कोठे जाशी भोगा...!!

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
11 Oct 2011 - 11:11 am

''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा....

''ताई, हे तर आमच्या भागातले प्रसिद्ध राजकारणी आहेत हो मोठे! खूप वट आहे हां त्यांचा.... इथं बऱ्याच जमिनी, इमारती, शॉपिंग मॉल्स त्यांच्याच मालकीची आहेत. सगळीकडे होल्ड आहे म्हणे त्यांचा! कोणीही त्यांच्याकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा.... दिलेला शब्द पडू देत नाहीत म्हणून रुबाब आहे बरं का त्यांचा... आमच्या इथे लोक त्यांना देव मानतात देव!'' कार चालवत असलेले डॉक्टर पटेल मला सांगत होते. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या मिसेस पटेलने पुष्टी जोडली, ''आमचा हेल्थ क्लब त्यांच्याच मालकीच्या इमारतीत आहे.... उद्घाटनाला आले होते ना ते साहेब! माझा फोटो आहे त्यांच्याबरोबरचा.... आपण कार्यक्रम संपल्यावर घरी जाऊ तेव्हा दाखवेन हं तुम्हाला!''

कार्यक्रम... हो, मुंबईच्या एका टोकाला असलेल्या त्या उपनगरात आज सायंकाळी माझा कार्यक्रम होता. डॉक्टर पटेल व त्यांच्या सौभाग्यवती स्वागत समितीत होते. त्यामुळे माझी खातिरदारी करणे, ने-आण करणे वगैरे जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या भागात नव्यानेच राहायला आलेल्या पटेलांना त्यांच्या 'साहेबां'ची व त्यांच्या बंधूंच्या नानाविध उपक्रमांची जास्त काही माहिती नव्हती, आणि त्यांना ती माहिती करून देण्याची मला इच्छाही नव्हती. आम्ही कार्यक्रम-स्थळाच्या वाटेवर असतानाच मला ते होर्डिंग दिसले काय आणि मनात गतस्मृतींचे मोहोळ माजले.....

---------------------------------------------------------------------------

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील ती एक मेंगळट दुपार होती. आमच्या सीनियर वकील मॅडम मुंबईला गेल्याचे निमित्त करून मी व माझी मैत्रीण आवारातच एका बाजूला गप्पा टाकत उभ्या होतो. दुपारचा एखादा पिक्चर टाकावा की आमची बसंती गाडी उडवत कोरेगाव पार्कमधून चक्कर मारावी यावर गहन खल करत असतानाच अचानक आवारातील पोलिसांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचे दोघींच्या लक्षात आले. आजूबाजूला पक्षकार, वकील वगैरे मंडळींची नेहमीसारखीच कोंदट वर्दळ होती. पण खाकी वेषातील एवढ्या संख्येतील पोलिसमामा आता अचानक इथे या गर्दीत काय करत आहेत याबद्दलचे कुतूहल आम्हाला जाणवू लागले. कोणाला तरी विचारावे का, वगैरेवर मंथन करत असतानाच अचानक मैत्रिणीने माझ्या बाहीला खेचून मला एका बाजूला ओढले. दुसर्‍या सेकंदाला साध्या व खाकी वेषातील पोलिसांचा ताफा माझ्या अंगाला अगदी चाटून पुढे गेला. त्यांच्या खाड् खाड् बुटांच्या तालात त्या घोळक्याच्या बरोबर मधून चार-पाच व्यक्ती चालल्या होत्या त्यांनी आमचे लक्ष वेधले....

त्यातील एक व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. मोठमोठ्या केसेसमध्ये आपल्या बुद्धिचातुर्याच्या व युक्तिवादाच्या जोरावर आरोपींना निर्दोष सिद्ध करण्यात त्यांचा हातखंडा. गेली अनेक वर्षे त्यांनी हाताळलेल्या वेगवेगळ्या नामी केसेसमुळे त्यांचे मोठे नाव होते. पण आज तेही त्यांच्या शेजारून चालणार्‍या व्यक्तीशी काहीशा अदबीने हसत व बोलत होते. कोण होती ती व्यक्ती? सर्वसाधारण उंची व मध्यम बांधा... सावळा वर्ण.... पांढरे शुभ्र परिटघडीचे कपडे... गळ्यात रुळणारा सोन्याचा जाडसर गोफ.... चेहर्‍यावर एक प्रकारचा मग्रूर, बेदरकार भाव....चेहरा काहीसा ओळखीचा वाटत होता... तेवढ्यात आमच्या समोरून जाणार्‍या त्या घोळक्यात कशावरून तरी खसखस पिकली.... सोबतचे पोलिसही त्या हास्यात सामील झाले. पोलिस, वकील, आरोपी व आरोपीबरोबरचे त्याच्यासारख्याच शुभ्र सफेद कडक वेषातील साथीदार....!! माय गॉड! मला व मैत्रिणीला एकाच क्षणाला तो 'अहोऽसाक्षात्कार' झाला.......!!

