....आणि तरीही मी!
खरे तर सौमित्र यांच्या कवितांचे आकर्षण फार पुर्वी पासुनच आहे. म्हणजे जेव्हापासुन गारवा ऐकले होते तेव्हापासुन त्यांचा पंखा (गारव्यामुळे पंखा झालो ;) ) झालोच होतो. गारवा प्रकाशित झाला तेव्हा नुकतेच मिसरुडे फुटुन महाविद्यालयात दाखल झालो होतो, आणि त्यात असा सुंदर प्रेमकाव्य असलेला अल्बम म्हणजे काही विचारालाच नको. ;) असो.
सौमित्र यांचा '....आणि तरीही मी!' कविता संग्रह काही दिवसांपुर्वी वाचनात आला. आत्तापर्यंत त्याची बरीच पारायणे झाली. यातील प्रत्येक रचना ही खुप तरल आणि स्वाभाविक वाटते. या सर्व कवितांनी मनात घर केले. एक तर गुलजार साहेबांसारख्या माणसाचा सहवास अन् त्यात मनात ठासुन भरलेली संवेदनशिलता. गुलजार साहेबांच्या शैलीचा पगडा या सर्व कवितांवर जाणवतो पण फक्त स्पर्शुन गेल्यासारखा. सौमित्र यांची स्वःताची अशी जी एक शैली आहे तिची पकड कुठेही सैल झाल्यासारखी वाटत नाही.
या संग्रहात अनेक प्रकारच्या रचना आहेत. काही खुप अस्वस्थ करतात, काही चटका लावुन जातात, काही अगदी अंगावरच येतात, तर काही एक अतुलनीय अनुभुती देऊन जातात. या कविता संग्रहाला कवीवर्य शंकर वैद्य यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांचे या संग्रहाबद्द्लचे विचार इथे उधृत करण्याचा मोह आवरत नाही.
"सुखद प्रेमानुभावाच्या छटा, कौटुंबिक परिसरातील वात्सल्य, निसर्गाशी तन्मय होऊन लाभलेला सुखशांतीचा आनंद हे भाव या कवितांतून प्रकटलेले आहेत. सौमित्र यांचे कवितेसंबंधीचे प्रेम आणि तिच्याशी असलेले त्यांचे प्राणाइतके जवळचे नाते त्यंच्या अनेक ओळींतुन प्रकटलेले आहे. त्याचबरोबर त्यांच्या कवितांत एकरुपतेने मिसळून गेलेले अनेक थोर चित्रकार, लेखक, कवी यांचे संदर्भ पाहीले कि, विविध कलांसंबंधी जागरुक असलेल्या कवी सौमित्र यांच्या कलात्मक व्यक्तिमत्वाची ओळख पटते."
यातील काही रचनांचे रसग्रहण इथे देतो आहे.
पहीली मला अत्यंत आवडलेली रचना म्हणजे "पावसाचे पोट्रेट्स" ही.
पावसाचे पोट्रेट्स
काल,
चिंब भिजलेला कॅनव्हास म्हणाला,
'तु पहीला चित्रकार
आम्हांला पावसात भिजायला नेणारा'
रंगानी घट्ट बांधून ठेवणार होतो कॅनव्हासवर
हा माझा शेवटचा पावसाळा...
रंग थांबले नाहीत.
कॅनव्हासवरून निथळून गेले पावसामागे...
आज,
एकटाच बाहेर पडलोय...
आज दिशादिशांमधे पावसाला बसवून ठेवीन.
आणि डोळ्यांत साठवून घेईन म्हणतो...
पावसाचे पोट्रेट्स
चित्रकारीता आणि काव्य यांचे इतके सुंदर मिश्रण माझ्यातरी पाहण्यात या रचनेशिवाय इतर कुठेही आलेले नाही. काल आणि आज मधे सरलेल्या काळात घडुन गेलेले स्थित्यंतर अगदी ठळकपणे जाणवते आहे. कॅनव्हासचे 'हा माझा शेवटचा पावसाळा' म्हणणे आणि कविचे 'आणि डोळ्यांत साठवून घेईन म्हणतो... पावसाचे पोट्रेट्स' म्हणणे या दोन स्वभाविक प्रतिक्रिया आहेत. मुळात पावसात उभे राहुन पावसाचेच पोट्रेट रंगविण्याची कल्पनाच भन्नाट आहे. 'रंग थांबले नाहित. कॅनव्हासवरुन निथळुन गेले पावसामागे' या मागची व्यथा अस्वस्थ करुन जाते.
