या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859
एक स्वप्न प्रवास.(६) http://misalpav.com/node/1894
एक स्वप्न प्रवास.(७) http://misalpav.com/node/1966
का कोणजाणे पण बाहेरचे वारे जरा कमी झाले होते. ढग आता हलत नव्हता.बाहेरची काही गम्मत कुठुन बघायला मिळते का हे मी पहात होतो.
तेवढ्यात ........
(क्रमश:)
एक अनाऊन्सन्समेंट झाली. यात्रेकरुनी कृपया आपल्या जागेवर बसुन घ्यावे. आपला ढग आता जगन्नाथ पूरीवरुन जात आहे. येथे उतरणारे एकहीजण नसणार नसल्याने ढगाने हा श्टॊप रद्द केला आहे. तरीपण केवळ यात्रेकरुंच्या सोईसाठी ढग काहीकाळ जगन्नाथ पूरीच्या ढग श्टेशनात केवळ दोन मिंटासाठी थांबेल.तरी कोणिही खाली उतरू नये.यात्रेकरुना जे हवे असेल ते सगळे ढगातच मिळेल.एक धक्का बसला आणि आमच्या ढगाचा हळु हळु वेग कमी होऊ लागला. काही वेळाने तो चक्क थांबला. ढग; पूरीच्या ढगश्टेशनात थांबला. तेथे बरेच ढग थांबले असावेत. मला ढग श्टेशन कसे असते ते बघायचे होते. पण खाली उतरलेले प्रवासी चुकुन दुस-या ढगात जातात त्यामुळे लोकाना खाली उतरायला प्रतिबंध होता.. ढगावर पाटी लावण्याची सध्या काहीच व्यवस्था नव्हती. लेझर किरणांचा वापर करुन ढगावर नावाची पाटी लावण्याचे प्रयोग चालु आहेत असे कळाले पण तोपर्यन्त ही गैरसोय होणार होती.
आसपास काही जण "ऐ मोनॅको, मोनॅको, पारले मोनॅको" असे ओरडत बिस्किटे विकत होते.
कसे कोण जाणे मोनॅको विकणारे सगळे हवेत तरंगत होते. अगदी आमच्या ढगात सुद्धा ते डायरेक्ट आले होते..
हवाई प्रवासाच्या नियमा नुसार ढगात ;हलकी असतात म्हणुन फ़क्त मोनॅको बिस्कीटे विकायला परवानगी होती.
थोड्या वेळाने टण टण टण टण टण टण टण टण टण असा आवाज झाला आणि एक अनाउन्समेंट झाली" कृपया आपल्या शेजारचा उतारु सीटवर बसला आहे याची खात्री करुन घ्या" मी शेजारी पाहिले . माझ्या शेजारचा पेस्तनकाका जागेवर नव्हता. त्याला मी बाहेर पडताना पाहिले नव्हते.पेस्तनकाका इकडे तिकदे असतील या अंदाजाने मी एक आवाज दिला...पेस्तनकाका..... पेस्तनकाका...दूरुन कुठुन तरी आवाज आला. "शू छे डिकरा" मी इकडे आजुबाजुला पाहिले कोणीच दिसत नव्हते. मी डोळ्यावरचा गॊगल काढुनही पाहिले..कोणीच दिसेना. मी पुन्हा एकदा आवाज दिला पेस्तनकाका..... पेस्तनकाका.तुम्ही कोठे आहात? " पेस्तनकाकांचा फ़क्त आवाजच येत होता "अरे मी इकडेच हाय".
"अरे पण इकडे म्हणजे कुठे" मी पुन्हा आवाज दिला.
"अरे जरा वरती बघ नी गर्दन उपर करुन". पेस्तनकाकांचा आवाज या वेळेस स्पष्ट आला. मी वर पाहिले.....पहातो तो काय. पेस्तनकाका हवेत तरंगत होते.त्यानी मोनॅको बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्यामुळे ते फ़ारच हलके होऊन हवेत तरंगत होते.
ते तसेच हवेत बराच वेळ तरंगत राहिले. बहुधा त्यांचा बिस्किटांचा स्टॊक संपल्यामुळे की काय ते हळु हळु खाली आले.
