ए दिल ए नादान..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
30 Jul 2011 - 8:04 am

केव्हातरी अचानक एखाद्या गाण्याची आठवण होते आणि मग ते गाणं इंटरनेटवर शोधून ऐकावंसं वाटतं. आताच्या हायटेक जमान्यात हे करणं सहज शक्यही आहे. त्या गाण्याला ऐकण्याच्या मोहात आपण यूट्यूब, धिंगाणा अशी एखादी साइट उघडतो आणि ते गाणं वाजू लागतं. आपल्याही नकळत आपण त्या गाण्याच्या आधीन होऊन जातो आणि ब्रम्हानंदी टाळी का काय म्हणतात ते होतं.
ए-दिल-ए -नादान.. हे गाणं पहिल्यांदा केव्हा कानावर पडलं आत्ता आठवतही नाही मला. पण या गाण्याची गहराई जेव्हा पहिल्यांदा जाणवली तो प्रसंग मी विसरूच शकणार नाही. साधारण १०-१२ वर्षापूर्वी....तेव्हा मी कॉलेजला होते आणि मी आणि काही मैत्रीणी कुठूनतरी येत होतो. बहुतेक पुण्याहूनच. कोणतीतरी ट्रॅव्हल्सची बस होती. साधारण रात्रीची वेळ होती ८-९ वाजत आले असतील. बसमधले सगळे दिवे बंद होते आणि कोणती तरी एकच खिडकी उघडी होती आणि त्यामुळे अंगाला गार वारा झोंबत होता. आणि बसमधल्या कुणीतरी ट्रांझीस्टर चालू केला आणि त्यावर हे गाणं चालू झालं. त्या अंधार भरल्या बस मध्ये केवळ रस्त्त्यावरच्या दिव्यांचा येणारा जाणारा प्रकाश! चेहर्‍यांवर होणारा प्रकाश -अंधारचा खेळ, त्या एकाच उघड्या असणार्‍या खिडकीतून अंगाला जरासा झोंबून जाणारा वारा.. अर्धे पेंगणारे लोक आणि त्या गूढ वाटणार्‍या बसच्या घरघर आवाजातही स्वत:च्या आवाजाने काळजाला भेगा पाडणारा लताबाईंचा आवाज!! तेव्हा हे गाणं इतकं कसं खोलवर गेलं खरंच नाही समजलं. पण तेव्हापासून या गाण्याने मनांत जे घर केलंय ते कायमचं. काय लिहू या गाण्याबद्दल!!

ए दिल-ए-नादान ए दिल-ए-नादान
आरजू क्या हैं, जुस्तजू क्या हैं

कुठेतरी अशाठिकाणी जाऊन बसावं जिथे केवळ मनाशीच संवाद होऊ शकेल. आणि त्या दुनिये मध्ये भरकटलेल्या मनाला, अंजारून गोंजारून विचारावं.. 'बोल रे वेड्या.. माझ्या मना बोल! तुला काय हवंय?? अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तू इतका झुरतो आहेस?? इतकी सगळी सुख आहेत तुझ्या दाराशी.. मग कशाचा इतका शोध घेतो आहेस? नक्की काय शोधतो आहेस?? बोल रे.. माझ्या मना.. बोल रे!!"
मनाला काय हवंय? हा प्रश्न म्हंटलं तर खूप गहिरा आहे. आणि मन तरी कुठे जाग्यावर असतं हो..! त्याला काही विचारायला, बोलायला.. मन एक जागी थांबायला तर हवं. म्हणून तर बहिणाबाई म्हणतात, 'मन वढाय वढाय.. उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलं हाकलं.. फ़िरी येतं शिरावर' !

हम भटकते हैं, क्यों भटकते हैं दश्त-ओ-सेहरा में
ऐसा लगता हैं, मौज प्यासी हैं अपने दरीया में
कैसी उलझन हैं, क्यों ये उलझन हैं
एक साया सा, रुबरु क्या हैं

