फिल्म दि मेसेज

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
9 Oct 2011 - 2:45 pm

"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते. प्रेषित मुहम्मद व इस्लामच्या जन्माबद्दलचा हा एक फारसा नसला तरी धाडसी चित्रपट म्हणावा लागेल. माझे खूप मुस्लिम मित्र असूनही त्या कुणाकडूनच कधी या चित्रपटाबद्दल ऐकले नव्हते - पण अचानक मिळून गेला. कथेला नायक असूनही तो शेवटपर्यंत न दाखवलेला कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. शिवाय या चित्रपटाबद्दल वाद झाल्याने (हो.. वाद होण्याचा किंवा 'घडवण्याचा' मक्ता काय फक्त बॉलीवूडने घेतलाय का) त्यातील प्रसंगांची इजिप्तच्या 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे. चित्रपटात कुठेही प्रेषित किंवा त्यांचे नातेवाईक दाखवलेले नाहीत.
विशेष म्हणजे ऊर्दूमध्ये डब झाल्याने या चित्रपटाची मजा आणखीच वाढलेली आहे. ऊर्दू भाषेला तिचे खास लोभस रूप आहेच व बॉलीवूडमधील ऊर्दू संवादलेखकांच्या कृपेकरून आपल्याला समजणारे ऊर्दू शब्द मजा आणतात.

शहनशाह ए फारीस, शहनशाह ए बाझन्तीन (byzantine), शहनशाह ए मिस्र यांना प्रेषित दूताकरवी 'इस्लाम कुबूल' करण्याचे फर्मान पाठवतात. इजिप्त वगळता सर्व राजे ते 'तुम बियाबानो से निकलकर हमे बताओगे की हमे किस खुदा को मानना चाहिये' वगैरे डायलॉग मारून फर्मान फाडून टाकतात किंवा नाकारतात. ही या चित्रपटाची सुरुवात. निवेदन-विवेचन पद्धतीने चित्रपटातील दृश्ये सुरु होतात.
'मक्का बुतो का मस्कन'
मक्केत अंदाधुंद मूर्तीपूजा सुरु असते. तिथले नेते व काबाचे पुजारी यांनी भोळ्याभाबड्या जनतेला देवाच्या नावे लुटायला सुरु केलेले असते.
अर्थात हा चित्रपट माहितीपटाच्या अंगाने पुढे जात असल्याने कोणत्या देवांची आराधना सुरु होती? कधीपासून सुरु होती? हिंदू मूर्ती त्यात होत्या का? हे त्यात तपशीलवार आलेले नाही व तशी काही तथ्ये कदाचित उपलब्ध असतील तरी ते येऊ शकले नसते. फक्त 'हुबल' व 'लात' या दोन देवतांच्या मुर्ती दाखवणारे एक दृश्य आहे. या दोन देवता समृद्धी देणाऱ्या मानल्या जात.
काबा व त्यातील देवतांच्या मूर्तींमुळे मक्का हे अरब मधील एक महत्वाचे गाव बनलेले असते. मक्केच्या आर्थिक नाड्या काबातील मूर्त्यांमध्ये गुंतलेल्या असतात. त्यामुळे जेवढ्या जास्त मूर्ती तेवढी जास्त आमदनी असा सरळ हिशेब असतो.

अद्याप प्रेषित न झालेले निरक्षर मुहम्मद हे सर्व पाहून व्यथित असतात व मक्केशेजारी असलेल्या पर्वतावरील गुहा (गार) ही त्यांच्या चिंतनाची जागा असते (वो गार में तन्हा थे). या गुहेत त्यांना 'जिब्रईल' या देवदुताचे दर्शन होते. मी देवदूत जिब्रईल असून तुम्ही खुदाचे प्रेषित मुहम्मद आहात हे सांगून जिब्रईल त्यांना 'ए मुहम्मद.. पढ..' ( हीच कुरानाची सुरुवात) असा आदेश देतो. पण मुहम्मद त्याला मी निरक्षर आहे.. मी वाचू शकत नाही हे सांगतात. मग जिब्रईल 'पढ उस खुदा के नाम से जिसने इन्सान को खून की नाजूक बूंद से बनाया..' असे सांगतो.
या प्रसंगानंतर मुहंमदांना प्रचंड ताप चढतो व ते झालेली घटना जवळच्या नातेवाईकांना सांगतात. इथून पुढे वेळोवेळी मुहमंदांवर खुदाच्या वहीचे नुजूल होते व मुहम्मद तो संदेश लोकांना ऐकवू लागतात.

