वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?
तर कितीतरी केसेस मध्ये ते उत्तर ''नाही'' असेच म्हणावे लागेल. त्यासंदर्भात हाती आलेली आकडेवारीच बरेच काही सांगून जाते. (मिळालेल्या आकडेवारीनुसार अशा किमान ३०,००० 'परित्यक्ता' वधूंच्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत, किमान १२०० वधू फक्त ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये आश्रयाला आहेत.)
कोणत्याही अॅरेंज मॅरेजमध्ये रिस्क किंवा धोका हा असतोच. कितीही खात्री करून घेतली असली तरी सर्वच माहिती कळालेली नसते. काही माहिती लपवलेली असते. परंतु माहिती नसलेल्या स्थळी, जिथे कायदे वेगळे आहेत, ओळखीचे वा नात्याचे जवळपास कोणी नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमच्या उदरनिर्वाहासाठी व अन्य कारणांसाठी सर्वस्वी अवलंबून आहात तेव्हा हा धोका कैक पटीने वाढतो. विवाह हा विश्वासाच्या नात्यावर आधारलेला असतो असे म्हटले तरी आपल्या बाजूने हा विश्वास अधिक बळकट व्हावा, आपल्याकडून चौकशीत काही कसर राहू नये व नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. त्या दृष्टीने वाग्दत्त वर व वधू या दोघांनीही आपली माहिती एकमेकांपासून दडवून न ठेवता उघड केली पाहिजे. चौकशीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींचे संपर्क तपशील, आपल्या नोकरीचे ठिकाण, सहकारी इत्यादींची माहिती एकमेकांना द्यायला हवी.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही.
कित्येकदा लग्न होऊन परदेशात गेलेल्या वधूला तिथे गेल्यावर आपल्या नवर्याचे अन्य कोणा बाई/पुरुषाशी संबंध असल्याचे कळते, किंवा नवर्याला दुर्धर व्यसने आहेत/ मानसिक रोग आहे हे लक्षात येते. कधी शारीरिक तर कधी मानसिक / भावनिक / वाचिक हिंसा - अत्याचारांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती उलटही असू शकते.
कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?
१. लग्नानंतर हनीमून उरकून पती परदेशी रवाना होतो, पत्नीला तिकिट पाठवितो म्हणून सांगतो. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. अनेकदा पत्नी गर्भवती असेल तर आणखी प्रश्न निर्माण होतात. (अशा किमान २०,००० वधूंनी लग्न व हनीमूननंतर आपल्या नवर्याला पाहिलेलेच नाही!!)
२. लग्नानंतर पत्नी पतीसमवेत परदेशी जाते, परंतु तिथे तिच्या वाट्याला छळवणूक, हिंसा, मारहाण, कोंडून ठेवणे, बलात्कार, कुपोषण/ उपासमार इ. येते. एक वेळ तिला परत भारतात जायची परवानगी सासरच्यांकडून मिळते परंतु तिची त्या पतीपासून झालेली मुले तिच्याबरोबर भारतात पाठवली जात नाहीत.
३. पत्नीच्या माहेरच्यांकडून हुंडा किंवा तत्सम रक्कम वसूल करण्यासाठी तिला तिच्या मर्जीविरुध्द परदेशात पती वा पतीच्या नातेवाईकांतर्फे ओलीस धरले जाते / डांबून ठेवले जाते. तुमची मुलगी हाती पायी धड हवी असेल तर अमकी रक्कम तमक्या ठिकाणी जमा करा अशा धमक्या दिल्या जातात. किंवा पत्नीला नांदवयची असेल तर अमुक रक्कम / मालमत्ता तमक्याच्या नावे जमा करा अशा धमक्या येतात.
४. पत्नी पतीच्या घरी सासरी पोहोचते तेव्हा तो तिथे त्याच्या मैत्रिणीबरोबर / जोडीदाराबरोबर राहत आहे असे लक्षात येते. त्याने केवळ आपल्या आईवडिलांच्या म्हणण्याखातर हे लग्न केलेले असते. अशा परिस्थितीत जर पत्नीकडे स्वतःचे आर्थिक स्रोत नसतील व ती पतीवर अवलंबून असेल तर पत्नीपुढे असलेले ते महासंकटच ठरते.
तिथे जर तिला काही कायदेशीर मदत / आधार नसेल, कोणाची ओळख नसेल तर आणखी संकट!
५. पतीने लग्नाचे वेळी जर त्याची नोकरी, पगार, लग्नाविषयीचे त्याचे स्टेटस, मालमत्ता यांविषयी खोटी माहिती दिली असेल तरी त्यामुळे फसवणूक झालेल्याही अनेक केसेस आहेत.
६. त्या त्या देशातील घटस्फोटाविषयीच्या उदार कायद्यांचा आधार घेऊन पतीने पत्नीस तिच्या संमती विरुध्द, तिच्या अनुपस्थितीत, तिला अंधारात ठेवून घटस्फोट दिला असल्याच्याही अनेक केसेस आढळतात.
७. अनेक पीडित स्त्रियांनी नंतर नवरा किंवा सासरच्या मंडळींवर हुंडा मागणे अथवा लग्नानंतर केलेल्या अत्याचारांबाबत फौजदारी दावे ठोकले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की जोवर पती भारतात येत नाही, समन्स/ अटकेच्या वॉरंटला प्रतिसाद देत नाही तोवर त्या दाव्याचे पुढे काहीही होणार नाही.
८. अनेक स्त्रियांना आपल्या मुलांच्या कस्टडीसाठी किंवा पोटगीसाठी कोर्टात अतिशय कडवा लढा द्यावा लागला.
