अफझलखान वध - खानाला बुडविला !

मालोजीराव's picture
मालोजीराव in जनातलं, मनातलं
9 Mar 2012 - 11:44 pm

या युद्धात २ मराठा महिलांनी हि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे भाग घेतला,दीपाबाई बांदल आणि बबई खोपडे
दीपाबाई यांनी म्हसवडे या बांदल यांच्या कारभाऱ्या सोबत आपले सैन्य राजांच्या बाजूने लढायला पाठवले ,तर बबई खोपडेंनी आपले सैन्य खानाच्या बाजूने लढविले !

कान्होजी जेधे शिवरायांस मिळाले !
जेधे बाजी पासलकर यांचे जावई असल्याने जेधे आले कि पासलकर येतील असे खानाला वाटले, खानाने जेध्यांना आपल्या वाई प्रांत हवालदार त्र्यंबक कान्हो च्या कडून निरोप पाठवला.
"आपला जमाव घेऊन सिताबीने यावे,खर्चाची तरतूद स्थळी केली जाईल,आम्ही तायाघाट ओलांडून गेलो आहोत"
खान तोपर्यंत वाईहून निघोन कुसगाव,चिखली,तायाघाट ,गुव्हेघर,गुताड असे करत लिंगमळ्यापर्यंत पोचला.
खालील पत्र जेध्यांस खानकडून आलेले आहे, ते पत्र जोडून अजून एक पत्र जेध्यांनी शिवरायांना पाठवले व या कमी त्यांचा सल्ला विचारला.



जेध्यांना आलेले खानाचे पत्र जोडून जेध्यांनी शिवरायांना पाठवले

यावर महाराजांनी धूर्त उत्तर देत कळविले "तुमचा व खानाचा घरोबा आहे,तरी तुम्ही जावे अथवा पुत्रास पाठवावे,नीट कौलभाक घ्यावी...दगा होईल असे होऊ देऊ नये "
महाराजांवर विश्वास दाखवत जेध्यांनी शपथक्रिया आणि कौलफर्मान राजांना मागितले,कौल घेऊन जेधे आपल्या ५ मुलांसह राजगडी आले.
तेथेही राजांनी सुचविले "बादशाही हुकुम मोडून तुम्ही येईन राहिलेत,वतन आणि जीवास अपय होईल तिकडेच जाणे" ...राजांच्या शब्दातील खोच लक्षात येऊन
जेध्यांनी आपल्या वतनावर पाणी सोडले.
जेधे आपल्या बाजूने आल्यावर राजांनी खलबते करण्यास मोरोपंत,सोनोपंत,नेतोजी पालकर,निळोपंत,रघुनाथ बल्लाळ,गोमाजी नाईक पानसंबळ,सुभानराव नाईक इ. मातब्बर बोलावले.

नेतोजी पालकर यांना जावळी घाटमाथ्यावर व्यवस्था लावून दिली.
अशी दोहो बाजूस तयारी चालू असता, कृष्णाजी भास्कर पत्र घेऊन शिवाजीकडे आला...पत्राचा मतलब असा होता "सरकारातून मला तुमच्यावर मोहिमेसाठी धाडले आहे, परंतु तुमचा व माझं घरोबा लक्षात घेऊन तुमच्या सर्व कृत्यांची माफी विजापूर दरबारातून करून घेईन, तुम्ही म्हणाल तसं तुमचा बंदोबस्त लावेन, शहाजीराजांपेक्षा मोठा मरातब होईल "
पत्रातला छद्मीपणा राजांना कळला,त्यांनी कृष्णाजी भास्करास एक दिवस गडावर ठेऊन घेतले चांगली सरबराई केली.दुसर्या दिवशी जाताना बरोबर पंताजी गोपीनाथ (बोकील वकील) यांस पाठविले.
"खानाचे चित्त आमच्या बर्यावर आहे कि वाईटावर आहे याचा कसून शोध घ्या " असे बजावले व खानास निरोप धाडला "आपण जावळीला यावे...आमच्या मनात कपट नाही "
बोकीलांनी खानची एकांतात भेट घेतली "राजा कचदिल आहे,वाई ला येऊन भेट घेण्यास भितो " असे सांगून त्यास जावळी येण्यास राजी केले.भेट संपल्यावर बोकीलांनी खानाच्या लोकांस लाच-लुचपत देऊन खानाचा ठाव घेतला असता कळले कि खानाच्या मनात फार्मानाप्रमाणे काहीही करून शिवाजींस ठार मारणे आहे.पंतांनी लगोलग हि गोष्ट राजांना कळविली.
जिजाऊ मा साहेबांनी सुद्धा युद्धापूर्वी "मुसलमान बेईमान, खान राखीना तुम्हाला " असे बजावले होते.


अफझल खान

अफझल खानाच्या गोटात राजांच्या हेरांचा सूळसुळाट होता,कोणी विश्वासराव नावाचा हेर रोज फकिराचा वेश घेऊन खानाच्या गोटात फिरत असे आणि ती खबर दरबारी पोचवत असे.
मजल दरमजल करत खान पार मुक्कामी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ला आला लगोलग राजांस त्याने भेटीचे वेळ आणि स्थळ ठरविण्यासाठी वकील पाठवला.
बुरुजाखालील माची भेटीचे ठिकाण ठरविले,शिवरायांनी त्या ठिकाणी सपाट जागेत उत्तम सदर तयार करण्यास अण्णाजी रंगनाथ तळेकर (कि मळेकर?) यांस सांगितले,
येण्याची वाट झाडे तोडून दगड हटवून सोपी करून दिली,पण जिथे जिथे वाट रुंद होती तिथली वाट जाणून बुजून अरुंद केली गेली कि जेणेकरून जास्त लोक एका वेळी येऊ शकणार नाहीत.
सदर - तयार केलेली सदर शाही इतमामास साजेशी होती. देरे,बिछाने, अस्मान्गिरी गिर्द्या ,तक्के ठेवून जागा सजविली होती.देर्यास चंद्रराई कळस सोन्याचे बसवले होते .मोत्याच्या झालरी लावल्या होत्या ,उंची मखमली पडदे होते.शामियान्यात एक चौथरा तयार करोन खाशांस बसण्याची व्यवस्था लावली होती.चौथरा ३३ फुट रुंद ,दक्षिणोत्तर ४० फुट असा होता. (१९२० सालापर्यंत चौथरा अस्तित्वात होता).