या संदेशांत सर्वात महत्वाचा व मक्काधिपती आणि मुहम्मद यांच्यात (व ईस्लाम व अन्य धर्मांतही ) वितुष्ट घड्वून आणणारा संदेश असतो तो म्हणजे - "एकच देव आहे व मुहम्मद हे त्याचे प्रेषित आहेत." (ला ईलाहा ईल्लला मुहम्मद रसूल्लीला (चु.भू.द्या.घ्या.) हा अरबी भाषेतील संदेश ऊर्दूमध्ये खुदा के सिवा कोई माबूद नहीं.. मुहम्मद खुदा के रसूल है असा दाखवण्यात आला आहे.. )

मक्कावासियांच्या मनात उलथापालथ घडवून आणणारे इतर संदेशही (देव एकच आहे व तो मूर्तीत बांधला जाऊ शकत नाही.. त्यामुळे काबा मध्ये ठेवलेल्या मूर्ती व त्यांची आराधना निरर्थक आहे.. स्त्री ही पुरुषाएवढीच महत्वाची आहे.. मुलींची जन्मतःच हत्या करणं पाप आहे...) मुहम्मदांना मिळतात. हे सोड्ता इतर संदेशांमागची सामाजिक पार्श्वभूमी चित्रपटात तेवढ्या तपशीलवार येत नसल्यानं ते बिगर मुस्लिम प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत नाहीत. पण मुहम्मदांच्या या संदेशांकडे अनेक मक्कावासी आकर्षित होतात.. त्यांना ऐकण्यासाठी नियमीतपणे येऊ लागतात.
मुहम्मदांच्या संदेशांना मानणार्‍या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे मक्काधिपतींचे धाबे दणाणते. मक्केतील गुलामसुध्दा मुहम्मदांच्या बाजूने होतात. मक्काधिपती मुहम्मदांच्या काका मार्फत त्यांना निरोप पाठवतात की आम्ही तुला अधिकार आणि पद देऊ.. पण तु तुझी शिकवण बंद कर. मुहम्मद ते नाकारतात. मग संघर्ष आणखीच तीव्र होतो.
मुहम्मदांवर "खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात.
त्यातच मुहम्मदांना ईस्लाम जाहीर करण्याचा संदेश मिळतो व त्यांचे अनुयायी काबासमोर मोर्चा घेऊन धडकतात. तिथे मूर्तीपूजा मानणारे मक्कावासी व मुहम्मदांचे अनुयायी यांच्यात मारामारी होते. इथे सिंहाचे शिकारी असणारे मुहम्मदांचे दुसरे एक काका हमजा (अँथनी क्वीन) मुहम्मदांची बाजू घेतात व मुहम्मदांच्या अनुयायांवर दगडफेक करण्याचा आदेश देणार्‍या काबाच्या पुजार्‍याला एका झापडीत खाली पाडून जमावाला स्वतःसोबत लढण्याचे आव्हान देतात. जमाव गुपचूप पांगतो. हमजाने ईस्लाम स्वीकारल्याने मुहम्मदांचा पक्ष थोडा मजबूत होतो.