मनाशी चालेला संवाद! आपलीच कथा त्याला ऐकवायची. आपली म्हणजे आपली आणि मनाची अशी दोघांची मिळून. कोणाच्या शोधात, कशाच्या शोधात आपण भटकतो अहोत? का भटकतो आहोत? अशी कोणती गोष्ट आहे जी आसपास नाहीये.. की जिच्यासाठी रानावनातून, वाळवंटातून आपण भटकतो आहोत.. काहीच समजत नाहीये. मना.. तू तरी सांग अरे!! मी माझ्या या दुनियेत असूनही का परकी वाटतेय.. ? अथांग सागरातली एखादी लाट तहानेने व्याकुळ व्हावी.. तशी मी आहे? का आहे? सांग रे मना...! काय नेमका गोंधळ होतोय माझा? आणी का होतोय?
कुठेतरी कुणीतरी साद घालतंय का? नक्की कुठून येतेय ही साद? माझ्यासमोर मीच आहे का? की साद घालणारी ती अज्ञात छाया आहे?
एकांती संवाद होताना इतके सगळे प्रश्न पडावेत, मनाच्या गाभार्‍यात कुठेतरी काहीतरी हळूवार हलून जावं. पाण्यावर एखादं पान पडल्यावर जसे तरंग निर्माण होतात तसेच मनावर तरंग उमटावे.. पण उत्तर सापडू नये! काय अवस्था आहे ना!!

क्या कयामत हैं, क्या मुसिबत हैं
कह नहीं सकते, किस का अरमॉं हैं
जिंदगी जैसे खोयी खोयी हैं, हैरान हैरान हैं
ये जमीन चूप हैं, आसमान चूप हैं
फ़िर ये धडकन सी चार सू क्या हैं

नाही मिळाली उत्तरे..! ते प्रश्न वारंवार येऊन दारावर धडका देताहेत पण दार उघडत नाहीये. आणि म्हणून मनाची अवस्था इतकी हळवी झालीये की, उत्तरे नाही मिळाली तर आता प्रलय येईल..संकट येईल.. काहीतरी भयंकर घडेल . काय घडेल.. नाही सांगता येत. नक्की काय हवंय? कोणाची वाट पाहतंय हे मन..? माझं आयुष्य इतकं कुठे हरवून गेलं आहे? का हरवून गेलं आहे? इतकी कसली आस आहे मनाला की ज्याच्यामुळे संपूर्ण आयुष्य हैराण झालंय?? कोण देईल याची उत्तरे? कुठे मिळतील?? कोण सांगेल??
मनाच्या या अवस्थेचं वर्णन करताना जमीन आणि आकाश यांची घेतलेली मदत लाजवाब आहे. 'ये जमिन चूप हैं'.... एक गूढ शांतता. दूर पर्यंत फक्त आणि फक्त जमिनच आहे.. रखरखीत वाळवंटी !! जिथे साद घालावी आणि दूरपर्यंत केवळ आपलाच आवाज जावा पण जिवंतपणाचा काही मागमूसही नसावा. मग पुन्हा 'आसमान चूप है.." पुन्हा तेच! संपूर्ण आकाशात ओळखीचा असा एखादाही रंग नसावा..! या दोन्ही ठिकाणी असलेली शांतता काळजाला घरे पाडते. त्या जमिन आनि आसमानच्या मध्ये एका विचित्र अवस्थेत आपण अडकलोय हे मनाला जाणवतं आणि नकळत अंगावर एक शहारा येतो. आणि आता ही जमिन आणि हे आकाश दोन्हीही शांत आहेत.. चिडीचूप आहेत.. मग ही स्पंदने कोणाच्या हृदयाची आहेत .. मना!!! चहू दिशांतून ऐकू येणारी ही स्पंदने.. काय आहेत? ती माझ्यावर येऊन का आदळताहेत??
मग कुठेतरी मनाला अचानक झोपेतून जाग यावी तशी जाग येते आणि साक्षात्कार होतो प्रेमाचा!! त्या जमिनीचं, त्या आकाशाचं शांत असणं, आपल्याच मनाची छाया आपल्या समोर येऊन उभी राहणं , या सगळ्याच्या तळाशी असलेल्या प्रेमाचा चहू दिशातून येणारा हुंकार ऐकू यायला लागतो. आणि या परमोच्च आनंदासोबतच त्या प्रेमाला असलेली दु:खाची किनारही जाणवते. मनाची तरल अवस्था किती कोमल शब्दांत बांधली आहे पहा!

