INDIA UNBOUND

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
25 Feb 2012 - 1:11 pm

इतिहास आपण सगळेच शिकतो. इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो. त्यामुळे इतिहासावरून एक सामान्य माणूस म्हणून काय शिकायचे असाच प्रश्न पडतो. संपूर्ण शाळेत आणि इतर अवांतर वाचनात भारताचा इतिहास मी वाचला. एक निसर्गसंपन्न, संस्कृतीचे पाळणाघर असलेला आणि तत्त्वज्ञानाचा गाभारा असलेला देश म्हणून भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचा उदोउदो वाचला, इंग्रजांची तथाकथित जुलमी राजवट आणि त्याविरुद्ध दिलेला तेजस्वी लढा, मोठमोठे तत्त्वनिष्ठ नेते आणि क्रांतिकारक यांचे बलिदान हे सगळं वाचलं. पण का कोण जाणे ते कधीच मला भिडलं नाही. कारण त्यात एका सामान्य माणसाच्या आयुष्याचा काहीच संदर्भ नव्हता. "इंग्रजांविरुद्ध सगळा देश पेटून उठला" अशी वाक्ये इतिहासाच्या पुस्तकात वाचून आश्चर्य वाटायचं. तीस-चाळीस कोटी लोक पेटून उठले तरी मूठभर इंग्रज एका झटक्यात नष्ट कसे झाले नाहीत असा प्रश्न पडायचा. एकूणच इतिहास म्हणजे त्रयस्थांची कहाणी असल्याप्रमाणे वाचला. त्याचा उपयोग ना वर्तमान समजायला झाला ना भविष्य. "इतिहास तुम्हाला भविष्यासकट सगळं शिकवतो" हे एक फक्त टाळीखेचक वाक्य असावं असं वाटत होतं.

एका रात्री मित्राकडे गप्पा-टप्पा करता करता पुस्तकांचा विषय निघाला आणि त्याने मोठ्या हौसेने आपलं पुस्तकांचं शेल्फ "वत्सा, तुजप्रत कल्याण असो" च्या अविर्भावात उघडून दाखवलं. इतर अनेक रोचक पुस्तकांमध्ये नाशिकच्या गणेश बँडचा निळा दरवाजा आणि शेजारीच कोकाकोलाची लाल पाटी असं मुखपृष्ठ असलेल्या एका पुस्तकाने माझं लक्ष वेधून घेतलं. नाव होतं "INDIA UNBOUND: From Independence To The Global Information Age".
इंडिया शायनिंगच्या जमान्यात मला बर्‍याच वेळा प्रश्न पडायचा की उज्ज्वल भूतकाळाच्या तुलनेत स्वातंत्र्यानंतरचा इतिहास कसा असेल? इंग्रज वा इतर कोणीही परकीय शत्रू नसताना केवळ चीन-पाकिस्तानची दोन-तीन युद्धे आणि आणिबाणीसारख्या राजकीय घटना एवढाच इतिहास असेल?
पुस्तक पुढून मागून पाहिलं. अमर्त्य सेन आणि नारायण मूर्तींसारख्या दिग्गजांचे गौरवोद्गार लिहीलेले वाचून पुस्तकाबद्दल चांगलं मत झालं आणि ते पुस्तक मी मित्राकडून मागून घेतलं. त्या दिवसानंतर तीन-चार दिवसात ते पुस्तक वाचताना अध्यात्मात आत्मज्ञान मिळाल्यावर जो आनंद होत असेल तो आनंद मला मिळाला.

स्वतः एका मध्यमवर्गीय घरातून आलेले आणि प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बल कंपनीचे ग्लोबल एमडी म्हणून काम केलेले, नावाजलेले लेखक आणि विचारवंत श्री. गुरचरण दास यांनी हे अप्रतिम पुस्तक लिहीले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतो,"I have followed, I find, the method of Defoe's Memoirs of a Cavalier, in which the author hangs the chronicle of great political and social events upon the thread of an individual's personal eperience"
आणि मग सुरु होतो एकाहून एक सुरस गोष्टींचा आणि अनुभवांचा एक कथाप्रवास. पुस्तकाचे तीन भाग आहेत आणि प्रत्येक भागात साध्या साध्या घटनांतून लेखकाने टिपलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल चपखलपणे आणि रंजकतेने उलगडत जातात.

आमच्या स्वप्नांचा निर्झर (Our Spring of Hope (1942-1965))

१९४२ ते १९६५ चा अनेक उतारचढावांचा कालखंड या भागात येतो. फाळणीचे दु:ख सहन करूनही स्वातंत्र्याने सगळ्या भारतीयांच्या मनात नव्या स्वप्नांच्या झर्‍याला उगम दिला. नेहरूंवर असलेल्या फॅबिअन विचारसरणीच्या प्रभावामुळे लोकशाही समाजवाद भारताने स्वीकारला आणि सर्वकल्याणकारी सरकारयंत्रणेच्या उभारणीला सुरुवात झाली. या उभारणीचे उद्बोधक तपशील पुस्तकात रंजकपणे मांडले आहेतच शिवाय, अठराव्या शतकापर्यंत श्रीमंत असलेला आपला देश गरीब का झाला? कापडाच्या उत्पादनात आघाडीवर असलेला भारत एकदम तळाला का गेला? इंग्रजांनी रेल्वेचं इतकं मोठं जाळं उभारूनही आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही भारतात औद्योगिक क्रांती का नाही झाली? याचाही उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय राज्यकर्त्यांची परकीय सत्तेची भीती, व्यापार्‍यांवरचा अविश्वास आणि स्वप्नाळू वृत्ती यातून बनलेली लोकशाही आणि समाजवाद यांचं स्वप्नवत मिश्रण असलेली अर्थव्यवस्था अपयशी का झाली? नेहरू आणि समकालीनांचे "सरकारप्रणित औद्योगिक क्रांती"चे स्वप्न का भंगले? नेहरूंच्या स्वप्नातली पोलादी चौकट असलेली नोकरशाही प्रत्यक्षात कशी निघाली? दुसर्‍या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करणारे संख्याशास्त्री, नेहरूंच्या मर्जीतल्या लोकांची सरकारात वर्णी या सगळ्यात इतर पर्याय मांडणार्‍यांकडे दुर्लक्ष कसे झाले? शेतीकडे अक्षम्य दुर्लक्ष का केले गेले?
इंग्रज सोडून गेल्यावर काळ्या बाबूंनी त्यांची जागा कशी घेतली? संस्कृत पठणार्‍या आणि इंग्रजी घोकणार्‍या उच्चवर्णीय मध्यमवर्गाचा उदय कसा झाला? ब्राह्मणी वर्चस्व असलेल्या जातीव्यवस्थेमुळे व्यापार्‍यांना प्रतिष्ठा मिळाली नाही. मंत्र पठणाला आणि अ‍ॅबस्ट्रॅक्ट विचार करण्याला प्रतिष्ठा असल्याने भारतीयांनी कधीच हाताने काम करणे, अंगमेहनत करणे चांगले मानले नाही वगैरे अनेक सुरस गोष्टींचा उहापोह या भागात आहे.
लेखकाने आपल्या आणि अपल्या कुटुंबीयांच्या अनुभवांवरून सरकारी यंत्रणेतला ब्रिटीश काळातला कर्तव्यकठोरपणा जाऊन त्याची जागा भ्रष्टाचार, चलता है वृत्ती आणि कामगार संघटनांची शिरजोरी यांनी कशी घेतली याचे अगदी मार्मिक वर्णन केले आहे.
वानगीदाखल पुस्तकात आलेले दोन किस्से सांगतो.
पहिला विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा. मारवाडी लोकांच्या व्यवसायप्राविण्याचा. चांदी आणि अफूच्या व्यवहारात जमवलेला पैसा जीडी बिर्लांना कलकत्त्यात तागाच्या धंद्यात लावायचा होता पण तागाच्या धंद्यात तेव्हा स्कॉटिश लोकांचा एकाधिकार आणि नियंत्रण होतं. तरीही जीडी बिर्लांनी या स्कॉटिश कंपन्यांचा विरोध पत्करूनही आपला कारखाना टाकला. अवघड परिस्थितीमुळे तो डबघाईला आला यात काहीच नवल नाही आणि मग शेवटी जीडींना त्यांना विरोध करणार्‍या स्कॉटिश लोकांकडेच तो विकण्यासाठी जावे लागले. करखाना विकत घेण्याची बोलणी करताना स्कॉटिश मॅनेजरने "तुझी हा कारखाना काढण्याची हिंमतच कशी झाली?" असं विचारलं. दुखावलेल्या जीडींनी त्याक्षणी कारखाना विकण्याची ऑफर गुंडाळली आणि काहीही झालं तरी ही एकाधिकारशाही मोडायची प्रतिज्ञा केली. थोड्याच वर्षात ज्या कंपनीकडे आपला कारखाना विकायची वेळ आली होती, तीच कंपनी जीडी बिर्लांनी विकत घेतली.
(हेच ते जीडी बिर्ला ज्यांनी गांधींना स्वदेशी कापडच पाहिजे तर चरखा चालवण्याऐवजी स्वदेशी कारखाने काढावे असं सुचवलं होतं पण तंत्रज्ञान, घाऊक उत्पादन आणि नफा कमावणे हे गांधीजींच्या तत्त्वांविरुद्ध असल्याने त्यांनी त्यास नकार दिला होता.)

