हल्ली बाजारात सगळीकडे 'हेल्थ फूड्स ' ची धूम आहे. जिथे बघावं तिथे 'कोलेस्टेरोल फ्री' , 'फायबर रिच', 'शुगर फ्री', 'लो कॅल' इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी 'unhealthy' समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा 'देवकृपेन' जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ. पण जर हे सगळे 'हेल्थ फूड्स' खरंच एवढे हेल्थी असते, तर मग जागतिक आरोग्य संघटनेन सगळ्यांचाच आहारात अमुक अमुक टक्के ह्या फूड्स चा समावेश असलाच पाहिजे असेच फर्मान नसते का काढले? ठीक आहे. अगदी एवढ्या टोकाला पण नको जाऊया. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये अश्या लाखो 'हेल्थ फूड' कंपन्यांनी गेल्या २० वर्षात खूप प्रगती केली आहे (शेयर मार्केट मधे) पण तरी त्या देशातल्या लठ्ठ लोकांची संख्या कमी झालेली नसून वाढलीच आहे. आणि आता हेच आपल्याही देशात घडतंय. कारण, मानसशास्त्रासंबंधीच आहे. अमेरिकेतच झालेल्या एका अध्ययनाप्रमाणे, 'हेल्थी' लेबल असलेले पदार्थ, इतर पदार्थांच्या प्रमाणात जास्त खाल्ले जातात आणि म्हणून त्या हेल्थ फूड मधून मिळणाऱ्या कॅलोरीस चं प्रमाण बरंच वाढून लोकं उलट आणि लठ्ठ होतात.
एक साधं उदाहरण घेऊया. एका डायेट जागरूक व्यक्ती समोर फ्रेंच फ्राईस किंवा बटाट्याची भजी आणि बेक्ड हेल्थ snack ठेवलं तर ते हेल्थ snack घेतील? ठीक आहे. आता जर फक्त पहिले दोन विकल्प असते तर त्यांनी काय केलं असतं? जर खरंच हेल्थ कोन्शिय्स असतील तर बहुदा ५ फ्रेंच फ्राईस किंवा २-३ भजी खाल्ली असतील. पण ह्याच व्यक्तीने त्या हेल्थ snack चा अर्धा पुडा फस्त केला असता.असे का? कारण त्याला कुणीतरी कुठलंतरी हेल्थ लेबल लावलेलं होतं. ह्याचा अर्थ हा नाही कि ते तुम्हाला फसवतायेत. पण आपणच त्या हेल्थी नूडल्स च्या पाकिटावर 'makes two servings' हे छापलेलं न वाचता ते माणशी एक पाकीट असं खातो. आणि अश्या वेळी तो 'हेल्थी' लेबल असलेला पदार्थ आपल्या आरोग्याला हानिकारक ठरतो.
प्रतिक्रिया
5 Mar 2011 - 9:49 am | विलासराव
पटतय.
5 Mar 2011 - 9:57 am | सहज
पण अजुन सविस्तर माहीती जसे - व्हिट फ्लार व होलविट फ्लार सारखा नेमका फरक, एकंदर पोर्शन कंट्रोल, हेल्थ फूड सेक्शन मधील अनेक पर्यायातील बरा - वाईट कसा निवडावा, एकंदर प्रोसेस फूड व होल फूड इ इ . जरुर द्या.
5 Mar 2011 - 10:16 am | सूर्य
थोडे अजुन सविस्तर हवे होते. २-३ भजी (किंवा रोज थोड्या प्रमाणात खाल्लेले अनहेल्दी फूड) चालते का?
- सूर्य
5 Mar 2011 - 12:23 pm | पिंगू
कुठलाही पदार्थ प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यावर तो अनहेल्थीच ठरतो. मग तो कुठलाही पदार्थ का असेना.
- (मोजून मापून खाणारा खवय्या) पिंगू
5 Mar 2011 - 3:04 pm | कच्ची कैरी
माहीतीपूर्ण लेख .तुमचे माहितीपूर्ण लेख अजुन वाचायला आवडतील स्सो कीप रायटींग :)
>> त्या हेल्थ फूड मधून मिळणाऱ्या कॅलोरीस चं प्रमाण बरंच वाढून लोकं उलट आणि लठ्ठ होतात.