ए दिल-ए-नादान ऐसी राहोन में कितने कांटे हैं
आरजूओं ने हर किसी दिल को दर्द बांटे हैं
कितने घायल हैं, कितने बिस्मिल हैं
इस खुदाई में एक तू क्या हैं

वेड्या मना! तू खरंच वेडा आहेस! कशाला या प्रेमाच्या वाट्याला गेलास? अरे या वाटेवर असंख्य काटे आहेत. ज्यानी प्रेमाची इच्छा केली.. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी प्रेम केल त्या सगळ्यांनाच अगणित वेदना मिळाल्या आहेत. अरे, किती दु:ख करून घेशील !! बघ जरा आजूबाजूला बघ...! प्रेमामध्ये घायाळ झालेली, जखमी झालेली, विद्ध झालेली इतकी लोकं आहेत.. !! मग अरे वेड्या... तुझं दु:ख घेऊन काय कुरवाळत बसला आहेस !!
मनाची काढलेली समजूत!! सुरूवातीला पडलेले असंख्य प्रश्न, त्यांची उत्तरं शोधण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा , त्यातून आलेली आगतिकता! मग.. मिळालेलं हे उत्तर!
आपलं प्रेम मिळू शकणार नाही याची झालेली बोचरी जाणिव, आणि मग मनानेच कढलेली मनाची समजूत! एक छोटिशी कथा अगदी कोमल आणि हळव्या शब्दांत बांधलेली.

या गाण्यातल्या नेमक्या कोणत्या बाजूबद्दल लिहू! जान निस्सार अख्तर यांचे शब्द तर लाजवाब आहेतच! पण खय्याम यांचं संगीत ! खरंच असं वाटतं की ते त्या जमिन आणि आसमान ला जाब विचारतंय, उत्तरं मागतंय. आणि या सगळ्याच्यावर.. या शब्दांना, त्या संगिताला न्याय देणारा लताबाईंचा आवाज! 'क्या कयामत है.. क्या मुसिबत है' गाताना टिपेला जाणारा.. तितकाच आर्त.. आणि 'ये जमिन चूप है' गाताना तितकाच हळवा होणारा!
काय काय लिहू! हे गाणं मनावर का कोरलं गेलं असावं याची कारणं शोधली पण मलाही नेहमी वेगवेगळी कारणं मिळाली. सांगितिक दृष्ट्या या गाण्यातली सौंदर्यस्थळं मी नाही दाखवू शकणार. तितकी माझी पोचही नाही. मात्र हे गाणं जसं मला भावलं तसं तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला आहे. हे गाणं बनवून जान निस्सार अख्तर, खय्याम साहेब आणि लताबाईंनी जे उपकार केले आहेत.. त्याची थोडीशी परतफ़ेड माझ्याकडून!

-प्राजु

(पूर्वप्रकाशन रामदास काकांच्या 'दिपलक्ष्मी' या अंकात)

संगीतचित्रपटप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

30 Jul 2011 - 8:59 am | ५० फक्त

या गाण्यात एक मध्ये एक जबरदस्त शांत पॉज येतो, काही नाही ना संगीत ना शब्द पण ती शांतताच बाकी सर्व शब्द आणि संगीत जेवढा खोल घाव करु शकत नाहीत तेवढा खोल घाव करुन जाते,

आणि त्या पेक्षाही वाईट आणि खरोखरच जीवघेणा घाव करतो तो एक म्युझिक पिस ' मेरा कुछ सामान तुम्हारे पास ' मधला सतत बारा वेळा बहुधा गिटारची तार टुंग टुंग करत राहते, हेडफोन वर बास मॅक्स करुन किंवा मेटल इक्विलायझर वर ऐका, दहातल्या ९ वेळा अ‍ॅटॅकची भिती वाटते.

त्याच पठडीतलं अजुन एक गाणं म्हणजे, ' करोगे याद तो,' यातली एक ओळ ' निगाह दुर तलक जा के लौट आयेगी' वाईट रे अतिशय वाईट.

मायमराठीपण काय कमी नाय यात, ' भातुकलीच्या खेळामधली ' गाताना ' का राजाचा श्वास कोड्ला; ही ओ़ळ श्वास न कोंडता गाताच येउ नये अशी लिहिलिय आणि गायलीय.

'अंगणात गमले मजला संपले बालपण माझे' हे लिहिताना पण मला सहन होत नाहीये, ..

गाणं प्रथम कधी ऐकलं त्या वेळेचं वर्णनही आवडलं. गाण्यातल्या सौंदर्यस्थळांचं याहून आधिक काय चांगलं वर्णन करता आलं असतं?

मी हा चित्रपट पाहिलेला नव्हता, मला हे गाणं नेहेमीच नदीत होडीत बसून नायिका म्हणात असावं असं वाटत असे. कदाचित ते संतुर च्या वापरामुळे असावं.