दुसरा प्रसंग स्वातंत्र्यानंतरचा. जेव्हा लेखक हार्वर्डला शिकत होते, तेव्हा "Government 180" या कोर्ससाठी त्यांना शिकवायला त्याकाळी अगदीच अप्रसिद्ध असलेले हेन्री किसिंजर होते. हेन्री किसिंजर यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सर्व देशांनी नीतिमत्तेला महत्त्व न देता फक्त स्वहितालाच महत्त्व दिले पाहिजे कारण त्यामुळे सगळ्या देशांच्या हेतूंचा अंदाज लावून त्यांच्या हालचालींचे भाकित करणे सोपे जाते आणि सत्तेचा समतोल राखण्यास मदत होते. यामुळेच अखेर शांतता प्रस्थापित होते. एका अध्यापनात त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध कसे ठेवू नये यासाठी नेहरूंचे उदाहरण दिलं आणि नेहरूंनी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये नीतिमत्तेचं एक धोकादायक रसायन टोचलं आहे असंही सांगितलं. शिवाय कोणालाही नीतिमत्तेवरून प्रवचन ऐकायला आवडत नाही अशीही टिप्पणी केली. हेच हेन्री किसिंजर पुढे "Secretary of State" झाले आणि त्यांनी निक्सनच्या काळात अमेरिकन सरकारचे धोरण पाकिस्तानच्या बाजूने झुकवले.

नेहरूंनंतर केवळ १९ महिने पंतप्रधान असलेल्या शास्त्रींनी हरितक्रांतीचा पाया कसा रचला आणि त्यापुर्वी लिंडन जॉन्सनच्या काळात भारताचे अमेरिकेतले राजदूत श्री. बी.के. नेहरू यांची अवस्था डोकं कापलेल्या कोंबडीसारखी का झाली होती हे मुळातूनच वाचलं पाहिजे.
नेहरूंनी ज्या समाजवादी सरकारचं स्वप्न पाहिलं होतं आणि नोकरशाहीची जी पोलादी चौकट आपल्या देशाला मजबूत करेल असं वाटलं होतं, ती चौकट झपाट्याने गंजू लागली होती. संघटित क्षेत्रातल्या कामगारांपैकी बहुसंख्य कामगार सरकारी नोकरीत किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीत काम करत होते (अजूनही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही.) जेआरडी टाटांनी या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या अकार्यक्षमतेकडे नेहरूंचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर लाखो लोकांच्या हृदयातून वाहू लागलेल्या स्वप्नांच्या झर्‍याचं पुढे काय झालं?

एक वाया गेलेली पिढी (The Lost Generation (1965-1991))

नेहरू आणि शास्त्रींनंतर काँग्रेस पक्षातल्या हाणामारीतून इंदिरा गांधींचे नाव पुढे आले आणि बरीच भवति न भवति होऊन त्या पंतप्रधान झाल्या. भारताच्या स्वतंत्र आयुष्यातलं एक वेगळंच युग सुरु झालं. नेहरूंच्या तत्त्वनिष्ठेकडून त्यांच्याच तत्त्वांचा दुरुपयोग करण्याकडे आणि प्रसंगी ती तत्त्वे सोयीस्करपणे सोडून देण्याकडे एक तत्त्वशून्य प्रवास सुरु झाला.
या काळात भारताचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अधःपतन कसं होत गेलं याचा वेदनादायक आलेख पुस्तकाच्या या भागात मांडला आहे.
उदाहरण म्हणून एक किस्सा पुरेसा आहे.
साल १९७१. बंगालातल्या हल्दिया प्रांतात हिंदुस्थान फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीचा एक खत कारखाना उभारण्याचे काम सुरु झाले. कर्मचार्‍यांसाठी निवास व्यवस्था, दवाखाने, रस्ते, शाळा आणि इतर गरजेच्या सुखसोयी निर्माण करायला सुरुवात झाली. १९७६ साली सुरु होण्याची अपेक्षा असलेल्या या कारखान्याच्या उभारणीचे काम १९७९ साली वाढीव खर्च करून एकदाचे संपले. पण तोपर्यंत हा कारखाना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार नाही असे लक्षात आले. पण समाजवादी सरकार असताना कामावर घेतलेल्या लोकांना कमी कसे करणार? १९७९ नंतर २३ वर्षे हा कारखाना चालूच रहिला. लोक कामावर येत राहिले, त्यांना पगार मिळत राहिला, ते निवृत्त होत राहिले, यंत्रसामुग्रीची नियमित दुरुस्ती आणि देखभाल होत राहिली आणि ती टाऊनशिपही गजबजलेली राहिली फक्त एक गोष्ट झाली नाही आणि ती म्हणजे उत्पादन. २३ वर्षात या कारखान्याने एक किलोसुद्धा खत तयार केले नाही. (पंधराशे कोटी रुपयांचा फुकटचा खर्च सोसून आणि पंधराशे लोकांना काहीही काम न करता पगार आणि सुखसोयी देऊन हा कारखाना शेवटी २००२ मध्ये बंद करण्यात आला.)
संधीसाधू समाजवाद आणि खाजगी उद्योगांवर सरकारचे गुदमरवणारे नियंत्रण याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भारतात औद्योगिक उत्पादनवाढीचा दर जेमतेम ३-४ टक्क्यांवर आला आणि लोकसंख्या मात्र २ टक्क्यापेक्षा जास्त वेगाने वाढत होती. ८९% आयकर आणि MRTP सारखे कायदे यांचे फटके टाटांसारख्या मोठ्या उद्योजकांनाही सोसावे लागले. राजकीयच काय सगळ्याच पातळ्यांवर भ्रष्टाचार अनिर्बंध झाला आणि जिने लोककल्याणकारक असणे अपेक्षित होते ती सरकारी यंत्रणा स्वहितरक्षक आणि जनहितभक्षक राक्षस बनली. तोंडाने "गरिबी हटाव"ची घोषणा देणार्‍या सरकारने प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील याची पुरेपूर काळजी घेतली. शिवाय आणिबाणी सारख्या प्रसंगांना तोंड देऊन भारतीय लोकशाही एका प्राणविरहित बुजगावण्यासारखी शोभेची वस्तू बनली.
या सगळ्याचे विदारक वर्णन या भागात लेखकाने केलं आहे. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींच्या काळात परिस्थिती थोडी सुधारली आणि राजीव गांधींनी सॅम पित्रोदांना दिलेल्या पाठिंब्यामुळे भारतात टेलिकॉम क्रांती झाली. तरीही भारताची आर्थिक स्थिती खालावतच गेली. सरकारी योजनांमधला राक्षसी भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशाची अमाप लूट यातून वित्तीय तूट वाढत गेली. स्वतःची क्षमता कधीच न वाढवल्यामुळे आयात वाढतच गेली आणि १९९१ मध्ये एक वेळ अशी आली की केवळ आठवडाभर पुरेल इतकीच परकीय चलनाची गंगाजळी सरकारच्या खजिन्यात शिल्लक उरली. पण म्हणतात ना, पहाट होण्यापुर्वीच रात्र सगळ्यात जास्त अंधारी असते.

स्वप्नांचा पुनर्जन्म (The Rebirth of Dreams (1991-2000))

१९९१ च्या उन्हाळ्यात जेव्हा भारताच्या तिजोरीत खडखडाट झाला तेव्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाऊन भीक मागण्याचा नेहमीचा पर्याय उपलब्ध होताच. पण कोणताही निर्णय न घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान श्री. पी.व्ही. नरसिंहराव आणि त्यांचे, राजकारणाचा यत्किंचितही अनुभव नसलेले अर्थमंत्री, श्री. मनमोहन सिंग यांनी एका दिवशी गुपचूप क्रांती घडवली. पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव सरकारने २१ जूनला सरकार स्थापन झाल्यापासून फक्त एका महिन्यात म्हणजे २४ जुलै १९९१ ला जे क्रांतीकारी औद्योगिक धोरण जाहीर केले त्याने एका फटक्यात कोट्यवधी गरिबांचा समृद्धीकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला. जाचक आयात नियंत्रण रद्द केले गेले, १६ मुख्य क्षेत्रे सोडून बाकी सगळी क्षेत्रे परवानामुक्त केली गेली, रुपयाचे अवमूल्यन केले गेले आणि बरीच क्षेत्रे परकीय गुंतवणुकीसाठी मोकळी करण्यात आली.
यामागे घडलेले रामायण आणि नरसिंहराव, मनमोहनसिंग, चिदंबरम आणि सचिव ए.एन.वर्मा या चौकडीने खेळलेला एक धाडसी डाव याचं रोमहर्षक वर्णन एखाद्या युद्धकथेपेक्षा कमी रम्य नाही. १९९१ मध्ये १.५ कोटी डॉलर्स असलेला परकीय चलनसाठा १९९७ पर्यंत ३०० कोटी डॉलर्सवर पोचला. भारताच्या सामान्य जनतेला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ साली नव्हे तर २४ जुलै १९९१ साली मिळाले असेच म्हणावे लागेल इतका फरक केवळ दहा वर्षात पडला.
त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने जो वेग पकडला तो सर्वज्ञातच आहे.
एक उदाहरण. १९९९ मध्ये बंगळुरुस्थित आर्मेडिया नावाची IC डिझाईन करणारी कंपनी अमेरिकेतील ब्रॉडकॉम कॉर्पोरेशनने तब्बल ६.७ कोटी अमेरिकन डॉलर्सना विकत घेतली. या कंपनीचे उद्गाते श्री. दवे हे एक सामान्य मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेले इंजिनिअर होते. इंटेलमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांनी ही स्वतःची कंपनी काढली आणि डिजिटल टीव्हीसाठी लागणारी डिकोडर चिप विकसित केली. १९९१ पुर्वी एका साध्या इंजिनिअरने कंपनी चालू करणे आणि ती परकीय कंपनीला विकणे ही स्वप्नातही करण्यासारखी गोष्ट नव्हती, पण केवळ आठ वर्षात एका इंजिनिअरने स्वतःसकट त्याच्या कंपनीत काम करणार्‍या चाळीस लोकांना करोडपती बनवले.
थोडक्यात, भारतीयांनी औद्योगिक क्रांती चुकवून थेट माहितीतंत्रज्ञान क्रांतीत झेप घेतली. अमूर्त विचार करण्यात पटाईत असलेल्या भारतीयांना कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये चांगलाच सूर गवसला आणि बघताबघता अमेरिकेच्या सिलिकॉनव्हॅलीमध्ये भारतीय नवउद्योजकांनी दबदबा निर्माण केला. भारतात "नवा पैसा" खेळू लागला आणि नवा, आधीच्या 'सुसंस्कृत' मध्यमवर्गीयांना उथळ वाटेल असा पण व्यवहारी आणि लोकांची पर्वा न करता स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणारा मध्यमवर्ग देशात तयार झाला.

