ती फक्त भीतीची लाट आहे..ती जाईल.. तिला महत्त्व द्यायचं नाहीये..
आणि आता तर डांबरी रस्ता आहे.. वाळूपण नाही..पटकन पोचता येईल..एकदा गोळ्या मिळाल्या की झालं. लॉजचा एक जिना.. की मग बस्स.. खोली लपेटून झोपून टाकू.. झोप झाली की होईल रिसेट..
..लॉजपर्यंत पाय पुढे पुढे टाकत राहायला पाहिजे.. पावलं मोजता येतील हवीतर...
........................
पोचलो सन मेडिकोपर्यंततरी.. लाट ओसरल्यासारखी वाटतेय आता.. पण स्ट्रिप घेऊन ठेवायला हवी..
"ए छोटे, झॅपिझ दे एक स्ट्रिप.."
....
"अरे मेरा हमेशा का मेडिसिन है रे.. पूछ तेरे बॉसको.. मालिक.. बोलो तुम्हारे लडके को एक स्ट्रिप देनेको.."
.....
स्ट्रिप हातात आली की आधार होतो एकदम.. तेवढ्यानेच बरं वाटायला लागतं..
आता लॉजवर पोचायचं एवढंच काम राहिलंय..
पण लॉजवर पोचलो तरी जरावेळाने भूक लागेल.. रात्री पोटात वेठ वळले की झोप येतच नाही.. मग आत्ता खाणं पटकन उरकून घेऊ काय?
उभ्याउभ्यापण चालेल..
"एक मैसूर मसाला दे.. मस्का ज्यादा डाल जरा...."
चर्र...
मोकळा आहे डोसेवाला म्हणून बरं, नाहीतर किती वेळ वेटिंग..
..........
.........
मस्तच केलाय डोसा.. याचा नेहमीच छान असतो..
"और एक ऐसाही बनाव.. मस्का डाल हां ज्यादा.. पहेले में बोलके भी कम डाला रे तूने.."
गबागब खाणार आज तेच्यायला... बरं वाटतंय.. खूप खूप बरं..
खाल्लं की मस्त... म्हणजे खाताना सगळे त्रास मागे पडतात.. टाईमप्लीज्ज... लहानपणच्या खेळात असायची की.. तशी..
पण खाणं कधीतरी संपणार.. पोट तट्ट होणार.. मग??? मग पुन्हा रिकामे.. पुन्हा काहीतरी कुरतडत बसणार मनाला.. जितका वेळ जमेल तितकं खायचं.. मग पुढे बघू..
............
............
तडस लागते पोटाला एवढ्यानेच आजकाल..
चलो चलो भई लॉजको चलो..
एक जिना चढायचा की दुसर्या जिन्याखालीच खोली..दुसरा जिना चढायचा प्रश्नच नाही..
मग मस्त अंधार करुन झोप काढायची..
........
जिन्याच्याखालची खोली का होईना पण मिळालीय कमी रेटमधे.. नायतर काही खरं नव्हतं..
जिनाच अर्ध्या खोलीतून जातो.. लाकडी जिने आणि लाकडी फळीच्या भिंती असल्यामुळे इथे प्रत्येक जाणार्यायेणार्याची पावलं ठकाठक वाजतात..
सवय काय प्रत्येक गोष्टीची होते.. आता बरोब्बर कळतं कितीजण चढून गेले वर..
सगळी बॅचलर पोरं, नवीनवी नोकरी लागलेली नाहीतर झगडणारी.. मी एकटाच बेकार..
मी कधीच कोणाच्या ठकठकीने दार उघडत नाही.. मग ती पोरं समजतात की मी पिऊन लास झालोय आत म्हणून..
मी पितो.. अगदी रोज.. पण लास होत नाही.
मी टक्क जागा असतो.. पण दार उघडत नाही..
संध्याकाळी बाहेर येतो थोडावेळ.. झाडाला पार हल्ली कुठे असतो का? पण आमच्या लॉजमधे आहे..त्यावर बसतो..