मग मक्केचे नेते आणखी चिडून मुहम्मद व त्यांच्या अनुयायांना वाळीत टाकतात. त्यांची घरे लुटली जातात व काही लोकांची हत्याही होते. शेवटी जीव वाचवण्यासाठी गुलाम व काही लोकांना शेजारच्या "हबशाच्या बादशहा" च्या राज्यात पाठ्वण्यात येते. हा हबशाचा बादशहा ख्रिश्चन असतो. तिथेही मक्केचे नेते त्यांचे लोक पाठ्वून 'गुलाम और मजहब के बागी' परत मागतात. इथे हबशाच्या बादशहासमोर झालेला कुराण वाचून दाखवण्याचा प्रसंग पहाण्यासारखा आहे. कुराणात मदर मेरी आणि येशू ख्रिस्ताबद्दल उल्लेख असल्याने सुखावलेला बादशहा (तुममे और हम में फर्क सिर्फ इस लकीर जितना है ) गुलाम व मक्केच्या लोकांना परत मक्केत पाठवण्याचे नाकारतो. या काळात मुहम्मद मात्र मक्केतच असतात, त्यांना त्यांच्या मोठ्या काकांचा आधार असतो. मक्केच्या नेत्यांचे या काका मार्फत मुहम्मदांना समजाऊन सांगण्याचे प्रयत्न सुरु असतात. पण वृध्द झालेल्या काकांचा मृत्यू होतो.

काही काळाने मुहम्मद मक्का सोडून मदिना मध्ये रहायला जातात. वाळवंटातील रस्त्यात एकट्या पडलेल्या मुहम्मदांवर मारेकरी पाठ्वले जातात. पण ते ज्या गुहेत लपलेले असतात तिच्या तोंडावर कोळ्याचे जाळे पाहून इथे कुणी नसेल असे समजून मारेकरी परत फिरतात.

मदिनामध्ये मुहम्मदांच्या आगमनानंतर ईस्लामच्या पहिल्या मशीदीचे बांधकाम, एका काळ्या गुलामाला मशिदीतून पहिली बांग देण्यास प्रोत्साहन देणे, नमाजची वेळ झाल्यानंतर लोकांनी दुकान उघड्यावर टाकून ओस पडणारी मदिना वगैरे दृश्ये मस्त आहेत.

पुढे मदिना वासियांना तीन वर्षातून एकदा मक्केची यात्रा करण्याचा मक्का-मदिनामध्ये करार होतो. प्रेषित मुहम्मदांसोबत खुदा सर्वप्रथम मक्केत 'हम कलाम' झाला असल्याने मादिनेतील मुस्लिमांच्या मनात मक्केबद्दल एक वेगळा आदर असतो.

पण यात्रेकरूंवर मक्केच्या काही लोकांनी अचानक हल्ला केल्याने दोन्ही पक्षात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडते व युद्ध होऊन मक्केचे बरेच महत्वाचे लोक मारले जातात.
अबू सुफियान या मक्केतील बड्या असामीच्या बायकोचा (हिचं नाव 'हिंद' असं आहे ) भाऊ हमजाकडून मारला जातो. ती मग चिडून भाला फेकण्यात तरबेज असलेल्या गुलामाला नेमून हमजाचा काटा काढते.
फार प्रभावी नसली तरी वाळवंटातील युध्दाची दृश्ये व वाळवंटात चित्रित झालेला हा एकूणच चित्रपट काहीतरी क्लासिक पहात असल्याची मजा देतो. वाळवंटातील दोन-तीन युध्दांचे प्रसंग चित्रपटातच पहाण्यासारखे आहेत.

मक्केवर मदिनावासियांचा विजय व मुहम्मदांनी काब्यावरुन दिलेला खुत्बा व संदेश यावर चित्रपट संपतो.

सर्व चित्रे जालावरुन साभार.

कथासंस्कृतीइतिहासव्युत्पत्तीचित्रपटविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

9 Oct 2011 - 3:02 pm | स्वानन्द

छान परीचय. कुठे मिळाला तर बघेन एकदा.