तयारी - सैन्य चौफेर पसरेल असे ठेवले होते,"चौकशीस हवालदार ,किल्लेदार,कारकून,कारखाननिस आदिकरून जातीने राहून चौकशी करावी,राखावी,यावे-जावे. वाड्यापर्यंत दरवाजाचे आत ठायी ठायी चौकी-पहारे असावे,दरवाज्यावरी-कचेरीनजीक तोफा ठेविल्या | बार होताच हुश्शार व्हावे " अशी ताकीद राजांनी दिली .
बुरुजाच्या आतल्या बाजूस पन्नास तोंडाशी शंभर, मोकळ जमिनीस शे-पन्नास अशी किल्ल्यावर व्यवस्था.तर किल्ल्याखाली व सभोवताली
व्यवस्था अशी होती. चंद्रगडावर जमाव ठेवला,हैबतराव व बालाजी शिलीम्कारास बोचेघोळ घाटी ठेवले, नेतोजी पालकर घाटमाथ्यावर थांबले,जावळीच्या अंगाला बांदल सैन्य थांबले.हिरोजी फर्जंद मंडपाजवळील दरडीत पन्नास माणसानिशी लपले.
"जाऊ जाणे येऊ नेणे ! अशी गत रदबदल्याची झाली " (चक्रव्युहात स्वताच अडकला)
त्या दिवशी ( मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी) ला सकाळी ब्राम्हण बोलावून द्रव्य,धर्म हस्तके,गोदाने दिली.केदारेश्वराची पूजा-प्रार्थना केली.
दुपारी दोनप्रहर सुमारास राजे सदरेस जायला निघाले- अंगात चिलखत वर जरीची कुडती,अस्तनीत नवटाकी पट्टा घातला.भवानी आईचे स्मरण केले.
मातोश्री जिजाउस भेटून जर दगाफटका झाला तर उमाजीस * राज्य द्यावे असा मानस केला
(उमाजी - शिवरायांचा वडिलभाऊ संभाजी यांचा पुत्र)
त्यावर जिजाउ साहेबांनी " काही वाकडे पडल्यास गर्दी जमवून शत्रूस बुडवावे राज्य रक्षावे" असा सल्ला दिला, जवळ जमलेल्या सर्व मातब्बरास नावाजून राजे म्हणतात
"तुम्ही सर्व शूर-पराक्रमी आहा,आमची मदार तुमचेवरच,सर्वांनी शर्थ करावी राज्य तुमचेच आहे" .
इकडे खान दीड हजार बंदूकवाले घेऊन सदरेस निघाला त्याला असा येताना पाहून बोकीलांनी त्यास अडवले आणि "एव्हडा जमाव कशाला, राजा धाशात खाईल,वापस जाईल " असे सांगून सगळे हशम हटविले.
खान,कृष्णाजी भास्कर,सैद बंडा , कमलशा मुर्शेद आणि दोन हुद्देकारी सशस्त्र एवडेच सदरेपाशी आले. सैद बंडा ला सुद्धा बोकीलांना सांगून दूर करविले तो जाऊन सदरेबाहेर थांबला.खानाच्या पालखीचे ३२ भोई बाहेर थांबले .
इथे राजे जिऊ महाला आणि संभाजी कावजी सोबत सदरेपाशी आले.
(जीवा महाला - याचे पूर्ण नाव जीवा महाला सकपाळ जातीने न्हावी याच्या वंशजांना कोंडिवली गावी काही जमीन इनाम आहे.
संभाजी कावजी - याचे पूर्ण नाव संभाजी कावजी कोन्धालकर, धोम धरणापाशी कमळगडाजवळ पायाथ्यास यांचे गाव आहे , युद्धानंतर राजांकडे याने शिरवळ वा वाई च्या देशमुखीची आशा धरली त्यास नकार दिल्याने तो नंतर च्या काळात शास्ताखानास मिळाला )

प्रत्यक्ष भेट - उंच बळकट शरीराचा खान शामियान्यात आला खानासमवेत कृष्णाजी पंत व विठ्ठलपंत मरठेकर होते,तर महाराजानसोबत पंताजी बोकील होते.
खानाने कृष्णाजीला 'हाच शिवाजी काय' अशी पूस केली ,तसेच राजांनी बोकीलांना 'हाच खान काय ' विचारले.आगत स्वागत ओळख करून देण्यात आली.
दोघेही सामोरे गेले भेटीसाठी उभे ठाकले, खानाने शिवरायांची हि इतिहासप्रसिद्ध गळाभेट घेतली,तत्क्षणी खानाने राजांची मुंडी कवटाळून काखेखाली धरली ,राजीयास घेरी आल्यासारखे झाले.
खानाचे कमरेस भली मोठी जमदाड होती तिचे म्यान टाकून खानाने जमदाड राजांच्या कुशीस चालवली,आत चिलखत असल्याने खरखर आवाज झाला,वर अंगास लागला नाही.
वार झाल्याचे लक्षात येताच राजांनी चपळाईने पूर्ण बळ एकवटून बिचवा खानाचे पोटी मारला.एकांगी करून तडाख्याचा वार केला
(एकांगी - बगले कडून बाजूला सरून दुसर्या बाजूने जोर लावणे)
या तडाख्यामुळे खानाची आतडी बाहेर आली ,खान पंतास 'दगा केला दगा केला' म्हणू लागला.तेवढ्यात महाराजांनी खानवर दुसर्या हाताने पट्ट्याने वार केला त्यात खानाचे दोन भाग होऊन खान पडला.
कृष्णाजी पंताने फिरंग काढून राजांवर वार टाकला पण तो बसला नाही,तेव्हा कृष्णाजी पंताने भोयास आत बोलाविले,त्यानी खानास गोळा करून पालखीत भरला व पालखी पळवू लागले.या गोंधळात सैद बंडा आत आला आणि त्याने पट्ट्या चा वार राजांवर टाकला,तो अडवून राजांनी उलट पट्ट्याचा वार बंडा वर केला. तो चुकवून पुन्हा पट्ट्याचा वार करण्यास सैद बंडा ने जवळीक केली तसा जीवा महालाने पुढे सरसावत फिरांगीने बंडा चा हात कापला. तसच जीवा आणि संभाजी कावजी शामियान्याबाहेर गेले आणि खानाची पालखी घेऊन पळणाऱ्या भोयांचे पाय कापले,तसा तो डोलारा खाली कोसळला आणि कावजीने खानाला पालखीतून बाहेर काढत त्याचे मस्तक कापले.