यासारखीच अजुन एक रचना विशेष लक्ष वेधुन घेते.
अजून कळलेलं नाही
संध्याकाळ
समुद्र...
मध्यरात्र....
उत्तररात्र...
जागरण...
दुपार....
पाऊस...
अशा साध्या साध्या गोष्टींचं....
काय करावं...
ते अजून कळलेलं नाहीयै मला.....
किती साधे शब्द आणि शेवटच्या एकाच ओळीने वरील सर्व शब्दांची परीणामकारकता एका प्रचंड उंचीवर नेऊन ठेवते. शेवटची ओळ वाचल्यानंतर संध्याकाळची हुरहुर, समुद्राची अथांगता, मध्यरात्रीची तगमग, उत्तररात्रीची अगतिकता, जागरणामागची असहाय्यता, दुपारची लाही, पावसात भिजतांना उमलणार्या भावना हे सग्गळ झटकन जाणवून जाते. हि शब्दांची ताकद थक्क करणारी आहे. आणि इथेच सौमित्र यांचा वेगळेपणा दिसतो.
अशीच एक अगदी अंगावर येणारी रचना पहा. जरा लांबलचक आहे पण एकदा वाचाच.
हार्ट सर्जरी
माझ्या काही अटी होत्या...
ऑपरेशन सुरु असतांना
माझा कवी मित्र
ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित हवा...
मला अॅनेस्थेशियात टाकलं जाऊ नये...
माझ्या आवडत्या कवींच्या कविता
ऑपरेशन सुरु असतांना मित्राला म्हणू द्याव्यात...
माझ्या छातीवरचे केस काढले गेले...
मी उताणा...
वर मोठ्ठा लाईट....
बाजूला ऑक्सिजन सिलिंडर्स...
चकचकीत शस्त्रास्त्रं....
पांढरे अॅप्रन्स.....
पांढरे रबरी हॅण्डग्लोज घातलेले डॉक्टर्स.. नर्सेस...
उशाला कॉम्प्युटराईज्ड टी. व्ही.
त्यावर आडव्या-तिडव्या रेषेत धावणारा बिंदू....
हा माझा श्वासोच्छवास म्हणे...
टी. व्ही. वर बघूनच त्यांची फ्रिक्वेन्सी कळ्ते....
(साले... ऑपरेशन करणार आहेत
की टी. व्ही. बघत बसणार आहेत...)
'ऐलतटावर-पैलतटावर हिरवळी घेऊनी
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुनी'
मित्राने कविता सुरु केली...
डॉक्टरांनी छातीत सुरी खुपसली...
वरचं मांस कापून बाजूला केलं....
फासळ्या ड्रिल करुन मोकळ्या केल्या....
धडक....धडक....धडक....धडक....धडक....
त्यांना दिसला लाल रंगाचा मुठीएवढा गोळा...
माझ्या डोळ्यात कॄतज्ञता उतरली....
हो सालं...
नाहीतर... आजकाल कोण इथपर्यंत पोहोचतो....
'सीझर' डॉक्टर म्हणाले....
अगदी अलगद हृदयात खुपसून....
ते हृदय कापू लागले....
चुळ्ळ्कन रक्तांचं कारंजं उडालं.....
जमिनीवर लाल थारोळ....
'झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
जळात बसला पाय टाकुनी असला औदुंबर'
मित्र आता डोळे मिटुन कविता म्हणत होता.
मोडकळीस आलेल्या घराची झडप डॉक्टरांनी उघडली...
आणि अचानक काही प्रेतं बाहेर पडली....
पैकी...
फक्त दोघांची ओळख पटली
एक माझ्या जुन्या मित्राचं होतं...
आणि दुसरं होत माझ्या प्रेयसीचे.....
ही प्रेतं माझ्या नकळत मी का वाहत होतो?
इतक्यात....
एक, दोन, पाच, वीस, पंचवीस.. अरे?
जिवंत माणसांचे कळपच्या कळप
माझ्या हृदयातुन बाहेर पडुन सैरावैरा पळू लागले...
जणू इतकी वर्षं बळजबरीनं
मीच त्यांना कोंडून ठेवलं होतं....
हळूहळू....
माझ्या रक्तात माखलेल्यांनी...
सारं ऑपरेशन थिएटर भरुन गेलं...
