बेडसे, कार्ले, भाजे लेण्या बघायला कधीपासून जायचे होतेच पण मुहूर्त फारच उशिराचा लागला. रविवारी दुपारी १२ च्या पुढे मी व मित्र निघालो ते त्याच्या थंडरबर्ड वरून. अर्थातच गाडीचा ताबा मीच घेतला व भरर्राटकन निघालो. कामशेतवरून वरून डावी मारली ते पवनानगरच्या दिशेला. थोड्याच वेळात घाट घाट ओलांडून द्रुतगती महामार्गाच्या खालून पलीकडे गेलो थोड्याच वेळात उजवीकडे बेडसे लेणी दिसली. बेडसे गावच्या फाट्याला गाडी वळवली व काही वेळातच गावात शिरलो. गाडी बेडसाई देवीच्या मंदिरापाशी लावली. गावापासूनच बेडश्याची चढण सुरु होते. उत्तम पायर्या बांधून काढल्या आहेत. दुपारचे दीड वाजले असल्याने उन अगदी रणरणत होते शिवाय मार्गावर कुठेही सावली नाही त्यामुळे चढण फारशी नसूनही दमायला होत होते. खालून बेडसे लेणीचे २ अजस्त्र खांब खुणावत होते. प्रथमदर्शनी तरी लेणी लहानच वाटत होती. अर्ध्या तासातच लेणीपाशी पोहोचलो तोपर्यंत जीव अर्धा होउन गेला होता.
खालून जे अजस्त्र खांब दिसत होते ते चैत्यगृहाचे होते. डावीकडे २/३ टाकी, छोट्या गुहा व एक लहानसा स्तूपही आहे. टाकीवरच पाली भाषेतील एक शिलालेखही लिहिलेला आहे.
चैत्यगृहाचा प्रवेशमार्ग डोंगर मधोमध फोडून त्याच्या दोन दरडींमधून केलेला आहे. त्या खिंडीतून आत जाताच चैत्यगृहाचे विशाल स्वरूप एकदम समोर येते. दोन अजस्त्र खांब, षटकोनी बांधणीचे, कुंभाकार तळखडा, घंटेच्या आकाराचा शीर्षभाग, त्यावर आमलक असलेला चौरंग व त्यावर घोडे व बैलांवर बसलेल्या स्त्रीपुरुषांच्या जोड्या. सारेच कसे नजाकतीने कोरलेले. बाजूच्या दोन्ही भिंतीनाही असेच अर्धे खांब कोरलेले जणू ते भिंतीत रूतले आहेत. त्यावरही असेच कोरीव काम. दोन खांबाच्या बरोबर मध्ये चैत्यगृहाचे पिंपळपानाकृती कमान असलेले प्रवेशद्वार. त्यावर नक्षीदार जाळी कोरलेली. बाजूच्या दोन्ही भिंतींवर अनेक मजली प्रासादांचे देखावे. त्यामध्येच गवाक्ष, एकावर एक चढत जाणारे अतिशय सुंदर कोरीवकामाने सजलेले. खालचे बाजूला विश्रांतीसाठी विहार खोदलेले.
पिंपळाकृती कमानीतून आत एका ओळीत दिसणारे खांब, समोर मधोमध चैत्य. खांब किंचित चैत्याच्या दिशेने झुकलेले. वेदी, मेढी, हर्मिका अजूनही ठशठशीत. विशेष म्हणजे हर्मिकेवरचे लाकडी छत्र सुमारे २००० वर्षांपूर्वीचे अजूनही शाबूत. कमलपुष्पांसारखी देखणी रचना असलेले. प्राचीन स्थापत्यकलेचा अजूनही शाबूत असलेला एक चमत्कारच. आतल्या खांबांवरही काही ठिकाणी चक्र , कमळ कोरलेले आढळले.
