किती दिवस झाले आपण आपल्याला पाहून.
मला वाटते एक दोन महीने झाले असतील.
या पाय हल्ली थकलेत. डोळे दमलेत. आणि आरशात काय पहाणार तोंडाचे बोलके....
अन कुणाला आहे कौतूक त्या थोबाडाचे. दाढीचे खुंट , आत गेलेली गालफाडे , अन फिकुटलेले डोळे!
हम..वय झालं असं म्हणायलाच हवं.
आबा स्वतःशीच बोलत असतात. एकलेपणा त्याना खायला उठतो. भिरभिर फिरत असुनसुद्धा खोलीतला हॉस्पीटलचा वास काही कमी होत नाही. घरातल्या घरात असूनही औषधे ,काढे, इंजेक्षने यामुळे घरात हॉस्पीटलच झाले होते.
खरच आपण थकलोय...आपले वय झालय.....
पण शरीर थकले म्हणून वय झालं? आपला आवाज तर खणखणीत आहे. तो तरी तसा आहे हे कशावरून?
गायला जमेल? काळी दोन चा आवाज उतरून एखादी पट्टी उतरला असेल.
गाण्याच्या आठवणीने आबाना काहीतरी वेगळे वाटले. अंगात उगाचच वीज चमकून गेल्यासारखे झाले.
अंग अंग मोहोरून आले.
आबानी टेबलाकडे पाहीले. मघाशी शंभूनाथने त्यांची जुनी ट्रंक लॉफ्टवरून काढून तिथे ठेवली होती.
त्याला पितळी कुलूप तसेच होते.औरम्गबादच्या प्रयोगाला ती मिळाली होती ती ट्रंक. कोण्या अनामीक चाहत्याने दिली होती.
आबानी आपले थरथरते हात अंकेवरुन , कुलुपावरून मायेने फिरवले. कुलुपाला थोडेसे ओढले असेल खटकन उघडले. उघडेच असेल कदाचित.
कर्र आवाज करत ट्रंकचे झाकण उघडले. ट्रंकेतून येणार्या शालूच्या वासाने आबा एकदम वेगळ्याच काळात गेले.
ट्रंक उघडली आतील जुनात शालूवरून आबानी हात फिरवला. मन एकदम मोरपिशी हसले.
त्यांच्या मनात अचानक वेगळाच काळ जागा झाला.
प्रेक्षकगृहात लोकांची लगबग सुरू झाली. सुरंगीच्या वेण्या , नवे कोरे शालु , पैठण्या , केवड्याची ,गुलाबाची अत्तरे , चंदनाची पावडरचा ,मोगर्याचे गजरे या सर्वांचा एकत्रीत वास येवू लागला.
सोडेवाले लेमनवाले यांचे आवाज येवू लागले.संध्याकाळी प्रेक्षकगृहात शिंपडलेल्या पाण्याने मातीचा सुगंध वातावरणात आणखीच रंग भरत होता.
बांगड्यांची किणकीण , एखाद्या कोपर्यातून येणारी हास्याची नाजूक लकेर , दबक्या आवाजातील कुजबूज ..........घणघण घणघण ...घंटेच्या एका आवाजाने हे सगळे आवाज शांत होऊ लागतात.
आवाज कमी होउ लागले तसे प्रेक्षकगृह जिवंत होऊ लागते.वातावर एका अनामिक उत्कंठेने भरुन जाते.
लोक डोळ्यात प्राण आणून पडद्याकडे पाहू लागतात.
पडद्यामागची हालचाल जाणवू लागते.पडद्यामागचे आवाज ऐकून अंदाज बांधायचा प्रयत्न करू लागतात
सागळी गात्रे आतूर होऊन नटाची वाट पहात असतात. त्या मखमली पडद्यामागे एक वेगळीच दुनीया जिवंत होत असते.
इकडे धुपाचा गंध उत्कंठा वाढवत असतो. शालू ,शेले यांची येजा आता थोडी निवत असते. आर्गनवाले तबले वाले ठाठोक करून हत्यारे लावत असतात,
पडद्यामागे हालचाल होते. घणणणणण घंटा निनादते. माईक जिवंत होतो
आर्गनचे सूर बोलू लागतात. घर्रर्रर्रर्रर्र आवाजासरशी पडदा वर जातो.
रंगमंचावर सगळी पात्रे समोर हात जोडून उभी असतात
आणि खणखणीत आवाजात नांदी सुरू होते.
" नमन नटवरा विस्मयकारा.... "
प्रतिक्रिया
6 Apr 2011 - 11:11 pm | मराठमोळा
वा विजुभाउ,
छान छोटेखानी मुक्तक... :)
7 Apr 2011 - 12:42 pm | विजुभाऊ
अरेच्चा मी क्रमशः लिहायलाअ विसरलोच की
6 Apr 2011 - 11:12 pm | यशोधरा
मस्त.
6 Apr 2011 - 11:13 pm | प्रीत-मोहर
मस्त!!!
6 Apr 2011 - 11:30 pm | प्रास
विजुभाऊ,
छान मुक्त-चिंतन.....
6 Apr 2011 - 11:33 pm | पैसा
आयुष्याच्या अंताजवळ पोचलेले आबा... आणि नाटकाची नांदी...छान!
7 Apr 2011 - 4:07 am | स्पंदना
असच म्हणेन्...अंत अन नांदी...विजुभाउ मस्त!!
6 Apr 2011 - 11:59 pm | पुष्करिणी
छान लिहिलय, आवडलं!
7 Apr 2011 - 10:06 am | sneharani
मस्त लिहलयं!
:)
7 Apr 2011 - 5:33 pm | बहुगुणी
..तर मग लवकर लिहा पुढचा भाग, हे लिखाण पुढ्च्या लिखाणाची वाट पहायला लावणारं आहे.
पूर्वीचं नाट्यगृह डोळ्यापुढे हुबेहूब उभं केलंत, आमच्याही 'मनात अचानक वेगळाच काळ जागा झाला.'
(शालूच्या उल्लेखावरून आबा स्त्री-भूमिका करणारे कलावंत असावेत कदाचित, बालगंधर्वांबद्दल वाचलेल्या अशाच एका कथेची आठवण झाली.)
7 Apr 2011 - 8:24 pm | मेघवेडा
असेच वाटले. मलाही आधी वर पैसाताई म्हणते त्याप्रमाणं "आयुष्याच्या अंताजवळ पोहोचलेले आबा आणि नाटकाची नांदी" यांची सांगड घालून तेवढंच मुक्तक लिहिलंय असं वाटलं होतं. यशोला मी म्हटलं सुद्धा की हे अधिक फुलवायला हवं.. मला वाटलं एवढ्यावरच थांबले का काय विजुभौ!
क्रमशः हवाच होता याला.. पुढलं लौकर लिहा राव.. :)
7 Apr 2011 - 9:57 pm | शशिकांत ओक
मित्र हो,
तिसरी घंटा वाजल्यावर नमन नटवरा ऐकून स्टेजवर पहिल्यानेच पाऊल टाकणाऱ्या नटाला छातीत वाटणारी धडधड...
त्यावरून आठवले...
मी केलेले साष्टांग नमस्कार नाटकातील एक पात्र - शिकार बहाद्दर आता नाव नाही आठवत...ते खांद्याला बंदूक लटकवून नाटक बर वावरतात
तसेच एकेकाळी उंदराच्याशिकारीची ऐट दाखवणारे...आपले विजुभाऊ .
आज मुक्तकात रंगलेले ... वा..वा..वा..आले, दादा ते आले....विजुभाऊ!!!