आम्ही तिकडे पल्याड असताना जे वेडयासारखे सिनेमे पाहीले (अर्थात जालावर ;) ) त्यातलाच हा एक. एव्हढाही काही खास नाही. वेळ जात नसेल तर पीरीयड मुव्ही म्हणून पाहायला हरकत नाही. :)

पैसा's picture

9 Oct 2011 - 3:26 pm | पैसा

इस्लामपूर्व काळातही मक्का व्यापाराचं केंद्र होती, आणि मसाल्याच्या व्यापारातून मक्केची भरभराट झाली होती. मक्का हे इस्लामपूर्व काळात पेगन धर्माच्या देवळांचं केंद्र होतं आणि काबा हे या धर्माच्या हुबाल देवतेचं देऊळ होतं. (विकि)

इस्लामचा सुरुवातीचा इतिहास वाळवंटातील लढायानी भरलेला होता. या चित्रपटातील वाळवंटातील लढायांची दृश्य नक्कीच प्रेक्षणीय असणार. अँथनी क्वीन हा संपूर्ण पडदा व्यापून टाकणारा अभिनेता असल्याने त्या दृष्टीनेही चित्रपट प्रेक्षणीय असावा.

एक इंटरेस्टिंग गोष्ट या चित्रपटाबद्दल वाचली, ती म्हणजे हॉलिवुडमध्ये कोणीही या चित्रपटाला आर्थिक मदत करायला तयार न झाल्यामुळे दिग्दर्शक मुस्तफा अक्कड यानी लिबिया आणि मोरोक्कोमधे या चित्रपटचं शूटिंग केलं ते गद्दाफीच्या आर्थिक मदतीच्या जोरावर.

यकु's picture

9 Oct 2011 - 3:31 pm | यकु

खर्‍या सैन्यातील सैनिक या चित्रपटात एक्स्ट्रॉ म्हणून घेतले होते म्हणे.

तुमची इंटरेस्टींग गोष्ट खरी आहे पण त्याचे कारण काही असे आहे,

Director Akkad faced resistance from Hollywood to making a film about the origins of Islam because they do not allow the physical representation of Prophet Mohammed himself, or Any other Prophet like Isaa(Jejus) or Musa (Moses) , as it against the Principles of Islam !

तुम्ही दिग्दर्शक अक्क्ड याची मुलाखत येथे पाहू शकता
http://video.google.com/videoplay?docid=7642488031125398567

तुम्ही दिग्दर्शक अक्क्ड याची मुलाखत येथे पाहू शकता

वाहिदा तु दिलेली लिंक म्हणजे सोने पे सुहागा !!
कुठ्ल्याही चित्रपटाची मेकींग पहाणे म्हणजे क्या बात.
धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2011 - 3:49 pm | अत्रुप्त आत्मा

हा चित्रपट ६ वर्षांपूर्वीच पाहीला आहे,पण त्या अधीच मी शेषराव मोरेंनी लिहिलेलं मुहंमद पैगंबरांचं संपूर्ण जिवन चरित्र वाचलेलं असल्यानी सिनेमातल्या उर्दू डायलॉगचा प्रभाव सोडता मला हा चित्रपट विशेष आवडला नाही... अर्थात बद्रची लढाइ कशी दाखवलीये ही उत्सुकता होतीच...ती ही काही विशेष प्रभाव टाकू शकली नाही...चवथे खलीफा अली यांची दोन पात्यांची तलवार 'झुल्फीकार' दिसली तोच काय तो त्या लढाइतला सत्याचा अंश...बाकी इस्लामच्या खय्रा तत्वज्ञानाचा आणी चित्रपटाचा संबंध फारसा कुठेही विशेषत्वानी त्यात येतही नाही...बालशिवाजी सारखा हाही बालइस्लाम आहे...एवढेच!