''अगं, आजच पेपरात फोटो आलाय ना पहिल्या पानावर या माणसाचा...''
''ओह नोऽऽ.... यू मीन... टाडा... गँगवॉर???''
''येस, येस... टाडा कोर्टात केसची सुनावणी चालू आहे अशी न्यूज आली आहे पेपरात...''
''जायचं आपण?''
''काय वेड-बिड लागलं का? ते घेतील तरी का आपल्याला आत?''
''प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि आपण पण वकील आहोत.... आय मीन... होणार आहोत! आपण थोडीच त्यांना डिस्टर्ब करणार आहोत? चल, जाऊन बघूयात तरी....!!!''

चार लोकांचे रस्त्यावर भांडण चालू असले की त्यांच्या आजूबाजूला ज्या उत्सुकतेने बघ्यांचा गराडा पडतो अगदी त्याच सवंग उत्सुकतेने मी व मैत्रीण टाडा कोर्टाच्या दिशेने झेपावलो. जिन्यापाशी पावले पुन्हा एकदा थबकली. जावं की न जावं? सोडतील का आत? ओळखपत्र वगैरे विचारलं तर सरळ कॉलेजचं ओळखपत्र पुढं करायचं असं ठरलं आणि मग उसना धीर गोळा करत आम्ही दोघी टाडा कोर्टासाठी जी खोली राखून ठेवण्यात आली होती तिच्या दिशेने वळलो. खालच्या गर्दीचा कोलाहल इथे अजिबात जाणवत नव्हता. दगडी बांधकामाच्या पॅसेजमधील गारवा आज अंगावर शिरशिरी उमटवून जात होता....

खोलीच्या दाराशी दोन सशस्त्र पोलिस उभे होते. आम्ही त्यांच्याकडे न बघताच दडपून आत शिरलो आणि तिथेच खुळचटासारख्या उभ्या राहिलो.

खोलीतल्या मागच्या व मधल्या भागातील बहुतेक सर्व खुर्च्या आणि बाकडी भरलेली होती.... आरोपीच्या माणसांनी!! म्हणजे त्यांच्या बाजूला काही तशा पाट्या नव्हत्या लावलेल्या.... पण एकंदरीत वेषावरून ही माणसे नेहमीची वाटत नव्हती. आरोपीचे वकील व सरकारी वकील आपापल्या फायली, कागदपत्रे व सहकारी मदतनिसांशी बातचीत यांत गुंतले होते. त्यांच्या मागे दोन-तीन खुर्च्या रिकाम्या होत्या, पण तिथे बसायची तर आम्हाला बिलकुल इच्छा नव्हती. धडधडत्या छातीने त्या उग्र गर्दीकडे बघत असतानाच बेलिफाने न्यायाधीशांच्या आगमनाची वर्दी दिली. ते यायच्या आत आम्हाला जागा पकडायच्या होत्या.... कुठं बसायचं.... भिरभिरत्या नजरेनं सारी खोली न्याहाळताना आमच्या मागच्या बाजूने आवाज आला... ''आईये जी, यहाँ आकर बैठिये |'' बायकी आवाज? चमकून त्या दिशेने पाहिले तर खरोखरी एक चाळीशी ओलांडलेल्या बाई आम्हाला खुणेने बोलावत होत्या. पहिल्याच रांगेतील बाकड्यावर बसल्या होत्या त्या! त्यांच्या शेजारील व मागच्या बाकड्यावरची जागा रिकामी होती. हुश्श!!! आम्ही काहीही विचार न करता मुकाट त्या बाईंशेजारी जाऊन बसलो. अजून छाती धडधडत होती. जणू शर्यतीत पळाल्याप्रमाणे श्वास फुलला होता. तेवढ्यात न्यायाधीश महोदय आले... त्यांना अभिवादन करून पुन्हा खाली बसेपर्यंत मी व मैत्रिणीने डोळ्यांच्या कोपर्‍यातून त्या बाईंना न्याहाळून घेतले.

त्यांचे वय नक्की कळत नव्हते. पण स्थूल शरीर, मेंदीचा कलप लावून तांबडे झालेले केस, अंगावर साधा परंतु किंमती, सुळसुळीत पंजाबी सूट, त्याच्यावरची लेसच्या कडांची नाजूक ओढणी, उंची पर्स, हाताच्या बोटांतील जाडजूड सोन्याच्या अंगठ्या... हे प्रकरण आमच्यासारख्या 'बघ्या'च्या वर्गातलं नव्हतं याची जाणीव होत असतानाच वकिलांनी बोलायला सुरुवात केली....

आमच्या मागच्या खुर्च्या व बाकड्यांवर दोन मुख्य आरोपी व त्यांचे साथीदार बसलेले होते. अगदी मोकळे ढाकळे. हातात बेड्या नाहीत, पायांत साखळदंड नाहीत, अंगावर जेलचे कपडे नाहीत.... पण त्यांच्या थंड थंड नजरा, चेहर्‍यावर कितीही उग्र बेपर्वाई असली तरी सावध देहबोली, मुख्य आरोपींचे अस्वस्थ चाळे, या सर्वांवर अलगद नजर ठेवून असलेले सफारी सुटामधील पोलिस, संथ लयीत चालणारे कोर्टाचे कामकाज, टंकलेखकांच्या टाईपरायटरमधून येणारा आवाज, डोक्यावरचे उंचच उंच छत व एका लयीत घरघरणारे पंखे, खिडकीतून येणारी गार वार्‍याची झुळूक....