या पोरांकडे पैसे मागायला लाज वाटते. पण कधीकधी मागितलेले बरे असतात.. साठवलेल्यातून किती महिने आणि किती वर्षं चालणार??
पुन्हा मोठा प्रॉब्लेम असा की मी बर्याचदा भानावर नसतो.. म्हणजे ते मगाशी एकदम घाबरलो तिच्या आठवणीने ते..समुद्रावर जायलाच नको होतं.. पण कधीतरी लक्षात येत नाही.. फिरत फिरत जाऊन बसलं की जरावेळाने लक्षात येतं की समुद्रावर बसलोय म्हणून.. मग तेवढ्यात भीतीची लाट आली तर धडपडून उठायचं.. आज झालंच की..
त्यात एवढं घाबरायची गरज नव्हती.. म्हणजे तिच्या बाबतीतल्या आठवणी येतात तेव्हा एकदम घुसमटायला होतं हे खरं.. जीव जाईल असं वाटतं हेही खरं.. पण ...
किती वर्षं झाली त्याला आता.. शांत झाल्यावर कळतं ना ते.. पण ती लाट आली की सगळंच भान सुटतं..
सगळा गेलेला काळ एकदम अंगावर येतो.. एका सेकंदात सगळं होऊन संपावं तसं.. खूप भीती वाटते..
...........
हा आला आनंद.. माझ्या वर एक मजला.. तिथे त्याची रूम आहे.. लग्न करणार आहे आता.. जागा शोधतोय म्हणत होता.
पैसे हवेत.. मुख्य म्हणजे आज आणि उद्या बाहेर जायला धाडस होईलसं वाटत नाही. बँकेपर्यंत जायला होणार नाही.. आणि या पोरांना त्यांच्या नोकर्यांच्या वेळात बँकेत जायला सांगताही येत नाही..आणि ..गोळ्या तर आज आणल्या आहेत.. पण हाताशी पैसे ठेवायला हवेत..
बँकेत किती उरलेत ते बघितलं तर अजूनच भीती सुरू होते.. पुढेपुढे भीक मागण्याची वेळ येऊ नये अशी इच्छा तर आहे. पण हातात काही नाही.. जगावंसं वाटतं सालं.. जगावंसं वाटतं..
..........
"ए.ए.. आनंदा.. जरा एक शंभरची जुळणी होईल का रे.."
.....
"अडचण म्हणजे..जरा कणकण आहे कालपासून.. आज औषध आणीन म्हणतो शहाकडे जाऊन..शंभर बास.."
....
"थँक्स रे.. थँक्स..."
........
.................
खोलीत एकदम गार झालंय.. गारठाच..
थोडीशी घेतो..
साध्या दारुचंही मॅनेज होत नाही दिवसेंदिवस.. ओल्ड माँक स्वस्त म्हणून ती परवडायची.. एकदम आणून ठेवायचो.. पण आता एकदम रातराणी.. लोकल ब्रँडने पोटात आग पडते.. पण नाही घेतली तरी खोलीसुद्धा खायला उठते. फक.. हा फक शब्द या पोरांच्यातलाच.. बरा वाटतो..
......
तिच्याकडे एकदा गेलोही होतो की लग्नानंतर.. मोठ्या घरामधे रहात होती.. माझ्याने कधीच झालं नसतं एवढं मोठं घर..
गिफ्ट तरी काय नेणार.. तिचं लग्न झालेलं.. मग माझी चांदीची नक्षीदार डबी दिली तिला.. लहानपणापासून सांभाळून ठेवलेली एकच वस्तू होती.. त्यात लहानपणी वीसपंचवीस पैशाची नाणी साठवून ठेवायचो..आता रिकामी झाली होती.
ती दिली.. आठवण म्हणून..
पण तिला देताना खूप काहीतरी दिल्यासारखं वाटलं.. तिला समजलं की नाही कोण जाणे..
तिने मला जेवायला भात आणि कुळथाचं पिठलं केलं होतं.. कधीतरी मी आवडतं असं म्हटल्यामुळे ते लक्षात ठेवून...