रोगी दगावेल म्हणून
त्यांच्यातून वाट काढत
डॉक्टर बिघाड शोधत होते....
'ही अफाट गर्दी कोलाहल कल्लोळ
आश्चर्य! अरे बघ गेला याचा तोल...'
तशातही...
मित्र कविता म्हणतच होता....
'दे विश्ड दे कुड फ्लाय अवे
अँड नॉट सिंग बाय माय हाऊस ऑल डे...
अँड अफकोर्स देअर मस्ट बी समथिंग राँग
इन वाँटींग टू सायलेन्स माय साँग...'
शेवटी सारे निघून गेलेत....
कच्चे टाके घातलेलं हृदय घेऊन मी पडलोय...
संपूर्ण रिकामा झालोय...
हा रितेपणा मला वेडही लावील....
म्हणूनच.....
मी उद्या राजस्थानच्या रेताड प्रदेशात जाणार आहे....
कच्चे टाके उसवून...
हृदयात खचाखच रेती भरुन घेणार आहे...
उरलेल्या सर्व वर्षांपूरती
आता, माणसांची वाट पाहण्यात अर्थे नाही....
आता, या क्षणी मला काहीच जाणवत नाही आहे....
पण,
कुठुन तरी, कुणीतरी डेस्परेटली गातोय....
'वुड्ज आर लव्हली डार्क अॅण्ड डीप
अॅण्ड आय हॅव प्रॉमिसेस टू कीप
अॅण्ड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप
अॅण्ड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप...'
आता ही एवढी मोठ्ठी रचना टंकायचे कष्ट घेण्याचे कारण, या रचनेचा वेगळेपणा आणि अर्थातच अर्थपूर्णता. या रचनेला प्रचंड वेग आहे. एकदा वाचायला सुरवात केल्यावर तुम्हाला थांबताच येत नाही. फक्त एकच अनपेक्षित स्पिडबेकर आहे आणि तो म्हणजे:
'हो सालं...
नाहीतर... आजकाल कोण इथपर्यंत पोहोचतो.... '
इथे तुम्ही नक्की थबकला असाल आणि अनाहूतपणे एक 'व्वाह' निसटला असेल. आणि कल्पना नसतांना आलेल्या स्पिडबेकरवरुन जशी गाडी सरकतांना जमिनीपासून १ फुट उडते तसं काहीतरी झाले असेल. पण त्यानंतर ही रचना तुम्हाला थांबण्याची अनुमती देतच नाही. सतत पुढे काय होणार याची उत्कंठा तुम्हाला पुढे वाचण्याशिवाय पर्याय ठेवत नाही. नाट्यप्रवेशाच्या घडणीच्या माध्यमातून हा काव्यानुभव उभा केलेला आहे. यात दिसणारी संवेदनशीलता कुठल्याही सहृदय माणसाला अस्वस्थ करणारी आहे यावर दुमत नसावे.' हृदयात अडकलेली प्रेतं ' हे रुपक मनावर एक खोल आघात करुन जातं. माणूस नकळत किती आणि कुठल्या गोष्टींचे ओझे वाहत असतो आणि हे ओझे एका विविक्षित क्षणी किती त्रासदायक ठरु शकते हे कोणाला सांगता येईल? हि रचना वाचतांना मनात उठणारे तरंग आणि वाचून झाल्यानंतर उमटणारी एक अतृप्ततेची भावना यातच या रचनेचे सारे श्रेय सामावलेले आहे.
आता इथेच थांबतो. याच संग्रहातल्या अजून काही रचनांचे रसग्रहण करुन लवकरच मांडण्याचा मानस आहे.
(हा माझा पहीलाच प्रयत्न आहे असे लेखन करण्याचा. काही चुकलं असल्यास जरुर सांगावे. शिवाय आपणापैकी कुणी हा कविता संग्रह वाचला असल्यास वरील रचनांवर आपले मत जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.)
प्रतिक्रिया
23 Mar 2011 - 6:15 pm | अविनाशकुलकर्णी
काव्य बंबाळ
23 Mar 2011 - 6:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
माझा लेख मी प्रकशित केला
आणि आपली प्रतिक्रिया आली
फक्त २ मिनीटात वाचुन काव्य बंबाळ?
23 Mar 2011 - 6:22 pm | प्रचेतस
ते अविनाश कुलकर्णी आहेत. नुकताच त्यांनी रजनीकांतचा चष्मा विकत घेतल्याचे समजले होते.
