या बाई स्वयंपाक घरात काम करीत होत्या. आणि अचानक चिमणीचं एक पिलु धिटाईने आत शिरलं. एकाच झेपेत ते पोर थेट जेवणाच्या टेबलापर्यंत पोचलं. तिथे बसून त्याने चिवचिव केली. टेबलावर काही दिसतय का ते पाहिलं. मग ते उलट वळल. मात्र लगेच त्याच्या लक्षात आलं की समोर बरीच माणसे आहेत. तो इवलासा जीव विलक्षण घाबरला. भितीच्या भरात त्याने बाहेर येण्या ऐवजी उलट आतल्या बाजुने झेप घेतली. पुढच संकट माझ्या डोळ्यापुढे स्पष्ट दिसलं. ते पिलु घरातल्या कुठल्याही खोलीत शिरलं तरी बाहेर पडायला वावच नव्हता कारण सर्व खिडक्यांना पक्ष्यांच्या जाळ्या बसविलेल्या होत्या. आंतमध्ये माण्सं पाहुन ते जर परत फिरलं तर आपल्याला बुजुन पुन्हा बुजु नये म्हणुन मी आईला हातानेच आहे तिथेच स्वस्थ बसुन राहायची खुण केली आणि मीही स्तब्ध बसुन राहिलो. ते भेदरलेले पिलु उजव्या बाजुला गेले. लगोलग परतले आणि ते स्वयंपाकघरात शिरले आणि त्याने खिडकीकडे झेप घेतली. मात्र बिचाऱ्याला समजले की बाहेर जाता येणार नाही. ते स्वयंपाकघरातुन बाहेर यायच्या आत मी जेवणाच्या टेबला पलिकडची उजव्या कोपर्‍यातली खिडकी बंद केली. ते पिलु त्या खिडकीतुन गेले असते तर मागच्या बाजुला कपडे वाळत घालायच्या छज्जाकडे जाणार आणि तिथेही जाळी असल्याने बाहेर पडायला रस्ता नाहीच.

ते पिलु आता भलतच घाबरल होतं. त्याची थरथर जाणवत होती. त्या पिलाने सुरक्षित जागा म्हणुन टेबला लगतच्या मांडणीवर मुक्काम ठोकला. तिथुन त्याला हलवणे गरजेचे होते. मी आईला आत जायची तर अर्चनाला व बाईंना बाहेर न येण्याच्या खुणा केल्या. पिलु उजव्या कोपऱ्यातल्या खिडकीकडे जाउ नये यासाठी देवापुढच्या उदबत्त्या त्या कोपऱ्यातल्या खिडकीत नेऊन ठेवल्या. म्हणजे धुरामुळे ते तिथे जाणार नाही. मग त्याला बाहेरच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी टेबलावर तांदुळ टाकले. ते तांदुळ पाहुन पिलु मांडणीवरून उतरुन टेबलावर येईल आणि तिथे आल्यावर कदाचित त्याला बाहेरचा रस्ता दिसेल. मात्र ते भेदरलेल पिलु त्या दाण्यांकडे पाहायच्या मन्स्थितीत नव्हतं. पोटाच्या भुकेपेक्षा जीवाची भिती अधिक प्रबळ ठरली होती आणि भयग्रस्त झालेल्या पिलाला भुकेची जाणीव उरली नव्हती की त्या तांदुळाच्या दाण्यांचा लोभ उरला नव्हता. ते पिलु अस्वस्थपणे चिवचिव करत मांडणीच्या वर फिरत राहिलं. मात्र त्याची आर्त साद त्याच्या आई बाबांपर्यंत पोचली होती.

आमच्या डाव्या अंगाने म्हणजे मोकळ्या बाजुने भरारी घेत चिमणा, म्हणजे त्याला पिलाचा बाबा त्याच्या सुटकेला आला. रोजच्या सवयीचे घर व माणसे असल्यामुळे म्हणा किंवा आपल्या पिलाला वाचवायच्या निश्चयामुळे असेल. पण त्या चिमण्याने आमची दखल घेतली नाही आणि आमच्या समोरुन तो थेट जेवायच्या टेबलावर जाउन स्थिरावला. समोरच ते तांदुळाचे दाणे होते. चिमण्याने तिथे बसुन चिवचिवाट केला. बहुधा तो त्या पिलाला सांगत असावा, की काळजीच कारण नाही, आता मी तुला न्यायला आलोय, घाबरु नकोस. ते पिलुही जरा शांत झाले. पण क्षणभरच. लगोलग त्या पिलाचा आकांत पुन्हा सुरू झाला. इकडे चिमणा त्या पिलाला बोलावत होता. जर त्याला पाहुन धीर करुन ते पिलु तिथे आले असते तर त्या चिमण्याला पिलासकट उलटे वळुन बाहेर पडने सोपे झाले असते. अखेर त्या चिमण्याने पुढे व्हायचे ठरव्ले. चिमणा त्या मांडणीवर गेला. पिलाला त्याला पाहुन धीर आला असावा. ते पिलु त्याच्या जवळ जवळ फिरु लागले. चिमण्याने पिलाच्या चोचीत दाणा भरवला, पण पिलु खायच्या स्थितीत नसावे. ’मला बाहेर काढा’ हा एकच धोशा त्याने लावला होता. चिमणा मात्र खरच खूप हुशार. त्याने पिलाकडे पाठ फिरवुन समोर टेबलाकडे झेप घेतली. अशा हेतुने की त्याला पाहुन पिलुही मागोमग येईल. पण त्या उंच सुरक्षित जागेवरुन खाली यायची त्या पोराची हिंमतच होत नव्हती. चिमणा पुन:पुन्हा गिरक्या घेऊन त्या पिलाला उडायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत होता मात्र पिलु तिथुन हालायला तयार नव्हते, आर्त चिवचिव मात्र अखंड सुरू होती.