तिचा नवरा दिसायला बरा होता पण टक्कल पडलेला..
त्याने जेवणाच्या ताटावर माझ्यासमोर बसून बोलताबोलता तिच्या खांद्याभोवती हात टाकून तिला जवळ घेतली..वाढायला उभी होती ती..
माझ्या घशाखाली भात उतरेना.. एकदम ताबा सुटेल आणि तिच्या नवर्याला काहीतरी करीन अशी भीती वाटली..
मी पाणी मागितलं आणि थोडावेळ भात चिवडून उठलो..
मेमरी आहे सगळी तश्शीच्यातश्शी.. शाबूत..
.........
मला ती मिळाली नाहीच..
मला कोणीच मिळालं नाही..
ही पोरं मदत करतात..
पण माझं कोणीच नाही...
मला आपल्या घरात ठेवून घ्यायला कोणी नाही.
सगळे मागे मागे पडले आहेत..
ती मागे पडत नाही.. ती हवी होती..
आता बरेच घोट झाले.. झोप येत्येय ती त्यामुळेच असणार..
...
बाहेर ठकठक होतेय.. पैसे मागतोय कोणीतरी..
थोड्याथोड्या दिवसांनी मागतात कोणीकोणी असे पैसे परत..
आत्तातरी मी दार उघडणार नाही... वाजवू देत.. जरावेळ वाजवेल आणि जाईल..
काय समजेल तो....
समजेल की लेलेआजोबा पिऊन लास झालेत..झेपत नाही तरी पितो थेरडा..
समजूदेत..
...............
...................
(एंड..)
प्रतिक्रिया
9 Nov 2011 - 5:36 pm | मदनबाण
कंपल्सरी एंड केला काय ?
लिहलय मात्र जबराट !
9 Nov 2011 - 9:51 pm | मन१
खरंतर वरवर चाळले; इंटारेष्ट्रिंग वाटतय.
लेल्यांबद्द्ल वाइट वाटलं.
बाकी गवि, आल्याआल्या त्या मरणाच्या संबंधित धाग्यांनी डोक्याची पार मंडई केलीत आता असे नैराश्य येनारे काहितरी.
प्रभावी लिहिता येतय म्हणून उगीच ह्या अटळ भयाणतेनं आमची लाइफ का खराब करताय?
9 Nov 2011 - 6:02 pm | प्रभाकर पेठकर
पहिल्या लेखापेक्षा हा लेख जरा चांगला जमून आला आहे. अभिनंदन.
9 Nov 2011 - 6:06 pm | उदय के'सागर
खुपच छान लिहीलय. वाचतांना एखादा "ऑफबीट्/आर्ट-फिल्म्/पॅरेलल सिनेमा/प्रायोगीक" चित्रपटच जणु डोळ्या समोर चालु होता असं वाटलं.
9 Nov 2011 - 8:14 pm | प्रचेतस
_/\_
गवि मानलं राव.
अफलातून शेवट केलाय.
9 Nov 2011 - 8:19 pm | रेवती
दुसरा भाग तितकासा आवडला नाही.
प्रेमभंग झाल्यावर आयुष्याची अशी माती करून घेतलेली पाहिल्यावर त्या मुलीला लेलेबुवांशी लग्न न झालेलंच परवडलं म्हणायला हवं.
10 Nov 2011 - 11:55 am | वपाडाव
प्रत्येक कथेचा अंत राज-प्रिया लग्न करुन सुखी-सुखी नांदावे असाच असावा असा हट्ट असावाच लागतो का?
नाही होत कधी कही सुखांत.... (आठौलं, हा पिच्चर पाहायचा राह्यलाय)कधी लग्न होत नाही दोघांच... कधी पोरगा नंतर चांगल्या मार्गाला लागतो.... दोघेही त्यांच्या त्यांच्या संसारात सुखी होतात.... किंवा जातो एखाद्या पाण्यात लाटेवर वाहत.... करतो आयुष्य उध्वस्त...तसंच लेल्यांनीही केलं....