कोणत्या तरी कारणामुळे त्या दिवशी काही मिनिटांसाठी कोर्टाचे कामकाज थांबले. न्यायाधीश त्यांच्या कक्षात गेल्यावर शेजारी बसलेल्या बाईंनी पर्समधून पाण्याची बाटली काढली व आम्हाला पाणी हवंय का विचारले. खरं तर तोंडाला कोरड पडली होती, पण का कोण जाणे, त्यांना नकोच म्हटले. मग त्यांनी आमची चौकशी करायला सुरुवात केली. पहिल्या पाच मिनिटांतच आमची नावे, कॉलेजचे कोणते वर्ष, कोर्टात काय करता वगैरे माहिती काढून झाल्यावर त्या बाईंनी पहिला बाँबगोळा टाकला....

''मैं तो यहाँ भाईसाब के लिए आयी हूँ | उनके लिए टिफिन जो लाना था....येरवडासे यह जगह मेरे लिए बहोत दूर है... हमारा फ्लॅट है ना वहाँ... लेकिन क्या करें... आना तो था ही... तो जी शोफर को गड्डी चलानेको बोला .... नहीं तो इस ट्राफिक में गड्डी चलानेका मुझे तो बाबा बहोत टेन्शन होता है....'' असं म्हणून बाईंनी आपल्या पर्समधून सुगंध फवारलेला टिचकीभर हातरुमाल काढून त्याने आपला चेहरा अलगद टिपला. आता या ''भाऊगर्दी''तील तिचा भाऊ नक्की कोण या धास्तीने बिचकलेल्या आम्ही... तेवढ्यात तिने मागे वळून आपल्या हातरुमाल धरलेल्या हाताने कोणाला तरी हलकेच अभिवादन केले. आम्ही टकमका त्या दिशेने पाहू लागलो! मेलो!!!! आमची नजरानजर गँगवॉर किंवा टोळीयुद्धाच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या मुख्य आरोपी क्रमांक दोन यांच्याशी झाली होती!!

टेन्शन, टेन्शन.... घोर टेन्शन!!!! बाई तर आमच्याशी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारख्या गप्पा मारतच सुटल्या होत्या. आमच्या मागे बसलेल्या अनेक थंड खुनशी नजरा आमचा हा 'वार्तालाप' टिपत होत्या याचे भान मला व मैत्रिणीला ''आता कोठे लपावे,'' या विचाराप्रत नेत होते. पण मग न्यायाधीश परत आल्यासरशी आम्ही सरसावून बसलो. आखिर डर डर के क्या जीना? आम्ही तर कोणताच अपराध केला नव्हता. तो फिर क्यों डरे?? अचानक आम्हाला स्वतःतील कायद्याच्या विद्यार्थ्याची आठवण झाली. मग आणखी ताठ मान काढून आम्ही पुढची सुनावणी ऐकत राहिलो.

त्या दिवसाचे कोर्टाचे काम संपल्यावर आम्ही त्या बाईंना एक घाईघाईतील ''बाऽय'' ठोकला व जणू वाघ मागे लागल्याच्या थाटात कोर्टाच्या आवारातून ज्या सटकलो ते पार जंगली महाराज रोडला आलो तरी आमचे हात-पाय थरथरत होते. आपला कोणी पाठलाग तर करत नाही ना, याची चार-चारदा खात्री करून घेतली. त्या रात्री मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने आमच्या दोघींची भरपूर शाब्दिक धुलाई केली.
''काय नडलं होतं का तिथं कडमडायला?''
''अरे पण...''
''हे बघा, ते लोक फार डेंजर आहेत.... उगाच कशाला चान्स घेताय?''
''हो, पण आम्ही काय तिथं त्यांना खुन्नस द्यायला नव्हतो गेलो...''
''पण त्यांनी खुन्नस घेतली तर??''
''अरे, पण आम्ही काय त्यांचं घोडं मारलंय?''
''कम ऑन, त्या माफिया डॉनच्या बहिणीशी तुम्ही गुलुगुलू गप्पा मारल्या.... आणि म्हणताय वर असं? त्याला समजा आवडलं नाही तिनं तुमच्याशी बोललेलं.... तर???....''
''तर तर काय...???''
''झाली ना त त प प?? नक्को ते उद्योग सुचतात तुम्हाला...''
''हे बघ.... लिसन टू मी...''
''नो, यू लिसन टू मी.... नो मोअर टाडा कोर्ट.... ओके? प्लीज! हात जोडतो....''
आणि यासारख्या त्याच्या पन्नास मिनतवाऱ्या ऐकल्यावर....
''ओह....ओके, ओके... नो मोअर.... प्रॉमिस!''

दोन दिवसांनी आमचे पाय पुन्हा टाडा कोर्टाच्या खोलीच्या दिशेने...

