धूपगंध ( ४)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
8 Jun 2019 - 9:23 am

मागील दुवा https://misalpav.com/node/44537

भांडे पुन्हा लोट्यावर ठेवताना त्याचा किंचीत आवाज झाला. आबांना तो आवाज नाटकाच्या घंटेसारखा वाटला. त्या आवाजासरशी डोळ्यात एक अनामीक चमक आली. ययाती- देवयानी मधील ययातीचा शर्मिष्टेसोबतचा प्रेमालाप ऐकु यायला लागला.

हे प्रिये तुझ्या मुखारविंदाला कमलनयांनी शोभा येते की मग भाळावरच्या कुंकुम तिलकाने पूर्व दिशेला प्रभा फाकते? इंद्रधनुची उपमा मी तुझ्या कमानदार रसशीत ओठांना देवू की मग त्या बाकदार भुवईला? तिर्विष्टपातही आढळणार नाही असे तुझे हे दैवी सौंदर्य, हिरे माणकांचा कधी मोह नाही पडला पण तुझ्या मोत्यासारख्या शुभ्र दंतपंक्तींच्या दर्शनाचा मोह या ययातीला पडला आहे.
त्या एकेक शब्दांनी प्रेक्षक श्रीमंत व्हायचे. आख्खं नाट्यग्रुह त्या शब्दाम्वर डोलु लागायचं. त्यांच्यावर त्या शब्दांचं गारुड व्हायचं . नाटक उत्तर रात्री पर्यंत चालायचं
गॅसबत्तीच्या उजेडात प्रेक्षक नाटक पहायचे थंडी वार्‍याची पर्वा न करता. एकदा तर प्रयोग चालू असताना आभाळ भरून आलं होतं. ढगांच्याच्या गडगडाटात रंगमंचावरचे संवाद नीत ऐकू येत नव्हते. मग पाऊस सुरू झाला. तडातड कोसळणार्‍या पावसातही प्रेक्षकांनी जागा सोडली नाही. त्यांना नाटक पहायचं होतं. तरी बरं कणकवलीच्या त्या झापाच्या थेटरात रंगमंचावर झापाचा का होईना आडोसा होता. नाटक कोणते होतं बरं? कान्होपात्रा की मृच्छकटीक? . हो म्रुच्छकतीकच. " अंगे भिजली जलधारांनी " ऐकताना त्या दिवशी वसंतसेना आणि चारुदत्ताबरोबर मायबाप प्रेक्षकही खर्‍याखुर्‍या जलधारांनी भिजले होते.
त्या दिवशी अंगावर आलेले रोमांच वसंतसेनेच्या विभ्रमांमुळे आले नव्हते , ऑरगनच्या ,सारंगीच्या स्वरांनी किंवा छप्परफाड तबल्याच्या तालामुळे नव्हते. ते मायबाप प्रेक्षकांच्या त्या प्रतिसादामुळे आले होते. हे रोमांच केवळ तनावर नव्हते तर मनावरही होते. इतकं प्रेम कुणीतरी आपल्यावर करते हेच मुळी अप्रूप होते. ते प्रेम करतात याचं नव्हतं तर" इतकं प्रेम?" याचं होतं. त्या नंतरच्या सलग तीन रात्री झोपू शकलो नव्हतो. पापण्या मिटल्या की नजरेसमोर ते पावसाचे तांडव यायचे . तडातड पडणार्‍या पावसात शांतपणे बसलेले प्रेक्षक यायचे रंगमंचावर चारुद्दत्त झालेलो आपण आणि समोर वसंतसेनेच्या रुपातले मास्टर दत्ताराम फुलंब्रीकर. एरवी प्रेक्षक आपल्या पहातात. त्या दिवशी आपण प्रेक्षकांना पहात होतो.
पाऊस जवळजवळ तासभर तरी पडत असेल तेंव्हा. पण कोणीही जागचा हलला नाही. पाऊस संपल्यावर नाटक पुन्हा सुरू झाले. भिजलेल्या अवस्थेतही प्रेक्षकाम्नी नाटक पाहिले. नाटक संपलं तेंव्हा पहाटे तीनचे टोले ऐकायला येत होते .