मला आता एक मार्ग सुचला होता. नाईलाज होता, पण तो कठोर उपाय करणे अपरिहार्य होते, दुसरा मार्गच उरला नव्हता. तो उपाय म्हणजे आणखी मोठी भीती, मोठे संकट निर्माण करणे. त्यामुळे जिवावर उदार होऊन पिलाला प्रयत्न करणे भाग पडले असते. मी सर्वांना आपला जागीच थांबायच्या सूचना दिल्या. आणि एकदम डोक्यात ट्युब पेटली, अरेच्चा हा प्रसंग चित्रित केला पाहिजे. मी अलगद आत गेलो, हँडिकॅम काढला. सुदैवाने बॅटरी चार्जड होती आणि आत टेपही होती. बाहेर येता येता मी अर्चनाला धुणी वाळत घालायची काठी आणायचा इशारा केला. मी पुढे होत स्वयंपाक घरात शिरलो आणि बाईना आत सरकण्याची खूण केली. कॅमेरा सज्ज करुन मी बरोबर समोर सुरू असलेल्या त्या धडपडीचे चित्रण करू लागलो. अर्चनाला मी काठी घेउन पुढे येण्याची खुण केली. आणि उपाय अचूक लागु पडला. तिला काठी आपल्या दिशेने आणताना पाहुन आधी चिमणा उडाला व काठी पाहुन ते पिलुही चिमण्यापाटी उडालं. मी त्यांना टिपत बाहेर आलो तो मागोमाग बाईही धावत आल्या आणि त्यांना बाहेर हुसकु लागल्या. मी ओरडुन त्यांना थांबवलं. त्याना बहुधा असं वाटल असाव की उपद्रवी पाखरांना आम्ही हुसकुन लावु पाहतोय. मी त्यांना मागे फिरायला सांगितले. एव्हाना ते दोघे उडाले होते.

मग मात्र मी फार अस्वस्थ झाले. माझा उद्देश कितीही चांगला असला तरी माझ्या लाडक्या चिमण्यांना मला काठीने हुसकावावे लागले हे मला फार लागले. क्षणात मनात विचार आला, की ती पाखरे मनोमन म्हणाली असतील की माणूस जातच अशी. चिमूटभर तांदुळ ते काय आणि त्या साठी आमच्या जिवावर उठायचे काय? कदाचित त्या पाखरांना असे तर वाटले नसेल की ही माणसे रोज आम्हाला बोलावुन दाणे तरी का टाकतात? यांच्यावर विसावुन निर्धास्तपणे आमच पिलु आत शिरलं तर हे त्याच्या जिवावर उठले! कदाचित ती दुखावलेली, धास्तावलेली पाखरं कदाचित पुन्हा कधीच येणार नाहीत या विचारानं मी व्यथित झालो. हे सगळे मनाचे खेळ अवघ्या चार पाच सेकंदात थैमान घालुन गेले. हातातला कॅमेरा तसाच ती पाखरं गेली त्या दिशेने रोखलेला होता. आणि अवघ्या काही क्षणातच ते बापलेक परत आले. मी विलक्षण सुखावलो. एकजण कठड्यावरुन साद देत होता तर एकाने थेट आत खुर्चीच्या पाठीवर जागा घेतली होती. दोघांनीही चिवचिव केली आणि जणु सांगितलं की ’आता आम्हाला रस्ता समजलाय बरं. आता नाही अडकणार. बर आहे, येतो आम्ही". पुढच्याच क्षणी ते पुन्हा भुर्रकन उडुन गेले, अगदी नेहेमी सारखेच.

मला खूप वर्षांपूर्वी कुणीतरी मेल केलेली कवीता आठवली. नक्की शब्द लक्षात नव्हते पण अर्थ असा होता की जर तुमचे पाखरावर प्रेम असेल तर त्याला पिंजर्‍यातुन मुक्त करा आणि सोडुन द्या. जर त्या पाखराचेही तुमच्यावर प्रेम असेल तर ते नक्की परत येईल. इथे गोष्ट जरा वेगळी होती पण माझे पाखरु मात्र परत माझ्याकडे आले होते.