आता आम्ही टाडा कोर्टाच्या वातावरणाला सरावलो होतो. आरोपीची बहीण रोज भक्तिभावाने ''भाईसाब''साठी टिफिन घेऊन यायची. आमच्याशी हटकून दोन-चार वाक्ये बोलायची. तिलाही कदाचित त्या सार्‍या पुरुषांमध्ये एकटीला बोअर होत असेल. आणि आमच्याखेरीज तिथे इतर कोणी स्त्रियाही नसायच्या. मग रोज हवा-पाण्याच्या, ट्रॅफिकच्या, कोर्टातील गर्दीच्या, टिफिनमध्ये काय आणलंय आणि भाईसाबना टिफिनमध्ये काय आवडतं याच्या फुटकळ गप्पा चालायच्या. ना आम्हाला कोणी तिथे हटकत होतं, ना प्रश्न करत होतं. पहार्‍यावरचे पोलिस, साध्या वेषातील पोलिस आणि सरकारी वकिलांचे मदतनीस देखील आता आम्हाला ओळख दाखवू लागले होते. मुख्य आरोपी व त्यांच्या हस्तकांच्या दिशेने पाहणे आम्ही मुद्दामच टाळायचो. आणि कोर्टाच्या सुनावणीत त्यांच्यावर असलेल्या गंभीर आरोपांची जंत्री ऐकताना एखादा माणूस एवढे सगळे गुन्हे कसे काय करू शकतो आणि वर टिच्चून ऐटीत निर्लज्जासारखा भर कोर्टात, जमावापुढे कसा काय वावरू शकतो याचेच नवल वाटायचे.

अनेकदा जेवणाच्या सुट्टीनंतर कोर्टात परत येताना आरोपी, त्यांचे हस्तक, पोलिस, आरोपीचे वकील हे सर्व लोक न्यायाधीश येण्याची वर्दी होईपर्यंत बाहेरच्या व्हरांड्यात उभे राहून नर्म हास्य-विनोद करत असत. मी ते सारे टकमका बघतच बसे. अशक्य वाटायचे, पण ते सारे नजरेसमोरच घडत होते. खोलीच्या आत इतक्या गंभीर आरोपांची चर्चा-सुनावणी, खोलीच्या बाहेर हास्य-विनोद??!!!!

आणि मग तो दिवस उजाडला.... त्या दिवशी जेवणाची सुट्टी संपल्या संपल्या मी व माझी मैत्रीण टाडा कोर्टात येऊन आमच्या ठराविक जागेवर, म्हणजेच मॅडमच्या शेजारी स्थानापन्न झालो. न्यायाधीश महोदय यायला अद्याप अवकाश होता. बाहेर व्हरांड्यात आरोपी, वकील, हस्तक, पोलिसांचा घोळका नेहमीप्रमाणेच उभा होता. अचानक आरोपीने काहीतरी खूण केली. ताबडतोब सोबतच्या एका हस्तकाने आरोपी साहेबांना सिगारेट देऊ केली. आता त्यांना माचिस हवी होती. शेजारच्या पोलिस इन्स्पेक्टरने तत्परतेने माचिस पेटवून त्यांच्यासमोर धरली व आरोपी साहेब मोठ्या ऐटीत सिगारेट शिलगावून ''नो स्मोकिंग''च्या पाटीखाली, कोर्टरूमच्या बाहेर आरामात उभे राहून सिगारेटच्या धुराची वलये हवेत सोडू लागले. त्यांचा तो आविर्भाव बघून आमच्याही डोक्यात धूर होऊ लागला. आम्ही दोघींनी एकमेकींशी कुजबुजत सल्लामसलत केली व कोर्टाच्या पुढ्यात बसणार्‍या लेखनिक - टंकलेखक महाशयांकडे जाऊन आमचा निषेध तत्परतेने नोंदविला.
''जज साहेबांना सांगा त्यांना चांगली समज द्यायला.... नो स्मोकिंगच्या पाटीखाली उभं राहून स्मोक करत आहेत ते!''
लेखनिक दादांनी मुंडी हालवली. न्यायाधीश महोदय आल्यावर आमच्या दिशेने अंगुलिनिर्देश करत त्यांना काहीतरी खुसफुसत सांगितले. न्यायाधीशांनी घसा खाकरला, आरोपीच्या वकिलांना जवळ बोलावून काहीतरी सांगितले, आरोपीच्या वकिलांनीही मुंडी हालवली.

आता आम्ही दोघी पुन्हा टेन्शनमध्ये! एकीकडे त्या आरोपीच्या बेदरकार वागण्याला लहानशी का होईना, खीळ बसल्याचा आनंद.... तर दुसरीकडे यावरून तो किंवा त्याचे साथीदार उगाच आपल्याशी खुन्नस तर घेणार नाहीत ना, याचे बाळबोध टेन्शन! त्या दिवसानंतर तिकडे जाणे आम्ही शक्यतो टाळलेच!

पण मग एक दिवस पेपरात बातमी आली... भारतातील ख्यातनाम विधिज्ञ व आघाडीचे फौजदारी वकील आरोपी क्रमांक दोनच्या वतीने टाडा कोर्टात युक्तिवाद करणार म्हणून!! झाले! आमचा टाडा कोर्टाला टाटा करण्याचा निश्चय पुन्हा डळमळला.... क्या करने का? जाने का या नहीं जाने का? शेवटी छापा-काटा केला. उत्तर अर्थातच 'हो' आले. शिवाय त्या विधिज्ञांचा युक्तिवाद म्हणजे कायद्याच्या अभ्यासकांना निव्वळ मेजवानी असते ते ऐकून होतो. वर ते विधिज्ञ आमचे मानद प्राध्यापक असल्यामुळे आमच्या जवळच्या परिचयाचे होते. गेली चार वर्षे त्यांच्या लेक्चरला होणार्‍या गर्दीत मिळेल ती जागा पकडून, कधी खालच्या कार्पेटवर बसून, तर कधी उभे राहून त्यांची भारतीय घटना, दंड विधान संहिता इत्यादींवरची लेक्चर्स कानात प्राण आणून ऐकलेली.... आता त्यांना प्रत्यक्षात ऐन कोर्टरूममध्ये ऐकण्याची संधी आम्ही कशी चुकविणार?