या तिन्ही भागात हे सगळे बदल टिपताना लेखकाने आपल्या आयुष्यातल्या साध्या-साध्या घटनांचा आधार घेतला आहे. लाहोरमधलं त्यांचं घर आणि फाळणीपुर्वीची स्थिती, फाळणीच्या काळातलं त्यांचं स्थलांतर, इंग्रज गेल्याबद्दल दु:ख व्यक्त करणारे त्यांचे आजोबा, टीसीला लाच घेताना पकडणारे आणि त्याचीच माफी मागण्यासाठीचा युनियनचा दबाव झुगारणारे त्यांचे काका, मुंबईतलं त्यांचं विक्स-वेपोरबचं ऑफिस, तिथला कांबळे शिपाई, त्यांचा मध्यप्रदेशातला डिस्ट्रिब्युटर, गुजरातमध्ये त्यांना विक्सवेपोरबचा नवाच उपयोग शिकवणारी गृहिणी, आर्थिक सुधारणा झाल्यानंतर तामिळनाडूत चहाच्या ठेल्यावर भेटलेला आणि 'बिल्गे' व्हायचं स्वप्न पाहणारा राजू या आणि अशा अनेक सामान्य माणसांच्या छोट्या-छोट्या, हृद्य प्रसंगांतून त्यांनी त्या-त्या काळाचा चित्रपट इतक्या मनोवेधक पद्धतीने फिरवला आहे की वाचताना वाचकाला त्या त्या काळात जाऊन आल्याचा भास व्हावा.
२००० साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात त्यांनी वाचकांच्या आग्रहापोटी २००६ साली एक उपसंहार जोडला. त्यात वर्तमानकाळाचा वेध घेताना त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत आणि आजची परिस्थिती पाहता ते मुद्दे किती समर्पक आहेत याची प्रचिती येते.
उपसंहारात भारताच्या प्रगतीचे कौतुक करतानाच ते भारताच्या वाढत्या तुटीकडे लक्ष वेधतात, परवाना-राज संपले असले तरी निरीक्षक-राज (Inspector-Raj) संपलेले नाही, अजूनही वाजवीपेक्षा कडक असलेले कामगार कायदे, पुन्हा एकदा गरिबांच्या नावाखाली काँग्रेसपक्षाचे स्वतःच अंमलात आणलेल्या सुधारणांना खीळ घालण्याचे उद्योग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्जेदार शिक्षणाकडे होत असलेली अक्षम्य हेळसांड याबद्दल चिंता व्यक्त करतात.

पुढे काय?
पुस्तकात उपसंहार लिहील्यालाही पाच वर्षे उलटून गेली आहेत. आज परिस्थिती काय आहे? हे पुस्तक वाचल्यानंतर कोणाही माणसाला परिस्थितीचे मूल्यमापन कसे करावे हे समजण्यास हरकत नाही. त्याप्रमाणे आपण आजूबाजूला पाहिलं तर काय दिसतं?
जगाची परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. अमेरिका आणि युरोपातले श्रीमंत देश अडचणीत आहेत आणि आशियातल्या देशांना पुन्हा समृद्धी मिळवण्याची संधी चालून आली आहे. त्याचवेळी भारतात काय परिस्थिती दिसते? वित्तीय तूट वाढत चालली आहे. कर्ज उत्पन्नाच्या ६०%पेक्षा जास्त झाल्याने मूलभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे सरकारला जमत नाहीये. त्याच वेळी महसुली उत्पन्नाच्या बाबतीत गोंधळ चालू असल्याने कित्येक करविषयक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. अजूनही परकीयांच्या भयगंड बाळगणारी आणि गरीबांचा खोटा पुळका असणारी माणसं परकीय गुंतवणुकीला विरोध करत आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीत कोणतेही विशेष असे धोरण राबवले गेले नाहीय. महाराष्ट्रातली पटपडताळणी या क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्दल पुरेसे भाष्य करणारे उदाहरण ठरावे. अजूनही सरकारी क्षेत्रातल्या कंपन्या आणि खुद्द सरकारी कर्मचारी स्वहित जपण्यात मश्गुल आहेत, छद्मी समाजवादी प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढत आहेत आणि सरकारला धोरण लकवा झाला आहे.
एक उदाहरण. ऑगस्ट २०११ मध्ये एक बातमी छापून आली होती. HFCL चा हल्दियातला खतकारखाना पुन्हा सुरु करण्याचे काँग्रेस सरकारने ठरवले आहे. त्या आणि बंद पडलेल्या इतर काही खतकारखान्याना पुन्हा सुरु करण्यासाठी एकूण मिळून दहाहजार कोटी रुपये गुंतवण्याचे सरकारने ठरवले आहे.
अशी आव्हानात्मक परिस्थिती असली तरी दुसर्‍या बाजूला भारतीय खाजगी क्षेत्रातले उद्योग वैश्विक भरार्‍या मारत आहेत आणि परकीय उद्योगांनाही भारतात गुंतवणूक करायची आहे. भारतातली बाजारपेठ आणि स्वस्त मनुष्यबळ जगभरातल्या कंपन्यांना अजूनही भुरळ घालते आहे.
सरकारने योग्यवेळीच काही कटू पण आवश्यक निर्णय घेतले नाहीत, नोकरशाहीतला आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार निपटण्यासाठी लोकांनी काही केलं नाही तर पुन्हा सुवर्णयुगात पोचण्याची भारताची ही संधी साधली जाईलच याची खात्री नाही. प्रत्येक भारतीयाचे भविष्य त्याच्या या महाकाय देशाशी निगडीत आहे. भविष्याची काळजी असलेल्या प्रत्येक भारतीयाने आपला इतिहास आणि वर्तमान दाखवणारे हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.
झुलत झुलत चालणारा हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा हत्ती वेळेवर तलावावर पोचणार की आपल्याच विविध गंडांच्या साखळ्यांनी बांधला जाऊन त्याचं समृद्धीचं स्वप्न विरून जाणार हे भारतीयांनीच ठरवायचं आहे.

INDIA UNBOUND: From Independence To Global Information Age
लेखकः गुरचरण दास
प्रकाशकः Penguin Books
पाने:४१९

इतिहाससमाजअर्थकारणराजकारणशिक्षणमाहिती

प्रतिक्रिया

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Feb 2012 - 1:59 pm | चेतनकुलकर्णी_85

मस्त पुस्तक दिसत आहे... :)
पण ह्यात फाळणी आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचा उल्लेख मात्र कुठेच दिसत नाही आहे...!!
असो ..हिंदुस्तानातील सोन्याचा निघणारा धूर आटण्याची काही करणे अशी सांगता येतील

१.हिंदुस्तांतील अनेक ग्रंथालयांची जाळपोळ परदेशी विशेषतः अफगाणी टोळ्या ....ज्यात अनेक बहुमूल्य तांत्रिक साहित्य नष्ट झाले जे आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले होते...
२.मुघली आक्रमण आणि हिंदुस्तानातील राजांची दुफळी...
३.भारत पाक फाळणी ज्याने आपल्याला कायमस्वरूपी yz शत्रू दिला..
४.१९४७ साला नंतर १० वर्षे असलेले अत्यंत मवाळ व बाळबोध सरकार..5.तथाकथित धर्म-निर्पेक्ष्य लोकशाही संसदीय पद्धती ...
५ .मुस्लिमांचे लांगुलचालन ...
६.जातीवर आधारित आरक्ष्यान..जे आता मत मिळवण्याचे साधन बनले आहे...
७.हिजडे भारतीय सरकार (आत्ता पर्यंत आलेली सर्व)
८.शिक्षण पद्धती ..मुलांचा शुद्ध विज्ञानावर असलेले दुर्लक्ष्य व MBA सारख्या अभ्यासक्रमांना पसंदी..
९. सरकारी कर्मचार्यांची निष्क्रियता ...व सरकारचे तिच्याकडे होणारे दुर्लक्ष्य ...
१०.सर्वच राकीय पक्षात वाढलेली घराणेशाही...जी आपल्याला आत्ता पेर्यान्ताचा सर्वात भंपक पंतप्रधान देऊ शकते..

पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या....

जयंत कुलकर्णी's picture

25 Feb 2012 - 8:20 pm | जयंत कुलकर्णी

चेतनजी,

सगळ्या बाबींचा ओढून ताणून आपण उल्लेख केलेल्या बाबींशी लावू नये. विचारात जरा जागा ठेवावी असा माझा अनाहूत सल्ला आहे. माझ्या सहीतील वाक्य कदाचित आपल्या उपयोगी पडावे. या सल्ल्याबद्दल रागावू नये कारण मला राग येत नाही. :-)

Ravindra's picture

25 Feb 2012 - 2:16 pm | Ravindra

फार सुन्दर पुस्तक आहे. असेच हिन्दुस्थान लिव्हर चे पहिले भारतिय चेअरमन प्रकाश टंडन यांची पंजाब Triology आहे. नाव विसरलो. आठवले कि सांगेन. ते पुस्तकही आत्मकथेबरोबर भारताची सामान्य माणसाची कहाणी सांगते. वाचून पहा. आपणास नक्कीच आवडेल.

Ravindra's picture

25 Feb 2012 - 2:22 pm | Ravindra

आता आठवले . प्रकाश टंडन यांच्या तिन्ही पुस्तकांची नावे - Punjabi Century , Beyond Punjab, Return to Punjab

नगरीनिरंजन's picture

25 Feb 2012 - 2:50 pm | नगरीनिरंजन

धन्यवाद Ravindara.

अशी बहुतांश पुस्तके झालेल्या कित्येक गोष्टी अत्यंत निरसपणे एका ठिकाणी बांधून वाचकांसमोर ठेवलेली बाडे ठरतात - पण तुम्ही लिहीलंय या घटना, निर्णयांमुळे लेखकाने त्याच्या वास्तविक जीवनात झालेल्या परिणामांचीही जोड दिली आहे; म्हणून ते वाचायला नक्कीच आवडेल.
एक उत्तम आणि दमदार पुस्तक परिचय.

पैसा's picture

25 Feb 2012 - 3:40 pm | पैसा

पुस्तक वाचायला हवंच आहे, पण त्यातल्या बहुतेक मुद्द्यांचा ननि यानी मस्त उहापोह केला आहे. १९९१ ते २००० मधे तेव्हा जरी आशेचा किरण दिसला होता, तरी आताची परिस्थिती मात्र इतकी चांगली दिसत नाही.

९१ साली क्रांती घडवून आणणारे सर्वच जण नंतर मोठमोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवले गेलेत. त्यातलं सगळ्यात मोठं प्रकरण दूरसंचार क्षेत्रातलंच! कळसाला पोचलेला भ्रष्टाचार आणि महाभयंकर महागाई, यानी सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. मोठेमोठे पूल १२/१५ वर्षांत कोसळून पडतात. परत पूल बांधायचे म्हणजे लोकांच्या पैशांचा अपव्यय, पण भ्रष्टाचार्‍यांना पैसे खायची आणखी संधी! इकॉनॉमिक्सच्या सिद्धांतांवर डोळे झाकून विश्वास ठेवून चलनवाढ कमी करण्यासाठी व्याजदर वाढवले जातायत, पण त्याचा परिणाम मध्यमवर्गावर जास्तच होतोय.

इकम टॅक्सचं सरकारला व्यक्तींकडून उत्पन्न थोडं असलं तरी मध्यमवर्गीयांना त्यातून सुटका मिळत नाही, त्याचवेळेला कॉर्पोरेट्स वेगवेगळ्या मार्गाने कर कसा चुकवता येईल हे पाहून आपला नफा वाढवत असतात. बँकांचे घराच्या कर्जाचे दर ११/१२ टक्के असतात, त्याचवेळेला कॉर्पोरेट्सना मात्र ६/७ टक्के दराने कर्ज सहज उपलब्ध असतात. कधी कधी भारतात बघायला मिळत नसलेला कांदा भारतातून पाकिस्तानला एक्सपोर्ट होत असतो. उदारीकरण म्हणजे हे सगळं नक्कीच अभिप्रेत नसावं.

हल्दियाच्या कारखान्याची कथा मनोरंजक तेवढीच संतापजनक आहे. त्याचवेळेला रतन टाटांचा नॅनोचा पूर्ण होत आलेला कारखाना बंगालमधून उचलून दुसरीकडे हलवावा लागला आणि टाटानी पैसे मोजून घेतलेली जमीन राज्य सरकारने कायदा करून परत काढून घ्यायची तयारी केली. दोन्ही घटना बंगालमधल्याच! म्हणजे उद्योगांना वातावरण पोषक आहे असंही म्हणता येणार नाही. त्याचवेळी शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष ही अक्षम्य चूक आहे.

स्वप्नाळू, आणि उद्योगांवर नियंत्रण आणणार्‍या समाजवादामुळे काही तोटे झाले असले तरी एक फायदा नक्कीच झाला. तो म्हणजे युरोप अमेरिकेतल्या बँका कोसळून पडल्या तेव्हा भारतातल्या आणि चीनमधल्या सरकार नियंत्रित बँका प्रचंड नफा कमावून एकूणच इकॉनॉमीला बर्‍यापैकी आधार देत होत्या. पण विरोधाभास असा, की भारतात आता याच सोन्याची अंडी देणार्‍या कोंबड्या कापून खायची तयारी सुरू आहे. युरोप अमेरिकेत पूर्ण फसलेलं आर्थिक धोरण जसच्या तसं भारतात राबवणं शक्य आणि आणि व्यवहार्य नाही. भारतात फार मोठ्या प्रमाणात गरीब वर्ग आहे सरकारने त्याला मदत करावीच लागेल आणि या वर्गाला काही प्रमाणात तरी सामाजिक सुरक्षा पुरवावीच लागेल.

आजतरी सगळीकडे प्रचंड गोंधळ आहे एवढंच आपण ठामपणे म्हणू शकतो!

अन्या दातार's picture

25 Feb 2012 - 3:51 pm | अन्या दातार

दोन्ही घटना बंगालमधल्याच! म्हणजे उद्योगांना वातावरण पोषक आहे असंही म्हणता येणार नाही.

याशिवाय अजुन एक घटक म्हणजे इथला कामगार वर्ग. प्रचंड विरोधाभास इथे दिसून येतो. काम मिळेपर्यंत कितीही पगारावर काम करायला हे लोक तयार होतात. पण एकदा का कामावर ठेवले तर काम कसे टाळता येईल हेच बघतात. अख्खी युनियन त्यासाठीच लढते.
याचा अतिरेकही इतका होतो की 'काम करा' म्हणून मागे लागणार्‍या फोअरमन/इंजिनीअरला जीवे मारायच्या धमक्याही दिल्या जातात. अश्या स्थितीत उत्पादकता कशी येणार??

नगरीनिरंजन's picture

25 Feb 2012 - 5:13 pm | नगरीनिरंजन

१९९१ ते २००० मधे तेव्हा जरी आशेचा किरण दिसला होता, तरी आताची परिस्थिती मात्र इतकी चांगली दिसत नाही.

याच्याशी सहमत आहे.
सरकारला करवसुलीसाठीसुद्धा एकसमान धोरण ठेवणे जमत नाहीये त्यामुळे करवसुली कोर्टकज्जांमध्ये अडकली आहे.
त्यात अजूनही समाजवादाच्या नावाखाली अन्नवितरण व्यवस्था मोडकळीला आलेली असताना अन्नसुरक्षा योजनेसारख्या महागड्या योजना काढल्या जात आहेत.
इंदिरा गांधींप्रमाणेच सोनिया गांधींच्या इच्छेपुढे मनमोहन सिंगांसारखा बुद्धिमान माणूस विनाकारण झुकतो आहे.
बाकी शेतमालाच्या आयात-निर्यातीबद्दलचे आणि किंमतींबद्दलचे निर्णय तर ब्रह्मदेवालाही समजणे अवघड आहे तिथे आपला काय पाड?
सुरु केलेल्या सुधारणा पूर्णत्वास न नेल्याने मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा गरीबांपर्यंत झिरपलाच नाहीय. जो काही अर्धवट फायदा झालाय तो आधीच सुस्थितीत असलेल्या वर्गाने उपभोगला आहे.
असो. हे लवकरच बदलेल अशी आशा. पण एकदा स्वतःला वाघ न म्हणता हत्ती म्हटलं की कितीही डुलत डुलत चाला, काय फरक पडतो?

अभिप्रायाबद्दल यकु,पैसाताई, प्रास आणि अन्या यांचे आभार!

क्लिंटन's picture

25 Feb 2012 - 6:33 pm | क्लिंटन

इकम टॅक्सचं सरकारला व्यक्तींकडून उत्पन्न थोडं असलं तरी मध्यमवर्गीयांना त्यातून सुटका मिळत नाही, त्याचवेळेला कॉर्पोरेट्स वेगवेगळ्या मार्गाने कर कसा चुकवता येईल हे पाहून आपला नफा वाढवत असतात.

