साठेचं काय करायचं?? ... नाटक...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
5 Jun 2008 - 4:28 pm

साठेचं काय करायचं...

लेखक : राजीव नाईक...
दिग्दर्शक संदेश कुलकर्णी
कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष
निर्मिती :समन्वय पुणे...
( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.)
हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले..
क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले...

मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते.. ( निखिल माझा आवडता अभिनेता आहे, हे लक्षात घेतलं तर पाहिल्यानंतर अधिकच आवडेल हे निश्चित)..

या नाटकाला फ़ार मोठी सांगण्यासारखी गोष्ट अशी नाही...
अभय आणि सलमा या जोडप्याची ही गोष्ट ... अभय ऎडफ़िल्म्स बनवणारा, मिडिआमध्ये काम करणारा, थोडासा लेखक दिग्दर्शक, क्रिएटिव्ह आणि सेन्सिटिव्ह आणि सलमा कॊलेजात शिकवते, इंग्लिशची प्रोफ़ेसर.....फक्त संवादांत येणारा साठे अभयचा मित्र ( किंवा अभयच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी म्हणूया हवं तर), साठे ऎवॊर्ड विनिंग डॊक्यूमेंटरीज बनवतो... आणि अभयला कुठेतरी सतत असं वाटत राहतं " आपण ऎडफ़िल्मवाले म्हणून साठे आपल्याला हिणवतो.." .. हे सगळं उगीच अभयला वाटतंय, साठेच्या हे गावीही नसणार कदाचित...अभय स्वत:ला फ़िल्ममेकर मानतो, त्याला साठेसारखं व्हायचंय पण त्याच्यासारखं यशस्वी होऊ न शकल्यामुळे तो त्याच्यावर जळतो..कंपूबाजीने आपल्यावर अन्याय केला नाहीतर कलाक्षेत्रात आपण कुठल्या कुठे पोचलो असतो असं त्याला वाटतं...पार्टीत साठेच्या होणाया कौतुकावर चिडतो आणि कंपूगिरीला शिव्या घालतो... आणि या प्रत्येक संवादात सलमा त्याला जाणीव करून देतेय की उगीचच साठेवर चिडचिड करायचं कारण नाही,, तुझे मित्र नाही तुझं कौतुक करत?..( तुमची तेवढी दोस्ती आणि त्याचा कंपू ?). एकदा साठेची फ़िल्म चालू असताना अभय दुसर्या एका मित्राला बू करायला लावतो , हे कळल्यावर पुन्हा वाद... सलमा त्याला सांगते, "तुझ्यात जेवढी टॆलंट आहे तेवढी लाव पणाला , असेलच स्पर्धा तर हेल्दी असूदे"... तरी अभयची चिडचिड चालूच...त्याची स्वप्नं म्हणजे वेल-इक्विप्ड स्टुडिओ, कादंबरी लेखन, फ़िल्म काढणे वगैरे...

अभय NFDC च्या फ़ंडिंगने एक फ़िल्म बनवू इच्छितो आणि त्यासाठी त्याची लाच वगैरे द्यायची सुद्धा तयारी आहे, हे दर्शवणारे सुंदर स्वगत आहे नाटकात..

नाटकात घडत फ़ारसं नाहीच... दहा प्रवेश आहेत नाटकात आणि बाहेर घडणाया घटनांवर दोघांच्या स्वभावानुसार रिपिटीटीव्ह त्याच त्याच प्रतिक्रिया...हे नाटक पुनरावृत्तीचं आहे, मध्ये मध्ये इतर सूर लागतातच पण मुख्य भावना परत परत येत राहतात.. पण संवाद अत्यंत छान, खटकेबाज...नाटक कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं असं फ़ारसं नाहीच...
हे झालं गोष्टीबद्दल...
दोन विरुद्ध स्वभावाच्या माणसांनी एकाच घटनेवर कशा प्रतिक्रिया द्याव्यात , आणि त्याचे संवाद कसे लिहावेत यासाठी ही संहिता अभ्यासण्यासारखी आहे... या संहितेचे पुन्हा पुन्हा वाचन करायला मला आवडते... नवनवीन काहीतरी सापडत राहते प्रत्येक वाचनात...