ढग आता मेघालयावरुन जात असावा. खाली ढगाला आजुबाजुला खिडक्या असण्याऐवजी खाली जमिनीला खिडक्या होत्या.बाजुचे दिसणे शक्य नव्हते. पण काही काही ठिकाणी जमिनीला असलेल्या खिडक्यातुन खालची जमीन दिसत होती,तिष्ता नदीचे विशाल पात्र संध्याकाळच्या उन्हात चमकत होते. डोंगर, रस्ते, घरे , इमारती ,गाड्या सगळे कसे दिवाळीच्या किल्यावर ठेवल्यासारखे दिसत होते. फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते.शिलॊंग हे सगळ्या ढगांचे आजोळ म्हणुन तर त्याला मेघालायची राजधानी म्हणतात.येथे आम्ही पाणी उतरवणार होतो.अप्पर शिलोंग जवळ चेरापुंजी गाठायचे आणि पाउस पाडायचा ही पाणी उतरवण्याची पद्धत. चेरापुंजी आले. आता ढग पाउस कसा पाडणार ही मला उत्सुकता होती. आत्तापर्यंत पाउस पडताना पाहिला होता . पावसाचे पडणे हे पावसात भिजुन अनुभवले होते.पण स्वत: पाउस कधी पाडला नव्हता. मला पाउस कसा पाडतात हे पहायचे होते म्हणुन मी ढगाच्या डिस्पॆच विभागात गेलो. तेथे पाउस पाडण्याची पूर्वतयारी चालली होती. आकारमानाप्रमाणे आणि प्रदेशानुसार गारांचे वर्गिकरण करुन ठेवले होते.त्या एका चाळणीमधुन खाली टाकण्यात येणार होत्या. पाण्याने भरलेले छोटे ढगांचे तुकडे रचुन ठेवले होते.
पाउस पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी म्हणुन ढगातील स्पीकर चालु केले होते. त्यावर मेघ मल्हार रागातील विजांचा कडकडाट वाजत होता. विजांचा लखलखटाट व्हावा म्हणुन विद्युत भारीतदोन ढग कार्यरत होते. त्यानी एकमेकाना टाळी दिली आणि एकच लखलखाट झाला. पाउस पाडण्यापूर्वी हे असे लोकाना पावसाची वॊर्निंग देण्यासाठी करावेच लागते. अन्यथा तक्रार कक्षात तक्रारींचा खच पडतो. पाण्याचे ढग पिळणारे मशिन चालु झाले. आणि खालचे आसमंत एक वेगळ्याच सुगंधाने भरुन गेले.
हवा एकदम उत्साही वाटु लागली.खाली पाउस पडत होता. पाउस चालु असताना जवळ जवळ तासभर खाली काही दिसत नव्हते. पण पाउस संपल्यानन्तर सगळे कसे लख्ख दिसु लागले.
खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती.
खडकावरुन फ़ेसाळत खळाळणारा पाण्याचा शूभ्र प्रवाह...त्याभोवती गवताचे हिरवे गार मखमली पाचुचे मखर. मधेच दिसणारी लालसर काळी माती या सगळ्याला विसंगत छेद देणारा काळाशार डामरी राष्ट्रीय महामार्ग. अक्षरश: वेड लावणारे दृष्य होते ते. हिरव्या रंगाच्या अगणीत छटा कोणीतरी मनाला येईल तशा उधळल्या होत्या.एका रंगाच्या इतक्या छटा असतात हे प्रथमच पहात होतो.नुकत्याच फ़ुटु पहाणा-या कोवळ्या सोनेरी लालसर मखमली दुलई पासुन ते गाभुळल्या शेवाळी काळसर हिरव्यापर्यंत........दाट वाढलेल्या कुरणाच्या फ़िक्कट पोपटी छटेपासुन ते वा-यावर नाचत हिंदोळणा-या मोठ्या हत्ती गवताच्या पाचुच्या हिरव्या गालिच्या पर्यन्त हिरव्या रंगाच्या असतील नसतील तेव्हढया सगळ्या छटा उपस्थित होत्या.