पटतंय का आज्जी ???
गवि, __/\__
एंड भावला..... अजुन नसतं आलं ताणता.... सुरेख
10 Nov 2011 - 8:53 pm | रेवती
प्रत्येक प्रेमप्रकरणात दोघांचं लग्न दरवेळी व्हायलाच पाहिजे असं नाही म्हणत मी.
प्रेमभंग हाही आयुष्याचा भाग आहे असं समजून निदान बरं तरी राहता आलं पाहिजे ना!
इतकं भिकेला लागायचं म्हणजे काय अर्थ आहे?
त्यांच्या मनाची शक्ती एवढीच का?
हेच जर लग्न झाले असते तर कोणत्याही संसारात यापेक्षाही मोठी संकटे येऊ शकतात.
त्यावेळीही हातपाय गाळून बसण्याची शक्यताच जास्त.
म्हणजे त्या बाईला एकटीला आलं का निस्तरणं?
असं भणंग राहून तरी त्या व्यक्तीला स्वत:ला आनंद आहे की त्या लग्न झालेल्या बाईला?
त्रास करून घ्यायचा आहे ना? मग घ्या की स्वत:ला करून, दुसर्याला आयुष्यभर सोसायला लावायचं हे खर्या प्रेमाचं लक्षण आहे काय? आपल्या आयुष्यातील जबाबदार्या ओळखल्या की असं उधळून देताना हज्जारदा विचार केला जातो. तरीही तू म्हणतोस तसं एखादा (खरंतर अनेक) असं वाहवत जाऊ शकतो हे मान्य करून मी माझे भाषण संपवते.
9 Nov 2011 - 8:54 pm | पैसा
लेल्याला कोणाचीही मदत, सपोर्ट नाही म्हटल्यावर हाच शेवट शक्य होता. असे खूप लोक असतात, जे स्वतःच्या विनाशाची तयारी करत असतात, त्यातून त्याना मागे ओढणारं काही असेल तर या अवस्थेतून बाहेर येऊ शकतात, नाहीतर.....
10 Nov 2011 - 1:20 am | प्रभाकर पेठकर
लेले आजोबा अत्यंत कमकुवत मनाचे आहेत असे दिसते आहे.
जिच्यावरचे प्रेम कधी व्यक्तही करता आले नाही तिच्या आठवणींनी आजोबा वयाला पोहोचेपर्यंतही त्यांना वस्तूस्थिती स्विकारता आली नाही.
मला ती मिळाली नाहीच..
मला कोणीच मिळालं नाही..
म्हणजे लेले आजोबांनी 'ती' मिळत नाही समजल्यावर 'दूसरी कोणी मिळते का पाहावे', असा प्रयत्न करून पाहिलेला जाणवतो आहे. म्हणजे 'तिच्या' वरचे प्रेम तितकेसे उदात्त वगैरे नसावे. दुसरी कोणी मिळाली असती तर लेले आजोबा 'तिला' विसरले असते.
मला आपल्या घरात ठेवून घ्यायला कोणी नाही.
लेले आजोबांनी आयुष्यात 'ति'च्यावर प्रेम करण्या व्यतिरिक्त इतर नोकरी व्यवसाय काही केल्याचा कुठे उल्लेख नाही आणि वयाने आजोबा बनेपर्यंत ते हक्काची एक खोलीही घेऊ शकले नाहीत. म्हणजे वाचली बिचारी म्हणायची 'ती'.
पैसे मागतोय कोणीतरी....
थोड्याथोड्या दिवसांनी मागतात कोणीकोणी असे पैसे परत....
आत्तातरी मी दार उघडणार नाही... वाजवू देत.. जरावेळ वाजवेल आणि जाईल..
पैसे मागताना खोटीनाटी औषधाची कारणे सांगायची आणि पैसे परत करायची वेळ आली कि वरील प्रमाणे विचार व्यक्त करायचे ह्यातून लेले आजोबांचा स्वार्थी स्वभाव डोकावतो. पुन्हा ....वाचली बिचारी 'ती'
लेले आजोबांच्या ह्या स्वभावदोषांमुळेच कथेचा शेवट 'अपरिहार्य' ठरतो.