भरभरून प्रेम करणे म्हणजे काय हे अनुभवलं त्यारात्री. कधी देव भेटला अनकाय हवे ते माग म्हणाला तर ती रात्र पुन्हा एकदा यावी हेच मागेन.... अगदी स्वप्नातही.
आज इतक्या वर्षानंतरही त्या आठवणीने अंगावर तसेच रोमाम्च उभे रहातात.
धुवांधार बरसणारा पाऊस कमी कमी होत जातो. तो थांबतही. तो सतत बरसत राहू शकत नाही. भाग्याचंही तसेच असावे. संगीत शाकुंतल, संगीत कीचकवध, स्वप्नवासवदत्ता, ययाती देवयानी , मृच्छकटीक , मदनमोहीनी चे प्रयोग गावोगावी केले. नागपूर अकोला वर्धा जळगाव , औरंगाबाद , सांगली कोल्हापूर बेळगाव, परभणी रत्नागिरी गोवा.... एक म्हणून गाव सोडलं नसेल.
सुरवातीला धुवांधार पडणारा पाऊस हळु हळु कमी कमी व्हावा तसे प्रयोगही कमी कमी झाले. दहा पंधरा दिवस न हणारे कंपनीचे बिर्‍हाड चारसहा दिवसात मुक्काम बदलू लागले. संस्थानच्या सुपार्‍या कमी होऊ लागल्या.
लोकांच्या आवडी निवडी बदलत चालल्या म्हणत नाटकमंडळी एकमेकांची समजूत काढत, बदलत्या आवडीनुसार काय देता येईल याचा खल करायचे. त्यातूनच झुंझारराव, रूपमती, गोकुळचा चोर , विदर्भकन्या ही नाटके केली. मायबाप प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत हे नटमंडळीना कळत होते. पण प्रेक्षकांना चाळीशी पन्नाशी पार केलेल्या नटाला शर्मिष्ठा , वसंतसेना , शकुंतला म्हणुनसमोर पहाणं , पनाशी उलटलेल्या थुलथुलीत पोटाच्या नटाला अर्जून , कृष्ण भीम म्हनुन पहाणं नकोसे झालंय हे त्याना कळंत नव्हतं.
एकेका नाटकाची एकेक लढाई आबा हरत होते. कधीतरी एकदा ती कणकवलीच्या प्रयोगाची ती मंतरलेली रात्र पुन्हा येईल या आशेने नवा प्रयोग मांडत होते.
अशातच एकदा गोदावरीबाई अत्यवस्थ असल्याची तार आली अमरावतीला. जावे की न जावे हा विचार करतंच नाटकाचा तो प्रयोग रेटला. कोंट्रॅक्टचे प्रयोग होते. बिदागी यथातथाच होते. पण कंपनीच्या द्रुष्टीने तीही महत्वाची होती. म्हणावे तसे प्रयोग मिळतच नव्हते. रसीकांची गंगा आटत चालली होती. आपं येथून निघून गेलो तर प्रयोग रद्द होतील. काँट्रॅक्टर कबूल केलेली बिदागी देणार नाही,बरोबरच्या लोकांचेही नुकसान होईल.आपल्यालाही पैशाची गरज आहेच की. गोदावरी बाईंच्या उपचारालाही पैसे लागणारच आहेत.
आपण प्रयोग करत राहिलो. तीन दिवसांनी गोदावरी गेल्याची तार आली.
त्या दिवशी"पैसा" या दोन अक्षरांबद्दल ब्रम्हज्ञान मिळालं. मान मरातब कीर्ति, रसिंकाचा उदंड प्रतिसाद , लोकांचे प्रेम या गोष्टी किती पोकळ आहेत हे फार वाईट पद्धतीने जाणवलं. गोदावरीबाईंना वेळेत औषधोपचार ही करता आला नाही.आपण त्याना मरायला टाकून इकडे प्रयोग करत राहीलो.जातेवेळी तीच्या मुखात गंगाजल सुद्धा देवू शकलो नाही. नाशकात गोदावरीला गंगा म्हणतात. या गोदावरीला शेवटचं गंगाजलही मिळालं नाही.
