यूं तो है हमदर्द भी... (३)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
4 Jan 2011 - 2:47 am

या आधीचे कथा भागः आणि

************
....आईंसाठी तो शेजारच्या इमारतीतला flat ही पाहून झाला, त्यांना तो आवडल्याचं त्यांनी सांगितल्यावर सगळेच खूष झाले.
************

परत निघतांना पद्माला एकदमच पुन्हा थकल्यासारखं, ग्लानी आल्यासारखं वाटू लागलं. म्हणून त्या संध्याकाळी न निघता दुसर्‍या दिवशी सकाळी सगळे परत निघाले. आई-नानांचे डोळे भरून आले, आई म्हणाली, "काळजी घे गं बाई, आई आहेतच, आणि संजय विचारेलच लिमये डॉक्टरांना, पण तूही जरा आता विश्रांती घे चांगली आठवडाभर, संपदाच्या मागे नाचू नकोस." "काही होत नाही गं," नाना म्हणाले "ठणठणीत होत्येय बघ ती चार दिवसांत. पुढच्या रविवारी येतोच आहोत आम्ही तिकडे." "या नक्की, नाना," संजय म्हणाला, "तो पर्यंत करतो तिला भक्कम!" संजयच्या आईनी पद्माच्या आईंच्या पाठीवर हात फिरवला, "काही काळजी करू नका हो, मी आहे ना. शीण झाला असणार प्रवासाचा, थोडा का आहे तो शिकागो-मुंबई प्रवास? आणि आल्यापासून सारखी रीघ लागली आहे लोकांची, आता चार दिवस कुणाला येउच देत नाही मी, म्हणजे होईल रिकव्हर ती." नेहाच्या मिठीतून संपदाला कसंबसं सोडवून दादरकर मंडळी गाडीत बसली. सर्वांना हात करून झाल्यावर वळण घेऊन गाडीने ब्राम्हण सोसायटी सोडली, आणि मागच्या सीटवर मध्ये बसलेल्या पद्माने सीट च्या पाठीवर मान टेकवली. शेजारी बसलेल्या संजयने तिच्या कडे पहात तिला विचारलं "खूप त्रास होतोय का?" पद्मा ने मुक्याने नाही म्हंटलं. पलीकडे बसलेल्या आईनी तिच्या कपाळावर हात ठेवला, किंचित ताप होता. आई म्हणाल्या, "ताप वाटतोय, काचा बंद कर. आणखी तास लागेल या ट्रॅफिक मधून पोहोचायला, झोपू देत तिला."
************
पद्मा आणि संपदा जरी अडीच महिने राहणार असले तरी संजयच्या परतीच्या फ्लाईटला दोनच आठवडे उरले होते, म्हणून लवकर सर्व परीक्षा करून घेतलेल्या बर्‍या असा विचार करून पुढच्या आठवड्यात डॉ. लिमयांच्या सल्ल्याने आधी एका गायनेकॉलॉजिस्टना दाख॑वलं, आणि त्यांनी काही काहीही स्त्रीरोग नाही म्हंटल्यावर एका एम डी infectious disease specialist ना पद्माला दाखवून घेतलं. त्यांनी आणखी बर्‍याच टेस्ट्स करवून घेतल्या, टी बी, मलेरिया, टायफोईड, याच नव्हे तर अगदी एड्स सकट इतरही अनेक बऱ्याच खर्चिक PCR टेस्ट्स ही. एकापाठोपाठ सर्व निगेटिव्ह आल्या. अगदी CT scans, MRI, bone scans, endoscopy, colonoscopy, ultrasound सकट सर्व परीक्षा झाल्या. अगदी cancer ची शंका नको म्हणून अन्नमार्गाच्या अंतर्भागाची biopsy देखील करून झाली. कशांतच काही निदान झालं नाही. ताप बरेचदा आपोआप उतरायचा काही तासांनंतर, पण थकव्याची तक्रार आणि पोट दुखणं काही कमी होईनात. तिची घालमेल आणि चीडचीड पाहून संजयचाही विरस व्हायचा, घरी सुटीवर आल्याचं सुख बाजूलाच राहिलं, संपदाला कुठे भटकवणंही जमलंच नाही.

संजयला निघायला दोनच दिवस उरले असतांना लिमयांनी शेवटी डॉ. वैशाली गानू या प्रसिध्द्ध rheumatologist कडे पाठवलं. त्यांची पंधराच मिनिटांची appointment कशीबशी मिळाली कारण त्या फक्त दोनच दिवस पुण्याहून मुंबईला हिंदुजा हॉस्पिटलला यायच्या. प्रसन्न चेहेऱ्याच्या पन्नाशीच्या डॉक्टरांना पाहूनच दोघांना बरं वाटलं. त्यांनी संजय ने पुढे केलेले आधीचे सगळे रिपोर्टस् बाजूला ठेवून पद्मा ला विचारलं, 'तुम्ही सांगा, काय होतंय तुम्हाला? आणि कधी पासून?"