काहींवर स्वतःच्याच मुलांना जबरदस्ती पळवून नेण्याचे आरोप ठोकले गेले व त्याविरुध्द लढा द्यावा लागला.
९. काही स्त्रियांना भारताखेरीज अन्य देशात लग्न करण्यास भाग पाडले गेले व नंतर लक्षात आले की तिथे लग्न केल्यावर भारतातील न्यायालयांकडे त्याबद्दल फारच मर्यादित अधिकार आहेत.
१०. लग्नानंतर पती परदेशी जातो. पत्नी नंतर जाते. तिथे तिला एअरपोर्टवर आणायला कोणीच आलेले नसते. नवर्याने दिलेला पत्ता/ फोन इत्यादी सर्व खोटे असते किंवा तो गायब झालेला असतो. (काही केसेसमध्ये पती पत्नीचे सर्व सामान - तिची कागदपत्रे, कपडे, दागदागिन्यांसह ताब्यात घेतो व गायब होतो असेही घडलेले आहे.)
आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.
त्यानुसार वधू/ वधूच्या कुटुंबियांनी
काय करावे?
१. वर/ वधू ची इत्यंभूत चौकशी करावी. त्यांचे आर्थिक स्टेटस, वैवाहिक स्थिती (अविवाहित/ घटस्फोटित/ विधुर / विभक्त इ.), नोकरीचे तपशील, क्वालिफिकेशन, पगार, ऑफिसचा पत्ता, कोणत्या कंपनीत नोकरी, त्या कंपनीची स्थिती, इमिग्रेशन स्टेटस, व्हिसाचे तपशील, त्या देशात लग्नाचा जोडीदार नेण्याची परवानगी आहे / नाही इत्यादी.
२. आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, निवासी पत्ता, कौटुंबिक तपशील, व्हिसाचे तपशील, व्होटर आहे/ कसे, सोशल सिक्युरिटी नंबर याची चौकशी.
३. लग्नेच्छुक मुलामुलीना परस्परांना भेटून मोकळेपणाने बोलण्याची, वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात प्रश्न टळू शकतात. मुलाच्या/ मुलीच्या परिवाराशी नियमित संपर्कात रहावे.
४. भारतात धार्मिक लग्न विधींबरोबरच ते रजिस्टर्ड करण्याचे बघावे. लग्नाचे फोटोग्राफ्स, चित्रफिती पुरावा म्हणून असू द्याव्यात.
५. ज्या देशात मुलगी वधू म्हणून रवाना होत असेल त्या देशाचे कायदे, खास करून कौटुंबिक अत्याचाराविरुध्द चे कायदे असतील त्यांच्याबद्दल तिला माहिती असावी. जर अशा अत्याचाराला तिला तोंड द्यावे लागले तर तिला तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा / सुविधा मिळू शकते हेही माहिती असावे.
६. जर वधू ला असा अत्याचार (शारीरिक/ मानसिक/ वाचिक/ भावनिक/ आर्थिक/ लैंगिक) सहन करावा लागत असेल तर तिने त्याविषयी तिच्या विश्वासातील लोकांना सांगितलेच पाहिजे.
७. पत्नी/ वधूने स्वतःच्या नावाचा वेगळा बँक अकाऊंट आपल्या निवासस्थानाजवळच्या बँकेत खोलावा.
८. परदेशी राहणार्या नवविवाहितेने नवर्याचे एम्प्लॉयर्स, शेजारी, नातेवाईक, मित्र, अॅम्ब्युलन्स, पोलिस, भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील स्वतःजवळ ठेवावेत.
९. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (व्हिसा, पासपोर्ट, बँक कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, लग्नाचे सर्टिफिकेट, इतर कागदपत्रे) छायांकित प्रती भारतात/ तुमच्या विश्वासाच्या माणसांकडे/ नात्यात ठेवून द्या.
या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपीही तुमच्याजवळ / तुमच्या विश्वासू व्यक्तीजवळ असू द्यात.
१०. तुमच्या नवर्याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची (व्हिसा, पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर, मालमत्तेचे तपशील, व्होटर कार्ड क्रमांक इत्यादी) प्रतही शक्य असल्यास जवळ ठेवा.
काय करू नये?
१. घाईघाईत काहीही निर्णय घेऊ नका, तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.
२. विवाहाचा उपयोग ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी/ परदेशी स्थायिक होण्यासाठी किंवा अन्य तत्सम फायदेशीर योजनांसाठी करू नका, तशा योजनांना बळी पडू नका.
३. लग्नासारखी गंभीर बाब फोन/ इमेल वरच्या संपर्काने ठरवू नका. प्रत्यक्ष मुलाला/ मुलीला व कुटुंबियांना भेटून, बोलून, इत्यंभूत चौकशी करून मगच काय तो निर्णय घ्या.
४. नुसत्या वरवरच्या देखण्या चित्राला भुलू नका. व्यवस्थित चौकशी करा, मगच होकार द्या.
५. जेव्हा मॅरेज ब्यूरो/ संकेतस्थळ/ मध्यस्थांमार्फत लग्न ठरते तेव्हा त्यांच्याकडील वधू/ वराचे तपशील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.
६. गुप्तपणे लग्नाच्या वाटाघाटी करणे टाळा. त्या लग्नाबाबत जितक्या लोकांना समजेल तेवढे चांगले. त्यानिमित्ताने मुला/मुलीची खरी माहिती कळायला मदत होईल.
७. परदेशांत लग्न करणे टाळा.
८. हुंडा किंवा तत्सम मागण्यांना परदेशस्थ जावई/ मुलीच्या सासरच्या मंडळींनी पुढे केल्यास गप्प बसू नका व त्यांना बळी पडू नका. लगेच संबंधित अधिकार्यांना संपर्क साधा.
९. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या क्रौर्याचे बळी ठरू नका. लगेच संबंधित अधिकार्यांना / क्रमांकांना संपर्क साधा.
१०. परदेशी जाण्याच्या खटपटीत कोणतीही कागदपत्रे नकली बनवू नका. किंवा कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नका.
११. नवरा राहत असेल त्या देशातील विवाहासंबंधातील कायदेशीर कारवाईत भाग घेणे टाळा. तुम्ही स्वदेशी नवर्यावर कोर्टात केस फाईल करू शकता. खास करून घटस्फोटाची केस.
१२. परदेशात तुमच्या पतीने तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत व तुम्हाला अंधारात ठेवून तेथील कोर्टानुसार घटस्फोट दिला तरी तो भारतात ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्ही त्या केसमध्ये सहभाग घेतला असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.
१३. नवरा किंवा सासरच्या मंडळींची बदनामी करणे टाळा, कारण ते तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकू शकतात. जे वास्तव आहे तेच बोला, आणि योग्य मंडळींसमोर : उदा : वकील, पोलिस, सोशल वर्कर, न्यायालय इत्यादी.
१४. कोणत्याही कारणास्तव कायदा स्वतःच्या हातात घेणे टाळा, व सूड उगवण्यासाठी अविचारी, हिंसक, बेकायदेशीर कृत्ये करू नका. संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधा. खोट्या तक्रारी नोंदवू नका.
परदेशांतील भारतीय महिलांच्या संघटना / मैत्री संस्था/ मदत संस्थांचे पत्ते व इतर तपशील :
http://moia.gov.in/writereaddata/pdf/list_indian_women.pdf
तुम्ही एन आर आय सेलकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता :
http://ncw.nic.in/NRICell/frmNRIComplaints.aspx
तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते?
१. तक्रार नोंदविली गेल्याची पावती मिळते. तक्रारकर्त्यास त्याच्या नोंदविल्या गेलेल्या तक्रारीचा क्रमांक मिळतो, जो पुढील संदर्भ व कारवाईसाठी महत्त्वाचा असतो.
२. तक्रारीची नोंद झाल्यावर तिची तपासणी होते. त्यात कितपत तथ्य आहे, काय वास्तव आहे इत्यादींची पडताळणी केली जाते. त्यासाठी संबंधित पार्टीजना प्रश्न विचारले जाऊ शकतात.
३. कारवाई
अ] समुपदेशन : पीडित व्यक्तीला समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे तिला तिचे कायद्याच्या दृष्टीने भवितव्य, तसेच इतर उपलब्ध पर्याय यांची माहिती करून दिली जाते.
आ] मध्यस्थांमार्फत वाद मिटविणे : एन आर आय सेलमार्फत मध्यस्थांकरवी जोडीदाराशी ऑडियो/ व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा वार्तालाप करून किंवा व्यक्तिशः संपर्क साधून मध्यस्थी केली जाते.
इ] संबंधित वादाची सेटलमेन्ट करणे : ह्यात परिस्थितीनुसार, नवरा-बायकोच्या संमतीनुसार, कायदेशीर कारवाई निश्चित केली जाते. ती त्या देशात की भारतात हेही परिस्थिती, संमती इत्यादींनुसार बदलते. मध्यस्थीत अपयश आल्यास पत्नीला तिचे कायदेशीर हक्क समजावून दिले जातात आणि तिच्या मर्जी व संमतीनुसार तिला कायदेशीर कारवाई करण्यास मदत केली जाते.
तसेच त्याच वेळी एन आर आय सेल हेही कार्य करते :
क] त्या त्या राज्याच्या शासनाशी व पोलिसांशी कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने संपर्क करणे
ख] त्या राज्याच्या महिला आयोगाशी त्या केसला फॉलो करण्याचे दृष्टीने संपर्क साधणे
ग]परदेशातील सेवाभावी संस्था, मिशन्सच्या सहयोगाने त्या पीडित महिलेला सुरक्षित आश्रय, मध्यस्थी, सुरक्षा मिळवून देणे.
घ] लूक आऊट कॉर्नर नोटिस बजावण्याची, समन्स बजावण्याची शिफारस करणे.
च] क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १८८, २८५ व्या कलमांन्वये, पासपोर्ट कायद्यानुसार व अन्य कायद्यांनुसार कारवाईची शिफारस करणे.
संपर्क तपशील :
Contact for NRI Marriages Case
Mailing Address :
NRI Cell, National Commission for women
4, Deen dayal upadhya Marg,
New Delhi -110002
Telephone Numbers : +91 - 11 - 23234918
Fax : +91 - 11 –23236154/ 23236988
Email : nricell-ncw@nic.in
धन्यवाद!
-- अरुंधती
माहिती स्रोत : राष्ट्रीय महिला आयोग संकेतस्थळ : http://ncw.nic.in/default.aspx
प्रतिक्रिया
30 Jul 2011 - 5:42 pm | चित्रगुप्त
अतिशय महत्वाची माहिती तपशीलवारपणे दिली आहे, हे फार चांगले केलेत.
30 Jul 2011 - 6:36 pm | प्रियाली
काही एनआरआय वरांच्या (किमानपक्षी अशापद्धतीने लग्न केलेल्या) पुरुषांच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत आणि अर्थातच युयुत्सुंच्या प्रतिक्रियेच्या अपेक्षेत.
31 Jul 2011 - 12:33 am | Nile
महत्त्वाचा मुद्दा.