प्रत्येक सृजनशील माणसाचा एक साठे असतो....( मीही त्याच्याइतकाच टॆलंटेड आहे मग त्याच्यासारखं व्हावंसं वाटत असतं, त्याने आपलं कौतुक करावंसं वाटत असतं... पण त्याच्या सतत यशस्वी होण्यावर मात्र मनात असूया दाटत असते)..मलाही असं क्वचित कधी होतं , तेव्हा मात्र मी हे नाटक आठवून ही भावना बरीच कमी करण्यात यशस्वी होतो... :)
आणि या उलट कळत नकळत आपण स्वत: क्वचित कोणाचे साठे असू शकतो ... लेखकाने स्वत: लिहिलंय की सुरुवाती-सुरुवातीला त्याला स्वत:ला साठेशी जास्त आयडेन्टिफ़ाय करावंसं वाटलं होतं...

..
राजीव नाईक यांनी या पुस्तकाच्या शेवटी हे नाटक सुचताना काय मनात होतं त्याबद्दल लिहिलं आहे...त्यातल्या काही ओळी देतो इथे...
" आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"..

सध्या तरी नाटक स्टेजवर नाही, पण याचे निदान पुस्तक आवर्जून वाचावे असे आमचे सर्व नाटकवाल्यांना आणि लेखक मंडळींना सांगणे आहे...

कलानाट्यवाङ्मयप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

मन's picture

5 Jun 2008 - 4:33 pm | मन

आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"..

निस्ती एका वाक्यात आमच्यासारख्यांची गोची कुठं होते ते सांगुन टाकलं ना राव.
सहिच.
(कुठं मिळालं तर पाह्य्ला नक्की आवडेल.)

आपलाच,
मनोबा

गेल्या वर्षी 'एकांकिका' स्पर्धा झाल्या होत्या त्यात शिकागो ला झालेल्या उपांत्य फेरीत हे नाटक सॅन होजे च्या मराठी मंडळाने केल होत. (नंतर ती एकांकिका अंतिम फेरीत दुसरी आली. ) त्यांच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग असेल - विचारुन बघितलेत तर मिळू शकेल.

मनिष's picture

5 Jun 2008 - 5:29 pm | मनिष

साठेचं काय करायचं हे बघायला आवडेल...ती अमृता सुभाष मात्र बर्‍याच वेळा तिच्या बालिश/पोरकट अभिनयाने डोक्यात जाते. (आठवा श्वास)
मधे मकरंद देशपांडे, सोनाली कुलकर्णी आणि ह्या दोघांचे (निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष) एक नाटक पाहिले होते (मला वाटते संदेश कुलकर्णीच दिग्दर्शक होता...), ते वेगळे पण बकवास होते...आता नाव आठवत नाही!

भडकमकर मास्तर's picture

5 Jun 2008 - 5:36 pm | भडकमकर मास्तर

ते वेगळे पण बकवास होते... :))
त्या नाटकाचं नाव पहिलं वहिलं...
वरच्या समन्वयच्या व्हिडीओमध्ये साडेसातव्या मिनिटाला त्याची माहिती आहे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

6 Jun 2008 - 7:02 am | मेघना भुस्कुटे

अमृता सुभाष बर्‍याचदा डोक्यात जाते हे खरंय. मी तिला प्रथम 'झोका'मधे पाहिलं आणि ती भन्नाट आवडली. पण मग त्याच त्या प्रकारचा अभिनय आणि अतिउत्कट काहीतरी केल्याचा आविर्भाव (तशीच ती सोनाली कुलकर्णी. अभिनेत्री म्हणून चांगलीय ती. पण मुलाखती? पार डोक्यात. अरे किती निरागसपणा दाखवावा माणसानं? सतत त्याचीच टिमकी? रडवेल्या आवाजात-गळा दाटून आणून किंवा अतिशयोक्त गंभीरपणे काही बोललं म्हणजेच तुम्ही शहाणे? जाऊ द्या...) दर वेळी पाहिल्यावर मग आमचं प्रेम ओसरलं!