10 Nov 2011 - 2:52 am | गवि
+ 100
10 Nov 2011 - 8:20 am | नगरीनिरंजन
परंतु उदात्त प्रेम वगैरे कविकल्पना वाटतात. प्रेमभंग झाल्यावर लग्न न केलेले, भकाभक सिगारेटी ओढणारे पण व्यावसायिक आयुष्यात यशस्वी असलेले लोकच उदात्त प्रेम करतात की काय?
"ती वाचली" हे खरंच असलं तरी ते फक्त एका पठडीतल्या दृष्टीकोनातून. त्याला त्याच्या आवडीचं करून जेवू घालते हे संशयास्पद आहे. तिच्या मनात असलेल्या अपराधी भावनेचं निदर्शक तर नाही?
त्याच्या भावनांची कल्पना असूनही भविष्याचा विचार करून दुर्लक्ष करण्याचा 'व्यवहारीपणा' तिच्याकडे होता की काय?
असे अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करून या चिरंतन वैफल्याच्या कथेचं हे आवर्तन इथे थांबतं.
कथा आवडली.
10 Nov 2011 - 9:16 am | गवि
ननि.. धन्यवाद..
लेलेंनी तिला विचारलंच नाही असं त्यांनीच म्हटलंय. त्यांना एकूण काहीच जमलेलं नाही, त्यांना कधीच कशाचाच कॉन्फिडन्स नव्हता, आणि ते साठून आलेलं आहे.
पण अर्थात तिनेही विचारलं नाही हेही खरं.
त्यांचं प्रेम उदात्त आहे किंवा लेले ढोंगी नाहीत किंवा अन्य काही लेलेंचा सदगुण मुळीच दाखवायचा नाहीये..
तुझा आणि सर्वांचेच प्रतिसाद आवडले..
10 Nov 2011 - 9:29 am | प्रभाकर पेठकर
प्रेमभंग झाल्यावर लग्न न केलेले, भकाभक सिगारेटी ओढणारे पण व्यावसायिक आयुष्यात यशस्वी असलेले लोकच उदात्त प्रेम करतात की काय?
असं मलाही वाटंत नाही.
प्रेमभंग झालेले लोकंही व्यावहारीक आयुष्य जगतात. पुन्हा लग्नाचा विचार केला नाही तरी गतस्मृतींना गोंजारित बसत नाहीत. वास्तव स्विकारून पुढील वाटचाल करीत राहतात. आपल्या प्रेमाला प्रामाणिक राहून दूसर्या कोणाबरोबर आयुष्य व्यतित करणं त्यांना रुचत नाही. ह्या त्यागात उदात्तता असते. (निदान त्यांना तरी ती वाटत असते).
तरूणपणीच्या एकतर्फी प्रेमभंगाच्या जखमेवर कालांतराने खपली धरते पण अर्थात त्या साठी मनाचा थोडा तरी खंबिरपणा लागतोच. तोच लेले आजोबांकडे नाही असे मला कथा वाचून जाणवले.
10 Nov 2011 - 10:07 am | गवि
पेठकरकाकांची निरिक्षणं अगदी बरोबर आहेत.
तरूणपणीच्या एकतर्फी प्रेमभंगाच्या जखमेवर कालांतराने खपली धरते
अगदी अगदी.. आजोबा होण्याच्या वयापर्यंत कशाला, अगदी चाळिशीपर्यंतही "तिचा" चेहराही नीट लक्षात राहील की नाही इतपत पुसली जाते त्यातली तीव्रता..