बाकी, रेको द्याला ना हो काकू? ;-)
31 Jul 2011 - 3:56 am | प्रियाली
नायल्या मेल्या तुला रेको! ती मुलगी येऊन रोज मला मिपावर शिव्या घालेल. नाय रे बाबा!! ;)
31 Jul 2011 - 4:46 am | Nile
अशानेच चांगल्या मुली चुकीच्या हाती जातात अन समस्या निर्माण होतात. परिस्थितीला मदत करायची वेळ आली की मागे सरणे नेहमीचेच. ;-)
31 Jul 2011 - 4:50 am | प्रियाली
माझ्या मते चांगल्या मुली स्वतःचे लग्न स्वतः ठरवून मोकळ्या होतात. ;)
31 Jul 2011 - 5:13 am | Nile
मिपावरील सर्व अरेंज्ड मॅरीड काकू आणि आजींचा अपमान करून तुम्ही युयुत्सुंच्या पक्षात गेलात हे पाहून अतीव दु:ख झाले! :P
(इतके बोलून माझे इथले अवांतर थांबवतो)
31 Jul 2011 - 2:43 am | धनंजय
अधूनमधून युनिव्हर्सिटीच्या आवारात विद्यार्जनासाठी येणार्या उपवर भारतीय तरुणी बघितलेल्या आहेत. (माझ्या विद्यार्थी दशेत भारतातून आगंतुक अविवाहित मुलांच्या मानाने अविवाहित मुलींची संख्या फार म्हणजे फारच कमी होती.)
या मुली जर परदेशात स्थायिक झाल्या, तर भारतातून नवरे आयात करण्याचा प्रघात फारसा नसावा. (माझ्या तीन-चार मैत्रिणींपैकी कोणीही तसे केलेले नाही. येथील मुलांशी मैत्री/लग्न केलेले आहे.) या मुलींच्या अनुभवांबाबत कुतूहल वाटते आहे.
31 Jul 2011 - 3:55 am | प्रियाली
+१. माझ्या कुटुंबात ज्या मुली येथे आल्या (आणि चांगल्या ८०च्या दशकात आलेल्या आहेत) त्यांनी येथील मुलांशी लग्न केले किंवा ज्यांना येथील मुलगे मिळाले नाहीत त्या अविविहीत राहिल्या. ९० च्या दशकात आलेल्या एकीचे लग्न ३७ व्या वर्षी आयटीमधल्या मुलाशी झाले. यावरून नवरे आयात करण्याची फॅशन अद्याप रुढ झालेली नाही असे म्हणता येईल.
पण मी आयात केल्या गेलेल्या वरांबद्दल म्हणत नसून, झटपट लग्न करून मुलींना येथे आणणार्या मुलांबद्दलच बोलत आहे. (माझे वरचे वाक्य सुस्पष्ट नसावे.) त्यांची बाजूही असेलच की. अनेकदा, असे पाहण्यात आले आहे की अमेरिकेची अत्यंत क्रेझ, तिथे गेल्यावर आपल्याला हवे तसे वागता येईल अशी काहीतरी संकल्पना, तिथला नवरा केला की पुढे शिकायची (आणि खर्चाचीही) सोय झाली वगैरे स्वप्ने बाळगणार्या मुलीही असतीलच. कदाचित अशा मुलींशी लग्न केल्यामुळे या मुलांचीही परवड होत असेल. शेवटी तेही फारशी चौकशी न करता (त्यांचे आईवडिल येथे बसून करत असतीलच म्हणा पण ती मुलाला अपेक्षित चौकशी असेलच असे नाही.) लग्न करत असतात.
असो. मागे माझ्या एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये एकजण अशाप्रकारे सुट्टी घेऊन मुली बघायला गेला होता. त्याला काही अमेरिकन बायांनी माझ्यासमोरच विचारले की "हे असे कसे? दोन आठवड्यांच्या सुट्टीत तू मुलगी पसंतही करणार?"
त्यावर त्याचे उत्तर असे की "आईवडिलांनी आधीच ५-६ मुली निवडून ठेवल्या आहेत. त्यातली मला जी सर्वात अधिक आवडली ती मी निवडणार. लग्न करायला आणखी काय पाहिजे?"
यावर त्या अमेरिकन बायकांची प्रतिक्रिया काही नव्हती. त्यांनी फक्त आ वासला. :)
31 Jul 2011 - 8:58 am | युयुत्सु
+१
30 Jul 2011 - 7:20 pm | शुचि
चांगला लेख आहे.
30 Jul 2011 - 10:39 pm | ५० फक्त
कुठली का असेना ही लग्नसंस्था फार माजलीय हल्ली बाकी काही नाही,
31 Jul 2011 - 11:51 am | प्रास
......शंभर टक्के म्हणा हवं तर!
31 Jul 2011 - 2:36 am | धनंजय
चांगली माहिती
31 Jul 2011 - 8:32 am | चिरोटा
अशा मुलींची संख्या १ ते ५% असावी. बहुतांशी मध्यम वर्गाच्या नजरेतून अमेरिकेत 'असणे' ही एक क्रेझ असते. ज्या मुलींना केवळ शिकण्यासाठी बाहेर जायचे आहे अशा मुली भारतात परत येतात असा अनुभव आहे.
31 Jul 2011 - 8:59 am | रेवती
वाचून कसेसेच झाले.
उपयुक्त माहिती आहे यात वाद नाही.
31 Jul 2011 - 9:02 am | अप्पा जोगळेकर
सविस्तर माहिती दिल्याबद्दल अभिनंदन खूपच जोरदार आणि तपशीलवार माहिती दिलेली आहे.
