मागील दुवा https://misalpav.com/node/44648
डोळ्यातल्या पाण्यामुळे आबांना समोरचे धूसर दिसू लागले. समोरचे काही आता पहायचे नव्हतेच मुळी. त्याची गरजही नव्हती. डोळ्यासमोर वेगळेच जग होते. ते जग पहायला या जगातली दृष्टी गरजेची नव्हती.
आठवणी अशा एकट्या कधीच येत नाहीत. एक आली की तीचा पदर धरून दुसरी येतेच.
या भरजरी आठवणींचा पदर धरून सोबत काही गमती जमतीही आल्या. मानसकन्येचा प्रयोग होता. खानदेशात बहुधा रावेर ला असावा. मध्यंतराला चहावाला पोर्या कुणासाठीतरी विड्या घेवून आला. साने मॅनेजरना ते अजिबात आवडायचं नाही. ते त्या पोर्यावरच ओरडले " अरे इकडे नकला पाठ नाहीत आणि हे धूर सोडत बसलेत.
कसा कोण जाणे तो शब्द दत्तारामच्या डोक्यात राहीला. मध्यंतरानंतरचा लगेचचाच प्रवेश. युद्धात हरले म्हणून हतबद्ध झालेल्या मातेला मानसकन्या धीर देते. "आईसाहेब तुम्हीच जर असा धीर सोडलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे." हे बोलताना मास्टर दत्ताराम फुलम्ब्रीकर " आईसाहेब तुम्हीच जर असा धूर सोडला तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे" असे बोलून गेला. आपण विंगेत होतो. सेनापती सहदेव म्हणून प्रवेश करणार होतो. धीर ऐवजी धूर हा शब्द ऐकून आपल्याला हसू अनावर झाले . खिक्कन हसलो. प्रेक्षकांनी ते ऐकले. रंगमंचावर आईसाहेबांच्या भुमीकेत असलेल्या वरेरकरांनीही ऐकले. अगोदरच ते कसेबसे हसू दाबत होते.त्यांना रहावले नाही. दारुगोळ्याच्या कोठारावर ठिणगी पडावी तसे काम त्या "खिक्क" ने केले. प्रेक्षक उबळ आल्यासारखे हसू लागले. हास्याचा स्फोट आणि स्फोटाच्या लाटा म्हणजे काय ते त्या दिवशी समजले. लोक अक्षरशः जमिनीवर पडून लोळत होते ,हसताना . कितीतरी वेळ ते थांबतच नव्हते. शेवटी पडदा पाडावा लागला. रसिकांची क्षमा मागितली. तिकीटाचे पैसे परत घेवून जायला सांगितले. रसिकांनी उदार मनाने माफ केले. नाटकाचा प्रयोग मात्र पुढे होऊ शकला नाही. त्या ऐवजी रसिकानी नाट्य संगीत ऐकणे पसंत केले.
त्यानंतर "मानसकन्या" ची तालीम करतानाही नटमंडळी हसत असायची. ती आठवण एक किस्सा बनून गेली .
आत्ताही आबांना ते आठवून मुखावर हसु फुटले .
कुकुडवाड ला सैरंध्री चा प्रयोग होता. समोर संस्थानचे दिवाण आणि इतर मानकरी बसले होते. एका मानकर्याला सैरंध्री इतकी आवडली की त्याने लग्न करेन तर सैरंध्रीशीच असे जाहीर करून टाकले. नाटक संपल्यावर मेकाप उतरवताना मास्टर सुरेश दाखवला तेंव्हा तो पुरुष आहे हे त्याना समजले. त्या मानकर्याने जाताना मास्टर सुरेशला आपल्या हातातले सोन्याचे कडे भेट दिले. चांगले आदपाव वजनाचे तरी असेल . पुढचे कितीतरी दिवस सुरेशची " मानकरीण बाई " अशी थट्टा करायचो.
कुठे असेल बरे मास्टर सुरेश.? यवतमाळ ला गेला तो पुन्हा भेटलाच नाही. छान गळा होता त्याचा. त्याचं ते " शोकाकुल का मने होतसे.." ऐकायला मिळालं होतं एकदा रेकॉर्डवर. खूप भरून आलं होतं ऐकताना ते. मास्टर सुरेशला समोरासमोर ऐकणे आणि रेकॉर्डवर ऐकणे यात खूप फरक होता. तलावाचे चित्र पाहून तहान भागवण्या इतका. आलाप मुरक्या पलटे सगळे धरुनही रेकॉर्डवरचे गाणे तीन मिनीटात संपले. रंगमंचावर रसिकांची दाद घेत ताने गणीक वाहवा घेत दहा दहा मिनीटे चालणारे ते गाणे रेकॉर्डच्या तबकडीवर तीन मिनीटात मावले होते.