बाय दी वे, 'पहिलं-वहिलं' मला बकवास नव्हतं हं वाटलं. त्या मुलाच्या वाढण्याचा आलेख होता तो आणि तो मला आवडलाही होता.

भाग्यश्री's picture

6 Jun 2008 - 7:18 am | भाग्यश्री

अगदी खरं.. अमृता सुभाष मेजर डोक्यात जाते.. सावली पाहीलाय का? सुंदर पिक्चर.. पण तिची ती टीपिकल बोलण्याची स्टाईल.. अति निरागसपणा.. इरिटेटींङ..!
पण हो.. झोका सुरेख होती!!
http://bhagyashreee.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

5 Jun 2008 - 5:31 pm | भडकमकर मास्तर

हा ऑर्कुटवर सापडलाय समन्वयचा विडीओ...
http://www.youtube.com/watch?v=ltvNU-CxtEw
त्यात तिसर्‍या मिनिटाला या नाटकाची माहिती आहे...

नाटकातले कलाकार निखिल रत्नपारखी आणि अमृता सुभाष

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष's picture

5 Jun 2008 - 5:34 pm | मनिष

"आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"

ह्या ओळी खरच विचार करायला लावणार्‍या आहेत...कित्येक कलाकार ह्या विचारांनी उध्वस्त झालेत किंवा नुसत्याच पाट्या टाकायला लागलेत, हे पचवायला खरच अवघड. राजीव नाईक ह्यांचे इतरही लिखाण वाचायला आवडेल.

आंबोळी's picture

5 Jun 2008 - 5:55 pm | आंबोळी

मास्तर तुमचा व्यासंग अफाट आहे हो....
अशीच चांगली चांगली नाटकांची/पुस्तकांची परिक्षणे देत चला....
त्यानिमित्ताने आमचेही वाचन वाढेल....

मुक्तसुनीत's picture

5 Jun 2008 - 6:05 pm | मुक्तसुनीत

भडकमकर यांनी या नाटकाचा इथे आवर्जून उल्लेख केला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

चार वर्षांपूर्वी या नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले होते. आणि वाचतानाच असे वाटले होते की हे नाटक म्हणजे आपल्याकरता एक आरसा आहे. ज्या कलाकृती असा अनुभव देतात त्या अर्थातच फार मार्मिक , आणि प्रसंगी वेदनादायक असतात. अभयचा दृष्टिकोन हा (POV) , नेमाड्यांच्या भाषेत सांगायचे तर , "शंभरापैकी नव्व्याण्णवांचा" आहे. प्रज्ञा आणि जुळारीपणा यांच्यातला फरक , कलेच्या निर्मितीचा विमर्श, आपल्या समकालीनांबद्दलची असूया, हेवेदावे , आणि यातून दिसणार्‍या माणसातल्या क्षुद्रपणाच्या छटा ....कधीतरी घडलेले कठोर आत्मपरीक्षण , असूयेपोटी केलेल्या पापांचा वाचलेला पाढा ... दहा प्रवेशांच्यामधे माणसाचे आरपार दर्शन आहे यात.

जत्रेमधे आरसे असतात पहा. त्यांच्यासमोर उभे रहायचे नि आपले वेडेविद्रे रूप पहायचे असा तो गमतीचा प्रकार असतो. "साठे" वाचताना असे काहीसे झाले. आणि गम्मत वाटत नव्हती ! पण "पहा , तुझ्यातसुद्धा हे आहे ! " असे कुणीतरी सतत सांगते आहे अशी एक भावना होत होती.

या नाटकाचा कॅलीफोर्नियाच्या एका संस्थेने केलेला प्रयोग मी डीवीडीवर पाहिला. प्रयोग उत्तम झाला आहे. मला केवळ एकच उणीव जाणवली. भडकमकरानी ज्या प्रदीर्घ स्वगताचा उल्लेख वर केला आहे ते स्वगतच प्रयोगात गाळले आहे ! हा एक मोठाच दोष मानायला हवा. कदाचित त्यांच्यासमोर वेळेचा प्रश्न असेल ; पण ते स्वगत फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