नोकरी करणारे किती कर भरतात आणि स्वतःचा बिझनेस असलेले किती कर भरतात याची तुलना केली तर ते का हे समजून येईल. स्वतःचा बिझनेस असलेले लोक अनेकदा स्वतःच्या गरजेसाठी घेतलेली एखादी गोष्ट बिझनेससाठी असे दाखवून त्यावर depreciation benefits घेऊ शकतात. उदाहरणार्थ स्वतःच्या वापरासाठी घेतलेला संगणकही बिझनेसच्या नावावर विकत घेतला तर संगणकासाठी असलेला दरवर्षी ६०% घसारा दाखवून खर्च वाढवून दाखविता येतो. अशा अनेक पळवाटा आहेत. म्हणजे कागदोपत्री नफा कमी म्हणजे करही कमी. नोकरदारांना असे करता येत नाही म्हणून ते जास्त कर भरतात. आणि बहुतांश वेळा या पळवाटांच्या बाबतीत कायदा तोकडा पडतो.म्हणजे वरच्या उदाहरणात म्हटल्याप्रमाणे एखादा संगणक नक्की स्वतःच्या वापरासाठी घेतला की बिझनेसच्या वापरासाठी घेतला हे नक्की सिध्द कसे करणार?

बँकांचे घराच्या कर्जाचे दर ११/१२ टक्के असतात, त्याचवेळेला कॉर्पोरेट्सना मात्र ६/७ टक्के दराने कर्ज सहज उपलब्ध असतात.

सध्याच्या काळात नक्की कोणत्या कॉर्पोरेट्सना ६/७% दराने कर्ज मिळते? मी एका बॅंकेत कंपन्यांना कर्ज मंजूर करायच्या विभागात कामाला आहे.तिथे तरी मी कमितकमी व्याजाचा दर बेस रेट+२.५% म्हणजे १३% बघितला आहे. जर कंपन्यांनी External Commercial Borrowing केले म्हणजेच परदेशातून परकीय चलनात कर्ज घेतले तर व्याजाचा दर बराच कमी असतो. पण असे कर्ज घेण्यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेची परवानगी लागते आणि कंपनीचे नाव चांगले नसेल तर परदेशातही त्या कंपनीला कर्ज द्यायला परदेशी बॅंक तयार होणार नाही. तसेच परदेशातून घेतलेल्या कर्जावर परतफेडीच्या वेळी विनिमय दरात होणाऱ्या चढ-उतारांचा पण परिणाम होतो.

जयंत कुलकर्णी's picture

25 Feb 2012 - 6:40 pm | जयंत कुलकर्णी

सहमत !

पैसा's picture

25 Feb 2012 - 7:15 pm | पैसा

मी सुद्धा एका बँकेच्या कर्जमंजूरीच्या विभागात कामाला आहे. आणि अनेक कंपन्यांची प्रपोझल्स मी तयार केलेली आहेत.

इथे थोडं अवांतर होईल, पण गेल्या वर्षीची गोष्ट आहे. एका कंपनीचं आमच्याकडे काही कोटी रुपयांचं डिपॉझिट आहे. त्यावर ९% रेटने व्याज बॅंक कंपनीला देते. त्यानी या डिपॉझिटवर कर्ज मागितलं. आमच्या बँकेने रीतीप्रमाणे ९+०.५०% दर ऑफर केला. त्याना तेवढा दर नको होता. दुसर्‍या एका खाजगी बँकेने आमच्या डिपॉझिट तारणावर त्याना ७% (होय. ७%ने) कर्ज मंजूर केलं!!

एक्सपोर्टसाठीही इतका कमी दर २ वर्षांपूर्वी मंजूर केला जात होता. (अर्थात आता इतर सगळ्याच दरांप्रमाणे हा दर वाढून १०- ११%च्या आसपास आहे.) आमच्या बँकेचा अधिकृतपणे एक्स्पोर्ट फायनान्सचा सध्या दर बी आर+१.२५% आहे. पण या कंपन्या हक्काने फाइनर रेट मंजूर करून घेतातच.

क्लिंटन's picture

25 Feb 2012 - 7:23 pm | क्लिंटन

दुसर्‍या एका खाजगी बँकेने आमच्या डिपॉझिट तारणावर त्याना ७% (होय. ७%ने) कर्ज मंजूर केलं!!

कमाल आहे. पण ही गोष्ट झाली गेल्या वर्षीची. मार्च २०१० पासून व्याजाचे दर १२ वेळा वाढले आहेत. आणि सगळ्याच कंपन्यांना सध्याच्या काळात (व्याजाचे दर वाढलेले असताना) ६-७% ने कर्ज मिळते असे नक्कीच नाही ना? :)

पैसा's picture

25 Feb 2012 - 10:06 pm | पैसा

:) सरसकट सगळ्यानाच नाही. पण आताही वाढलेल्या दरांमधे कॉर्पोरेट्स आणि आम जन्ता यांच्यामधे निदान ४ टक्के फरक असतो. म्हणजे लहान कर्जांना जास्त दर आणि मोठ्या कर्जांना कमी दर. कारण कॉर्पोरेट्सची बार्गेनिंग पॉवर जास्त असते.

काही जायन्ट्स तर कर्ज प्रकरण करताना काहीही मॅनेज करू शकतात असं ऐकलेलं आहे.

बँकेच्या मॅनेजरला मॅनेज करता व्याजदर मॅनेज होतो म्हणे.....

अवांतराबद्दल क्षमस्व!

अन्या दातार's picture

25 Feb 2012 - 3:43 pm | अन्या दातार

चांगली ओळख करुन दिलीय ननि! सिंहावलोकन करण्याची गरज काय आहे हे या पुस्तकातून कळतेच. तसेच इतिहासातून शिकण्यासाठी कुणीतरी आपला कानही पकडावा लागतो; ती गरज हे पुस्तक पूर्ण करेल असे वाटते.

प्रास's picture

25 Feb 2012 - 3:51 pm | प्रास

पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी केलेल्या लिखाणाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून तुमच्या या लिखाणाकडे बोट दाखवावं लागेल.

कोणतंही पुस्तक, शक्य असल्यास खरोखर मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंतच वाचायचं असतं. त्यातली प्रस्तावना वाचून लेखकाची ओळख करून घेतल्याखेरिज पुस्तक समजलं असं म्हणवत नाही.

"INDIA UNBOUND: From Independence To The Global Information Age" या पुस्तकाची अशाप्रकारे अप्रतिम ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.

हे पुस्तक वाचण्यासाठी नक्कीच उद्युक्त झालो आहे आणि हेच या लिखाणाचं यश आहे. पुस्तक वाचल्यानंतर त्यातले विचार पटतील न पटतील, कदाचित काही विचारांबाबत मतभिन्नताही निर्माण होण्याची शक्यता आहे पण आज अशी पुस्तकं न वाचता बाजूला पडणं अधिक दुर्दैवी असेल.

पुन्हा एकदा धन्यवाद!

क्लिंटन's picture

25 Feb 2012 - 9:54 pm | क्लिंटन

India unbound हे पुस्तक मी ३-४ वर्षांपूर्वी वाचले होते आणि ते मला खूपच आवडले होते.या पुस्तकाविषयी लिहिल्याबद्दल नगरीनिरंजन यांना धन्यवाद.

स्वतः गुरचरण दास यांनीही इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतील आर्थिक धोरणांना विरोध केला आहे पण नेहरूंच्या काळातील धोरणांविषयी त्यांचा सूर तितकासा कडवट नाही. पुस्तकातील काही मुद्दे मला पटले पण काही मुद्दे मला पटले नाहीत. तेव्हा नेहरू आणि इंदिरा गांधींच्या धोरणांचा थोडक्यात परामर्श घेतो.

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात टाटा, बिर्लांचे काही उद्योग, किर्लोस्करांसारखे उद्योग, कापड गिरण्या सोडल्या तर भारतीयांच्या मालकीचे मोठे खाजगी उद्योग जवळपास नव्हतेच. आज सर्वत्र पब्लिक्-प्रायव्हेट पार्टनरशीपचा घोषा दिसतो.पण त्यावेळी खाजगी उद्योगाची स्थिती मुळात मोठी गुंतवणुक करण्यासारखी नव्हती. म्हणूनच नेहरूंनी पुढाकार घेऊन सरकारी कंपन्या विविध उद्योगांमध्ये आणल्या. त्यावेळी स्थापन झालेल्या Oil & Natural Gas Corporation, Shipping Corporation of India, Hindustan Machine Tools यासारख्या सरकारी कंपन्यांनी त्या काळातील परिस्थिती अनुरूप (एकूणच संसाधनांची/ कुशल मनुष्यबळाची टंचाई इत्यादी) चांगले काम केले यात शंका नाही. अशाच उद्योगांनी नंतर खाजगी क्षेत्राची जी वाढ झाली त्याला "बेस" उपलब्ध करून दिला. नेहरूंच्या काळात सरकारने पुढाकार घेऊन अनेक उद्योग उभे केले यात मला तरी काहीही चुकीचे वाटत नाही उलट ते चांगलेच केले. गुरचरण दास म्हणतात की स्वातंत्र्य नुकतेच मिळालेले असताना नाही तरी नंतरच्या काळात म्हणजे १९७० च्या दशकात दक्षिण-पूर्व आशियाई देशांप्रमाणे आपणही निर्याताभिमुख धोरण अवलंबायला हवे होते.याविषयी भाष्य करण्याइतकी माहिती माझ्याकडे नाही तेव्हा त्यावर काही लिहित नाही.