अरे बापरे !मला तर अजुनपार्यंत कुणीही उलट आणि लठ्ठ लोक दिसली नाहीत ;)
5 Mar 2011 - 5:23 pm | स्वाती२
चांगला लेख. एकंदरीतच पदार्थ जेवढा टिकाऊ तेवढा तो आरोग्याला अपाय कारक असे प्रोसेस्ड फूडच्या बाबतीत समजावे. अशा प्रकारच्या बहुतेक पदार्थांची चव ही फॅट, साखर, मीठ आणि इतर आर्टिफिशल फ्लेवरिंग मुळे असते. साहजिकच जेव्हा लोफॅट म्हणतो तेव्हा साखर किंवा मीठाचे प्रमाण वाढवलेले असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपली मानसिकता. त्यामुळे मल्टीग्रेन, लोफॅट, होलग्रेन, बेक्ड, हार्ट हेल्दी वगैरे लेबल्स पाहूनच आपण भुलतो. अगदी खाकर्यासारखा पारंपारीक पदार्थ देखील जेव्हा प्रोसेस्ड फूड बनुन येतो तेव्हा फ्लेकी पॅस्ट्री इतकाच तेलकट असतो. ज्युस, फळ घातलेले दही वगैरे हेल्दी वाटणार्या पदार्थात भरपूर साखर घातलेली असते. पण आपले डोके योगर्ट विथ फ्रुट हे हेल्दी आणि श्रीखंड अनहेल्दी ठरवुन टाकते. म्हणुनच लेबल्स ना न भुलता पाकिटावरचे न्युट्रेशनची माहिती वाचायची सवय लावावी.
5 Mar 2011 - 9:38 pm | सर्वसाक्षी
................'बनविणार्यां'साठी आणि विकणार्यांसाठी.
मध्यंतरी असे वाचनात आले की आजकाल 'शर्करामुक्त' (मराठीत शुगरफ्री म्हणतात ते) म्हणुन जे काही विकले जाते त्याचे दुष्परीणाम पाहता साखरयुक्त पदार्थ कमी अपायकारक ठरावेत.
5 Mar 2011 - 10:55 pm | निनाद मुक्काम प...
बाकी आपण म्हणता त्या मुद्यात दम आहे .
ह्यावर अजून वाचयला आवडेल
रोजचे सूर्यनमस्कार / नियमित व्यायाम असेल तर सामान्य जेवण सुद्धा चालू शकेन .( उगाच परदेशी खुळे अंगिकारू नये )
सणासुदीला ज्या शुगर फ्री मिठाया येतात त्यात सामान्य मिठाया पेक्षा जास्त उर्जा असते .
मिठाया ह्या वजनावर विकल्या जातात .
त्यातील जर साखर कमी केली तर तिच्या जागी खवा /मावा इतर पदार्थ भरले जातात .पर्यायाने अधिक केलेरीज
6 Mar 2011 - 12:23 am | शिल्पा ब
लेबल वाचायला शिका....मुख्य म्हणजे घरीच काय ते बनवुन खात जा...बाहेर कशाला लसलस करायची?
6 Mar 2011 - 1:06 am | नेत्रेश
> अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये अश्या लाखो 'हेल्थ फूड' कंपन्यांनी गेल्या २० वर्षात खूप प्रगती केली आहे (शेयर मार्केट मधे) पण तरी त्या देशातल्या लठ्ठ लोकांची संख्या कमी झालेली नसून वाढलीच आहे.
अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये हेल्थ फुड हे खुप महाग असते. अगदी चांगली कमाई करणार्या मध्यमवर्गीयांना सुध्धा ते महाग पडते. बर्गर, पिझ्झा, फ्राईड चिकन, फ्रेंच फ्राईज, पेप्सि-कोक असे अन्-हेल्दि पदार्थ खुप स्वस्त असतात, सर्वत्र सहज उपलब्ध असतात. त्यांचि चवही अॅडिक्टीव्ह असते. त्यामुळे बरेच गरीब आणी निम्नवर्गिय लोक यावर गुजराण करतात. अशा अन्-हेल्दि खाण्यामुळे त्यांचे वजन बेसुमार वाढते, आणी जंक फुडच्या अॅडीक्शन मुळे वाढतच रहाते.
घरी बनविलेले हेल्दि फुड हे मॅकडोनल्डस, केएफसी मध्ये मिळणार्या जंक फुड पेक्षा स्वस्त पडत नाही. जेव्हा पती पत्नी दोघेही मिनीमम वेजेसवर काम करतात तेव्हा घरी जेवण बनवणेही नेहमिच शक्यही नसते. हेच कारण आहे की अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये लठ्ठ लोकांची संख्या वाढतच आहे.
6 Mar 2011 - 4:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>घरी बनविलेले हेल्दि फुड हे मॅकडोनल्डस, केएफसी मध्ये मिळणार्या जंक फुड पेक्षा स्वस्त पडत नाही.