पाउस झाल्यामुले माणसे खुशीत येत असतीलच पण ढगही खुशीत येतात. ते हलेके होतात. पुढील प्रवासासाठी हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे म्हणत एकमेकांत मिसळतात.शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे तसे काहिसे झाले.....आमच्या ढगात बरेचसे लहनमोठे ढ्ग मिसळले. आणि ढग वरवर जाउ लागला
आता बहुधा फ़ार संध्याकाळ झाली असावी.बाहेरे अंधारु लागले होते.हळु हळु ढगातही अंधारु लागले. खाली अंधार झाला होता. काहिच दिसेनासे झाले होते.
खाली दिसेनासे झाले म्हणुन की काय आकाशात एक चमत्कार होत होता. कोणितरी चिकटवावे तशा एकेक चांदण्या चमकु लागल्या. सप्तर्षी , व्याध , स्वाती , भूतप , कृत्तीका ,व्याध , रोहिणी , अश्लेशा, भरणी, ही सारी एकदम डोक्यावर चमकत होती. पूर्वेकडे वृस्चिकेत अनुराधा. ज्येष्ठा . मूळ नक्षत्रा सह दिमाखात उगवत होत्या. हे कमी होते म्हणुन की काय अगस्तीचा तारा दक्षीणेकडे लाल ,जांभळा रंग उधळत होता. मधुनच एखादा ईरिडियम उपग्रह चमकुन जात होता. मी ठरवुन टाकले पुढची कोजागिरी ढगातच साजरी करायची.
पौर्णीमेचा चंद्र दिसावा अशी मनोमन प्रार्थना करत होतो. पण नन्तर एकदम आठवले; प्रतिपदेला पौर्णीमेचा चन्द्र कसा दिसेल..
आता रात्र मध्यावर आली होती. सर्वत्र कसे शांत शांत होते . नाही म्हाणायला एखादा तारा तुटताना दिसत होता.माझ्या आजुबाजुचे सगळे गाढ झोपले होते. मध्यरात्र उलटुन रात्रीचा तिसराप्रहर सुरु होता.अधुन मधुन जाताना एखादा छोटा ढग फ़ारसा गाजावाजा न करता आम्हाला येउन मिळत होता. त्यानुसर आमचा ढग मोठामोठ होत होता. पूर्वेला शुक्र चमकयला लागला.त्य अंधारात शुक्र फ़ारच तेजाने तळपत होता. त्याचा प्रकाश इतका शीतल वाटत होता त्यामुळे सगळ्या ढगात नाईट लॆम्पमुळे यावा तसा एक निळसर प्रकाश सर्वत्र पसरला होता.
हळु हळु सगळे तारे अंधुक व्हायला लागले.पूर्वेला निळसर गुलाबी गुलालाची उधळण होऊ लागली.मी आत्तापर्यंत सूर्योदय फ़क्त डोंगराआडुनच होताना पाहिला होता.हा सूर्योदय अगदी क्षितीजावरुन होत होता.आकाश गुलाबी सोनेरी लालसर मोरपंखी अशा अनेक रंगानी भरुन गेले. आमचा ढग तर मिनिटामिनिटाला नवा रंग धारण करत होता.हळु हळु त्या प्रत्येक रंगात एक सोनेरी झाक डोकावु लागली. पूर्वेकडे साक्षात भगवान सहस्त्ररश्मी क्षितीजाआडुन डोकावु लागले.क्षितीजावरुन सूर्यास्त दिसतो जवळ जवळ तेवढाच सूर्योदय ही मनोहर दिसतो. किंबहुना त्यापेक्षा जास्तच. कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हळुहळु सगळ ढग लालसर सोनेरी प्रकाशाने न्हाउन निघाला. त्या प्रकाशात आम्ही सगळेच लालसर सोनेरी यक्ष दिसु लागलो. तेजपुंजाची झळाळी काय असते याचा आम्ही अनुभव घेत होतो.
मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय ते अनुभवत होतो.आता सगळ ढग सोनेरी झाला. पिवळा चश्मा न लावातादेखील ढगातले सगळे दिसु लागले हळु हळु प्रकाश जास्त जास्त तीव्र होऊ लागला. आणि प्रखर झाला.पूर्वेला बघवत नव्हते इतका म्हणजे वेल्डिंग करताना असतो त्या पेक्षाही प्रखर उजेड दिसु लागला. डोळे दीपु लागले.सूर्याची किरणे आता थेट डोळ्यावर येऊ लागली.