या गाण्यात काय आवडत नाही? इतक्या ठिकाणी हे गाणं भावस्पर्शी आहे की काही दोन तीनच जागा शोधणं कठीण आहे. तरीही उल्लेखच करायचा झाला तर:

संतुर-तबला-व्हायोलिन-सारंगी यांचा इतका सुंदर मेळ फार कमी हिंदी गाण्यांमध्ये आठवतो. (एक थोडंसं साम्य असhttp://misalpav.com/node/18660लेलं दुसरं गाणंही खय्याम यांचंच आहे, 'प्रेमपर्बत' या चित्रपटातलं, 'ये दिल और उनकी निगाहोंके साये')

३.५१ च्या आसपासचा 'क्या कयामत है, क्या मुसीबत है' या शब्दांबरोबर चढणारा लतादीदींचा आवाज आकाशाला गवसणी घालतो.

४.३१ ते ४.४५ या दरम्यानचं 'ये ज़मीं चूप है, आसमां चूप है' या ओळींच्या आसपासचं संगीताचं थबकणं तर जीवघेणं आहे.

एका अवीट गोडीच्या गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल आणि उत्तम रसग्रहणाबद्दल प्राजूचे आभारच मानायला हवेत.

(मी तरी) बर्‍याच दिवसांनी प्राजुचा लेख वाचतोय, इतकंच म्हणेनः 'देर आये, दुरुस्त आये!'

मदनबाण's picture

30 Jul 2011 - 1:36 pm | मदनबाण

सुंदर लिहलयस तू... :)

योगप्रभू's picture

30 Jul 2011 - 1:55 pm | योगप्रभू

कधी कधी माणसे पाण्यात डुंबत नाहीत, पोहतही नाहीत. ती केवळ पाण्यावर डोळे मिटून विसावतात आणि प्रवाहाच्या लयीचा आनंद घेतात. वाहात राहण्याचे सुख अनुभवतात.

प्राजु, आताही असंच वाटतंय तुझे लेखन वाचून. हे गाणे ऐकत, तुझे छान विचार वाचत फक्त एक फील घ्यावा आणि मनाशी संवाद साधावा. प्रतिक्रिया नकोच द्यायला.

काही बोलायचंच असेल तर इतकंच म्हणेन 'अप्रतिम' :)

अन्या दातार's picture

30 Jul 2011 - 2:58 pm | अन्या दातार

खरोखर अप्रतिम. गाण्याची चिकित्सा/चिरफाड न करता केलेले सुंदर विश्लेषण.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jul 2011 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा

१) प्यार तेरी पेहेली नजर को सलाम

२)चांर दिनोका प्यार ओ रब्बा..बडी लंबी जुदाई..लंबी जुदाई

३)ओ रब्बा कोई तो बताए प्यार होता है क्या

४)फीरं भोरं भई...जागा मधुबन...(झाकीर च्या साज मधलं)

५)गली गली मोरा दिल तरसे

अता ह्यातली कोणती कोणत्या क्षणी अइकली,ते काही आठवत नाही...पण ही गाणी अइकल्यावर काही घडुन गेलेले क्षण अठवतातच... गाण्यांची गाठ अशी नाहीतर तशी आपल्याशी पक्की असते हेच खरे...

गणपा's picture

30 Jul 2011 - 3:24 pm | गणपा

अतीसुंदर..
पण हे काय यात एकही वादग्रस्त विधान, शब्द नाहीत. मग आता दंगेखोरांच काय होणार?

अशीच अजुन दोन आवडत गाणी म्हणजे उत्सव मधली "सांज ढले गगन तले" आणि "मन क्युं बेहेका री बेहेका"

५० फक्त's picture

30 Jul 2011 - 4:51 pm | ५० फक्त

गुरुवर्य गणपा , 'मन क्यों बहका रे बहका' हे गाणे मी वर दिलेल्या बाकी गाण्यांमुळे आणि त्यात अधिक ' रंजिशे सही ' या सगळ्यांमुळं जो एकटेपणा किंवा उदासीनता येते ना त्या वरचा अतिशय उत्तम उतारा आहे, पण ' मेरा कुछ सामान' आणि 'ती गेली तेंव्हा' जे दुखः देउन जातं ना त्याला उतारा नाही, शेवटचं ' मै भी वही सो जाउंगी'' फक्त काळीज चिरणं एवढं एकच गोष्ट करतं, बाकी काही नाही.