बेडसे लेणीला फारसे कोणी येत नसल्याने येथे निरव शांतता असते. अस्वच्छतेचा कुठे मागमूसही नाही. चैत्यगृहाच्या बाहेर आलो. शेजारच्या दोन दरडींवर वर जाण्यासाठी पावठ्या खोदलेल्या आहेत. त्या चढून वर गेलो. तर लेण्याचे एकदम वेगळ्याच कोनातून अतिशय सुरेख दर्शन झाले. आता आम्ही त्या दोन खांबाच्या शिरोभागाच्या अगदी जवळ होतो. खालून न दिसलेले कोरीव काम आता अगदी पुढ्यातच दिसत होते. चैत्यगृहाची कमानही अगदी समोरच आली होती. जवळून हा सर्वच देखावा अतिशय भव्य वाटत होता. पूर्वजांच्या कौशल्याने मन अगदी विस्मित झाले होते. दरडी उतरून खाली आलो. आता उजवीकडे मोर्चा वळवला. बाजूला एक मोठा विहार खोदला आहे. कोरीव काम फारसे नाही पण १/२ शिलालेख आणि विश्रांतीसाठी कक्ष खोदलेले आहेत. बाजूलाच काही लहानसे विहारही आहेत.
बेडसे लेणी बघून झाली होती. ३ वाजून गेले होते. त्यामुळे तिथून काढता पाय घेतला. १० मिनिटातच खाली उतरलो. आता जायचे होते ती कार्ल्याची जगप्रसिद्ध लेणी पाहायला.
त्याविषयी पुढच्या भागात.
बेडसे लेणीचे प्रथमदर्शन
छोटासा स्तूप व काही खोदीव अवशेष
भव्य खांब
प्रासाद व गवाक्षांची जाळीदार रचना.
चैत्यगृह
हर्मिका व तिच्यावरील लाकडी कमलपुष्पाकृती छत्र
दरडी चढून गेल्यावर पुढ्यात उभे ठाकलेले खांब
चैत्यगृहाच्या उजवीकडील मोठा विहार
बाय बाय
प्रतिक्रिया
23 Feb 2011 - 12:22 am | कौशी
सुन्दर फोटो
23 Feb 2011 - 12:36 am | विनायक बेलापुरे
बारिकसारिक तपशील ही दिसत आहेत फोटोत. छान.
23 Feb 2011 - 8:13 am | आनंदयात्री
दोनेक वर्षापुर्वी गेलो होतो, आदल्या दिवशी फस्क्लास लोनावळा यमटीडीशीला मुक्काम केला होता, बारकं बोटिंग फिटींग पण आहे तिथे, मग दुसर्या दिवशी कार्ला आणि ही लेणी ..
हा बघा तिथला आंद्या ;)
23 Feb 2011 - 8:33 am | प्रचेतस
लई भारी रे आंद्या. अजूनही फोटू टाक ना.
23 Feb 2011 - 8:21 am | ५० फक्त
तुझ्याकडुन उल्लेख ऐकल्यावर वाटच पहात होतो कधी टाकतो आहेस ते. आणि तो बुलेट्चा उल्लेख पुन्हा जळवण्यासाठि का करतो आहेस, आधिच मला होम मिनिस्ट्रि कडुन क्लिअरन्स मिळ्त नाहि आणि त्यात हे असं असो.
फोटो व वर्णन नेहमि प्रमाणेच मस्त, आता तुमच्या सोबत फिरायचे वेध लागले आहेत.
23 Feb 2011 - 8:35 am | प्रचेतस
अरे पण माझी किती जळते आहे याची तुला काहीच कल्पना नाही. एकदा बुलेट चालवल्यानंतर पल्सर चालवणे किती दु:खदायक असू शकते ते मी सध्या अनुभवतोय. :(
24 Feb 2011 - 12:57 pm | इन्द्र्राज पवार
"...एकदा बुलेट चालवल्यानंतर पल्सर चालवणे किती दु:खदायक असू शकते ते मी सध्या अनुभवतोय...."
वल्ली....हे मी अनुभवले आहे. फक्त पल्सरऐवजी होंडा पॅशन {जी एरव्ही शहरात सुखदायक वाटते}. त्यातही ग्रामीण भागातील खडतर प्रवास होता तो....पिलिअनवर एक ज्येष्ठ नातेवाईक, त्यामुळे प्रवासात तसे बोलणेही नसल्याने सारा वेळ ते खड्डे आणि दगड चुकविण्यातच गेला होता. सारे शरीर आपसुक शेकून निघाले होते.
....पण यार बुलेटची मझा कुछ और है |.... त्यातही गोव्यातील रस्ते असले की, मग आणखीन काय हवे? आठ-दहा तासाचे जरी बुलेट रायडिंग असले तरी अरेबियन नाईट्समधील उडत्या सतरंजीवरूनच प्रवास करतोय की काय असे वाटते. [बुलेट घेतली पाहिजे....स्वतःची].
(बाकी तुमच्या "डोंगर-लेणी' पालथे घालण्याच्या सवयीबद्दल काय लिहू? तुमच्या फोटोतूनच आम्ही आमची भटकंतीची भूख भागवितो.)
इन्द्रा
23 Feb 2011 - 1:53 pm | गणेशा
अतिशय छान फोटोज.
मला ही लेणी माहीतीच नव्हती ...
कार्ला लेणी ला पावसाळ्यात जातोच ... ही लेणी नक्की कोठे आहेत त्याच्या... मस्त वाटले फोटो पाहुन
23 Feb 2011 - 3:59 pm | स्पंदना
शेवटुन चौथ्या फोटोत तो जो भिंतीत कोरलेला घोडा आहे तो किती देखणा कोरलाय ना? कुठे आहेत ही लेणी? खरच खुप कोरीव आहेत. सुन्दर!
वल्ली!! हेवा वाटतो!
23 Feb 2011 - 4:01 pm | स्पा
वाल्या, सगळे फोटू अव्वल
मस्तच !!!!!
23 Feb 2011 - 4:14 pm | नाखु
पवनानगर हून जवळ आहेत काय ? दुचाकी वरून जाण्यासारखी ( स्कूटी ) वरून
23 Feb 2011 - 5:40 pm | प्रचेतस
पवनानगरहून ही लेणी अगदीच जवळ आहेत.
पुण्यावरून जाताना कामशेतवरून पवनानगर कडे जाणारा रस्ता डावीकडे वळतो. त्या रस्त्याने जायचे थोड्याच वेळात घाट लागतो घाट पार केल्यावर रस्ता द्रुतगती महामार्गाच्या खालून जातो लगेचच उजवीकडच्या डोंगरात लेणी व पायर्या दिसतात. बेडसे गावाला जाणारा फाटा पुढेच आहे. कामशेतवरून अगदीच ८/१० किमीच अंतर आहे. पवनानगर वरून तर फक्त ५/६ किमी असेल. दुचाकीवरून जाण्यासारखेच आहे. रस्ताही चांगला आहे.
23 Feb 2011 - 6:08 pm | धमाल मुलगा
हिंडा...हिंडा गुपचूप! ;)
23 Feb 2011 - 6:20 pm | प्रचेतस
तुम्ही पन चला की वो सायबा.
23 Feb 2011 - 6:20 pm | हेम
वरून २ रा फोटो.... ती काही लेण्यांत भिक्खूंची स्मृतीस्मारके अशीच असतात नां! हीनयान पंथीयांच्या लेण्यांत. कारण अशी भाज्यालाही आहेत, ठाणाळ्यालाही आहेत...
23 Feb 2011 - 6:35 pm | प्रचेतस
अगदी बरोबर. हीनयानपंथीयांची ही लेणी. हे लोक मूर्तीपूजक नव्हते. त्यामुळेच येथे बुद्धप्रतिमाही आढळत नाहीत.
असे लहान स्तूप भंडारा डोंगराच्या पोटात खोदलेल्या लेण्यांतही आहेत.
16 Feb 2012 - 5:59 am | दीपा माने
सुंदर लेणी छायाचित्रे आणि माहीती.
16 Feb 2012 - 6:03 am | ए.चंद्रशेखर
उत्कृष्ट फोटो आणि लेख. खूप आवडला
18 Jun 2014 - 3:11 pm | प्रसाद गोडबोले
एकदा इथे गेलेच पाहिजे आता :)
9 Feb 2018 - 5:53 pm | परिंदा
हर्मिका म्हणजे काय?
9 Feb 2018 - 6:24 pm | प्रचेतस
हर्मिका म्हणजे स्तूपाचे अण्ड आणि छत्र यामधील पायऱ्यापायऱ्याची चौकोनी रचना. बौद्ध धर्मात सात स्वर्गांची संकल्पना असल्याने बरेचदा ह्या हर्मिकांच्या पायऱ्या संख्येने सात आढळतात. हर्मिकेच्या सर्वात वरच्या थरात एक खड्डा असतो, त्यात बहुतकरून बुद्धाचा किंवा बौद्ध धर्मातील प्रमुख गुरूंचा एखादा अवशेष (अस्थी, दन्त, केश इ.) असतो व त्यावर छत्र असते.
9 Feb 2018 - 11:23 pm | अरविंद कोल्हटकर
लेख वाचून २०-२५ वर्षांपूर्वी बेडसा लेण्यांना दिलेली कौटुंबिक भेट आठवली. माझे वृद्ध वडीलहि सर्व पायर्या चढून उत्साहाने लेणी पाहण्यासाठी आले होते. ग्रीक धर्तीचे स्तंभ आणि काही विश्रान्तिकक्ष सोडता अन्य काही आठवत नाही. अन्य लेण्यांमध्ये विश्रान्तिकक्षांमध्ये झोपायच्या उंच जागेवर कोरलेली उशी आणि जमिनीवर सोंगट्या खेळण्याचा पट पाहिला आहे पण येथे तसे काही आहे का हे आठवत नाही.
बेडशातील लेखांचे वाचन बर्जेस-इंद्राजी ह्यांच्या पुस्तकात असे दिले आहे:
बेडसा लेण्यांमध्ये तीन कोरीव लेख आहेत. त्यातील पहिला एका स्तूपामागील शिळेवर कोरला आहे. तो असा आहे:



ह्याचे वाचन:
....य गोभूतिनं आरणकान पैण्डपातिकानं मारकटवासीनं यूपो
....वासिना भतासाळमितेन कारित
(आरणक = संस्कृत आरण्यक = अरण्यवासी, पैण्डपातिक = संस्कृत पिण्डपातिक = भिक्षेवर उपजीविका करणारा, मारकुटवासीनं = ’मार’ नावाच्या (आता विस्मृत) पर्वतावर राहणारा, ह्या सर्व विशेषणांचे आदरार्थी बहुवचन वापरले आहे.)
अर्थ - हा स्तूप गोभूति नावाच्या अरण्यवासी आणि मार पर्वतावर राहणार्या भिक्षूंसाठी xxxवासी भट्टाषाढमित्राने बनविला.
दुसरा चैत्याजवळील पाण्याच्या टाकीजवळ आढळतो.
ह्याचे वाचन:
महाभोयबालिकाय म(हा)देवि-
य महारठिनिय सामडिनिकाय
(दे)यधम आपदेवणकस वितियिकाय-
अर्थ - महाभोजाची कन्या महादेवी (राजकन्या) सामदिनिका, आपदेवणकाची द्वितीय पत्नी हिचा दानधर्म
(महाभोज हा ह्या भागातील कोणी अज्ञात राजा दिसतो.)
तिसरा चैत्याच्या उजव्या बाजूकडील विश्रामकक्षांपैकी (cells) एकाच्या दारावर दिसतो.
ह्याचे वाचन:
नासिकान अनदस सेठिस पुतस पुसणकस दान-
अर्थ: नासिकवासी शेठ आनंद ह्याचा पुत्र पुष्यणकाचे दान-
नासिकचा कोणी दानशूर व्यक्ति प्रवास अवघड असण्याच्या त्या दिवसात इतक्या दूरवर येऊन दान देतो हे लक्षणीय आहे. लोहगड-विसापूरमधील खिंड ही चौल बंदरामधून देशावर जाणार्या व्यापारी मार्गावर होती असे वाचले आहे. नाशिकमधील व्यापार्याला त्या कारणाने अनेकदा ह्या भागामध्ये येजा करावी लागत असणार असा तर्क.
11 Feb 2018 - 4:53 am | एस
बेडसे लेणी ही या लेणीसमूहातील तिन्ही लेण्यांमध्ये माझी सर्वात आवडती लेणी आहेत. लहानशीच, पण अतिशय निवांत आणि शांत असलेली. यातल्या स्तुपावरील लाकडी छत्र अतिशय देखणे आहे. चैत्यगृहाच्या छताच्या लाकडी फासळ्या आता गायब झाल्या आहेत. सुरुवातीच्या पर्सिपॉलिटन शैलीतील खांबांबद्दल अधिक लिहा ही विनंती.
अरविंद कोल्हटकर यांचा शिलालेखांच्या वाचनाचा प्रतिसाद आवडला. माहितीपूर्ण. धन्यवाद सर.
12 Feb 2018 - 8:57 am | प्रचेतस
पर्सिपोलिस हे पर्शियामधील एक शहर, तिकडील स्तंभांच्या शैली इकडील स्तंभांच्या बाबतीत अनुसरण्यात येऊ लागली त्यामुळे त्यांना पर्सिपोलिटन धर्तीचे स्थंभ अथवा पर्सिपोलिटन पिलर्स असे संबोधण्यात येउ लागले.
पर्सिपोलिटन स्तंभ म्हणजे खाली कुंभाकार तळखडा, त्यावर षटकोनी किंवा अष्टकोनी स्तंभ, स्तंभशीर्षावर आमलक, आमलकावर हर्मिकेची उतरती पायर्यांची रचना आणि सर्वात शिरोभागी किचक अथवा बैल, हत्ती, स्वार अशी छताला आधार देणारी रचना. बेडसे लेणीतील स्तंभ ह्यांचे उत्कट उदाहरण आहे. असेच स्तंभ कार्ले चैत्य, नासिक लेण्यांतील गौतमीपुत्र विहार, नहपान विहार, लेण्याद्री येथेही पाहावयास मिळतात.
नाशिक लेणी (लेणी क्र. १०, नहपान विहार)
ह्याच्या व्हरांड्यातील स्टंभ षटकोनी असून स्तंभशीर्षावर हत्ती, सिंह असून मागील बाजूस स्फिन्क्स आणि ग्रिफिन आहेत.
गौतमीपुत्र विहार (लेणी क्र. ३ देवी लेणे)
येथील स्तंभांनाच सातकर्णी स्तंभ असे देखील म्हणतात. हे स्तंभ अष्टकोनी असून तळभागी कुंभ नाही, इतर रचना मात्र पर्सिपोलिटन स्तंभासारखीच.
कार्ले चैत्यातील पर्सिपोलिटन स्तंभ

12 Feb 2018 - 1:39 pm | एस
विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद. बेडसे लेण्यांमधील पर्सिपॉलिटन शैलीतील स्तंभ फारच सुंदर आहेत. विशेषतः त्यांच्या शीर्षभागातील दांपत्यशिल्पे अतिशय सुरेख आहेत.
12 Feb 2018 - 9:41 am | शेखरमोघे
उत्कृष्ट लेख. फोटो आणि माहिती खूप आवडली.