भर दुपारचे १२ वाजताहेत. उन रणरणतेय आणि मी भर उन्हात भाजे लेण्यांच्या पायर्या चढतोय. समोरच विसापूर किल्ल्याची अखंड तटबंदी त्याच्या बुरुजांसह दर्शन देतीय तर उजवीकडे बुलंद लोहगड भर उन्हातही झळाळून उठलाय. चढण फारशी नसल्यामुळे आम्ही भाजे लेण्यांना सहजपणे पोचतोय. लेण्यांच्या प्रवेशद्वारात पोहोचताच भाजे लेणीचे भव्य चैत्यगृह सामोरे येतेय.
भाजे लेण्यांकडे जाणार्या पायर्या, पाठीमागे दिसणारी विसापूर किल्ल्याची तटबंदी
विहाराच्या एका खिडकीतून दिसत असलेला लोहगड
कलते खांब असलेले भव्यदिव्य शैलगृह
एकूण बावीस लेण्यांचा हा समूह. एक चैत्यगृह, एक स्तूपसमूह आणि इतर २० विहार. भाजे लेण्यांचा काळ सुरु होतो ते इ.स. पूर्व २ र्या शतकात आणि त्याचे अखेरचे बांधकाम होते ते इ.स. ६ व्या शतकात. सर्वात ठळकपणे दिसणारे लेणे म्हणजेच चैत्यगृह. नेहमीप्रमाणे दिसणारी पिंपळपानाकृती कमान येथेही दिसत आहेच. बाजूलाच यक्षिणीचे शिल्पही कोरलेले दिसतेय. कमानीच्या बाजूलाच आणि वर गवाक्षांच्या माळा, कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, कातळात खोदलेल्या कडय़ा सर्व काही दिसतेय. तो भव्य देखावा जणूकाही अंगावरच येतोय.
चैत्यगृहाची रचना नेहमीसारखीच -अष्टकोनी खांब व मध्ये गुळगुळीत स्तूप. पण इथे मात्र थोडेसे वेगळे दिसतेय. अष्टकोनी खांब आहेत पण ते सरळ उभे न ठेवता कललेले ठेवलेले आहेत जणू ते छताच्या ओझ्याने वाकलेले आहेत. खांबावर कमळ, चक्र कोरलेले दिसतेय. एका खांबावर खुंटी व तिला लटकवलेला हारही मोठ्या नजाकतीने कोरलेला दिसतोय.
चैत्यगृह, यक्षिणीचे शिल्प, लाकडी फासळ्या व कमानदार गवाक्ष व सज्जे
चक्र, कमळ व खुंटीवर ठेवलेला हार
इथेही छतावर २००० वर्षांपूर्वी घातलेले लाकडी फासळ्यांचे आवरण अजूनही शाबूत दिसतेय. बावीस अर्धवर्तुळाकार तुळयांनी बावीस खांब जोडलेले आहेत तर अकरा पाववर्तुळाकार तुळया स्तूपाच्या वर एकाच बिंदूत सांधल्या गेल्या आहेत. अतिशय नाजूक तरीही भव्यदिव्य असेच ते दृश्य दिसतेय. मधोमध गोलाकार स्तूप त्यावर हर्मिका पण इथे मात्र हर्मिकेवरील लाकडी छत्र दिसत नाहीये. वाटोळा स्तूप झिलईकामाने गुळगुळीत केलाय हा लेण्यांवरील मौर्यकलेचा प्रभावच.
लाकडी तुळयांनी केलेली नक्षीदार कमान
चैत्यगृहाच्या भव्यदिव्यपणाने विस्मित होउन बाहेर येतोय आणि पावले विहारांकडे वळताहेत. काही दुमजली विहार दिसत आहेत. काही अगदीच साधे दिसत आहेत तर काही कलाकुसरीने सालंकृत केले दिसताहेत. दरवाजे, खिडक्या, झोपण्याचे ओटे तर काही विहारांत अगदी ओट्यांच्या बाजूला वस्तू ठेवण्यासाठी कप्पेही खोदल्याचे दिसत आहेत.
दुमजली विहार
अगदी भरपूर संख्येने येथे विहार दिसत आहेत.
सुरुवातीच्या एका विहारावर शिलालेख कोरलेला दिसत आहे.