इकडे शामियानात झालेल्या धुमाळीने पंताजी बोकीलांवर सुद्धा काही वार झाले,तर कृष्णाजीला राजांनी त्याच्या लष्करात बातमी सांगण्यास सोडून दिले,गड उतरताना झालेल्या कचाकचीच्या लढाईत त्यास अपय होऊन तो मारला गेलं असावा असे काही इतिहासकार सांगतात.
(बर्च्याच ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यातच मारला गेल्याची नोंद आहे )
खान पडल्यापडल्या गडावरच्या मराठ्यांनी तोफेला बत्ती दिली.तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, बाजी सर्जेरावाने जीवाची शर्थ केली.
कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही.
सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले.
"कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये" असे आदेशच मिळाले होते.
'अलिशान अफझलखान महमदशाही' ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार
पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफझुल्या चा पोरगा फाझल जीव वाचवायला कोयनाकाठाने कऱ्हाड च्या दिशेने पळत सुटला असता खंडोजी खोपड्याच्या हाती लागला,परंतु फाझल खानाने पैशाचे आमिष दाखविताच लोभापायी त्याने फाझल ला सोडून दिले, हि बातमी गडावर कळताक्षणी राजांनी खान्डोजीस धरून आणविला आणि त्याचे डोके उडवले.
कापड ,हत्यारे, वाई ला असलेला तोफखाना, बाराशे उंट,४-५ हजार घोडे, ४ लाखाहून जास्त जवाहीर, ७-८ लाख रोकड असा बराच मुद्दे माल सरकारात जमा झाला.
राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले.
पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले,
रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले.
पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला.
देवीच्या समोरील बाजूस डोंगराचे टोक होते तिथे खानाचे मुंडके पुरल्याचे सांगण्यात येते, नंतर भोवती बुरुज उभारला 'अब्दुल्ला(अफझल) बुरुज ' , शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते.

(उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला,कहर म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी तर असे लिहिले कि राजांनी खानास एकट्यास जेवायला गडावर बोलाविले,
खान आल्यावर गडाचे दरवाजे लाऊन घेऊन राजांच्या माणसांनी खानाला मारिले. :P ,
सर जदुनाथ सरकारांनी सुद्द्धा अप्रत्यक्षपणे असेच सुचविले आहे.महम्मद खाफीखान ,साकी मुस्तैद खान,अडोल्फ बेंडसर,भीमसेन सक्सेना या मोगलांच्या तर्फेच्या लोकांनी सुद्धा शिवरायांनाच या प्रकरणी दोषी ठरवत ठपका ठेवला. परंतु खानाकडे राजांना मारायचे फर्मान होते हे माहित असताना शिवरायांनी जे केले ते योग्यच होते.
वरील लोकांचा मराठी साधनाचा अभ्यास कमी असल्याने स्थानिक राजकीय स्थितीचा आणि खानाच्या पूर्वीच्या दगाबाजीच्या इतिहासाचा विचार या लोकांनी केला नाही.
खानाचा वधच केला जाणे गरजेचे होते. )


अफझल बुरुज

प्रतापगडावर मोठा सोहळा केला,सगळे आनंदून गेले, भवानी आईची कृपा झाली समजून राजांनी चांगले कारागीर बोलावून त्यास तुळजापूर ला पाठविले
आणि मूर्तीचे तसेच ध्यान करून तशीच मूर्ती गंडकी शिळा आणून प्रतापगडावर घडविली.राजेश्री मोरोपंत पिंगळे आणि त्यांच्या पत्नी च्या हस्ते मूर्ती बसविली.


श्री भवानी आई

(देवीस रायगडात २ आणि सातार्यात ११ गाव इनाम होते, पेशवा कडूनही एक २०० व एक ३०० अशी मिळून पाचशे रु ची साडीचोळी सालीना होती,औरंगजेबाच्या आक्रमणा वेळी काही वर्षे मूर्ती काढून दुसरीकडे हलविण्यात आलेली, नंतर ती पुन्हा आणून बसविली गेली)
जिजाउंचा आनंद गगनात मावेना त्यांनी अनेक धर्म केले,दान केले. आपल्या पुत्राचा पराक्रम पुढील पिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून शाहीर बोलावण्यात आले.
अज्ञानदास शाहिराने हाती डफ आणि तुणतुणे घेऊन हे पादशाही सरदाराचे भांडण आणि शिवाजी सर्जाचे दलभंजन खड्या आवाजात गायले !
"शिवाजी सर्जानं इनाम घोडा बक्षीस दिला | शेरभर सोन्याचा तोडा हातात घातीला "


खानाने स्वतासाठी बनवून घेतलेली कबर ...पण बिचारा तेथे दफन नाही होऊ शकला !
(शहाबाग,विजापूर )


अली आदिलशहा


प्रतापगड नकाशा

खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात धरणीकंप झाला ,बडी बेगम शोक करू लागली
तर औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडून नंतर मोठी खंडणी घेऊन बिनकपड्याचे सोडून दिले होते !

अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले,मराठा सैन्याने कोकणात राजापूर तर घाटावर पन्हाळा,विशालगडा पर्यंत धडका मारल्या !
आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती
अटकेपर्यंत धडक मारून भगवा रोवणाऱ्या मराठेशाहीची हि खरी सरुवात होती !
जय भवानी ,जय शिवाजी !
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

इतिहाससमाजराजकारणलेखमाहिती

प्रतिक्रिया

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ---^---

त्याच बरोबर महाराजांची सावरकर रचित आरती----

प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया ---^---

मालोजीराव's picture

10 Mar 2012 - 10:41 am | मालोजीराव

अतृप्त राव तृप्त झालो वाचून...धन्यवाद !

कुंद कहा, पयवृंद कहा,
अरूचंद कहा सरजा जस आगे ?
भूषण भानु कृसानु कहाब
खुमन प्रताप महीतल पागे ?
राम कहा, द्विजराम कहा,
बलराम कहा रन मै अनुरागे ?
बाज कहा मृगराज कहा
अतिसाहस मे सिवराजके आगे ?

मालोजीराव

अमृत's picture

10 Mar 2012 - 3:41 pm | अमृत

अतिशय समर्पक प्रतिसाद...

अमृत

मोदक's picture

10 Mar 2012 - 4:38 am | मोदक

>>>>सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला.

अधिक माहिती असेल तर वाचायला आवडेल.

मोदक's picture

10 Mar 2012 - 3:00 pm | मोदक

डु.का.टा.आ.

पाषाणभेद's picture

10 Mar 2012 - 6:00 am | पाषाणभेद

शिवजयंतीच्या शुभ दिनी एक उत्तम ऐतिहासीक लेख वाचल्याचे मनाला समाधान झाले.

शिवछत्रपतींचा त्रिवार विजय असो!