दुसरे म्हणजे गुरचरण दास त्यांच्या पुस्तकात बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर त्यांच्या कारभारात आलेल्या inefficiency बद्दलही लिहितात. ती सत्य परिस्थिती असेलही किंबहुना बऱ्याच अंशी होती असे म्हटलेलेही चुकीचे ठरू नये.पण राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बॅंकांच्या शाखांचे जाळे देशात झपाट्याने वाढले.२००७ मध्ये कोकाकोलाचे भारतात पुनरागमन झाले त्याला १५ वर्षे पूर्ण झाली.त्यावेळी कोकाकोला इंडियाच्या सी.ई.ओ ने म्हटले की पहिली २५ वर्षे आमचे ध्येय भारतात खेड्यापाड्यापर्यंत सक्षम distribution यंत्रणा उभारणे आहे. एकदा का ते झाले की त्या बेसवर आमची प्रगती झपाट्याने होईल.बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतरच्या काळात बॅंकांच्या शाखा वाढवून अशीच "distribution" यंत्रणा सक्षम बनविण्यावर भर राहिला. १९७० च्या दशकात आपला विकासाचा दर २.५-३% होता. तो १९८० च्या दशकात ५-५.५% आणि १९९१ पासून सरासरी ७%+ राहिला आहे.त्यामागे बँकांचे मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या जाळ्याची भूमिका महत्वाची आहे. जर कोकाकोलासारख्या जागतिक कंपनीच्या कोणी उच्चपदस्थाने एखादी गोष्ट सांगितली तर लोक ती ऐकून घेतात पण तीच गोष्ट जर सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटली तर मात्र तेच लोक त्याची हेटाळणी करतात! (ही सगळी माहिती आमचे प्राध्यापक टी.टी. राम मोहन यांनी दिली होती).

अर्थातच हल्दिया कारखान्याप्रमाणे अनेक ठिकाणी "समाजवादी" धोरणांमुळे अनेकांना काहीही काम न करता नुसता फुकटचा पगार दिला जात असेल तर ते सर्वथैव चुकीचे आहे. पण भारताच्या सगळ्या आर्थिक प्रश्नांचे कारण म्हणजे नेहरू-इंदिरा गांधींची "समाजवादी" धोरणे असे म्हणायचा अनेकांचा कल असतो.पण ती धोरणे सरसकट चुकीची नक्कीच नव्हती तर ती धोरणे राबविणे ही त्या काळाची बऱ्याच अंशी गरजही होती असे मला वाटते म्हणून मुद्दामून हा प्रतिसाद लिहित आहे.

नगरीनिरंजन's picture

26 Feb 2012 - 7:54 am | नगरीनिरंजन

पतिसाद आवडला.
स्वातंत्र्य मिळाल्यावर अवजड आणि Capital Intensive उद्योगांमध्ये सरकारने गुंतवणूक करणे योग्यच होते. पण साध्या-साध्या साबण, टूथपेस्ट सारख्या उद्योगांवरही नियंत्रण ठेवण्याचे कारण काय होते?
शिवाय सरकारने सुरु केलेल्या उद्योगांनी नफा कमवायचा नाही, कार्यक्षम असण्याची गरज नाही हे कोणत्या तर्कशास्त्रात बसते?
"Profit is a dirty word" हे नेहरूंचे तत्वज्ञान चुकीचे नव्हते काय?

ती धोरणे राबविणे ही त्या काळाची बऱ्याच अंशी गरजही होती

हे मान्य करायला काहीच अडचण नसावी पण त्याच वेळी Wage Goods Theory सारख्या पर्यायांकडे दुर्लक्ष करण्याचे काहीच कारण नव्हते.

धोरणे अवलंबली यात चूक नाही पण त्यांची अंमलबजावणी नीट होत नाहीय हे पाहूनही केवळ हट्टाने किंवा राजकीय फायद्यासाठी ती रेटत राहणे हे चूकच नव्हते काय?

कोकाकोलाचे उदाहरण मला तरी पटले नाही. टेलिकॉम क्रांती घडवताना सॅम पित्रोदांनी टेलिफोन सेवा दूरवर कशी पसरवली? गावा-गावातल्या दुकानदारांकडे कॉईनबॉक्स सुरु करून खूप कमी वेळात देशभर ही सेवा पुरवली गेली, तसेच कोकाकोलालाही करणे शक्य होते. पारलेसारख्या कंपन्यांनी ते करून दाखवलेही.
बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यावर सरकारने शाखा वाढवल्या हे योग्यच झाले परंतु मुक्त अर्थव्यवस्था असती तर बँकांची गरज तशीही वाढलीच असती आणि गरजेप्रमाणे शाखा निघाल्याच असत्या. सरकारने अवाढव्य खर्च करण्यापेक्षा योग्य ते प्रोत्साहन आणि नियंत्रण यंत्रणा निर्माण केली असती तरी भागले नसते काय?

प्रदीप's picture

26 Feb 2012 - 10:23 am | प्रदीप

पण त्यावेळी [स्वातंत्रय मिळाल्यनंतरच्या काळात] खाजगी उद्योगाची स्थिती मुळात मोठी गुंतवणुक करण्यासारखी नव्हती. म्हणूनच नेहरूंनी पुढाकार घेऊन सरकारी कंपन्या विविध उद्योगांमध्ये आणल्या.

खाजगी उद्योनांना काही इन्सेन्टिव्ह्स देऊन मोठे उद्योग उभारता आले नसते का? प्रत्येक बाबीत सरकारचे अस्तित्व आपणास घातक ठरले आहे का?

क्लिंटन's picture

26 Feb 2012 - 10:31 pm | क्लिंटन

खाजगी उद्योनांना काही इन्सेन्टिव्ह्स देऊन मोठे उद्योग उभारता आले नसते का?

हो काही प्रमाणात हे करता आलेच असते.तरीही सरसकट सगळ्या क्षेत्रांमध्ये हे करायला भांडवल, तांत्रिक ज्ञान, उपयुक्त resources ची टंचाई या सगळ्या गोष्टी आडव्या आल्या असत्या हे नक्की. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मी समाजवादी/साम्यवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता नक्कीच नाही. अनेकांचे मत असते की नेहरूंच्या धोरणांनी पूर्ण वाट लावली आणि ते पूर्णपणे समर्थनीय नाही असे मला वाटते.

प्रत्येक बाबीत सरकारचे अस्तित्व आपणास घातक ठरले आहे का?

हो परत एकदा लिहितो. १९४७ मधील परिस्थितीनुसार कदाचित ती धोरणे अवलंबणे ही काळाची गरज होती. पण तीच धोरणे अगदी १९९१ पर्यंत कायम ठेवायला हवी होती का, ती आधी बदलता आली नसती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणारी उपयुक्त माहिती माझ्याकडे नाही. म्हणून ४४ वर्षे का लावली या बद्दल काहीच लिहित नाही. आजही अनेक उद्योगांमध्ये सरकारचे अस्तित्व आहे आणि सरकारी उद्योगांमध्ये असलेला गलथानपणाही आहे. त्याचे अजिबात समर्थन नाही.

जयंत कुलकर्णी's picture

25 Feb 2012 - 6:37 pm | जयंत कुलकर्णी

पुस्तकाची ओळख कशी करून द्यावी याचे उत्कृष्ट उदाहरण.

नेहरूंचे हे चुकले, ते चुकले नाही हे वाद घालण्यात हाशील नाही. त्यांच्या धोरणामुळे काय झाले आहे हे समोर दिसतेच आहे. कोणते धोरण बरोबर हे आपण सांगू शकत नाही कारण ते फार गुंतागुंतीचे आहे. परिणामांकडे मात्र आपण बोट दाखवू शकतो हे खरे. आणि लायसेन्स राज मुळे खाजगीत कारखाने निघत नव्हते हेही खरे आहे. त्या काळातील भारतीय उद्योजक गुंतवणूक करायला तयार नव्हते किंवा त्यांची तशी परिस्थिती नव्हती हे म्हणणे धाडसाचे होईल. बरेचसे खाजगी उद्योगच सरकारने ताब्यात घेतले. SCI ही मला वाटते पहिल्यांदा खाजगीच होती. (खात्री नाही). AirIndia/banks/Insurance इ. इ ही सगळी धोरणे राबवण्यासाठीच ताब्यात घेण्यात आली होती. ती ताब्यात न घेता धोरणे कशी राबवता येतील मला वाटते याचा विचार करायला पाहिजे होता. . सोलापूरातील जुनी मिलचे उदाहरण घ्यायला हरकत नाही. एवढी मोठी मिल एका भारतियानेच विकत घेतली होती. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. एक मात्र खरे आहे की R & D setup मधे पैसे घालायला मात्र हे लोक तयार नव्हते. आणि दुर्दैवाने तसे ते आजही तयार नसतात. हे माझे मत. !