'बाधया हालिकजयाना दानं'
बाध या शेतकर्याच्या बायकोचे दान. म्हणजे अगदी आपल्यासारख्या सामान्य जनांनीही पण ही अप्रतिम लेणी बांधायला मदत केलेली दिसत आहे.
थोडे पुढे येताच दोन थंडगार पाण्याची टाकी खोदलेली दिसत आहेत. वर शिलालेख आहेच
‘महारठी कोसिकीपुत विण्हुदत दानं’
महाश्रेष्ठी कोसिकीपुत्र विण्हुदत्त याने हे टाके खोदलेले आहेत. आजचा शेठजी हा शब्द पूर्वीच्या श्रेष्ठी याचा अपभ्रंश.
थोडे पुढे एका गुहेत स्तूपांचे एक संकुलच तयार केलेले दिसत आहे. एकूण १४ स्तूप येथे कोरलेले दिसत आहेत. मान्यवर बौद्ध भिक्षूंची ही स्मारकेच. यातल्या काही स्तूपांवर त्यांची नावेही कोरलेली आहेत. एकदमच वेगळे आणि वैविध्याने भरलेले असे हे लेणे दिसत आहे.
आता तिथून थोडे पुढे जात आहे. आता पोचतोय ते भाजे लेण्याच्या प्रसिद्ध सूर्यगुंफेकडे.
व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी याची रचना. आतले दालन कड्याकुलपांनी बंद केलेले आहे पण वरांड्यात मात्र अप्रतिम कोरीव कलेची खाणच दिसत आहे. सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम यांनी ही गुंफा भारून गेली आहे. यातली सगळ्यात ठळक दिसतोय तो सूर्य-इंद्राचा देखावा. चार घोड्यांच्या रथात सूर्य स्वार होउन चालला आहे. त्याच्या बाजूला आहेत त्याच्या पत्नी संज्ञा व छाया. एकीच्या हातात छ्त्र तर दुसरीच्या हातात चामर. रथाखाली तुडवला गेलेला असुर दिसत आहे. असुर म्हणून त्याचे पायही वळलेले दिसताहेत. रथामागे बकर्या, तसेच इतर प्राणी आणि सैनिकही दिसत आहेत.
सूर्यरथ
रथाखाली तुडवला गेलेला, पाय वक्र असलेला असुर.
दुसर्या बाजूला हत्तीवर आरूढ असलेल्या इंद्राचे शिल्प दिसत आहे. गळ्यात फुलांची माळ, हाती अंकुश दिसतोय. इंद्राच्या पाठीमागे हाती ध्वज धरून दास बसलेला दिसतोय. हत्तीने सोंडेत झाड पकडलेले दिसत आहे. त्यावरील फांद्या, पानेही स्पष्ट दिसत आहेत. आजूबाजूला लहानमोठ्या शिल्पकृतींचा अक्षरशः खचच पडलेला दिसत आहे. एक अश्वमुखी स्त्री, एक तबला वाजवणारी तर एक नर्तिका येथे दिसत आहे. आजूबाजूलाच अनेक वादक कलाकारही दिसताहेत. साग्रसंगीत असाच हा देखावा आहे.
गजारूढ इंद्र
हत्तीच्या सोंडेत असणारे झाड
नर्तिका, तबला व इतर वाद्ये वाजवणारे वादक
पण बौद्ध लेण्यांमध्ये सूर्य -इंद्राचे काय काम? काही तज्ज्ञांच्या मते रथारूढ देवता साक्षात बुद्ध असून गजारूढ शिल्प हे बुद्धशत्रू 'मार' याचे आहे. २ सुंदर शिल्पांचा असा अर्थ लागताच क्षणात त्याचे युद्धशिल्पांत रूपांतर होतेय.
समोरच्या भिंतीवर खालील बाजूस ग्रीक दंतकथांतील पात्रे कोरलेली दिसत आहेत. शरीर घोड्याचे व मुख मानवाचे अश्या ह्या ग्रीक उपदेवता 'सेंटोर'च्या प्रतिमाच. काही शिल्पाकृतींमध्ये पंख असलेले घोडे कोरलेले आहेत. ही ग्रीक पद्धतीची शिल्पे म्हणजेच २२०० वर्षांपासून चालू असलेल्या समुद्र उल्लंघून चालत असलेल्या व्यापाराचा व त्याद्वारे इकडे तिकडे पसरलेल्या संस्कृतीचा ढळढळीत पुरावाच.