यकु's picture

9 Oct 2011 - 3:57 pm | यकु

शेषराव मोरेंचं ते पुस्तक मी वाचलेलं आहे.
त्यात ईस्लाम स्थापन झाल्यानंतरचं जे काही वर्णन आहे ते चित्रपटात जुळत नाही.
मोरेंचं पुस्तक ईस्लामी राज्यविस्तार समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2011 - 4:30 pm | अत्रुप्त आत्मा

@-मोरेंचं पुस्तक ईस्लामी राज्यविस्तार समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे....हो ते तर आहेच पण त्यातून प्रेषितांच्या काळातला ओरिजनल म्हणजेच मुळ इस्लाम काय आहे?हे विशेषत्वानी कळतं...बरोबर ना?..कारण प्रास्ताविकात मुहंमद मुस्तफ्फा यांनी म्हटल्याप्रमाणे ''मराठी भाषा या विषयात यापूर्वी कोरडी आहे...

---तिरपे आमचे...

मन१'s picture

9 Oct 2011 - 5:58 pm | मन१

ओळख करुन दिल्याबद्दल आभार.

१९६० च्या दशकात १०-१२ ऑस्कर मिळालेला बेन्-हर आठवतोय? त्यातही एक महत्वाची व्यक्तिरेखा -- येशू हिचा चेहरा दाकह्वलेला नाही. हीच टेक्निक भारत्-एक खोज मध्ये गौतम बुद्धाबद्दल वापरण्यात आलेली होती.

>> 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे.
म्हंजे?

शहनशाह ए फारीस, शहनशाह ए बाझन्तीन (byzantine), शहनशाह ए मिस्र

मला वाटते ह्यासोबतच अतिदूरच्या चीनच्या सम्राटालाही हे पत्र गेले होते. तेव्हा कुणीच नसणार्‍या पैगंबराने थेट तीन चार सर्वात मोठ्या सम्राटांना असे पत्र पाठवणे ह्यातून अफाट आत्मविश्वास जाणवतो.

बादवे, त्या पत्राला, "ख़त ए मुबारकबाद" म्हणतात.(उर्दु शैली नुसार "ख" नंतर नुक्ता द्यायचा प्रयत्न केला आहे.)

"खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात.

ह्यात एखादे मुसेलिमा किंवा मुसैलिमा/मुसयलिमाह ह्या नावाचं पात्र आहे का?(पैगंबराच्या समग्र जीवनावर चित्रपट असेल तर असायला हवे.)

"हबशाच्या बादशहा" म्हणजे अ‍ॅबिसिनियाचा आफ्रिकन ख्रिश्चन राजा असावा.

>> कुराणात मदर मेरी आणि येशू ख्रिस्ताबद्दल उल्लेख असल्याने सुखावलेला बादशहा (तुममे और हम में फर्क सिर्फ इस लकीर जितना है ) गुलाम व मक्केच्या लोकांना परत मक्केत पाठवण्याचे नाकारतो.
माझ्याकडची माहिती वेगळी होती.

काही काळाने मुहम्मद मक्का सोडून मदिना मध्ये रहायला जातात.

ह्याला हिजरा किंवा हिज़रत म्हणतात. अत्यंत म्हत्वाची घटना. इस्लामी वर्षाची कालगणना इथूनच सुरु होते. जसे आपल्याक्डे शालीवाहन शक आहे, शिव शक आहे किंवा आता जगभर वापरले जाणारे सिअवीसन येशूच्या ज्ञ्मापासून सुरु होते तसेच.

युद्ध सगळिच आहेत का? अल बद्र, खैबर, ट्रेंच वगैरे ची?

एका वेगळ्या चित्रपटाची ओळख झाली; पुनश्च आभार

मन१,

१९६० च्या दशकात १०-१२ ऑस्कर मिळालेला बेन्-हर आठवतोय? त्यातही एक महत्वाची व्यक्तिरेखा -- येशू हिचा चेहरा दाकह्वलेला नाही. हीच टेक्निक भारत्-एक खोज मध्ये गौतम बुद्धाबद्दल वापरण्यात आलेली होती.