.....................बेडरूमच्या खिडकीतून येणारी सूर्यकिरणे थेट डोळ्यावर येत होती. त्याने मला जाग आली. रेडीओ वर गाणे लागले होते " येरे घना येरे घना.... न्हाऊ घाल माझ्या मना....."
छे: आजही तसेच. ऎन; पुन्हा.एकदा मी स्वप्नात तुला न भेटताच परत आलो. ही अशी स्वप्नांची समाप्ती नको वाटते. पण ते आपल्य हातात थोडेच असते.
.तुझ्या स्वप्नात यायला आता सर्व काळजी घेउन काही तरी नवा मार्ग शोधायला हवा.....
बघु. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास कसा पूर्ण करता येतोय ते.
तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर...... ..........
प्रतिक्रिया
12 Jun 2008 - 9:47 am | राजे (not verified)
नेहमी प्रमाणेच छान !!
पुरी येथे गेलात भगवान जगन्नाथाचे दर्शन तरी घ्यावयास हवे होते हो.....
बाकी तुम्हाला लहानपणापासून निसर्ग आवडतो असा माझा कयास आहे... नेहमी तुम्हाला पाऊस व पावसाळी वातावरण आवडत असावे.. तुमच्या लेखनी मध्ये हे आरामात लक्षात येते.. प्रवास असाच रंगत दार ठेवा.. व पुढील भाग लवकर येऊ देत.
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
12 Jun 2008 - 9:59 am | अमोल केळकर
मस्त वर्णन
आपल्या पुढील सर्व प्रवासास हार्दीक शुभेच्छा
12 Jun 2008 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेघदुत ची आठवण झाली. :)
ढगातला प्रवास आवडला, आकाशात जेव्हा केव्हा ढगांचा प्रवास पाहात राहू आपल्या लेखाची आठवण होत राहील.
ढगांच्या खिडकीतून खाली डोकावल्यावर काय काय दिसले वाचायला मजा आली.
''आकारमानाप्रमाणे आणि प्रदेशानुसार गारांचे वर्गिकरण करुन ठेवले होते.त्या एका चाळणीमधुन खाली टाकण्यात येणार होत्या. पाण्याने भरलेले छोटे ढगांचे तुकडे रचुन ठेवले होते.पाउस पडण्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी म्हणुन ढगातील स्पीकर चालु केले होते.''
हाहाहाहा हे लै भारी !!!
बाकी 'ऐन' ला भेटल्याशिवाय आपला प्रवास थांबवूच नका आणि ती इतक्या सहजा सहजी भेटता कामा नये !!!
12 Jun 2008 - 10:49 am | मनस्वी
वा व्हिक्टर
छान कल्पना.
हाही ढगप्रवास आवडला.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
12 Jun 2008 - 11:52 am | झकासराव
झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. >>>
ही तुमची वर्णन करण्याची शैली मला आमचा नववी कि दहावीतील धडा आठवुन देते.
त्यात विठ्ठल गाडगीळ (चु भु दे घे) यानी त्यांच्या केरळ प्रवासाचे वर्णन केले होते. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
12 Jun 2008 - 4:13 pm | अभिरत भिरभि-या
अक्शी खरे ...
नववी तल्या या धड्यात नारळीच्या बागांचे असे काही वर्णन दिले आहे की बास ..
बाकी ते वर्णन खोटे वाटावे अशी सध्या केरळची अवस्था आहे.
12 Jun 2008 - 12:00 pm | भाग्यश्री
मला हा भाग खूप आवडला!! फार सुंदर वर्णन...!
http://bhagyashreee.blogspot.com/
12 Jun 2008 - 12:36 pm | मदनबाण
व्हिक्टरभाऊ मस्तच...
कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती.
हे फार आवडल..
(स्वप्नाळु)
मदनबाण.....
12 Jun 2008 - 2:03 pm | स्वाती राजेश
मस्त लेख....
पारले मोनॅकोच्या ऍडचे वर्णन आवडले....:)
फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते.
बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो...:)
अजुनी तिला भेटला नाहीत याचे जास्त वाईट वाटले...:)
13 Jun 2008 - 1:42 am | इनोबा म्हणे
फ़क्त शिवाजी महाराज, जंगलात गुहेत रहाणारा सिंह, पालथा झोपलेला सैनिक आणि सलाईनच्या बाटलीचे कारंजे असते तर फ़टाके न उडवतादेखील दिवाळी केल्यासारखे वाटले असते.
बाळापण आठवले...आम्हीपण सलाईनचा वापरकरून कारंजा करत होतो...
हेच म्हणतो विजुभाऊ...मस्तच
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
12 Jun 2008 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते
हवाई प्रवासाच्या नियमा नुसार ढगात ;हलकी असतात म्हणुन फ़क्त मोनॅको बिस्कीटे विकायला परवानगी होती.
शाळा सुटल्यावर लहान मुलानी जल्लोश करत घरी जाण्यासाठी वर्गातुन मैदानात धाव घ्यावी. त्यांची एकच सरमिसळ व्हावी आणि त्या गर्दीला "उत्साह" एवढेच रूप मिळावे
जमलाय लेख. तुमच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे.
बाकी ढगांपासून प्रेरणा घेऊन एवढे लिखाण करणारे कालिदासानंतर बहुतेक तुम्हीच. :D :D
बिपिन.
12 Jun 2008 - 4:28 pm | पद्मश्री चित्रे
कमाल आहे तुमच्या कल्पना शक्तीची..
मानलं तुम्हाला...
12 Jun 2008 - 5:36 pm | शितल
पेस्तनकाकांचा आवाज या वेळेस स्पष्ट आला. मी वर पाहिले.....पहातो तो काय. पेस्तनकाका हवेत तरंगत होते.त्यानी मोनॅको बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्यामुळे ते फ़ारच हलके होऊन हवेत तरंगत होते.
हा हा हा ...
खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती.
खुप सु॑दर वर्णन.
हळु हळु सगळे तारे अंधुक व्हायला लागले.पूर्वेला निळसर गुलाबी गुलालाची उधळण होऊ लागली.मी आत्तापर्यंत सूर्योदय फ़क्त डोंगराआडुनच होताना पाहिला होता.हा सूर्योदय अगदी क्षितीजावरुन होत होता.आकाश गुलाबी सोनेरी लालसर मोरपंखी अशा अनेक रंगानी भरुन गेले. आमचा ढग तर मिनिटामिनिटाला नवा रंग धारण करत होता.हळु हळु त्या प्रत्येक रंगात एक सोनेरी झाक डोकावु लागली. पूर्वेकडे साक्षात भगवान सहस्त्ररश्मी क्षितीजाआडुन डोकावु लागले.क्षितीजावरुन सूर्यास्त दिसतो जवळ जवळ तेवढाच सूर्योदय ही मनोहर दिसतो. किंबहुना त्यापेक्षा जास्तच. कोणाही मर्त्य मानावाला जमणार नाही अशी रंगांचे ही स्वर्गीय उधळण ढगात सुरु झाली होती. हळुहळु सगळ ढग लालसर सोनेरी प्रकाशाने न्हाउन निघाला. त्या प्रकाशात आम्ही सगळेच लालसर सोनेरी यक्ष दिसु लागलो. तेजपुंजाची झळाळी काय असते याचा आम्ही अनुभव घेत होतो.
निसर्ग सौद॑र्याची उधलण छान केली आहे स्वप्नात. तुम्ही आम्हाला ही स्वप्नात पाठवलेत.
12 Jun 2008 - 10:42 pm | वरदा
म्हणते तस्सच माझी प्रतिक्रीया देऊन टाकली तिने...
तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम! सिंपली ग्रेट!!!
12 Jun 2008 - 10:49 pm | छोटा डॉन
स्वप्नप्रवास नेहमीप्रमाणे मजेशीर झाला ...
शितलला ज्या वाक्यांवर हसु आले तेथेच मला पण हसु आले तेव्हा पुन्हा स्मायली टाकण्यात अर्थ नाही ...
प्रवास नंतर लवकर संपवू नये ...