23 Mar 2011 - 8:40 pm | टारझन
ह्यात आमच्या अविणाश कुलकर्ण्यांचं वर्ष भराचं लेखन झालं असतं :) बंबाळणारंच ते :)
=))
- छोटा खल्ली
23 Mar 2011 - 7:26 pm | गणेशा
अतिशय सुंदर लिहिले आहे तुम्ही ..
थोडेशे अवांतर :
जेंव्हा कविता म्हणजे काय असते अशी अवस्था असताना पहिल्यांदा हे पुस्तक हातात आले होते .. कवितेचे मी पाहिलेले पहिलेच पुस्तक म्हणजे हेच ... तेंव्हा २५० रुपयाला असल्याने नव्हते घेतले ..
पण हळुच असेच मधोमध उघडले ..
पान नं होते ६९ .. त्यावरील कविता खरेच खुप मनात घर करुन गेली ...
जेंव्हा कामाला लागलो तिसरा पगार झाला तेंव्हा हे पुस्तक मी विकत घेतले .. आधी पान ६९ वाचले आणि मग सगळे ...
माझ्याकडे मुंबई मध्ये हे पुस्तक नाहिये .. तुमच्या कडे असेल तर येथे ती कविता द्या ना ... कविताच्या भावना मनात असल्या तरी शब्द अस्पष्टशे झाले आहेत ...
तुमच्या मुळे आठवल्या या पुस्तकाच्या आठवणी .. धन्यवाद..
पावसाचे पोट्रेट्स पण माझी एक आवडती कविता .. लिहितो जमल्यास ..
पण तुम्ही लिहिले आहेच
फक्त एक बदल सांगु इच्छितो ,
'हा माझा शेवटचा पावसाळा...' आणि ' आणि डोळ्यांत साठवून घेईन म्हणतो... पावसाचे पोट्रेट्स'
ह्या दोन्ही ओळी कवीनेच म्हंटल्या आहेत ... कॅनव्हास ने हा माझा शेवटचा पावसाळा असे म्हंटलेले नाही.
बघा एकदा असे वाचुन अजुन खोल अर्थ तुम्हाला सापडेल ..
अवांतर : कवी ग्रेसच्या एका कवितेचे रसग्रहन केले होते ते आठवले .. देइन लवकर ...
23 Mar 2011 - 6:57 pm | शुचि
"हार्ट सर्जरी" कविता अफलातून आहे. किती सुंदर कल्पनाविलास. धन्यवाद काव्यप्रेमी ; आपल्यामुळे ही अनवट कविता वाचायचा योग आला.
"अजून कळलेलं नाही" सुद्धा सुंदर कविता . पण ही वाचताना, मनात एक प्रश्न येतो प्रत्येक गोष्टीचं काही करावं असं मुळी असतच का? Haven't we human beings ceased from "Being" human beings & become "human doings?"
लिहीत रहा. छान लिहीता.
23 Mar 2011 - 7:02 pm | नगरीनिरंजन
कवितांमधला आशय आणि कल्पनाविलास चांगला आहे! सध्याच्या फ्याशन प्रमाणे कविता छंद आणि आकृतीबंध रहित आहेत. त्यामुळे वाचल्यावर छान असा उद्गार निघतो, "अहाहा!" असा नाही.
23 Mar 2011 - 7:40 pm | प्राजु
चांगलं लिहिलं आहे.
मात्र एक असं.. की सौमित्र यांच्या सगळ्याच कविता मला आवडत नाहीत.. काही अतिशय उच्च आहेत तर काही..... जाऊदे!! असो..
23 Mar 2011 - 10:50 pm | कवितानागेश
छान ओळख.
24 Mar 2011 - 7:55 am | ५० फक्त
कविता हा तसाही माझा प्रांत नाही, पण गारवा मधलं किशोर कदमांच्या आवाजातलं निवेदन मात्र अतिशय भावलं होतं कधी काळी.
मिकाप्रे, तुमचं विवेचन पण छान झालंय. लिहा अजुन लिहा, आमच्या डोक्यात पण काहितरी प्रकाश पडेल.
24 Mar 2011 - 11:28 am | हरिप्रिया_
मस्त लिहिला आहे लेख.
"हार्ट सर्जरी"कविता तर खूपच आवडली.
नक्की सौमित्रच्या कविता मिळवून वाचायला आवडतील.
अजुन येवू दे..