अवांतर -
आमच्या एका मित्र-मैत्रिणीचे शाळेपासूनचे अफेअर अकरा वर्षे चालले. आणि नंतर त्या मित्राची सॅलरी फारच कमी आहे ( २५ व्या वर्षी वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये याला अनेक मुली फारच कमी सॅलरी असे मानतात हे तेंव्हाच कळले ) आणि स्वतःच्या मालकीचे घर नाही या कारणासाठी त्या बहाद्दर मुलीने एका वयस्कर दिसणार्या अमेरिकास्थित भारतीयाशी लग्न केले. आमच्या ग्रुपमधल्या अनेक मुलींनी त्या मुलीचा निर्णय अत्यंत व्यवहार्य आहे असा निर्वाळा दिला तेंव्हापासून अमेरिकास्थित व्यक्तींशी होणारे लग्न या विषयावर विचार करणे आम्ही सोडून दिले आहे.
31 Jul 2011 - 9:18 am | sagarparadkar
...... चला, फटके पडायच्या आत पळा ......... :)
31 Jul 2011 - 5:26 pm | अप्पा जोगळेकर
तिचा 'तो' मित्र म्हणजे तुम्हीच तर नाही ना?
नाही. आम्ही शतकाच्या जवळ कधी पोचलोच नाही. कायम शून्यावर धावबाद होत आलोय. :)
31 Jul 2011 - 9:24 am | अन्या दातार
>>अनेकदा, असे पाहण्यात आले आहे की अमेरिकेची अत्यंत क्रेझ, तिथे गेल्यावर आपल्याला हवे तसे वागता येईल अशी काहीतरी संकल्पना, तिथला नवरा केला की पुढे शिकायची (आणि खर्चाचीही) सोय झाली वगैरे स्वप्ने बाळगणार्या मुलीही असतीलच.
>>२५ व्या वर्षी वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये याला अनेक मुली फारच कमी सॅलरी असे मानतात हे तेंव्हाच कळले
>>आमच्या ग्रुपमधल्या अनेक मुलींनी त्या मुलीचा निर्णय अत्यंत व्यवहार्य आहे असा निर्वाळा दिला
यावरुन एकच निष्कर्ष मी काढू शकतो तो म्हणजे या मुलींना काटकसर करत जगण्याचा कंटाळा आलेला आहे किंवा काटकसर करत जगण्याची इच्छा नाही.
(छे ब्वा, या स्त्रीमुक्तीवाल्यांमुळे माझ्यासारखी काटकसरी मुले अगदी बिच्चारी झाली आहेत! काळाचा महिमा अगाध आहे हे पटतंय खरंच ;) )
कॉलिंग स्पा, वपाडाव, मनराव अँड सुड
31 Jul 2011 - 10:11 am | पाषाणभेद
हा उपयुक्त लेख सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत करून अमेरीकन एंबसी बाहेर मोठ्या अक्षरात लावावा अशी मागणी मनसे (मराठी नवनिर्माण सेना) तर्फे करण्यात आलेली आहे.
31 Jul 2011 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेख.
-दिलीप बिरुटे
31 Jul 2011 - 1:07 pm | प्यासा
रेसिडेंट इंडियन बद्दलही एखाद्या रेसिडेंट एविल ने धागा खोलावा ...ला हौल विला कुव्वत बहोत ही दिलचस्प जानकारी मिलेगी....पंजाब,हरियाणा,दिल्ली येथे एनआरआय विवाह अन खाप पंचायतींचे विवादित निकाल आजकाल खूप चर्चेत आहेत.
31 Jul 2011 - 8:01 pm | सौन्दर्य
लेख खुप माहिती पुर्ण आहे. लेख वाचतावाचता जे प्रश्न मनात उद्भवले त्यांची उत्तरे देखील लेख पुढे वाचता वाचता मिळत गेली.
मि असे पाहिले आहे कि कित्येक वेळा भिडेखातर किंवा जास्त चौकशी केल्याने वधु/वर हातचे निसट्तील अशी भिती पालकाना वाटत असावी, त्या मुळे इच्छा असून देखिल खोलात जाउन चौकशी केली जात नाही आणि मग पश्चाताप करायची पाळी येते.
असाही एक विचार मनात आला -
अशी चौकशी objective गोष्टिंबद्दल (शिक्षण, वय, ऊत्पन्न, स्थावर्/जंगम मालमत्ता, लिगल स्टेटस इत्यादी) घडू शकते, परंतु इतर subjective गोष्टिंचे काय ? वधू/वराचा स्वभाव, आवडी-निवडी, इत्यादीची चौकशी कशी करणार ? हाती आलेली माहिती किती खरी असणार कारण ती पुन्हा subjective असणार.
आणि हे फक्त अनिवासीयां संदर्भातच घडते असे नाही, हे कोठेही घडू शकते.
आणि मग मनात एक एज ओल्ड प्रश्न उद्भवतो कि कोण्त्या प्रकारचे विवाह १०० % फलद्रूप होतिल ? प्रेम विवाह, नियोजित विवाह की आणखी वेगळ्या प्रकारचे ?
31 Jul 2011 - 8:02 pm | सौन्दर्य
लेख खुप माहिती पुर्ण आहे. लेख वाचतावाचता जे प्रश्न मनात उद्भवले त्यांची उत्तरे देखील लेख पुढे वाचता वाचता मिळत गेली.
मि असे पाहिले आहे कि कित्येक वेळा भिडेखातर किंवा जास्त चौकशी केल्याने वधु/वर हातचे निसट्तील अशी भिती पालकाना वाटत असावी, त्या मुळे इच्छा असून देखिल खोलात जाउन चौकशी केली जात नाही आणि मग पश्चाताप करायची पाळी येते.