टोटल असहमत. घरी बनवलेले कुठलेही खाणे, त्याच्याशी मिळत्याजुळत्या जंक फूड पेक्षा ९९% वेळा स्वस्त पडले पाहिजे, असे माझे आजवरचे निरीक्षण आणि तर्कशास्त्र सांगते.
छोटीशी आकडेवारी सांगायची झाली तर,
अमेरिकेत एक बर्गर साधारण $५-$६ ला पडतो असे गृहीत धरू.
घरात चार माणसे आहेत असे गृहीत धरू.
हे कुटुंब दिवसातून दोनदाच खाते (लंच आणि डीनर) असे गृहीत धरू.
या कुटुंबाचा दिवसाचा जंक फूड चा खर्च वरील गृहीतकांतून $४०-$५० पडेल. घरात नक्की काय हेल्दि फुड बनवले तर इतका खर्च येतो, हे मला कळत नाही आहे. यात चार माणसांचे आठवड्याचे वाण सामान आले पाहिजे असा अंदाज आहे. चूभूद्याघ्या
7 Mar 2011 - 4:48 am | नेत्रेश
अमेरीकेल मॅकडोनल्ड मध्ये चिजबर्गर, मॅक डबल, बिग मॅक हे १ डॉलर किंवा कमी किमतीत मिळतात. त्यामुळे ४ जण ८ ते १० डॉलर मध्ये १ वेळा आरामात जेवतात. अमेरीकेतील सर्व फास्टफुड चेन्सच्या रेस्टॉरंट मध्ये डॉलर मेन्यु असतोच. टॅकोबेल सारख्या रेस्टॉरंट मध्ये तर अर्ध्या डॉलरचेही पदार्थ असतात. या सर्व पदार्थात बीफ/पोर्क आणी चिज असते, त्यामुळे ते खल्ले की परत लवकर भुक लागत नाही.
तेच पिझ्झाच्या बाबतीत. विकतचा फ्रोझन / फ्रेश पिझ्झा हा घरी तयार केलेल्या पिझ्झ्यापेक्षा नेहामीच स्वस्त आणी चविला चांगला असतो.
मॅकडोमाल्ड तोच बर्गरचा मेन्यु घरी बनविण्यासाठी किमान १५ ते २० डॉलर चे नुसते सामानच लागेल. करण्याचा त्रास, गॅस, डिशवॉशर ईत्यादी पकडुन आरामात ३ पट खर्च येतो.
आता हेल्द-फुड बघायला गेलात, लीन मीट अत्यंत महाग असते. ऑरगॅनिक फुड (जास्त हेल्दी) हे तशाच रेग्युलर फुड पेक्षा २ ते ३ पट महाग असते. असे हेल्द-फुड संपुर्ण घरी बनवणे मध्यम वर्गीयांनाही परवडत नाही, गरीबांना तर अजीबातच परवडत नाही. बाहेरचे जंक-फुड हे नेहमीच स्वस्त आणी कन्व्हीनीयंट असते, जे गरीबांना अती लठ्ठ बनवते.
9 Mar 2011 - 6:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>अमेरीकेल मॅकडोनल्ड मध्ये चिजबर्गर, मॅक डबल, बिग मॅक हे १ डॉलर किंवा कमी किमतीत मिळतात. त्यामुळे ४ जण ८ ते १० डॉलर मध्ये १ वेळा आरामात जेवतात
अहो तो डॉलर मेन्यू काय पुरणार जेवणाला? खरंच नाही पुरत. अगदी त्यात बीफ असले तरीही. छोटुसा असतो. सबवे चा ६ इंची सब पण नाही पुरत जेवणात.
आणि मुळात घरी पण तसेच खायचे असेल तर ते ही जंकच झाले की. बाकी मुद्दे खाली स्वाती२ यांनी मांडले आहेत तेच. घरी चांगले अन्न बनवण्यापेक्षा वारंवार बाहेर खाणे हे आळस (आणि थोडा माज) याचे लक्षण आहे.