बरं झालं आपली रेकॉर्ड नाही निघाली ते. जे गाणं रसीकांसोबत रंगायचे ते गाताना समोर रसीकच नसतील तर मग कुणासाठी गायचं ते ? छे नकोच.
तेल संपल्या नंतर वात जळून दिवा विझून जावा तशी संगीत नाटके एक एक करून विझत गेली. सिनेमा नावाची जादुची ट्यूबलाईट रसिकांच्या डोळ्यापुढे लख्ख उजेड फेकत होती. त्या कृत्रीम उजेडात जिवंत अभिनय करणारे समोरा समोर बसून ताना पलटा ऐकवणारे दिवे विझत गेले.त्या प्रखर उजेडापुढे पणतीच्या उजेडाची स्नीग्धता फिक्की पडत गेली.
आपलं सगळं विश्वच विझत गेलं. आपण या घरात आलो . निदान तेवढा का होईना एक तुकडा होता आपल्या साठी . कसलं का असेना जुनं पुराणं, पण एक छप्पर होतं निवार्यासाठी. रसिकांनी वेळोवेळी दिलेल्या भेट वस्तुंवर गुजराण होत राहीली. आठवणीत का होईना आपण ते विझलेलं विष्व पुन्हा पुन्हा तेवत ठेवत राहीलो.
कंपनीत असताना तोडकामोडका हस्तसामुद्रीकाचा, पत्रीकेचा अभ्यास केला होता. लोकांना सांगत राहीलो. त्यानं एक झालं निदान रोजच्या मीठ मिरचीचा प्रश्न तरी सुटला.
मधे एकजण आला होता. म्हणाला आत्मचरित्र लिहा. चांगलं अडीचशे तीनशे पानी. सपशेल नकार दिला. उभं साठ सत्तर वर्षाचं आयुष्य अवघ्या अडीचशे पानत कस्म मांडणार? ? आणि तरी कोणासाठी लिहायचं आत्मचरीत्र? आपल्याकडे पत्रीका दाखवायला येणार्या कोणालाच मास्टर गंगाराम, मास्टर दत्ताराम, सारंगीये उस्ताद वली खां, मास्टर सुरेश , ऑर्गनवाले भवानराव हरकारे यांची नावंही माहीत नसतात. त्याना रस असतो तो फक्त भविष्यातच. भूतकाळ काहीच कामाचा नसतो. कोणे एके काळी कितीही भरजरी असली तरी आता ती जीर्ण वस्त्रे , फरशी पुसणं म्हणूनही त्यांचा उपयोग होत नाही.
या विचाराबरोबर आबांच्या तोंडात एक घट्ट कडवट चव पसरली. आवंढा गिळतानाह तो कडवटपणा घशातून खाली उतरत गेला. आबांनी फुलपात्रात पाणी ओतून घेतले पाणी तोंडात घेवून त्यानी कडवटपणा कमी करायचा प्रयत्न केला.
लोक आपल्याकडे पत्रिका घेवून येतात. त्याना त्यांचा भूतकाळ माहीत असतो ,पण त्यात रमायला आवडत नाही. त्याना भविष्य पहायचं असतं ते खूप चांगलं आहे उज्वल आहे असे म्हंटले की त्याना बरं वाटतं. तसा काय फरक आहे भूतकाळात आणि भविष्यात? एक माहीत असते आणि एक माहीत नसते.दोन्ही स्वप्नरंजन असतात. एक निश्चीत दुसरे अनिश्चीत.
सत्तर बहात्तर वर्षाच्या लोकांची पत्रीका दाखवायला लोक येतात तेंव्हा हसू येते. ज्यांच सगळं आयुष्य भूतकाळ झालंय त्यांचं भविष्य काय पहायचं? आपण हे एकदा वडीलांची पत्रीका दाखवायला आलेल्या त्या सबनीसांना सांगीतले होते . बोलाफुलाला गाठ पडावी तसे सबनीसांचे वडील पुढच्या महिन्यात खपले. त्यानंतर सबनीसांनी आपल्याशी बोलणंच टाकलं. त्या विलक्षण योगायोगाची आबांना गंमत वाटली.क्षणभर चेहेर्यावर एक स्मित झळकले.
कशाला जाणून घ्यायचं असतं भविष्य कोण जाणे ? उगाच चिंतेने जीवाला घोर. त्यापेक्षा भूतकाळ बरा. आयुष्यातले निवडक क्षण फोटोच्या अल्बम प्रमाणे पाने उलटत पहाता येतात. कधीही घेवून बसता येतो.