पण ते सर्व अन्यत्र सेटल झाल्यावर. ज्याच्या आयुष्यात सदोदित फेल्युअर आहे किंवा ज्याच्यात तेवढा दमच नाही त्याला शेवटी कधीतरी सगळं अंगावर यायला लागतं, त्यावेळी , या बाबतीत लेले आजोबांना तिची आठवण पुन्हा येऊ लागली असावी.. आणि अधिकच्या रिकामेपणाने सिलेक्टिव्ह मेमरी म्हणून ती एकदम तीव्र झाली असावी. याचा अर्थ मला नाही वाटत की विशी-तिशीपासून टिल डेट तीसचाळीस वर्षं रोज दिवसरात्र ते तिचाच ध्यास घेऊन बसलेत..
कोणी सांगावं अशाच इतरही "लाटा" येत असतील रोज नव्यानव्या.. आज तिची लाट असेल.. :)
10 Nov 2011 - 11:01 am | नगरीनिरंजन
हे परफेक्टली पटलं. आयुष्यात सगळं उलटं दान पडलेल्या किंवा लहानपणीच्या वाईट अनुभवांमुळे पुढे सतत कशालातरी घाबरून काहीच न करू शकलेल्या माणसाने आपली विफलता झाकण्यासाठी अशा कुठल्या कुठल्या क्षुल्लक दु:खांना गोंजारून ठेवावं तसं मुळात कशात काही नसलेलं दु:ख लेले आजोबांनी अतिरंजित करून ठेवलेलं जाणवतं.
मुळात ते दु:ख प्रेमभंगाचं नसून आपल्याला काहीच जमलं नाही, आपण कमकुवत आहोत, अपयशी आहोत याचंच असावं.
10 Nov 2011 - 12:48 pm | मन१
संपूर्ण चर्चा मूळ लेखाहून अधिक आवडली.(वयाचा परिनाम आहे का?)
फक्त एक नाही समजले:-
>> म्हणजे लेले आजोबांनी 'ती' मिळत नाही समजल्यावर 'दूसरी कोणी मिळते का पाहावे', असा प्रयत्न करून पाहिलेला जाणवतो आहे. म्हणजे 'तिच्या' वरचे प्रेम तितकेसे उदात्त वगैरे नसावे.
म्हणजे? असे असलेच पाहिजे का? आपले "उदात्त" आहे हे दाखवण्यासाठी जर ती काही कारणानं निघून गेली तर जन्मभर एकटे/एकाकी/एकमग्न्/द्विभुज्/मनोव्याकूळ असेच रहावे का? "ती" तिच्या संसारात सुखी असेल आणि "हा"ही धोपट मार्गाला लागला, भल्या रस्त्याला लागला तर काही चुकतय असं म्हणायचय का? सोडून गेल्यावरही दोघेही आपापले आयुष्य ठिकठाक व्यतीत करताहेत तेही कुठलाही कडवटपणा न ठेवता(काहीसे चांगले,निखळ, मैत्रीपूर्ण संबंध ठेवताहेत) हे चित्र शक्यच नाही असे वाटते का?
10 Nov 2011 - 9:07 pm | पैसा
सामान्य माणसाच्या बाबतीत तू म्हणतोयस ते बरोबर आहे. पण लेले आजोबा 'तिला' विचारू शकला नाही, आयुष्यात काहीच करू शकला नाही, यावरून त्याच्या मनाचा कमकुवतपणा सिद्ध होतो. लेले हा सरळच मनोरुग्ण आहे. अगदी वेड्यात जमा नसला तरी निराशा आणि भीती यांचा शिकार.
जेव्हा कोणताही माणूस किंवा अगदी प्राणीसुद्धा एखाद्या आघाताला सामोरा जातो तेव्हा तो एक तर प्रतिकार करतो, किंवा पलायन. या कथेत लेले परिस्थितीचा प्रतिकार करू शकला नाही, त्यामुळे त्याने एकदा जो पलायनवाद स्वीकारला, तोच आयुष्यभर चालू ठेवला.
गोळ्यांच्या आहारी जाणे, दार न उघडणे यात पलायनवादच दिसून येतो. त्यातही दुर्दैव म्हणजे अशा परिस्थितीत सापडलेला माणूस स्वतःला त्यातच कम्फर्टेबल समजायला लागतो. आपण परिस्थितीचा प्रतिकार करू शकत नाही हे त्याल कळतंय, पण आता पळून जाण्याशिवाय इतर काही मार्गही नाही. हे एक दुष्टचक्र आहे आणि लेले त्यातून आता बाहेर पडणं शक्य नाही.