अन्या दातार's picture

10 Mar 2012 - 8:10 am | अन्या दातार

रोमांचकारी लिहिले आहे.
दंडवत महाराजांना अन तुझ्या लेखनकौशल्यालासुद्धा
_/\_ _/\_ _/\_

प्रचेतस's picture

10 Mar 2012 - 9:19 am | प्रचेतस

सार्थक झाले, शिवजयंतीच्या दिवशी अप्रतिम लेख वाचून.

काही शंका.

शिवाजीमहाराज भेटीच्या वेळी निशस्त्र होते असे ऐकलेले आहे. अर्थात बिचवा (आणि वाचनखं?) लपवूनच नेली होती. पण नंतर महाराजांनी पट्ट्याने वार करून खानास दुभंग केला ही माहिती नविन आहे. वास्तविक बिचव्याने कोथळा बाहेर काढला आणि भोयांनी पालखीत बसवले तेव्हाही खान जिवंतच होता. नंतर संभाजी कावजीने खानाचे मस्तक कापून आणले.

हैबतराव व बालाजी शिळीमकरास बोचेघोळ घाटी ठेवण्याचे कारण काय? वास्तविक ही वाट तुलनेने प्रतापगडापासून बरीच लांब. पानशेत-खानूच्या जवळ. शिवाय बरीच अवघड, शिवाय तेव्हा रायरीचा रायगड झालेला नव्हता मग ही वाट रक्षण्याचे कारण काय असावे?

मालोजीराव's picture

10 Mar 2012 - 1:03 pm | मालोजीराव

हैबतराव व बालाजी शिळीमकरास बोचेघोळ घाटी ठेवण्याचे कारण काय?

नक्की सांगता नाही येणार पण महाराजांच्या आदेशाप्रमाणे कोकणात येणाऱ्या जाणार्या सर्व वाटा बंद कराव्यात,एकही हशम सुटू नये
खालून वर घाटावर मदत मिळू नये अश्या प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यात आला, मोहनगड हि तसा लांबच होता...तेथील वाटाही अडविण्यात आल्या होत्या.

- मालोजीराव

मुजरा स्विकारावा मालोजीराजे !!!!!

मुक्त विहारि's picture

10 Mar 2012 - 10:51 am | मुक्त विहारि

छान लेख.....

कॉमन मॅन's picture

10 Mar 2012 - 10:53 am | कॉमन मॅन

महाराजांना लाख लाख दंडवत..!

शिवजयंतीनिमित्त महाराजांना मुजरा आणि या लेखासाठी साष्टांग दंडवत..

- (शिवभक्त) पिंगू

मालोजीराव's picture

12 Mar 2012 - 11:45 am | मालोजीराव

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना गाडून गेला,

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला ||

- मालोजीराव

हर्षद आनंदी's picture

10 Mar 2012 - 1:54 pm | हर्षद आनंदी

अनेक वेळा वाचुन, कथुन झालेला हा इतिहास, कितिहा वेळा ऐकिला तरी नवाच वाटतो. मजा येते, खानाचि उडालेली धुळधाण वाचण्यास.. अनुभवण्यास!!

छत्रपति शिवाजि महाराज की जय !!

मन१'s picture

10 Mar 2012 - 2:02 pm | मन१

खंडोजी खोपड्याबद्दल माहिती वेगळी ऐकली होती.
त्याला जीवे मारले नाही, अफझल खान प्रस्म्गानंतर कित्येक दिवस तो लपून छपून रहात होता. व नंतर कुठूनतरी लग्गा लाउन तो "माफी" मिळावी म्हणून शिवाजींच्या दरबारी सादर झाला. सुरुवातीस त्यास माफीही मिळाली. मात्र त्यानंतरही त्याने काही कागाळ्या सुरुच ठेवल्या म्हणून त्याचेही हात्-पाय तोडण्यात आले.
अजून एक म्हणजे अफझल खानाने औरंगजेबाला घेरले तेव्हा औरंगजेब दख्खनच्या मोहिमेवर आलेला दिल्लीचा राजपुत्र /शहजादा होता. अफझल खानाने घेरुन सर्व वाटा बंद केल्यावर त्याने अफझलच्या जवळिल माणसापैकीच कुणालातरी लालुच वगैरे दाखवून(किम्वा दिल्ली दरबाराचा धाक दपटशा दाखवून) सुटका करुन घेतली म्हणतात.
तो निसटून गेल्ल्यावरच अफझल खानास पत्ता लागला की शाहजादा सुटलाय्, फरारी झालाय.
ज्याच्यामुळे हे झाले त्या अधिकार्‍यास खानाने मारले.

बाकी, "खानाला जेवायला बोलावून गडाचे दरवाजे लावून मारले" हे मोगली तर्क जरा अतिच वाटताहेत.
ज्याला धडा शिकवायला आलोय त्याच्याकडे सत्यनारायणाला गेल्यासारखे भोजन अन् प्रसाद घ्यायला जाण्याइतकाही खान मूर्ख असेलसे वाटत नाही. त्याची अशी प्रतारणा केल्याबद्दल तथाकथित इतिहासकारांना नक्की काय म्हणावे समजत नाही.
आणि समजा "शिवाजीने (च)दगा" केला असे गृहित धरले तरी नक्की त्यात काय चुकले हे समजले नाही.
खानाने हल्ला करुन आपली मुंडकी छाटण्याची राजांनी वाट पहायला हवी होती का?

नितिन थत्ते's picture

10 Mar 2012 - 2:46 pm | नितिन थत्ते

छान लेख. विशेषतः पोवाड्याचे स्वरूप न दिल्यामुळे आवडला.

@मन १-

आणि समजा "शिवाजीने (च)दगा" केला असे गृहित धरले तरी नक्की त्यात काय चुकले हे समजले नाही.
खानाने हल्ला करुन आपली मुंडकी छाटण्याची राजांनी वाट पहायला हवी होती का?

सहमत आहे. खानाने हल्ला केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला मारले असे जस्टिफिकेशन द्यायची गरज नाही. त्यावेळच्या राजकारणात अफझलखान मरणे गरजेचे होते म्हणून त्याला मारला. खानाने हल्ला केला नसता तर राजांनी त्याला तसेच सोडले असते काय?

अफझल खानाने औरंगजेबाला घेरले तेव्हा औरंगजेब दख्खनच्या मोहिमेवर आलेला दिल्लीचा राजपुत्र /शहजादा होता. अफझल खानाने घेरुन सर्व वाटा बंद केल्यावर त्याने अफझलच्या जवळिल माणसापैकीच कुणालातरी लालुच वगैरे दाखवून(किम्वा दिल्ली दरबाराचा धाक दपटशा दाखवून) सुटका करुन घेतली म्हणतात.
तो निसटून गेल्ल्यावरच अफझल खानास पत्ता लागला की शाहजादा सुटलाय्, फरारी झालाय.
ज्याच्यामुळे हे झाले त्या अधिकार्‍यास खानाने मारले.