असाही एक विचार मनात आला -
अशी चौकशी objective गोष्टिंबद्दल (शिक्षण, वय, ऊत्पन्न, स्थावर्/जंगम मालमत्ता, लिगल स्टेटस इत्यादी) घडू शकते, परंतु इतर subjective गोष्टिंचे काय ? वधू/वराचा स्वभाव, आवडी-निवडी, इत्यादीची चौकशी कशी करणार ? हाती आलेली माहिती किती खरी असणार कारण ती पुन्हा subjective असणार.
आणि हे फक्त अनिवासीयां संदर्भातच घडते असे नाही, हे कोठेही घडू शकते.
आणि मग मनात एक एज ओल्ड प्रश्न उद्भवतो कि कोण्त्या प्रकारचे विवाह १०० % फलद्रूप होतिल ? प्रेम विवाह, नियोजित विवाह की आणखी वेगळ्या प्रकारचे ?
1 Aug 2011 - 6:54 am | चित्रा
लेख आणि माहिती उत्तमच आहे.
अरुंधती, धन्यवाद.
आणि मग मनात एक एज ओल्ड प्रश्न उद्भवतो कि कोण्त्या प्रकारचे विवाह १०० % फलद्रूप होतिल ? प्रेम विवाह, नियोजित विवाह की आणखी वेगळ्या प्रकारचे ?
बापरे, तुम्ही एकदम मुळाशी जाणारे प्रश्न विचारताय ब्बॉ... आणखी वेगळ्या प्रकारचे म्हणजे काय? :) १००% फलद्रूप म्हणजे काय? !
सुलभीकरण करायचे तर -
विवाह फलद्रूप झाला नाही (नवराबायकोचे स्वत:च्या मर्जीने एकत्र राहण्याइतपत पटले नाही) तरी अशा व्यक्तींनी एकमेकांना घातक कृत्ये करावीत अशी वेळ येण्याची गरज नसते. अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे यासाठी वर दिलेली माहिती उपयुक्त आहे.
बाकी मर्जीने लग्न केलेल्या नवराबायकोंनी कधी, कसे, कुठवर एकत्र राहायचे आणि का, ते त्यांच्यावर सोडू या ना. विवाह फलद्रूप 'करण्याचा' असा काही फॉर्म्युला नसतो/नसावा. त्यासाठी सामंजस्य हवे हे कोणीही सांगेल, पण ते असे तयार करता येत नाही का आपले स्वभाव तातडीने लग्नानंतर बदलता येत नाहीत. प्रत्येक नवराबायकोचे असे वेगळे रसायन तयार होते ते त्यांचे त्यांनाच कळते. एनीवे.
माहिती अतिशय आवडली. अमेरिकेतील 'सहेली' या संस्थेचे या काही बाबतीतले काम चांगले आहे. http://www.saheli-austin.org/d6/
31 Jul 2011 - 10:02 pm | अनिवासि
आत्ताच हा लेख वाचला. लेख चान्गला आहे यात प्रश्नच नाहि. परदेशवाशियाशि लग्न करताना अनेक गोष्टीन्चा विचार करावा लाग्तो हे खरेच आहे. त्याबद्दल दुमत नाही.
मला फक्त एक- दोन गोष्टीन कडे लक्ष वेधावे असे वाटते,
ह्या लेखासाठी अखिल भारतिय सन्स्थेचा सन्दर्भ दीला आहे म्हनजे ह्यात सर्व भारतिय आले.
लेखात arranged लग्नाबद्दल उल्लेख आहे परन्तु forced लग्नान्बद्दल काही दिसले नाही.
अनेक भारतिय समाजात अजुनही अशी प्रथा आहे आणि ती परदेशात सुद्धा चालु आहे. मी अमेरिकेबद्दल काहीही बोलु शकत नाहि परन्यु येथे U.K मध्ये अशा बतम्या बरेच वेळा येतात.
हा लेख मराठीत आहे म्हणुन मी मरठी समाजाबद्दलच बोलत आहे.
गेल्या ३०/४० वर्शात अशी दुर्देवी उदाहरणे मला तरि फारशी ऐकावयास मिळालेलि नाहित.
ह्याचा अर्थ precautions घेउ नयेत अस्स नाहि पण एक्दमच सर्व NRI ना बाद करु नये.
उद्या परगावी जात असल्यामुळे - तेथे computer वापरायला मिळेलच असे नसल्यामुळे- ह्या प्रतिक्रियेवरिल प्रतिक्रिया नन्तरच वाचेन.
1 Aug 2011 - 4:11 am | इंटरनेटस्नेही
अतिशय गंभीर विषय.
1 Aug 2011 - 10:32 am | पंगा
हे थोडे अती होत आहे, असे वाटत नाही काय? की ऐकला कोठूनतरी 'सोशल सिक्युरिटी नंबर' हा शब्द नि दिला ठोकून? इतक्या सेन्सिटिव माहितीचा संभाव्य दुरुपयोग होण्याची शक्यता लक्षात घेता, जेथे लग्न अजून झालेले नाही तेथे ही माहिती कोणी पुरवेल असे वाटत नाही. त्यापेक्षा लग्न न झालेले बेहत्तर!