पंख असलेले घोडे व सेंटोरच्या शिल्पाकृती
बाहेरून सूर्यगुंफा अशी दिसते
निघताना परत एकदा चैत्यगृह कॅमेर्यात सामावण्याचा मोह आवरला नाहीच.
सूर्यगुंफेने भारावून जात आता परतीची वाट धरत आहे. पूर्वजांच्या कोरीव कामामुळे भान हरपून गेलेले आहे. आता पावले वळताहेत ते नुकत्याच जाउन आलेल्या अश्याच एका सुंदर लेण्याकडे, बेडसे येथे पुन्हा एकदा.
प्रतिक्रिया
28 Mar 2011 - 11:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्ली एकदम झकास फोटो पण माहितीची अधिक भर हवी असे वाटले.
कलते खांब असलेले शैलगृह मस्तच आहे. आवडले.
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
28 Mar 2011 - 11:17 pm | प्रचेतस
अधिक माहिती नक्कीच दिली असती पण त्याकाळच्या स्थापत्यकलेविषयी जास्त माहिती नाहीच. अधिकाधिक घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण आपल्यासारख्यांची मदत लागेलच.
28 Mar 2011 - 11:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्थापत्यकलेविषयी की भाषेविषयी की अजून कशासंबंधी (किंवा काही नसूही शकते हं) ही भाजेलेणी प्रसिद्ध आहे मला काही आठवेना राव. :(
काही आठवलं तर डकवतो. आमच्या औरंगाबादेत विद्यापीठाकडे एक बौद्धलेणी आहे. ते शैल्यगृह जरा त्याच शैलीचे वाटते. तोही फोटो सापडला तर अगदी शेवटचा प्रतिसाद म्हणून डकवेन. उगाच एवढ्या सुंदर लेखात मधेच माझं अवांतर नको. :)
-दिलीप बिरुटे
28 Mar 2011 - 11:30 pm | प्रचेतस
भाजेलेणी ही सूर्यगुंफेतील प्रतिमांसाठी जास्त प्रसिद्ध आहे असे ऐकलेले होते.
तुम्ही म्हणालात ती औरंगाबादेतील लेणी म्हणजे पितळखोर्याचीच ना? फोटो डकवला तरी चालेल. अवांतर तर अजिबात होणार नाही उलट एकप्रकारे लेखाला पूरकच होईल. :)
28 Mar 2011 - 11:51 pm | आनंदयात्री
पितळखोरा नाही. बिरुटे म्हणतात, औरंगाबादची लेणी. होय औरंगाबादमध्येही लेणी आहेत. ती बौद्धलेणी असुन बीबी का मकबर्याजवळ आहेत.
औंरगाबाद (म्हणजे आमचे संभाजीनगर हो) जवळची लेणी,
१. वेरुळ
२. अजिंठा
३. पितळखोरे (येथे जवळच अत्यंत पुरातन अर्वाचीन असे सुंदर मंदिरही आहे, त्यासाठी गवताळा अभयारण्यातुन जावे लागते)
28 Mar 2011 - 11:50 pm | गणेशा
नेहमीप्रमाणेच अप्रतिम ..
जुन्या आठवणी जाग्या गेल्या मित्रा ....
तुम्ही असेच फिरत रहा.. कधी तरी त्या वाटेवर आमची पाउले उमटतीलच अशी आशा ..
28 Mar 2011 - 11:54 pm | सांजसखी
फोटो छान काढलेत !!
29 Mar 2011 - 1:19 am | गणपा
मस्त रे वल्ली.
29 Mar 2011 - 6:45 am | स्पा
वल्या तुसी ग्रेट हो
पहिलाच फोटो पाहून दिल खुश झालं :)
कलते खांब, पण अफाट
सुंदरच फोटू, आवडेश
29 Mar 2011 - 7:27 am | ५० फक्त
धन्य आहात आपण वल्ली, लेण्यांमध्ये एवढा रस घेउन फिरताय, फोटो काढताय आणि छान छान लिहिताय. तुमचं हे फिरण्या- लिहिण्याचं वेड असंच अखंडित राहो हीच प्रार्थना.
तसंच तुमच्या प्राचीनभाषा अभ्यासाला पण आमच्या शुभेच्छा.