आबा त्या अल्बमची पाने उलटत राहीले. आई बाबा,भाऊ , शाळेतले गव्हाणकर मास्तर , मास्टर दत्ताराम फुलंब्रीकर , संगीत सैरंध्री, शाकुंतल, गोदावरी बाई, मृच्छकटीकचा तो पावसातला प्रयोग, "माडीवरी चल ग गडे" ला मिळालेले आठ वन्स मोअर. संगीत मीराबाई मधे भजनात वाजणारा मृदुंग, सगळे क्षण डोळ्यासमोर उभे राहीले. आनंद देणारे , दु:ख देणारे , जपून ठेवावेसे वाटणारे , सोन्याच्या मोहोरा उधळून टाकाव्या असे वाटणारे , केशराचे मळे फुलावे तसे वाटणारे , मोगर्याच्या धुंद वासाचे , अत्तरा प्रमाणे घमघमाट असणारे , मुक्त पावसात भिजावेसे वाटणारे पडदा उघडायच्या अगोदर चे ते किंचीत कावरेबावरे . पडदा उघडल्या नंतर वाटणारे आत्मविश्वासाचे , स्वतःच्या राज्याची प्रचिती देणारे , प्रेक्षकांनी कडाडून टाळी दिल्या नंतर काळजात लख्खन वीज चमकून गेली असे वाटणारे क्षण.
हे सगळे क्षण आठवताना एक जाणीव प्रकर्षाने होत राहिली. नकोसे वाटणारे सगळे क्षण हे आपल्या रक्ताच्या नात्यानी दिले. हवेहवेसे वाटणारे आनंद दिलेले सगळे क्षण
हे कोणी दिले नव्हते तर आपण घेतलेले होते .
ह्यात्मैव आत्मनो बंधु , रात्मैव रिपुरात्मना..... हाच असेल का तो "बोधीक्षण". काळजात एक वीज चमकली. घशाला कोरड पडली. डाव्या हातातून मुंग्या येवू लागल्या . घाम येतोयसे वाटले. आबांनी टेबलावरून वाटीत ठेवलेली औषधाची गोळी घेतली. सवयीने गोळीचा वास घेतला. त्याना धूपाचा गंध आल्यासारखे वाटले. पाण्याच्या घोटाबरोबर गोळी घशाखाली गेली. धूपाचा गंध खोलीभर पसरला.ऑरगनचे सूर वाजू लागले. पडदा वर जाण्याआधीची पोटात गुदगुल्या करणारी ती हुरहूर पुन्हा एकदा जाणवली. मीरा, कृष्ण ,दुष्यंत ,अर्जून ,हरिश्चंद्र , वासवदत्ता, लक्ष्मीबाई ,सहदेव, चारुदत्त, वसंतसेना, कान्होपात्रा, पृथ्वीवल्लभ नलदमयंती सगळी पात्रे नांदीसाठी हात जोडून उभी राहिली.
मंचावर धावत फेर्या मारत घणघण घण घण घण करून घांटावाल्याने घंटा दिली. पडदा वर जाऊ लागला. मास्तरानी ऑरगनवर काळी तीन चा सूर लावला. मृदंगावर थाप पडली. काळजात पुन्हा एकदा वीज चमकली. ऑरगनवर सूर वाजू लागले. त्या सूरांनी आसमंत भरून गेला. नांदी सुरू झाली.
आनंदाच्या लाटा असाव्यात अशी एक विलक्षण संवेदना शरीरभर पसरत गेली. आबांनी त्या सूरात आपला सूर मिसळला. पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांचा उजेड वाढत गेला.
सूरांच्या सोबतीला शब्द आले.
"हे नट नागर विश्वस्वरूपा, आनंद कंद निज भाव स्वरुपा" धूपाचा गंध अंगभर पसरत गेला.
( समाप्त)
प्रतिक्रिया
9 Jun 2019 - 12:03 pm | प्रमोद देर्देकर
शेवट भावूक झाला !
बालगंधर्व यांचे उत्तरं आयुष्य काहीसं असंच गेलंय .
9 Jun 2019 - 1:03 pm | धर्मराजमुटके
समाप्त ची पाटी पाहून विरस झाला. छान झाली ही लेख मालिका ! और आने दो !
9 Jun 2019 - 1:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लिहिलं आहे.
9 Jun 2019 - 1:28 pm | कंजूस
काही अध्यात्मिक असेल म्हणून लेखमाला वाचायला उघडलीच नव्हती. पण फारच धरून ठेवणारं लेखन आहे.
सुरेख.
9 Jun 2019 - 1:48 pm | पद्मावति
निशब्द __/\__
9 Jun 2019 - 2:28 pm | टर्मीनेटर
खूप छान लिहिलंय! आत्ता सलग पाचही भाग वाचले. आयुष्यात कधीही नं पाहिलेल्या संगीत नाटकाचा माहौल, वाचताना डोळ्यासमोर उभा राहिला.
काही वाक्ये विशेष आवडली, जसे की-
पुढील लेखनास शुभेच्छा!
9 Jun 2019 - 4:04 pm | जॉनविक्क
त्यामागील कारण असे लिखाण होय.
सुंदर.
10 Jun 2019 - 7:34 am | विजुभाऊ
_/\_
29 Jun 2019 - 10:31 am | मुक्त विहारि
मस्त.