त्या दिवशी नेमकी आमच्या सीनियर मॅडमना आमची तहान लागली होती. शेवटी त्यांनी सांगितलेले काम करून टाडा कोर्टात पोचायला आम्हाला जरा उशीरच झाला. धावत-पळत जिना चढत आम्ही कोर्टरूममध्ये पोचलो तेव्हा सारी खोली तुडुंब भरली होती. भारतातील ज्येष्ठ विधिज्ञ व गुन्हेगारी वकिलांचा युक्तिवाद ऐकायला तिथे पत्रकार, आरोपींकडची मंडळी व बरेच सारे वकील उपस्थित होते. आमची नजर सर्व दिशांना भिरभिरली तर बसायलाच काय, उभे राहण्यासाठीही कोठेच रिकामी जागा दिसेना! गर्दी झाली होती नुसती तिथे! शेवटी पहार्‍यावरच्या पोलिसाने आमची दया येऊन पहिल्या बाकाकडे अंगुलिनिर्देश केला. तिथे आमच्याशी रोज गप्पा मारणार्‍या आरोपी क्रमांक दोनच्या भगिनी असणाऱ्या मॅडम आरामात बसल्या होत्या. आम्हाला पाहताच त्यांच्या गुलाबी लिपस्टिकने रंगविलेल्या ओठांवर ओळखीचे हसू आले व त्यांनी लगबगीने बाजूला सरकून आम्हाला बसायला जागा करून दिली. तेवढीच जागा रिकामी होती. आरोपींच्या नातलगांसाठी जणू मुद्दाम राखीव ठेवलेली!! गच्च भरलेल्या कोर्टात आज वेगळेच वातावरण होते. शेजारी बसलेल्या मॅडमही खास जामानिमा करून आलेल्या दिसत होत्या. तेवढ्यात न्यायाधीश महोदय आले व कोर्टाचे कामकाज सुरू झाले....

...ब्रिलियंट, ब्रिलियंट! एक उत्कृष्ट, बुद्धीला स्तिमित करणारा आणि अफलातून युक्तिवाद ऐकल्यावर माणूस ज्या प्रभावाखाली येतो त्याच प्रभावात विहरत आम्ही त्या दिवशी कोर्टरूममधून बाहेर आलो. मेंदू अद्याप त्या युक्तिवादातच गुंतला होता. आणि ज्या उठावदार शैलीत वकिलमहाशयांनी आपले म्हणणे मांडले ती शैली, तो आत्मविश्वास पाहिल्यावर लोक या माणसाला कायद्यातला बाप का म्हणत असतील ह्याची जाणीव होत होती. आतल्या उकाड्यानंतर बाहेरची व्हरांड्यातील मोकळी हवा छातीत भरभरून घेतानाच आमच्या टाडा कोर्टरूममधील शेजारणीने आम्हाला गाठले.

''क्या अर्ग्युमेन्ट किया ना सर ने! मैंने उनको सुबह बोला भी था, आप को तो कोर्ट रूम में सिर्फ एंट्री लेने की जरूरत है... हमारा हौसला बहोत बढाया है उन्होंने.... '' मॅडम भरभरून बोलत होत्या... त्या आमच्याशी बोलत असताना बाकीचे वकील आम्हा तिघींकडे गमतीशीर नजरेने बघत तिथून जात होते. तेवढ्यात सारी कोर्टरूम आपल्या युक्तिवादाने जिंकणारे ते ज्येष्ठ विधिज्ञ आपल्या ज्युनियर्स सहित बाहेर आले. केस हाताळणारे नेहमीचे फौजदारी वकील आज त्यांच्या पुढे-मागे झुलत होते. त्यांचा तो सारा घोळका आमच्यासमोरच थांबला. विधिज्ञ साहेबांना ''भाईसाहेबां''च्या बहिणीशी बोलायचे होते... त्यांनी दोन मिनिटे गप्पा मारल्या. त्या वेळात मी व मैत्रीण, दोघी मागे गुपचूप उभ्या होतो. अचानक त्या मॅडमना काहीतरी आठवले आणि त्यांनी आमची ओळख त्या ज्येष्ठ कायदेतज्ञांशी करून दिली. त्याबरोबर ते उद्गारले, ''यह बच्चीयाँ तो हमें पता है... हमारी स्टुडंटस है... है नं?'' आम्ही दोघींनी आवंढा गिळत मुंड्या हालवल्या व धिटाईने पुढे होऊन आमच्या या सरांच्या कोर्टरूममधील युक्तिवादाबद्दल त्यांचे अभिनंदन केले! झाले!! सर भलतेच खूश झाले.... त्यांच्या ज्युनियर्सकडे वळून काहीशा अभिमानाने म्हणाले, ''देखो, ये दोनों मेरी स्टुडंट्स है.... आज मेरा अर्ग्यूमेन्ट सुनने के लिए आयी थी....'' सर्वांच्या नजरा आमच्याकडे.... आणि आम्ही दोघी दूधखुळ्यासारख्या तिथेच अवघडून उभ्या!
तरीही मोठ्या प्रयत्नांनी आम्ही दोघींनी टाळ्याला अडकलेली जीभ उचकटून ''सर, यू वेअर सिंप्ली ब्रिलियन्ट!'' चा उद्घोष केला. सरांनी दोघींच्या पाठीवर थोपटल्यासारखे केले आणि, ''सो, सी यू गर्ल्स इन कॉलेज!'' म्हणत आमचा निरोप घेत तिथून रवाना झाले.