भडकमकर मास्तर's picture

5 Jun 2008 - 11:16 pm | भडकमकर मास्तर

"पहा , तुझ्यातसुद्धा हे आहे ! " असे कुणीतरी सतत सांगते आहे अशी एक भावना होत होती.
__
वा.. काय बोललात !! .... असंच होतं...
भडकमकरानी ज्या प्रदीर्घ स्वगताचा उल्लेख वर केला आहे ते स्वगतच प्रयोगात गाळले आहे ! हा एक मोठाच दोष मानायला हवा. कदाचित त्यांच्यासमोर वेळेचा प्रश्न असेल ; पण ते स्वगत फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

स्पर्धा होती म्हणताय, म्हणजे कदाचित वेळाचा प्रॉब्लेम असेल... कारण वाचायचे म्हटले तर तासभर लागतो... मग ४५ मिन्टांच्या एकांकिकेसाठी काही सीन उडवणे आलेच...( मी इतर काही सीन कमी केले असते पण हा नसता उडवला...)
अजून एक शक्यता.... लेखकाने शेवटी लिहिल्याप्रमाणे जेव्हा हे नाटक अनुष्टुभ नावाच्या नियतकालिकात छापून आले , तेव्हा त्यात तो प्रवेश नव्हताच.... कदाचित ते स्क्रिप्ट त्यांच्या हाती लागले असेल...
____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हेरंब's picture

5 Jun 2008 - 6:48 pm | हेरंब

हे नाटक मी एन्.सी. पी.ए. ला पाहिले आहे. अतिशय उत्तम सादरीकरण व सहजसुंदर अभिनय असे या नाटकाचे वर्णन करता येईल. निखिल इतकाच अमृतानेही सुरेख अभिनय केला आहे. कुठेही पहायला मिळाले तर सोडू नका.

मुक्तसुनीत's picture

5 Jun 2008 - 8:27 pm | मुक्तसुनीत

तुम्ही पाहिलेल्या प्रयोगात "अभय" या पात्राचे ते प्रदीर्घ स्वगत होते काय ?

हेरंब's picture

6 Jun 2008 - 5:53 pm | हेरंब

मी पाहिलेल्या प्रयोगात अभयचे स्वगत होते, पण ते प्रदीर्घ वाटले नाही. मी मूळ संहिता वाचलेली नाही.

धनंजय's picture

5 Jun 2008 - 9:49 pm | धनंजय

परीक्षण आवडले.

हे नाटक पुनरावृत्तीचं आहे, मध्ये मध्ये इतर सूर लागतातच पण मुख्य भावना परत परत येत राहतात.. पण संवाद अत्यंत छान, खटकेबाज...नाटक कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं असं फ़ारसं नाहीच...

स्वगत : पण काही प्रमाणात पात्रांचे वेगवेगळे पैलू खुलत असावेत - नाहीतर मास्तरांना ते इतके भावले नसते...

भडकमकर मास्तर's picture

5 Jun 2008 - 11:37 pm | भडकमकर मास्तर

स्वगत : पण काही प्रमाणात पात्रांचे वेगवेगळे पैलू खुलत असावेत - नाहीतर मास्तरांना ते इतके भावले नसते...
हो... पण काही प्रमाणातच वेगळे पैलू खुलतात.... :) ..
मला स्वतःला असली नाटकं फार आवडतात...पण सर्वांनाच आवडतील असंही नाही... ( आमच्या ओळखीचे एक ज्येष्ठ नाटकवाले आहेत त्यांना ही चर्चा करणारी नाटकं अजिबात खपत नाहीत... " अरे काहीतरी घटना तर घडवा रे.." असा त्यांचा अट्टाहास असतो...उदा... खून, मारामार्‍या, तळपत्या तलवारींचे युद्ध, कटकारस्थान वगैरे..असो ..ज्याची त्याची आवड...

एक स्पष्टीकरण...
नाटक रिपीटीशनचं आहे असं खुद्द लेखक स्वतःच म्हणतात...नाटकात एक वाक्यही आहे, अभय म्हणतो," आपल्या गप्पांना सुरुवात, मध्य, शेवट नसतोच्...सुरुवात, मध्य की परत सुरुवात..."