मी वाचले त्याप्रमाणे -
हा खान महंमद होता .. ज्याच्या हाताखाली अफझल लढत होता.
ही तक्रार अफझलने केल्यावर खान महंमद परत येताक्षणी खून करण्यात आला.

बाकी मालोजीराव, खूप सुंदर लिहीत आहात. बर्‍याच नवीन गोष्टी कळाल्यात.
औरंगझेब वारल्यानंतर शाहूराजे व ताराऊ यांच्याबद्दल लिहिणे शक्य होईल का? त्या इतिहासाची अतिशय अल्प माहिती व गोंधळ आहेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2013 - 4:42 pm | llपुण्याचे पेशवेll

मनोबा,
सहमत. खंडोजी खुद्द जेध्यांच्याच पदरामागे लपून माफीसाठी आला. आणि कान्होजींच्या शब्दाखातर त्याला माफी मिळाली पण ती चौरंगीच्या शिक्षेसहीत. कान्होजीना तुमच्या जबानी पाई त्याचा जीव ठेवला असे सांगितले नाहीतर 'स्वराज्यात वशिलेबाजी चालते असे रयतेस वाटेल' अशी कारणमिमांसाही दिली.

अमृत's picture

10 Mar 2012 - 3:35 pm | अमृत

दश दिशा कडाडल्या,
केसरी गुहे समीप,
मत्त हत्ती चालला||

खान चालला पुढे
अफाट सैन्य मागूनी,
उंट हत्ती पालख्याही रांग लांबलांब ती,
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला,
केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला ||

रोमहर्षक रोचक जिवंत स्फुर्तीदायक रक्त सळसळवणारे वर्णन... खूप खूप आवडले...

(रोमांचीत) अमृत

पैसा's picture

10 Mar 2012 - 3:49 pm | पैसा

यावेळेला आम्हाला काहीही शंका नाहीत! सुरेख!

मालोजीराव's picture

12 Mar 2012 - 12:27 am | मालोजीराव

धन्यवाद पैसा ताई :)

- मालोजीराव

कानडाऊ योगेशु's picture

10 Mar 2012 - 7:15 pm | कानडाऊ योगेशु

अफजलखानाचा वध,पन्हाळ्याहुन आणि आग्र्याहुन सुटका,बाजी तानाजीचा पराक्रम हे शिवचरित्रातील प्रसंग पुन्हापुन्हा ऐकत/वाचत राहावेसे वाटतात. बालपणात घेवुन जातात आणि स्फुरण देतात.

समयोचित उत्कृष्ठ लेख.

(शिवभक्त) योगेशु

श्रीयुत मालोजीराव राजे यांसी
श्रीयुत रघुनाथ राव सावंतसाहेब यांचा
नमस्कार
लिहिणेस कारण की हरयेक करुन तुम्ही श्रीयुत राजमान्यराजश्री श्रीमंत राजे शिवाजी यांचे विषयी लिहीत राहणे ,अस्खल लिहीलेत .दोन्ही गोष्टी तुम्हास लिहील्या आहेती यात तुम्ही स्याहाणे अस बहुत लिहीणे नलगे.
आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती
अटकेपर्यंत धडक मारून भगवा रोवणाऱ्या मराठेशाहीची हि खरी सरुवात होती !
जय भवानी ,जय शिवाजी !
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

श्रीयुत रघुनाथ राव सावंतसाहेब

मालोजीराव's picture

12 Mar 2012 - 12:10 pm | मालोजीराव

सप्रेम नमस्कार रघुनाथ राव सावंतसाहेब ,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असा अभ्यासू वाचकवर्ग असेल तर जगदंबेच्या कृपेने आम्ही जरूर लिहित राहू !

श्रीमंत छत्रपती हर्षनिधान राजाराम महाराजांच्या काळात
१५ हजारांची फौज घेऊन मराठ्यांनी पहिल्यांदा नर्मदा पार केली आणि माळव्यात धूळधाण केली,
धमनी गावाजवळ प्रचंड लुट करोन ,खंडणी गोळा करोन धामधूम केली
या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या राजेश्री कृष्णाजी सावंत यांस साष्टांग दंडवत !!!

या शूर कृष्णाजी सावंत यांची मूर्ती जेजुर गडावर नैऋत्येस पूर्वाभिमुखी देवडी मध्ये पहायास मिळेल ,
कृष्णाजींचे सुपुत्र सरदार अडोजी सावंत यांनी हि मूर्ती येथे बसविली.

- मालोजीराव

मैत्र's picture

11 Mar 2012 - 12:31 am | मैत्र

अप्रतिम समयोचित लेख !
उत्तम तपशील, नवीन माहिती... उत्तम मांडणी

अभिमानानं उर भरून यावा असं काही यात वाचायला मिळालं..
समाजाचा एक मोठा घटक एका गटाला लक्ष्य करत असताना.. माझ्या कदाचित पूर्वजांपैकी कोणी महाराजांच्या इतक्या महत्त्वाच्या घटनेत त्यांच्या कार्यात इतकं मोठं काम केलं याचा मला अतिशय अभिमान वाटतो.. एकूणात पंताजी गोपीनाथ / गोपीनाथपंत बोकील हे नाव सोयीस्कर रित्या वगळलं जातं. आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णि या नावाचं प्यादं वापरलं जातं. आणि त्यानंतर
बोकील वकीलांना इतकं मोठं इनाम खुद्द महाराजांनी दिलं ही माहिती नव्हती... राज्यावर आणि त्याहून महत्त्वाचं शिवरायांच्या जिवावरचं संकट निभावून नेण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली हेच पिढ्यान पिढ्या अभिमान करावा असं इनाम आहे...

जाती धर्म गावं प्रांत सगळे भेद मिटवून एका स्वराज्या साठी सगळ्या रयतेला एकत्र आणणारा कर्तृत्ववान जाणता राजा आपल्याच महाराष्ट्रात होऊन गेला हे गेल्या काही दशकांचा इतिहास आणि आत्ताचं राजकारण पाहून काही काळानंतर खरंही वाटणार नाही...

पुनश्च मुजरा मालोजीराव..

गोपीनाथपंत बोकील म्हणजे या प्रसंगातील अतिशय महत्वाची कामगिरी बजावणारी व्यक्ती होय !
त्यांची मुद्सद्देगिरी,राजकारण आणि संभाषणकौशल्य यामुळेच खानाला जावळीत आणणे शक्य झाले,आणि पुढील मनसुबा साधला.
आमचेही गाव हिवरेच्या शेजारीच आहे, अजूनही बोकील वाडा हिवरे मध्ये आहे,सध्या कोणी राहत नाही.आमचे पणजोबा मानाजीराव सरपाटील असताना बोकीलांचे घरी येणे जाणे असायचे.