आठवतोय.. म्हणजे दि मेसेज, बेन हर, १० कमांडमेंट्स आणि अजुन एक वाळवंटातील प्रेषिताबद्दलचाच असे चार चित्रपट असलेली डिव्हीडी होती माझ्याकडे.
बेन हर मध्ये मात्र आता ख्रिस्त दिसेल.. मग दिसेल असं करुन फार परेशान झालो होतो..

>> 'जामे अल अझर' व 'वर्ल्ड शिय्यत कौन्सिल'ने तारीकी सच्चाई केलेली आहे.
म्हंजे?

म्हणजे चित्रपटाबद्दल वाद झाल्यानंतर त्यातील प्रसंग आणि त्यांची सत्यता तपासून पाहिली आहे. अल अझर कैरो मधले ईस्लामी विद्यापीठ.

"खुद कलामी" (संदेश वगैरे काही नाही.. हा स्वतःच काव्य रचतोय) चे आरोप केले जातात. ह्यात एखादे मुसेलिमा किंवा मुसैलिमा/मुसयलिमाह ह्या नावाचं पात्र आहे का?(पैगंबराच्या समग्र जीवनावर चित्रपट असेल तर असायला हवे.)

हमजा ज्याला झापड मारतो तेच ते पात्र असावे.. वर फोटो दिलाय.

"हबशाच्या बादशहा" म्हणजे अ‍ॅबिसिनियाचा आफ्रिकन ख्रिश्चन राजा असावा.

जी हां!

युद्ध सगळिच आहेत का? अल बद्र, खैबर, ट्रेंच वगैरे ची?

तीन-चार आहेत.. त्यात बद्रचे आहे.. पण बाकीची दोन बहुतेक नावांचा घोळ असेल.

वाहिदाने दिलेल्या दुव्यात कळले की या चित्रपटाची एक अरेबिक आणि एक इंग्लिश अशा दोन आवृत्त्या एकाच सेटवरुन काढल्या होत्या. दोन्हीत कलाकार वेगळे... अरेबिक आणि इंग्लिशची डबींग अवघड जाते म्हणून हा खटाटोप.. खरं म्हणजे हा चित्रपट्च एक प्रचंड खटाटोप होता... डायरेक्टरला मानायला पाहिजे.

मन१'s picture

10 Oct 2011 - 1:35 pm | मन१

पण एक समजत नाही, तेव्हा अरब स्त्रिया बुरखा वापरत नव्हत्या का? वापरताना दिसल्या नाहित तिथे म्हणून विचारतोय.
तेव्हा स्त्रिया घोड्यावर बसायच्या ना? आता अरबस्थानात त्यांना गाड्या का चालवू देत नाहित?

चित्रपटाबद्दलः- ह्याच धाटणीचा, डॉक्युमेंट्री कम् चित्रपट अंगाने जाणारा "सरदार" पाहिला होता. परेश रावल त्यात मुख्य भूमिकेत होता. तो चित्रपट काहिहि काल्पनिक न घुसवता जसाच्या तसा बनवूनही रंजक वाटला, किंवा पुढला भाग पहावासा वाटत होता. मात्र इथे नक्की काय गडबड झाली आहे ते माहित नाही, पण जSSरासा संथ/रटाळ वाटला अधेमधे.
विषयनिवडीबद्द्ल १०/१० आहेतच,एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे; पण थोडा अजून रंजक नसता का बनवता आला?
की काही गोष्टी प्रेक्षकाला आधीच माहित असणं गृहित धरण्यात आलय?
चोप्रांची महाभारत ही सिरियलही महभारत ह्या कथेची ज्यांना पार्श्वभूमी ठाउक नाही अशांना व्यवस्थित समजली, आवडली होती.

प्रास's picture

9 Oct 2011 - 10:04 pm | प्रास

चित्रपट परिक्षण आवडलं.

:-)

गवि's picture

10 Oct 2011 - 1:01 pm | गवि

छान रे..