२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती...
२० मे ते २४ मे २००६... या गोष्टीला आज बरोबर दोन वर्षे पूर्ण होत आहेत आणि आजच तेंडुलकरांच्या दु:खद निधनाची बातमी सकाळी समजली.
या कार्यशाळेदरम्यान तेंडुलकरांच्या पायाशी बसून काही शिकायची संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो...
कार्यशाळेदरम्यान मी स्वत: काढलेले छायाचित्र..शेजारी संदेश कुलकर्णी
या कार्यशाळेसाठी मुंबई,पुणे बरोबरच सोलापूर, रायगड, नगर , औरंगाबाद, लातूर या ठिकाणांहून लेखक सहभागी झाले होते...
पहिल्याच दिवशी सर्वांची ओळख करून घेताना त्यांनी " तुम्ही सारे का लिहिता किंवा तुम्हाला पहिल्यांदा नाटक का लिहावंसं वाटलं? " या प्रश्नाबद्दल जरा सविस्तर बोला असं सगळ्यांना सांगितलं...त्यांनी सगळ्यांचं नीट ऐकून घेतलं... त्यांचा हा एक मला स्वभावविशेष जाणवला की "मी म्हणतो तेच खरं आणि तसंच सगळ्यांनी लिहायला हवं " असं चुकूनही त्यांनी कधी म्हटलं नाही..कोणत्याही शंकेवरती त्यांनी "याबद्दल माझा स्वत:चा एक अनुभव सांगतो त्यातून तुम्हाला काही लक्षात घ्यावंसं वाटलं तर बघा " असंच म्हटलं....
त्यांच्या लेखनप्रवासातला " शांतता कोर्ट चालू आहे " या एका महत्त्वाच्या नाटकाच्या लेखनाची सुरुवात कशी झाली याबद्दल त्यांनी खूप सांगितलं....
त्यांचं म्हणणं होतं की नाटककाराला लिहिता लिहिता पात्रं दिसली पाहिजेत, त्यांच्या हालचाली दिसल्या पाहिजेतच शिवाय ते ऐकूही आलं पाहिजे...सारी वातावरणनिर्मिती निदान लेखकाच्या मनात पक्की हवी...( त्यासाठी दिग्दर्शकाला उपयोगी पडणार्या रंगसूचना शक्य तेवढ्या स्पष्ट द्यायला हव्यात...आता दिग्दर्शक त्या किती वापरणार ते तो ठरवेल पण संहितेमध्ये तुमचे नाटक स्पष्ट हवं)...
कमीतकमी वेळात आणि कमीतकमी संवादात खर्या आणि सशक्त व्यक्तिरेखा तयार करणं हे नाटकाचं मोठं बलस्थान आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं...त्यासाठी त्यांनी अपर्णा सेनच्या " मिस्टर ऎंड मिसेस अय्यर" या फ़िल्ममधली बसमधील पात्रांची उदाहरणे दिली आणि ती फ़िल्म खास त्या सीनसाठी तिथे परत पहायला लावली....
त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ....लेखक सुरुवातीला आपापली पात्रे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये डोक्यात ठेवून गोष्ट लिहायला सुरू करतो, आणि ठरवलेल्या एका विशिष्ट शेवटाकडे जाण्याच्या दृष्टीने तो लिहित असतानाच कधी कधी जाणवायला लागतं की ते पात्र म्हणतंय मी नाही असा वागणार, मला वेगळं वागायचंय, पण मग त्यासाठी गोष्ट बदलली तरी बदलू द्या, नाटक लांबलं तरी लांबूद्या..., संपादन पुनर्लेखन या तांत्रिक बाबी नंतर हाताळा परंतु आधीच शेवट ठरवून नवनवीन शक्यता सोडून देऊ नका... मला हे फ़ार महत्त्वाचं वाटलं........
या चार दिवसांमध्ये चंद्रकांत कुलकर्णी, गिरिश जोशी , जब्बार पटेल, संदेश कुलकर्णी या मंडळींचंसुद्धा उत्तम मार्गदर्शन लाभलं... पुणे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जाऊन आम्ही तिथल्या उत्तम छोटेखानी थिएटरात "शांतता कोर्ट चालू आहे " ही फ़िल्म पाहिली , दूरदर्शनवर फ़ार लहान असताना पाहिली होती...आणि त्यातल्या कडी लागण्याच्या दृश्याबद्दल तेंडुलकरांनी झकास स्पष्टीकरण दिलं
लेखक असूनही प्रत्येकाला नाटक तयार कसं होतं, सेट कसा लागतो, प्रकाशयोजना कशी ठरते, तालीम कशी होते हे ठाऊक असणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं त्यामुळे त्यांनी सर्वांना जसा येईल तसा अभिनयही करायला लावला...
शेवटच्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांनी कार्यशाळेदरम्यान तयार केलेल्या काही (सुमार) कथांचं रंगमंचावर सादरीकरण केलं तेही त्यांनी सहन केलं आणि छान करताय असं म्हणाले. :)
अगदी जाताना पुन्हा तीन महिन्यांनी कार्यशाळा परत घ्यायचं ठरलं ,तुम्ही आपापली नाटकं लिहून आणायची.. कोणत्याही समीक्षकाला बोलवायचे नाही, आपणच आपापल्या नाटकांचे समीक्षण करू असं स्वत: तेंडुलकर म्हणाले...
आता मात्र या कार्यशाळेचा योग कधीच येणार नाही...
प्रतिक्रिया
19 May 2008 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तर,
जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर मराठी नाटकाचा झंजावात. त्यांचा स्वभाव आणि नाटके सतत चर्चेत राहणारी अशीच होती.
ऐंशी संहितेमधून आपल्या संहितेची निवड होऊन आपणास नाट्य लेखन कार्यशाळेत त्यांचे मार्गदर्शन घेता आले आपण भाग्यवान आहात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
19 May 2008 - 5:20 pm | प्रभाकर पेठकर
असे भाग्य फार थोड्या गुणवंतांना लाभते. अशा वेळी खूप काही शिकता येते. भाग्यवंत आहात.
19 May 2008 - 5:51 pm | शितल
तुमचे नशिब मोठे तुम्हाला ते॑डु॑लकरा॑चे मार्गदर्शन लाभले, आणि स॑देश कुलकर्णी हे देखिल माझे आवडते व्यक्तीमत्व आहे.
तेडु॑लकरा॑ना माझी विनम्र आदरा॑जली.
19 May 2008 - 7:32 pm | कलंत्री
तुम्हाला योग्य ते दिशा आणि विचार मिळालाले आहेत. या विचारावरच पूढील कार्य चालु ठेवा. नाहीतर अश्या मान्यवरांच्या मृत्युनंतर आपण परत विसरतो. अश्या कार्यशाला भरविणे हीच खरी श्रद्धाजंली असेल.
19 May 2008 - 7:38 pm | चतुरंग
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा.
शुभेच्छा!
चतुरंग
19 May 2008 - 8:22 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
20 May 2008 - 7:11 am | विसोबा खेचर
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो.
अगदी हेच म्हणतो. मास्तर, नशीबवान आहात...!
तात्या.
20 May 2008 - 12:36 pm | स्वाती दिनेश
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा.
शुभेच्छा!
असेच म्हणते,चतुरंगसारखेच.
स्वाती
20 May 2008 - 1:03 am | भडकमकर मास्तर
त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?"

त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा..
मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता.

.... नाटक कुठेही घडू शकते.
एका मध्य प्रदेशातील नक्षलवादी दुर्गम भागात मी हिन्दी घाशीरामचा प्रयोग पाहिला आहे. पण दोनच कलाकारांचा... फार छान होता तो प्रयोग... दोघे उत्तम गायक होते आणि अभिनेते... नाटकातला त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय सत्तास्पर्धेचा आशय ते उत्तम मांडत होते.
यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे"
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 May 2008 - 2:55 am | धनंजय
असे स्फूर्तिस्थान मिळते ते मोठ्या भाग्याचे असते.
20 May 2008 - 8:31 am | विकास
तेंडुलकरांबरोबर काम करायला मिळाले हे भाग्य आहे. खालील माझा प्रतिसाद टिकात्मक असला तरी मला देखील त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले असते तर आवडले असते.
गेल्या पिढीतील अनेक बुद्धीवादी लेखकांपैकी तेंडूलकर होते. त्यांच्यातील बुद्धीवंताला आदरांजली वाहत असतानाच त्यांच्याच पद्धतीने थोडेसे लिहावेसे वाटले...मला कल्पना आहे की कदाचीत मला जे काही वाटते ते अनेकांना पटणार नाही, पण त्यांच्याच, म्हणजे तेंडुलकरांप्रमाणे जे वाटते ते स्पष्टपणे लिहून ही अनोखी पण मनापासून आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे.
असे म्हणायचे कारण इतकेच की पु ल आणि कुसुमाग्रजांसारख्यांना (त्यांच्या मृत्यूनंतरही) तेंडूलकरांनी बुद्धीवाद म्हणून टिका करत नावे ठेवल्याचे आठवते...एकीकडे श्री पु भागवतांना मनोहर जोशींकडून पुरस्कार घेऊ नये म्हणून जाहीर दबाव आणणारे तेंडूलकर नंतर त्याच जोशीबुवांबरोबर न्युयॉर्कला एकाच व्यासपिठावर बसल्याचे आठवते...
त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता.
जर वरील विधान हे तेंडूलकरांनी केले असले तर सखेद आश्चर्य वाटले...विचार करा तेंडुलकरांचे इतर बाबतीत विचार काय असावेत याचा : जर असेच विधान हे हिंदू पुढार्याने अन्याय झाला म्हणून मुसलमानांविरुद्ध नाटके करायला केले, अथवा आता राज ठाकरे अथवा कधिही शिवसेना जे काही परप्रांतिंयांविरुद्ध त्यांच्याकडून होणार्या कथीत अन्यायाविरुद्ध वाचा फोडून "राडा" करते त्यात आणि तेंडूलकरांच्या विचारात काय फरक? मग एकाचे चांगले आणि दुसर्यांचे अतिरेकी का म्हणायचे?
मला थोडक्यात इतकेच म्हणायचे आहे की स्वतःच्या बुद्धीचा वापर जर समाजात कुठल्याही पद्धतीचा द्वेष तयार करायला अथवा "पेटवायला" करण्यात येत असला तर त्याचे कौतुक का करायचे? हिंसा ही हिंसा असतेच - आणि ती कधी कधी तलवारी पेक्षा लेखणीने अधीक होऊ शकते. कधी दंगलीच्या रुपात तर कधी समाजात अंतर्गत द्वेष निर्माण करून...
कदाचीत असे करताना तेंडुलकरांनी पोटतिडकीने केले असेल - होणारे अन्याय पाहून... पण तेच इतरांचे झालेले असू शकते. म्हणून कुठेतरी असे राहून राहून वाटते की विचारी आणि बुद्धीवादी असून आणि उत्कृष्ठ साहीत्यनिर्मिती करत असताना देखील हे समाजाला वैचारीक दिशा देण्याच्या संदर्भात कुठेतरी वाट चुकलेले व्यक्तिमत्व होते.
20 May 2008 - 9:15 am | विसोबा खेचर
विकासरावांचा प्रतिसाद आवडला...
तात्या.
20 May 2008 - 9:21 am | भडकमकर मास्तर
त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता.
या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही... त्यांचा कोणत्या आतिरेकी, नक्षलवादी विचारांना कितपत पाठिंबा होता की नव्हता मला ठाउक नाही...तिथे तर ( आणि मी लिहिले आहे त्यातही ) सन्दर्भ फक्त नाटक कोठेही होऊ शकते एवढाच असावा....
बाकी चालूद्यात....
_
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 May 2008 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे
असा अर्थ विकासरावांच्या लिखाणातुन ही कोठेहि ध्वनित होत नाही. त्यांची आंदरांजली मात्र अगदी "तेंडुलकरी" वाटते.
प्रकाश घाटपांडे
20 May 2008 - 9:32 am | पिवळा डांबिस
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही!
नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!!
पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!!
नाटककार म्हणून एक भूमिका असणे निराळे आणि विचारवंत म्हणून तीच भूमिका निभावणे निराळे!!!!
विचारवंत म्हणून तेंडुलकर अपुरे पडले हे निश्चित!!!!!
कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!!
20 May 2008 - 4:24 pm | विकास
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!!
१००% मान्य आणि मला त्यांची नाटके आवडतात. उगाच त्यांच्या नाटकांबद्दल (विशेष करून घाशिराम) जो काही गोंधळ घातला गेला तो मला कधी आवडला / आवडत नाही. टिका करणे वेगळे आणि विचार करायलाच विरोध करणे वेगळे.
पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!!
इतकेच कुठेतरी वाटते. मी स्वतः कधी स्वतःला समाजवादी समजत नसलो, तरी पुर्वी सारख्या समाजवाद्यांची (विशेष करून मराठी) गरज आजही आहे असे वाटते. कुठलाच समाज एकेरी नसावा, जर तो चांगला प्रौढत्वाला (मॅचूअर) होणे गरजेचे वाटत असेल तर. त्यात आपल्याकडील समाजवाद्यांचे योगदान चांगले आहे.
कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!!
माझा देखील "टिका" करणे हा उद्देश नव्हता. पण जेंव्हा एखादे व्यक्तिमत्व हे विशाल असते तेंव्हा त्याला "मी श्रद्धांजली" वाहतो इतकेच अशा चर्च्रेत म्हणायच्या ऐवजी कुठेतरी थोडे त्या व्यक्तीचे आणि ती व्यक्ती ज्या विचारांचे प्रतिनिधित्व कदाचीत तिच्या कळतनकळत करते त्या विचारांचे थोडेसे विश्लेषण करावेसे वाटले.
20 May 2008 - 1:19 am | भडकमकर मास्तर
.
20 May 2008 - 9:56 am | भडकमकर मास्तर
इथे सर्व जण तेंडुलकरांवरती आरोप करणार आणि मग त्यांना मास्तर उत्तरे देणार असा विषय नाहीये , याची इथल्या सूज्ञांना कल्पना असणार याची मला खात्री आहे.... :)
(खुद्द माझ्या घरीही "तुमचे ते तेंडुलकर ..... " आणि मग हेच वरचे सर्व ऐकायची मला सवय आहे....)
मी छोटा माणूस त्याला काय उत्तरे देणार ?
त्यांच्याकडून चार दिवस नाटक शिकलो , मला आनंद आहे.... ( पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आणि नाटकातील सर्व विचारांचा मी सपोर्टर आहे असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, आणि इथे तो विषयही नाही.... मला न आवडणारे तेंडुलकर असा विषय ज्याने त्याने काढून आपापली मते त्यात जरूर लिहावीत... प्रत्येकाला तो अधिकार आहेच... )
इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा...
अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे ....
प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 May 2008 - 10:12 am | विसोबा खेचर
इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा...
खरं आहे आपलं म्हणणं!
अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे ....
कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल!
तात्या.
20 May 2008 - 6:38 pm | विकास
>>>कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल!
+१.
आपला हा लेख आणि अनुभव मला देखील नक्कीच आवडला आणि त्यात रसभंग व्हावा अशी माझी देखील इच्छा नव्हती/नाही. पण जेंव्हा मुक्त व्यासपिठावर एखादा विषय चर्चेला येतो तेंव्हा त्यात वाचताना जे सुचले ते पटकन लिहीले गेले. आपल्याला जर त्यात व्यक्तिगत टिका वाटली असल्यास क्षमस्व.
आणि हो, तेंडुलकरांना मी फक्त "तुमचे" मानत नाही. कुठलेही असामान्य व्यक्तिमत्व हे त्या समाजातील सर्वांचे असते आणि म्हणून त्यांच्यातील आवडणार्या आणि नावडणार्या गुणावगुणांसहीत ते "आमचे" ही आहेत आणि त्यात आनंद आहे.
20 May 2008 - 10:50 am | पिवळा डांबिस
मास्तर, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय!!
तुमची काही चूक नाही हो!!
असलीच तर "विजय तेंडुलकर" या महान विषयाला हात घालण्याचीच आहे!!:))
तो माणूसच इतका महान होता की त्याच्या साहित्यिक आणि विचारवंती कामगिरीविषयक निरनिराळी मतं असणारच!!
तेंडुलकर नाटककार म्हणून महान होते यात काहीच संशय नाही हो!!!
महान व्यक्तीच्याच कार्याचे मूल्यमापन होते!! भडक मकरांच्या कार्यांचे कोणी मूल्यमापन करील काय? (ह. घ्या.!!!)
आमचे म्हणणे इतकेच की त्यांची नाटककार म्हणून भूमिका आणि त्यांची विचारवंत म्हणून भूमिका (विशेषतः मोदींविषयी!!!!!!) यांचा मेळ लागत नाही!!!
कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!!
आमचे काही चुकले काय? असेल तर स्पष्ट करा........
आम्हाला आपल्या संतांचे एक वचन आठवते...
"देव्हार्यावरी विंचू आला,
देवपूजा नावडे त्याला,
तेथे पैजाराचे काम
अधमासी तो अधम"
आता आपले संत खरे की तेंडुलकर मोठे!!!!
स्पष्टोक्तीबद्द्ल क्षमा असावी!!
तुम्ही नाही म्हटलंत तरी "आपलाच",
पिवळा डांबिस
20 May 2008 - 1:40 pm | प्रकाश घाटपांडे
गोची होते खरी! काय करणार?
http://sadhanatrust.com/pdf/SW20080510.pdf या ठिकाणी पान नं २९ वर राहुल रेवले यांचा 'समाजवाद्यांनी केलेली सर्वात मोठी चुक ' हा लेख . यावर साधनाच्या संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. वाचनीय आहे.
प्रकाश घाटपांडे