[ तसे मनात असल्यास आम्हाला वेगळी व्यवस्था करावी लागेल, च्यायला ढगांचे "ट्रॅफीक जाम" करुन टाकतो एकदम बेंगलोर श्टाईल, मग बसा वर्णन करत ....]
अवांतर : विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ???
छोटा व्हिक्टर डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
13 Jun 2008 - 11:29 am | विजुभाऊ
विजूभौ व्हीक्टर ममधले "व्हीक्टर" काय आहे ???
ऍन मला विजुभाऊ न म्हणता व्हिक्टर या समानार्थी नावाने हाक मारते / ओळखते.
( मैत्रिणीने भाऊ म्हणुन संबोधणे .. :SS .ह्रदयाला काय वेदना होतात हे तुम्हाला काय ठाउक. तुम्हाला तुमची मैत्रीण डॉनुड्या शोनुड्या म्हणत असेल हो.....आमच्या नशीबी नेहमी सालं "भाऊ"च. माझे नाव मी बदलुन विजु"बबड्या" असंच ठेवतो आता )
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
13 Jun 2008 - 8:11 am | यशोधरा
मस्त!! मोनॅकोची जाहिरात सहीच!!
15 Jun 2008 - 7:27 pm | बकुळफुले
छे: आजही तसेच. ऎन; पुन्हा.एकदा मी स्वप्नात तुला न भेटताच परत आलो. ही अशी स्वप्नांची समाप्ती नको वाटते. पण ते आपल्य हातात थोडेच असते.
विजुभौ गटणे मामा म्हणतो की ऍनने तुम्हाला नकार दिला म्हणुन.......=))
पण लगे रहो....एक ना एक दिवस तुमची स्वप्ने खरी होतील...
तुम्हाला ऍन वास्तवात ही भेटावी ...ही सदीच्छा
15 Jun 2008 - 7:42 pm | सखाराम_गटणे™
खास जेलो ला पाठवले आहे ना. ती आमच्या ग्रुप ची आवडती हेरोईन. तीचे लग्न झाले तेव्हा आम्ही शोकसभा वैगरे घेतली.
विजुभाउ थोडे समजुन घ्या. 'कहानी मे टिवस्ट' :)
19 Jun 2008 - 6:54 pm | प्रभाकर पेठकर
खाली तिष्ता नदी आता दुथडीभरुन वहात होती.झाडे कशी लहान मुलाला आईने आंघोळ घालावी तशी दिसत होती. जंगलातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गामुळे खाली दाट केसातुन भांग पाडावे तसे दिसत होते. दगडावरुन पडणारे नदीचे पाणी पाहुन मला कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओलेत्या ललनेच्या शुभ्र वस्त्राप्रमाणे दिसणारे नदीचे पाणी ही उपमा आठवली. खरेच कालिदासानेही असाच ढगातुन कधितरी प्रवास केला असावा त्याशिवाय त्याला ही उपमा सूचली नसती.
खडकावरुन फ़ेसाळत खळाळणारा पाण्याचा शूभ्र प्रवाह...त्याभोवती गवताचे हिरवे गार मखमली पाचुचे मखर. मधेच दिसणारी लालसर काळी माती या सगळ्याला विसंगत छेद देणारा काळाशार डामरी राष्ट्रीय महामार्ग. अक्षरश: वेड लावणारे दृष्य होते ते. हिरव्या रंगाच्या अगणीत छटा कोणीतरी मनाला येईल तशा उधळल्या होत्या.एका रंगाच्या इतक्या छटा असतात हे प्रथमच पहात होतो.नुकत्याच फ़ुटु पहाणा-या कोवळ्या सोनेरी लालसर मखमली दुलई पासुन ते गाभुळल्या शेवाळी काळसर हिरव्यापर्यंत........दाट वाढलेल्या कुरणाच्या फ़िक्कट पोपटी छटेपासुन ते वा-यावर नाचत हिंदोळणा-या मोठ्या हत्ती गवताच्या पाचुच्या हिरव्या गालिच्या पर्यन्त हिरव्या रंगाच्या असतील नसतील तेव्हढया सगळ्या छटा उपस्थित होत्या.
सुंदर वर्णन. आवडले.
अभिनंदन.