लेखकाच्याच शब्दात..."... प्रश्न असा होता की कितीदा अशी पुनरावृत्ती झाल्यावर बंध लक्षात येईल? आणि कितीदा झालं तर हे फार होईल? प्रेक्षकांचं परत परत तेच होण्याकडे लक्ष जाईल की दरम्यानचं इथे तिथे जाणंही पोचेल त्यांच्यापर्यंत?क्रोएशियातल्या प्रयोगानंतर तिथल्या एका लॅरी झापिआ नावाच्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया हायसं वाटायला लावणारी होती,काही खटकणं तर सोडाच, तो म्हणाला," राजीव, यू हॅव ऍन अमेझिंगली लिरिकल सेन्स ऑफ रेपिटीशन..."

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

या नाटकाची ऑडिशन पास होवू शकलो नाही ..त्याची खूप खंत लागली..
पण ज्यांनी तो प्रयोग केला त्यांनी माझ्यापेक्षा निश्चीतच छान न्याय दिला..

उत्तम नाटक..

सर्किट's picture

6 Jun 2008 - 3:56 am | सर्किट (not verified)

होय, मनोज आणि हेमांगीने खरेच सुंदर केले होते ते नाटक. मी स्पर्धेतील नाटक बघू शकलो नाही, पण त्यांच्या तालमी बघितल्या.

- सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2008 - 10:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या परिक्षणामुळे नाटकांचा परिचय होत आहे.
आणखी नाटकांची परिक्षणे येऊ द्या.

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 11:11 pm | विसोबा खेचर

मास्तर, सुंदर परिक्षण.

पाहिलं पाहिजे हे नाटक....

आपला,
(नाट्यप्रेमी) तात्या.

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 11:13 pm | भाग्यश्री

छान परिक्षण.. नाव खूप ऐकले होते या नाटकाचे.. पण विषय माहीत नव्हता..
असेच अजुन नाटकांबद्दल येऊद्या..

चतुरंग's picture

5 Jun 2008 - 11:34 pm | चतुरंग

"साठेचं काय करायचं?" हे ज्यावेळी रंगभूमीवर आलं त्यावेळी त्याबद्दल चांगले ऐकू आले, ते बघायचे असे ठरवलेले पण ते अचानकच गायब झालेले आठवते.
आता पुन्हा नव्याने त्याचे परीक्षण वाचून निदान संहिता तरी वाचायला मिळावी असे तीव्रतेने वाटते.

(स्वगत - ह्या संहितेचं काय करायचं? :? )
चतुरंग

मेघना भुस्कुटे's picture

6 Jun 2008 - 6:55 am | मेघना भुस्कुटे

मास्तर, अगदी नेमके परीक्षण. आणि प्रास्ताविकातल्याही काय अचूक ओळी उचलल्या आहात हो तुम्ही!

'आताची नाटके'प्रमाणे 'सततची नाटके' आणि 'पूर्वीची नाटके' (नावाबद्दल खात्री नाही बुवा)बद्दल पण लिहा ना काहीतरी. त्यातले ते महाभारताबद्दलचे नाटक आणि स्त्री-पुरुषांतील काही प्रकृतीभेदांबद्दलचे नाटक.. मजा येईल.

राजीव नाईक यांचेच 'नाटकः एक पडदा तीन घंटा' वाचलेच असेल तुम्ही. का कोण जाणे, इतके सुंदर पुस्तक असून त्याबद्दल कुणीच कुठेच बोलताना दिसत नाही. नाटकातला काळ आणि नाटकातला अवकाश याबद्दलचे विवेचन (मान्य आहे, हे जरा किचकट विषयासारखे वाटते!) आहे त्यात. पण किती सहज-सोपे आणि रंजक केले आहे त्यांनी ते. सगळेच विषय सोपे करता येत नाहीत आणि तसे करूही नयेत. पण हा काहीसा तांत्रिक विषय त्यांनी उदाहरणे घेऊन इतका छान लिहिला आहे, की त्या पुस्तकाला जवळ जवळ एखाद्या कादंबरीइतके पकडमूल्य आले आहे.

मी बर्‍याच वाचणार्‍या मंडळींना हौसेहौसेनं हे पुस्तक सुचवले. पण कुणाकडूनच काहीच प्रतिसाद आला नाही. नकारात्मकही नाही आणि होकारात्मकही.