काही वेळा आयुष्यात गोष्टी इतक्या वेगाने घडत जातात की मेंदू पार बधिर होऊन जातो. त्या दिवशी आमचेही असेच झालेले... अनपेक्षितपणे सरांशी झालेला तो वार्तालाप, त्या अगोदरचा मेंदूचा कीस काढणारा त्यांचा युक्तिवाद... त्या नशेतच आम्ही आमच्या सीनियर मॅडमच्या चेंबरमध्ये घुसलो. त्यांना भेटायला आलेले एक सहकारी वकील जाता जाता, ''काय बाबा! तुम्ही लोक मोठी माणसं.... थोरामोठ्यांच्या ओळखीची...!!'' असा टोमणा सर्वांदेखत मारायला विसरले नाहीत. त्या नंतर अनेक दिवस कोर्टातील ओळखीचे शिपाई आणि कॅन्टिनची पोरंही, ''क्काय मॅडम... तुमची पार हाय कमांड पर्यंत वळख हाय की!'' सारख्या उद्गारांनी जाता-येता आम्हाला डिवचत होती तर ओळखीचे काही वकील, ''मानलं पाहिजे बुवा तुम्हाला! पार त्या माफिया डॉनच्या घरच्यांशीच ओळख काढलीत की! '' करत यथेच्छ थट्टा-मस्करी करत होते.

लवकरच परीक्षा जवळ आल्यामुळे आमचे कोर्टात जाणे बंद झाले. टाडा कोर्टाची आठवण स्मृतीच्या एका कोपर्‍यात बंदिस्त झाली. टोळीयुद्ध करून, खून-दरोडे करून बिनबोभाट वावरणारे, जेलमध्येही पंचतारांकित कारावास भोगणारे, नंतर निवडणुकीत जिंकून येणारे ते राजकारणी-गुन्हेगार माझ्या भूतकाळातील एका जमान्याच्या आठवणीचा भाग झाले. नंतर त्यांचे काय झाले वगैरे मागोवा घ्यायच्या भानगडीत मी पडले नाही. वकिली न करण्याचा निर्णय घेतल्यावर तर ते जग जणू माझ्यासाठी परकेच झाले.

------------------------------------------------------------------------------

आज कितीतरी वर्षांनी तो एकेकाळचा परिचित चेहरा आठवला होता... त्यांच्या बंधूंचा तसाच दिसणारा चेहरा भल्या मोठ्या होर्डिंगवर झळकत असण्याचे निमित्त! ती थंड, बेदरकार नजर आठवून भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या होत्या. ''बाहेर पडले त्या जगातून, ते बरंच झालं!'' असा विचार मनाशी करत करतच मी कार्यक्रमाचे ठिकाणी पोचले.

त्या उपनगरातील साईबाबांच्या स्थानिक मंदिराचा जीर्णोद्धार केल्याप्रीत्यर्थ आयोजित केलेला सोहळा होता तो! माझ्या एका परिचितांमार्फत मला कार्यक्रमाचे आमंत्रण आले असल्यामुळे मीही फार चौकशी न करता परस्पर होकार दिला होता. कार्यक्रम छान झाला, संपला, सरतेशेवटी नारळ-शाल-पुष्पगुच्छ सत्कार वगैरे झाले. नेहमीप्रमाणे मला आलेला पुष्पगुच्छ मी तेथील दोन लहान मुलींकडे सोपविला. पण नारळ कसा नेणार? शाल कुठं ठेवणार? ताबडतोब एका संयोजकांनी माझ्यासमोर सुती पिशवी धरली. पिशवीचा पांढरट पिवळा रंग, त्यावर लाल ठसठशीत शाईत गौरवाने छापलेले तेच ते परिचित नाव.... ओळखा बघू कोणाचे असेल????? ''कोठे जाशी भोगा... तुझ्यापुढे उभा!!'' बरोब्बर!! त्या गावातील थोर राजकारणी - समाजकारणी - लोकांचे पालनहार - अशा त्या साहेबांच्या बंधूंचे पिशवीवर छापलेले ते नाव मला चांगलेच परिचयाचे होते. अर्थात त्या गावात बहुतेक ठिकाणी त्यांचे नाव असतेच म्हणे... अन् येतेच.... अखेर तेच तर त्यांचे ''कर्म''स्थळ आहे...!!! भले कायदा काहीही म्हणो, पोलिस कळवळून काहीही म्हणोत, वर्तमानपत्रे ठणाणून काहीही सांगोत.... ते त्या भागाचे अनभिषिक्त राजे आहेत हेच खरे!! लोकशाहीत लोकांच्या मनावर ''राज्य'' करणारे... मग ते भले दहशतीच्या जोरावर असो, की लोकांवर केलेल्या उपकारांच्या 'दबावापोटी' असो!