क्लिंटन's picture

25 Feb 2012 - 7:07 pm | क्लिंटन

लायसेन्स राज मुळे खाजगीत कारखाने निघत नव्हते हेही खरे आहे

सुरवातीच्या काळात लायसेन्स राज असणे ही पण एक गरज होती. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात नैसर्गिक साधन-सामुग्री भरपूर होती पण त्यातील tapped resources खूपच कमी होते. तेव्हा परमिट-कोटा-लायसेन्स ठेऊन "रेशनिंग" करणे ओघाने आलेच. आणि हे resource tap करायची क्षमता खूपच कमी खाजगी उद्योगांमध्ये होती तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन ते काम करायचा प्रयत्न केला हे एका प्रतिसादात म्हटलेच आहे. आता हे लायसेन्स राज कधीतरी काढून टाकणे गरजेचे होतेच. पण ते नक्की कधी करणे योग्य झाले असते (५/१०/२०/३० की प्रत्यक्षात लागली तेवढी ४४ वर्षे) यावर भाष्य करायला माझ्याकडे पुरेशी माहिती नाही तेव्हा त्यावर काहीही लिहित नाही.

त्या काळातील भारतीय उद्योजक गुंतवणूक करायला तयार नव्हते किंवा त्यांची तशी परिस्थिती नव्हती हे म्हणणे धाडसाचे होईल. बरेचसे खाजगी उद्योगच सरकारने ताब्यात घेतले.

दोन मुद्दे: सरकारने बरेच खाजगी उद्योग ताब्यात घेतले हे बरोबर आहे पण त्यातले किती उद्योग भारतीय मालकीच्या कंपन्यांच्या ताब्यात होते (आणि किती उद्योग ब्रिटिश कंपन्यांच्या ताब्यात होते) हे पण बघायला हवे. दुसरे म्हणजे आज खाजगी क्षेत्रातील उद्योग सरकारी कंपन्यांपेक्षाही जास्त पैसा बाजारातून उभा करून काहीही करू शकतात पण त्या काळी तशी परिस्थिती नव्हती.त्यामुळे उद्योगधंद्यांची वाढ झपाट्याने व्हायला खाजगी उद्योगांना भांडवलाची समस्या नक्कीच आली असती. तसेच स्टीलसारख्या काही उद्योगात तांत्रिक ज्ञान उपलब्ध होते (तरीही भिलाई कारखान्यासाठी रशियनांना बोलवायला लागले ही गोष्ट वेगळी) पण तीच परिस्थिती सगळ्या उद्योगांमध्ये होती का?तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन सुरवातीच्या काळात उद्योग काढले हे चांगलेच झाले.

जयंत कुलकर्णी's picture

25 Feb 2012 - 8:00 pm | जयंत कुलकर्णी

क्लिंटन,

////सुरवातीच्या काळात लायसेन्स राज असणे ही पण एक गरज होती. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात नैसर्गिक साधन-सामुग्री भरपूर होती पण त्यातील tapped resources खूपच कमी होते. तेव्हा परमिट-कोटा-लायसेन्स ठेऊन "रेशनिंग" करणे ओघाने आलेच. आणि हे resource tap करायची क्षमता खूपच कमी खाजगी उद्योगांमध्ये होती तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन ते काम करायचा प्रयत्न केला हे एका प्रतिसादात म्हटलेच आहे. आता हे लायसेन्स राज कधीतरी काढून टाकणे गरजेचे होतेच. पण ते नक्की कधी करणे योग्य झाले असते (५/१०/२०/३० की प्रत्यक्षात लागली तेवढी ४४ वर्षे) यावर भाष्य करायला माझ्याकडे पुरेशी माहिती नाही तेव्हा त्यावर काहीही लिहित न///////

Resources खूप होते पण Tapped म्हणजे वापरण्यायोग्य Resources कमी होते... पण मग वापरण्यायोग्य Resources वाढवणे हे खाजगी उद्योगाला सहभागी करून सहज शक्य होते. सरकारने हे जे पुढाकार घेऊन काम केले त्याचे कारण नुसते एवढेच नव्हते, लोकांना नोकर्‍या देऊन खूष ठेवणे हाही त्यातील एक उद्देश असावा. (जो अजूनही बंगाल मधे असतो).

उद्योग कोणाच्या मालकीचे आहेत याचा याच्यात कुठे संबंध आहे हे कळाले नाही. आजही अनेक उद्योग परदेशी आहेतच. प्रश्न मला वाटते खाजगी आणि सरकारी हा आहे. आपण Resources बद्दल म्हणताय मला आठवते आहे.... बजाजवर जास्त वाहनांचे उत्पादन केल्याबद्दल सरकारने खटला भरला होता. ( मला या उद्योगाबद्दल तरी जराही सहानभुती नाही). अशी उदाहरणे त्या काळात भरपूर होती. मला वाटते एखादे धोरण करायला लागणे आणि एखादे धोरण करायला पाहिजे म्हणून अमलात आणणे यात दुसरे करायला जास्त Determination लागते. मी सरकारी उद्योगाच्या विरूद्ध नाही पण त्यांना अवाजवी मदत करण्याच्या जरूर विरोधी आहे आणि पूर्वीच्या धोरणांचा तो अविभाज्य घटक होता. ते सगळे उद्योग म्हणजे चालले तर नवरत्न नाहितर तो लोकांचा- त्यांनी पोसलाच पाहिजे या वृत्तीतून चालवले जातात याचे दु:ख जरूर आहे.

क्लिंटन's picture

25 Feb 2012 - 10:17 pm | क्लिंटन

सरकारने हे जे पुढाकार घेऊन काम केले त्याचे कारण नुसते एवढेच नव्हते, लोकांना नोकर्‍या देऊन खूष ठेवणे हाही त्यातील एक उद्देश असावा. (जो अजूनही बंगाल मधे असतो).

अर्थातच. मी स्वतः समाजवादी /साम्यवादी आर्थिक विचारांचा अजिबात पुरस्कर्ता नाही. ज्या शिक्षणसंस्थेला epitome of capitalism असे म्हणता येईल अशा एका शिक्षणसंस्थेत माझे शिक्षण झाले आहे आणि बहुतांशी तेच विचार माझेही आहेत. माझ्या प्रतिसादाचा उद्देश हा की सध्या नेहरूंच्या आर्थिक धोरणांवर टिका करणारे बरेच लोक असतात. माझ्या मते ती टिका १००% समर्थनीय नाही कारण त्या परिस्थितीत उपयुक्त Resources ची टंचाई असताना नेहरूंच्या सरकारने त्या परिस्थितीतून मार्ग काढायला योग्य तेच केले.

बजाजवर जास्त वाहनांचे उत्पादन केल्याबद्दल सरकारने खटला भरला होता.

बहुतेक सर्वच उद्योगांना उत्पादनाचा कोटा ठरवून दिलेला होता. याचे कारण परत तेच-- उपयुक्त Resources ची टंचाई. समजा देशात १०० एकक स्टील, १०० एकक वीज आणि १०० एकक इतर Resources आहेत आणि सगळ्या उद्योगांना आहेत त्याच Resources मध्ये भागवून घ्यायचे आहे. या परिस्थितीत जर बजाजने त्यांना ठरवून दिलेल्या १० पेक्षा जास्त एकक स्टील/वीज वापरली तर त्याचा अर्थ इतर उद्योगांना तेवढे Resources कमी आणि त्या उद्योगांवर परिणाम होणार! कोटा पध्दतीचे मागचे rationale हे होते. आता प्रत्यक्ष बजाजविरूध्दचा खटला नक्की कधी भरला, त्यावेळी कितपत टंचाई होती याची माहिती मला नाही. पण १९४७ नंतरची टंचाई लक्षात घेता कोटा पध्दत आणणे आता वाटते तितके वाईट नव्हते एवढाच माझा मुद्दा आहे. आता तीच धोरणे किती वर्षे राबवायला हवी होती? १९९१ पूर्वीच ती मोडीत काढता आली असती का किंवा मोडीत काढायला हवी होती का या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणारी माहिती माझ्याकडे नाही म्हणून त्यावर भाष्य करत नाही.

मी सरकारी उद्योगाच्या विरूद्ध नाही पण त्यांना अवाजवी मदत करण्याच्या जरूर विरोधी आहे आणि पूर्वीच्या धोरणांचा तो अविभाज्य घटक होता.

हो बरोबर. आता भारतातील खाजगी उद्योग समर्थ असताना आणि पूर्वीची टंचाईची परिस्थिती आता नसताना (किंवा असेल तर खाजगी उद्योग आयातीद्वारे समस्या सोडवू शकायच्या परिस्थितीत असताना) सरकारने अजूनही सगळ्या उद्योगांमध्ये स्वतः राहायला पाहिजे असे नक्कीच नाही.

उद्योग कोणाच्या मालकीचे आहेत याचा याच्यात कुठे संबंध आहे हे कळाले नाही.