30 Mar 2011 - 10:45 am | निनाद मुक्काम प...
@धन्य आहात आपण वल्ली, लेण्यांमध्ये एवढा रस घेउन फिरताय, फोटो काढताय आणि छान छान लिहिताय. तुमचं हे फिरण्या- लिहिण्याचं वेड असंच अखंडित राहो हीच प्रार्थना.
तसंच तुमच्या प्राचीनभाषा अभ्यासाला पण आमच्या शुभेच्छा.
हेच म्हणतो मी
तुमचे ह्यावर एक पुस्तक प्रकाशित झाले तर ..
सहज कल्पना आली ..
29 Mar 2011 - 8:36 am | दीपा माने
सुंदर फोटो काढले आहेत. माहीतीही मनापासून लिहीलीत. प्रत्यक्ष पाहात आहे असेच वाटते.
29 Mar 2011 - 10:55 am | स्पंदना
फोटोज तर अप्रतिम आहेत्च पण प्रत्येक लेण्या बद्दल्ची मीहिती ही अतिशय सुन्दर वल्ली!! __/\__
तुम्ही जे लिहिल आहे की बौद्ध लेण्यात सुर्य अन इंद्र कसे? मला अस वाटत की बौद्ध हा त्या काळी धर्म नव्हता एक जगण्याची प्रणाली होती , हिंदु धर्म न नाकारता स्विकारलेली एक जगण्याची पद्धती. त्यामुळे त्याम्चे देव हे आपलेच असणार नाहि का? उगाच फार किस पाडुन आणि एक धर्म वाढवायची काय गरज नाही का?
29 Mar 2011 - 12:05 pm | सागर
वल्ली मित्रा,
सुंदर फोटोंना सुरेख शब्दांची झालर मिळाली आणि तुझी ही ऐतिहासिक भाजे लेण्यातील यात्रा प्रत्यक्ष केल्याचा अनुभव आला. असे वाटले तुझ्याबरोबरच फिरतो आहे. शिलालेखातील बारकावे उत्तम टिपले आहेस, तसेच ग्रीक देवतेचा क्लोज-अप.
सर्वच फोटो अप्रतिम आहेत. पण "विहाराच्या एका खिडकीतून दिसत असलेला लोहगड" हा माझा सर्वात आवडता फोटो. उत्कृष्ट फोटोग्राफीचा नमुना म्हणता येईल तू टिपलेला हा सुंदर फोटो :)
असेच छान छान पर्यटन कर आणि आम्हाला बसल्याजागी अशा फुकटच्या यात्रा घडू देत ;)
अवांतरः सिंहगडाला कधी भेट देतोयेस? आधुनिकीकरणामुळे तिथे अगोदरच बरीच क्षती होते आहे. गडाचे अगोदरच गेलेले सौंदर्य पूर्ण नाहिसे होण्याअगोदर तुझ्या कॅमेर्यात उरलेल्या आठवणी साठवून ठेव. अगोदरच सिंहगडाला टिपले असशील तर अजून एक छानसा लेख येऊ देत :)
29 Mar 2011 - 12:09 pm | प्रचेतस
सिंहगडाला तर बरेच वेळा टिपले आहे पण पावसाळ्यात तिथे कधीही गेलो नाही अजून. आता या पावसाळ्यात खास क्यामेर्यात टिपण्यासाठीच जाणार आहे.
29 Mar 2011 - 12:25 pm | सागर
पावसाळ्यात सिंहगडाचं सौंदर्य अजून बहरतं हे माझे अनुभवाअंती झालेले मत आहे.
पावसाळ्यातला तो अंगाभोवती रुंजी घालणारा गारवा,... शहारा आणतो पण काटा नाही आणत... अंगावर होणार्या जलधारांचा शिडकावा, धुक्याचे पांघरुण...क्षणात येते ...तर वार्याच्या दुसर्या लाटेसरशी क्षणात अदृष्य होते... अहाहा ... काय ते सिंहगडावरचे सौंदर्य वर्णावे.. केवळ अप्रतिम.
माझी खात्री आहे की पावसाळ्यात सिंहगडावर जाशील तेव्हा हे सर्व त्यात तू अगदी नेमके क्षण टिपशील :)
मी त्यावेळी पुण्यात असलो तर नक्की येईन
29 Mar 2011 - 4:02 pm | स्वच्छंदी_मनोज
वल्ली साहेब मस्तच फोटो आणी माहीती. अजुन थोडी माहीती हवी होती
साधारण ८-९ वर्षांपुर्वी भाजे लेण्यांना गेलो होतो त्याची आठवण जागी झाली. तेव्हा त्या पायर्या नव्हत्या. आतातर म्हणे ASI भाजे लेण्यासाठी तिकीटपण घेते म्हणे.