"आता जवळ जवळ पंधरवडा होत आला. खूपच थकवा येत राहतो सारखा. रोज वेग-वेगळ्या ठिकाणी अंग दुखतं, विशेषत: muscular pain असल्यासारखं वाटतं. बरेचदा पोटात ठसठसतं. झोप पूर्ण झाल्या सारखी वाटतच नाही, सारखं गळून गेल्यासारखं, अगदी शक्तिपात झाल्यासारखं वाटतं. कधी कधी ताप येतो, बहुधा सकाळी दोन-तीन तास मी बरी असते, मग थकवा आणि त्रास वाढत जातो."

डॉ. गानुनी तिला शांतपणे तपासलं, सगळे रिपोर्टस् भरभर चाळले, पण त्या सगळे महत्वाचे डीटेल्स लक्ष देऊन नोट करत होत्या हे स्पष्ट होतं. त्यांनी वर मान करून विचारलं, "असं आधी कधी झालं होतं?" पदमाने संजयकडे पाहत म्हंटलं, "नाही, थोडीशी weekends ना थकायचे तशी मी दोन एक महिन्यांपूर्वी, पण असा continuous थकवा आल्याचं आठवत तरी नाही."

"मला शक्यता वाटत नाही, पण इतर सर्व रिपोर्टस् निगेटिव्ह आलेत म्हणून आपण RA -rheumatoid arthritis- ची टेस्ट करून घेऊ. Rheumatoid arthritis ही एक autoimmune disorder आहे.." असं म्हणून त्या दोघांना ऑटो इम्युनिटी ची संकल्पना समजावून सांगितली. "मला सध्या तरी हा तो आजार वाटत नाही. आर ए टेस्ट दोन दिवसांत करून घ्या, पुढच्या गुरुवारी मी परत इथे असेन, त्यावेळी मला परत भेटा. मग पाहूयात काय ट्रीटमेंट द्यायची ते. तोपर्यंत गरज वाटली तर साधी तापाची किंवा अंगदुखीची गोळी घ्या आणि बाकी इतर सर्व औषधं थांबवा."

रविवारी आई-नाना आले, दोन -तीन तास बसले, आणलेला खाऊ आणि खेळणी संपदाला देऊन, "होईल गं बरं" म्हणून पद्माला दिलासा देऊन परतले. सोमवारीच आर ए टेस्ट चा रिपोर्ट आला, डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे तोही निगेटिव्ह होता, संजयने त्यांना पुण्याला फोन करून ते कळवलं. त्यांनी "ठीक आहे, गुरुवारी भेटते", म्हंटलं. शुक्रवारी रात्रीची फ्लाईट असल्याने संजय राहिलेल्या बर्‍याच कामांपैकी थोडी तरी आवरावीत म्हणून फिरतीला लागला. त्या दिवसापासून थेट गुरुवार पर्यंत पद्माला तितकासा त्रास झाला नाही म्हणून तिची कळी खुलली होती. गुरुवारी डॉ. गानुंनी तिला पुन्हा एकदा तपासलं. त्या म्हणाल्या, "मला आता या क्षणी तरी सिरीयस काही वाटत नाही. तुम्हाला allopathic औषधांची गरज आता तरी नाही, what might help you is some immune modulators. तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित, पण मी तुम्हाला एका आयुर्वेदिक वैद्यां कडे रेफर करते आहे, पुण्याला या सप्रे म्हणून एक उत्तम वैद्य आहेत, तुम्ही त्यांना भेटून सर्व हिस्टरी परत सांगा, त्या देतील ते औषध चालू करा, आणि मला दोन आठवड्यांनी भेटा." संजयकडे पाहत त्या म्हणाल्या, "माझ्या लक्षात आहे, तुम्ही निघताय उद्या, काही काळजी करू नका, we will take care of her."

**********
(क्रमशः)

कथाविचार

प्रतिक्रिया

मस्तच विषय, पुढे काय होते याची उत्कंठा आहेच.

नंदन's picture

4 Jan 2011 - 5:25 am | नंदन

मस्तच विषय, पुढे काय होते याची उत्कंठा आहेच.

--- असेच म्हणतो. वैद्यकीय संज्ञाही कथेच्या ओघात व्यवस्थित बसल्या आहेत.