निघताना मी डॉक्टर पटेल व त्यांच्या पत्नीस त्यांच्या घरी मुक्कामासाठी न जाता मला परतीच्या गाडीला सोडायची विनंती केली. तेही अगोदर जरा हिरमुसले, पण नंतर काहीसे नाईलाजाने तयार झाले. नारळ व शाल असलेली पिशवी का कशी कोण जाणे, पण त्यांच्या गाडीच्या डिकीतच राहिली!! :-)

--- अरुंधती कुलकर्णी

कथासमाजराजकारणअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

11 Oct 2011 - 11:28 am | विसुनाना

उत्तम कथा.
अवांतर -
आता गुंड राजकारणी झालेले आहेत आणि राजकारणी गुंड.
त्याशिवाय चालतच नाही.
अतिअवांतर-
तुम्ही वकिली न करण्याचा निर्णय घेतला ते योग्यच केलेत. नाहीतर कुणी सांगावे? तुमच्या सरांप्रमाणे तुम्हीही एखाद्या टाडा, मकोका लागलेल्या गुंडाचे वकीलपत्र घेऊन एक उत्कृष्ट, बुद्धीला स्तिमित करणारा आणि अफलातून युक्तिवाद करत त्याला सोडवले असते.
त्याहीशिवाय चाललेच नसते.

मराठी_माणूस's picture

11 Oct 2011 - 11:58 am | मराठी_माणूस

... आमच्या इथे लोक त्यांना देव मानतात देव

हीच आपली खरी शोकांतीका आहे. उद्या दाउद ने एखाद्या ठीकाणी एखाद्या उत्सवाला अथवा अन्य काही उपक्रमाला मदत केली तर तेथील स्थानिक लोक हेच म्हणतील. त्या वेळेस त्यांना ह्याच दाउदचा बाँब स्फोट घडवुन आणण्यात हात होता ह्याचा सोयीस्कर पणे विसर पडेल.

"इतरत्र काहीहे होउ दे पण माझ्या कडे व्यवस्थीत आहे ना, मग ठीक आहे " हीच व्रुत्ती गुंड माणसांना मोठे करते.

मन१'s picture

11 Oct 2011 - 11:58 am | मन१

मस्त कथन....
मूळ कथावस्तूबद्दल, किम्वा राजकारणी , गुंड, देश वगैरे वगैरेबद्द्ल एकच म्हणेनः-
"आनंद आहे."

प्रभाकर पेठकर's picture

11 Oct 2011 - 12:04 pm | प्रभाकर पेठकर

उत्तम कथा. तपशिलांचे सावध लेखन आणि वर्णनाची हातोटी वखाणण्याजोगी. अभिनंदन.

मेघवेडा's picture

11 Oct 2011 - 2:48 pm | मेघवेडा

तपशिलांचे सावध लेखन आणि वर्णनाची हातोटी वखाणण्याजोगी. अभिनंदन.

असेच म्हणतो. लिखाण आवडलेच.

जाई.'s picture

11 Oct 2011 - 1:20 pm | जाई.

छान कथन

अत्रुप्त आत्मा's picture

11 Oct 2011 - 1:54 pm | अत्रुप्त आत्मा

अता ही गोष्ट कॉमन झालीये,,,आधी अपल्याच गल्लीत दादागिरी करणारे,काही वर्षांनी नगरसेवक झालेले दिसतात... आणी त्या अधीच टोळी युद्धात मारले गेले तर,, कै.थोर.स-माज सेवक ... वगैरे वगैरे...

मिसळपाव's picture

11 Oct 2011 - 4:28 pm | मिसळपाव

"......संथ लयीत चालणारे कोर्टाचे कामकाज, टंकलेखकांच्या टाईपरायटरमधून येणारा आवाज, डोक्यावरचे उंचच उंच छत व एका लयीत घरघरणारे पंखे, खिडकीतून येणारी गार वार्‍याची झुळूक...."
हा परिच्छेद नेमका आहे. तो वाचून जSSSरा वेगळी आठवण जागी झाली;

"... संथ लयीत चालणारे प्राध्यापकांचे लेक्चर, चार रांगांपलीकडे बसलेला एखादा मोहक चेहेरा, मधेच झालेली अभावित नजरानजर, मागे कोणीतरी बॉल-पेनने करणारा टक-टक आवाज, डोक्यावरचे उंचच उंच छत व एका लयीत घरघरणारे पंखे, खिडकीतून येणारी गार वार्‍याची झुळूक..." !!!

मस्त लिहिलंय ओ एकदम भारी, जाम आवडलं,.

रेवती's picture

11 Oct 2011 - 5:57 pm | रेवती

तुमचे लेखन कौशल्य आवडले.
आजकाल सगळं बोलण्यापलिकडे गेलय.