भारतात औटसोर्सिंगच्या विरुद्धसुद्धा, ग्राहकांच्या माहितीची हाताळणी आणि विशेषतः सोशल सिक्युरिटी नंबरसारख्या गैरवापराचा स्कोप असलेल्या माहितीची हाताळणी भारतातली कोणती व्यक्ती कशी करत असेल, त्यावर नियंत्रणाची भारतात व्यवस्था कितपत काटेकोर आहे, त्यावर भरवसा कितपत ठेवायचा, इतक्या ग्राहकांपैकी किमान काहीजणांचे सो. सि. नं. चोरून त्यांच्या आधारे त्यांच्या नावे स्वतः क्रेडिटकार्डखाते खोलून त्यावर कोणता भुरटा भारतीय औटसोर्सिंगकामगार फ्रीकाउट मारत नसेल याचा काय भरवसा (अमेरिकेतही हे होऊ शकत नाही असे नाही, पण पकडले जाण्याची आणि पकडले गेल्यावर त्याबद्दल शिक्षा होण्याची शक्यता त्या मानाने बरीच अधिक आहे, उलट भारतात कोण विचारतो, आणि त्याकरिता भारतातील कोणत्यातरी अनोळखी एंटिटीबरोबर हुज्जत कशी आणि का घालायची आणि एवढी कटकट करून त्याचा उपयोग होण्याची शक्यता किती, हा पर्सेप्शनचा भागही आहेच.) अशा मुद्द्यांवरून येथे किती गदारोळ होऊ शकतो, याची आपल्याला कल्पना नाही काय? अशा परिस्थितीत जिच्याशी आपला विवाह अजून झाला नाही, तिला तर सोडाच, पण तिच्या आईवडिलांना, चुलतभावंडांना आणि दूरच्या काकांना आपला सोशल सिक्युरिटी नंबर कोणता मूर्ख कशासाठी देईल?
तसेही, माझ्या पत्नीला इन्कम टॅक्स एकत्र फाईल करण्याच्या दृष्टीने माझा सो. सि. नं. माहीत असण्याचे वाजवी कारण आहे, तेही ती माझी पत्नी झाल्यावर, तोपर्यंत नाही. माझ्या सासूसासर्यांना, झालेच तर मेहुण्याला नि शेजार्यापाजार्यांच्या कुत्र्याला माझा सो. सि. नं. माहीत असण्याचे कोणतेही वाजवी कारण अथवा गरज नाही. (सासूसासरे आणि मेहुणा यांची शेजार्यापाजार्यांच्या कुत्र्याशी तुलना करण्याचा येथे उद्देश नाही. 'शेजार्यापाजार्यांचा कुत्रा' ही संज्ञा साधारणतः 'एवरीवन अँड देअर डॉग' अर्थात 'ऑल अँड संड्री' अथवा 'टॉम, डिक, हॅरी अँड तिवारी' अशा अर्थाने वापरलेली आहे. कृपया नोंद घ्यावी.)
सारांश, व्हिक्टिम पिक्चर रंगवणे ठीक आहे, आणि फसवणुकीच्या केसेस होऊ शकतात, नव्हे अनेकदा होतात, म्हणूनच त्यासाठी खबरदारी घेणे हेही वाजवी आहे, पण त्याबरोबरच आपण खबरदारीच्या नावाखाली दुसर्या पक्षाकडून जी अपेक्षा करतो, तीही वाजवी आहे की नाही हे तपासून पाहणे आवश्यक आहे.
बाकी, संभाव्य वराचे नाव परदेशातील स्थानिक मतदारयादीत आहे किंवा कसे, या माहितीची नेमकी आवश्यकता काय आणि ती काढणार कशी, हेही कळले नाही.
अधोरेखित अतिशय महत्त्वाचे आहे.
म्हणजे असे समजा, की लग्न करायला भारतात आलेल्या पुरुषाला लग्न झाल्यानंतर पत्नीचे दुसर्या कोणाशी प्रेमप्रकरण आहे हे कळते. (रादर, लग्न होईपर्यंत ही गोष्ट सोयिस्करपणे दडवली जाते. मुलीचे पालक त्याबद्दल वाच्यता करीत नाहीत, कारण त्यांना प्रकरण पसंत नसते, आणि मुलगी अमेरिकेला गेली तर भले होईल अशी आशा असते. मुलगीही सपोज़ेडली पालकांच्या दडपणाखाली चूप राहते. आणि मग लग्नानंतर हळूच गौप्यस्फोट करते. बरे, पालकांच्या तथाकथित दडपणामुळे झालेले लग्न स्वतः मोडण्याचीही मुलीची हिंमत नसते, तर नवर्यानेच कोणताही गौप्यस्फोट न करता केवळ 'मला हे लग्न पसंत नाही' असे - लग्न झाल्यानंतर! - म्हणण्याची जबाबदारी घ्यावी - नि विनाकारण स्वतः गोत्यात यावे - आणि मुलीची मात्र सुटका करावी, ही अपेक्षा असते. बरे, सगळे उघडकीला आल्यावरसुद्धा वधूपालक तरीही आपल्या मुलीला सोडू नये, अमेरिकेला घेऊन जावे, म्हणजे 'सगळे ठीक होईल' म्हणून मुलाच्याच मागे लागतात, आणि झालेले लग्न कायद्याने रद्दबातल करवून घेऊन मोडीत काढण्यात मात्र मुलालाच काय ते नाकी नऊ येतात नि सगळा मनस्ताप होतो.)
किंवा, मुलगा लग्न करायला भारतात येतो. लग्न होते. मुलगी व्हिसा इंटरव्ह्यूसाठी म्हणून मुंबईच्या अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये जाते. कॉन्सुलेटमध्ये अर्जदाराव्यतिरिक्त कोणालाही जाण्यास परवानगी नसल्याने मुलगा अर्थातच बरोबर असत नाही. तसेच, सुरक्षाकारणांसाठी कॉन्सुलेटच्या थेट समोर थांबण्यासही कोणाला परवानगी नसल्याने मुलगा तेथेही घुटमळू शकत नाही. सबब, कॉन्सुलेटच्या दाराकडे त्याची सतत नजर नसते. मुलगी इंटरव्ह्यूला म्हणून कॉन्सुलेटला जाते. नि तेथून पसार होते.