काय दिलं आपण तीला? जाताना अहेवपणी गेली , सवाष्ण म्हणून गेली हेच काय ते. नवर्‍याच्या मागे बाईची अन्नान दशा होऊन परवड होऊ नये म्हणून बायका "सवाष्ण" मरण यावं म्हणतात. पण त्या यातना आपण तीला स्वतः नवरा असूनही भोगायला लावल्या.
औषधोपचार न करता आल्यामुळे गोदावरीबाई गेल्या.... त्या गेल्या नव्हे आपण त्यांचा खून केला.
आबांना या जाणीवेसरशी एक जीवघेणा चटका बसला. उरलेलं आयूष्य हा जळता सल घेवून जगायचं.
जगायचं कशासाठी ? कुणासाठी?
सम्राटाला कणाकणांन हरावं लागतं एकेक लढाई हरत एकेक भूप्रदेश गमावत साम्राज्य कणाकणानं संपत जातं. ते छोटं छोटं होत आकसत जातं. शेवटी उरतो तो एक तुटक्या फुटक्या भग्न प्रसादाचा एखादा कोपरा.
लोकांच्या मनात ते गत वैभवाचे दिवस तसेच जागे असतात. त्याला स्मरून ते हळहळत असतात. एक दिवस ती पिढी संपते, त्या बरोबर त्या आठवणीही सम्पतात. मागे उरतो तो फक्त एक ढिगारा दगड विटांचा स्वतःच्याच आठवणीत रमलेला.
प्रेक्षकही दुरावले. जवळ्चं स्वतःच म्हणावं असं माणूसही गेलं मग जगायचं कुणासाठी? स्वतःसाठी , आप्तांसाठी , रसिकांसाठी? रम्गभूमीसाठी की मग आणखी कोणासाठी?
कोण्या लेखकाच्या कल्पनेतून जन्मलेल्या पात्रांना दोन घटकांसाठी का होईना जिवंत करणारा नट आयुष्यभर ते पात्र होऊन जगतो. त्याच्या आचारा विचारांत काय पण स्वप्नातही तीच पात्रे असतात.
नाटकाचे दौरे कमी कमी होत गेले प्रयोगही कमी झाले कम्पन्या कर्जबाजारी होऊन एक एक करत बंद पडल्या . किर्लोस्कर नाटक मंडळी, बलभद्र मंडळी, वसंत संगीत , रेवणसिद्ध नाटक मंडळी ओल्या फडक्याने पाटी पुसावी तशी एक एक नावे पुसत गेली.
बोर्डावरच्या नुसत्या नावावर गर्दी खेचणारे मास्टर दत्तारार्म फुलंब्रीकर मास्टर त्रिभुवन, मास्टर धनीराम , मास्टर मदन त्या पुसल्या जाणार्‍या पाटीवरच्या अक्षरासाराखे पुसले गेले. ही नावे फक्त कुणाच्या तरी मनात आठवण म्हणून उरली. सुवर्णाक्षरे वगैरे नाहीच.
रसिका<चे दोन क्षण आनंदात गेले या पेक्षाही आपण ते दोन क्षण एक वेगळं आयुष्य जगलो म्हणून ते आपल्यासाठी सुवर्णक्षण. त्या रसिकांसाठी ते दोन क्षण वेगळी अनूभूती देवीन गेले म्हणून ते सुवर्ण क्षण.
असे सुवर्णक्षण जगता आले ही आपली श्रीमंती. नाहीतरी खरे सोने आपल्या जवळ आहे ही जाणीव आपल्याला श्रीमंती देते. चोरापोरीच्या भितीने ते सुवर्ण मिरवताही येत नाही. हे सुवर्ण आपण सतत मनात वागवत असतो.
एखाद्या नटाला काय हवं असतं आणखी आयुष्यात? तोजोपर्यंत नट म्हणून जगत आसतो तो पर्यंत तो श्रीमंतीत जगत असतो. रंगमंचावर भूमिका साकारताना त्याला एकाच जन्मात अनेक जन्म जगायला मिळतात. ती भूमिका साकारताना त्याला प्रेक्षक आहेत नाहीत या ची तमा नसते आपणच आपल्याला साक्षीभावाने पहात असतो. द्वैत आणि अद्वैताच्या सीमा रेषा पुसल्या जातात....