(या प्रसंगाचे चित्रण येथे पाहा)

वावरराहती जागाजीवनमानप्रकटनलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

9 Apr 2012 - 12:48 am | जेनी...

ऊऊऊऊऊ लालाला

जाम मस्त वाटलं...:)

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2012 - 1:12 am | प्रभाकर पेठकर

मस्त लेख आणि विस्मयकारक निरिक्षण. अभिनंदन.

प्राणी पाखरांचे विश्व आपल्या विश्वाला समांतर आहेसे वाटते. त्यांच्या भावभावना टिपताना, अभ्यासताना जाणवतं त्यांचेही संवाद चालू असतात, संभाषण चालू असतं. त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव फार लोभस असतात. आपल्या पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर ह्यांचे हावभाव निरखावे त्यांची भाषा समजली नाही, तरी काहितरी आहे हे नक्कीच जाणवते.

कुत्रा आपल्या क्षेत्रात शेपटी वर करून फिरतो तर दुसर्‍या कुत्र्याच्या क्षेत्रात शिरल्यावर शेपुट खाली करून, कान पाडून चालतो. अशा कुत्र्यावर तिथला कुत्रे कितीही भुंकले तरी हल्ला करीत नाहीत (पूर्व वैमनस्याचे किस्से वगळता). एखादा ताकदवान कुत्रा आपली शेपुट वरच ठेऊन, कान ताठ ठेऊन, 'मी तुम्हाला घाबरत नाही' असा संदेश देतो. आता तिथले कुत्रे कमकुवत असतील तर खुप भुंकतात, हल्ला करण्याचा आव आणतात पण आपली ताकद ओळखुन हल्ला करीत मात्र नाहीत.

मांजर घाबरली की शेपुट पिंजारते. अशा वेळी ती घातक असते हल्ला (स्वसंरक्षणार्थ) करू शकते. मांजर शेपुट आडव्या दिशेत हलवत असेल तर ती रागावली आहे हे समजावे. खेळण्याच्या मनःस्थितीत असताना, रागावलेली असताना, घाबरलेली असताना आणि बोक्याशी प्रेमात आली असताना मांजर वेगवेगळे सुर आळवते.

स्वाती२'s picture

9 Apr 2012 - 1:46 am | स्वाती२

मस्तच!

मस्त रे जाम भारी लिहिलं आहेस आणि शुटिंग पण मस्त आहे एक्दम.

रेवती's picture

9 Apr 2012 - 5:03 am | रेवती

छानच झाले आहे लेखन.
छायाचित्रण पाहिले. चिमणा त्या पिल्लाचा कितीतरी वेळा बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करत होता पण पिल्लाचा धीर होत नव्हता ते पाहून मनुष्याच्या पिल्लांनाही एकच गोष्ट कितीवेळा सांगावी लागते त्याची आठवण झाली. ;)

सहज's picture

9 Apr 2012 - 6:08 am | सहज

मी अश्यावेळी एखादा पंचा, टॉवेल टाकून, पिल्लाला त्याखाली पकडून (जेणेकरुन पक्षाचे पंजे, नखे आपल्याला लागू नयेत) गॅलरीमधे सोडून द्यायचो.

वर्णन तर भारीच!

तांत्रिक प्रश्न - जर एखाद्याचा 'होम व्हिडिओ' पाहीला, तर त्या व्यक्तीच्या घरी जाउन आल्यासारखे आहे का? ;-)
(दिवस : आमंत्रणे रेशो गड्बडलेला) सहज

रणजित चितळे's picture

9 Apr 2012 - 9:16 am | रणजित चितळे

मजा आली वाचून

प्रचेतस's picture

9 Apr 2012 - 10:12 am | प्रचेतस

लै भारी.
मजा आली वाचून.

मृत्युन्जय's picture

9 Apr 2012 - 10:55 am | मृत्युन्जय

सर्वसाक्षींच्या लेखात से रोजच्या घटनांचे किंवा साध्यासुध्या प्रसंगांचे नेमके चित्रण असते त्यामुळे ते भावुन जातात. हा लेखही आवडला हो ससा :)

सस्नेह's picture

9 Apr 2012 - 12:27 pm | सस्नेह

वा, खूप दिवसांनि चिमण्यांबद्दल ऐकायला (वाचायला ) अन पहायलाही मिळाले. रेशमाचे बंध खरोखरच छान जपले आहेत तुम्ही अन तुमच्या कुटुंबियांनी, सर्वसाक्षीजी. निसर्गाशी नाते राखणारे हे धागे सर्वानीच शक्य होईल तसे जपावेत, अशी विनंती.

पहाटवारा's picture

9 Apr 2012 - 1:16 pm | पहाटवारा

शाळेतला धडा आठवला मराठीच्या पुस्तकातला .. बहुदा शिरिष पै नी लिहिलेली कथा असावी .. घरटे मोडायला लागल्याची ..
मस्त लिहिले आहे ..
थोडा टायपो झाला आहे .. "मग मात्र मी फार अस्वस्थ झाले. "
बाकि मजा आली वाचताना ..

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2012 - 3:29 pm | स्वाती दिनेश

फार सुंदर लिहिले आहे साक्षीदेवा,
स्वाती