अशा काही केसिस माहितीतल्या आहेत. याशिवाय याहूनही काही भन्नाट किस्से आहेत, पण ते ऐकीव आहेत या कारणास्तव येथे उद्धृत करीत नाही.
अशा केसिसमध्ये दोष कोणाचाही असला, तरी 'समाज नावाच्या गुंतागुंतीच्या रचने'त संशयाचे बोट हे काही अंशी तरी नवर्याकडे वळते, आणि विशेषतः असे प्रकार भारताबाहेर घडले, तर (पुन्हा, दोष कोणाचाही असो) नवरा (निर्दोष सिद्ध होईपर्यंत) विनाकारण कायदेशीर अडचणीत अडकण्याची शक्यता बळावते. मनस्ताप होतो तो वेगळाच.
तर सांगण्याचा मुद्दा हा, की फसवणुकीचे हे तथाकथित उलटे प्रकारही घडत असतात, आणि ते तितकेही अपवादामक नसावेत. त्यांच्याबद्दल काही परामर्श घेतला गेल्याचे आढळले नाही. कदाचित हे आपल्या गावी नसावे किंवा कदाचित लेखाच्या स्कोपमध्ये नसावे. किंवा कदाचित 'पुरुष काय, तसेही स्वतःला सांभाळून घ्यायला समर्थ असतातच' हे सामान्य गृहीतकही असू शकेल. ते काहीही असले तरी त्याबद्दल पंगा घेण्यात फारसे स्वारस्य नाही.
फक्त एकच कुतूहल आहे. अशा रीतीने फसवले जाऊन कायदेशीर अडचणीमध्ये सापडणार्या एनाराय पुरुषांकरिता तुमचे एनाराय सेल नेमके काय करीत आहे, हे जाणून घ्यायला आवडेल. (अर्थात, काही करावे ही अपेक्षा नाही. कारण 'Caveat Emptor' आणि 'खड्ड्यात पडल्यास, पडणार्याने तिसर्यावर न विसंबता स्वतःच स्वतःला त्यातून बाहेर काढण्याचे पाहणे उत्तम' या दोन्ही गोष्टी आम्ही मानतो.)
जाताजाता: काँट्ररी टू पॉप्युलर हाइप, होणार्या एकूण एनाराय-अरेंज्ड विवाहांच्या टक्केवारीच्या तुलनेत फसवणुकीचे प्रकार हे तसे तुरळकच असावेत, आणि एकंदरीत हा प्रकारही एकंदर विवाह या प्रकाराच्या तुलनेत बर्यापैकी सेफ असावा, असे कोणत्याही आकडेवारीविना मांडण्याचे धाडस करू इच्छितो. परंतु, कोणत्याही विवाहाप्रमाणे यात फसवणूक होऊ शकते, आणि तशी ती झाल्यास अंतरे आणि राष्ट्रसीमा यांमुळे अधिक त्रास आणि मनस्ताप होऊ शकतो हे लक्षात घेता, योग्य ती खबरदारी घेण्याबाबत काहीच आक्षेप असू शकत नाही. तसेच, ज्यांना हा मार्ग पटतो किंवा झेपतो, त्यांनी तो जरूर अवलंबावा; इतरांनी तो अवलंबावाच, असा कोणाचाही आग्रह असल्याचे ऐकिवात नाही. बाकी, बायका अथवा नवरे आयात करावेत की न करावेत, जोडीदार स्थानिक असावेत की आयात, सजातीय/सधर्मीय/सवंशीय/सलैंगिक असावेत की आंतरजातीय/आंतरधर्मीय/आंतरवंशीय/आंतरलैंगिक, निकषांप्रमाणे जोडीदार न मिळाल्यास विवाह न करता रहावे (एकट्याने, दुकट्याने अथवा समूहाने) की यांपैकी कोणते - नि कोणकोणते - निकष ढिले करावेत, हा ज्याचात्याचा / जिचातिचा वैयक्तिक प्रश्न असल्याने, त्याबद्दल कोणतीही टिप्पणी - अगदी ट्रेंडात्मकसुद्धा - करण्याची फारशी गरज निदान मला तरी भासत नाही.
बाकी चालू द्या.
1 Aug 2011 - 10:43 am | अर्धवट
पंगासेठ, मुद्दे पटले..
आणि "ट्रेंडात्मक" हा शब्द आवडला..
असाच एक "साटल्य" पुर्वी वाचला आणि आवडला होता, बहुतेक तुम्हीच उल्लेखिला होतात.
1 Aug 2011 - 10:46 am | सहज
कदाचित लेखाच्या स्कोपमध्ये नसावे
बास! इतके समजुन घेउन हा एक ठरावीक माहीतीपूर्ण लेख आहे काथ्याकुटाचा विषय नाही हे पाहूनच चान चान म्हणुन गप्प बसायचे ठरवले आहे.
2 Aug 2011 - 4:47 pm | अरुंधती
नमस्कार पंगा!
आपण नॅशनल वुमेन्स कमिशनच्या संकेतस्थळावरील एन आर आय सेल संदर्भातील माहिती वाचलीत तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिथे मिळतील. वरील लेखात तेथील माहितीच्या आधारेच विधाने केली आहेत. हवी तर घ्या, नाहीतर राहू द्यात. त्याने परिस्थिती थोडीच बदलणार आहे? :-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
2 Aug 2011 - 4:47 pm | अरुंधती
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :)