औट घटकेचा पाहुणा...

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
13 May 2008 - 8:37 pm

मंडळी,
परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच.
तर झालं असं....
आमच्या कडे सकाळी सकाळी ७.०० वाजता पाणी येतं कार्पोरेशनचं. ते आलेलं होतं आणि आई अंगणात पाणी मारत होती. ते झाल्यावर तिने काही झाडांनाही पाणी घातलं. हे सगळं काम आई अंगणात आमच्या २ कुत्र्यांना सोबत घेऊन करते. म्हणजे ती कुत्री सकाळी अंगणात तिच्यासोबत हिंडत असतात. तर त्यादिवशी पाणी मारत असताना एकदम धप्प असा आवाज आला. आईने जाऊन पाहिले तर एक पिलू असलेला पोपट अंगणातल्या फरशीवर पडला होता. तो पडला, तसाच उठला आणि उडायचे सोडून चालू लागला. आमची कुत्री ताबडतोब शिकार मिळाल्याच्या आनंदात त्या पोपटावर धावून गेली. त्यात भर म्हणून की काय, सुगावा लागल्याप्रमाणे आमचं मांजरही तिथे दैत्य म्हणून हजर. झालं.... ! आईची तारांबळ उडाली. त्या पोपटाला वाचवायचं कसं? आईने मला जोरदार हाक मारली. साखर झोपेतून जागी होत मी अंगणात पळाले. झालेला प्रकार आईने गडबडीने कुत्र्यांवर ओरडत, मांजराला हुस्कावत मला सांगितला... मला पु.लं.च्या चितळे मास्तरांची आठवण झाली.
मी मोठ्या कुत्र्याला घराच्या मागच्या अंगणात पिटाळलं, लहान आहे त्याला त्याच्या घरात बंद केलं आणि मांजराला घरात हाकललं. मी हे सर्व करे पर्यंत आई त्या पोपटाच्या मागे त्याला पकडायला चालत (पळत नव्हे) होती. पण चाल हळूहळू असली तरी आईला(कोंबडी मागे पळण्याची सवय नसल्याने) तो पोपट काही पकडता येईना. शेवटी मी पुढे सरसावले (है शाब्बास... झाशीची राणी!!). आणि (कोंबडीमागे पळण्याची नाही, तरी मुलामागे पळण्याची सवय असल्याने) अलगद तो पोपट हातात उचलून घेतला. हुश्श! मात्र..... त्या पोपटाने जमेल तसे वळून, वेडेवाकडे होत... माझ्या हाताला चावायला सुरूवात केली. (इश्य! माझा हात त्याला पेरूप्रमाणे गोड वाटला की काय??) डाव्या हातचे एक बोट, उजव्या हाताची २ बोटं अगदी अनेक वेळा चावून जखमी केली. तरीही मी त्याला खाली सोडत नाही म्हंटल्यावर त्याने माझ्या बोट चावून रक्तबंबाळ केलं. मग मात्र मी त्याला खाली सोडून दिला. इतक्यात मला आमचं मांजर खिडकीतून उडी टाकून खाली आलेलं दिसलं. झालं! हा पोपट आता बहुतेक या मांजराचे भक्ष्य होणार. आईने मला पटकन टॉवेल आणून दिला. तो टॉवेल त्या पोपटावर टाकून मी त्याला अलगद उचलला. आता मात्र त्याला माझा हात खाता म्हणजे चावता येईना. आईने कांदे-बटाटे ठेव्ण्याची जाळिची झाकण असलेली बास्केट रिकामी केली आणि मला आणून दिली. मी पोपट त्यात ठेवला. टॉवेल काढण्याआधी त्यात त्याला थोडा खाऊ ठेवला. आणि मग टॉवेल काढून, पटकन झाकण लावले. आणि त्यावर जाडजूड ऑक्सफर्डची डिक्शनरी ठेवली. शुकाचर्यांचा अभ्यास होईल आणि दुसरे महत्वाचे मांजराला बास्केट खाली ढकलून पाडता येणार नाही. पोपटाचे संरक्षण...! वाह वाह... हुश्शार!
सकाळची सगळी कामे उरकून मी भर दुपारी १२.०० वाजता, जराही उन वाया न घालवता, पोपटासाठी पिंजरा आणायला बाहेर पडले. पण पिंजरा मिळतो कुठे कोणाला माहिती?? गावभागांत चौकशी केल्यावर समजले की महानगरपालिकेपाशी मिळतो पिंजरा. तिथे गेले. त्या दुकानदाराशी हुज्जत घालून २३० रू.चा पिंजरा १७५ रू. ला घेतला. स्कूटरवरून सर्कस करत तो पिंजरा ट्रॅफिकमधून घरी घेऊन आले. त्यामध्ये असणार्‍या वाट्यांच्या जागी, घरातली कोणतीही वाटी बसेना. म्हणून मग, एका १२च्या सेट मधले २ कप त्यांचे कान अगदी नीट फोडून त्या पिंजर्‍यात ठेवले. एकात पाणी आणि एकात पोळीची तुकडे घातले. माळ्यावर चढून एक तार शोधून ती त्या पिंजर्‍याला बांधली. आणि मग शुकाचर्यांना अलगद त्या पिंजर्‍यात ठेवले (पुन्हा एकदा टॉवेल). आणि पिंजरा पोर्चमध्ये वरती खुंटीला टांगला. पोपटरावांनाची ते घर आवडलं असावं कारण "ट्रॅक ट्रॅक.. किर्रर्र्..."असा आवाज काढून त्यांनी तो आनंद साजरा केला.
आम्हीही निवांतपणे जेवलो आणि पोपट पाळण्याची स्वप्नं रंगवत, त्याला बोलायला कसं शिकवायचं... वगैरे विचार करत बसलो. अधून मधून पोपटराव आपला ठेवणीतला आवाज काढून ओरडत होतेच. आम्हालाही गम्मत वाटत होती. असेच ३-४ तास निघून गेले.
आणि संध्याकाळी ६ च्या दरम्यान फाटकाबाहेर दंगा ऐकू आला. बाहेर जाऊन पाहिले तर..आमच्या घरासमोर असणार्‍या कारवानांच्या वस्ती वरची माणसं होती ती. त्यांनी सांगितले की, तो पोपट त्यांचा होता. सकाळी निघून गेला होता. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. (अच्छा!! आम्हाला वाटले की, ते पिलू आहे म्हणून त्याला उडता येत नाही.) आणि गेली ९ वर्षे तो त्यांच्याकडे आहे. सकाळपासून त्या मुलाच्या वडिलांनी पोपट हरवला म्हणून जेवणही नाही केले. आणि सकाळपासून ती लोकं त्या पोपटाला शोधत आहेत. आणि त्याचा आवज ऐकून माग काढत ते आमच्या घरी आले........................ अरे परमेश्वरा!!!
आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला..

- प्राजु.

धोरणवावरसाहित्यिकविचारलेखप्रतिसाद

प्रतिक्रिया

ऋचा's picture

14 May 2008 - 9:34 am | ऋचा

खुप छान वाचताना समोर घडतय असं वाटत होतं.

:)

खुप छान मांडणी केली आहेस..

चित्रा's picture

14 May 2008 - 5:19 pm | चित्रा

छान लिहीले आहेस.

धनंजय's picture

15 May 2008 - 4:10 am | धनंजय

छान अनुभवचित्रण

सकेत's picture

15 May 2008 - 2:16 pm | सकेत

सुन्दर लिहिले आहेस्.........खुप छान.............
=D>

विसोबा खेचर's picture

14 May 2008 - 9:52 am | विसोबा खेचर

ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला..

प्राजु, सुंदर लिहिलं आहेस. ही हकिकत प्रत्यक्ष तुझ्याकडून ऐकली होती त्यापेक्षा वाचताना अधिक मजा आली!

मस्त अनुभवकथन! :)

तात्या.

सहज's picture

14 May 2008 - 9:52 am | सहज

तो पोपट नंतर काय बरे त्याच्या जातभाईंना स्टोरी ऐकवत असेल? :-)

त्या कारवानां पासुन सुटका झाली आता मी मुक्त झालो म्हणले तर....कुत्री, मांजर व दोन बायका सगळे त्याच्या मागे लागले होते.... जाउ दे बॅक टु पॅव्हीलियन.

असो. प्राजु बोट बरी आहेत ना आता? एक भन्नाट आठवण ठेवुन गेला पाहूणा.

विजुभाऊ's picture

14 May 2008 - 10:06 am | विजुभाऊ

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2008 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुर्वार्धातील अनुभव अनुभवलेला, आणि अनेकदा वाचलेला असल्यामुळे
हा अनुभव तितका 'टच' झाला नाही. यातला उत्तरार्ध अनपेक्षीत आहे आणि तो आवडला.

बाकी पोपटाचं कडकडून चावणे क्या कहने !!! बोट बरं असेल ना आता :)

मनस्वी's picture

14 May 2008 - 10:27 am | मनस्वी

बोट कसंय आता??

आनंदयात्री's picture

14 May 2008 - 10:53 am | आनंदयात्री

ओघावते लिखाण .. पोपट तुमचा पोपट करुन गेला म्हणायचा की !

मदनबाण's picture

14 May 2008 - 11:05 am | मदनबाण

ताई अगदी असाच अनुभव माझा ही आहे.....
तो अवचित आलेला पाहुणा फार आनंद देऊन गेला.....
लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या...

(विठु विठु प्रेमी)
मदनबाण.....

पोपटाची ष्टोरी मस्त.

(अवांतर - तुझ्या बोटांचा झालेला 'पोपट' आता नीट झाला असेल अशी आशा आहे. ;) )

चतुरंग

प्राजु's picture

14 May 2008 - 2:22 pm | प्राजु

बोटं बरी आहेत. त्याचीही गम्मत झाली. पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं... :(

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राजे's picture

14 May 2008 - 5:08 pm | राजे (not verified)

त्याच वेळी तूम्ही आपली कुंडली धोंडोपतांना दाखवावयास हवी होती..... ;)

छान अनुभव !! असेच लिहीत राहा !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा's picture

14 May 2008 - 11:32 am | यशोधरा

मस्तच लिहिलय... :) पोपट वाचला म्हणायचा तुमच्यामुळे :)
बोट कसं आहे आता?

>> त्याचे पंख कापले होते
:(

स्वाती दिनेश's picture

14 May 2008 - 12:55 pm | स्वाती दिनेश

प्राजु,
पाहुण्याची गोष्ट आवडली...खूप छान!
तुझ्या हाता,बोटांना जखमा झाल्या तरी तो वाचल्यामुळे मनाला किती आनंद झाला असेल ना?
स्वाती

प्रगती's picture

14 May 2008 - 12:40 pm | प्रगती

ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला

लेख अगदी जिवंत वाटतो आहे.

इनोबा म्हणे's picture

14 May 2008 - 12:54 pm | इनोबा म्हणे

ओघावते लिखाण .. पोपट तुमचा पोपट करुन गेला म्हणायचा की !
हेच म्हणतो. :))

बाकी लेख मस्तच.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 1:05 pm | प्रभाकर पेठकर

त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते.

काय हे क्रौर्य....! आपल्या घरून पोपट उडून जाऊ नये म्हणून त्याचे पंख कापायचे?
तसेही मला पक्ष्यांना पिंजर्‍यात जखडून ठेवायला आवडत नाही.
बाकी गोष्ट छान आहे.

स्वाती राजेश's picture

14 May 2008 - 2:03 pm | स्वाती राजेश

प्राजु, मस्त लिहिले आहेस.
प्रत्यक्ष समोर घटना घडत आहे असे वाटते.:)
आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला..

सोप्या भाषेत छान वर्णन केले आहेस.

सुमीत's picture

14 May 2008 - 2:19 pm | सुमीत

सुरुवात आणि शेवट, मस्तच आणि हो लेख पण :)
लेखनशैली छानच आहे.

माझा तो पोपट मला सोडून निघून गेला.. पण आपण सर्वांनी माझा अनुभव ऐकून माझ्यासाठी सहानुभूती दाखवलीत त्याबद्दल मी आभारी आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शरुबाबा's picture

14 May 2008 - 3:02 pm | शरुबाबा

सुरुवात आणि शेवट, मस्तच आणि हो लेख पण

मन's picture

14 May 2008 - 3:23 pm | मन

त्या पोपटाला वाचवायची धडपड आवडली.
पण तिथुन पुढं त्याला कायम पिंजर्‍यात ठेवायचा प्लॅन असेल तर अजिबात आवडलं नाही.
म्हंजे पिंजर्‍यात ठेउन त्याला आपली भाषा शिकवणं वगैरे.
पण त्याच्यासाठी केलेली धडपड चटका लावुन गेली.
(बाकी,त्या पंख कापणार्‍याबद्दल काय बोलाव?)

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

धमाल मुलगा's picture

14 May 2008 - 4:15 pm | धमाल मुलगा

अरेरे...
एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले :( च्यामारी पोपटच झाला की!

बाकी, लेख नेहमीप्रमाणेच खास प्राजुताई स्पेशल :) छानच जमलंय..साधं-सोपं...गप्पा मारल्यासारखं :)
खुप खुप वाईट वाटतं ना असं कोणी आपल्या घरातून आपण आपला मानलेला प्राणी-पक्षी कोणी घेऊन गेलं की :(

पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं

:/ आँ...इंजेक्शन कसं काळंनिळं पडलं गं ? :P

आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? (..हौस्.हौस..फटके खायची...धम्या लेका आता सोडेल का प्राजुताई? आता खा तीचे फटके !!!)

पिवळा डांबिस's picture

14 May 2008 - 7:25 pm | पिवळा डांबिस

एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले च्यामारी पोपटच झाला की!
शाधा नायी काई धमुदादा, एकदम शप्तलंगी पोपट झाला की, आप्ल्या प्लाजुताईचा!!:))

आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं?
अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!!:))
पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!!:))

-डांबिसकाका

आंबोळी's picture

15 May 2008 - 1:15 pm | आंबोळी

आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं?

नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल......

औट घटकेचा यजमान

"त्या कारवानांडून कशीबशी सुटका करुन पळालो.... पण त्या दुष्टानी रावणाने जटायुचे कापावेत तसे माझे पंख छाटले होते म्हणून उडू न शकल्याने एका अंगणात उडी मारली... तर दोन कुत्री आणि एक मांजर मला खायला आले. ते कमी म्हणुन कि काय एक मुलगी त्याना हाकलून माझ्या मागे लागली. तिलाही मला खायचे असावे. (अमेरिकेहून कोल्हापूरला आल्यापासुन ती मांसभक्षी झाल्याचे ऐकिवात आहे. आणि ती आपल्या मिसळपाव वरील मित्र्-मैत्रिणींना जेवायला बोलावत असल्याचेही ऐकिवात आहे. त्यांच्या साठीच तर पकडत नसेल ही मला? ).
मी सुटकेसाठी तिच्या बोटांना कडकडून चावलो पण तिने मला सोडले नाही. माझ्यासारख्या पूर्णवैराग्याला तिने आगोदर कांद्याबटाट्याच्या दुरडीत डांबले...नंतर माझ्यासाठी एक तुरूंग घेउन आली आणि मी इतक्यावेळा ओरडून सांगीतले कि मला मिरची डाळ द्या तर न ऐकता मला कान फुटक्या कपातून पाणी आणि पोळी दिली. शेवटी त्या कारवानांनीच येउन माझी सुटका केली".

अवांतरः प्राजुताई तुमच्या सारखे मस्त आणि टची अनुभव नाही मांडता आले.... तुमची अनुभव मांडण्याची हातोटी खरच लाजवाब आहे. सुंदर.

अतिअवांतर : केशवसुमार, याला लेखाचे विडंबन म्हणता येइल का हो?

वरदा's picture

14 May 2008 - 5:20 pm | वरदा

प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस...
पण लिहिलयस झकास्..ए वन...
मला प्राण्यांचा काहीच अनुभव नाही त्यामुळे मला तर सहीच वाटलं वाचायला..
तु खुप सुंदर लिहितेस रंगवून सांगायची कला खूप मस्त....
आता बोटाला जप म्हणजे लवकर बरं वाटेल्..मला तर एकदा लागलं की त्याच त्याच ठीकाणी परत परत धडपडायची सवय आहे...तसं करु नकोस...
अवांतरः लहानपणी आमच्या घराला तारेचं कुंपण होतं किती वेळा टिटॅनस घेतलंय काही गणतीच नाही...गाय अंगणात आली हाकलवताना आपटा कुंपणावर..बॅडमिंटनचं फुल बाजुच्या अंगणात पडलय कोण जाईल लांबून फाटकातून वगैरे गायीने वाकवलेल्या तारेतुन घुसा शेजार्‍यांच्या अंगणात्.....खूप खूप आठवणी जाग्या झाल्या गं....

शितल's picture

14 May 2008 - 6:01 pm | शितल

प्राजु छान लिहले आहेस,
पोपटाच्या चोचीला तीक्ष्ण धार असते, ते तर कधी कधी त्या॑ना पकडायला गेल्या चोच मारून आतील मा॑स देखिल काढतात.
काय हे पक्षी देखिल आता माणसा॑चा पोपट करू लागले आहेत.

गणपा's picture

14 May 2008 - 6:47 pm | गणपा

प्राजुताई,
मस्त लिहिलयस. आवडलं. लहान असताना मी कोंबडीच पिल्लु पाळल होत त्याची आठवण झाली. भलतच करमती होत ते.

देवदत्त's picture

14 May 2008 - 7:37 pm | देवदत्त

अनुभव कथन छान लिहिले आहे.

आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला..
सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून :)

विसोबा खेचर's picture

15 May 2008 - 12:14 am | विसोबा खेचर

सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून

हेच खरं!

अवांतर - मला कोणतेही प्राणी पाळायला आवडत नाहीत. त्यांना पाळून बंदिस्त करण्याचा आपल्याला हक्क नाही. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे जगू द्या!

तात्या.

अव्यक्त's picture

14 May 2008 - 8:10 pm | अव्यक्त

....राणीचा बाग...

....राणीचा बाग...हा फक्त मुबई मध्येच आहे असा समज होता माझा....पण साक्शात कोल्हापुर मध्येही आहे. वाचुन विलक्शण उडालोच्....काय काय पालल आहेस्...कुत्रा, मान्जर, पोपट, कोम्बडि, आणि कोण? आनि पोपटाला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... त्यापेक्शा विरकर डिक्शनरी द्यायचिस्.....तुझा लढ्वय्या बाणा कामि आला....माझ्याशि भान्डुन भान्डुन तु क्षत्रिय धर्माचे पालन करायचिस...कामि आले...

ईश्वरी's picture

14 May 2008 - 9:54 pm | ईश्वरी

अनुभव छान मांडला आहे. वाचायला छान वाटले.