प्रदीप's picture

11 Oct 2011 - 6:33 pm | प्रदीप

नेहमीप्रमाणे अरूंधती ह्यांचे लिखाण सकस आहे, प्रसंग उभारण्याची हातोटी, घडलेल्या घटनांतील नाट्य वगैरे सगळे छानच आहे.

पण एक प्रश्न मनात आला. ज्या राजकारणी व्यक्तिविषयी हे लिहीले आहे, तिच्यावरील आरोप सिद्ध झाले होते का, ह्याविषयी काहीच टिपण्णी नाही.

.....आणि कोर्टाच्या सुनावणीत त्यांच्यावर असलेल्या गंभीर आरोपांची जंत्री ऐकताना एखादा माणूस एवढे सगळे गुन्हे कसे काय करू शकतो आणि वर टिच्चून ऐटीत निर्लज्जासारखा भर कोर्टात, जमावापुढे कसा काय वावरू शकतो याचेच नवल वाटायचे.

खटल्याची सुनावणी अनुभवतांनाच त्या हे लिहीतात, तेव्हा संभ्रमित व्हावयास होते, म्हणजे आरोपीवरील आरोप कोर्टात सिद्ध व्हावयाच्या अगोदरच लेखिकेने मनोमनी त्याच्यावरील आरोप मान्य केलेले आहेत.

आपल्याकडे राजकारणी व गुंड हे समीकरण झाले आहे, त्यातून ही मानसिकता येते, हे खरे आहे. पण वकिली शिकणार्‍या व्यक्तिने थोडे भान ठेवले पाहिजे होते असे उगाच वाटून गेले.

पिवळा डांबिस's picture

12 Oct 2011 - 2:45 am | पिवळा डांबिस

नेहमीप्रमाणे अरूंधती ह्यांचे लिखाण सकस आहे, प्रसंग उभारण्याची हातोटी, घडलेल्या घटनांतील नाट्य वगैरे सगळे छानच आहे.
सहमत! मलाही लिखाण आवडलं!!

साधामाणूस's picture

11 Oct 2011 - 7:07 pm | साधामाणूस

गडबडीत कोठे जोशी भागा असे वाचले. (क्र ह घ्या)

अरुंधती's picture

11 Oct 2011 - 7:48 pm | अरुंधती

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

सबब व्यक्ती हयात व ''कार्यरत'' असल्यामुळे त्यावर जास्त बोलू इच्छित नाही. मात्र आरोप सिध्द झाले, कारावासाची शिक्षाही झाली. नंतर निवडणुका लढवून सबब व्यक्ती / त्यांचे कुटुंबिय सत्ताकारणात आले व आहेत.

ते जे कुणी माफिया असतील ते कोर्ट कचेर्‍या करीत होते तेव्हा तुम्हीही कोर्टात जायचात
तिथे त्यांच्या बहिणीसोबत बसायला मिळाले आणि
तुमचे सिनियर्स त्यावेळी त्यांची केस लढवायचे मग तुम्ही वकील नाय व्हायचं असं ठरवलंत
आणि मग जे काय व्हायचं असेल ते होऊन भाषणं वगैरे करु लागलात तेव्हा
ते माफिया नेते झाले होते
.
.
.
.
.
या सगळ्या वाचनातून एवढंच कळलं!
वर प्रदीप म्हणतात तसे त्यांच्यावर काय आरोप होते वगैरे आणखी तपशील लिहीले असते तर मजा आली असती.

अर्धवटराव's picture

11 Oct 2011 - 9:05 pm | अर्धवटराव

काय झकास रंगलाय "भोग"... व्वा !!

( बेदरकार ) अर्धवटराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Oct 2011 - 9:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूळ विषयाबरोबर प्रसंग रेखाटतांना जे लालित्यपूर्ण वर्णन आले आहे ते मला अधिक आवडले.
अरुंधती या नेहमीच सकस लेखन मिपावर घेऊन आल्या आहेत. असेच वैविध्यपूर्ण अधिक लेखन वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहेच.

बाकी, राजकारणी असलेल्या भाईकडून आपल्याला नकोसा असलेला पाहुनचार, शाल नारळ योगायोगाने राहून गेला. पण वर प्रतिसादात विसुनाना म्हणतात तसेच मीही म्हणतो तुम्ही जर खूप प्रसिद्ध वकील असता म्हणजे 'कायद्यातला एकच तज्ञ' तर मग ?

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

11 Oct 2011 - 10:50 pm | पैसा

अरुंधतीचं हे कौशल्य आहे, कोणताही प्रसंग ती छान फुलवते, वाचकाला सगळं वाचायला प्रवृत्त करते. असे कितीतरी अनुभव आठवले, की त्या प्रसंगातून जात असताना खूप इन्व्हॉल्व व्हायला होतं, मग हळूहळू विसरायला होतं आणि नंतर कधीतरी दत्त म्हणून त्य प्रसंगातली व्यक्ति समोर येते आणि मग सगळं कालच घडल्यासारखं लख्ख आठवतं.

आत्मशून्य's picture

12 Oct 2011 - 3:15 am | आत्मशून्य

वकीली सोडायला नको होती... असो :)