अनेकदा नेहरूंवर टिका करणारे म्हणतात की त्यावेळीच खाजगी क्षेत्राला पुढे आणायला हवे होते. नाहीतरी अनेक लहानसहान खाजगी कंपन्या सरकारने सुरवातीच्या काळात ताब्यात घेतल्याच होत्या तेव्हा पाहिजे तितकी capability खाजगी उद्योगांकडे होती असेही म्हटले जाते. तेव्हा हे उद्योग भारतीयांचेच होते की इंग्रजांचे होते हा प्रश्न उभा राहतो. म्हणजे जर उद्योगांचे key knowledge इंग्रज मालकांकडे असेल आणि ते मालक १९४७ नंतर त्यांच्या देशात निघून गेले तर अशा खाजगी कंपन्या पुढे किती टिकणार हा प्रश्न होताच. तेव्हा सरकारने ज्या कंपन्या ताब्यात घेतल्या त्यापैकी किती ब्रिटिश गेल्यानंतरही तगू शकतील अशा होत्या? दुसरे म्हणजे संपूर्ण देशात उद्योगांची वाढ करायला लागणारे स्केल त्यांच्याकडे होते का? तिसरे म्हणजे फायनान्शियल मार्केट आजच्याप्रमाणे तेव्हा पुढारलेले नव्हते. तेव्हा अशा खाजगी उद्योगांना एका ठराविक मर्यादेनंतर भांडवलाची समस्या आलीच असती . भारत सरकार इतर देशांकडून किंवा World Bank सारख्या संस्थांकडून पैसे कर्जाऊ अधिक सहजपणे मिळवेल पण खाजगी कंपन्यांना ही मर्यादा होती. अशा अनेक गोष्टींचा विचार करता सुरवातीच्या काळातले सरकारचे धोरण-- महत्वाचे उद्योग सरकारच्या ताब्यात हे तितके वाईट नव्हते असे लक्षात येईल.

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2012 - 8:18 am | जयंत कुलकर्णी

Got your point. पण मला वाटते काही चुका धाडस दाखवून कबूल करायला लागतील.

नगरीनिरंजन's picture

26 Feb 2012 - 8:32 am | नगरीनिरंजन

काही चुका धाडस दाखवून कबूल करायला लागतील.

सहमत आहे. नाहीतर यशापयशाचं मूल्यमापन कसं करायचं? सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल कौतुक पाहिजे तर चुकांची जबाबदारी घ्यायचीही तयारी पाहिजेच ना.

अन्या दातार's picture

26 Feb 2012 - 9:12 am | अन्या दातार

लोकसत्ता आयडीया एक्स्चेंज कार्यक्रमात अजित गुलाबचंद यांनी सरकारी धोरणांचा घेतलेला आढावा इथे वाचायला मिळेल. नेहरुंच्या आर्थिक धोरणांबद्दल त्यांनी नापसंती दर्शवलेली आहे.

टीपः जरी लोक पेपर वाचतात हे माहिती असले तरी सदर दुवा मूळ विषयास धरुन असल्याने याबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचे कारण वाटत नाही. :)

पहिल्या परिच्चेदात अगदि ननि, माझ्याच भावना दिस्ताहेत.
तिथून पुढचं सारच अत्यंत प्रभावी लिहिलेलं आहे. मला नेहमीच बुचकाळ्यात टाकणार्‍या कोड्यांची उत्तरं मिळ्त्तील अशी आशा आहे. पुस्तक घेणारच आहे.
वाचनखूण तर साठवलीच आहे.

रघुपती.राज's picture

25 Feb 2012 - 7:37 pm | रघुपती.राज

या पुस्तकाकडून 'ऐतिहासिक' पुस्तकाप्रमाणे अपेक्षा बाळगणे योग्य नाही. पुस्तकाचा लेखक एक ज्येश्ठ व्यवस्थापक आहे - इतिहास तज्ञ नाही. या व्यक्तीने त्याच्या द्रुष्टीकोनातुन सदर पुस्तक लिहिले आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. येथे लेखकाचा भर आर्थिक मुद्दे व त्या अनुशंगाने येणारी सामाजिक धोरणे यावर आहे. त्यामुळे "फाळणी आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचा उल्लेख मात्र कुठेच दिसत नाही" हा चेतन साहेबांचा मुद्दा या पुस्तकात येत नाही हे खरे. पण हे पुस्तक प्रत्येक भारतीय तरूणाने जरुर वाचावे असे माझे प्रामाणिक मत आहे. हे पुस्तक जरी भूतकाळातील अनेक अपयशांचा पाढा वाचत असले तरी ते आजच्या तरुणाईला एक सकारात्मक विचार देउन जाते. विशेषतः खुल्या अर्थव्यवस्थेत आकाशाला गवसणी घालण्यापासुन आजच्या तरुणाला 'सरकारी धोरणे' अडवू शकत नाही असा एक दिलासा देउन जाते.

या पुस्तकात 'मारवाडी' असे शीर्श़क असलेले एक प्रकरण प्रत्येक मराठी माणसाने जरुर वाचावे असे आहे. बर्याच वेळा या समुदायाचा अत्यंत हीन उल्लेख मराठी माणसे करतात. पण या समुदायाचे काही बरे वाईट गुण आपण उचलणे आवश्यक आहे. सदर प्रकरण या कारणासाठी तरी जरुर वाचावे. येथे कोणाची भलामण करणे किंवा कोणाला कमी लेखणे हा हेतू नाही.

जे जे आपणासी ठावे ते लोकासी सांगावे - शहाणे करुन सोडावे सकळ जन येवढाच विशुध्द हेतु.

संगणकावर मराठी लिहिण्याची फार सवय नसल्याने चुक भुल द्यावी घ्यावी.

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Feb 2012 - 8:06 pm | पुण्याचे वटवाघूळ

या पुस्तकाकडून 'ऐतिहासिक' पुस्तकाप्रमाणे अपेक्षा बाळगणे योग्य नाही.येथे लेखकाचा भर आर्थिक मुद्दे व त्या अनुशंगाने येणारी सामाजिक धोरणे यावर आहे. त्यामुळे "फाळणी आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचा उल्लेख मात्र कुठेच दिसत नाही"

असं कसं? प्रत्येक पुस्तकात फाळणी आणि पाक पुरस्कृत दहशतवादाबरोबरच नेहरू कसे नेभळट होते, त्यांनी काश्मीर प्रश्नाचा कसा विचका केला, मुस्लिमांचे मतासाठी कसे लांगूलचालन केले जाते याचा उल्लेख नसेल तर कसे चालेल?

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Feb 2012 - 8:27 pm | चेतनकुलकर्णी_85

असं कसं? प्रत्येक पुस्तकात फाळणी आणि पाक पुरस्कृत दहशतवादाबरोबरच नेहरू कसे नेभळट होते, त्यांनी काश्मीर प्रश्नाचा कसा विचका केला, मुस्लिमांचे मतासाठी कसे लांगूलचालन केले जाते याचा उल्लेख नसेल तर कसे चालेल?
सहमत १००%
अहो अश्या पद्धतीने इतिहास शाळेत शिकवल्यावर खर्या चुका ह्या नवीन पिढीला समजताच नाहीत...शाळेच्या इतिहासात "काश्मीर प्रश्न " ह्यावर चुकार शब्द नाही आहे परंतु नेहरू ,गांधी आदींचे गोडवे पण भर गायले आहेत...अगदी नेहरुंना लहान मुले फार आवडत( का आवडतात ते नव्हते सांगितलेले!!) असाही(बिनकामाचा) उल्लेख असल्याचा आठवतोय..असली कुचकामी माहिती घेऊन काय करायचेय??... भारताच्या प्रगतीचे खुंटलेली बीजे ही पहिल्या वहिल्या सरकारनेच रोवली आहेत हा खरा भारताचा इतिहास आहे.....

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Feb 2012 - 9:26 pm | पुण्याचे वटवाघूळ

आता मात्र हसावे की रडावे हे कळेनासे झाले आहे. टाळ्या जोरदार टाळ्या. मी वर लिहिलेल्यातील उपरोध तुमच्या लक्षात आला नसेल तर मात्र जोरदार टाळ्याच वाजवायला हव्यात.

एका विशिष्ट विचारसरणीचा ब्रेनवॉश भलताच प्रभावी असतो बघा.त्यातून काहीही संबंध नसलेल्या विषयांमध्येही अशा सगळ्या गोष्टी दिसायला लागतात.

चेतनराव एवढ्यावरच कसे थांबलात? खिलाफत चळवळ, ५५ कोटी, मोपल्यांचे बंड यासारखे विषय कसे दूर ठेवलेत? तुम्ही लिहिलेल्या अगदी पहिल्या प्रतिसादातील मुद्दे आणि काश्मीर प्रश्न, खिलाफत इत्यादी मुद्दे यात साम्य काय? या सगळ्यांचा १९४७ नंतर भारतात सरकारने घेतलेल्या आर्थिक धोरणांशी काहीही संबंध नाही आणि तसा संबंध या विषयात (खरं तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी) एकाच विचारसरणीच्या लोकांना वाटतो.

असो. मुळच्या चर्चेशी अवांतर ठरत असल्याने जास्त लिहित नाही.

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Feb 2012 - 9:34 pm | चेतनकुलकर्णी_85

माझीच चूक झाली..तुमच्या नावा प्रमाणेच तुम्ही पण उलटे बोलत असणार हे माहित असायला हवे होते... :P
आता पुढच्या वेळे पासून खाली लिहित जावा कि मी उपरोधिक पणे बोलतोय... :) ब्रेन वाश कोणाचा झालाय ते आधी तपासून पहा...
अवांतर सल्ला :- कोर्टाची पायरी कधी चाद्लातच तर असे बोलून वर म्हणू नका मी उपरोधिक पणे बोलतोय म्हणून..गोचीत याल...