माझी ही एक जुनी आठवण जागी झाली. असाच आम्हालाही एक लव बर्ड सापडला होता. तो घरातून उडुनही जात नव्हता. त्यात कोणीतरी सांगितले की असेच त्याला सोडुन दिले तर कावळे चोची मारून जखमी करतील. म्हणुन मग पिंजरा आणुन त्यात त्याला ठेवले. त्याला वाटीत खायला ठेवले तरी घरातील आमच्या पैकी कोणीतरी भरवल्याशिवाय तो अजिबात खात नसे. त्याचे खाणे तो खायचाच.(जे बाजारात पक्ष्यांचे खाद्य मिळ्ते ते) पण उपमा, पोहे , मटारचे (वाफवलेले ) दाणे हे विशेष आवडीचे. एक घास (त्याचा घास म्हणजे २-३ शिते) खाऊन झाला की पुढचा घास घेण्यासाठी चोच उघडुन 'आणखी हवे' असे सांगायचा. खाण्याचा स्पीड ही चान्गला..पटापट खायचा. उभ्या जागी गिरकी घेउन किंवा २-३ उड्या मारून ' खायला दिलेले आवडले' ह्याचि पावती द्यायचा. आणि परत चोच उघडलेली...आणखी खाण्यासाठी. त्याचे नुसते निरीक्षण करीत बसले तरी वेळ छान जायचा. कधीतरी एकदा घरगड्याच्या हातून पिंजर्‍याच्या दाराला कडी घालायची राहून गेल्याने तो उडुन गेला.

त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते.
खरच काय हे क्रौर्य !
ईश्वरी

गृहिणि's picture

14 May 2008 - 11:49 pm | गृहिणि

फार छान जमलाय लेख. छोटिशि गोष्ट पण सांगण्याच कसब वाखाणण्यासारख आहे तुझ. बोटांचि काळजि घे. रागावु नकोस पण मला विशेषतः पक्ष्यांना पिंजर्यात ठेवण अजिबात आवडत नाहि. कितिहि मोठा असला तरि त्यांना मोकळ वाटेल एवढा मोठा नसतो ना पिंजरा.

जयवी's picture

15 May 2008 - 12:26 pm | जयवी

प्राजु....... खूप छान लिहिलं आहेस गं...... अगदी समोर घडतंय सगळं असं वाटलं.
इतकी धडपड करुन पोपट मात्र गेला..... वाईट वाटलं.
आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं....;)

प्राजु's picture

15 May 2008 - 4:01 pm | प्राजु

आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं?
बडबड्या... छे. काहीतरीच... तो तर विठूविठूड्या झाला असेल.

अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!!
पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!!

असेल नक्की देत असेल बातम्या.... प्राजक्ताच्या जागी..

नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल......

ही शक्यताही नाकारता येत नही. निलकांता, बघ बरं जरा मिरचीडाळ्.कॉम ची बांधणी कुठे चालू आहे का?

प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस...
हो ना गं. वरदा, तूच सख्खी मैत्रीण आहेस बघ. माझं दु:ख तू एकटीच समजू शकलीस.

तुझा लढ्वय्या बाणा कामि आला
म्हणूनच मी स्वतःला झाशीची राणी म्हणवून घेतलं... :)

आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं....
हो गं जयूताई, आधी नाक झालं आता बोटं.. बाबा म्हणतात मला, कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू... :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

17 May 2008 - 4:03 am | वरदा

कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू
मलाही तेच म्हणायचे बाबा लहान असताना. ते म्हणायचे लाल औषधाचा हौद बांधून तुला त्यात ठेवलं पाहीजे...:))

अभिता's picture

17 May 2008 - 6:17 pm | अभिता

असाच अनुभव (पोपट पकडण्याचा )माझासुध्दा आहे.कारवानच्याजागी कातकरी असे वाचावे.आम्ही तेव्हा नुकतेच घर बांधले होते.त्यामुळे आपणहि काहि तरी पाळावे असे वाटत होते व आयताच पाहुणा आला म्हणुन फार आंनंद झाला होता.जिचा पोपट होता ती तो घेउन गेली . नंतर ४/५ वर्षानी ती आमच्याकडे कामाला आली .पण आमचा तिच्यावर कायम सूक्शम राग राहिला. आम्ही म्हणजे मी व माझा भाऊ.