द्वैत आनि अद्वैत... आबाम्ना स्वतःच्याच विचारांचे हसू आले. पण त्यात तथ्य होते. नटराजाला रंदगेवता मानतो. आपणच आपल्याला साक्षीभावाने पहाणे हा साक्षात्कारच म्हणायला हवा. हा साक्षात्कार प्रत्येकवेळेस अनुभवला आहे. ऑथेल्लो, हॅम्लेट , नलदमयंती, संत गोरा कुंभार , रत्न कुबेर, प्रुथ्वीवल्लभ, स्वप्नविजय , रमामाधव सगळे जन्म जगून झाले.
प्रत्येक नावासरशी एक एक जग आठवणीत उजळंत गेलं. एखादाया घाटमाथा उतरताना दिसावीत तशी छोटी छोटी गावं दिसू लागली . प्रत्येक प्रयोगाच्या आठवणी काजव्यांची बेटं दिसावीत तशी आबांना डोळ्यासमोर दिसू लागल्या.
अमरावतीला मोकळ्या मैदानात केलेला वसंत संगीत चा प्रयोग. रसीकांनी आख्खं मैदान भरलं होतं. मुंगीला ही जागा नव्हती. गाण्याला वन्समोअर मिळतातच त्या दिवशीराजा भर्तृहरी च्या संवादाना वाहवा मिळाल्या भर्तृहरी पिंगलेला सोडून जातो त्या वेळेस बायकाच काय पण समोर बसलेले पुरूषही मुसमुसत डोळे पुसत होते. रंगमंचावरून हे पहाताना अंगावर काटा आला होता.
नागपूरच्या सीता स्वयंवराच्या प्रयोगाला शिवधनुष्याच्या प्रसंगानंतर फुले उधळली होती....... काय अलोट प्रेम करायचे लोक तरी ना.! क्षनभर आपणच राम आहोत असे वाटायचे. लोक धनुर्धारी रामाचे ते रूप डोळ्यात साठवून ठेवायचे सीता रामाच्या गळ्यात हार घालते ते दृष्य डोळ्यात साठवून ठेवायचे. एकदा तर टाळ्या वाजवून मंगलाष्टके म्हंटली होती रसीकांनी. संगीत चंचल लक्ष्मी चा प्रयोग होता सोलापूरला. सदाशिव आपल्या बायकोला ज्या पद्धतीने बोलतो ते सहन न होऊन एका प्रेक्षकाने पायातली वहाण काढून फेकली होती रंगमंचावर . आपल्या अभिनयाची पावती होती ती. देवाचा कौल मिळाल्याचे फूल आपण कपाळी लावतो तशी ती वहाण आपण कपाळी लावली होती.
डोळ्यातल्या पाण्यामुळे आबांना समोरचे धूसर दिसू लागले. समोरचे काही आता पहायचे नव्हतेच मुळी. त्याची गरजही नव्हती. डोळ्यासमोर वेगळेच जग होते. ते जग पहायला या जगातली दृष्टी गरजेची नव्हती.
आठवणी अशा एकट्या कधीच येत नाहीत. एक आली की तीचा पदर धरून दुसरी येतेच.
क्रमशः

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

8 Jun 2019 - 11:48 am | आनन्दा

...

पद्मावति's picture

8 Jun 2019 - 3:04 pm | पद्मावति

अप्रतिम...केवळ अप्रतिम _/\_

प्रमोद देर्देकर's picture

8 Jun 2019 - 9:20 pm | प्रमोद देर्देकर

वा विजुभौ खूप छान अप्रतिम लिहलंय .
बऱ्याच दिवसांनी लिहते झालात.
येवू दे अजून.

धर्मराजमुटके's picture

8 Jun 2019 - 10:59 pm | धर्मराजमुटके

બહુ સરસ ! આગડ ના ભાગ ક્યારે ? એમ છ મહિના વરસ પછી લખો તો કેમ ચાલે ?

जॉनविक्क's picture

9 Jun 2019 - 6:36 pm | जॉनविक्क

लिखाणात, मनात, आणि आसमंतात. अजून येउद्या.