अवांतर : ते तिकीट घेवुन ASI त्या पैशांचे लेण्यांसाठी काय करते ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्याबद्दल शंकेला वाव आहे.
भारतात खोदल्या गेलेल्या सर्वात प्राचीन दगडी गुंफामध्ये भाजे लेण्याचा पहिल्या पाचात लागावा. बिहारच्या बाराबर लेण्यांनंतर भारतात लेणीकलेची सुरुवात झाली आणी महाराष्ट्रातील भाजे, ठाणाळे, खडसांबळे इ. लेणी याच काळात खोदली गेली. लेणीकलेला राजाश्रय मिळण्यापुर्वी लोकाश्रयाधारीत लेणी खोदण्याच्या परंपरेचे भाजे हे उत्तम उदाहरण ठरावे.
पुर्वापार चालण्यार्या बंदर कोकण (ठाणे, कल्याण, नालासोपारा) ते देश (नगर, पुणे) जोडणार्या व्यापारी मार्गांवर (बोरघाट, उंबरखिंड, कुसुरघाट) या परीसरातील अनेक लेणी (कार्ले, भाजे, बेडसे, शेलारवाडी, कोंडाणे) खोदली गेली.
इंद्ररथ, सुर्यगुंफा आदी शिल्पावरुन मला वाटते कि या मुळच्या हिनयान लेण्यांचे मधल्या काळात ब्राम्हणी शैलीत रुपांतर झाले असावे.
झकास फोटो आणी माहीती. आता अजुन येउदे.. पु.ट्रे.शु,
30 Mar 2011 - 8:33 am | प्रचेतस
भाजे लेणीला आता ५ रू. चे तिकीट घ्यावे लागते. पुरातत्व खात्यातर्फे तिथे बरीच डागडूजी चालू असलेली दिसली. जागोजागी सिमेंट व वाळूच्या थप्प्या पडलेल्या दिसतात.
बहुतेक ही शिल्पे नंतरच्या महायान कालखंडात खोदली गेली असावीत. सुर्यगुंफेतील बहुतेक शिल्पांवर ग्रीक शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. बर्याच तज्ज्ञांना ह्या शिल्पांमध्ये ग्रीकांच्या हेलिओस नाहीतर रोमनांच्या अपोलोचाही भास होतो. पण ब्राह्मणी शैली तर इथे नक्कीच नाही.
29 Mar 2011 - 5:10 pm | कच्ची कैरी
मस्त ,अप्रतिमच आहेत फोटोज
29 Mar 2011 - 5:28 pm | चित्रा
फोटो आणि माहिती आवडली.
अधिक माहिती हवी आहे, ती नंतर विचारेन.
29 Mar 2011 - 11:04 pm | पैसा
काही मूर्ती जरा झिजलेल्या/सच्छिद्र झाल्यासारख्या दिसतायत. या लेण्यांकडे बरंच दुर्लक्ष झालं असावं.
29 Mar 2011 - 11:08 pm | क्रान्ति
चांगली माहिती आणि छायाचित्रं.
29 Mar 2011 - 11:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सातवाहन कालखंडात चैत्यगृहे व विहार प्रचंड प्रमाणात कोरले गेले, त्यापैकी भाजे येथील लेण्या आहेत. भाजे येथे आपण म्हणता तसे भव्य असे अर्धवर्तुळाकार प्रवेशद्वार आहे. अशाच प्रकारचे चैत्यगृहे ठाणे जिल्यातील कोंडणे येथे आहे असे म्हणतात. त्याचबरोबर आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरे येथील चैत्यगृह असेच भव्य आहे. तसेच अजिंठा येथील लेणी क्र. ९ आणि १० ही चैत्यगृहेच आहे. प्राचीन आणि भव्य प्रवेशद्वारासोबत जी चैत्यगृहे म्हणून नावे सांगितली जातात ती वरीलप्रमाणे आहेत.
-दिलीप बिरुटे
30 Mar 2011 - 8:26 am | प्रचेतस
कोंडाणे लेणे येथे तसेच चैत्यगृह आहे. कोंडाणे लेणे हे महाराष्ट्रातील आद्य लेणे समजले जाते. लेण्यांच्या डोक्यावरूनच एक धबधबा पावसाळ्यात तेथे पडत असतो. त्यामुळे तिथेबरीच झीज झाली आहे. नंतरच्या चैत्यगृहांच्या बांधकामात ह्या चुका सुधारून घेतल्या गेल्या.
कार्ले लेणी, बेडसे लेणी येथेही अशीच अर्धवतुळाकार पिंपळपानाकृती कमान आढळते. कार्ल्याचा चैत्य तर भारतात सर्वात मोठा समजला जातो.
30 Mar 2011 - 10:41 am | llपुण्याचे पेशवेll
पण बौद्ध लेण्यांमध्ये सूर्य -इंद्राचे काय काम? काही तज्ज्ञांच्या मते रथारूढ देवता साक्षात बुद्ध असून गजारूढ शिल्प हे बुद्धशत्रू 'मार' याचे आहे. २ सुंदर शिल्पांचा असा अर्थ लागताच क्षणात त्याचे युद्धशिल्पांत रूपांतर होतेय.
कदाचित असेही असू शकेल की पूर्वी हे लेणे कोण्या वैदीक देवतेचे मंदीर असेल. मग बौद्धधर्माचा प्रभाव वाढल्यावर आख्खे लेणे बौद्धांकडे आले. व ते पुढे बौद्ध म्हणूनच ओळखले गेले. असे अन्यत्रही अनेक ठीकाणी झाल्याचे दिसते.
लेखातील इतरही अनेक मतांशी सहमती नसली तरी लेख उत्तम लिहीला आहे हे मान्य करावेच लागते. फोटोही छान. :) धन्यवाद.
30 Mar 2011 - 11:02 am | निनाद
लेखातील इतरही अनेक मतांशी सहमती नसली नक्की कोणत्या स्वरूपाची मतांतरे आहेत या विषयी थोडी अधिक माहिती द्याल का? ती का आहेत, याचा उहापोहही वाचायला आवडेल.
30 Mar 2011 - 11:27 am | प्रचेतस
पण भाजेचे जे मूळ चैत्यगृह आहे ते तर बौद्धांनीच बांधलेले आहे ना? आणि चैत्यगृह तर सूर्यगंफेपेक्षाही प्राचीन असावे असे मानले जाते.

शिवाय त्या इंद्र-सूर्यांच्या शिल्पांच्या वर स्तूप आणि कमानी कोरलेल्या आढळतात. शिवाय त्या दोन शिल्पांच्या मध्ये एक विहार आहे.
इंद्र, सूर्य ह्या तर नक्कीच वैदिक देवता आहेत. पण वेदकाळात जर मूर्तीपूजा नव्हती तर ही शिल्पे इथे कोरण्याचे काय कारण? शिवाय जर जैन शिल्पे असतील असे म्हटले तरीही संपूर्ण भाजे लेण्यात सूर्यगुंफेव्यतिरिक्त इतर कुठेही या पद्धतीची शिल्पे दिसत नाहीत.
तसेच अजून कुठल्या मतांशी सहमती नाही हे देखील सांगावे म्हणजे माझीदेखील चूक झाली असल्यास लेखात सुधारणा करता येईल.
शेवटी सत्य महत्वाचे. नाही का?
30 Mar 2011 - 6:49 pm | चित्रा
बौद्ध चित्रांमध्ये मार हा राक्षस दाखवलेला असतो, पण तो बुद्धाला वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करत असतो, जसे आपल्या मुली देऊन इ. बुद्ध हा बुद्ध होण्याआधी त्याला मायेत गुंतवणारा असा हा मायावी राक्षस आहे. तो गजावर आरूढ असलेली शिल्पे आहेत पण ती बुद्ध रथावर विराजमान असताना नाहीत, तर तपस्या करताना इ. आहेत. 'ह्या वरील शिल्पाशी त्याचा कसा संबंध असेल?' असा विचार करते आहे.
15 Oct 2020 - 7:16 pm | गोरगावलेकर
भाजे लेण्यांशी संबंधित एक छोटीशी आठवण आहे. जमल्यास लिहीन.
15 Oct 2020 - 10:40 pm | प्रचेतस
अवश्य लिहा.