(या निमित्ताने रेडी-टू-इट वर काही महिन्यांमागे झालेली उद्बोधक चर्चा आठवली)
6 Mar 2011 - 6:36 pm | स्वाती२
मुळात सो कॉल्ड 'हेल्थ फूड' आणि हेल्दी फूड या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यातील घरगुती, आरोग्याला चांगले जेवण अगदी अमेरिकन पद्धतीचे बनवायलाही जास्त खर्च येत नाही. पण बहुतेक गरीब लोकांना एक तर असे जेवण घरी बनवता येते हेच माहित नसते शिवाय जोडीला आळशी, उनाड वृत्तीही काही अंशी कारणीभूत असते. लहानपणापासून एकदा का जीभेला अतिरिक्त मीठ,साखर असलेले आयते पदार्थ खायची सवय लागली की घरगुती जेवण आवडेनासे होते. माझा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीत गरीब वस्तीत शिकवायला जातो. तिथे येणारी मुले सुरवातीला साधे पाणी प्यायलाच तयार नसतात. एवढेच नाही तर त्यांना अतिरिक्त साखर नसलेला ऑरेंज ज्युसही आवडत नाही. अगदी ८-९ महिन्याची असल्यापासुन या मुलांना साखर घातलेल्या सरबतांची सवय लागलेली असते.
इथे शाळा, हॉस्पिटल आणि इतर संस्थामधुन कमी पैशात, कमी वेळात घरच्या घरी पोषणमुल्य असलेले जेवण कसे बनवावे याचे मार्गदर्शन मिळते. पण असे जेवण बनवण्यासाठी जे नियोजन करावे लागते ते करण्याची बर्याच जणांची तयारी नसते.
फास्ट फूड वाले जरी वॅल्यु मिल, डॉलर मेन्यु देत असले तरी प्रत्यक्षात हे जंक फूड बनवायला जेमतेम २५ सेंट्स खर्च आलेला असतो. साधे पाण्याचे उदाहरण- पाण्याची बाटली वेंडिंग मशिन मधून आयत्या वेळी घेतली तर डॉलर जातो. तेच ग्रोसरी स्टोअर मधून एकदम २४ बाटल्यांची केस घेतली तर ३.९९ ला, कुपन वापरले तर २.९९. घरुन फिल्टर केलेले पाणी ....हे असेच इतर गोष्टींच्या बाबत चालते. इथेही चांगल्या घरातील लोक शनिवार-रविवारी आठवड्याच्या जेवणांची पूर्वतयारी करणे, काही जेवणे फ्रीज करुन ठेवणे वगैरे करतात आणि कमी पैशात चांगला आहार घेतात.
7 Mar 2011 - 4:44 am | नेत्रेश
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण त्यामध्ये अजुनपर्यंत त्यांनी अंगीकारलेली (अन्-हेल्दी) जीवनपद्धती बदलणे अपेक्षीत आहे. हे बदल वयाच्या ३० - ४० वर्षांनंतर करणे हे तीव्र ईच्छाशक्तीशीवाय जमणे अशक्य आहे. आणी आळशी / अतीव्यस्त लोकांना हे शक्य होत नसावे. ही जीवनपद्धती लहानपणापासुन स्विकारलेल्या प्रामुख्याने ग्रामीण, लहान शहरातील लोकांमध्ये हे अती लठ्ठपणाचे प्रमाण नगण्य आहे.
पण माझा मुद्दा हा ईतकाच आहे की ईथल्या लोकांना स्वस्त जंक-फुडचा पर्याय सहज उपलब्ध असल्यामुळे ते हेल्दी फूडकडे दुर्लक्ष करतात आणी अती लठ्ठपणा ओढाउन घेतात.
21 Nov 2011 - 8:31 pm | आनंदी गोपाळ
वजन किति?
7 Mar 2011 - 5:23 am | अभिज्ञ
लेख अजून सविस्तर हवा. अन चर्चा देखील अमेरिकन जंक फुड इतपत मर्यादित नसावी.:)
तसेच हेल्थ फुड अन हेल्दी फुड नक्की फरक उमजला नाही.
ह्या विषयावर अजून माहिती वाचायला उत्सुक.
अभिज्ञ.
7 Mar 2011 - 10:03 am | वपाडाव
या ठिकाणी मी "५० फक्त" यांच्या स्वाक्षरीतील एक वाक्य ढापुन टाक्तोय,
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत.
8 Mar 2011 - 6:20 pm | खादाड अमिता
तुमच्या एवढ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
पुढे प्रत्येक विषयावर उ. दा. 'शुगर फ्री', 'लो कॅल' 'झीरो कोलेस्तेरोल' ई. सविस्तर लेख लिहिणार आहे.
21 Nov 2011 - 8:32 pm | आनंदी गोपाळ
'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' अशी पाटी रस्त्याच्या कडेला बर्याचदा वाचली आहे. २ घास कमी खाणे हा वजन घटवायचा सर्वोत्तम उपाय आहे.
21 Nov 2011 - 8:41 pm | पैसा
गाडी न वापरता "रस्त्याच्या कडेने चालत रहाणे" हा पण दुसरा उपाय आहे.