- मालोजीराव

नन्दादीप's picture

11 Mar 2012 - 2:49 pm | नन्दादीप

सुंदर लेख.
आपल्या राजाबद्दल कितीही वेळा ऐकलं, वाचलं तरी कंटाळा येत नाही.

लेख आवडला. बरेच तपशील नव्याने कळाले.
अजुन वाचायला आवडेल.
लिहित रहा.

शशिकांत ओक's picture

11 Mar 2012 - 7:12 pm | शशिकांत ओक

मालोजीराव,
समयोचित अप्रतीम लेख.

सुनील's picture

11 Mar 2012 - 8:39 pm | सुनील

लेख आवडला. खूप चांगली माहिती दिली आहे.

पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले

हे खरे का?

कारण महाराजांनी वतनदारीची पद्धत बंद केली (जी राजारामाने पुन्हा सुरू केली) असे सांगण्यात येते त्याच्याशी हे विसंगत वाटते.

पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले

हे खरे का?

होय हे खरे आहे, वतन आणि इनाम यात फरक आहे.
इनाम देणे म्हणे बक्षिसपत्र देणे, गाव इनाम दिले म्हणजे वसूल होणार्या करा पैकीकाही टक्के घेण्याचा हक्क तसेच खंड वसुलीचे अधिकार
आणि काही चावर जमीन मिळते !

कारण महाराजांनी वतनदारीची पद्धत बंद केली (जी राजारामाने पुन्हा सुरू केली)

श्रीमंत हर्षनिधान राजाराम साहेबांना वतनदारी पद्धत काही काळासाठी नाईलाजाने चालू करावी लागली,
यामागे फार मोठा इतिहास आहे.

- मालोजीराव

>>इनाम देणे म्हणे बक्षिसपत्र देणे, गाव इनाम दिले म्हणजे वसूल होणार्या करा पैकीकाही टक्के घेण्याचा हक्क तसेच खंड वसुलीचे अधिकार<<

मग वतनदारी मध्ये असे वेगळे काय असते?

मग वतनदारी मध्ये असे वेगळे काय असते?

...वतनदार हा एक प्रकारे त्या भागाचा राजाच असतो, तेथील न्यायव्यवस्था, सैन्य ,चौक्या, आदेशाचे अधिकार (शिक्के) ,सारा ठरविणे, बारा बलुते व्यवस्था इ. सर्व गोष्टी त्याच्या अधिकाराखाली असतात !
ते ज्या राजाचे किंवा बादशहाचे मांडलिक असतात त्यांना वेळोवेळी युद्धात सैन्याची व इतर मदत करावी लागते ,तसेच उत्पन्नाचा काही भाग जमा करावा लागतो !

- मालोजीराव

मन१'s picture

16 Mar 2012 - 11:53 am | मन१

रायरीचे मोरे,दक्षिण कोकणातील राणे/रावराणे/प्रभुदेसाई ह्यांच्यापैकी काही मंडळी,वाडीकर सावंत,सिंदखेडराजा येथील जाधव ही सर्व मंडळी म्हणायला आदिलशाही सरदार होती, पण प्रत्यक्षात आपापल्या प्रभावक्षेत्रात काहिसे de facto राजेच होते.
म्हणजे, उत्तर पेशवाईत जसे शिंदे,होळ्कर व इतर सरदार ,वतनदार , व मुघलांचे बरेचसे नवाब नावाचे मांडलिक प्रत्यक्षातले मर्यादित स्वातंत्र्य उपभोगणारे सत्ताधीश बनले तसेच काहिसे.
बरोबर काय?

मालोजीराव's picture

16 Mar 2012 - 12:07 pm | मालोजीराव

बरोबर घाटावरचे मोरे,घाटगे,नाईक-निंबाळकर कोकण आणि गोव्यातील सुर्वे,दळवी,खेम सावंत ,फोंड सावंत,लखम सावंत यांची स्वताची गादी आणि निशाण (झेंडा) होते !
म्हणूनच महाराजांना हि सरंजामशाही मोडून काढायला फार त्रास झाला !
संभाजी राजांचा मृत्यूही अशाच वतनाच्या वादामुळे झाला...महाराष्ट्राचे दुर्द्यैव आणखी काय !

- मालोजीराव

गोंधळी's picture

16 Mar 2012 - 12:29 pm | गोंधळी

रायरीचे मोरे,दक्षिण कोकणातील राणे/रावराणे/प्रभुदेसाई ह्यांच्यापैकी काही मंडळी,वाडीकर सावंत,सिंदखेडराजा येथील जाधव ही सर्व मंडळी म्हणायला आदिलशाही सरदार होती

ही माहिती कोठुन मिळाली.

ही माहिती कोठुन मिळाली.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने आणि मराठी रियासत मध्ये या संदर्भात माहिती मिळेल !

- मालोजीराव

गोंधळी's picture

16 Mar 2012 - 3:41 pm | गोंधळी

धन्यवाद ....मालोजीराव.

अप्रतिम लेखन.
महाराज, महाराजांनी जोडलेली माणसे आणि तसा काळ पुन्हा होणे नाही.

अमेरिकेसारख्या बलशाली देशाच्या राष्‍ट्रप्रमुखाला कुणीही ऐरागैरा कट करुन मारु शकतो.
पण महाराजांवर उठलेला एक हात वरच्या वर धडापासून वेगळा करुन उडवला गेला - तो सबंध महाराजांवर पडू शकला नाही.
महाराजांवर जीव ओवाळून टाकणारी लोक जोडणे हा महाराजांचा मोठेपणा असं एक निरीक्षण प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी केलं आहे.

आम्ही राजे असतो तर मालोजीरावास या लेखनाबद्दल पाच गाव ईनाम केला असता.
तूर्तास त्यांणी नर्मदापार होऊन धमणी गावाच्या पर्यटनास यावे म्हणजे योग्य तो सत्कार करण्याची संधी मिळेल, अशी विनंती.