11 Nov 2011 - 2:23 am | प्रभाकर पेठकर
म्हणजे? असे असलेच पाहिजे का? आपले "उदात्त" आहे हे दाखवण्यासाठी जर ती काही कारणानं निघून गेली तर जन्मभर एकटे/एकाकी/एकमग्न्/द्विभुज्/मनोव्याकूळ असेच रहावे का?
असे मी म्हणत नसून ते एक सर्वसाधारण निरिक्षण आहे. लेले आजोबांच्या त्या मुली बाबतच्या भावना इतक्या तिव्र दाखवल्या आहेत की त्यांना तथाकथित वेडाचे झटके येत आहेत. त्या मुली बद्दल भावना इतक्या तिव्र असूनही त्यांनी 'दूसरी कोणी मिळाली तर पाहावी' असा प्रयत्न केलेला दिसतो हा कथेतील किंवा लेले आजोबांच्या स्वभावातील विरोधाभास आहे हे मला अधोरेखित करायचे होते.
उलट मी तर म्हंटले आहे एकतर्फी प्रेमभंगाची तिव्रता इतक्या काळापर्यंत (म्हातारपणापर्यंत) राहात नाही आणि माणूस आपल्या आयुष्यात एकटा किंवा नविन जोडीदारासह रमतो.
9 Nov 2011 - 11:37 pm | नावातकायआहे
जवळुन पाहिलेली अशीच एक व्यक्ति होती. ....
त्याच क्रियाकर्मही 'उधारी' वाल्यांनी केले. मयतीला सगळेच बुडालेले (?)
10 Nov 2011 - 2:32 am | सुहास झेले
शब्द नाहीत गवि... मानलं !!
10 Nov 2011 - 3:30 am | पाषाणभेद
सुंदर लेखन गवि
10 Nov 2011 - 9:36 am | प्यारे१
पहिल्या भागाच्या वाचनानंतर उगाचच दया, अरेरे, काय ही ह्याची अवस्था असे वाटत असताना दुसरा भाग मात्र चीड आणतो.
'ह्याड्ड्ड्ड्ड तिज्यायला, आधीच का नाही मेलं' हे म्हणण्याइतपत.
-कॉलेजात विषय गेले म्हणून डिप्रेस्ड आणि उगाच भकास आयुष्य जगलेला पण आता पूर्ण सावरलेला प्यारे.
10 Nov 2011 - 9:39 am | किसन शिंदे
पहिल्या भागाच्या सुरूवातीपासून ते ह्या भागाच्या शेवटून तिसर्या ओळीपर्यंत माझ्या डोळ्यासमोर प्रेमभंगाच ओझं उराशी बाळगून निराशेच्या खोल गर्तेत वाहवत जाणार्या एका तरूणाचं चित्र निर्माण झालं होतं. :O
पण इथे गोष्ट तर वेगळीच आहे. ;)
10 Nov 2011 - 12:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
__/\__
10 Nov 2011 - 1:38 pm | शाहिर
लै भारी ओ ...
तिचा नवरा दिसायला बरा होता पण टक्कल पडलेला..
टकलावर भारी राग बुवा तुमचा :)
10 Nov 2011 - 3:45 pm | गणेशा
अप्रतिम गवि ...
हा भाग खुप सुंदर झाला आहे, गति ही उत्तम..
एखादे नाटकच पाहत आहे असे वाटले वाचताना...
11 Aug 2023 - 2:34 pm | विजुभाऊ
मिपा च्या खजिन्यातला हा एक मोती. गविं
11 Aug 2023 - 9:05 pm | सुरिया
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा.
.
.
परफेक्टच की.
12 Aug 2023 - 9:54 am | विवेकपटाईत
कथा आवडली. रात्रीच्या वेळी अशी कथा वाचल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात. .