तुम्ही लिहाल का त्याबद्दल?

भडकमकर मास्तर's picture

6 Jun 2008 - 9:06 am | भडकमकर मास्तर

धन्यवाद....
सततची नाटकं आणि मधली नाटकं...
हे दोन संग्रह शोधायच्या प्रयत्नात आहे बराच काळ... पटकन दिसत नाहीत कुठे...
'नाटकः एक पडदा तीन घंटा नाही वाचलंय... मिळालंच नाही... पण आता आवर्जून शोधून वाचतो ... नक्की लिहीन त्याबद्दल....
कुणाकडूनच काहीच प्रतिसाद आला नाही. नकारात्मकही नाही आणि होकारात्मकही.
माझं असं खूप वेळा होतं .... अरे आमच्या सूचनेवर पाहिजे तर टीका करा पण दुर्लक्ष नका रे करू ;) ;) ...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jun 2008 - 8:44 am | प्रकाश घाटपांडे

या ज्योतिषाच काय करायचं? हा साप्ताहिक सकाळ १७ मे २००८ चा डॉ एन सी एडल यांचा लेख वाचला. त्या शिर्षका वरुन मला " साठेचं काय करायचं? " हे आठवलं . मास्तर लई भारी लिहिता बर का? त्याच्या मुळे आम्हाला नाटक जरा नीट पहाता येतात. हे नाटक आले कि पाहू.
तुम्हि लिहिल्या मुळे ज्याच त्याच अभयारण्य पाहिल होतं आवडलं.
प्रकाश घाटपांडे

शितल's picture

6 Jun 2008 - 6:09 pm | शितल

" आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"..

हे वाचुन तर ते नाटक पहाव असे वाटते.

मनिष's picture

6 Jun 2008 - 6:09 pm | मनिष

जरा (अती) सविस्तर प्रतिक्रिया ह्या नाटकाच्या निमित्ताने...
http://www.misalpav.com/node/2010

अरुण मनोहर's picture

8 Jun 2008 - 8:19 am | अरुण मनोहर

आपले हे परीक्षण वाचायचे राहूनच गेले होते. पण त्यातून उगम पावलेली मनीषची चर्चा वाचली होती. परीक्षण चांगले आहे सर.

उद्या, पुण्यात - सुदर्शनला आहे हे नाटक; संध्याकाळी ७ वाजता. मी जमले तर नक्की येतो!

मनिष's picture

10 Apr 2014 - 12:04 am | मनिष

गेल्या महिन्यात विनोद दोशी महोत्सवात राजीव नाईकांचेच नवीन नाटक 'बंदिश' पाहिले. खूप अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, अ‍ॅब्सर्ड असे वाटले. प्रायोगिक नाटकांचे वावडे नाही, पण काहिही करावे का? कोणी पाहिले का? कसे वाटले?

नाट्य अभ्यास वर्गात (Understanding Theatre) ह्या नाटकाविषयी चर्चा झाली म्हणे, तर तिथली मंडळी (ररा इ.) काही प्रकाश टाकतील का?

रमताराम's picture

10 Apr 2014 - 7:01 pm | रमताराम

बंदिश' या नाटकाबाबत मी नुकतीच एक नोट फेसबुकवर शेअर केली आहे. ती बरीच मोठी असल्याने इथे पेस्ट न करता फक्त दुवा देतो आहे.

मनिष's picture

10 Apr 2014 - 7:05 pm | मनिष

हे आपलं बोलणं झाल्यावर एका तासात लिहिलं का?
_/\_

रमताराम's picture

10 Apr 2014 - 7:44 pm | रमताराम

तुला धन्यवाद द्यायला पाहिजे याबद्दल. एरवी लिहिलं नसतं, कंटाळा दुसरं काय. कुणाला वाचावसं वाटतंय हे समजलं तरच लिहायची तसदी घेतो. एरवी नुसते लाईक करणार्‍यांसाठी हे सगळं टाईप करायचा कंटाळाच येतो.

एका तासात एवढे सगळे? मला ४-६ ओली लिहायलास अर्धा तास लागतो!
धन्य आहात! :-)