अजुन एक गाणं राहिलं ' कभी तनहाईयों में युं हमारी याद आयेगी' सुरुवातीला बहुधा बासरी वाजते आणि गायिका तोच सुर पकडुन गाणं सुरु करते, वाद्य संपतं कुठं आणि आवाज सुरु कुठं होतं ते कळतच नाही. हे मला आवडतं कारण हे गाणं निराशावादी नाहीयं म्हणुन, ' ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यारकी दुनिया, न फिर तु जी सकेगा और ना तुझको मौत आयेगी '' डायरेक्ट धमकी, याला म्हणतात अ‍ॅटिट्युड. असंच अजुन एक गाणं ' रे तुझ्या वाचुन काही येथले अडणार नाही' नाट्यपद आहे. ' तानसेना वाचुनी किंवा सदारंगाविना, काय मैफिल या जगाची रंगली केंव्हाच ना, कोण तु कोण तु तुजविण वीणा बंद ही होणार नाही '

पाषाणभेद's picture

31 Jul 2011 - 10:23 am | पाषाणभेद

थोडक्यात विरहगीत जुनी खपली काढतेच.

इंटरनेटस्नेही's picture

1 Aug 2011 - 4:18 am | इंटरनेटस्नेही

.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jul 2011 - 5:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

लताबाईंनी गायलेल एक नितांत सुंदर गाणे. आणि त्याची तितकीच सुंदर ओळ्ख.

लताबाई म्हणजे साक्षात सरस्वतीमाताच. दुसर्‍या कोणत्याही शब्दात त्यांचे वर्णन होउ शकत नाही.

आपल्या नकळत आपण गाण्यात गुरफटुन जातो आणि मग ते गाण कधी संपल ते कळतच नाही.

त्यांचे कोणतेही गाणे घ्या तितक्याच तल्लीनतेने आत्मीयतेने आणि सहजतेने गायलेले असते. मी काही फार ग्रेट वगेरे करतीय असला कोणताही आव न आणता.

प्रतिसादांमधे उल्लेख झालेले प्रत्येक गाणे म्हणजे आपल्याला मिळालेला एक अनमोल ठेवा आहे. आयुष्यभर जपावा असा. खरोखर आपण किती भाग्यवान आहोत.

पैजारबुवा,

दोन अविस्मरणीय गाणी:

कभी तनहाईयों में युं हमारी याद आयेगी:
http://www.youtube.com/watch?v=1pfVgEjnafg

तुम अपना रंजोगम... अपनी परेशानी मुझे दे दो....
http://www.youtube.com/watch?v=A8Yr1OOeOT8

स्वाती दिनेश's picture

30 Jul 2011 - 6:43 pm | स्वाती दिनेश

प्राजु, छान लिहिले आहेस.आवडले.
स्वाती

सौन्दर्य's picture

30 Jul 2011 - 8:22 pm | सौन्दर्य

प्राजु,

ईतक्या हळूवार पणे लिहीले आहेस कि ते गाण्याच्या तारेशी एकदम जुळते. खूप दिवसांनि इतके चांगले वाचावयास आणि ऐकावयास मिळाले. ऐकावयास अश्यासाठी म्हंट्ले कि लेख वाचताना गाणे मनात तरळू लागले.

फारच छान.

सौन्दर्य

प्राजु's picture

30 Jul 2011 - 9:07 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार!

मलाही आवडतं हे गाणं .
हा धागा वाचताना पुन्हा ऐकून झालं.
त्याबद्दल धन्यवाद!
गाणं जितकं उत्कट आहे ते भाव त्या अम्मा मालिनीच्या चेहर्‍यावर दिसत नाहीत म्हणून काहीतरी चुकल्यासारखं वाटतं एवढच! मी सिनेमा पाहिला नाही पण या ठिकाणे रेखा (किंवा करिश्मा कपूर...... त्यावेळी पाळण्यात असणार ती गोष्ट वेगळी) चांगले काम करू शकली असती असे वाटले.

विजुभाऊ's picture

1 Aug 2011 - 1:43 pm | विजुभाऊ

हे गाणे एकटेच असताना हाती शिवास रीगल घेवून ऐकून बघा ......... साल्ल.... ग्लासातील द्रवापेक्षा गाण्याचीच कीक जास्त येते............
प्राजू एका सुंदर गाण्याची याद ताजा केलीस धन्यवाद

वाचल्यावर त्याच दोन ओळी मनात गुणगुणत होत्या,

ए दिल-ए-नादान, ए दिल-ए-नादान

लेखात उल्लेखलेले गीत आणि पहिल्याच प्रतिसादात दिलेली सारीच गीते हृदयाच्या तारा छेडून जातात.
त्यात माझी भर -
१. आनंदमधील - "कहीं दूर..." : या गाण्याच्या प्रथम अनुभवावर असाच लेख लिहिता येईल.
२. पं. जीतेंद्र अभिषेकींचे - "काटा रुते कुणाला"