शिवाजी महाराजांनी केवळ स्वतःवर जीव ओवाळून टाकणारी माणसं स्वतःभोवती जमा केली नव्हती. जी माणसे जवळ केली होती ती सर्व अंगात विशिष्ट हुन्नर असलेली होती आणि त्यांच्या त्या कौशल्याला उचित असे स्थान राजांनी दिले होते. खूप प्रेम करणारी माणसे त्यांच्या भावनाशीलतेमुळे आणीबाणीच्या प्रसंगी राजाला संकटात आणू शकतात. महाराजांकडे तसे नव्हते. याची अनेक उदाहरणे देता येतील. विस्तारभयास्तव काहीच नमूद करतो.
१) जीवा महाला हा पट्टा चालवण्यात इतका पारंगत होता, की बसल्या जागेवरुन नऊ हातावरचा माणूस विजेच्या वेगाने गाठून त्यावर पट्ट्याचा वार टाकून तो तेवढ्याच वेळात आपली पूर्वीची बैठक घेत असे. हे त्याचे कौशल्य महाराजांच्या स्मरणात होते. त्याचमुळे अफजलखानाच्या अंगरक्षकांचा तपशील बहिर्जी नाईकांकडून ऐकताना खानाचा खास रक्षक सय्यद बंडा नऊ हातावरचा माणूस मारतो, हे ऐकल्यावर महाराजांनी आवर्जून जीवा महालाला आपल्या जवळ ठेवले. पुढे त्यानेच बंडाला गारद केले.
२) संभाजी कावजी कोंढाळकर हा अतिशय धिप्पाड आणि बलदंड होता. खड्ड्यात पडलेल्या तोफेचे चाक तो एकट्याने वर काढत असे. हा माणूस अर्धे बकरे, पंधरावीस भाकरी आरामात फस्त करत असे आणि जड तलवारही खांद्यावर खुरप्याइतक्या सहजतेने बाळगत असे. अफजल हाही तोफेचे चाक एकट्याने वर काढत असे आणि पहार हाताने वाकवत असे, हे ऐकल्यावर राजांना लगेच संभाजी कावजीची आठवण आली. यालाही महाराजांनी स्वतःच्या अंगरक्षकांत जवळ ठेवला कारण अफजलच्या ताकदीचा महाराजांना अंदाज होता.समजा कच्चा जखमी झालेला अफजलखान राजांवर चालून आला असता तर त्याला अंगावर घेण्यास केवळ संभाजीच योग्य होता. पुढे तसेच झाले. एकट्या संभाजीने खानाच्या भोयांचे पाय तोडले आणि खानाचे मस्तकही.
३) दिल्लीला औरंगजेबाच्या भेटीला जाताना महाराजांनी जी माणसे बरोबर नेली होती ती सर्व पारखलेली, कसबी आणि अतिशय सावध होती. पळण्याची सूत्रबद्ध योजना आखताना या माणसांच्या जीवाला अपाय होऊ नये म्हणून महाराजांनी औरंगजेबाकडे अर्ज करुन त्यांना आधीच दक्षिणेकडे रवाना केले होते. अशा माणसांमध्ये राजांचा जीव गुंतलेला असे. पन्हाळ्याच्या वेढ्यात नकली शिवाजी बनलेला शिवा काशीद मारला गेल्यानंतर, तसेच 'महाराज आम्ही साहेबकामावर मरतो, मुलालेकरांना अन्न द्यायला तुम्ही समर्थ आहात' असे म्हणून घोडखिंडीत बाजीप्रभूने मरण पत्करल्यावर शिवाजीसारखा धीराचा राजाही सद्गदित झाला होता.
४) राजापूरहून एका माणसाचे तिथल्या अत्याचाराबाबतचे आणि स्वतःच्या घरच्या हलाखीचे पत्र राजांना मिळाले. वाचताना एक गोष्ट ध्यानात आली, की ते हस्ताक्षर मोत्याच्या दाण्यासारखे टपोरे आणि सुंदर घडवलेले होते. ही गोष्ट राजांनी ध्यानात ठेवली आणि पुढे राजापूरच्या स्वारीत त्या माणसाला शोधून काढून आपला पत्रव्यवहार विभाग (चिटणीसी) त्याच्या स्वाधीन केला. गुलाम म्हणून राबणारा बाळाजी राजांच्या मंत्रिमंडळातील बाळाजी आवजी चिटणीस झाला.

(अवांतर - कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याच्याविषयी ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे तपशीलवार नोंद असेल तर ती जाणून घ्यायची इच्छा आहे. मालोजीराजांसारखे अभ्यासू मिपाकर यावर काही लिहू शकतील का?)

यकु's picture

13 Mar 2012 - 2:12 pm | यकु

:)

शैलेन्द्र's picture

16 Mar 2012 - 3:32 pm | शैलेन्द्र

अगदी
बरोबर, खरतर ही भेट घेताना, एखाद्या फुटबॉलच्या सामन्यात जसे "एकास एक" रणनीती ठरवीली जाते, तशीच महारांजानी ठरवली. अगदी कृष्णाजीपंतांपुढे गोपीनाथकाकांना उभे केले इथुन त्याची सुरवात झाली. फक्त भेटीच्या ठीकाणीच नाही तर जावळीच्या खोर्‍यातही राजांनी स्वार्‍या-शिकारी ठरवुन दिल्या होत्या..

आम्ही राजे असतो तर मालोजीरावास या लेखनाबद्दल पाच गाव ईनाम केला असता.

धन्यवाद यशवंतराव

तूर्तास त्यांणी नर्मदापार होऊन धमणी गावाच्या पर्यटनास यावे म्हणजे योग्य तो सत्कार करण्याची संधी मिळेल, अशी विनंती

नक्की प्रयत्न करू...नर्मदेपार रावेडखेडीस पेशवा सरकारांच्या समाधीजवळ भेटू

- मालोजीराव

पैसा's picture

16 Mar 2012 - 7:32 pm | पैसा

'पेशवा सरकार'ची समाधी नर्मदेच्या पाण्याखाली जाणार असं कालच फेसबुकवर वाचलं. हे खरं आहे का?

हो. खरंय.
वाईट वाटून घेऊ नका.
पेशवा सरकार भाग्यवान आहेत. नर्मदामाई पोटात घेतेय त्यांना. अजून काय हवं?
दॅट विल बी ए ग्रेट इव्हेंट फॉर हिम & फॉर एव्हरीबडी.

पैसा's picture

16 Mar 2012 - 7:58 pm | पैसा

समाधी बघायची शेवटची मुदत काय असेल?

सरदार सरोवर.
कुणाशी बोलणार?



मराठ्यांच्या 'चुंगी' नाक्या जवळ असलेली हि पेशवा सरकारांची समाधी

मी सुद्धा २-३ वर्षापासून ऐकत आहे कि समाधी पाण्याखाली जाणार , नक्की माहित नाही कधी ते !
श्रीमंत सेनाधीश पंतप्रधान थोरले बाजीराव पेशवा सरकारांस मानाचा मुजरा !

- मालोजीराव

गोंधळी's picture

16 Mar 2012 - 11:21 am | गोंधळी

............ शिवाजी राजाय नमः............

मन१'s picture

16 Mar 2012 - 11:35 am | मन१

सर्वाम्च्याच प्रतिसादांतून अधिक माहिती मिळते आहे.....

चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा शिवरायानी पट्ट्याच्या एकाच घावात वध केला. असा उल्लेख आहे. हा शासनमान्य इतिहास असल्याने तो खरा मानायला हरकत नसावी.

http://3.bp.blogspot.com/_hrgE3emTGYk/TRxhmrhboHI/AAAAAAAAAeo/74RHh0tO2q...

पंताजी गोपीनाथ बोकील यांचे राहते गाव, वंशजांचा उल्लेख जसा तपशीलवार आहे तसा कृष्णाजी भास्करचा उल्लेख कुठे आला आहे का? हा माणूस कोण होता?त्याचे गाव कुठले? तो एकदम खानाचा वकील कसा झाला, अशी माहिती अभिप्रेत आहे. त्याबद्दल कुणी सांगू शकेल का?

अर्धवटराव's picture

1 Jun 2012 - 12:24 am | अर्धवटराव

>>...हा शासनमान्य इतिहास असल्याने तो खरा मानायला हरकत नसावी.
-- इतिहासाच्या खरेखोटेपणाची कसोटी शासनमान्यतेवर अवलंबुन असावी?

अर्धवटराव

JAGOMOHANPYARE's picture

1 Jun 2012 - 12:11 pm | JAGOMOHANPYARE

हो.. कारण शासनाला सगळे पुरावे,संदर्भ जपून ठेवावे लागतात. तुम्ही अभ्यास मंडळाला विचारले तर सांगू शकतात.

बाकी खाजगी लेखक असे पुरावे द्यायला बांधील नसतात.

अर्धवटराव's picture

1 Jun 2012 - 11:04 pm | अर्धवटराव

ह्म्म... शासनाने सगळे पुरावे, संदर्भ जपुन ठेवावे हे टेक्निकली बंधनकारक असेल, पण या बाबतीत शासन किती उदासीन आहे याचे प्रत्यय इतीहासाच्या अभ्यासकांना वारंवार येतात.
मुळ मुद्दा असा, कि एखाद्या ऐतिहासीक ग्रे एरीयावर शासनाने ठप्पा मारल्यास तो काळा-पांढरा व्हावा? शासन संस्था कधिच इंपार्शल राहु शकत नाहि. इतीहासाच्या बाबतीत तर नाहिच नाहि.
अफझलखान वध, आग्र्याहुन सुटकेचा प्रयत्न/मार्ग (आझाद हिंद सेना, सुभाशबाबु वगैरे गोष्टी तर अजुनच डार्क... )अशा घटना शासनमान्य इतीहासाच्या संदर्भातुन नि:पक्ष म्हणुन स्विकारता येणे अवघड आहे...

अर्धवटराव

अफजलखानाचे चित्र पाहिले.

पण अफजलखानाबद्दल अधिक माहीती मिळेल का ?

कोण कुठला ? घराणे कुठले ? भारतीय की परदेशी.

स्वतःला बुतशिकन म्हणवून घेत असे, क्रुफशिकन म्हणवून घेत असे.
याचा अर्थ काय ?

त्याच्यात असे कोणते गुण होते म्हणून बादशाहाचा तो वजनदार सरदार होता.

अफजलखान अफगाणिस्तानचा होता. तो 'वजन' दार होता, म्हनुन बादशाचा वजनदार सरदार होता.

अन्तर्यामी's picture

15 Jun 2012 - 12:59 pm | अन्तर्यामी

केवळ अप्रतिम.....!!!!!!!!!!

अत्यन्त सुन्दर .............
राजे खरच तुम्हि आज जन्माला या हो............

भटक्य आणि उनाड's picture

17 Feb 2013 - 5:49 pm | भटक्य आणि उनाड

छान लेख.अप्रतिम.....!!!!!!

सृष्टीलावण्या's picture

17 Feb 2013 - 7:30 pm | सृष्टीलावण्या

आपल्या पुत्राचा पराक्रम पुढील पिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून शाहीर बोलावण्यात आले.

प्रसिद्ध इतिहास संकलक अप्पा परबांशी बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा कळला की आपल्या शिवबाने कोणताही भाट-चारण कधीच पूर्णकालिक सेवेत ठेवला नव्हता. जरी ह्या शाहीर अज्ञानदासांनी अथवा कवि भूषणांनी येऊन शिवरायांचे पोवाडे गायले तरी त्यांना बिदागी देऊन तत्काळ परत पाठवण्यात आले.

बहुदा कायमस्वरूपी स्तुतिपाठक राजांच्या तत्त्वांत बसत नव्हते किंवा (विशेषकरून) गडांवर अनावश्यक (युद्धोपयोगी नसलेले) मनुष्यबळ असणे हे राजांना मान्य नसावे.

मग कवींद्र परमानंद कोण होते ब्वॉ? भाटचारणापेक्षा वेगळे कोणी ते होते असे दिसत नाही. ते तर लै घटनांमध्ये महाराजांच्या बरोबर होते. शिवभारत या काव्याचे कर्ते म्हणून त्यांचे स्थान फार महत्वाचे आहे.

आशु जोग's picture

17 Feb 2013 - 11:21 pm | आशु जोग

अफजलखानाचे पोट फाडले, शायिस्तेखानाचे बोटे तोडली
असे उल्लेख असलेले धागे इथे टाकले जातात आणि ते पुन्हा का वर आणले जातात

त्यामुळे हळव्या लोकांची मने दुखावली जातात
(मनाने हळवा) जोग

कपिलमुनी's picture

18 Feb 2013 - 12:45 am | कपिलमुनी

यांचे एक पुस्तक आहे या विषयावर ..कुणाला नाव आठवते आहे का?

आज परत (कितव्यांदा कुणास ठाऊक) वाचले.
परत एकदा जय भवानी जय शिवराय.
.
ह्या मालोजी, वल्ल्या, ब्याटमानाला लिहायला सांगा रे.

आनंदयात्री's picture

11 Apr 2018 - 6:26 am | आनंदयात्री

हेच म्हणतो! मालोजीराव आहेत कुठे?

योजक: तत्र दुर्लभ: या न्यायाने शिवराय एक कुशल योजक, नेतृत्व होते. लहान असतांना लाडके शिवबा होते. माणसे जोडणे,दुरदृष्टी असणे,अन्यायाची चीड इ. गुणांमुळे राजे स्वराज्य निर्माण करू शकले.